Wednesday, March 21, 2012

वांझोटा...


बोंबला, तिच्यायला माझी बायको बायको म्हणुन जिला जीव लावला, दहा वर्षे जे तिला सोसावं लागलं ते सोसायला मदत केली, बोललो असेन एक दोन वेळा मी सुद्धा चिडुन, पण म्हणुन असं पदरचं दुखः इंटरनेटवर मांडावं, ह्या देशात कायदा आहे म्हणे की, बलात्कार झालेल्या बाईचं नाव डायरेक्ट लिहित नाहीत, मग हे कसं काय चालतं.
हा काय बलात्कार नाही का, म्हणजे जे नटरंग मध्ये दाखवलं तसं झालं तरच पुरुषावर बलात्कार होतो का, बायकांची मनं जळतात, करपतात, उध्वस्त होतात आणि पुरुषाच्य मनाला काय नवी पालवी फुटते, पालीला शेपटी फुटते तशी ? हे जहरी बोल अन कुजक्या नजरा फक्त बायकांसाठी राखीव आहेत काय, त्यांना बोलवत नसतील बारश्याला अन हळदी कुंकुवाला, तसं मी गेल्यावर पण ऑफिसातले सगळे चालु असणारा पोरांच्या अ‍ॅडमिशनचा विषय एका शब्दात बदलतातच की, तेवढंच कशाला शेजारचा चोच्या, लग्न होईपर्यंत का नंतर सुद्धा बायको माहेरी गेली की माझ्याकडुन स***भी अन *च्या* च्या पिडिएफ घेउन जायचा अन आता बायकोची टेस्ट पॉझिटिव्ह आली की साला बोलायचं पण टाळतो माझ्याशी.
जसं काय अन्याय ही बायकांची मक्तेदारी असल्यासारखंच बोलतात सगळेजण, बाहेरचे बोलतात ते इनडायरेक्ट ,पण जेंव्हा सख्ख्या भावानं मदतीची तयारी दाखवली तेंव्हा मला काय गुदगुल्या झाल्या असतील असं वाटतंय काय ? नाकाखाली मिशा आहेत तर डोळ्यातुन पाणी नाही आलं पाहिजे, असं शिकवणारे अण्णा असते ना, तर त्यांना सुद्धा या न उमटणा-या शिक्यासारख्या मिशांचा भिकारचोट पणा दाखवुन दिला असता, पण ते गेले म्हणुन एका वर्षात लग्न करायचं म्हणुन समोर आलेल्या दुस-याच पोरीला हो म्हणुन बसलो , पुढं हे असं काही होईल याची काय जाण होती.
पहिली चार वर्षे, नोकरी पक्की नाही, शहरातला खर्च परवडत नाही, म्हणुन मारुन नेली, मग नंतर तर आमचंच काय तरी चुकतंय असं वाटायला लागलं, शास्त्रीय ते अशास्त्रीय सगळी पुस्तकं वाचुन झाली, तेवढ्यासाठी घरी पिसि घेउन रात्र रात्र भर नेट धुंडाळुन झालं, जेवढ्या रात्री पोर होण्यासाठी जागवल्या असतील त्यापेक्षा जास्त ह्यात गेल्या, नंतर आईच इथं येउन राहिली मग तर काय सगळाच आनंद होता, दर महिन्याला तारखेवर लक्ष ठेवुनच राहायची , आधीच बायकोला ते दिवस वाईट जायचे त्यात आधी रडगाणं मग बायकोचं सुरु.
मग वैदु, आयुर्वेद, गव्हांकुराचा रस अन कसचं काय सुरु केले, घरच्या विझत चाललेल्या दिव्याचा धुर बिल्डिंगमध्ये पसरला होता, आणि मग हे प्रकरण जास्तच पेटलं. हिच्या डोक्यात काय म्हणे तर आपण मुल दत्तक घेउ, आपलं नसलं तरी काय झालं, त्याला आपलं करु, लहान ५-८ महिन्याचं असलं की त्याला काही कळत नसतं, त्याला एवढं प्रेम देउ की त्याला जन्मभर बाकी कुणाची आठवणच नको यायला.
थेरी बरी वाटली, पण प्रात्याक्षिक कितीतरी जास्त अवघड असतं, तसं हे सगळीकडंच असते, करण्यापेक्षा बोलणं जास्त सोपं असतं, जेंव्हा एकदोन अनाथाश्रमात गेलो, तेंव्हा पहिल्यांदा तर आमच्यावरच संशय घेतला, मग आर्थिक परिस्थिती चांगली आहे सिद्ध करा, सामाजिक परिस्थिती चांगली आहे सिद्ध करा, बायकोच्या डोक्यावर मुल नसण्यानं परिणाम झालेला नाही, तिची मानसिक स्थिती बिघडलेली नाही ह्याचं प्रमाणपत्र आणा, एवढ्या भानगडी की आम्ही जन्माला येउन कुणाला जन्माला घालु शकत नाही हा या जगातला सग़ळ्यात मोठा गुन्हा आहे असं वाटायला लागलंय, त्यात पुन्हा हिचं, आपलं नसलं तरी काय झालं त्याला आपलं करु, असा कंटाळा आलाय ना याचा.
अरे जे पोर या जगात आलं ते कुणाच्या तरी नादानपणातुन आलंय की कुणाच्या तरी पापातुन की कुणाच्या भीतीतुन काय माहीत, आणि ते सोडलंय का ह्याची काय माहिती आपल्याला ? अशा सोडलेल्या पोरांचं काय होतं ते महाभारतानं कर्णाच्या रुपात दाखवुन दिलेलंच आहे, आणि त्याची अवस्था तो अभेद्य कवच कुंडलांसहित जन्मला तेंव्हाची, आम्हाला जे मिळेल, त्याला अनाथाश्रमाच्या लोकांनी पल्स पोलिओ तरी दिलंय का नाही कुणास ठाउक.
असंच एक लेकरु, ते आपण घरी आणायचं, त्याला आपलं म्हणायचं, आपलं पोर म्हणजे काय फक्त आपलं रक्त मांस नसतं, तर आपले संस्कार, आपली बुद्धी, आपल्या भावना घेउनच जन्माला येतं ते. उगा आवडलं म्हणुन पोर घरात आणायला काय ते कुत्र्याचं पिलु आहे, आणलं, दुध पाजलं, फिरायला नेलं, बस म्हणलं की बसतंय, भुंक म्हणलं की भुंकतंय.
आता आपलं मायेचं लेकरु असावं असं मला पण वाटतंय, मला बाबा म्हणावं, त्याच्या चिमुकल्या हातात बोटं दिल्यावर झोपेत असुन पण त्यानं ती घट्ट धरावीत, त्याचा हात हातात धरुन गालावर फिरवावा आणि मग बायकोनं ओरडावं, 'दाढी टोचंल त्याला रडेल ते ' , दुध पाजुन झाल्यावर कडेवर घेउन ढेकर काढली की आपलंच पोट भरल्यासारखं वाटावं, कधी 'गुणी बा़ळ तर कधी ' निज आता' म्हणत त्याला झोपवावं, असं मला पण वाटतं, आणि असं होत नाहीये म्हणुन रडु पण येतं, पण नाकाखालच्या मिशा आड येतात..
त्या सलीलच्या दमलेल्या बाबाला कहाणी सांगायला एक परी आहे, इथं आम्ही नुसतंच दमतोय आणि घरी येउन पाठीकडं पाठ करुन झोपतोय. पण पुन्हा एखादा दिवस माझी इच्छा उफाळुन येते बाप होण्याची तर कधी बायकोची आईपणाची स्वप्नं जागं करतात, मग कुस बदलली जाते पण उजवली जात नाही अजुन..



Print Page