Thursday, July 5, 2012

क क कपलचा - भाग ३...


क क  कपलचा - भाग ३...

 कुठलिहि गोष्ट पहिल्यांदाच करताना जो वेळ लागतो तेवढा घेउन हर्षदनं मेडिकल काउंटरची खरेदी संपवली, तिथल्या पोरानं ज्या पद्धतीनं मयतीचं सामान देतात तसं, मख्ख चेह-यानं सगळं सामान काउंटरवरच्या पोरीकडं दिलं, तिंनं तेवढ्याच मख्ख चेह-यानं सगळं एका काळ्या बँगेत टाकलं वर बार कोडचं स्टिकर लावुन बॅग हर्षद्कडं दिली. त्याच्या मनावरचं फार मोठं ओझं उतरल्यासारखं झालं, पंधरा मिनिटं रांगेत उभं राहुन बिल देउन तो तिथुन बाहेर पडला, शरदला फोन करुन प्रितीलाच यायला सांगितलं अन सामान घरी टाकायला आला. शेजारच्या निकाळजेंच्या दाराबाहेर दोन चार चपला जोड होते, ते बघत दरवाज्याचं कुलुप उघडलं, आत येउन सगळं सामान जिथलं तिथं लावलं. काळी पिशवी तशीच बेडरुम मधल्या कपाटात कपड्यांखाली लपवुन ठेवली अन बाहेर पडला. निकाळ्जेंच्या घराबाहेर चपला वाढल्या होत्या, जाळीचा दरवाजा पुढं केलेला होता.
पुन्हा प्रितीपर्यंत यायला पंधरा मिनिटं गेली, शरद पोहोचलाच होता. नेहमीचं टेबल नव्हतं, मग बाहेर गार्डन मध्येच दोघं बसले. ' हर्ष्या, भाड्या अशी ही शेवटचीच पार्टी बहुतेक तुझ्याबरोबरची, मिल्याला बोलवु का, आणि वहिनी येणार होत्या ना आज, ते सोडुन तु इथं कसा ? मोबाईल काढत शरद बोलला. ' अरे तिचा एसेमेस आला होता, एक्सप्रेस १२ तास लेट आहे, उद्या साडेसात पर्यंत येणार आहे, तेंव्हा जाईनच आणायला.' बहुधा फोन एंगेज लागत होता मिल्याचा ' आणि गाडी खरंच लेट आहे का हे पहायला तु स्टेशनवर गेला असशील ना आता, इथं येताना ?' हर्षदला एकदम त्याचं टॉप सिक्रेट बोर्डावर टांगावं तसं झालं. ' अबे भाड्या, मोजुन १०२५ दिवस झालेत माझ्या लग्नाला, हे अन असले सगळे घंदे करुन बसलोय मी. तु आता काहीही कारणं सांग न भेटायला, मी तुला तुझी खरी कारणं सांगेन, मी जिंकलो की प्रत्येक वेळी एक क्वार्टर, बोल लावतो काय बेट ? , हर्षदनं हसुन वेळ काढली, तोवर वेटरनं शेव चकलीच्या वाट्या आणुन ठेवल्या. मग दोघं जण गप्पा मारत साडेबारा पर्यंत निवांत बसले. पिणं संपल्यावर बारच्या दरवाज्यापर्यंत दोघंही धडपडत आले, मग गळ्यात गळा घालुन रडले आणि मग निघुन गेले.
पिल्यावर हर्षद नेहमीच गाडी हळु चालवायचा, त्यात उद्या सकाळी उठुन अनुजाला आणायला जायचं होतं, व्यवस्थित घरी आला, कुलुप काढताना पाहिलं निकाळजेंच्या घराबाहेर दोन महागातल्या बुटांचे जोड होते.
नेहमी पिउन आल्यावर हर्षदला गपगुमान झोप यायची, पण आज टुम्म, काही केल्या झोप येईना. एक तर जागा नविन, सारखा रस्त्यावरच्या गाड्यांचे हॉर्न वाजत होते, त्यानं उठुन एका खोक्यातुन एफएम काढला, बेडरुम मध्ये लागेना म्हणुन बाहेर हॉल मध्ये आणुन लावला, तो सेट होउन चालु व्हायच्या आतच बाहेरुन आरडाओरडा ऐकु आला, तसा लगेच दरवाजा उघडुन पाहिलं, दोघंजण घाईघाईनं जिन्यावरुन खाली गेले, निकाळजेंच्या घराबाहेर महागातले बुट दिसत नव्हते.
आत येउन, तो आता हॉलच्या खिडकितच बसला, आत एफएमवर ' दिल की ये आरजु थी' लागलं होतं, दारु प्याली की अशी गाणी जास्तच केविलवाणी वाटतात हे त्याचं आवडतं मत होतं. अनुजाला फोन लावला,  आउट ऑफ रेंज होता.  फोन चार्जिंगला लावुन पुन्हा त्यानं बेडवर अंग टाकलं, झोप काही येईना. उठुन त्यानं कपाटातली काळी पिशवी काढली. ' ति**ला, ह्याचा अन चॉकलेट,स्ट्रॉबेरीचा काय संबंध, बोंबलायला, पब्लिकना ति**ला, काय पण विकतंय अन काय पण  विकत घेतंय, पण एकदा बघुच पुन्हा घाईच्या वेळेत जमेल नाय जमेल' पाकिटं बाहेर काढली तसा शरदचा सल्ला आठवला ' अंधारात पॅकचा चमकणारा चौकोन असलेला कोपरा ओळखता आला पाहिजे,  नाहीतर संपलं सगळं ' त्याचं त्यालाच हसु आलं, मग उठुन लाईट बंद केली ,घरातल्या लाईट बंद केल्या तरी रस्त्यावरच्या लाईटचा उजेड खिडकीतुन आत यायचा अन नेमका बेडच्या पायाशी थांबायचा.
सहाला अलार्म वाजला तसा हर्षद उठला, आणि जोरजोरात हसायला लागला, रात्री नशेत प्रॅक्टिस म्हणुन १२ पॅक फोडली होती, बेडवर सगळीकडं तोच कचरा होता. उठुन त्यानं सगळं आवरलं, बेडशीट बाथरुम मध्ये नेउन भिजवुन ठेवली, काल दुध आणलं नव्हतं त्यामुळं चहाचा प्रश्नच नव्हता, तसंही अजुन किचन सगळं लावुन झालंच नव्हतं, आवरुन लगेच बाहेर पडला. त्यानं कुलुप लावुन जिन्याची पहिली पायरी उतरली तोच मागुन आवाज आला, ' चहा घेणार का ?' या.' इति, निकाळजे काकु.   प्रश्न पण आणि आमंत्रण पण, नक्की काय करावं समजेना, पण चहाचा मोह काही मोडवला नाही. पहिल्यांदाच निकाळजेंच्या घरात गेला, हॉलमध्ये सोफ्यावर बसला तोच निकाळजे काकु चहा घेउन बाहेर आल्या. चहा समोरच्या टिपॉय वर ठेवला आणि आत निघुन गेल्या. आतुन पैंजणांचे आवाज येत होते, काकुंच्या पायात पैंजण होते का नाही, त्यानं लक्ष दिलं नव्हतं. ' कांचन असेल, त्याला एकदम आठवलं, काल काकुनी हेच नाव सांगितलं होतं, तीच असावी. फोन वाजला, अनुजाचाच होता. पटकन चहा संपवुन कपबशी टिपॉयवर ठेवली, 'काकु थँक्यु,येतो मी'  एवढं पटकन बोलुन निघाला, कॉलनीच्या बाहेर येईन रिक्षा पकडुन स्टेशनवर आला.
एस-३ बोगीच्या दोन्ही दरवाज्यांच्या मध्ये उभा राहिला, टेनिसची मॅच पाहिल्यासारखा मान हलवुन दोन्ही दरवाज्यांकडं पाहात होता. एकदाची त्याला उजव्या दरवाज्यात अनुजा दिसली, हातावरची पुसटत चाललेली मेंदी, साडी, ब्लाउज, चपला, रुमाल, टिकली सगळं पक्कं मॅचिंग, नवेपणाची सगळी दिखाउ लक्षणं उतु जात होती. हर्षदला पाहिल्यावर तिनं हात हलवला पण मग हसावं की लाजावं तिला कळालंच नाही, ती तशीच अवघडुन उभी राहिली. मागच्या पॅसंजरनं ' साईड' असं जोरात ओरडल्यावर भानावर येउन ती उतरली, हर्षदनं पुढं येउन दोन्ही बॅगा घेतल्या. दोघंही थोडी सावरली, ' नवि बायको, नवं घर, अपुन की तो निकल पडी बॉस, चल नविन घरी जाउ लगेच'. त्याच्या थिल्लरपणाचं तिला थोडं हसु आलं थोडं कौतुक वाटलं, दोघंही स्टेशनच्या बाहेर आले. रिक्षानं घरी यायला  पंधरा मिनिटं गेली, दोन जिने चढुन दारासमोर आले तेंव्हा निकाळजे काकु बाहेरच होत्या, वाण्याचं बिल देत होत्या. दोघांना हातानंच खुण करुन जिन्यात मागं सरकुन उभं केलं, आत जाउन पाणी घेउन आल्या, भाताची मुद ओवाळुन टाकली, अन म्हणाल्या ' बोलला नाहीत ते, सुधारस केला असता आज, कालचा पाक उरलाय ना जिलेब्याचा' , त्या घरात निघुन गेल्या.
दोघं पुढं आली, घराचा दरवाजा उघडुन एकत्रच आत आली, एकमेकांना खेटुन आत येताना दोघंही बावरली खरी, अनुजा आत आल्या आल्या  बाथरुम मध्ये गेली, हर्षदनं सामान नेउन बेडरुम मध्ये ठेवलं. ती बाहेर आली तसा तो दुध आणायला बाहेर निघाला ' मॅगी आणल्या नसतील तर त्या पण आण ?' १२ वर्षे संसार झालेल्या बायकोसारखं अनुजानं विचारलं,  ' हो, किचनमध्ये आहेत काढुन घे,आणि दरवाजा लावुन घे'. दार लावताना अनुजाचं लक्ष शेजारच्या दाराकडं गेलं, उंब-याच्या दोन्ही बाजुन निटशी गाईची पावलं काढलेली दिसली. ' म्हणजे मला स्पर्धा आहे इथं पण' असा विचार करत तिनं दार लावलं, सगळं घर फिरुन पाहिलं, किचनमध्ये पसारा तसाच होता, इलेक्ट्रिकची शेगडी वर काढलेली होती, पण तिला याचा काही अनुभव नव्हता, म्हणुन तिनं  त्याकडं दुर्लक्ष केलं. हर्षद आलाच तेवढ्यात, दरवाजा उघडल्या उघडल्या हातातली दुधाची गार पिशवी अनुजाच्या पोटावर चिकटवली, मगाशी गाडीतुन  तिनं हात हलवुन इशारा केला तेंव्हापासुन तो लक्ष ठेवुन होता, चान्स आता मिळाला. एकदम चिरकुन अनुजा मागं सरकली. बाहेर येउन दाराकडे पाहात निकाळजे काकुंनी त्यांच्या घराचा दरवाजा सुद्धा धाडकन लावुन घेतला.
' गॅस नाही आला ना हो अजुन, मी बोलले होते ना तुम्हाला महाबळेश्वरलाच, मला नाही येत त्या लाईटच्या शेगडीवर काही करायला, शॉक बिक बसला म्हणजे ?' पंधरा मिनिटानंतर घरातुन सहजतेनं अर्थ लागु शकेल असा आलेला हा आवाज. ' हो मगासारखाच लागेल शॉक, फक्त गरम चटका असतो लाईटचा गार नाही' हर्षद किचनमध्ये जात जात बोलला. ' हे बघ मी दाखवतो, ही पिन ह्या प्लग मध्ये घट्ट बसवायची, लुज बसली की फरफर ठिणग्या पडतात, आणि हे लाल बटण दाबायचं, एका मिनिटात सगळी  कॉईल लालबुंद होते, मग काय वर भांडं ठेवायचं, त्यात पाणि ओतायचं, ते उकळलं की मॅगी टाकायची, दो मिनिट में तयार' असं म्हणुन त्यानं प्रात्याक्षिक करुन दाखवलं. ' अहो मिस्टर, पण आयुष्यभर मॅगीच खाणार आहोत का  तिन्ही त्रिकाळ, बाकीचं कसं करणार, मला नाही जमायचं ह्याच्यावर' अनुजानं पुन्हा स्पष्ट नकार दिला. अर्ध्या तासात मॅगी आणि चहा, एवढं आटोपुन दोघं हॉल मध्ये येउन बसली ' आज सुटी घेतलीत का हो ?' अनुजानं विचारलं, नाही स्टेशनला शेवटचे तीन चार दिवस आहेत, बरीच कामं पडलीत. एक वाजेपर्यंत जाईन, रात्री यायला दहा वाजतील. बाहेरच जाउ जेवायला आज, दोन्ही वेळा, आणि शेजारी विचारुन कामवालीचं वगैरे पाहुन घे' जसजशी मॅगी गार होत होती तसतसा संसाराची फक्त स्वप्नंच रम्य असतात याची जाणिव दोघांना होत होती. मागच्या महिन्यातली लग्नाची रजा, बदली आणि घर बदलणं यात ब-याच गोष्टी करायच्या राहुन गेल्या होत्या.
हर्षदचा फोन वाजला, सोनवणेंचा फोन होता ' काय मिस्टर, कुटुंब आलं काय घरी ? पोहोचले ना व्यवस्थित, मग इथं कधी येताय, चिकार राडा आहे निस्तरायचा, तिथला संसार कुटुंब बघेल या इथं लवकर, नाहीतर चार दिवस नाईट मारावी लागेल.' फोन कट. हर्षदच्या चेह-यावर टेन्शन दिसायला लागलं, तो  उठुन आवरायला गेला, अनुजानं उठुन सामान लावायला सुरुवात केली, ज्या एक दोन गोष्टी तिनं  विचारल्या त्याला काहीतरी उत्तरं देउन हर्षद बाहेर पडला. त्याला युनिफॉर्ममध्ये अनुजा पहिल्यांदाच बघत होती, एकदम चार्मिंग वगैरे दिसायचा फोटोत पण प्रत्यक्ष काही फार बरा नाही दिसत असं तिला वाटलं. दुपारी एकच्या सुमारास तो परत येईपर्यंत बरंचशी जागा मोकळी झाली होती, तो आला तेंव्हा अनुजा तयारच होती, दोघंजण बाहेर जेवण करुण आले, तिला घरी सोडुन तो पुन्हा स्टेशनला निघुन गेला. तिनं आता पिसि जोडायला घेतला, अर्धा तास खटाटोप करुन ती विडोजच्या पासवर्ड पर्यंत येउन थांबली, फोन करुन हर्षदला पासवर्ड विचारला तर त्यानं ऑफिसचे महत्त्वाची माहिती त्यात आहे असं सांगुन पासवर्ड देणं टाळलं खरं, पण बिसिए केलेल्या अनुजाला दहा मिनिटं पुरेशी होती, सिस्टिम सुरु करायला. थोडंफार शोधाशोधी करुन झाल्यावर, हर्षदला नक्की जे लपवायचं होतं ते सापडलं...

Print Page

0 comments:

Post a Comment