Saturday, July 2, 2016

अंकोदुही भाग ११

राजसभेतुन बाहेर पडल्यापासुन माझ्या दालनात येईपर्यंत माझ्या कानांत काकांचं शेवटचं वाक्य घुमत होतं ‘ तुम्हांला तिघींना तुमचा निर्णय घेण्यासाठी उद्या सुर्यास्तापर्यंतची वेळ आहे, उद्या सुर्यास्तानंतर आपण सर्वजण इथं जमु आणि तुमचा निर्णय ऐकु. त्यानंतरच्या दिवशी चवथ्या प्रहरी राजा दशरथांना भेटायला आपणा सर्वांना जायचं आहे, तुमचा निर्णय काहीही असला तरी..’
हेच आपलं स्वयंवर कसं होईल, - मांडवी शक्य तेवढ्या रागानं बोलत माझ्या दालनात आली. तिच्या मागोमाग श्रुतकिर्ती आणि ताई पण आल्या. ‘ ताईच्या स्वयंवरात कितीतरी राजे आले होते, त्या सर्वांनी तो धनुष्याचा पण पुर्ण करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर तिचा विवाह निश्चित झाला, जे त्या स्वयंवरात सहभागी झाले त्यांची नावं, राज्यं, संपत्ती याची थोडी तरी कल्पना होती आपल्याला, पण याबाबतीत तसं काहीच घडणार नाही.’
तिच्या बोलण्यात थोडी भिती होतीच, पण त्याच बरोबर एक निर्णय समानतेची किंवा स्वातंत्र्याची संधी मिळत नसल्याचा राग देखील होताच.
‘म्हणजे तुला त्या राजकुमारांना पाहायचं आहे तुझा निर्णय घेण्यापुर्वी.’ श्रुतकिर्ती या विषयावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलली., ‘ मला तर नुसतं पाहायचंच नाही तर त्यांची भेट घ्यायची आहे आणि बोलायचं देखील आहे ‘
 सितेचा वेगळेपणा पुन्हा अधोरेखित होत होता, हा विचार उद्यापर्यंत न ठेवता आताच आईला अन् काकुला सांगायचं ठरलं आणि आम्ही आईच्या दालनात गेलो. तिथं आई एकटीच होती, दासी तिच्या पायांना उटी लावत होत्या, आम्हांला बघताच त्या निघुन गेल्या, ‘ मला वाटलंच होतं, तु येशील असं, पण तुम्ही तर सगळ्याच जणी आल्या आहात ‘ आई माझ्याकडं पाहात उठुन बसली.
श्रुतकिर्तीनं काहीही आढेवेढे न घेता, तिचा विचार आईला बोलुन् दाखवला. ‘ तुझी मागणी अगदीच अयोग्य आहे असं नाही, पण याचा निर्णय उद्या सकाळी राजा जनक आणि कुलगुरु करतील, आणि राजा दशरथांना देखील या बद्दल विश्वासात घ्यावं लागेल.’
माझ्या अपेक्षेनुसार आई पुन्हा एकदा आमच्या बाजुनं बोलली होती, आम्ही परत निघताना तिच्या हालचालीतुन एक तणाव जाणवत होता, किंचित आनंदाचा भास होत होता, दालनाच्या दरवाज्यातुन मी मागं वळुन पाहिलं तेंव्हा आई एका गवाक्षाला टेकुन बाहेरचं आकाश पाहात होती. माझ्या दालनात येउन मी देखील तशीच उभी राहिले, पण माझ्या गवाक्षातुन मला आकाश पाहता येत नव्हतं, त्याची कल्पना करावी लागत होती. तो छोटासा काळाकभिन्न् आकाशाचा तुकडा आणि एखादाच तारा कुठंतरी दुरवर चमकणारा, प्रत्येक रात्री तुमच्या समोर चंद्राची कोर येत नसतेच आणि आली तरी तिचा प्रकाश तुम्हाला पुढची वाट दाखवेलच असं नाही,
आयुष्याच्या वाटा निट पाहायला अन समजायला सुर्याचीच साथ असावी लागते, उदया काय होईल याच्या नेहमीसारख्या विचारात हरवुन मला झोप लागली, कधीतरी दासी येउन दालनातले दिवे शांत करुन गेल्याचं जाणवलं.
सकाळी मात्र ताईच्या दालनात रात्रभर  दिवे जळत असल्याचं कळालं, या पुर्वी असं कधी झालेलं नव्हतं. मी मात्र सकाळी उठुन गाईंच्या गोठ्यात गेले, दिवस उजाडताच त्या सा-या गाई अन् वासरं चरायला नेली जात, पुर्वेच्या जंगलांच्या सीमेवर जिथं उंच उंच गवतांची दुरवर पसरलेली वनं होती, मला तिथं जायला खुप आवडायचं, पण आज ते शक्य नव्हतं. थोडा वेळ तिथं थांबुन मी दालनात आले, आईचा निरोप आलेला होता सकाळच्या दुस-या प्रहरीच आम्ही तिघी जणी आईच्या दालनात आलो, बाबा तिथंच होते. आईनं आमचं कालचं बोलणं त्यांच्या अन् काकांच्या कानी घातलं होतं.
बाबा नेहमीच्या गंभीरतेने येरझा-या घालत होते, बहुधा काकांची वाट पाहात होते. ते येइपर्यंत कुणीच काही बोललं नाही, मला ताईची तिथं नसण्यानं उगा अस्वस्थ होत होतं, काही क्षण असे वाट पाहण्यात गेले, आणि काका, काकु आणि ताई एकत्रच आले, ताईनं आज रक्तवर्णी वस्त्र अन् अलंकार घातले होते, पांढ-या शुभ्र वस्त्रांत असलेल्या काकांच्या मागुन येताना ती ज्वालेसारखीच दिसत होती. सगळे जण बसल्यावर दालनाचे दरवाजे बंद करण्यात आले अन् दिवसा देखील गवाक्षांचे पडदे ओढले गेले.

‘ तुम्हा सर्वांशी बोलण्यासाठी राजा दशरथांना स्वतः यायचे आहे, असा निरोप आला आहे आताच दुताने, तसेच आपण सर्वांनी त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणी म्हणजे उत्तकिर्ती उपवनात यावं असा देखील निरोप त्यांनी दिला आहे. ‘ काकांनी एका दमात सगळं सांगुन टाकलं. मी ताईकडं पाहिलं, तिन्ं डोळ्यांनीच सगळं काही व्यवस्थित असल्याचं सांगितलं. ‘ आज दुपारी भोजनानंतर राजा दशरथ आणि त्यांचे पुत्र आपल्या सभेत येणार आहेत, तुम्ही सर्वांनी त्यावेळी तिथं यावं, अर्थात सर्व मर्यादा पाळुनच ही भेट होईल, तसेच पुर्वेकडच्या काही राज्यांनी या स्वयंवराच्या विरोधात एकत्र येउन युद्धाची तयारी सुरु केली असल्याची वार्ता आलेली असल्यानं या प्रस्तावावर एक दोन दिवसांत आपण निर्णय घ्यावा असं मंत्रिपरिषदेचं विचार आहे, अर्थात तुम्हां तिघींवर कोणताही दबाव नाही निर्णय घेण्यासाठी हे लक्षात ठेवा परंतु त्याचवेळी हे आपलं राज्य, प्रजा आणि समाज या सर्वांचाही विचार तुम्ही कराल एवढ्या ज्ञानवती तुम्ही आहात हे मी जाणतो ‘