Sunday, February 24, 2013

अंकोदुहि - ०४


भाग - ४
 तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली  होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' .... पुढं

आई तो एकच शब्द बोलुन निघुन गेली, बराच वेळ मी जागी होते पण शेवटी रात्री आईनं जेवणात ज्या औषधी घातल्या होत्या त्यांचा परिणाम मला जाणवायला लागला, मला झोप लागली. पहाटे नुकतंच उजाडायला लागलं तेंव्हाच जाग आली. रात्रभर न हलवल्यानं हात जड झाला होता. मी उठुन माझ्या खोलीच्या गवाक्षात आले, तिथुन मला सुर्योदय दिसत नाही, पण समोर न दिसणा-या सुर्यनारायणाच्या आगमनानं सगळं आकाश रंगुन गेलेलं पहायला मला नेहमीच आवडायचं. आज सुद्धा मी तसंच पाहात उभी होते गवाक्षाजवळ, तेवढ्यात सखीनं बाबा येणार असल्याची सुचना दिली. मी अंगावरचे ओघळलेली वस्त्रं सावरली. केसातली सुरकुतलेली फुलं काढुन टाकली.

बाबा आत आल्यावर त्यांच्या पाया पडुन एका बाजुला उभी राहिले. बाबा एका आसनावर बसुन होते. ' बाळा, आजपासुन मी स्वयंवराची आमंत्रणं करण्यासाठी निघतो आहे. आसपासच्या काही महत्त्वांच्या जनपदांमध्ये प्रत्यक्ष जाणं फार गरजेचं आहे. ' या वर मी काही बोलावं असं काहीच न समजल्यानं मी पलंगाच्या कडेला हात धरुन निश्चल  उभी राहिले. दोन क्षणांच्या शांततेनंतर पुन्हा बाबा बोलले ' याच प्रवासात तुझ्यासाठी सुद्धा योग्य वर पहावा अशी माझी इच्छा आहे, आणि एक पिता म्हणुन मी तुझा विचार घेण्यासाठी आलो आहे याबाबतीत, तुझी काही इच्छा किंवा काही अट आहे विवाहासंदर्भात.'

 हात पाय थरथरत होते, मैत्रिणिंबरोबर विवाहाबद्दल गुजगोष्टी करणं, आई आणि काकु आमच्या विवाहाच्या चर्चा करत असताना त्यांच्या मागं पुढं फिरुन लाड करुन घेणं अन हे असं बाबांनी  स्पष्ट विचारणं, मी तशीच मान खाली घालुन उभी राहिले. भीती, उत्सुकता, आनंद आणि लज्जा ह्या सगळ्या भावना एकदम माझ्या मनात फेर धरुन होत्या. शेवटी सुटका बाबांनीच केली ' बरं, मी समजु शकतो तुझी मनस्थिती, आता निघतो मी पण बरोबर मध्य प्रहराला आम्ही निघणार आहोत, तोपर्यंत काही सांगायचं असेल तर मला सांग, आणि हो काही नसेल तुझ्या मनांत तर तसंही कळव, मग मी माझ्या या लाडक्या लेकीसाठी योग्य असा एक वर निवडुन आणतो. जसं या घरात सुख अनुभवलं आहेस तसंच सगळं आयुष्यभर अनुभवशील याची काळजी तुझा हा पिता निश्चित घेईल, चिंता करु नकोस. ' एवढं बोलुन बाबा आसनावरुन उठले तोच माझ्या तोंडातुन शब्द निघाले 'मला पती क्षत्रियकुळातलाच हवा, आणि तो देखील पराक्रमी, सर्व शस्त्रनिपुण असाच'  आपल्या गुड्घ्यांवर जोर देत बाबा उठुन माझ्याकडं आले, डोक्यावर हात ठेवत म्हणाले ' बाळा तुला उदंड आयुष्य लाभो' आणि निघुन गेले.

सकाळची आन्हिकं आवरुन आम्ही स्वयंपाकघरात एकत्र येण्याआधी देवघरात जाउन प्रार्थना केल्या. ते धनुष्य कालपासुन देवघरातच ठेवलेलं होतं. त्याच्या दोन्ही वक्रांवर लावलेले चंदन आणि कुंकवाचे पट्टे त्याच्या असामान्यतेत भरच घालत होते. त्याची प्रत्यंचा मात्र एका बाजुला गुंडाळुन ठेवलेली होती. देवासमोर हात जोडताना नकळत त्या धनुष्यासमोर सुद्धा हात जोडले गेले. स्वयंपाकघरात आई आणि काकु, बाबांच्या बरोबर जे पदार्थ द्यायचे होते त्यांची तयारी करत होत्या. ताई, मी आणि धाकट्या दोघी त्यात गुंतलो. मध्य प्रहराला थोडासाच वेळ होता तेंव्हा प्रवासाला दिले जाणारे पदार्थ बाहेर मागवले गेले. थोडा वेळ फार लगबग झाली, आचारी, दास, सखी यांचा थोडा गोंगाट झाला आणि मग सगळंच एकदम शांत झालं. कालचा सोहळा पार पडल्यानंतर कुलगुरुंनी ताईच्या स्वयंवरासाठी दिवस ठरवुन दिला होता. अजुन दोन महिने होते मध्ये. पण घरात सगळीकडं त्याचीच चर्चा चालु होती, दास, सखी, भाट, ब्राम्हण आणि सैनिक सर्वांच्या तोंडी हाच एक विषय होता. ज्यांना ते धनुष्य त्या खोलीतुन देवघरात नेलं जात असताना पाहायची संधी मिळाली होती ते त्याचं वर्णन करुन इतरांना असं काही सांगत होते की बाकीच्यांनी त्यांच्या भाग्याचा हेवा करावा. आणि मग सर्वांनाच याचं आश्रर्य वाटायचं की असं काय आहे त्या धनुष्यात की त्याला प्रत्यंचा चढवणारा एवढा भाग्यवान असेल की तो या घरातल्या ज्येष्ट कन्येशी विवाह करु शकेल.

बघता बघता दिवस सरु लागले, ऋतु बदलत होता. त्या बरोबर आम्हा चौघींचे बोलण्याचे विषय सुद्धा. सुरुवातीला सख्यांकडुन रोज माहिती मिळायची की आज बाबा कोणकोणत्या जनपदांमध्ये जाउन आमंत्रण देउन पुढे निघाले आहेत, कुणी त्या आमंत्रणाचं सहर्ष स्विकार केला तर कुठं त्यांना नकाराला तोंड द्यावं लागलं, आणि मग अशा आमंत्रणं स्विकारलेल्या जनपदांबद्दल आम्ही बोलत असायचो. पण काही दिवसांत जसजसे बाबा बरेच लांब गेले तसतसं त्यांच्याबद्दल काही कळायला वेळ लागायला सुरुवात झाली, मग आमच्या बोलण्याचा विषय असायाचा तो स्वयंवराची  तयारी. तशी तर घरात ती सुरु झालेली होतीच पण ते सगळं अगदी शास्त्रानुसार होतं. परंपरेनुसार होतं.  काकु बराच वेळा ब्राम्हणांबरोबर बोलताना दिसे, काका मात्र आपल्या जवळच्या आणि विश्वासाच्या सेवकांना घेउन प्रत्यक्ष स्वयंवराची तयारी करण्यात गुंतलेले दिसत. आईकडं घरातली सगळी कामं होती.  लांब लांबुन वेगवेगळ्या प्रकारचं धान्य कोठारांमध्ये येण्यास सुरुवात झाली  होती. त्या कोठारांच्या जवळुन जाताना एक वेगळाच गोडसा वास भरुन राहिलेला असे.  न राहवुन एकदा मी तिथं गेले होते, त्या वासाच्या ओढीनं.  तशी ही कोठारं वर्षभर भरलेली असायची, पण आता ती अक्षरशः ओसंडुन वाहात होती.

घराच्या मागच्या अंगणाला लागुनच असलेल्या गोशाळेजवळ अजुन एक मोठी गोशाळा उभी केलेली होती. जवळपासच्या ब-याच गावांतुन गाई आणि वासरं आणुन तिथं बांधलेली होती, दिवसभर त्यांच्या ग़ळ्यात बांधलेल्या घंटांचा किणकिणाट सगळीकडं भरुन राहायचा. त्यात देखील दोन भाग होते. एका बाजुला फक्त पांढ-या शुभ्र गाई अन त्यांची तशीच शुभ्र वासरं होती. तर दुस-या भागात सगळ्या वेगवेगळ्या गाईंचा गोंधळ असायचा. आम्ही रोज सकाळी देवघरातुन थेट तिथंच यायचो. प्रहरभर तिथं गाईंना चारा खाउ घालुन मग पुन्हा घरात परतायचो. एकदा विचारणा केल्यावर असं समजलं की त्या पांढ-या गाई या भेट देण्यासाठी आणलेल्या आहेत तर बाकीच्या दुध दुभतं पुरवण्यासाठी. नगरात सगळीकडंच अशी गडबड होती. सगळ्या उद्यानात वेगवेगळ्या आकाराचे अन रंगाचे मांडव उभे केले जात होते. स्वयंवराला येणा-या सर्वांसाठी ही राहण्याची व्यवस्था  केलेली होती. या स्वयंवराच्या निमित्तानं आमची मिथिला हे आमचं एकच मोठं घर झालेली होती. नगरात प्रत्येक जण प्रत्येकाला सुचेल ते, सांगेल ते काम करत होता.  नगरातल्या रंगमंदिरात दिवसभर नृत्य आणि गाण्यांचा सराव सुरु होता. दोन-तीन दिवसातुन एकदा तरी आम्ही तिकडं जायचो, पण तिथं जास्त वेळ थांबता येत नसे. त्या गणिकांच्या मे़ळ्यात आम्हाला कुणी पाहिलं तर काय ही भीती सगळ्यात आधी मलाच वाटायची.

अशातच एका स्वयंवराला मोजकेच दिवस बाकी होते, एका सकाळी आम्ही नगरदेवतेच्या मंदिरात एका पुजेसाठी निघालो होतो. मंदिर फार लांब नव्हतं. तेंव्हा नगराच्या एका बाजुस फार मोठा कोलाहल ऐकु येत होता. रणवाद्यं, माणसं आणि शस्त्रं सर्वच कसं भयकारी होतं. रथाच्या बाजुला असलेल्या सिंह प्रतिमेला मी गच्च धरुन उभी राहिले. रथाचे घोडे देखील एकदम बेचैन झाले, सारथ्यानं त्यांना चुचकारत तिथुन पुढं काढलं ' गेल्या आठ दिवसांत हा गोंधळ फारच वाढला आहे' सारथी सांगु लागला, ' स्वयंवराच्या वेळी जर कुणी काही आगळीक केली, आणि युद्ध प्रसंग उभा राहिला तर, त्याची तयारी सुरु आहे इथं ' मी ताईला विचारलं ' खरंच असं होईल का गं, स्वयंवराच्या वेळी येईल असा काही प्रसंग, की ज्याचा सामना करण्यासाठी प्रसंगी बळाचा वापर करावा लागेल आपल्याला.' रथाच्या अग्रभागी उभी राहिलेली ताई हसत होती ' एकतर त्या धनुष्याला प्रत्यंचा न चढवता आल्यानं होणारा अपमान आणि जनकासारख्या पराक्रमी राजाशी नातेसंबंध जुळवण्याची हुकलेली संधी एखाद्या क्षत्रियाला कोणत्याही थराला नेईल, म्हणुन ही तयारी केलेली बरी '
 
नगरदेवतेच्या देवळातली पुजा आटोपुन परत येताना देखील माझ्या मनात ह्या एका नविन भितिनं घर केलं होतं, क्षत्रिय, हा शब्द त्या रात्रीपासुन मला छळत होता. मी जेवढं लांब जाण्याचा प्रयत्न करायचे तेवढाच तो कोणत्यातरी अनपेक्षित दिशेनं येणा-या बाणासारखा माझ्याकडे यायचा. आणि तरी ही मला माझ्यासाठी क्षत्रिय पती हवा होता. आम्हां चौघींच्या शिक्षणात शस्त्र सिक्षणाचा  भाग होताच पण गेली काही वर्षे त्याकडं दुर्लक्षच झालेलं. मुळात आजुबाजुच्या प्रदेशात तशी शांतताच होती, आमच्या राज्याच्या उत्तर पुर्वेच्या सिमांवर काही किरकोळ कुरबुरी सोडल्या तर फारशी युद्धजन्य परिस्थिती उदभवलेली नव्हती. त्यामुळंच तर हा युद्ध सराव  आयोजिला होता. पुन्हा त्या सरावक्षेत्राजवळुन येताना मला जाणवलं. स्वयंवराच्या आधी चार दिवसांपासुन आम्हां चौघींना घराबाहेर जाण्याची बंदी घातली गेली, वाड्याला जास्तीचा पहारा बसवला गेला. अगदी देवघराच्या आजुबाजुला शस्त्रसज्ज सख्या दिसायला लागल्या, हे सारं पाहुन आमची उत्सुकता शिगेला पोहोचली. बाहेरुन आत येणा-या सख्या आणि मैत्रिणिंच्या कडुन नगरात पोहोचलेल्या राजे आणि राजकुमारांच्या कथा कानावर यायच्या. कुठल्या मांडवात कोणत्या जनपदाचा राजा आहे, त्याचं वय काय, त्याचा तोरा कसा, त्याच्या सख्या कशा आहेत, त्याचे रथ कसे आणि किती, अश्वांचा रंग कसा आणि बरंच काही. आम्ही आमच्या दालनांतच दिवसभर बसुन असायचो. सगळी गवाक्षं तृणांच्या पडद्यांनी झाकुन घेतली गेली होती.

त्या दिवशी, त्या स्वयंवराच्या दिवशी मात्र सकाळपासुनच एक मोकळेपणा जाणवत होता, सगळं  घर कसं आनंदलं होतं, आई, काकु, काका आणि बाबा सगळेच सकाळपासुन गडबडीत होते. आम्ही चौघी सख्यांकडुन  श्रुंगार करुन घेण्यात गुंग होतो. ताईनं तिच्यासाठी सुवर्णरंगी वस्त्रं निवडली होती, माझ्यासमोर एकच पर्याय होता निलवर्णी रंवाची वस्त्रे नेसायचा. माझी तयारी त्यानुसारच चालु होती.  हे सगळं चालु असताना आई माझ्या दालनात आली, तिच्या बरोबर आमच्या घरातली सर्वात वृद्ध दासी होती, पांढरे केस आणि सुरकुतलेली त्वचा, तरी देखील या समारंभासाठी गळ्यात घातलेले अलंकार हे थोडंसं विचित्रच वाटलं मला तरी. सनिष्ठा तिचं नाव. मी आईच्या पाया पडले, तिनं मला जवळ घेतलं अन बाकी सख्यांना दालनाबाहेर जाण्यास सांगितलं. मग मला एका चौरंगावर बसवुन स्वतः एका कोप-यात जाउन थांबली. सनिष्ठा माझ्यासमोर येउन, दोन्ही हात वरखाली झटकत माझ्या भोवती गोल फिरु लागली, दोन आवर्तनं झाल्यावर तिनं आपल्या मुठी उघडल्या, एका मुठीत काहीतरी होतं, दुस-या हातानं तिनं माझ्या चेह-यावरुन तिचा तो खरखरीत हात फिरवला अन पुन्हा दोन्ही हात एकमेकांवर ठेवुन  दालनाबाहेर निघुन गेली. ती गेल्यावर आई, माझ्याकडं आली आणि पुन्हा एकदा मला जवळ घेतलं, मी गोंधळलेल्या नजरेनं तिच्याकडं पाहिलं हसत हसत ती म्हणाली ' कळेल तुला तु आई झालीस म्हणजे ' तेवढ्यात बाहेर गेलेल्या सख्या आत येत होत्या त्यांचं बोलणं ऐकु आलं ' फार वेळ लागेल त्याला, एवढं सोपं नसतं ते '

Monday, January 14, 2013

अंकोदुहि - ०३


भाग - ०३
तेव्हाच ताईनं त्या धनुष्याला एक हिसका दिला अन कुठल्याश्या प्राण्याच्या आतड्याची असावी अशी ती खरखरीत प्रत्यंचा माझ्या हातातुन सरकन ओढली गेली, माझ्या हातावर अजुन एक रेघ ओढुन ...........
पुढं....

माझ्या हातातुन रक्त वाहणं थांबतच नव्हतं, मी.आई आणि धाकट्या बहिणींबरोबर त्या खोलीबाहेर पडले, बाहेर सगळेच उत्सुक होते आत काय आहे आणि काय चाललं आहे ते पहायला, समजुन घ्यायला. त्याचवेळी आम्हा चौघींचं असं बाहेर पडण्यानं थोडा गोंधळ झाला. थोड्याच वेळात वैद्य औषधी लेप घेउन आले, तोपर्यंत आईनं हात धुतला होता, तो लेप हातावर लावल्यावर चंदनाचा स्पर्श एकदम थंड वाटला,मात्र थोडया वेळानं जसजसं त्या लेपामधलंते औषध जखमेपर्यंत पोहोचायला लागलं आग आग व्हायला सुरुवात झाली. आईच्या मांडीवर डोकं ठेवुन मी झोपले होते ती बराच वेळ. जाग आली तेंव्हा दिवस मावळलेला होता, खोलीत समया लावलेल्या होत्या त्यांच्या शांत उजेडानं जरा बरं वाटलं. आईला देखील झोप लागली होती. माझ्या हालचालीनं ती उठली, मग उठुन दोघींनी आवरलं. हातावरचा लेप वाळुन निघुन गेला होता. पलंगाच्या बाजुला त्याच्या खपल्या पडल्या होत्या, एका  सखीनं येउन सगळं साफ केलं.

मला काकांना आणि बाबांना भेटायचं होतं, तसं मी आईला सांगितल्यावर तिनं कुणाला तरी तिकडं पाठवलं. दोघंही काही कामात होते, तोपर्यंत काकुकडं गेले. ती आणि ताई दोघी बाहेर बागेत फिरत होत्या. मला बघताच ताई पळत आली आणि माझा हात हातात घेतला, तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातनं दोन आसवं गळाली माझ्या हातावर आणि पुन्हा तेच झालं, आधी शीतलता आणि नंतर जळणं. मला वाटलं होतं, ताई तिच्या चुकीबद्दल काहीतरी बोलेल पण तसं काहीच झालं नाही, पण त्या धनुष्याबद्दलच बोलत राहिली. पेटीबद्दल एक चकार शब्द नव्हता तिच्या बोलण्यात. ते धनुष्य म्हणे योगी परशुरामांनी काकांना दिलं होतं, आणि त्यांना ते प्रत्यक्ष भगवान शंकरांनी दिलेलं होतं. खरं असावं असं मला तरी वाटलं नाही. खरं आश्चर्य या पुढंच होतं, ते धनुष्य आमच्या घरातल्या कुणीच आजपर्यंत वापरलेलं नव्हतं. काका एका विशिष्ट दिवशी त्याची पुजा करत तेवढंच. काही दिवसांपुर्वी एका ऋषींच्या करवी काही निरोप पोहोचला होता काकांकडे आणि त्यानुसार ही आजचा समारंभ साजरा झाला होता.

संध्याकाळचा शेवटचा प्रहर संपल्याचं नगा-यांच्या आवाजानं लक्षात आलं, आता आमच्या वाड्याचे सगळे दरवाजे बंद होणार,उदया सुर्योदयापर्यंत ते बंद्च राहणार. आजच्या समारंभाच्या नियमांनुसार बाबा आंणि काकांना सुर्यास्ताच्या आधीच भोजन करणं गरजेचं होतं, त्यासाठी काकु मगाशीच आत गेल्या होत्या. कारंज्याबाजुच्या पाय-यांवर बसुन मी आणि ताई त्या धनुष्याबद्दलच बोलत होतो. मला त्या ताईच्या पेटीबद्दल अजुन ऐकायचं होतं, पण ती अजिबात तो विषय काढु देत नव्हती. तिनंच सांगितलं की, आज काकांनी तिच्या स्वयंवराची घोषणा केली आहे, ' जो क्षत्रिय पुरुष, त्या धनुष्याच्या प्रत्यंचा चढवुन दाखवेल अशाशीच तिचं लग्न होणार होतं'. यापुर्वी लग्नाचा विषय निघाला की ताई थोडीशी गुपचुप असे, पण आज तिच्या चेह-यावर एक वेगळीच लकाकी होती, डोळ्यात एक वेगळाच भाव होता, थोडा आनंदाचा. ज्याच्याबद्दल मला असुया वाटायला लागली होती. आतुन आईची हाक आल्यावर आम्ही दोघी उठुन आत गेलो. माझ्या खोलीकडं जाताना बाबांच्या खोलीकडं माझी नजर गेली, तिथं सख्या आता समयांच्या वाती नीट करत होत्या, म्हणजे बाबा तिथं नव्हते. मला जे विचारायचं होतं ते आज राहुन जाणार होतं हे नक्की.

रात्री जेवताना थोडासा त्रास झाला हाताला, जेवण झाल्यावर पुन्हा आईनं हाताला लेप लावला, ती माझ्या खोलीतुन निघाली तशी मी तिला अडवलं, ' आई थोडा वेळ बस ना ?' मी तिला विचारलं. ती थांबली, मागं न वळता तिनं विचारलं ' मला उत्तरं देता येणार नाहीत असे प्रश्न विचारणार असशील तर मी थांबुन काय उपयोग?' तिला काहीतरी लपवायचं होतं असं वाटलं नाही, उलट ती मला मर्यादांच आणि त्या पाळण्याचं प्रात्याक्षिक देत होती. ' हो आहेत असे काही प्रश्न, पण त्यांची उत्तरे दिली नाहीस तरी चालेल मला'  आई मागं वळली तेंव्हा तिच्या डोळ्यात पाणी असेल असं वाटलं, पण तसं नव्हतं. अजुन एक प्रात्यक्षिक, कसं जगायचं याबद्दल.  मी पलंगावर एका बाजुला होउन बसले आणि आईला जागा करुन दिली.  तिनं खोलीच्या बाहेर उभ्या असलेल्या सखीला बोलावुन  तिला विचारल्याशिवाय कुणालाही आत पाठवु नये असं सांगितलं. यावरुन मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहित तरी ते मला विचारता येतील याची खात्री आईनं दिली मला.

'आई, स्वयंवर म्हणजे, उपस्थित आणि योग्य अशा वरांपैकी आपल्याला आवडेल आणि योग्य वाटेल अशा एकाची निवड करणं, होय ना? ',  ' होय, क्षत्रियकुळांमध्ये स्वयंवराचा हाच अर्थ असतो' - आईला या विषयावर प्रश्नाची अपेक्षा होतीच बहुदा, तिनं शांतपणं सांगितलं. ' मग ताईच्या स्वयंवरासाठी तो धनुष्याचा पण का?, तिला अशा वराची निवड करण्याचं स्वातंत्र्य नाही ? स्वयंवराच्या दिवशी एखादा क्षत्रिय पुरुष जर ताईला योग्य वाटला, आवडला, पण त्याला त्या धनुष्याला प्रत्यंचा नाही चढवता आली तर ताईला त्याच्याशी लग्न नाही करता येणार, असंच ना ?'- माझा पुढचा प्रश्न तिच्या उत्तराची वाटच पाहात होता. थोडंसं थांबत आई सावरुन बसली, तिनं उत्तरं दिली नसती तरी मला चालणार होतं, म्हणुनच तिच्या उत्तराची अपेक्षा न करता मी पुढचा प्रश्न विचारला ' म्हणजे तो क्षत्रिय पुरुष त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवु शकेल, पण तो ताईला योग्य वाटला नाही किंवा आवडला नाही तरी तिनं त्याच्याशीच लग्न करायचं का ? , का त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवु शकणं ही या स्वयंवराची एक  पुर्व पात्रता आहे, जर असे एकापेक्षा अनेक क्षत्रिय पुरुष असतील जे ही गोष्ट सिद्ध करु शकले तर त्या अनेकांपैकी एकाची निवड ताईला करता येईल.? का पहिला क्षत्रिय पुरुष हे सिद्ध करु शकला तर स्वयंवर तिथंच थांबेल. ?

माझं बोलणं थांबलेलं पाहुन, आई हसली. मला सतावणारे एवढे प्रश्न विचारत असताना आई एवढी शांत कशी राहु शकते याचं मला आश्चर्य वाटत होतं. पलंगाच्या मागच्या नक्षीकामाला रेलुन बसल्यानं आईचं उत्तरीय खाली ओघळलं होतं, ते हातानं सावरुन घेत तिनं बोलायला सुरुवात केली. ' हे पहा बाळा, तु मला चार प्रश्न विचारले, हो ना. त्या प्रत्येक प्रश्नात एक शब्द वारंवार येतो आहे, तो कोणता यावर जरा विचार कर, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझी तुलाच मिळतील. मी काही न सांगता देखील.' एवढं  बोलुन ती पलंगावरुन खाली उतरली, माझ्या मस्तकावरुन हात फिरवत म्हणाली ' बाळा, मला तुम्हा तिघींच्या  भविष्याची काळजी वाटते, ज्यांचं आयुष्य जन्मापासुनच अविश्वासनिय आहे, असामान्य आहे त्यांच्याबद्दल आपण सामान्यांनी काय बोलावं, का विचार करुन आपली मति कुंठित करुन घ्यावी.?' झोप आता, तुझ्या  जेवणामध्ये तुला गुंगी यावी असे काही पदार्थ मी मुद्दाम घातले होते, आणि हो हाताची जास्त हालचाल नको होउ देउ.' एवढं बोलुन तिनं पलंगाच्या बाजुच्या समईतल्या दोन वाती फुंकर मारुन शांत केल्या, अन ती बाहेर जायला निघाली.

माझ्याच प्रश्नातला एक शब्द, माझ्या भविष्याचीच काळजी,  आम्हां तिघींचं सामान्य असणं, ताईचं असामान्यत्व या सर्वांनी माझ्या डोक्यात पुरता गोंधळ माजवला होता त्या चार क्षणांत. या सर्वात माझे प्रश्न कुठंतरी बाजुलाच पडले होते. मी फक्त घटनांच्या परिणामांचा, आणि त्यादेखील समोर घडणा-या आणि मला दिसणा-या परिणामांचा विचार करत होते, तर आई त्या घटनांच्या मागं घडलेल्या आणि घडवुन आणलेल्या कारणांबद्दल बोलत होती. आई खोलीतुन बाहेर पडणारच होती, तेवढ्यात या विचार चक्रातुन बाहेर येत  मी तिला विचारलं, ' आई, मला काही समजलं नाही, तु काय समजावते आहेस ते, आणि ते समजल्याशिवाय मला झोप देखील येणार नाही, किमान तो शब्द कोणता ते तरी सांगुन जा'. दरवाज्याच्या चौकटीचा आधार घेत आई थांबली, एक पाय उंबरठ्यावर होता, तशीच मान मागं वळवुन माझ्याकडं पाहिलं, तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली  होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' ....