Tuesday, April 19, 2011

तुमचं आमचं सेम नसतं - भाग १२


तुमचं आमचं सेम नसतं - भाग १२

लग्न, सत्यनारायण आणि तुळजापुरचं देवदेव सगळं व्यवस्थित पार पडलं. आज सकाळी लाडोबा तिच्या कॉलेजच्या शिबिराला गेली आणि दुपारी आई पंढरपुरला. मी ऑफिसात बसलोय. शनिवारचं फारसं काम नाहीये, पण पाच वाजेपर्यंत तरी बसुन रहायला पाहिजे. आज लेबर पेमेंटचा दिवस आहे त्यामुळं. सगळे पैसे चार वेळा मोजुन झालेत. दोनदा चुकीचे आणि दोनदा बरोबर.८ वेळा घरी फोन करुन झालाय.मैत्री ते प्रेम ते लग्न हा प्रवास फार थोडक्यात आटोपला आमचा. मैत्री तर कधी नव्हतीच असं वाटतंय, प्रेम झालंय असं वाटेपर्यंत आम्ही लग्न केलं. आता हा मैत्रि आणि प्रेमाचा गाळलेला पोर्शन कसा पुर्ण करणार आहोत काय माहिती.  

संध्याकाळी फिरायला जाणार आहोत, स्कुटी टाकलीय आज रिपेअर करायला, मला एकट्याला पिकप घेत नाही दोघांना काय होईल काय माहित. चला, चार झालेत आता सगळॆ मुकादम यायला सुरु होतील. आठ सत्तर, लेबर पेमेंट माझ्याकडे आल्यापासुनचं सर्वात मोठं पेमेंट आहे आज. तरी बरं  हिशोबाप्रमाणे नोटा वेगळ्या काढुन ठेवल्या आहेत तरी शेवटी आहेतच घोळ. बरं झालं मी लगेच जॉईन झालो आता याच्या परसेंट मधुन काही देणी उडवता येतील, का ऑफिसने गिफ्ट दिलंय म्हणुन काहीतरी घेउन जावं घरी का कुठंतरी फिरुन यावं, घराच्या कर्जाला तर भरता येणार नाहीच.उगी भावनेच्या भरात डोळ्यावर यायला नको. आणि माधवीला कुठं जायचं नाही हे समजवता समजवता जाम त्रास झालाय आणि आता एकदम जायचं म्हणलं तर तिला पण नसत्या शंका यायच्या. या अशा वेळी पैसे नाहीत म्हणुन कुठं जाता येत नाही हे वाईटच पण काही उपाय नाही. बाजारात फक्त नोटाच चालतात, भावना नाही. साहेबाचा बंगला आहे पण तो कुठं टिटवाळा का शहापुर आणि तिथं असल्या उन्हाळ्यात जाउन काय करणार, परत त्यानं हो म्हण्लं पाहिजे ना, लग्नाहुन यायला गाडी दिली हेच पुढची ४ वर्षे ऐकवणार आहे.

सगळी कामं संपवुन घरी फोन केला, माधवीला तयार व्हायला सांगितलं, ऑफिस बंद करुन स्कुटी घेतली गॅरेज मधुन आणि घरी आलो.दोन तीन वेळा बेल वाजवल्यावर माधवीनं दार उघडलं, माझं आवरुन होईपर्यंत चहा केला होता तो घेउन निघालो. साडी नेसल्यानं ति एका बाजुला बसणार होती, मला असं गाडी चालवायची सवय नव्हती, एकदा पडल्यानंतर आई कधी गाडीवर बसलेली नव्हती आणि लाडोबा ड्रेस घालुन बसायची. बिल्डिंगच्या पार्किंगबाहेर आलो आणि जमलं एकदाचं. हे जमलं म्हणजे संसार करायला पण जमेलच. पैसे खिशातच होते, घरी ठेवले तर कशाचे म्हणुन सांगणार माधवीला हा प्रश्न होता.हुतात्मा बागेत गेलो,फिरलो बोलणं आजच्या पेक्षा कालच्या बद्दलच जास्त. तसे दोघांकडे बरेच कॉमन मुद्दे होते , बाबांचं जाणं, आईनं ठाम उभं राहणं वगैरे. आपल्या आपल्या पालकांबद्दलचा हा अभिमान कधीतरी मुद्द्यावरुन गुद्द्यावर येणार आहे याची जाणिव होत होती. पण बहुधा यालाच संसार म्हणतात. बागेतुन बाहेर येउन चव्हाणकडं कचोरी, भेळ खाउन घरी आलो. दुपारी स्वयंपाक जास्त झालाय तो संपवणं भाग होतं, कारण घरातलं अन्न वाया घालवण्यावरुन मार खाल्लेला असणं हा एक कॉमन मुद्दा आत्ताच चर्चिला होता.

घरी आलो, आता पैसे काढुन ठेवणं भागच होतं, लाडोबाच्या खोलीतल्या कपाटात पैसे ठेवतानाच माधवीनं विचारलं ’अन्याच्या खोलीत काय करतोस?’ ’घरातली सगळी महत्वाची कागदपत्रं, पैसे वगैरे याच कपाटात असतं’ तिला सांगितलं. तिनं जेवायला घेतलं होतं, आता जास्त जेउ नये असं वाटत होतं पण ’आमच्याकडं’ या सदराखाली जगातल्या बहुतेक चांगल्या गोष्टींची यादी ऐकवल्यानंतर न जेवणं म्हणजे माघारी होती, जी मला पहिल्याच दिवशी नको होती. करपलेल्या मोहरीची आमटी आणि भात खाउन ’मी जरा जाउन येतो’ असं सांगुन बाहेर पडलो. स्कुटी काढली आणि घरापासुनच्या जरा लांबच्या मेडिकलमध्ये जाउन आलो. एवढ्या रात्रीपण जाम गर्दी असते मेडिकल दुकानात. घरी येताना ५-६ गजरे घेउन आलो.

घरी आलो, दरवाजा उघडुन माधवी आत पळाली आणि अत्तराचा घमघमाट जाणवला. आत जाउन पाहिलं तर माधवी स्प्रेच्या फुटलेल्या बाटलीचे काचा गोळा करत होती, ’अरे मी खुर्चीवर उभं राहुन उडवत होते तर पडलीच खाली’ हे सांगताना तिचा चेहरा जाम लाडिक+त्रासिक झाला होता. तिचं काचा गोळा करुन होईपर्यंत कॉटवर बसुन होतो, सगळा कचरा टाकुन ती पुन्हा आत आली, आमच्या आयुष्याच्या खरी सुरुवात का ख-या आयुष्याची सुरुवात काही सुचत नव्हतं. कारण माधवी पुढं आलीच नव्ह्ती दारातच उभी होती खाली बघत. अक्षरक्ष: काही मिनिटं गेली अशीच, एकदम भानावर आल्यासारखं झालं मीच उठुन तिच्याकडं गेलो, तिचे हात हातात घेतले, दोघंही कॉटकडं आलो. बाजु बाजुला बसलो, एक शब्द नाही फक्त पंख्याचा आवाज होता. अजुन ही दोघात बरंच अंतर होतं यापेक्षा जवळ लग्नात बसलो होतो. तिचे हात सोडुन टेबलावरचा गज-याचा पुडा उघडुन तिच्यासमोर धरला, तिची काहीच हालचाल नाही,हे क्षण काय करावं हे कळु नये असेच असतात का काय करावं हे कळत नाही म्हणुन असे असतात. दोन गजरे काढुन तिच्या समोर धरले, तिनं घेतले आणि तसेच हातात ठेवुन बसली ’घाल ना’, कोरड्या घशातुन कसाबसा आवाज आल्या माझ्या. तिनं हात मागं घेउन केसात अडकवले.  अगदी माधवीला स्वप्नात कल्पुन पण बरीच स्वप्नं पाहिली होती, पण आता ती खरी होत आहेत असं वाटतानाच खुप दुर आहेत असं वाटत होतं. तिचं गजरे घालुन झालं पुन्हा हात खाली घेउन बसली,हसली पण नाही माझ्याकडे बघुन. हळुच मागं सरकुन डोक्याखाली हात घेउन एका कुशीवर झोपलो. तिनं मागं पाहिल्यावर ये ना इकडं असा हातानंच इशारा केला.


माधवी -

कशी असते सुरुवात संसाराची अशीच की वेगळी, सुमतीचे बाकी सल्ले आठवत नव्हतं,नको म्हणु नकोस एवढंच आठवत होतं. मागं सरकले, पाय वर घेउन हळुच झोपले, त्यानं वाकुन गज-याचा पुडा घेतला आणि उरलेले गजरे तोडुन फुलं सगळ्या कॉटवर पसरली, काही माझ्यावर सुद्धा. मी चेह-यावरची फुलं बाजुला करायला लागले तर म्हणाला ’ थांब मी टाकलीत मीच काढतो’ पटकन एका बाजुला वळले, त्याचा हात माझ्या हातावर येत होता, बोटात बोटं गुंतत होती, कानात काहीतरी बोलला आणि...

पहाटे जाग आली तेंव्हा जेवढं रात्रीचं आठवतंय तशीच झोपले होते, त्याच्या डाव्या हातावर माझा डावा हात ठेवुन त्यावर डोकं ठेवुन,  मानेच्या खाली पाठीवर त्याचे श्वास अजुन जाणवत होते. माझा उजवा हात धरुन त्यानं मला घट्ट धरुन ठेवलेलं. म्हणजे सुमतिचा सल्ला डावलुन मी नको म्हणाले होते  तिथंच तो थांबला होता. त्याच्याकडं पहावं म्हणुन वळायला गेले, लगेच त्याची पकड अजुन घट्ट झाली. अजुन थोडी हलले तर त्याला जाग येईल म्हणुन तशीच पडुन राह्यले, डोक्यावरच्या खिडकितुन गार वारं येत होतं. एवढा वेळ वाजली नाही पण आता थंडी वाजत होती, आपसुकच मागं त्याच्याकडं सरकले, त्याला जाग आलीच, मान वर करुन त्यानं मला जागा करुन दिली आणि पुन्हा हात घट्ट पकडला. उजव्या  हातानं मंगळसुत्राशी खेळत होते. दहा मिनिटानी हॉलमधल्या घड्याळाचा अलार्म वाजला, पाच वाजले असावेत. हात सोडवुन उठत तो म्हणाला ’अलार्म बंद करु दे सरक’ थोडं कोरडंसच. उठुन खाली पडलेली साडी गोळा करत होते तेवढ्यात तो आला आणि दरवाज्यात थांबुन माझ्याकडं बघत होता, रात्री त्याला नाही म्हणलं होतं पण आता त्या नजरेला नाही म्हणायची हिम्मत माझ्यात उरली नव्हती आणि गरज पण वाटली नाही.

दुधवाला ४-५ वेळा बेल वाजवुन निघुन गेला, मी तशीच त्याच्या मिठित पडुन होते. चांगलंच उजाडलं होतं आता, त्याचा हात ढकलुन उठले, पुन्हा झटक्यात ह्यानं हात पकडला आणि परत मागं ओढली, अजुन अर्धा तास तसंच बोलत होतो. फोन वाजल्यावर उठणं भागच होतं. मी त्याच्या अंगावरची चादर ओढुन घेतली तसं तो उठुन गेला बाहेर. मि पण उठुन आवरलं, केसाची पिन आणि टिकली सोडुन सगळं सापडलं. बाहेर गेले, हा फोनवर बोलत बसला होता, मी हातानंच कुणाचा आहे विचारलं ’बहिणाबाई आहेत तुझ्या, घे फोन’, असं म्हणुन फोन पुढं केला. मी फोन घेतला हा समोरच बसलेला, त्याला हातानंच आत जा म्हणलं तर गाल फुगवुन हुप्प केलं आणि नाही अशी मान हलवली. तिकडुन ताइ हॅलो हॅलो करत होती, आता मला दोन महिन्यापुर्वीचं तिचं चिडणं समजत होतं. मी पुन्हा त्याला ’ आत जा प्लिज’ असं खुणेनंच सांगितलं,त्यावर त्यानं २ बोटं ओठांवर ठेवली आणि मला एकदम हसु आलं, तो उठुन आत गेला. मी जरा थांबुन ’ हॅलो बोल ग तायडे’, अशी सुरुवात केली. तायडीचा पहिला प्रश्न ’ काय ग कीति बिस्किटात पटला सौदा?’ ’दोन’ मी पटकन बोलुन गेले, तेंव्हा हा दारात उभा राहुन हसत होता.

-- --- --- -- -- --- गोडी अपूर्णतेची लावील वेड जेंव्हा


सर्व वाचकांना,

हर्षद आणि माधवीचा नमस्कार,गेले आठवडाभर असे बरेच नमस्कार घातलेत आम्ही, पण तुम्हाला हा खास कारण आमच्या आयुष्याच्या ह्या एका तुकद्याबद्दल आम्ही जे सांगितलं ते तुम्ही आवडुन घेतलंत. हा प्रवास इथं सध्या थांबवतोय, कारणं तुम्हाला कळालीच आहेत. नवं आयुष्य सुरु झालंय, ही नव्याची नवलाई संपेल आणि संसार सुरु होईल. तुमच्या सारखाच,काही वेगळा नसेल फारसा, मग तेच तेच काय सांगायचं तुम्हाला.

तुमचं जे प्रेम मिळालं त्याबद्दल अतिशय आभार. काही वेगळं,विशेष सुखाचं मजेचं होईल तेंव्हा येउच सांगायला परत.

आम्ही आनंदी राहु हे आमचं वचन, तुम्ही पण तसंच वचन द्या. एवढं बोलुन, आज सकाळीच दोघांना मिळुन सुचलेल्या चार ओळी आपल्या समोर ठेवुन रजा घेतो, कळावे लोभ असावा. टाटा बाय बाय.

दु:ख अपमान माळ्यावरची गाठोडी ।
जनांपुढे काय उघडावी ती ॥
सुख सन्मान फुलल्या फुलांची करंडी।
घेउनी येउ तुम्हासाठी लुटावया॥

हर्षद-माधवी.

9 comments:

Anonymous said...

Hello Harshad and Madhavi, many more congrats. Wishing you all the happiness in the world and a happy,healthy married life. God bless you. Waiting for the next post. But you can take your time otherwise your betterhalf will get angry. As you ask me I did reply to your mail.Thanks. Sneha,Singapore.

वैभव गायकवाड said...

माझं देखील पुढच्या महिन्यात लग्न आहे....तुमची मालिका वाचताना सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत होते...आणि नकळत आमच्या स्थितीशी तुलना होत होती...तुम्ही मालिका संपवलीत, आता आम्ही इतकं मन लावून काय वाचायचं? फार कमी लेख इतके दर्जेदार असतात, त्यात तुम्ही एक-दोन नाही तर तब्बल १२ लेखांची मालिका लिहिलीत...खूप सुंदर लिखाण....असेच लिहित राहा...आणि तुमच्या वैवाहिक आयुष्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा.

Unknown said...

superb,sagale 12 lekh apratim hote kontahi bhag kantalwana vatala nahi

हर्षद छत्रपती said...

@ sneha - thanks a lot for your email. please confirm your surname because i have got mail from two ids. thanks a lot for reading the series.
@ vaibhav, congratulations and wish you a very happy, healthy and wealthy married life.
@ dattatray, thanks a lot for following the series and your comments, that has really helped me in writing. can you please email me at harhsad.chhatrapati@gmail.com

Anonymous said...

Hello Harshad, I don't have surname. In mail my name is sneha sivarajakrishnan. I have send you the mail again. Thanks. Sneha, singapore.

Anonymous said...

your posts are very honest and hence fresh. I love them! Wish you a very happy married life!!

- Nikhil.

हर्षद छत्रपती said...

nikhil,very very thanks for the comments which will keep me supporting in writing in the future. can you please drop and email to me at harshad.chhatrapati@gmail.com

Anonymous said...

khup ushira suruvat kelya mule sagle bhaag ekdam vachta ale...farch cchan ahet,
best wishes.
Prachi

Unknown said...

प्रिय हर्षद,

तुमचे सगळे लेख मला एका बैठकीत वाचनास भाग पडले. (ते हि office चे काम सांभाळत ) तुमची लेखन शैली अतिशय सोपी पण मानस भावणारी आहे. माझ्या घरासमोरच वाचनालय असल्याने मला लहानपणापासून कथा कादंबरी वाचनाची गोडी होती. तुमची हि कथा सुहास शिरवळकर यांच्या "बरसात चांदण्याची" या कथे सारखी आहे. खूप बरे वाटले. खरे तर मला मराठीत सुधा ब्लोग असतात हे मे-२०१२ मध्ये समजले आणि मराठी ब्लोग विश्व वरील सगळे ब्लोग रोज जमेल तसे वाचतोय. जर तुमचा फोन नो. मिळाला तर बरे होईल.

धन्यवाद !

प्रमोद देर्देकर

Post a Comment