Tuesday, January 20, 2015

आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२

आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२

' माफी अन बिना शिक्षेची, माणसांवरचा विश्वास कधीच उडालाय रे माझा, शिक्षा करणारच तुला, तसा नाही सोडणार, घाबरु नकोस शिक्षा पैशाचीच असेल आणि आयुष्यातुन उठवणार नाही तुला एवढं लक्षात ठेव.' - एवढं वाक्य दिसलं, अन माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, जाग आली तेंव्हा मी बेडवर झोपुन होतो, बायको समोर बसुन होती, अन दोन्ही पोरी तिला बिलगुन उभारल्या होत्या. मेव्हणा खिडकीत उभा राहुन टॅबकडं पाहात होता वेड्यासारखा.
संध्याकाळ असावी असं वाटलं, उठुन बसलो, ' आलिया भोगासी असावे सादर' अजुन काय बोलु मी तरी ? मेव्हणा बोलला आणि निघुन गेला..
बायको दोन्ही मुलींना घेउन दुस-या बेडरुममध्ये गेली, मी समोरच्या टॅबकडं पाहात होतो. कधी तरी ऐकलं होतं की या विश्वात निर्माण झालेला प्रत्येक ध्वनी हा या इथंच कुठंतरी तरंगत राहतो, तो पुन्हा कधीतरी तुम्हालाच ऐकु येउ शकतो. या आंतरजालाचंही तसंच आहे, प्रत्येक डिस्कवरचे काही मॅग्नेटिक संकेत बदलले जातात प्रत्येक वेळी, पण ते मॅग्नेट मागचे संकेत लक्षात ठेवत नसेलच असं नाही, आणि अगदी लाखो करोडोत एकदा असा विचार केला तरी, प्रत्येक संकेत पुन्हा एकदा त्याच रुपात त्याच ठिकाणी येउ शकतोच की.
पुन्हा एकदा मागच्या मार्गानंच हेम्याला फसवावं का असा विचार केला, पण ते शक्य नव्हतं. टॅब उचलुन हातात घेतला, प्लिपकार्ट ओपन होती, आणि माझ्या नावानं एक नविन टॅब कार्ट मध्ये टाकलेला होता, ड्युअल सिम आणि ३जि असलेला. वर्ड फाईल उघड्ली, म्हणजे हेम्या आला, आणि आदेश दिला.. ' तुझ्या कार्डाचे डिटेल टाक, आणि टॅब आल्यावर मला कळेलच तेंव्हा काय करायचं ते सांगतो तुला.'
नकार शक्य नव्हताच, कारण हेम्या काय करु शकतो याची कल्पनाच काय परिणाम देखिल माहित होते. माझं डिटेल टाकुन झालं, आणि बाहेर हॉल मध्ये माझ्या सकाळपासुन बंद असलेल्या फोनच्या अंगात जीव आला आणि एसेमेसचा टोन वाजला, मोठी कन्या पळत फोन घेउन आली, तिच्यामागं बायको आणि तिच्या हातुन फोन घेउन मेसेज वाचत म्हणाली ' झाली सुरुवात आर्थिक शिक्षेची'. तो फोन पण बेडवर आदळुन निघुन गेली. डोकं जड झालं होतं, कितीतरी वेळ तसाच पडुन होतो, जाग आली तेंव्हा रुममधला  छोटा दिवा चालु होता, बाजुला  कुणीच नव्हतं, टॅब पण बंद होता. बेडवरुन उठत बाहेर आलो, हॉलमधल्या घडाळ्यात साडेतीन वाजले होते. दुस्-या बेडरुममध्ये तिघी झोपल्या होत्या, किचन मध्ये पाहिलं, बेसिन मध्ये तिन ताटं होती, कट्यावर कुणीतरी आणुन दिलेला डबा होता. फ्रिज  उघडुन एक सफरचंद घेउन हॉल मध्ये येउन बसलो, टिव्ही लावला, बराच वेळ चॅनल बदलण्यात गेला,शेवटी एक बातम्याचा चॅनल लावला अन सफरचंद खात बसलो, सकाळी साडेपाचच्या सुमारास अलार्म झाला, बायको उठुन आली. माझ्या हातुन रिमोट घेतला अन शेजारी बसुन माझ्या डोक्यावरुन हात फिरवत बसली, लहान लेकरासारखं तिच्या मांडीवर डोकं ठेवुन मी रडायला लागलो.
' का रडतोयस, कशाचं वाईट वाटतंय, का भीती वाटतेय भविष्याची ?, टाळता येणार असेल रडुन उपयोग आहे का, टाळ मग ते आणि नसेल तर जे होईल त्याला सामोरं जा.'  उठुन तिचे दोन्ही हात हातात घेत मी म्हणलं ' माझं जे होईल त्याला मी सामोरं जाईन, पण तुमची काळजी वाटते गं, मला काही झालं तर तुमचं कसं होणार याची कल्पनाच करवत नाही., या दोघींना कशी सांभाळशील, काय सांगशील बाबा कुठं गेला म्हणुन, समजायच्या वयात येईपर्यंत किती अवघड होईल ना तुला त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत राहणं याची भीती वाटते. '
म्हणजे बदनामीची भीती नाही तुला, डायरेक्ट मरणाचीच गोष्ट सुचतेय तर, असला कसला भित्रा रे तु ? अनुजानं डोळ्यात पाणी आणुन विचारलं, घशातुन शब्द बाहेर पडत नव्हते तिला उत्तर द्यायला, तिला सांगायचं होतं ' बाई, बाबा देवबाप्पाकडं गेला हे सांगणं सोपं आहे, शेजार पाजारचे, नातेवाईक थोडी सहानुभुती तरी दाखवतील, पण मला तुरुंगवास झाला आहे हे कसं समजावशील, आणि तु लाख समजावशील, पण बाकीची लोकं माझ्या लेकींकडं एका चोराच्या मुली म्हणुनच पाहतील ना, त्याची भीती वाट्ते. ' पण सांगायची डेअरिंग झाली नाही.
आज ऑफिसला येत नाही असा नितिनला एसेमेस केला आणि सकाळची आन्हिकं आवरुन घेतली, तोपर्यंत दोन्ही पोरी उठल्या होत्या, त्यांचं आवरुन अनुजा त्यांना शाळेच्या बसमध्ये सोडुन आली. तिचं किचनमधलं आवरुन झाल्यावर दोघांसाठी चहा घेउन आली, दोघंजण गॅलरीत बसुन चहा पित होतो. ' आपण धनुभावजींना विचारायचं का याबद्दल ? त्यांच्याकडं काही उपाय असेल या सगळ्यावर. '  आयटित असुन सुद्धा अध्यात्माबद्द्ल बरंच कळत त्यांना'. खरंच धन्याला विचारावं एकदा, पण पुन्हा अध्यात्म वेगळं आणि तांत्रिक वेगळं. मग दिवसातला बराच वेळ असाच भलते सलते विचार करण्यात घालवला. दुपारी पोरी घरी आल्यावर कालचं काहीच टेन्शन त्यांना जाणवणार नाही याची काळजी आम्ही दोघंही घेत होतो. संध्याकाळी सगळेजण कोथरुडच्या बागेत गेलो, खरंच जवळपास ८-९ महिन्यांनी इथं येत होतो, बाग बरीच बदलली होती, नविन जॉगिंग पाथ आणि बरंच काही बदललेलं होतं. दोन्ही पोरी तासभर खेळल्या, मग बाहेर येउन घोड्यावर बसणं, पाणीपुरी वगैरे शिस्तीत झालं. साडेआठच्या सुमारास घरी आलो. नितीन खालीच भेटला पार्किंगमध्ये. अनुजा अन दोन्ही मुली वर गेल्या आणि आम्ही दोघं खालीच बागेतल्या बाकावर बसुन बोलत राहिलो, जे दिवसभर अनुजाबरोबर बोललो तेच पुन्हा एकदा नितिन बरोबर बोलुन झालं. साडेअकराला वर घरी आलो.
बेडरुममधल्या कपाटातुन टॅब बाहेर काढला, हेम्या ऑनलाईन होताच, ' काय आज सुट्टी काढली होती काय हापिसातुन ?'- पहिला प्रश्न. ' मी विचारलं - ' हो, पण तुला कसं कळालं, खरंतर तुला कळु नये म्हणुन दिवसभर तुला हात नव्हता लावला मी ' दोन चार हसण्याच्या स्माईली टाकुन हेम्या टायपला - ' तुला आठवतंय मी यात अडकलो कसा ते, फ्रिक्वेन्सी जुळल्या होत्या, तसंच तुझी एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे, तुझ्या हार्टची धडधड एका विशिष्ट पद्धतीनंच होते, आणि हे कळतं मला सगळं. त्या धडधडीचा संबंध तुमच्या रुपाशी पण असतो माहितीय का ?  म्हणजे बघ तुझ्या हार्टची लय जेवढी मद्द आणि मंद आहे ना त्यापेक्षा तुझ्या बायकोची जास्त सुंदर आहे, ती ऐकत राहिलं ना तर काही वेळानं  त्या लयीशी जुळवुन घ्यावंसं वाटतं मलापण, म्हणजे ती दिसायला तुझ्यापेक्षा उजवी आहेच बरोबर ना ? ' मी गप्प, हेम्या भुत असला तरी पुरुष होता किंवा भुतात स्त्री पुरुष असं काही असतं का माहित नाही, पण शेवटी एका पुरुषाचंच भुत होता. ' अबे, गप का झाला, आता काही करणार नाही तिला घाबरु नको, शिक्षा तुला देणार आहे तिला नाही, जा झोप आता उद्या ऑफिसला जायचंय, आणि हो उद्या तो नविन टॅब घेउन ठेवायला सांग अन्नुला.... ' हेम्या गायब होता होता टायपुन गेला, टॅब ठेवताना मी पुन्हा एकदा नीट पाहिलं ते अन्नु बोल्ड केलेलं होतं.....
क्रमशः

Thursday, January 1, 2015

आर्ट ऑफ द स्टेट

नेहमी सारखा तो दिवस उगवला, म्हणजे सुर्य उगवला आणि दिवस सुरु झाला, दोन चार दिवसापुर्वीच परीक्षा संपलेल्या असल्यानं घरातली सकाळची गडबड शांत झालेली होती, तरी पण वर्षभराच्या सवयींनं सगळं घर जागं झालेलं, अर्थात त्या जागेपणावर आळसाची एक मस्त साय आलेली होती.
मी, बायको अन दोन्ही पोरी सगळेजण निवांत बेडवर लोळत होतो, दोन्ही पोरींचं लाथा आणि उशीयुद्ध मधुन मधुन नियंत्रित करत, रविवारची सकाळ कुणाच्या घरी धाड घालावी यावर आम्ही दोघंही स्वतंत्र विचार करत होतो.
एका क्षणी, दोघांचा एकदमच आवाज आला, ''बंडाकडं जायचं ?'', आता एकमेकांना एकच प्रश्न विचारला म्हणजे उत्तर होकारार्थीच असणार होतं, ही दोन लेकरं आमच्या आयुष्यात येण्याआधी आम्हां दोघांचं असं एकमत फार दुर्मिळ होतं, पण या दोन लेकरांनी त्या असहमतीच्या वेड्या वाकड्या काठ्या मोडुन टाकल्या होत्या, दोघांचे प्रखर इगो विरघवळुन त्याचाच नॉर्थन लाईट सारखा विस्मयकारक शो दोन लेकी आम्हाला दाखवायच्या.
पण बंडाकडं जायचं म्हणजे सोपं काम नव्हतं, सगंळ्यांत महत्वाचं बंडा कुठंतरी ट्रेस होणं, दर रविवारी ' मी माझा' याला वाढवुन 'आम्ही आमचे' तत्त्वात फिरणारे बंडा आणि त्याचं कुटुंब, घरी असेल किंवा नाही याची खात्री नसायची. बायकोनं आमच्या दोघांत दहा-वीस केलं आणि निर्णय दिला की फोन करायची पाळी तिची आहे, मी पुन्हा पांघरुणात गुरफटुन गेलो आणि ही गेली बंडाला फोन करायला.. दोनच मिनिटांत हॉल मधुन हिचा आवाज आला. ' अहो, तुमचा फोन बंद पडला आहे, रात्री चार्जरचं बटण चालुच केलं नव्हतं आणि वायफाय चालु राहिलं बहुतेक, काय करु ?', अंथरुणातुन न उठताच मी ओरडलो, ' चार्जिंगला लाव ना मग, होईल पाच मिनिटात चालु,' , ओके बॉस, आणि उठा आता मी कॉफि करते आहे, चला लवकर - इति बायको हॉलमधुन. आई कॉफि करणार आहे, दोन्ही पोरींनी ऐकलं आणि उशा तशाच टाकुन, 'बाबाला सुट्टी आवरायची डुट्टी' हा नियम ऐकवुन बाथरुममध्ये गेल्या पण. अशा क्षणांना मी जगुन घेतो, आपल्याच संसाराकडं थोडंसं त्रयस्थ नजरेनं पाह्तो आणि डोक्यात ' लागो न द्रुष्ट माझी माझ्याच संसाराला' म्हणुन घेतो..
बेड आवरुन, सकाळची आन्हिकं आवरुन हॉलमध्ये येईपर्यंत, बायकोच्या दोन वेळा आणि पोरींच्या दहा वेळा हाका मारुन झाल्या होत्या. हॉल मध्ये पेपरच्या पसा-यात आमच्या घरातली बहुमतातली मेंबरं बसुन होती. एवढ्या वेळात फोन चालु झाला म्हणुन मी बंडाला फोन लागतोय तो पाहतोय तर, फोन ढिम्मच, निदान चार्जिगचा सिग्नल देखिल येत नव्हता. 'तुझा फोन बघु ग, ह्याला काही तरी झालंय पुन्हा', असं म्हणुन बायकोचा फोन घेउन बंडाला फोन लावला, तर त्याचा फोनमधुन 'आप कतार में और हम सतार में' हे ऐकु आलं. कॉफि पिउन मगच बघुया असं म्हणुन कॉफि प्यायला बसलो. सुडोकु, शब्दकोडं आणि ठिपके जोडुन हत्ती बनवा हे करुन झाल्यावर, पुन्हा फोन लावला बंडाला तर पुन्हा तेच 'आप कतार में और हम सतार में'. मग चिडुन पुन्हा माझ्या फोनकडे नजर फिरवली, साहेब अजुन ढिम्मच होते. तिकडुन ओठाच्या कोप-यातुन बायको हसत म्हणाली, ' घ्या अजुन घ्या साडेपाच ईंची फोन सात हजारात, काय तर म्हणे कार्बन, मी तर या नंतर हेलियमचा फोन घेणार आहे, एकदम हवासेभी हलका'. तिच्या जवळ जाउन कानात खुसपुसलो, बट साईझ ड्झ मॅटर मॅडम'. आणि तिनं तिचा फेवरिट प्रश्न विचारला, ' स्वल्पविराम कुठं, ?' आणि अजुन एका रविवारची सुरुवात मनमुराद हास्यानं झाली.
' चल गं, मी आंघोळ आवरुन घेतो, तु ट्राय करत रहा तुझ्या फोन वरुन' असं म्हणत मी सटकणार, तर लगेच ऑर्डर आली, ' एक नग घेउन जा विसळायला, दुसरा मी विसळते', चला धाकटीला उचलुन संडे बाथची मज्जा असं म्हणत बेडरुम मध्ये निघुन गेलो. शॉवरच्या गार पाण्यात चांगला अर्धा तास घालवल्यावर त्या पाण्याच्या आवाजाच्या वरताण बायकोचा आवाज आला तसं पोरीला बाहेर पिटाळ्लं आणि लगेच मीपण आवरुन घेतलं, बाहेर येउन पाह्तो तो मोठी कन्या आणि बायको, कपाटातुन जुना टॅब काढुन त्यात सिमकार्ड घालुन तो चालु करुन बसल्या होत्या, त्यावरुन फोन लावत बंडाला. मला पाहुन कन्या बोलती झाली ' बाबा हा टॅब सारखा हँग होतो आहे, मध्येच एक फाईल उघडते सारखी, खुप जुना आहे ना रे, किटकॅट टाक ना यात.
रविवारीच मंडे ब्लुच नाही तर ब्लुच्या सगळ्या शेड डोक्यात घुमायला लागल्या...' हज्जार वेळा वाद झालेत ना त्या टॅबवरुन मग का पुन्हा चालु केला आज, काय हौस आहे एवढी रिस्क घ्यायची, आधुनिक काळातला पेशव्यांचा उजव्या सोंडेचा गणपती आहे हा, आणि आता बंद सुद्धा होत नाहीये, ' तो टॅब बेडवर आपटत मी बोललो. ' अरे पण मग ठेवलासच का घरात, का नाही देत टाकुन तळ्यात, जादुच्या दिव्याची जादु हवीय पण धुर नकोय हे कधीपर्यंत चालणार. निदान आतातरी घाल बत्ता त्यावर, ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी, आहे का दम तेवढा ?' दोन्ही पोरी बाहेर टिव्हीला चिकटवुन बेडरुमचा दरवाजा लावुन आम्हां दोघांचा वाद चालु होता.
' तुझं काय नुकसान केलं होतं मी ? हा एकच प्रश्न जवळ्पास २९७ पानं टाईप केलेला होता, आणि हा आकडा वाढतच होता.
बायको, आणि पोरी तिच्या भावाकडं गेल्यावर हॉलमध्ये एकटाच बसुन त्या टॅबकडं पाहात होतो, आणि शेवटी धीर करुन हात उचलला, आणि टाइप केलं..
' हेम्या, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी, मी खुप घाबरलो होतो, माझी फॅमिली, पोरी, त्यांचं भविष्य, मी घाबरलो होतो रे खुप, माफ कर मला हेम्या माफ कर.'