Tuesday, January 25, 2011

या वर्षीची गड्डा यात्रा - फोटो सहित


३१ डिसेंबर संपली आणि पहिल्या जानेवारीला डोळे उघडायच्या आधीपासुनच प्रत्येक सोलापुरकराला गड्ड्याचे वेध लागलेले असतात. सोलापुरचे ग्रामदॅवत श्री. सिद्धेरामेश्वरांची यात्रा मकर संक्रांतीला भरते. संक्रांतीच्या २-३ दिवसात देवळात व होम मॅदानावर बरेच कार्यक्रम असतात. संपुर्ण शहरातुन काठ्यांची मिरवणुक निघते. काठ्या या शब्दावर जाउ नका, या प्रत्यक्ष ३०-४० फुटि बांबु असतात, जे एक व्यक्ति आपल्या कमरेला बांधलेल्या विशिष्ट पट्ट्याच्या आधारे दोन्ही हातावर तोलुन धरत जवळ्पास संपुर्ण शहरातुन मिरवत आणतात. ही मिरवणुक ३ दिवस असते. सोलापुर शहरात एकुन ६८ ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केलेली आहे, त्या सर्व ठिकाणी या काठ्या नेउन आणण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी या काठ्यांचे व श्रीसिद्धेश्वराचे लग्न लावले जाते, त्याच दिवशी रात्री होम मॅदानावर दारुकाम म्हणजे फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम असतो. पुढील फोटो जालावरुन साभार.
ह्या वर्षी माझं या सगळ्या सोहळ्याला उपस्थित राहणं शक्य झालं नाही, पण नंतर सुट्टी मिळाल्यावर लगेच लेकाला घेउन मी सोलापुरला आलो. पहिल्यांदा श्रीसिद्धेश्वराच्या देवळात गेलो त्याची काही छायाचित्रे.
हे देउळ एका मानवनिर्मित तलावात आहे, त्याच्या मागे सोलापुरचा भुईकोट किल्ला दिसत आहे. हा तलाव किल्ल्याच्या एका बाजुला आहे.
येथे ही देवळात आत जाताना पाय धुण्याची छान सोय केलेली आहे. तसेच संपुर्ण देवळाच्या फरसबंदी आवारात पांढ-या रंगाचे पट्टे मारलेले आहेत, पायाला चटके बसु नयेत म्हणुन.

ही श्री. सिद्धरामेश्वरांची समाधी. वरच्या लाल रंगाच्या मंडपामुळे खालची संगमरवरी समाधी लाल दिसत आहे. या आवाराला तिनही बाजुला दगडी ओव-या आहेत व मध्ये काही जुनी झाडे पण आहेत.

श्री.सिद्धेश्वराच्या देवळातील ही मुर्ती / शिवलिंगावरचा मुखवटा, श्रावणांत याला विड्याच्या पानंची सजावट केली जाते, ती देखील अतिशय सुंदर असते.

हे मंदिरावरचे शिखर व या मंदिराला गाभा-याच्या दोन्ही बाजुला सभामंडपाला जोडुन दोन छोटी मंदिरे आहेत, असा प्रकार मी फक्त येथेच पाहिला आहे.


हे साधुबाबा खिळाच्या वर उभे राहुन सर्वांना आशिर्वाद देत होते, पण का माहित नाही फोटो काढताना ते लगेच खाली उतरले आणि थोडे रागावले.

मंदिराला तलावाच्या काठाला जोडणा-या छोट्या रस्ता वजा पुलावर या यात्रा काळात व श्रावणांत दुकाने लावलेली असतात.

या दुकानात नेहमीच्या गंडे, दोरे, फोटो, प्रसाद या धार्मिक वस्तुंबरोबरच भस्म / विभुती पण मिळते, हे गोल्,लंबगोल, कांडी ते बेसन लाडु यापॅकी ब-याच आकारात मिळते. सोलापुरातील लिंगायत समाजात रोज सकाळी छाती,कपाळ व खांद्यावर भस्माचे पट्टे ओढुनच घराबाहेर पडण्याची किंवा कामाधंद्याला लागण्याची परंपरा आहे.
दुपारी घरी आल्या बागेतल्या फुलांचे व झाडांचे काही फोटो काढले, मालकीण बाई - आमच्या मासाहेब ब-याच दिवसांनी भेटल्याने सगळ्यांना तरतरी आलेली होती.
आणि या आमच्या माहेरवाशिणी, यांनी दिवाळीत आकाशकंदिलाच्या वायर वरच आपला झुलता बंगला बांधला आहे. 
ही दुस-या दिवशीची सुरुवातीची खादाडी - 
आणि आता खाली गड्ड्यावरची विविध दुकाने- 
माझ्या लहानपणी या हॉटेलमध्ये खाजा नावाचा मॅद्याचा केलेला आणि वरुन प्रचंड पिठिसाखर घातलेला गोड पदार्थ मिळायचा, त्याचं वर्णन मी माझ्या लेकाला पुणॅ ते सोलापुर ४ तास सांगत होतो, पण या वेळी हा खाजा कुठे दिसलाच नाही. आताशा ही हॉटॅल बदलत्या काळाप्रमाणे डोसा, इडली ते पावभाजी ते चायनिज पर्यंत आली आहेत.
 पण लोकं गड्ड्यावर येतात ते या साठी, भाग्यश्री बटाटेवडा, पोलिसचॉकीच्या जवळ असणारा हा स्टॉल माझ्यासाठी गेल्या २० वर्षांचं आकर्षण आहे. दरवर्षी गड्डा फिरताना सुरुवातीला दोन , मध्ये दोन व शेवटी दोन असे वडे खाल्याशिवाय माझा गड्डा पुर्णच होत नाही, या वर्षी ही परंपरा पुढं माझ्या लेकाला देताना मला खुप छान वाटत होतं आणि तो पण पहिल्यांदाच इतक्या इंटरेस्ट्ने बटाटावडा खात होता.
माझे बाबा जसे मला खांद्यावर घेउन मला सगळा गड्डा फिरवत मी पण तसेच लेकाला घेउन फिरलो, त्याला खेळणी घेतली, वडे खाल्ले, उसाचा रस पिला, पापड खाल्ले, परत घरी येताना फुगा घेतला आणि मगच मला माझं बाबा होणं पुर्ण झाल्यासारखं वाटलं, लेक पण माझ्यासारखाच खांद्यावर झोपला होता, माझे केस घट्ट धरुन आणि पाय गळ्यात अडकवुन, माझा शर्ट पण तसाच मळला होता जसा बाबांचा मळायचा. फरक एवढाच होता की दुखणा-या खांद्याबद्द्ल मी दोन वेळा लेकाला सांगितलं आणि खाली उतरवलं होतं आणि बाबा कधी या बद्दल बोललेच नाहीत....
या फोटोपॅकी काही फोटो लेकानं खांद्यावर बसुन काढलेत.


 भाग्यश्री वड्याएवढेच हे चिवडे पण गड्ड्याचा अविभाज्य भाग आहेत.  ज्या मोठ्या पाळण्यांत बसायला मी अजुनही घाबरतो त्याचा लांबुनच काढलेला फोटो.
 परंपरेनुसार गड्डा फिरण्याचा शेवट या स्थानी झाला, या दादांनी दिलेलं पुदिन्याचं पाणी संध्याकाळ भर पोटात भरलेलं व्यवस्थित पचवतं, हा १-२ नाही तर १५ वर्षांचा अनुभव आहे.
तर अशी झाली या वर्षीची गड्डा यात्रा, पुढच्या वर्षी लग्नासहित ३ दिवस जायचा विचार आहे, पाहु या कसं जमतंय ते.
हर्षद. 

Tuesday, January 18, 2011

तुमचं आमचं सेम नसतं भाग-२


...अशा त-हेने मी कोणत्याही मुलीच्या प्रेमात न पडताच कॊलेजच्या बाहेर पडलो, प्रेमात पडण्याच्या प्रयत्नांचा परिणाम अभ्यासावर झालेला दिसत होताच, तिथले मार्क वाढले नव्हते पण इथले तर कमी झाले होते.
कॊलेजच्या बाहेर पडलो आणि नोकरीला लागलो, आता इथे अनेक थोरा मोठ्यांबरोबर राहुन ब-याच गोष्टींच ज्ञान मिळत होतं. सुरुवातीचे काही दिवस काम करण्याच्या प्रेमात गेले, मग काही कंपनीच्या प्रेमात, आणि मग पुन्हा प्रेम आठवलं. घरुन पण "आता बघा लग्नाचं " अशी टोचणी सुरु झाली होती.
ऒफिस सोलापुरच्या मध्यवस्तीत बाजारपेठेतच होतं त्यामुळं ब-याच पोरी पाहायला मिळायच्या बसल्या बसल्या काम करता करता, पण सालं आमचं ऒफिसच असलं खतरुड होतं की आमच्या दिव्य व्यक्तित्वाचा प्रभाव फारसा पडायचा नाही. अशातच एका कमर्शियल बिल्डींगच काम आम्हाला मिळालं, अर्धी बिल्डिंग तयार होती आणि उरलेली आम्ही करत होतो. साहजिकच आधिच्या भागात जी ऒफिस होती, तिथली वर्दळ जाता येता सुखावु लागली.
त्यातल्याच एका दुकान कम ऒफिस ज्यादा मध्ये असलेल्या २-३ मुलींपॆकी एकीकडे जरा जास्त लक्ष जायचं, सुरुवातीला वाटायचं की हे उगीच होतंय, मग काही दिवसांनी मांजर डोळे मिटुन दुध पितं ती स्थिती आली. सहकारी होतेच पेटवायला आणि पार्ट्या उकळायला. दररोज ५-५० खर्च व्हायला सुरुवात झाली. असं करता करता २-३ आठवडे गेले. एका दिवशी साईटची सगळी कामं झाल्यानंतर वेळ होता म्हणुन तिथंच थांबलो होतो. तर आमच्या क्लायंट्च्या ऒफिसमधुन ती बाहेर येताना दिसली,आताशा तिथं ब-याच ओळखि झाल्या होत्या, म्हणलं आज त्यांच्याकडंच चॊकशी करावी आणि आत गेलो. पाहतो तो काय सगळॆजण पेढे खात आहेत. एका काकुंनी अर्धा पेढा दिला आणि म्हणाल्या " घे रे बाबा त्या वरच्या जोश्यांच्या पोरीचं लग्न ठरलंय". शपथ सांगतो त्यानंतर कधी कारलंही एवढं कडु लागलं नाही.
मग आडवळणानं थोडि चॊकशी केली, या परिस्थितित जास्त खोलात जाणं धोक्याचं होतं म्हणुन आपलं वर वर गप्पा, बरं या सगळ्यांत मला जेवढा आणि जो रस होता तो बाकी कुणाला नव्हता त्यामुळं १-२ वाक्यं झाली की बोलणी पुन्हा आमच्या कामाकडेच यायची.
अर्धा तास तिथं काढुन बाहेर येउन लकी मध्ये गेलो, एका मित्राला फोन केला त्याचं ऒफिस भागवत समोर होतं,तो पण काम संपवुन आला. त्याला थोडं सरळ काही फिरवुन फिरवुन सांगितलं, तो ही याच चक्रात पुरता अडकला होता. म्हणजे त्याला जी पोरगी पटवायची होती ती पटत नव्हती पण दुस-या पोरीनं त्याला पटवलं होतं. फक्त त्याच्या घरी जाउन ’ मॆं आपके बेटेके बच्चेकी मा बननेवाली हुं’ एवढं सांगणंच बाकी होतं. या गहन आणि अतिशय महत्वाच्या बिषयावर ब-याच चर्चा झाल्या आणि लकी वाल्यानं उठवलं म्हणुन घरी आलो. रात्र पुन्हा जागण्यात गेली.
दुस-या दिवशी पुन्हा साईटवर आणि सहज तिच्या ऒफिसवरुन गेलो तर ती एकटिच होती आत, एकदम सभ्यपणाचा चेहरा करुन आत जाउन अभिनंदन करावं असा विचार केला,तेवढ्यात तिच्या साहेबांचा आवाज आला, "नलिनी, जोशीबाई येणार नाहीत का लग्न केल्याशिवाय, फोन लावुन विचार जरा" म्हणजे ही जोशी नाही वा वा काय छान वाटलं मला, माझा जीव कितीतरी जोरात आणि किती मोठ्या भांड्यात पडला,त्या आनंदात गाणं म्हणत म्हणत बाहेर आलो, आज पुन्हा सगळं जग सुंदर वाटत होतं, हवा छान होती, झाडं डोलत होती वगॆरे वगॆरे.
पण माझ्या प्रेमाला अजुन मुहुर्त लागायची वेळ आली नव्हती, २-३ दिवसांतच माझी बदली दुस-या साईट्वर झाली आणि पुढचे ८ महिने तिथंच काढले. परत येउन पुन्हा साईटवर गेलो तर काय.....
हर्षद
वाचकांना नम्र विनंती बरा वाईट जो असेल तो प्रतिसाद द्यावा.

Monday, January 17, 2011

युद्ध कोणाचं कोणाशी - भाग - २

युद्ध कोणाचं कोणाशी - भाग - २
मोददला विचार करायला बराच वेळ होता कारण एक सामान्य सॆनिक या नात्याने त्याला या तात्विक युद्धात भाग घ्यायचाच नव्हता, पण भाग घेणं नाही म्हणुन युद्धाची झळ पोहोचत नाही असं होत नाही. आजुबाजुच्या वातावरणाचा नको म्हणलं तरी परिणाम होतोच, कंपनं जाणवताच आणि त्याचे प्रतिसाद उमटतात घरी दारी सगळीकडे. ह्या परिस्थितित मोदद आणि त्याच्या सहका-यांची हळु हळु मानसिक कुचंबणा व्हायला सुरु झाली होती. सगळे एकत्र बसले की हा लढता नसलेलं युद्ध हाच एक विषय असायचा.
तशातच एक दिवस बातमी आली कि युद्ध होऊन होणारी अपरिमित हानी टाळण्यासाठी वाटाघाटी सुरु होणार आहेत, आणि सगळ्यांमध्ये एकच आनंदाची लाट उसळली, आज पर्यंत लढाई सुरु कधी होईल याची वाट पाहणारे वीर आता जिव तरी वाचला याच्या आनंदात होते. मोददची अवस्था फार बदलली नव्हती वाटाघाटी म्हणजे युद्ध होणार नव्हतं पण मरण टळत नव्हता. वाटाघाटीतुन जर आपल्याला,आपल्या राज्याला कुणाचं मांडलिकत्व पत्करावं लागलं तर त्या बरोबर येणा-या अपमानापेक्षा युद्ध होऊन रणांगणावरचं हॊतात्म्य जास्त चांगलं अशी त्याची धारणा होती.
या विषयावर बोलायला त्याच्या काही सहका-यांकडे वेळच नव्हता ते फक्त संध्याकाळी कोणत्या गणिकेच्या महालात गाणं रंगेल याचीच काळजी करीत होते. जंगलात वाढलेला मोदद जंगलातल्या प्राण्यांसारखाच विचार करित होता, जंगली श्वापदं आज शिकार मिळाली ती खाउन निवांत झोपत नाहीत, तर तो भाग किंवा ती जागा सोडुन दुसरीकडे जाउन शिकारीची तयारी करतात, कारण आता त्या जागेतल्या त्यांच्या सावजांना त्यांच्या हालचालीची, ताकदीची कल्पना आलेली असते. पुन्हा त्याच कळपातली सावजं आपल्याला सहज सापड्तील या वेड्या विचारात राहणा-या प्राण्यांना मग काही दिवस उपाशी राहण्याची वेळ येते हे त्यानं पाहिलं होतं.
यथावकाश वाटाघाटींचा दिवस उजाडला, पुन्हा सगळे जण चिंतेत, उगाचच सगळे तणावाखाली होते. शत्रुपक्ष वाटाघाटीसाठी राज्यात येणार होता, त्यामुळं आपलं राज्य सर्व सुख संपन्न दिसायला हवं की अतिशय दरिद्रि दिसायला हवं याचा गोंधळ सगळ्यांनाच होता. सर्व काही छान दिसलं तर शत्रुचा मोह वाढणार होता आणि वाईट वाटलं तर आजुबाजुच्या राज्यात होणारी अपमानजनक स्थिती यातुन मार्ग काढायची तयारी चालु होती. या बरोबरच केलेली युद्धाची तयारी सुद्धा लपवणॆ गरजेचे होते, हे काही शक्तिप्रदर्शन नव्हते पण गाफिल राहणे ही शक्य नव्हते. शत्रु घाबरला नाही तरी त्याच्या मनातली सुप्त भिती संपुन जाणं देखिल परवडवारं नव्हतं. आणि अगदि युद्धाच्या परिस्थितित होतं तसंच मोदद निवांत बसुन होता त्याच्या सहका-यांबरोबर. आता सगळॆच जरा जास्त सावध होते, आक्रमकता फक्त डोळ्यांतच उरली होती. तलवारी म्यानांत होत्या पण काही दिवसांपुर्वी त्यांना बाहेर काढायला शिवशिवणारे हात आता केवळ बाराबंदीच्या गाठींबरोबर गुंतले होते. भाल्यांची टोकं नुसतीच उन्हात चमकत होती, त्यांच्या टोकांना रक्ताची तहान आहे असं दिसत नव्हतं.
न लढल्या जाणा-या युद्धाचा येणारा ताण लपवुन सगळे काही छान मजेत असल्याची ग्वाही देत फिरत होते तर काही जण आता उरलो फक्त उपकारापुरता असा आव आणुन बसलेले दिसत होते. पण एक गोष्ट प्रत्येकाच्या मनात निश्चित होती ती म्हणजे या न होणा-या युद्धाची आणि त्याच्या आपल्या घरांवर आणि आपल्या लेकरा बाळावर होणा-या परिणामांची काळजी.. अगदी मोददच्याही मनात कुठेतरी खोलवर ही वेदना पुन्हा पुन्हा उसळुन वर येण्याचा प्रयत्न करीत होती, मग त्यानं आपली तलवार काढली आणि तिला धार लावु लागला...
क्रमशः
पहिल्या भागाची लिंक - http://harshad-gaaanikha.blogspot.com/2011/01/blog-post_11.html

Saturday, January 15, 2011

२०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा.


 २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता..
पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि
आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे,
असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे. आपले आपले कॅरियर वाहने घेउन यावं आणि तिळ्गुळ घेउन जावा.
चिरंजीवांनी त्यांच्या साईट्वरुन खास पोक्ल्न मागवल आहे त्यासाठी.
आपले वाहन उपलब्ध नसल्यास आमचे कडुन तिळगुळ घरपोच करण्याची व्यवस्था केली जाउ शकेल, ही सोय देखिल चिरंजिवांच्याच सॉज्यनाने.
काल आमच्या सॉ. नी भाकरी भाजी चा बेत केला होता, तर आज आमच्या मासाहेबांनी आज शेंगागुळाच्या पोळ्या केल्या होत्या. हो आता होत्याच, फोटो सकाळी आठचे आहेत आणि साडेनउ पर्यंत ब-याच पोळ्या संपल्या आहेत. हे फोटो पण फार घाईत काढले आहेत.
आज आमच्या कडच्या माहेरवाशीणी पण होत्या ना क्मापिटिशिन्ला. फोटो पहा आणि मज्जा करा.पुन्हा एकदा सर्वांना संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा व हे वर्ष आपणा सर्वांना अर्थपुर्ण, आरोग्यपुर्ण व आनंदाचे जावो ही सुर्य नारायणाच्या चरणि प्रार्थना.

Tuesday, January 11, 2011

युद्ध - कोणाचं कोणाशी

हे काय चाललंय, काही समजत नाही, विचारांच्या भुंग्यांनी डोकं पोखरुन टाकलं होतं, आधिच घरची ही एवढी कामं आ वासुन पुढे उभी होती त्यात हे अजुन काय. त्याच्या सारख्या सॆनिकाला या सगळ्याचा आता खरंतर उबग आला होता. गेली काही वर्षे सगळं व्यवस्थित चालु होतं, आजुबाजुच्या इतर राज्यांच्या सतत चालु असलेल्या लढाया आणि नॆमित्तिक युद्धं या बद्दल तो नेहमीच त्या राज्यातल्या मित्र व नातेवाईकांबरोबर बोलत असे. पण आता त्यांच्या समस्या त्याला आता आपल्या समोर उभ्या असलेल्या दिसत होत्या, आपल्या वाटत होत्या. त्यानं बाकी सगळ्यांना सुचविलेले काही महत्वाचे काही विनोदी मार्ग आता त्याच्याच भोवती फेर धरुन नाचत आहेत असं त्याला वाटत होतं, पण या सगळ्याला घाबरेल तो मोदद कसला.
मोददला त्याच्या वडिलांनीच शिकवलं होतं आल्या प्रसंगाला न घाबरता तोंड द्यायला. त्याचं आयुष्य त्याच्या पत्रिकेत दिल्याप्रमाणे, त्याची रास व्रुश्चिक होती, आणि या राशीला संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला असतो. अर्थात हे मोदादनं वाचलेलं होतं. त्याच्या या ज्योतिष, देव, धर्म या गोष्टींवर विश्वास नव्हताच.
आजची लढाई ही चालु तर होती पण ती होती तात्विक पातळीवर म्हणजे त्याच्या अधिकार कक्षेच्या बाहेरची, पण मोददला ह्या गोष्टी त्याच्या बुद्धीच्या बाहेरच्या कधीच वाटल्या नव्हत्या. तसा तो त्याच्या सॆन्यात फक्त एक रथि होता पण वास्तविकता तर ही होती की त्याच्याच सॆन्यातले नाही तर ब-याच शत्रुसॆन्यातले देखील महारथी त्याला सामोरं जाणं टाळत.
चालु असलेल्या लढाईची मोददला काही दिवसांपुर्वी थोडी कल्पना आलेली होती, त्याचे विचार फक्त तलवारी किंवा भाल्यांच्या कक्षेत कधीच बसणारे नव्हते, तो नेहमी समोरच्या डोळ्याला जखम करण्यापेक्षा त्या डोळ्यात असणा-या त्याच्या कुटंबाच्या दिसणा-या शेवटच्या प्रतिमेवर जास्त लक्ष द्यायचा. समोरच्या डोळ्यांत डोळे घालुन पाहिले की होणारी जखम जास्त विषारी असते हे त्याला नेहमीच माहीत होतं. गदेनं डोकं फोडण्यापेक्षा त्या डोक्याच्या आतल्या विचारांची दिशा बदलुन त्याला गोंधळवुन लढायला जास्त मजा येतं हे त्याला आवडायचं.
मोददनं आपल्या वडिलांबरोबर जंगलात ब-याच वेळा जंगली जनावरं पाहिली होती, जवळुन, लांबुन. आपण त्या वाघापासुन लांब असतो त्याला दिसत नाही तरी तो कसा रागावतो, ओरड्तो याचं त्याला नेहमीच आश्चर्य वाटायचं. पण बरीच वर्षे त्या जंगलात घालवल्यावर त्याला पण हल्ली वाघा-सिंहाचे वास येत, त्याचा हात नकळत कंबरेला लावलेल्या तलवारीकडे जाई. तसाच जशी त्या वाघाची नखं बाहेर निघत त्याच्या पंजातुन.
पण या वेळी कसं काय आपण बेसावध राहिलो याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याच्या दुस-या मनानं त्याला या टाळता न येणा-या भविष्याची थोडी चुणुक दाखविली होती काही काळापुर्वी. त्या कडे त्यानं मुद्दाम दुर्लक्ष केलं होतं की नव्या संसाराच्या, नव्या घराच्या गडबडीत तो हे विसरुन गेला होता हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं.

Saturday, January 1, 2011

२०११ चं पहिलं सुर्य दर्शन. (छायाचित्रे)

आपणां सर्वांना २०११ या नविन वर्षाच्या अनेक उत्तम हार्दिक शुभेच्छा.
आज सकाळी लवकर उठुन या वर्षाच्या पहिल्या सुर्याचे काही फोटो काढले, म्ह्यणले आज आपल्यापॅकी बरेच जणांना हि प्रथम सुर्यदर्शनाची संधी मिळाली नसेल, म्हणुन ते फोटो येथे टाकत आहे.त्याच वेळेला शेजारच्या इमारतीवर काही पोपट पोपट्चाळे करित होते, ते पण टिपले आहेत. त्यांच्या बोलण्यावरुन त्यांना हा स्पॉट स्वस्त मिळाला आहे, तिथे आधि राहणा-या कबुतरांकडुन असे समजले.
धन्यवाद,
हर्षद