Monday, January 17, 2011

युद्ध कोणाचं कोणाशी - भाग - २

युद्ध कोणाचं कोणाशी - भाग - २
मोददला विचार करायला बराच वेळ होता कारण एक सामान्य सॆनिक या नात्याने त्याला या तात्विक युद्धात भाग घ्यायचाच नव्हता, पण भाग घेणं नाही म्हणुन युद्धाची झळ पोहोचत नाही असं होत नाही. आजुबाजुच्या वातावरणाचा नको म्हणलं तरी परिणाम होतोच, कंपनं जाणवताच आणि त्याचे प्रतिसाद उमटतात घरी दारी सगळीकडे. ह्या परिस्थितित मोदद आणि त्याच्या सहका-यांची हळु हळु मानसिक कुचंबणा व्हायला सुरु झाली होती. सगळे एकत्र बसले की हा लढता नसलेलं युद्ध हाच एक विषय असायचा.
तशातच एक दिवस बातमी आली कि युद्ध होऊन होणारी अपरिमित हानी टाळण्यासाठी वाटाघाटी सुरु होणार आहेत, आणि सगळ्यांमध्ये एकच आनंदाची लाट उसळली, आज पर्यंत लढाई सुरु कधी होईल याची वाट पाहणारे वीर आता जिव तरी वाचला याच्या आनंदात होते. मोददची अवस्था फार बदलली नव्हती वाटाघाटी म्हणजे युद्ध होणार नव्हतं पण मरण टळत नव्हता. वाटाघाटीतुन जर आपल्याला,आपल्या राज्याला कुणाचं मांडलिकत्व पत्करावं लागलं तर त्या बरोबर येणा-या अपमानापेक्षा युद्ध होऊन रणांगणावरचं हॊतात्म्य जास्त चांगलं अशी त्याची धारणा होती.
या विषयावर बोलायला त्याच्या काही सहका-यांकडे वेळच नव्हता ते फक्त संध्याकाळी कोणत्या गणिकेच्या महालात गाणं रंगेल याचीच काळजी करीत होते. जंगलात वाढलेला मोदद जंगलातल्या प्राण्यांसारखाच विचार करित होता, जंगली श्वापदं आज शिकार मिळाली ती खाउन निवांत झोपत नाहीत, तर तो भाग किंवा ती जागा सोडुन दुसरीकडे जाउन शिकारीची तयारी करतात, कारण आता त्या जागेतल्या त्यांच्या सावजांना त्यांच्या हालचालीची, ताकदीची कल्पना आलेली असते. पुन्हा त्याच कळपातली सावजं आपल्याला सहज सापड्तील या वेड्या विचारात राहणा-या प्राण्यांना मग काही दिवस उपाशी राहण्याची वेळ येते हे त्यानं पाहिलं होतं.
यथावकाश वाटाघाटींचा दिवस उजाडला, पुन्हा सगळे जण चिंतेत, उगाचच सगळे तणावाखाली होते. शत्रुपक्ष वाटाघाटीसाठी राज्यात येणार होता, त्यामुळं आपलं राज्य सर्व सुख संपन्न दिसायला हवं की अतिशय दरिद्रि दिसायला हवं याचा गोंधळ सगळ्यांनाच होता. सर्व काही छान दिसलं तर शत्रुचा मोह वाढणार होता आणि वाईट वाटलं तर आजुबाजुच्या राज्यात होणारी अपमानजनक स्थिती यातुन मार्ग काढायची तयारी चालु होती. या बरोबरच केलेली युद्धाची तयारी सुद्धा लपवणॆ गरजेचे होते, हे काही शक्तिप्रदर्शन नव्हते पण गाफिल राहणे ही शक्य नव्हते. शत्रु घाबरला नाही तरी त्याच्या मनातली सुप्त भिती संपुन जाणं देखिल परवडवारं नव्हतं. आणि अगदि युद्धाच्या परिस्थितित होतं तसंच मोदद निवांत बसुन होता त्याच्या सहका-यांबरोबर. आता सगळॆच जरा जास्त सावध होते, आक्रमकता फक्त डोळ्यांतच उरली होती. तलवारी म्यानांत होत्या पण काही दिवसांपुर्वी त्यांना बाहेर काढायला शिवशिवणारे हात आता केवळ बाराबंदीच्या गाठींबरोबर गुंतले होते. भाल्यांची टोकं नुसतीच उन्हात चमकत होती, त्यांच्या टोकांना रक्ताची तहान आहे असं दिसत नव्हतं.
न लढल्या जाणा-या युद्धाचा येणारा ताण लपवुन सगळे काही छान मजेत असल्याची ग्वाही देत फिरत होते तर काही जण आता उरलो फक्त उपकारापुरता असा आव आणुन बसलेले दिसत होते. पण एक गोष्ट प्रत्येकाच्या मनात निश्चित होती ती म्हणजे या न होणा-या युद्धाची आणि त्याच्या आपल्या घरांवर आणि आपल्या लेकरा बाळावर होणा-या परिणामांची काळजी.. अगदी मोददच्याही मनात कुठेतरी खोलवर ही वेदना पुन्हा पुन्हा उसळुन वर येण्याचा प्रयत्न करीत होती, मग त्यानं आपली तलवार काढली आणि तिला धार लावु लागला...
क्रमशः
पहिल्या भागाची लिंक - http://harshad-gaaanikha.blogspot.com/2011/01/blog-post_11.html

0 comments:

Post a Comment