Sunday, April 8, 2012

दर्द - ऐ - दात


मी आताशा ठरवुनच टाकलंय,
पुढचं प्रेम या डॉक्टरवरच करायचं.
सगळे दात काढले तिनं,
तरी तिच्यावरच मरायचं.
मी आताशा ठरवुनच टाकलंय...
एक दिवस काय झालं,
बासुंदी पिता पिता हाटेलात
पुढचा एक दात कर्रकन हलला
मला वाटलं त्याचा बेरिंगच निसटला
घरी येता येता दवाखान्यांत गेलो
तिथली रांग पाहुन मनोमन सुखावलो
बाहेर एक बाउन्सर बहुधा कंपाउंडर असावा
आत नाही जमलं की इथंच उपटत असावा.
शेवटी माझा नंबर आला, हळुच आत गेलो
बेसिनमधले गोरे हात पाहुनच गार झालो
या हातानी एक काय चार दात काढा
जमलं तर भरुन द्या मागच्या दोन दाढा
'येस,प्लिज, य, खुर्चीवर बसा,' आवाज बरा नव्हता,
काळी तिन पांढरी दोनच्या मध्ये अडकला होता
काय झालंय ते विचारलं, तेंव्हा बरं वाटलं
खुप दिवसाचं दुख: एकदम घशात साठलं,
भारावुन म्हणलं, सगळेच दात दुखतात
तोच खर्रारा आवाज, 'इथंच सगळे चुकतात '
मी म्हणलं, चुकत असेल तर चुको लाख बापडं
आवाज बरा नसला तरी छान असावं रुपडं
मागुन येउन तिनं हनुवटी धरली
दाढी न केल्याची मलाच लाज वाटली
ग्लोव्हज मधुन देखील तिला टोचु नयेत केस
परतफेड म्हणुन उद्या ड्ब्बल करेन फेस
तो स्टिलचा आकडा, डोळ्यासमोर आला
प्रेम बिम विसरा,मला माशाचा हुक वाटला
मासा तर घाबरेलच असा हुक पाहुन
मी मात्र सावरलो मागची बोटं पाहुन
' अरे अरे, फार त्रास असेल ना ?'
जेवताना सारखं अवघड होत असेल ना ?
सताड उघड्या तोंडातुन ग्वाँ ग्वाँ आवाज आला
सवयीनं तिच्या मेंदुनं पटकन संदेश टिपला
शेवटी तो हुक दुख-या दातावर विसावला
त्याचा थंडपणा मला कण्यापर्यंत जाणवला
ओरडता येत नसल्यानं मी तोंडच हलवलं
तिथंच मला गो-या बोटातलं बळ जाणवलं
दोन मिनिटं तिच्या बोटांचा खेळ चालु होता
त्याचवेळी चुकार बटा खाली पडत होत्या
त्या सगळ्याचा अंत खरंच सुखात होता
आता एक खड्डा माझ्या मुखात होता
रक्ताळलेल्या बोटानीच तिनं कापुस दिला
'पाच मिनिटं धरा ' पुन्हा खर्रारा आला
मग थोडा सावरुन बसलो समोर येउन
ती ही बसली खुर्चीत, मास्क काढला ठेवुन
ती पाहताच बाला, जबडा उलुशिक हलला
क्रुकेड दात तिचा,तिच्या ओठावर दिसला,
नालायक तो दात तिला अस्सा टोचत असेल
शाप दिला त्याला तुझ्यात कच्ची मटकी फसेल
समोरच्या कागदावर फक्त तीन लाईनि दिसल्या
आवाजात देव तर अक्षरात मास्तर फसला,
'ह्या सकाळी आणि ह्या रात्री दोन घ्या;
आज आणि उद्या फक्त थंडच काही प्या'
कागद हातात घेताना, थोडासाच झालेला स्पर्श
घाण अडकलेल्या नखांना दुर्मिळ असा हर्ष
' माझा दात मिळेल का , शेवटचा पाहायला
एवढी वर्षं घातलं होतं कोलगेटनं नाहायला
पटकन उठली तशी, खुर्ची मागं करुन
वळली गर्रकन तिथंच ओढणी वर ओढुन
स्टिलच्या ट्रे मधुन एक दात उचलला
कापसात ठेवुन हळुच माझ्या पुढे ठेवला
मग तोच खर्रारा पुन्हा एकदा घुमला
'जपुन ठेवा तुमच्याकडं, व्यवस्थित चांगला,
असा दात काढलेला जसा नागाच असतो
प्रेमात आलं आड कुणी तर कचकन चावतो,
असल्या भ्याड कल्पना कधी पटत नाहीत
तेंव्हा मात्र दात ठेवला खिशात कापसासहित
भिती आहे उद्या दुसराच कुणी येईल
माझे सगळे दात एकदम सुधारुन देईल
दुसरा एखादा दात दुखरा नाही याचं दुखः होतंय
नेक्स्ट व्हिजिट परवाच आहे याचं बरं वाटतंय
वाटलं इथंच विचारावं तोंड उघडुन एकदा,
पण बिल पाहुन म्हणालो,
च्यायला एका दाताला ५००/- बराय तुमचा धंदा.

Print Page

Thursday, April 5, 2012

प्रार्थना.. आता एकच...


कोपरापुढचे हात सुने होत नाहीत, विटत नाहीट, विरत नाहीत,
त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात ?
बोळकं झालेल्या तोंडात पेज भरवताना
दोन चमचे उकळतं पाणि टाकावंसं वाटतं आहे
माझी म्हणावी अशी अपेक्षा उरलेली नाही
माझे म्हणावे असे ' हे ' पण फार उरले नाही
गोळ्या,सुया, सलाईन ह्यांचा वरखर्च
रक्त संपत आलेल्या देहाला आज पेज पचणार की नाही ??
रात्र उलटताना पुन्हा त्याच स्क्रिनकडे लक्ष जाते
श्वासाचं पुक्क अन उश्वासाचा ट्यॅन
बाजुला लटकवलेली पिशवी अन कॉटखालचं पॅन
मरणाची भिक्षा मागतात ह्यांचे सुरकुतले हात
दिसु लागतो बाजुचा पडद्यामागं मेलेला
ऐकु येतो त्याच्या बायकोचा शोक
अशावेळेस हात कुणासमोर जोडू?
कुणासमोर मागु, स्वातंत्र्य अशा शोकाचं?
दवाखानातल्या ह्या एकविसाव्या रात्री
पुक अन ट्यॅन ऐकताना वाटते आहे
उद्याचं कोवळं उन ह्यांच्या मिटत्या डोळ्यांवर कोसळण्याआधीच
मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर
तर
.
.
.
.
ती पिवळी नळी ओढावी म्हणते........


Print Page