Tuesday, January 18, 2011

तुमचं आमचं सेम नसतं भाग-२


...अशा त-हेने मी कोणत्याही मुलीच्या प्रेमात न पडताच कॊलेजच्या बाहेर पडलो, प्रेमात पडण्याच्या प्रयत्नांचा परिणाम अभ्यासावर झालेला दिसत होताच, तिथले मार्क वाढले नव्हते पण इथले तर कमी झाले होते.
कॊलेजच्या बाहेर पडलो आणि नोकरीला लागलो, आता इथे अनेक थोरा मोठ्यांबरोबर राहुन ब-याच गोष्टींच ज्ञान मिळत होतं. सुरुवातीचे काही दिवस काम करण्याच्या प्रेमात गेले, मग काही कंपनीच्या प्रेमात, आणि मग पुन्हा प्रेम आठवलं. घरुन पण "आता बघा लग्नाचं " अशी टोचणी सुरु झाली होती.
ऒफिस सोलापुरच्या मध्यवस्तीत बाजारपेठेतच होतं त्यामुळं ब-याच पोरी पाहायला मिळायच्या बसल्या बसल्या काम करता करता, पण सालं आमचं ऒफिसच असलं खतरुड होतं की आमच्या दिव्य व्यक्तित्वाचा प्रभाव फारसा पडायचा नाही. अशातच एका कमर्शियल बिल्डींगच काम आम्हाला मिळालं, अर्धी बिल्डिंग तयार होती आणि उरलेली आम्ही करत होतो. साहजिकच आधिच्या भागात जी ऒफिस होती, तिथली वर्दळ जाता येता सुखावु लागली.
त्यातल्याच एका दुकान कम ऒफिस ज्यादा मध्ये असलेल्या २-३ मुलींपॆकी एकीकडे जरा जास्त लक्ष जायचं, सुरुवातीला वाटायचं की हे उगीच होतंय, मग काही दिवसांनी मांजर डोळे मिटुन दुध पितं ती स्थिती आली. सहकारी होतेच पेटवायला आणि पार्ट्या उकळायला. दररोज ५-५० खर्च व्हायला सुरुवात झाली. असं करता करता २-३ आठवडे गेले. एका दिवशी साईटची सगळी कामं झाल्यानंतर वेळ होता म्हणुन तिथंच थांबलो होतो. तर आमच्या क्लायंट्च्या ऒफिसमधुन ती बाहेर येताना दिसली,आताशा तिथं ब-याच ओळखि झाल्या होत्या, म्हणलं आज त्यांच्याकडंच चॊकशी करावी आणि आत गेलो. पाहतो तो काय सगळॆजण पेढे खात आहेत. एका काकुंनी अर्धा पेढा दिला आणि म्हणाल्या " घे रे बाबा त्या वरच्या जोश्यांच्या पोरीचं लग्न ठरलंय". शपथ सांगतो त्यानंतर कधी कारलंही एवढं कडु लागलं नाही.
मग आडवळणानं थोडि चॊकशी केली, या परिस्थितित जास्त खोलात जाणं धोक्याचं होतं म्हणुन आपलं वर वर गप्पा, बरं या सगळ्यांत मला जेवढा आणि जो रस होता तो बाकी कुणाला नव्हता त्यामुळं १-२ वाक्यं झाली की बोलणी पुन्हा आमच्या कामाकडेच यायची.
अर्धा तास तिथं काढुन बाहेर येउन लकी मध्ये गेलो, एका मित्राला फोन केला त्याचं ऒफिस भागवत समोर होतं,तो पण काम संपवुन आला. त्याला थोडं सरळ काही फिरवुन फिरवुन सांगितलं, तो ही याच चक्रात पुरता अडकला होता. म्हणजे त्याला जी पोरगी पटवायची होती ती पटत नव्हती पण दुस-या पोरीनं त्याला पटवलं होतं. फक्त त्याच्या घरी जाउन ’ मॆं आपके बेटेके बच्चेकी मा बननेवाली हुं’ एवढं सांगणंच बाकी होतं. या गहन आणि अतिशय महत्वाच्या बिषयावर ब-याच चर्चा झाल्या आणि लकी वाल्यानं उठवलं म्हणुन घरी आलो. रात्र पुन्हा जागण्यात गेली.
दुस-या दिवशी पुन्हा साईटवर आणि सहज तिच्या ऒफिसवरुन गेलो तर ती एकटिच होती आत, एकदम सभ्यपणाचा चेहरा करुन आत जाउन अभिनंदन करावं असा विचार केला,तेवढ्यात तिच्या साहेबांचा आवाज आला, "नलिनी, जोशीबाई येणार नाहीत का लग्न केल्याशिवाय, फोन लावुन विचार जरा" म्हणजे ही जोशी नाही वा वा काय छान वाटलं मला, माझा जीव कितीतरी जोरात आणि किती मोठ्या भांड्यात पडला,त्या आनंदात गाणं म्हणत म्हणत बाहेर आलो, आज पुन्हा सगळं जग सुंदर वाटत होतं, हवा छान होती, झाडं डोलत होती वगॆरे वगॆरे.
पण माझ्या प्रेमाला अजुन मुहुर्त लागायची वेळ आली नव्हती, २-३ दिवसांतच माझी बदली दुस-या साईट्वर झाली आणि पुढचे ८ महिने तिथंच काढले. परत येउन पुन्हा साईटवर गेलो तर काय.....
हर्षद
वाचकांना नम्र विनंती बरा वाईट जो असेल तो प्रतिसाद द्यावा.

2 comments:

हर्षद छत्रपती said...

vikrant many a thanks and keep visiting.

Unknown said...

LAI BHARI...MOTHYANE HASAYALA YET RE

Post a Comment