Tuesday, January 25, 2011

या वर्षीची गड्डा यात्रा - फोटो सहित


३१ डिसेंबर संपली आणि पहिल्या जानेवारीला डोळे उघडायच्या आधीपासुनच प्रत्येक सोलापुरकराला गड्ड्याचे वेध लागलेले असतात. सोलापुरचे ग्रामदॅवत श्री. सिद्धेरामेश्वरांची यात्रा मकर संक्रांतीला भरते. संक्रांतीच्या २-३ दिवसात देवळात व होम मॅदानावर बरेच कार्यक्रम असतात. संपुर्ण शहरातुन काठ्यांची मिरवणुक निघते. काठ्या या शब्दावर जाउ नका, या प्रत्यक्ष ३०-४० फुटि बांबु असतात, जे एक व्यक्ति आपल्या कमरेला बांधलेल्या विशिष्ट पट्ट्याच्या आधारे दोन्ही हातावर तोलुन धरत जवळ्पास संपुर्ण शहरातुन मिरवत आणतात. ही मिरवणुक ३ दिवस असते. सोलापुर शहरात एकुन ६८ ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केलेली आहे, त्या सर्व ठिकाणी या काठ्या नेउन आणण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी या काठ्यांचे व श्रीसिद्धेश्वराचे लग्न लावले जाते, त्याच दिवशी रात्री होम मॅदानावर दारुकाम म्हणजे फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम असतो. पुढील फोटो जालावरुन साभार.
ह्या वर्षी माझं या सगळ्या सोहळ्याला उपस्थित राहणं शक्य झालं नाही, पण नंतर सुट्टी मिळाल्यावर लगेच लेकाला घेउन मी सोलापुरला आलो. पहिल्यांदा श्रीसिद्धेश्वराच्या देवळात गेलो त्याची काही छायाचित्रे.
हे देउळ एका मानवनिर्मित तलावात आहे, त्याच्या मागे सोलापुरचा भुईकोट किल्ला दिसत आहे. हा तलाव किल्ल्याच्या एका बाजुला आहे.
येथे ही देवळात आत जाताना पाय धुण्याची छान सोय केलेली आहे. तसेच संपुर्ण देवळाच्या फरसबंदी आवारात पांढ-या रंगाचे पट्टे मारलेले आहेत, पायाला चटके बसु नयेत म्हणुन.

ही श्री. सिद्धरामेश्वरांची समाधी. वरच्या लाल रंगाच्या मंडपामुळे खालची संगमरवरी समाधी लाल दिसत आहे. या आवाराला तिनही बाजुला दगडी ओव-या आहेत व मध्ये काही जुनी झाडे पण आहेत.

श्री.सिद्धेश्वराच्या देवळातील ही मुर्ती / शिवलिंगावरचा मुखवटा, श्रावणांत याला विड्याच्या पानंची सजावट केली जाते, ती देखील अतिशय सुंदर असते.

हे मंदिरावरचे शिखर व या मंदिराला गाभा-याच्या दोन्ही बाजुला सभामंडपाला जोडुन दोन छोटी मंदिरे आहेत, असा प्रकार मी फक्त येथेच पाहिला आहे.


हे साधुबाबा खिळाच्या वर उभे राहुन सर्वांना आशिर्वाद देत होते, पण का माहित नाही फोटो काढताना ते लगेच खाली उतरले आणि थोडे रागावले.

मंदिराला तलावाच्या काठाला जोडणा-या छोट्या रस्ता वजा पुलावर या यात्रा काळात व श्रावणांत दुकाने लावलेली असतात.

या दुकानात नेहमीच्या गंडे, दोरे, फोटो, प्रसाद या धार्मिक वस्तुंबरोबरच भस्म / विभुती पण मिळते, हे गोल्,लंबगोल, कांडी ते बेसन लाडु यापॅकी ब-याच आकारात मिळते. सोलापुरातील लिंगायत समाजात रोज सकाळी छाती,कपाळ व खांद्यावर भस्माचे पट्टे ओढुनच घराबाहेर पडण्याची किंवा कामाधंद्याला लागण्याची परंपरा आहे.
दुपारी घरी आल्या बागेतल्या फुलांचे व झाडांचे काही फोटो काढले, मालकीण बाई - आमच्या मासाहेब ब-याच दिवसांनी भेटल्याने सगळ्यांना तरतरी आलेली होती.




आणि या आमच्या माहेरवाशिणी, यांनी दिवाळीत आकाशकंदिलाच्या वायर वरच आपला झुलता बंगला बांधला आहे. 
ही दुस-या दिवशीची सुरुवातीची खादाडी - 
आणि आता खाली गड्ड्यावरची विविध दुकाने- 
माझ्या लहानपणी या हॉटेलमध्ये खाजा नावाचा मॅद्याचा केलेला आणि वरुन प्रचंड पिठिसाखर घातलेला गोड पदार्थ मिळायचा, त्याचं वर्णन मी माझ्या लेकाला पुणॅ ते सोलापुर ४ तास सांगत होतो, पण या वेळी हा खाजा कुठे दिसलाच नाही. आताशा ही हॉटॅल बदलत्या काळाप्रमाणे डोसा, इडली ते पावभाजी ते चायनिज पर्यंत आली आहेत.
 पण लोकं गड्ड्यावर येतात ते या साठी, भाग्यश्री बटाटेवडा, पोलिसचॉकीच्या जवळ असणारा हा स्टॉल माझ्यासाठी गेल्या २० वर्षांचं आकर्षण आहे. दरवर्षी गड्डा फिरताना सुरुवातीला दोन , मध्ये दोन व शेवटी दोन असे वडे खाल्याशिवाय माझा गड्डा पुर्णच होत नाही, या वर्षी ही परंपरा पुढं माझ्या लेकाला देताना मला खुप छान वाटत होतं आणि तो पण पहिल्यांदाच इतक्या इंटरेस्ट्ने बटाटावडा खात होता.
माझे बाबा जसे मला खांद्यावर घेउन मला सगळा गड्डा फिरवत मी पण तसेच लेकाला घेउन फिरलो, त्याला खेळणी घेतली, वडे खाल्ले, उसाचा रस पिला, पापड खाल्ले, परत घरी येताना फुगा घेतला आणि मगच मला माझं बाबा होणं पुर्ण झाल्यासारखं वाटलं, लेक पण माझ्यासारखाच खांद्यावर झोपला होता, माझे केस घट्ट धरुन आणि पाय गळ्यात अडकवुन, माझा शर्ट पण तसाच मळला होता जसा बाबांचा मळायचा. फरक एवढाच होता की दुखणा-या खांद्याबद्द्ल मी दोन वेळा लेकाला सांगितलं आणि खाली उतरवलं होतं आणि बाबा कधी या बद्दल बोललेच नाहीत....
या फोटोपॅकी काही फोटो लेकानं खांद्यावर बसुन काढलेत.


 भाग्यश्री वड्याएवढेच हे चिवडे पण गड्ड्याचा अविभाज्य भाग आहेत.  ज्या मोठ्या पाळण्यांत बसायला मी अजुनही घाबरतो त्याचा लांबुनच काढलेला फोटो.
 परंपरेनुसार गड्डा फिरण्याचा शेवट या स्थानी झाला, या दादांनी दिलेलं पुदिन्याचं पाणी संध्याकाळ भर पोटात भरलेलं व्यवस्थित पचवतं, हा १-२ नाही तर १५ वर्षांचा अनुभव आहे.
तर अशी झाली या वर्षीची गड्डा यात्रा, पुढच्या वर्षी लग्नासहित ३ दिवस जायचा विचार आहे, पाहु या कसं जमतंय ते.
हर्षद. 

3 comments:

Vinoba said...

मला हल्ली सोलापुरची खुप आठवण येते.किती दिवस नाही, किती वर्ष झाले तिकडे गेलेच नाही.गड्ड्याची जत्रा..... ते संध्याकाळी लौकर तयार होऊन रात्री गड्ड्यावर घरच्या सगळ्या मंडळींबरोबर,कधी काही कौटुंबिक मित्रपरिवारासह जाणे एक सोहोळाच असायाचा! जाताना पाय कसे भरभर पडायचे.दरवर्षी गेले तरी नवीन ओढ असायचीच.खरेदी अशी फारशी नसायची महत्वाची पण वेगवेगळ्या स्टालना भेट देणे चुकवायचे नाही.शिवाय अधूनमधून काही ना काही खाणे चालु ठेवायचे (दोन अडीच तास फिरायला शक्ती नको का?)बटाटेवडे,भेळ,कसले तरी तळलेले मोठे खुसखुशीत पापड,उसाचा रस,बुढ्ढीका बाल,मोठे दोसे आणि शेवटी आईस्क्रीमने ह्या सगळ्याला पुर्ण्वविराम.अरे हो! झटपट फोटोचा पण एक मस्त कार्यक्रम(विसरु नये अस्सा!) व्हायचा बरं का ह्या दरम्यान. एवढा वेळ चालुन आता पायांना आपली ताकद संपल्याची जाणीव व्हायला लागलेली असायची.त्यावेळी वाहनांची फारशी सोय नव्हती.टांग्याची वाट पाहात पाहात घराच्या दिशेने स्वत:ला कसेबसे ढकलत एकदाचे आत शिरलो की सरळ अंथरुणात! (हो!.गड्ड्यावर जाण्यापूर्वी हे काम प्रत्येकजण अगदी आनंदाने करीत असे.)पुढे वय वाढले तसे घरच्या लोकांबरोबर जाण्यापेक्षा मैत्रिणींबरोबर जाण्यात मजा वाटू लागली मात्र आता वेळेचे बंधन आले.पण तरी गड्ड्याची मजा काही कमी नाही झाली.बरं, हा कार्यक्रम काही एकदाच व्हायला हवा असे नाही.गड्डा आहे तोपर्य़ंत कधीही जा, गंमत तेवढीच येते.
आता ११.३० वाजले आहेत पण गड्ड्याच्या त्या आठ्वणीत एवढे रमायला झालेय की त्या वेळेसारखीच आता मी दमून,त्याच आनंदात गुडूप्प होऊन जाईन!

Nandkumar Waghmare said...

छान पोस्ट आहे. मी सुद्धा अक्षता कार्यक्रमासह तीन दिवस सोलापुरला खास गड्डा यात्रेसाठी तळ ठोकून होतो. तसेच 23 ते 26 जानेवारी या काळतही गड्डा यात्रेसाठी सोलापुरात होतो. अक्षता कार्यक्रम व होम कार्यक्रमाच्या वेळेचे फोटो सुद्धा मोबाईलवरून काढले. ते तितकेच छान आले नाहीत. म्हणून ब्लॉगवर टाकले नाहीत. पण तुम्ही टाकलेले फोटो छानच आहेत. गड्डा यात्रा पुन्हा एकदा आठवली.
पण गेल्या काही वर्षात गड्डा यात्रा कमी कमी होत आहे. यंदाही ही कमतरता जाणवली. यंदा दुकाने कमी लागलेली दिसत होती.

पण या यात्रेची मजा काही औरच... हे नक्की...

Anonymous said...

Some of my relatives are from solapur...I regularly goes to Solapur & Akkalkot....But I was not knowing about this.....

Thanks for Information....

Regards,
Jayant Phatak (jayant.phatak@rediff.com)

Post a Comment