Monday, February 28, 2011

तेजोनिधि लोहगोल - छायाचित्रे


तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज
हे दिनमणि व्योमराज
कोटि कोटि किरण तु़झे अनलशरा उजळिती
अम्रुतकण परि सेवुनि अणु रेणु उधळिती
तेचातच जनन मरण तेजातच नविन ध्यास
ज्योर्तिमय मुर्ती तुझी नभमंड्ल दिव्यसभा
दाहक परि संजिवक तरुणारुण किरणप्रभा
होव जिवन विकास वसुधेची राख लाज
हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज.
हे गाणं दररोज सकाळी ऐकुन माझ्या दिवसाची सुरुवात करतो, काही फार जास्त महत्वाचं काम असेल दिवसभरात तर लगेच ' गगन सदन तेजोमय' ऐकुन घेतो, सगळी कामं झटपट होतात माझी.
मागच्या आठवड्यात एका डोंगरावर गेलो होतो, म्हणजे हापिसातर्फे ट्रेनिंग होतं, त्या अंतर्गत डोंगरावर चढवलं होतं, अगदि सकाळि सकाळी. हवा थोडी मद्द मद्द होती, आभाळ होतं, जयंतराव साळगावकरांना सांगितलेली वेळ टळुन गेली तरी सुर्यनारायंण दिसत नव्हते, फक्त उजळलेलं आभाळ त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा देत होतं. अगदी गगन सदन तेजोमय चा प्रत्यक्ष याचि देही याचि डोळा अनुभव.
आद्ल्या संध्याकाळी त्यांची काढलेली छायाचित्रे त्यांना दाखवायची होती, त्यांची चार कॉतुकाचे शब्द बोलले तर ते ह्रुदयात साठवुन ठेवायचे होते म्हणुन माझी थोडी घाई होती पण भास्करजी निवांत होते, अहो प्रत्यक्ष विश्वनियंत्रक ते त्यांना कोण सांगणार नि विचारणार. आणि खरंतर तो मित्र वर येण्याचा संबंधच नव्हता, बहुधा आमच्यासारख्यांच्या वाढत्या वजनानं हल्ली ही वसुंधरेचा फिरण्याचा वेगच कमी होत चालला आहे.
आणि तो क्षण आला, तो लोहगोल त्याच्या तेजोमय सदनाच्या सौंधावर उभा राहुन त्याच्या प्रजेला आपल्या सौम्य रुपात दर्शन देता झाला. त्याच्या दाहक नसणा-च्या संजिवक किरणप्रभेची ही काही छायाचित्रे , त्याच्या प्रथम दर्शनाच्या ह्या काही आठवणी कॅमेरात साठवलेल्या आपणासमोर सादर करतोय. आपणांस आवडतील ही अपेक्षा.
पहिले दोन फोटो आदल्या दिवशी आपली वसुंधरेनं त्या व्योमराजाचा निरोय घेतानाचे, त्याची प्रियसखी त्याच्यापासुन दुर जात असल्यानं चेह-यावर येउ पाहात असलेली पिवळसर रगाची उदासी, लालभडक रंगाच्या कर्तव्यनिष्ठेनं तो लगोलग झाकुन घेत होता.
आणि हे दोन फोटो दाखवुन त्यावर शाबासकी मिळावी म्हणुन मी त्यांची वाट पाहात उभा होतो तर वसुंधरेला ह्या अतिरिक्त ढगांचा अडथळा दुर करुन पुढं यावं लागणार होतं त्यासाठी.
थोड्याच वेळात तो अडसर दुर झाला आणि त्या विश्वउर्जास्त्रोताचं त्या दिवशीचं प्रथम दर्शन झालं.

माझ्या,या मित्राला त्याचे काल संध्याकाळचे फोटो आवडले म्हणुन त्याने खास दिली ही पोझ .
आता सगळेच ढग दुर झाले होते,
म्हणुन मी अजुन जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तरी तो शांतपणे पोझ देत होता.
मग अजुन धाड्स करुन अजुन जव़ळ गेलो
पण एवढ्या जवळ गेल्यावर चिडुन त्याने त्याच्या महालाच्या खिडक्यांवर लगेच ढगांचे पडदे टाकण्याच्या आज्ञा दिल्या.

पुन्हा मनात ' गगन सदन ' सुरु केलं तरी राग कमी होईना, ढगांचा पडदा आहे तिथंच
मग मीच जागा थोडी बदलली आणि हे फोटो काढले.
वर सविता आणि खाली सरिता, त्या मधल्या अंतराळातलं माझं चिमुकलं जिणं या क्षणी खुप सुखाचं झालं.
दव पिउन नवेली झाली गवताची पाती आता त्या संजिवक किरण प्रभेतुन मिळणा-या अम्रुतकणांचे सेवन करण्यात गुंग होती, त्यामुळं त्यांना जास्त न धक्का देता हे दोन फोटो काढुन आम्ही परतीच्या वाटेला लागलो.
सर्व वाचकांना नम्र विनंती, मी या क्षेत्रात तसा नविनच आहे, त्यामु़ळे आपल्या प्रतिसादामुळेच माझा उत्साह वाढणार आहे, म्हणुन प्रतिसाद अवश्य द्यावेत.
हर्षद.

तुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०५

Print Pageबाबांना खुप वाटायचं मी शिक्षक व्हावं असं, पण मला त्यात काहीच मजा वाटत नव्हती. लहानपणापासुन बाबांबरोबर दुकानात जाउन जाउन माझ्या डोक्यात ते वेगवेगळ्या ऒषधांचे वास बसले होते वस्ती करुन, ते काही केल्या जात नव्हते. ते आधीचं छोटंसं दुकान, मग नगरपालिकेने केलेलॊ तोडातोडी, मग ६-८ महिने चाललेली कोर्ट केस आणि मग नंतर हे मिळालेले खुप मोठं दुकान, सगळं सगळं आठवतय मला. माझा हट्ट पाहुन बाबांनी मला डिफार्मसीला घातलं, सोलापुरात होस्टेलवर मी एकटिच राहणार म्हणुन घाबरलेली मी, त्यात आईनं कुठुन कुठुन ओळखी काढुन दिलेले पत्ते, ही काकु, ती मावशी हे न ते सगळं सगळं लक्षात ठेवणं केवढं अवघड होतं ते माझं मलाच माहिती. त्यात गॊरी ताईचा गोंधळ, कारण तिला बार्शीतच कॊलेजला घातलं होतं म्हणुन.
ह्ळु हळु मी सगळ्याला सरावले होते आणि बघता बघता शिक्षण पण संपलं होतं. त्यावेळी किती तरी वेळा गप्पा व्हायच्या की कुणाला इथंच सासर मिळतंय कुणाला कुठं ? पण तेंव्हा हे फार सिरियस वाटलं नव्हतं, तेंव्हा काय आणि परवा पर्यंत तरी कुठं सगळं सिरियस होतं.
गेल्या मंगळवारी मी घरी आले तर , जास्तीची ताटं, कप बश्या पडलेल्या होत्या. मग आई आल्यावर आईला म्हणाले ’ कोण आलं होतं ग, काका काकु का?’ आई म्हणाली ’ हो, का ग ?’ आणि पुढं विचारलं ’ माधवी जरा एस्टीची तिकिटं दाखव गं?
मी म्हणाले ’ मी जिपनं जा ये करते कोण बसणार त्या फडतुस एस्टित धक्के खात’ एवढं ऐकल्यावर आई बेडरुम मध्ये जाउन रडत बसली, ताईचा फोन घेतला नाही,दुकानात पण गेली नाही, शेवटी महादेवकाकाच आले, चाव्या आणि पैसे घेउन. मला काही कळतच नव्हतं, मी एस्टीनं न जाण्यानं नुकसान होतंय एस्टीचं आणि आई का रडतेय, आणि गेले १५-२० दिवस तर पैसे पण देत नाही मी त्याला.
य्स्स्स, आत्ता उजेड पडला माझ्या डोक्यात, हे माझं त्याच जिपसाठी थांबणं कॊणितरी काकुच्या कानावर घातलं होतं आणि ते तिथुन आईपर्यंत पोहोचलं होतं. आता मलापण रडु येत होतं, काय करु सुचत नव्हतं. अगदी पिक्चरच्या हिरोईनसारखं होत होतं मला, मग होता नव्हता तो सगळा धीर गोळा केला आणि आईच्या समोर जाउन उभी राहिले. आई पाच मिनिटं ताडताड बोलत होती, माझ्या डोळ्यातुन धारा लागल्या होत्या, पण वर मान करायची डेरिंग होत नव्हती. माझ्या डोळ्यातलं पाणि माझ्याच पायांवर पडत होतं, आणि मनात वाद्ळ चालु होतं, काय केलंय मी असं ? फक्त दररोज एका जिपमध्ये बसते मह्णुन एवढा गोंधळ, एवढी चॊकशी.?
शेवटी एकदाची आई थांबली आणि त्याच आवाजात विचारलं ’ कुठपर्यंत गेलीत ही थेरं? काही झालं गेलं तर नाही ना? आधी बापानं दिलेली आणि नंतर मिळालेली विद्या आहेच, नको ती , त्याचवेळी सांगत होते इथंच ठेवा इथंच ठेवा, पोरिची जात नजरेसमोर बरी, तर नाही ऐकलं कुणि आमचं, आणि आता उरलेय........मी........एकटी........सगळ्या दुनियेला तोंड द्यायला ’
या सगळ्या बोलण्यानं मला मी जेवढी बावरली नव्हते, तेवढं शेवटच्या तीन थांबत थांबत आलेल्या उश्वासांनी हादरले . काही कळायच्या आत आईच्या पायावर पडले, आणि जोरात ओरडले ’ नाही ग आई, काही नाही केलं ग मी.’
आईनं उठवुन विचारलं, ’ खरं बोल गधडे, आता लहान नाहीस तु, चांगली एकवीसची आहेस.
मी म्हणाले ’ आई एकदा मला तरी विचारयंस की ग असलं काहीतरी बोलण्याआधी?
आई ’ तुझं तोंड शिवलं होतं होय गं ? तुला नाही सांगता आलं ते?
मी ’ अग पण आई, तसं काही माझ्या मनात नव्हतंच ग, उगीच कोणितरी तुला काहीतरी सांगतं आणि तुझा विश्वास बसतो
.
आई ’ चल आता एकदा तुझ्यावर ठेवते विश्वास सांग काय आहे ते सगळं आणि खरं खरं, एक शब्द जरी खोटा निघाला ना तर तुझा तरी जिव घेईन नाहीतर मी तर जिव देईन.
मी कसाबसा धीर गोळा करुन सगळं सांगितलं, अगदि दोन महिन्यापुर्वी पहिल्यांदा एस्टि सुटली होती ते आजपर्यंत. दहा मिनिटं तरी बोलत असेन. एवढं ऐकल्यावर बहुधा आईचा विश्वास बसला असावा. तिनं त्याच करड्या आवाजात ऒर्डर दिली , कोण आहे तो त्याला उद्या घेउन ये त्याला घरी, दुपारी मी घरी येईन जरा लवकर आणि येताना काकांना पण निरोप दे.
मी म्हणाले ’ हो बोलते मी .’
आणि हे बोलल्यावर खरी काळजी सुरु झाली, जर उद्या तो भेटलाच नाही तर, उद्या तो नाहीच म्हणाला तर, आज नको उद्या येतो म्हणाला तर, एक ना बारा भानगडी, नको नको ते विचार मनात येत होते, म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती.
तेवढ्यात आईचा नेहमीचा आवाज आला ’ मधु, चला आज भाजी आमटी तुझ्याकडे आहे, माझी पोथी वाचुन होईपर्यंत घे आटोपुन, मग एकत्रच बसु, पण त्याआधी महादेवनं हिशोब ठेवला आहे तो तपास आणि निट, गेल्या महिन्यात सात-आठ चुका झाल्या तेंव्हाच मला ही शंका यायला हवी होती. पण विचार केला लेकरु उन्हातान्हांत जातंय, बाबाला बोललं होतं एक - दोन वर्ष शिकवेन कारखान्याच्या शाळेत, जाउदे, तर हिचं काय वेगळंच सुरु.’
मी पुन्हा धास्तावले, ह्या अशा गोष्टी काय मी आईला सांगणार होते घरात, बरं गॉरिताईला फोन करावा तर तिचं नव्या संसाराचं कॊतुक, आत्ताच सांगत होती म्हणे ’आज काय ह्यांनी हाफडेच घेउन दुपारीच घरी आले अचानक आणि , त्यांचे सगळे कपडे इस्त्री करुन ठेवले आठवडाभराचे, मी म्हणाले, मी करत जाईन तर मला म्हणतात ही इस्त्री जड आहे, पुढच्या महिन्यात एखादी हलकी घेउ म्हणजे तुला पण करता येईल इस्त्री. रोज कडक इस्त्रीचा शर्ट लागतो ग यांना.’ आता माझ्या डोळ्यासमोर उगाच तो आला, आठवायला लागले त्याला कधी इस्त्रीचे कपडे घातलेलं पाहिलंय, कधीच नाही. नेहमी खाली जिन, वर एक शर्ट आणि टोपी उलटी घातलेली, त्या बाबा सैगल सारखी, शी बाई मला नाही आवडत असलं काही.
’मोहरी तडतडली नाही अजुन, गॆस संपला का ग? ’ इति आई. ’ अगं करते गं आता लगेच होईल, किती वेळ लागतो त्याला.’ मी उत्तर देउन रोजमेळ हातात घेतला आणि खरंच माझ्या चुका होत्या अर्थात पन्नास - शंभरच्या होत्या म्हणुन आई काही जास्त बोलली नव्हती, नाहीतर जेवण दिलं नसतं,बाबा करायचे तसं,हिशोब चुकला की रात्री जेवण नाही. हिशोब झाला, मग किचन मध्ये जाउन दोन्ही गॆस पेटवले, एकिकडे कढईत तेल गरम झालं की मोहरी टाकली. कुकरमधुन वरण काढेपर्यंत मोहरी जळाली, त्या वासानं आईचा आवाज ’ जरा सुधरा आता, हे असलं खाउ घालणार का उद्या नव-याला,होय गं ? आणि तो खाईल गप, त्याची आई,ती बरी चालवुन घेईल हे असलं’ यावर मला खुदकन हसु आलं,एकदम आठवलं, बाबांना पण ताटात लोणचं वाढलेलं खपत नसे,’ भाज्या करता येत नाहीत धड म्हणुन ही मुरवलेली लिंबं वाढता काय?’ हे असं चारचॊघात बोलायचे बाबा.
आईची पोथी वाचुन संपेपर्यंत कशीबशी आमटी झाली होती,’ कट्ट्याजवळ येत आई म्हणाली ’ अगं, मोहरी जळाली ना तर त्यात भाजी टाकायची, आमटीपेक्षा कमी वास येतो जळाल्याचा, सरक हो बाजुला. ताटं घे आणि आता मोठ्या ताटांत जेवायला शिका, ते तसलं कप्याकप्याचं ताट का नेणार आहेस बरोबर’ आई बहुधा माझं लग्न ठरल्यासारखंच वागत होती,ह्या सगळ्या कहाण्या आता तीन चार महिन्यांपुर्वी ऐकुन झाल्या होत्या, त्या परत एवढ्या लगेच ऐकायला मिळतील असं मलाच वाटलं नव्हतं. शेवटी भाजी आईनंच टाकली, तोपर्यंत मी बाकीचं आवरलं होतं. जेवणं झाली, सगळी झाकपाक करुन कड्या कुलुपं लावुन दोघी झोपलो, मला थोड्याच वेळात झोप लागली, काहीतरी आवाज झाला म्हणुन उठुन पाहिलं तर हॊलमधला दिवा चालु होता, बाहेर जाउन पाहिलं तर आई, बाबांच्या फोटोसमोर उभी राहुन बोलत होती. ’ काय करु मी, दुकानाचं बघु, गॊरीचं पहिलं वर्ष लग्नाचं, तिचं सणवार का हे मधुचं, असं सगळं एकदम कसं व्हायचं हो? बरं महेशभावोजींना सांगावं तर ते त्यांच्या साडुच्या मुलाचंच धरुन बसलेत, आपलीच पोर, आपलंच घर काही त्रास नाही काय नाही, पुढं मागं दुकान पण बघेल, हे सगळं असलं. हे सगळं रांगेला लावुन का नाही गेलात तुम्ही? काय घाई होती एवढी तुम्हाला ?
आई बरंच काही बोलत होती, मी हळुच परत आले आणि झोपायचा प्रयत्न करु लागले, आता एक एक प्रश्न समोर उभे राहात होते, उद्या माझं झालंच लग्न तर ह्या घराचं काय? दुकान कोण बघेल? आईकडं कोण बघेल? माझ्या नावाचं लायसन्स काढुन पुन्हा पहिल्यासारखं कोणितरी लायसन्सवाला बघा, त्याला हिस्सा द्या, ही सगळी लफडी आईला निस्तरता येतील? माझी मला मीच स्वार्थी वाटायला लागले होते, आई-बाबांची अपराधी वाटायला लागले होते. पण त्याच वेळी, जिजाजी ताईला कसं इस्त्री करायला शिकवत असतील, बाजुला बसुन का मागं उभं राहुन हे असले विचार पण घुमायला लागले. आई आत आली, हातात चक्क चहाचा कप होता, थेट बाबा धरायचे तसा, गरम चहाचा कप थेट पकडायचा, कानाला नाही, आणि मला म्हणाली,’आज खुप आठवण येतेय गं तुझ्या बाबांची. ते असते ना तर खुप मारलं असतं तुला हे असलं ऐकुन. बरं झालं बाई तुझा मार वाचला.’ माझा विश्वासच बसेना माझ्या कानावर, आई मगाशी बोलत होती ते खरं का हे ? का दोन्ही ? छे या पेक्षा एस्टिने गेले असते दोन महिने तर काय बिघडलं असतं माझं. 
सर्व वाचकांना नम्र विनंती, प्रतिसाद अवश्य द्या.
हर्षद.

Monday, February 14, 2011

तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ०४

Print Page

तुमचं आमचं सेम नसतं - भाग - ०४
माधवीच्या मागं मागं चाललो होतो,तिनं एका घराचा दरवाजा वाजवला, दोन मिनिटं काहिच आवाज नाही, आणि नंतर एकदम आमच्या मागुन आवाज आला,” कोणय रे ", मी वळालो आणि पाहिलं बहुधा तिची आई असावी अशा वयाची एक बाई घराकडे येत होती, समोरच्या घरात गप्पा मारायला गेली होती बहुतेक. मी जरा कावराबावरा झालो कारण ज्या घराकडुन त्या येत होत्या त्याच्या कंपाऊंड्मधुन एक काका माझ्याकडे विचित्र नजरेनं बघत होते. माझ्या मनात उगाचच नाहि नाहि ते विचार येत होते.
तेवढ्यात माधवि पाय-यावरुन खाली उतरली आणि म्हणाली ”किल्ली हवी आहे घराची ”, त्या काकु झपकन घरात गेल्या, किल्ली घेतली आणि माधविच्या हातात देत विचारलं "आई गेली का आहे घरीच". माधवीचं काहीच उत्तर नाही, आणि त्यामुळं माझी अस्वस्थता वाढत चाललेली. ती सरळ त्या घराच्या मागच्या दिशेनं चालायला लागली. मी ह्ळुच काकुंकडं पाहिलं, त्यांच्या नजरेत ’कुठुन आणलंय हे खुळ पकडुन’ असे भाव होते. मनाचा हिय्या करुन मी चालु लागलो.
तो कच्चा रस्ता एक शंभर मिटर मागे असलेल्या घराकडे जात होता, आणि आत्ता माझं लक्षात आलं की या सगळ्या गोंधळात त्या छोट्याश्या बंगलीवजा घराकडे आपलं लक्षच गेलं नव्हतं. गुंठेवारीतलं असलं तरी व्यवस्थित घर होतं, निदान बाहेरुन तरी. रंग पण नविनच होता. गेट समोर आल्यावर दिसलं की गेटच्या कॊलमवर दोन द्वारपाल रंगवलेले आहेत, म्हणजे अशातच घरात काहीतरी मंगल कार्य लग्न वगैरे पार पडलेलं होतं. गेट उघडंच होतं, ते ढकलुन दोघं आत गेलो, दरवाजा पण उघडाच होत्ता, माझं थोडं टेन्शन कमी झालं, चला दुसरं, खरंतर तिसरं कुणितरी असणार होतं इथं.
मागं वळुन पाहिलं आणि आता, बापरे आता आमची जिप डायरेक्ट कुठुनच दिसत नव्हती. पुन्हा धडधड वाढली. माधवीचा आवाज ऐकुन भानावर आलो, ” आई ए आई, झोपलीस की काय? - आतुन काही आवाज आला नाही, पण लगेचच दार उघडलं गेलं, एक साधारण ४५ च्या आसपासची बाई, घरगुती पण व्यवस्थित अवतारात दरवाज्यात उभी. माझ्याकडे लक्ष गेल्यावर डोळ्यांनीच माधवीला ”हे कोण?” हा प्रश्न गेला हे मी पाहिलं. यावर तिचं उत्तर बहुधा” चल आत सांगते” असं असावं, कारण त्या माउलीच्या चेह-यावर अजुन काही लिंक लागल्याचं दिसत नव्हतं,म्हणजे या ठिकाणि मी जेवढा नवखा होतो तेवढेच हे सगळे, जे कोणि आणि जे किती असतील ते मला नवखे असणार होते. या अनोळखि पणाची एक गंमत असते, माणुस या अनोळखी पणातच जास्त खुलतो, मोकळा होतो. मी स्वताला सावरत पटकन त्यांना नमस्कार म्हणलं, माधवी आत गेली, मला काय करावं कळेना, मी तिथंच ” पायरिशि होवु दंग ” या थाटांत. पण तेवढ्यात तिच्या आईनं मला आत यायला सांगितलं.
घर साधंसंच, एक हॊल, त्याच्या बाजुला किचन, त्या भिंतिवरची हॊटेल मध्ये असते तशी सर्व्हिंग खिडकी, मागं घरात जाणारा पॆसेज, त्यात एका बाजुला दिसणारा बाथरुमचा दरवाजा. बाहेर प्रमाणेच आत पण घर टापटिप, छान रंगकाम केलेलं होतं. बसायला दोन खुर्च्या, एक लोखंडी कॊट, त्यावर दोन गाद्या, सोलापुरी चादर अंथरलेली होती. एका कोप-यात टिव्हि, दिल्लि मेड साउंड सिस्टिम, त्याचे स्पिकर वर चारी कोप-यात लावलेले. एका भिंतिवर हिरो होंडाचं घड्याळ व एक फॆमिली फोटो, "हम दो हमारी दो". नकळत माझं मन गरज नसताना या सगळ्याची तुलना माझ्या घराबरोबर करु लागलं, जोड्या लावा सुरु झालं, हे आहे, ते नाही वगैरे वगैरे. हि विचार मालिका तुटली ” बसाना तुम्ही का उभे ? " या माधवीच्या प्रश्नानं. दरवाज्याजवळच्याच खुर्चित बसलो. तोवर तिची आई, आत गेली होती आणि आतुन आवाज आला ” मधु, इकडं ये ग जरा ” आता ही आवाजाची पट्टी साधारण नॊर्मल होती.
मधु आत गेली आणि मी पुन्हा तुलना सुरु केली. अजुन एक साम्य माझ्या आणि त्या घरातलं जे मगाशी निसटलं होतं ते ठळकपणे समोर आलं, घरातल्या कुटुंबप्रमुखाचा भिंतिवरचा फोटो हार घातलेला. आता हार सुकला होता, पण जेंव्हा घातला होता तेंव्हा मायेनं घातलेला असणार हे निश्चितच. मला एकदम बाबा आठवले, ते असते तर एव्हाना माझं लग्न लावुन दिलं असतं त्यांनी. पुन्हा माधवीच्या आवाजानं माझी तंद्रि भंग पावली, ” तुम्ही चहा घेणार की सरबत?’ पाच मिनिटात दोनदा बोलली ते पण प्रश्नच!, मी हलकंच हसत उत्तर दिलं ’चहा’,आणि हा आदेश असावा तसा आत पाठवला गेला ’आई, चहाच टाक”आम्हाला’.
ती समोर पलंगावर बसली, तिच्याच घरात असल्यानं जरा निवांत होती. ’ मागच्या महिन्यांत गॊरी ताईचं लग्न झालं, तेंव्हाच ही रंगरंगोटी केली होती’ मी फक्त ’हुं, छान आहे तुमचं घर’ एवढंच बोललो असेन, तेवढ्यात तिची आई बाहेर आली, हातात ट्रे घेउन त्यान दोन कप चहाचे आणि एक सरबताचा ग्लास. मी चहा घेतानाच माधवीचा आवाज आला ’ बाबा गेल्यापासुन आईनं चहा सोडलाय’ हा मनकवडेपणा होता की टेलिपथि की अजुन काही हे कोडं मला आजपर्यंत सुटलेलं नाही. जे प्रश्न माझ्या मनात ज्या क्रमाने होते त्याच क्रमाने त्यांची उत्तरे न मागता मिळत होती. आत्ता पहिल्यांदाच तिच्या आईच्या गळ्याकडं निट पाहिलं, एक न सांगता येणारी भावना दाटुन आली. कसातरी चहा संपवला आणि काहितरी बोलायचं म्हणुन विचारलं ’ तुम्ही बार्शिचेच का?’ माधवी -’ नाही, मुळचे कर्नाटकातले,माझे आजोबा इकडे आले होते माझे, आणि तुम्ही इथलेच की ? - पुन्हा प्रश्न - मी ’ नाही, मुळ गाव सोलापुर, इकडं कामानिमित्त फक्त’.
तिच्या आईनं तिला आत जायला सांगितलं, आणि अगदी स्पष्ट विचारलं ’ तुमची ओळख कशी झाली, मधुबरोबर, तिच्या कॊलेजात होतात की? - मी मग सगळी हकिकत सांगितली. तिची आई ’ मधु फार काही बोलली नाही कधी, पण ठिक आहे, तिच्यावर विश्वास आहे माझा, काही वेडंवाकडं नाही करणार ती’ , मला उगीचच सिट्वर मुद्दाम हात ठेवल्याची लाज वाटल्यासारखं झालं. ’ घरी कोण असतं? - पुन्हा प्रश्न - मी माहिती पुरवली. नक्की कुठल्या दिशेला चाललंय हे सगळे काही हिशोबच लागत नव्हता. माधवि पुन्हा बाहेर आली, तशा तिची आई पुन्हा आत गेली . आता शांतता होती ती फार सुखद नव्हती पण भयाण पण नव्हती. ’ चला निघतो मी, अजुन साईटवर जायचं आहे’ असं म्हणुन उठलो.
तेवढ्यात तिची आई बाहेर आली , आत जाउन बोलण्यासाठी बळ उसनं घेउन आलेल्या असाव्यात अशा बोलायला लागली ’ आता आम्ही दोघिच आहोत एकमेकिंना, हिचे बाबा गेले आणि आत्ता गॊरीचं लग्न झालं मागच्या महिन्यात,वर्षात करायचं असतं म्हणुन आटोपलं. तुम्हाला मधु आवडली असेल तर आधी तुमच्या घरी बोला आणि कुणा मोठ्यांना घेउन या पुन्हा येताना, पत्रिका पाहणार असाल तर हि घ्या, बाकी मागे फोन नंबर लिहिला आहेच.’ एका दमात सगळं सांगुन मोकळ्या झाल्या व शेवट्चा शब्द असाअ आला की, निघा आता, उगाच लोकांना चर्चा करायला विषय नको.
मी कसंनुसं हसुन, पुन्हा निरोप घेतला, पत्रिका जपुन खिशांत ठेवली आणि बाहेर येउन बुट घालायला लागलो, काही हालचाल जाणवली,वर पाहिलं माधवी दारात उभी होती, तिच्या चेह-याकडं पाहणं मला मुश्किल होत होतं, त्यात थोडि अगतिकता आणि बराच आपलेपणा बराच, मुग्ध प्रेम नाही. मी हळुच आत पाहिलं, तिची आई आत गेली होती, शक्य तेवढ्या हळु आवाजात कुजबुजलो ’मी बोलतो आईशी आणि फोन करतो तुला’ ’चालेल, पण लवकर कर’ - अवघ्या दहा मिनिटांत मी ’तुला’ आणि ती ’कर’ वर आली होती.
मला परत जायला रस्ता सापड्णार नव्हताच, मग तिला विचारलं, ’रस्ता सांगशील का जरा मेन रोडवर जाइस्तोवर’ ’आई, मी सोडुन येते मेन रोडपर्यंत’ एवढं बोलुन चपला घालुन ती निघाली. आईनं मगाशी दाखवलेल्या विश्वासाला जागत माझ्या पुढंच चार पावलं जात होती. जिप दिसेपर्यंत काही बोलणं झालं नाही,मी जिपमध्ये बसल्यावर आमच्या ड्रायव्हरला म्हणाली, ’तुम्ही पण यायचं ना चहा घ्यायला’ आमच्या ड्रायव्हरनं थेट सिक्सर मारला ’ आता काय येणं जाणं होईलच की घेउ पुन्हा आल्यावर’.
चुपचाप जिप मध्ये बसलो, ड्रायव्हरनं विषय काढलाच ’ मग यंदा आहेत वाटतं लाडु’, मी काहिच बोललो नाही. रुमवर आलो आणि मग एक एक विचार यायला लागला, आपण आईला ,बहिणीला काही सांगितलंच नाही आणि एवढा मोठा निर्णय घ्यायचा विचार करतोय. तिच्या आईनं केलं तेच बरोबर होतं "आधी तुमच्या घरी बोला आणि कुणा मोठ्यांना घेउन या पुन्हा येताना". आता हेच मोठं लफडं होतं घरी विषय काढायचा कसा आणि सांगायचं कुणाला, थेट आईला की लाडोबाला,म्हणजे माझ्या धाकट्या बहिणीला. तशी ती माझ्या पेक्षा दोन वर्षांनीच लहान आहे, पण तरी देखील आमच्यात एक अंतर आहेच. रुममधुन बाहेर आलो, जेवायला मेस मध्ये गेलो, तिथंही डोक्यात हाच विचार होता. मग सरांना (बॊसला) घरी फोन केला आणि उद्या सोलापुरला घरी काम आहे असं सांगितलं. तिथुनच डायरेक्ट एसटी स्टॆंडला आलो आणि एसटि पकडुन थेट सोलापुरला. घरी यायला रात्र झाली होती, त्यामुळं आई पण चमकली ” आत्ता कसा आलास रे अचानक? जेवणार आहेस की कसं? काही भांड्णं झाली का साईटवर?, पुन्हा नुसते प्रश्न. सगळ्याला नाही म्हणुन झोपलो. डोळ्यासमोरुन दरवाज्यात उभारलेली माधवी जात नव्हती तसेच तिची आई पण. उद्या सकाळी आईला सगळं सांगावं असा विचार करत कधीतरी झोप लागली.
सकाळी उठलो आणि आई स्वयंपाकघरात काहीतरी करत होती, तिथं जाउन बसलो. आई म्हणाली ” बोल काय सांगायचंय तुला, रात्री दोन-तिन वेळा बडबडत होतास, उद्या सांगतो उद्या सांगतो. एक पाच मिनिटं धीर जमवण्यात गेली आणि नंतर दहा मिनिटं गेल्या दोन महिन्यात काय काय झालं ते सांगितलं अर्थात सेन्सॊर करुनच, आणि हे संपतय तोच लाडोबा आली तिच्या लक्षात आलं की काहितरी गंभिर बाब आहे. ती पण तिथंच बसली. थोडा वेळ असाच शांततेत गेला, मग आईनं विचारलं” मुलगी शिकतेय अजुन की नोकरी करतेय’. आई स्वतः नोकरी करत असल्यानं बायकांनी नोकरी करणं हा आमच्या घरातला अतिशय जिव्हाळ्याचा विषय होता, आणि लाडोबाला लगेच मुद्दा सापडला माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, ’ कोण रे मुलगी आणि कुणासाठी? आईनं डोळे वटारलेलं मी पाहिलं आणि लाडोबा बाहेर निघुन गेली. आता आईच्या आवाजात तसाच प्रॊढपणा होता जो काल माधवीच्या आईच्या आवाजात होता,संथ पण अजिबात गोंधळ नसलेला. अर्धा तास या विषयावर चर्चा करुन उठलो. खिशातली पत्रिका आणुन आईला दाखवली, ती आजच जाते म्हणाली साठेंकडे . मग संध्याकाळी पुढचं बोलु असं म्हणुन चर्चेचा एक भाग संपला.
मी पुन्हा बाहेर येउन बसलो, पेपर वाचला, आवरलं मग ऒफिसमध्ये गेलो. सर आल्यावर थोडं कामाचं बोलुन घरी आलो जेवायला. लाडोबानं अपडेट केलं,"आई मगाशीच गेलीय साठॆंकडं,तिचा म्हणे मनुष्य गण आहे आणि तुझा राक्षस, असं कसं रे होणार मग? साठेंची पोरगी हिच्या बरोबर कॊलेजात त्याचा परिणाम अजुन काय? मी काहीच बोललो नाही, गप्प बसलो. लाडोबाचा पुढचा प्रश्न ” तिचे पण बाबा नाहीत का रे?”. मी मानेनंच हो म्हणलं. लाडोबा - पण आई आपल्या आईसारखीच आहे का रे, न रडणारी? तिचे हे प्रश्न ऐकुन दोघांचे डोळे भरुन आले, तेवढ्यात आई आली, आम्ही सारवासारव केली, लाडोबानं पाणि आणुन दिलं, पाणि पिउन आई म्हणाली. ” साठे म्हणाले पत्रिका जुळतीय, पण १९च गुण जुळताहेत ,मुलगी, माणसं आणि घरदार पाहुन निर्णय घ्या "
” हो का आणि दाद्याचा राक्षस गण आहे ना आणि तिचा मनुष्य असं कसं चालेल? इति लाडोबा. आई हसुन म्हणाली,”तुझा पण राक्षस गणच आहे, तुला बघु एखादा राक्षस त्या चंद्रकांताच्या यक्कुसारखा, आधि तुमच्या दादासाहेबांचं तरी आट्पुद्या मला, मग ते बघितील तुला काय करायचं राक्षस का देव. चहा टाक जरा”,
आणि पुढचा प्रश्न मला होता, फोन नंबर आहे का बार्शिकरांचा, मी पत्रिका साठॆंकडेच विसरलेय.

Thursday, February 10, 2011

तुमचं आमचं सेम नसतं - भाग ०३

तुमचं आमचं सेम नसतं - भाग ०३


४ महिने म्हणता म्हणता ७-८ महिने बार्शी जवळ साईटवर गेले,महिन्यातुन एक -दोन दिवस घरी येउन जायचो. पाईप लाईन व पंपिंग अशी दुहेरी जबाबदारी घेउन काम चालु होतं. आता आपण लवकरच लग्न केलं पाहिजे ही भावना जोर धरु लागली होती, जे मनात येतंय कुणाशी तरी बोलावसं वाटतंय ते ऎकणारं कुणितरी असावं हा विचार आता सारखा सारखा छ्ळायला लागला होता, अशातच भेटली ती, साखर कारखान्याच्या हंगामी शाळेत शिकवायला येणारी बार्शीच्या एका कॊलेजची काही मुलं आणि अर्थातच मुली पण. रडार वर पुन्हा ठिपके दिसायला लागले. आम्ही रोज बार्शी ते साईट येणं जाणं करायचो, त्यामुळं कधि या मुलांची एसटि चुकली की आमच्या जिप मध्ये त्यांना कारखान्याच्या फाट्यावर सोडत असु. एके दिवशी या ग्रुपबरोबर एक नविन मुलगी होती. त्यांचं बार्शीत ऒषधांचं दुकान होतं आणि काका काकु कारखान्यावर होते ऎडमिन मध्ये.दोन दिवसात तिचं नाव कळालं, माधवी. अजुन दोन दिवसांनी साईटवरच्या सुपरवायझर व ड्रायव्हरनी त्यांचं दुकान कुठं आहे ते हुडकुन काढलं.

 ती जिप मध्ये बसल्यावर आमचा ड्रायव्हर नेहमीपेक्षा वेगळी गाणी लावायचा, आता हे लक्षात येउ नये एवढी दुधखुळी नव्हती ती, कॊलेजातली असली तरी शाळेवरच्या तिच्या प्रेमाने तिनं शाळा एकदोन वर्षे उशिराच सोडली असावी असा संशय होता."बाकी चेहरेपट्टी व अंगकाठी बरी होती, अगदी हिरॊईन नसली तरी मला शोभुन दिसली असती " - हे माझं स्वगत आणि मनोज, माझा सहकारी याचं मत होतं. त्याचं लग्न ठरलेलं होतं त्याच्या आत्याच्या मुलीबरोबर त्यामुळं त्याला जणु या गोष्टींवर बोलायचा हक्क असल्यासारखा तो बोलायचा. आमची कामं संपत आली होती आणि आता मी तुम्ही वरुन तु पर्यंत आलो होतो. माधवी पण बहुधा एसटि चुकवायची आणि आमच्या जिपमध्ये यायची. मागच्या सिटवरुन आता मधल्या सिटपर्यंत प्रगती होती. चढता-उतरताना कळत नकळत खांद्याला तिचा हात लागला कि डोक्यात नुसतं झण्ण्ण व्हायचं. दुपारी त्यांचा ग्रुप चारच्या सुमारास कारखान्याच्या फाट्यावर येउन एसटि साठी थांबायचा, एकदा त्यांना बार्शीला सोडायच्या निमित्ताने माधवीचं घर पहावं असा विचार केला आणि मनोजला तसं सांगितलं, तो म्हणाला बरोबर हाय हो पुढं, आपण काही चुकिचं तर करत नाही, जा आज तु.
त्या दिवशी, दुपारी साईट्ची सगळी कामं संपवुन ड्रायव्हरला जिप लवकर काढायला लावली, कारखान्याच्या फाट्यावर आलो आणि काय तो सिन म्हणावा तर असा, तिथं फक्त माधवी आणि दोन शाळकरी मुली होत्या, आता आमच्या ड्रायव्हरला पण का लवकर निघालो याचा उलगडा झाला होता, त्यानं जिप थांबवली, माधवी पुन्हा मधल्या सिटवर बसली, पुन्हा चढताना तो स्पर्श आणि पुन्हा शहारा. जिप सुरु झाली आज मि मुद्दाम, सिटवर हात आडवा टाकुन बसलो होतो, जिप एखाद्या खड्यातुन जाताना तिनं आधारासाठी सिट धरलंच तर असावा हात या हिशोबानं. पुढच्या दहा मिनिटातच  ज्या हुशारिनं भगवान क्रुष्णानं रथ / घोडे खाली करुन अर्जुनाला कर्णापासुन वाचवलं त्याच हुशारिनं  आमचा क्रुष्ण रस्त्यावरच्या दिसेल त्या प्रत्येक खड्यातुन जिप चालवु लागला. पहिल्यांदा तिनं हात पुढं करणं टाळलं पण नंतर अगदीच नाईलाज झाला तसं सिट पकडायला सुरुवात केली. मी पण उगाचच हात खाली केल्यासारखं करायचो पण पुन्हा हात तिथंच. अर्धा तासाचा तो रस्ता संपुच नये असं वाटत होतं,
दोन शाळेतल्या मुली उतरल्या वर माधवीला विचारलं, तुला घरापर्यंत सोडु दे का ? आणि ति चक्क हो म्हणाली, पत्त्ता आणि दिशादर्शन सुरु केलं, डाविकडं, उजवीकडं सांगताना आता तिला वाकावं लागत होतं. तिचं घर पार बार्शीच्या दुस-या टोकाला होतं, गुंठेवारीच्या प्लॊटवर बांधलेलं एक मजली घर होतं. घर जवळ आल्यावर उतरली आणि दुसरा आश्चर्याचा धक्का दिला तिनं, चक्क चहाला घरात बोलावलं. आता खरी परिक्षा होती, एकटा असताना पाहिलेली स्वप्नं, मनोज बरोबरच्या गप्पा सगळ्या एका क्षणात डोळ्यासमोर येउन गेल्या. थेअरी बरीच झाली होती, पण आता प्रात्याक्षिक करायची वेळ आली तेंव्हा चक्क फाट्ली होती. बरं नको म्हणावं तर का नको आणि हो म्हणावं तर वेगळंच काही झालं तर काय हा प्रश्न होता. शेवटी,म्हणजे त्या मिनिटाच्या शेवटी तिच्याबरोबर तिच्या घरात जायचं ठरवलं, चला म्हणालो आणि तिच्या मागुन निघालो. ड्रायव्हर जिपमध्येच होता, काही दगाफटका झाला तर लगेच निघता यावं या उद्देशानं तो बहुतेक तिथंच बसला असावा.

क्रमश: (उरलेला भाग शनिवारी रात्री)

Friday, February 4, 2011

सहल - मोराची चिंचोळी व रांजणखळगे.

Print Pageसहल - मोराची चिंचोळी व रांजणखळगे.
मित्रहो, अचानक ठरवुन देशस्थात ब-याच गोष्टी नीट होतात हे बाबांचं वाक्य सिद्ध करण्यासाठीच की काय दोन दिवसात हि सहल ठरवली आणि यशस्वी केली. या बद्दल आम्ही सर्व प्रथम आमचे मित्र कि जे श्री. राजशेखर व श्री. अभिजित यांचे अनेक आभार. तर या सहलीचा रिपोर्ट खालीलप्रमाणे सादर आहे.
रविवारी सकाळी ठरल्याप्रमाणे लवकर उठुन घरातुन मिंटित बसुन निघालो, मुंबई-पुणे हायवेला फारशी वर्दळ नसल्याने बरोबर २० मिनिटात राजशेखरच्या घरी पोहोचलो आणि शिरस्त्याप्रमाणे चहा पाणि घेउन शिक्रापुरला निघालो,मोशि -आळंदि -सणसवाडि मार्गे शिक्रापुरला साडेनवुला ट्च, आहा लई मजा आली गाडी चालवायला सकाळी सकाळी. अभिजित हडपसरहुन येउन तिथेच जॊईन झाला. शिक्रापुर पासुन डाव्या हाताला एक फाटा जातो तो पाबळला, त्याच रस्त्यावर साधारण १७ - १८ किमि वर मोराचि चिंचोळी हे गाव आहे, आता जे नावात आहे ते गावात पण आहे, हो दोन्ही चिंच पण आणि मोर पण. इथे श्री. आनंदराव थोपटे यांच्या घरीच जेवणा खाण्याची सोय आहे, त्यांच्या बरोबर आधीच बोलणी झालेली होती, तसेच त्यांनी पण सकाळपासुन ३-४ फोन करुन कुठे आलेलो आहोत ते विचारलेले होतेच.
गाड्या त्यांच्या घराच्या समोर लावल्या आणि सगळी पोरं खाली उतरवली. जवळ जवळ दोन तास पोरांना मांड्यावर घेउन आया व पोरं दोन्ही पार्ट्या जाम कंटाळल्या होत्या, अशा वेळी ड्रायव्हर असणं हे सर्वात सुखाचं काम असतं, रिझर्व्ह सिट आणि हात पाय हलवायला जागा. थोपटेंनी काही मोराची अंडि साठवुन तसेच छोटि पिल्लं पकडुन त्यांना वाढवणं सुरु केलं आहे,

पुढच्या वर्षी हे मोर मोठे झालेले असतील आणि लहानपणापासुन - यहां मॆ घर घर खेली - असल्याने तिथंच आसपास राहतील. ’ पोहे होत्याती गरम तवर रानातुन जाउन या चटदिशि ’ इति, थोपटेमावशी लगेच चहा घेउन त्यांच्या घराच्या मागच्या रानात फिरायला निघालो. मागं एका तात्पुरत्या पाटामधुन मोटार चालु करुन पाणि सोडलेलं होतं, पोरं आणि त्यांचे आईबाप असे सगळेच त्यातुन चालत चालत गेलो, आसपासची शेती पाहिली, मग गोव्यात जसे डॊल्फिन दर्शनाचे होतात तसे मोर दर्शनाचे कार्यक्रम झाले. परत येताना माझ्या बायकोला अबोलीचं झाड दिसलं, ही तिची अतिशय म्हणजे अतिशय आवडती फुलं ( पुरावा - आज पर्यंत सासरहुन ३ अबोली रंगाचे शर्ट मिळालेत). आमच्या सोलापुरच्या घरि सुद्धा खुप झाडं आहेत अबोलीची असो.. तिनं खुप फुलं गोळा केली,

तेवढ्यात थोपटेअण्णांच्या लेकाचा आवाज ऎकुन परत घराकडे आलो, गरम गरम पोहे तयार होते, हाण हाण हाणले कारण आता इथुन पुढे रांजणखळगे पाहायला जायचं होतं आणि तिथं बरेच चालावं लागणार होतं. तो पर्यंत सगळी पोरं मातीत खेळुन मजा करत होती, आज काल घराच्या बाहेर पडलं की डांबर नाहितर सिमेंट्चे रस्ते आणि जी बाजुला माती असते ती नको नको त्या गोष्टींनी रंगलेली पण इथं पोरांना मातील खेळायला त्यांच्या आरोग्य निरिक्षक आया पण काही म्हणत नव्हत्या.
शेवटी रांजण्खळगेला निघताना पोरांना अक्षरक्ष: उचलुन थोडं विसळलं आणि पुन्हा गाड्यांत बसवलं, अभिजितच्या गाडित थोपटेअण्णा गाईड म्हणुन बसले होते, तिथुन निघुन मलठणमार्गे रांजणखळगे पाहायला आलो, पार्किंगच्या गोंधळाच्या नियमाच्या पुरेपुर पालन करत मोकळ्या मॆदानात २-३ वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं पार्किंग करुन मंदिराजवळुन खाली नदी पात्रात खळगे पाहण्यासाठी उतरलो. थोपटे अण्णांच्या वॊकिंग कॊमेट्री आणि अभिजित बरोबरच्या ’ खळगे म्हणजे पाणि व ज्वालामुखी व उल्कापात’ अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.असेहि सगळ्या सिव्हिल इंजिनियरना दगड म्हणलं की किति ब्रास याचीच काळजी असते, पण अभिजित तसा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि असा एक मित्र असल्याबद्दल माझाच अभिमान वाटला. आता हे खळगे कसे का कधी असले शास्त्रीय प्रश्न विचारु नका,आम्ही रविवारच्या सहली या साठी काढत नाही त्या साठि गुगला. इथं फक्त फोटो पाहा आणि मजा करा.
गालावरच्या खळीत जी मजा आहे ती नदितल्या खळग्यात कुठं असं म्हणु नका, फोटोवरुन कल्पना येईलच नाहीतर प्रत्यक्ष जाउन पाहा हा फार जबरदस्त नजारा आहे, विशेषत: फोटोग्राफर्स साठी तर निश्चितच, ब्लॆक व्हाईट फोटोग्राफिसाठी तर खुपच सुंदर. हे त्या खळग्यांचे फोटो.




 हा चेहरा राजशेखरने दाखवला म्हणुन लक्षात आला, (नाहीतर आम्हाला प्रत्येक दगड म्हणजे आमचेच पत्रिबिब वाटते)

 असे बरेच छोटे छोटे दगडी पुल आहेत तिथे.

तिथंच एका खळग्यातल्या पाण्यातले बेडुकदादा.

 हे खरंच रांजणासारखं दिसतय.



बालविक्रमादित्याला सापड्लं त्याचं सिंहासन.
सगळे खळगे पाहण्यात १-२ तास गेले, आता तिथल्या देवळाजवळ आणि आमच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होति. मग तिथुन परत आलो थोपटे अण्णांच्या घरी, तोवर मावशींनी जेवण करुनच ठेवलेलंच होतं, भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी, दोन प्रकारचा ठेचा, शेंगादाण्याची चटणी, मसालेभात व कढी असा बेत होता. भाकरी होतानाचा मला यापेक्षा चांगला फोटो अजुन मिळाला नाही,


घराबाहेरच खाटांसमोर टेबलं मांडुन जेवायची व्यवस्था केलेली होती. ताटं वाढुन आणली, आधीच भुक लागलेली होती त्यात असं जेवण
पुढं आल्यावर कशाला थांबा असा विचार केला त्यातच थोपटेअण्णा एका भल्या थोरल्या किटलीतुन घरचं तुप घेउन आले आणि भातावर आमटी घ्यावी तसं तुप भाकरीवर घालु लागले, अगागा अस्सल घरगुती तुपाच्या वासानं भुक अजुनच खवळली आणि आम्ही सगळ्यांनी मनसोक्त घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर एका चिंचेच्या झाडाखाली विश्रांतीची सोय केलेली होती,
 हे महाशय खांबावर बसुन मजा पाहात होते आमची.
तिथं थोडि विश्रांती घेउन निघताना १-२ मोरांनी दर्शन देउन आमचा दिवस सार्थकी लावला व आपल्या गावाचं नाव राखलं.

थोपटेअण्णांच्या घरातील धाकटे सदस्य - लई अ‍ॅटिटुड होता याला.
 हे गव्हाच्या शेतात बसले होते,
नेहमीप्रमाणे मला मोहवणा-या तेजोनिधी लोहगोलाची ही छायाचित्रं,
आणि त्या सुर्यास्ताच्या बरोबरच हा एक व्रुक्षास्त, सुर्य नारायण उद्या पुन्हा येतील पण ह्याचा पुन्हा उदय होण्यासाठी आपल्यालाच हात पाय हलवले पाहिजेत, किमान आपल्या लेकरा बाळांसाठी तरी.
फोटोंसाठी अभिजितला धन्यवाद. राजशेखरकडचे फोटो आले की टाकतो खाली.
तर अशी ही या वर्षातली दुसरी ट्रिप सुफ़ळ संपुर्ण झाली