Saturday, July 2, 2016

अंकोदुही भाग ११

राजसभेतुन बाहेर पडल्यापासुन माझ्या दालनात येईपर्यंत माझ्या कानांत काकांचं शेवटचं वाक्य घुमत होतं ‘ तुम्हांला तिघींना तुमचा निर्णय घेण्यासाठी उद्या सुर्यास्तापर्यंतची वेळ आहे, उद्या सुर्यास्तानंतर आपण सर्वजण इथं जमु आणि तुमचा निर्णय ऐकु. त्यानंतरच्या दिवशी चवथ्या प्रहरी राजा दशरथांना भेटायला आपणा सर्वांना जायचं आहे, तुमचा निर्णय काहीही असला तरी..’
हेच आपलं स्वयंवर कसं होईल, - मांडवी शक्य तेवढ्या रागानं बोलत माझ्या दालनात आली. तिच्या मागोमाग श्रुतकिर्ती आणि ताई पण आल्या. ‘ ताईच्या स्वयंवरात कितीतरी राजे आले होते, त्या सर्वांनी तो धनुष्याचा पण पुर्ण करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर तिचा विवाह निश्चित झाला, जे त्या स्वयंवरात सहभागी झाले त्यांची नावं, राज्यं, संपत्ती याची थोडी तरी कल्पना होती आपल्याला, पण याबाबतीत तसं काहीच घडणार नाही.’
तिच्या बोलण्यात थोडी भिती होतीच, पण त्याच बरोबर एक निर्णय समानतेची किंवा स्वातंत्र्याची संधी मिळत नसल्याचा राग देखील होताच.
‘म्हणजे तुला त्या राजकुमारांना पाहायचं आहे तुझा निर्णय घेण्यापुर्वी.’ श्रुतकिर्ती या विषयावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलली., ‘ मला तर नुसतं पाहायचंच नाही तर त्यांची भेट घ्यायची आहे आणि बोलायचं देखील आहे ‘
 सितेचा वेगळेपणा पुन्हा अधोरेखित होत होता, हा विचार उद्यापर्यंत न ठेवता आताच आईला अन् काकुला सांगायचं ठरलं आणि आम्ही आईच्या दालनात गेलो. तिथं आई एकटीच होती, दासी तिच्या पायांना उटी लावत होत्या, आम्हांला बघताच त्या निघुन गेल्या, ‘ मला वाटलंच होतं, तु येशील असं, पण तुम्ही तर सगळ्याच जणी आल्या आहात ‘ आई माझ्याकडं पाहात उठुन बसली.
श्रुतकिर्तीनं काहीही आढेवेढे न घेता, तिचा विचार आईला बोलुन् दाखवला. ‘ तुझी मागणी अगदीच अयोग्य आहे असं नाही, पण याचा निर्णय उद्या सकाळी राजा जनक आणि कुलगुरु करतील, आणि राजा दशरथांना देखील या बद्दल विश्वासात घ्यावं लागेल.’
माझ्या अपेक्षेनुसार आई पुन्हा एकदा आमच्या बाजुनं बोलली होती, आम्ही परत निघताना तिच्या हालचालीतुन एक तणाव जाणवत होता, किंचित आनंदाचा भास होत होता, दालनाच्या दरवाज्यातुन मी मागं वळुन पाहिलं तेंव्हा आई एका गवाक्षाला टेकुन बाहेरचं आकाश पाहात होती. माझ्या दालनात येउन मी देखील तशीच उभी राहिले, पण माझ्या गवाक्षातुन मला आकाश पाहता येत नव्हतं, त्याची कल्पना करावी लागत होती. तो छोटासा काळाकभिन्न् आकाशाचा तुकडा आणि एखादाच तारा कुठंतरी दुरवर चमकणारा, प्रत्येक रात्री तुमच्या समोर चंद्राची कोर येत नसतेच आणि आली तरी तिचा प्रकाश तुम्हाला पुढची वाट दाखवेलच असं नाही,
आयुष्याच्या वाटा निट पाहायला अन समजायला सुर्याचीच साथ असावी लागते, उदया काय होईल याच्या नेहमीसारख्या विचारात हरवुन मला झोप लागली, कधीतरी दासी येउन दालनातले दिवे शांत करुन गेल्याचं जाणवलं.
सकाळी मात्र ताईच्या दालनात रात्रभर  दिवे जळत असल्याचं कळालं, या पुर्वी असं कधी झालेलं नव्हतं. मी मात्र सकाळी उठुन गाईंच्या गोठ्यात गेले, दिवस उजाडताच त्या सा-या गाई अन् वासरं चरायला नेली जात, पुर्वेच्या जंगलांच्या सीमेवर जिथं उंच उंच गवतांची दुरवर पसरलेली वनं होती, मला तिथं जायला खुप आवडायचं, पण आज ते शक्य नव्हतं. थोडा वेळ तिथं थांबुन मी दालनात आले, आईचा निरोप आलेला होता सकाळच्या दुस-या प्रहरीच आम्ही तिघी जणी आईच्या दालनात आलो, बाबा तिथंच होते. आईनं आमचं कालचं बोलणं त्यांच्या अन् काकांच्या कानी घातलं होतं.
बाबा नेहमीच्या गंभीरतेने येरझा-या घालत होते, बहुधा काकांची वाट पाहात होते. ते येइपर्यंत कुणीच काही बोललं नाही, मला ताईची तिथं नसण्यानं उगा अस्वस्थ होत होतं, काही क्षण असे वाट पाहण्यात गेले, आणि काका, काकु आणि ताई एकत्रच आले, ताईनं आज रक्तवर्णी वस्त्र अन् अलंकार घातले होते, पांढ-या शुभ्र वस्त्रांत असलेल्या काकांच्या मागुन येताना ती ज्वालेसारखीच दिसत होती. सगळे जण बसल्यावर दालनाचे दरवाजे बंद करण्यात आले अन् दिवसा देखील गवाक्षांचे पडदे ओढले गेले.

‘ तुम्हा सर्वांशी बोलण्यासाठी राजा दशरथांना स्वतः यायचे आहे, असा निरोप आला आहे आताच दुताने, तसेच आपण सर्वांनी त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणी म्हणजे उत्तकिर्ती उपवनात यावं असा देखील निरोप त्यांनी दिला आहे. ‘ काकांनी एका दमात सगळं सांगुन टाकलं. मी ताईकडं पाहिलं, तिन्ं डोळ्यांनीच सगळं काही व्यवस्थित असल्याचं सांगितलं. ‘ आज दुपारी भोजनानंतर राजा दशरथ आणि त्यांचे पुत्र आपल्या सभेत येणार आहेत, तुम्ही सर्वांनी त्यावेळी तिथं यावं, अर्थात सर्व मर्यादा पाळुनच ही भेट होईल, तसेच पुर्वेकडच्या काही राज्यांनी या स्वयंवराच्या विरोधात एकत्र येउन युद्धाची तयारी सुरु केली असल्याची वार्ता आलेली असल्यानं या प्रस्तावावर एक दोन दिवसांत आपण निर्णय घ्यावा असं मंत्रिपरिषदेचं विचार आहे, अर्थात तुम्हां तिघींवर कोणताही दबाव नाही निर्णय घेण्यासाठी हे लक्षात ठेवा परंतु त्याचवेळी हे आपलं राज्य, प्रजा आणि समाज या सर्वांचाही विचार तुम्ही कराल एवढ्या ज्ञानवती तुम्ही आहात हे मी जाणतो ‘

Monday, June 27, 2016

अंकोदुही भाग १०

‘ तुम्हांला दोहींना महाराजांनी बोलावलं आहे,’ दासीच्या आवाजानं दोघीही एकदमच भानावर आलो, अंगावरची वस्त्रं सावरुन लगेच काकांच्या कक्षाकडं निघालो, जाताना मांडवी अन् श्रुतकिर्ती देखील आमच्या बरोबरच होत्या .
काकांच्या दालनात न नेता आम्हाला राजसभेच्या मोठ्या दालनात बोलावलं होतं, याचा अर्थ आता जे बोलणं होणार आहे ते वैयक्तिक किंवा कौटुंबिक नव्हतं तर त्यापेक्षा जास्त मोठे असं काही होतं. आम्ही सगळ्याजणी जेंव्हा तिथ्ं पोहोचलो, तेंव्हा तिथ्ं आई, बाबा, काका, काकु आणि काही म्ंत्रि व आमचे कुलगुरु बसलेले होते. आमच्या साठी आसनं राखुन ठेवलेली होतीच, आम्ही बसताक्षणीच, काकांनी बोलायला सुरुवात केली,‘हे कुलगुरु आणि मंत्रिगण,सितेचं स्वयंवर संपन्न झालं, अयोध्येचा राजकुमार रामाबरोबर तिचा विवाह निश्चित झाला आहे, त्याचवेळी राजा दशरथांनी एक प्रस्ताव ठेवला आहे, तो प्रस्ताव या तिघींच्या संदर्भात आहे’
शेवट करताना काका आमच्या आसनांजवळ् आले होते.. त्यांनी मंत्रिगणांपैकी एक, स्वधत्वांना पुढे बोलायला सांगितले, त्यांनी राजा दशरथांचा प्रस्ताव आम्हां समोर मांडला, आणि पुन्हा आसनस्थ् झाले..
‘ विवाह हा एक अतिशय वैयक्तिक् निर्णय आहे प्रत्येक् स्त्री साठी, त्या बद्दलच्या प्रस्तावाची चर्चा अशी राजमंत्र्यांचा समोर का करण्यात येते आहे, याचं कारण विचारु शकतो का आम्ही ? मी माझा प्रश्न विचारला. आईचं माझ्याकडं पाहणं मला अजुनही आठवतं, किंचितसा धाक आणि बरंच कौतुक होतं तिच्या बघण्यात..
काका आता माझ्या आसनाच्या मागंच आले होते, तेंव्हा स्वधत्वांना काही बोलायचं होतं, पण काकांनी हात वर करुन त्यांना बसायला सांगितलं, ‘उर्मिले, हा प्रश्न मला फक्त तुझ्याकडुनच अपेक्षित होता अन तु माझा अपेक्षाभंग केला नाहीस. होय, विवाह संबंध हा वैयक्तिकच निर्णय आहे तुमच्यासाठी, नव्हे सर्वांसाठीच पण राजा दशरथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी जी शंका उपस्थित केलेली आहे, त्या शंकेचं उत्तर शोधण्यासाठी किंवा तिचं निराकरण करण्यासाठी त्यांनीच हा प्रस्ताव् मांडला आहे, आणि हे इतक्या कमी वेळात झालं आहे, याचा अर्थ या प्रस्तावावर त्यांनी इथं येण्यापुर्वीच विचार केलेला आहे. सहज सुचलेला असा हा उपाय नाही. या प्रस्तावावर आपण जो काही निर्णय देउ त्याचे बरेच साद पडसाद फक्त सितेच्या किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरच पडतील असे नाही तर आपल्या राज्यावर, राजकारणावर देखील पडु शकतात्.’
‘ ते काय असतील याबाबत आज दिवसभर मी आणि तुझ्या बाबांनी आपल्या मंत्रिसभेसोबत आणि सेनाध्यक्षांसोबत् विचार केलेला आहे, तसेच दिवसभर तुझी काकु आणि आई ह्या कुलगुरंसोबत याबद्दलच्या शास्त्र आणि धर्मग्रंथाच्या संदर्भाने चर्चा करत होत्या. या दोन्ही बाजुंनी विचार केल्यास हे चारही विवाह होणं हे आपल्या राज्याच्या सुरक्षेच्या आणि भविष्यातील प्रगतीच्या दुर्ष्टीनं उपयुक्त आहेच, आणि शास्त्रांनी देखील अशा विवाहांना मान्यता नाकारलेली नाही.’
 ‘ आता प्रश्न उरला तुमच्या आयुष्याच्या जोडिदाराची निवड तुम्ही करण्याबाबत, .. आईनं उठुन आमच्या बाजुला येत बोलायला सुरुवात केली. ‘ अयोध्येच राज्य आणि  तिथला राजवंश हे काही उत्क्रुष्ट राजसंस्थांपैकी एक आहेत, राजा दशरथांचे चारही पुत्र शारिरीक, बौद्धिक आणि भावनिक कसोट्यांवर उत्तम उतरु शकतील याबाबत आपल्या गुप्तहेरांनी खात्री दिलेली आहे, आणि आपल्या आयुष्यभराच्या सहचराबद्दल अशा उत्तम क्षत्रिय कुळात जन्मलेल्या पराक्रमी पुरुषांपेक्षा तुमची अपेक्षा फार वेगळी नसेल असं आम्हांला वाटतं’

आणि हे सुद्धा लक्षात घ्या, जर हा प्रस्ताव आमच्या पैकी एकालाही योग्य वाटला नसता, तर या चर्चेसाठी तुम्हाला बोलावण्यात आलंच नसतं, तुमचं मत विचारलं गेलंच नसतं. आता हा प्रस्ताव स्विकारणं किंवा नाकारणं हेचं तुमचं स्वयंवर आहे असं तुम्ही समजु शकता..

Sunday, June 19, 2016

अंकोदुहि भाग् ०९

आज, वाड्यातला मोठा चौक सजवला होता, सर्व् बाजुंनी तलम् वस्त्रांचे पडदे अन् त्या जोडीला विविध आकाराची आसनं, वेगवेगळ्या पुष्परचना आणि खुप सारे सुगंधी द्रव्यांचे धुप त्या चौकात एका मंगल कार्याची चाहुल देत होते. तिस-या प्रहराला दशरथ राजा सहित, राम्, लक्ष्मण्, ऋषीगण, कुलगुरु आणि मंत्रिगणांचं आगमन झालं, बाबा स्वागताकरिता वाड्याच्या मुख्या प्रवेशद्वाराजवळच उभे होते. चौकात सगळे जण् आल्यावर, काकांनी सर्वांचं स्वागत केलं, ज्याला त्याला मानानुसार आसनांवर बसवलं गेलं, मध्याभागी दोन वर्तुळाकार आसनांवर् काका आणि राजा दशरथ बसले होते. जलपान् आणि मिष्टान्न सेवनानंतर बराच काळ चर्चा होत राहिली.
‘’ जनका, तुम्ही तुमच्या कन्येचं उभं केलेलं स्वयंवर माझ्या मुलानं जिंकले आहे, हे तुमचं आणि आमचं, सौभाग्यचं म्हणावं लागेल, या दोन्ही प्रचंड आणि बलवान राज्यांमध्ये जुळुन येणारा हा संबंध आपल्या सुरक्षित भविष्याची सुरुवात ठरेल हे नक्की. परंतु माझ्या एका मंत्र्यानं एक शंका उपस्थित केलेली आहे, त्याबद्दल आपण आपापल्या कुलगुरुंचा विचार घ्यावा असं मला वाटतं..
राजा दशरथांच्या शांत अन गंभीर आवाजानं तिथं उपस्थित असलेले सगळेजण मोहित झाले होते जणु,, ‘’ तुझी कन्या सीता हि तुमची निजकन्या नाही, तुम्हाला सापडलेली या भुमिच्या पोटात, तिचं उत्पतस्थान आणि वंश यांचा शोध लागणं फार कठिण आहे. अशा कन्येबरोबर् माझ्या ज्येष्ठ् राजपुत्राचा विवाह झाला, तर तो क्षत्रिय आणि अक्षत्रिय विवाह् ठरेल आणि वर्णभेद झाल्यानं आणि यानंतर माझ्या इतर तीन पुत्रांचा विवाह क्षत्रियकन्यांशी होणं ही गोष्ट अवघड होईल.
‘ परंतु महाराज दशरथांनी असा विचार करावा हे योग्य वाटत नाही ‘ काकांचा आवाज् सुद्धा तेवढाच शांत आणि विश्वासु होता. ‘ प्रत्यक्ष देवाधिदेवांच्या प्रसादानं आपणांस प्राप्त झालेले हे चार् पुत्र तेवढेच पराक्रमी अन् तेजस्वी आहेत., हा वर्णभेदाचा विचार एखाद्या अशक्त क्षत्रियानं केला पाहिजे, आपल्यासारख्या बलवान राजा आणि अयोध्येसारख्या शास्त्रनियंत्रक राजसत्तेसाठी असा विचार योग्य नव्हे.
‘योग्य आणि मान्य असा विचार तुम्ही पुढं ठेवला आहे राजा जनक, जसे आम्ही चार पुत्रांचे पिता आहोत तसेच तुमच्या शुभकुळात् देखील् अजुन तीन कन्या आहेत. या स्वयंवराने राम जानकीचा विवाह् सिद्ध झाला आहे, तसेच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा विवाह् त्या तिघिंच्या समवेत करुन हा शास्त्रोत्त्पन्न प्रश्न सोडवता येउ शकतो..’
एखाद्या गोष्टीचा फार खोलवर आणि दुरपर्यंत विचार करुन बोलल्याप्रमाणे राजा दशरथांनी त्यांचा विचार त्या छोट्याश्या सभेपुढे ठेवला. या शक्यतेचा कुणी विचारच केला नसावा, किंबहुना ताईचं स्वयंवर, ते धनुष्य या गोष्टी एवढ्या मोठ्या झालेल्या होत्या की त्यामागे असा काही विचार करावा हे देखील कुणाला सुचले नाही. अर्थात बाबा आणि आईच्या बोलण्यात ब-याच वेळा अशा प्रकारच्या चर्चा ऐकु येत हे खर्ं..
त्या दिवशी इतर काही विषय नव्हताच कुणाला बोलायला, नगरातल्या नागरिकांपासुन ते आमच्या मंत्रीगणांपर्यंत हा एकच विषय होता, ताईच्या वेगळेपणाचा प्रभाव एवढ्या प्रखरतेनं या पुर्वी कधीच जाणवलेला नव्हता. या सगळ्यांनं तिला एकाकी वाटु नये म्हणुन् मी तिच्या दालनात् गेले. ती नेहमी प्रमाणे शांत होती, मंचकावर झोपुन ती फार काही गहन विचार करत आहे असं जाणवलं मला, तरी देखील माझ्या चाहुलीनं ती उठली अन पश्चिमेच्या तिच्या आवडत्या गवाक्षात् जाउन् उभी राहिली, मी तिच्या जवळ जाउन थांबले, बाहेर सुर्य क्षितिजाला टेकला होता, कोणत्याही श्रेष्ठ रंगकर्मीन्ं कितीही तपस्या केली तरी शक्य होउ नये अशा रंगछटा तिथं पसरल्या होत्या, आणि दर क्षणाला त्यांच्यात असंख्य बदल होत होते, काहीशा वेगानं चाललेल्या वा-यांनी चुकार ढगांबरोबर खेळ चालवलेला होता.
तितक्यात सुर्यास्ताचा घंटानाद नगरात दुमदुमु लागला, आमच्या मागुन आलेल्या एका दासीनं घाईनंच त्या गवाक्षावरचा जाड गवताचा पडदा खाली पाडला अन् आम्ही दोघी पुन्हा कालच्याच पुष्करणिजवळ येउन बसलो, काहीही न बोलता, बरंच काही सांगितलं जात होतं अन् ऐकु येत होत्ं.. शेवटी ताईनंच सुरुवात केली.. ‘ का गं, तुम्हा क्षत्रियकन्यांना मान्य आहे का असा विना स्वयंवराचा विवाह,? स्वत्ः निवड करण्याचा तुमचा अधिकार तुम्हाला आहे, पण तो न वापरता येणं याला तुमची तयारी आहे?
‘स्वयंवराची गरजच आहे कशासाठी, तर एखाद्या स्त्रीला ज्या पुरुषाबरोबर आपल्ं आयुष्य व्यतित करायचं आहे, तिला तो पुरुष योग्य वाटतो किंवा नाही, हे समजुन् घेण्याचा हा अधिकार् आहे. यांत स्वातंत्र्य निवडीचं आहे, ‘ मी आईबरोबरच्या चर्चेतुन जे मला समजलं होतं त्याचा विचार करुन उत्तर दिलं..
परंतु, ही निवड करायची आहे, ती कोणत्या क्षमतांवर, त्या पुरुषाची युद्धसज्जता, परहत्या पराक्रम का संपत्ती का बौद्धिक संपन्नता अथवा प्रजननक्षमता.. माझ्यासाठी हा धनुष्याचा पण उभा केला गेला, पण जर हे धनुष्यच नसतं तर कशाच्या आधारावर मला माझ्या आयुष्याच्या जोडिदाराची निवड करावी लागली असती ? ताईच्या मनात असे बरेच प्रश्न होते तसे माझ्या मनात् देखील. त्यांची उत्तरं माझ्याकडंही नव्हती त्यामुळं मी शांत राहायचं ठरवलं. अशा वेळी शांतताच आपल्या प्रश्नांची उत्तरं देते किंवा कधी कधी त्या प्रश्नांचं अस्तित्वच मिटवुन टाकते.
मग असे प्रश्न पडुन राहतात शस्त्रागारांच्या अंधा-या कोप-यात पडुन राहिलेल्या वज्रांच्या पात्यांसारखे, त्यांच्या तुटलेल्या धारेला आता काहीही अर्थ उरलेला नसतो, आणि त्या मोडुन् पडलेल्या शराग्रांसारखे ज्यांच्या मागचे काष्ठांगही तुटुन गेल्यानं ते होउन राहिलेले असतात धातुंचे तुकडे, पुन्हा कधी एकदा तो अग्नी वितळवुन् टाकेल अन पुन्हा जन्म होईल या आशेवर.
आणि हो एकदा का हे अर्थहीन वाटणारे धातुंचे तुकडे वितळवले की मग मात्र त्यापासुन् पुन्हा बनतात तशीच शस्त्रे जी पुन्हा तेवढीच जीवघेणी असतात, तुम्हाला हवी असली तरी किंवा कसेही..

अंकोदुहि भाग् ०८



पुर्वी एका रात्री मी आईच्या मांडीवर डोकं ठेवुन झोपण्याचा प्रयत्न करत होते, तेंव्हा आईनं विचारलं, ' बाळा, काहीतरी विचारायचं आहे तुला, आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मला सुद्धा शांतता मिळणार नाही, विचार काय हवंय तुला ?'
मी आईला आज पुन्हा तोच प्रश्न् केला, ‘’ आई, स्वयंवर् म्हणजे आपल्याला जो आवडेल्, हवासा वाटेल् असा वर् निवडण्याच्ं स्वात्ंत्र्य् देणारी व्यवस्था ना, मग् ताईच्या स्वय्ंवरात् तो धनुष्याचा पण् कशासाठी ठेवला गेला ?, त्या धनुष्याच्ं अन् ताईच्ं काही नात्ं आहे. आणि तु मागे एकदा क्षत्रिय असा उल्लेख् केला होतास्, त्याचा इथ्ं काही स्ंब्ंध् आहे अशी श्ंका आहे मला, या सगळ्याचा उलगडा झाल्याशिवाय् मला देखिल् शांतता लाभणार् नाही.’’
आईच्या चेह-यावरचे शांत भाव् बदलत चालल्याच्ं मला जाणवल्ं, अगदी तिच्याकड्ं न पाहता देखील्, माझ्या डोक्यावर् फिरणारा तिचा हात् आता एकाच् ठिकाणी स्तब्ध् झाला होता. ‘’ हे पहा बाळा, तु म्हणतेस् ते अगदी योग्य् आहे, एखाद्या स्त्रिला तिला योग्य वाटेल् अशा पुरुषाशी विवाह् करण्याची मोकळीक् असण्ं म्हणजे स्वयंवर्, पर्ंतु हे तुम्हां तिघींच्या, क्षत्रियकन्यांच्या बाबतीत् खर्ं आहे, कारण् तुमचा जन्मच् झालेला असतो, स्वत्ंत्र विचाराच्या आणि निर्णयक्षमता असलेल्या स्त्रि पुरुषाच्या संकरातुन्, तुमच्या आईन्ं देखील् स्वयंवराचा अधिकार् वापरुन् आपल्या पतिची निवड् केलेली असते, पर्ंतु तुझ्या ताईच्ं तस्ं नाही, ती भुमिकन्या, जमिनिच्या पोटात् एका पेटित सापडलेली, तिच्या ख-या मातापित्यांविषयी कुणालाच सत्य् माहित् नाही.
मग या भुमिलाच तिची आई मानल्ं जाउ लागल्ं, क्षत्रिय् हे या भुमिवर् राज्य करणारे आणि भुमि हे राज्य् करुन् घेणारी हा नियम् आहे या जगाचा. या भुमिच्ं रक्षण् करण्ं हे आपणा क्षत्रियांच्ं कर्तव्य, या बदल्यात् हि भुमी त्यांना धान्य्, धातु अशी स्ंपत्ति देत् राहते.. तिला आपला रक्षक् निवडण्याच्ं स्वात्ंत्र्य् नाही, अनेक् वेळा युद्धातुन् किंवा तहांमधुन् तिचा रक्षक् , तिचा अधिकारी बदलतो,
म्हणुन् तुझ्या ताईसाठी हा स्वयंवरात् हा पण् ठेवला गेला, निदान् या धनुष्याच्या निमित्तान्ं तरी या भुमिकन्येचा विवाह् योग्य अशा क्षत्रियाबरोबर् व्हावा जो तिच्ं रक्षण् करु शकेल्, तिला जपु शकेल् आणि तिच्यापासुन् प्राप्त् होणा-या स्ंपत्तीचा अधिकारी होउ शकेल्.
या उत्तरान्ं ना माझ्ं समाधान् झालं, ना आईच्ं पण् आता अजुन् झोप् टाळण्ं शक्य् नव्हत्ं, म्हणुन् आम्ही दोघीही झोपी गेलो.
या दिवसान्ंतर् आमच्या नगरांत् फिरण्यावर् ब्ंधन्ं आली, कुठेही जायच्ं असेल् तर् बाबांना किंवा काकांना विचारुनच् जाव्ं लागे आणि प्रत्येकवेळी महिष् दलाच्या आवरणातच् वावराव्ं लागे, नाट्यशाळा असो की गोशाळा, एखादाच् दिवस् उद्यानात् आणि नदी किनारी जायची परवानगी मिळे.
‘ उद्या राजा दशरथ् आणि त्यांचे म्ंत्रिगण् वाड्यात् येणार् आहेत्’ बाबांनी आमच्या दालनात् येत् घोषणाच् केली, आम्ही तिघी उठुन त्यांना नमस्कार् केला, उद्या तिस-या प्रहरी राजा दशरथ् आणि त्यांचे सहकारी म्ंत्रि तसेच् कुलगुरु येणार् असल्याच्ं कळाल्ं, बाबा, काका आणि इतर् मोठ्यांना तर काही वेळ् नव्हता, त्यांच्या सोबत् सगळी मिथिला नगरी एक् लग्ननगरी झाली होती.. सगळे जण् विवाह समारंभाच्या तयारीत् लागले होते, पण् अजुन् विवाह् कधी आहे हेच् ठरलेल्ं नव्हत्ं, उद्याच्या भेटीच्या वेळी या सर्व् गोष्टी ठरतील् अस्ं आईन्ं सांगितल्ं.
ती रात्र मी आणि ताईन्ं वाड्यातल्या पुष्करिणिच्या काठावर् बसुन् बोलत् जागवली.. ‘’ ताई, तुला पुन्हा भेटावं अस्ं वाटलं का गं रामाला, ? मी विचारल्ं ‘ नाही ग, त्या दिवशी आपण् नाट्यशाळेत् जात् होतो तेंव्हा त्यांच्या निवासाजवळुन् रथ् जाताना दिसले होते, थांबाव्ं अस्ं वाट्लं देखील्, पण् बाबांची आज्ञा आठवली अन् काही बोलले नाही.’’
‘हो, पण् तेंव्हा तर् ते दिसले होते ना, च्ंपकव्रुक्षाखाली बसलेले त्या ऋषींसोबत्, एका हातात् खड्ग् होत्ं अन् दुस-या हातात् बाण्, तुझा विचार् होता तर थांबलो असतो, मी तर बाबांची अनुमती घेतली असती अशा वेळी..
अजाणतेपणी मी तिला तिच्ं वेगळ्ंपण् जाणवुन् देण्याचा प्रयत्न् केला, अन् ती एकदम् शांत झाली, समोरच्या पाण्यात् पाहात्. मग मीच् माझ्या डोक्यातुन् एक् फुल् काढुन् पाण्यात् टाकल्ं अन् पाणि हलल्ं तस्ं तिच्ं एकटक् पाहण्ं भंगल्ं, ‘’ खर्ं सांगु, आता या पाण्यात् पण् मला रामाच्ंच् चित्र दिसत्ंय्,’’ तिच्या चेह-यावर् पुन्हा तेच आश्चर्य् आणि मोहाचे तर्ंग् उमटत होते.

अंकोदुहि भाग् ०७

त्याचवेळी, काही ऋषीचं तिथं आगमन झालं, आणि त्यांच्या बरोबर दोन युवक होते, ते होते ऋषीवेशातच मात्र त्यांच्या हातात शस्त्रं होती, त्यांच्या पायातल्या लाकडी खडावांच्या खडखडाटानं सभास्थान भरुन गेलं, जेंव्हा ते सर्वजण मध्यभागी थांबले तेंव्हा अपयशानं दुखी दिसणारा रावण आपले अलंकार,वस्त्रं अन खड्ग सावरीत निघाला होता, आतादेखील तो तेवढाच तो-यात चालत होता जेवढा आत येताना होता. तो बाहेर गेल्यावर तिथली कुजबुज कमी झाली, ' हे जनकाधिपती प्रजावत्सल जनका, माझ्या बरोबर अयोध्यानरेश दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण आलेले आहेत, आणि ते देखिल इथं उपस्थित असलेल्या राजांच्या एवढेच या स्वयंवरात भाग घेण्यासाठी योग्य आहेत परंतु काही काळापासुन ते आम्हां बरोबर असल्याने ते इथं उपस्थित असलेल्या इतरांसारखे राजवस्त्रांलंकारांनी सज्ज होउन येउ शकले नाहीत, आणि अशी माझी खात्री आहे की ह्या स्वयंवरात सर्व लायक क्षत्रियांना भाग घेता येईल, या साठी त्यांना तुझी अनुमती असावी असं मला वाटतं ' त्या ऋषींचं हे बोलणं संपलं त्याच वेळी शस्त्रधारी ते दोन युवक पुढं आले, खांद्यावरची तपकिरी रंगाची भिल्ल प्रकारची धनुष्यं सावरत त्यांनी काका आणि बाबांकडे पाहात नमस्कार केला.
बाबा, घाईघाईनं आसनावरुन उठुन खाली गेले, त्यांनी त्या ऋषींच्या पायावर मस्तक ठेवुन नमस्कार केला अन अतिशय आदरानं त्यांना आसनावर बसवलं, बाजुच्याच आसनांवर राम आणि लक्ष्मण देखील बसले. दोन्ही राजकुमारांनी सगळ्या सभेचं लक्ष वेधुन घेतलं, ऋषींनी ओळख करुन दिली नसती तरी ते दोघं एखादया मोठ्या वंशाचे आहेत हे त्यांच्या चेह-यावर आणि हालचालीतुन समजत होतंच. बाबा, पुन्हा व्यासपीठावर आल्यावर त्यांचं, काकांचं अन कुलगुरुंच काही बोलणं झालं, अगदी हलक्या आवाजात. काही क्षणांनंतर काकांनी आसनावरुनच हात वर करुन आज्ञा दिली, त्याच वेळी सगळ्या मंडपातुन पसरुन राहिलेलं आमचं सैन्यदल बाहेरच्या बाजुला निघुन गेलं, माझा हात नकळत कंबरपट्ट्यामधल्या शस्त्रावर स्थिर झाला, आता अगदी एकदाच लक्ष देउन पाहिलं तरी मोजता येतील आणि लक्षात राहतील एवढेच लोक मंडपात उरलेले होते. काकांनी ऋषींच्या दिशेनं बघुन हातानंच अनुज्ञा दिली, राम आसनावरुन उठले, खांद्यावरुन धनुष्य आणि त्याखालचं भिल्ल वस्त्र काढुन ठेवलं, सभेच्या मध्यभागी येउन व्यासपीठाकडं पाहात काकांना नमस्कार केला, वळुन धनुष्याकडं गेले त्याला नमस्कार केला, आणि जणु काही बराच काळ ते धनुष्य हाताळत असल्याप्रमाणं, ते उचललं, एका बाजुला प्रत्यंचा लावली, ते टोक डाव्या पायात पकडलं, प्रत्यंचेचं दुसरं टोक उजव्या हातात होतं, डाव्या हातानं धनुष्य पकडलेलं होतं. आमच्याकडं त्यांची पाठ होती, दोन क्षण थांबुन उजवा हात पाठीमागुन फिरवत धनुष्याच्या टोकापर्यंत नेला, आणि प्रत्यंचा धनुष्याला बांधली. पण पुर्ण झाला, आणि व्यासपीठाकडं वळत उत्सुकतेनं प्रत्यंचेला ताण दिला, ताणलेली प्रत्यंचा सोडताच झालेला नाद सगळ्यांनीच आश्चर्यचकित करुन गेला.
झाल्ं, स्वय्ंवराची अट् पुर्ण् झाली, रामान्ं ते धनूष्य् खाली ठेवल्ं आणि पुन्हा मागं वळुन् काकांना नमस्कार् केला आणि जाउन् आसनावर् बसुन् राहिला, ताईची अवस्था मात्र पाहावत् नव्हती. तिच्या चेह-यावर् आश्चर्य् आणि मोह् एकत्रच् दिसत् होते, जणु काही ती याच् क्षणाची वाट् पाहात् होती, पण् त्याचवेळी तो येउ नये असंही तिला वाटत् होत्ं.
बाबांनी पुढ्ं होउन् स्वय्ंवराचा सोहळा स्ंपल्याची घोषणा केली, तसेच् सर्व उपस्थित् राजांचे आणि इतर जनांचे आभार् मानले, पाहता पाहता त्या ऋषीगण् आणि राम् लक्ष्मणाच्या बाजुला आमच्या सैनिकांची एक् तुकडी अर्धवर्तुळाकार् परिघात् उभी राहिली, बाबा खाली उतरुन् त्यांच्याकडे जाउन् त्यांच्याबरोबर् बोलत् होते, काकांनी आम्हां सर्वांना तिथुन् वाड्यात् जायला सांगितल्ं. आम्ही चौघीजणी शांतपणे आत् आलो, एव्हाना तिथ्ं जे काही झाल्ं ते आई आणि काकुना कळाल्ं होत्ंच्.. त्यांच्याही चेह-यावर् आन्ंद् होता. ताईला समोर् बघताच् काकुन्ं जवळ् घेतल्ं, दोघींच्या डोळ्यातुन् अश्रु वाहात् होते.
त्याच दिवशी एक राजदुत अयोध्येला पाठवण्यात आला, राम, लक्ष्मण आणि ऋषींची राहण्याची व्यवस्था वाड्याच्या जवळच असलेल्या एका उद्यानात केली होती. सगळे नगरवासी आता, स्वयंवराची तयारी आवरुन विवाहाच्या तयारीला लागले होते, तीन चार दिवसांनी राजा दशरथ आपल्या कुटुंबियांसहित मिथिलेला येत असल्याची वार्ता आमच्या गुप्तचरांतर्फे आम्हाला मिळाली.

अंकोदुहि भाग् ०६

आणि, उजव्या रांगेच्या पहिल्या राजाच्या मंत्र्यानं उभं राहुन त्या राजाची ओळख करुन द्यायला सुरुवात केली. ते झाल्यावर काकांनी ताईला विचारलं, ' योग्य ?' तिनं उत्तर दिलं ' योग्य' . काकांनी हात उंचावुन तिची मान्यता सभेला कळवली, आणि निसंदन क्षेत्राचा तो राजा धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याकरिता उभा राहिला.
त्यानं ते धनुष्य उचललं, अगदी सहज पेललं आणि प्रत्यंचा उचलण्यासाठी तो खाली वाकला, पण त्यावेळी त्याचा तोल गेला अन तो खाली पडला, मला तर हसुच आलं, आणि मग लक्ष गेलं या गडबडीत देखिल ते धनुष्य खाली जमिनिवर पडलं नव्हतं तर त्या चौरंगावर एका टोकाला आलं होतं. तो राजा चिडुन निघुन गेला, अगदी सभा सोडुनच गेला. मग दुसरा राजा, मग तिसरा असं सुरु झालं. काहींना तर ते धनुष्य पेलता देखिल आलं नाही, तर बरेच जण त्या प्रत्यंचेच्या गोंधळात फसत होते, काही जणांना तिच्यामुळं मला झाली होती तशी जखम देखिल झाली होती. दोन प्रहर झाले, कुलगुरुंच्या संमतीनं एक प्रहराची विश्रांती घेण्याचं ठरलं. त्यानुसार स्वयंवराचा कार्यक्रम एक प्रहरासाठी स्थगित केल्याची घोषणा केली गेली. ज्या राजांना संधी मिळाली होती पण यश मिळालं नव्हतं, त्यापैकी बरेचसे सभास्थानाच्या बाहेर काही अंतरावर एकत्रित झाले असल्याचा निरोप दुताकडुन आल्यावर, बाबा आणि व्यासपिठाजवळ उभ्या असलेल्या सैनिकांचा एक गट त्या दिशेला गेला. जाताना ज्या पदधतीनं बाबांनी आपली तलवार सिद्ध केली होती ते पाहुन मला सकाळ्चे आईचे शब्द आठवले.
काही वेळानं बाबा आणि ते सैन्यदल परत आलं तेंव्हा कळालं की, फक्त बोलणी होउन होउ घातलेला तणाव टाळला गेला होता. तरी देखील बाबांची नजर बदललेली दिसत होतीच. आल्यावर त्यांनी लगेच काकांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या, आता समोर फार कमी राजे होते, आणि ते सुद्धा वेगवेगळ्या जागी विखुरलेले होते. स्वयंवर पुन्हा सुरु होण्यास अजुन काही वेळ होता, आम्ही सा-या जणी एका बाजुला पडद्यांच्या आडोशात जलपान करुन परत येईतो पाहिलं तर समोरच्या सगळ्या मोकळ्या जाग्या नगरातल्या नागरिकांनी भरुन गेलेल्या होत्या, पुन्हा एकदा नजर फिरवल्यावर समजलं की समोर उभ्या असलेल्या नागरिकांच्या मागे आमचं सैन्यदल विखुरलेलं होतं. पुन्हा एकदा मनात भीती, उत्सुकता दाटली आणि आईच्या शब्दांनी पुन्हा एकदा धीर दिला. ताईचा हात हातात धरला, किंचीत ओलावा जाणवत होता तिच्या हाताला आणि कंप देखील. माझा दुसरा हात धाकट्या मांडवीच्या हातात होता, ती मात्र स्थिर होती, का असावं असं, तिच्या चेह-याकडं पाहुन देखील तिच्या नजरेतली शांतता मला सुखावुन गेली.
स्वयंवर पुन्हा सुरु झाल्यावर, पुन्हा आणखी काही राजांच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर एका उंच आणि बलदंड पुरुषानं सभास्थानी प्रवेश केला, सगळ्यांचं लक्ष त्यानं वेधुन घेतलं, सर्वांगावर घातलेल्या सुवर्णालंकारानी त्याच्या भोवतालचा काही भाग स्वप्रकाशित झाल्यासारखा दिसत होता, एखाद्या पुरुषाच्या अंगावर एवढं सोनं मी प्रथमच पाहात होते, आमच्या नाट्यशाळेतले नट देखिल एवढे दागिने घालत नसत. तो धनुष्याजवळच असलेल्या एका रिकाम्या आसनावर बसला, आणि मोठ्या अभिमानानं त्यानं त्याचं खड्ग दोन्ही पायांच्या मध्ये टेकवलं, त्याच्या मुठीवर उजवा हात ठेवुन डाव्या हातानं त्यानं त्याच्या मानेवरचे केस मागे फिरवले ते त्याच्या बलदंड बाहुंचं प्रदर्शन करण्यासाठीच. अजुन एक दोन राजांनी धनुष्याला प्रत्य्ंचा लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्याचा मंत्री उभा राहिला, त्यानं काकांना नमस्कार केला आणि सर्व सभेला उद्देह्शुन म्हणाला ' या सुदिनी सुमुहुर्तावर मी सुवर्णलंकाधिपती रावणाचा मंत्री या नात्यानं या स्वयंवरात त्यांच्या भाग घेण्याची इच्छा महाराज जनकांसमोर सादर करतो आहे, त्यांची अनुज्ञा द्यावी.'
काकांनी प्रथम जानकीकडं पाहिलं ती गोंधळलेली आहे, हे दिसतच होते, मी लगेच बंधनेनं दिलेल्या निलवस्त्रानं तिच्या मानेवरचा घाम पुसला, क्षणार्धात ते वस्त्र लाल झालं. मी दंडावरच्या बाहुबंदामध्ये दडवलेल्या कुपी काढण्यासाठी हात वर केला खरं पण तो हात तिथंच धरला गेला, मी चमकुन मागं पाहिलं, बाबा उभे होते. मी हात खाली केला अन तिच्या दुस-या बाजुला जाउन शांत उभी राहिले, जे होईल ते पाह्त. काही क्षण असेच तंणावात गेले, जानकीनं एकदा रावणाकडं अन एकदा काकांकडं पाहिलं, यावेळी मात्र तिचे डोळे चमकल्याचं जाणवलं मला, दोन क्षणांत काकांचा हात वर झाला. राजा रावण, उठला, खांद्यावरचं वस्त्र आसनावर ठेवुन त्यावर आपलं खड्ग ठेवलं, अन दोन पावलं टाकत त्या धनुष्यापर्यंत पोहोचला देखील. एका गुड्घ्यावर खाली बसत त्यानं त्याला नमस्कार केला, अन वर उठतानाच एका झट्क्यानंच ते धनुष्य उचललं, त्याबरोबरच, आतापर्यंत सा-यांनाच गोंधळात टाकणारी त्याची प्रत्यंचा देखील सर्र्कन हवेत फिरली. ती वर हवेतच झेलत त्यानं धनुष्याच्या एका टोकाला ती बांधली, दुसरं टोक धनुष्याच्या टोकावर बांधणार इतक्यात त्याच्या वरच्या टोकाच्या दोन करड्या रंगाच्या रत्नांपैकी एक निघुन त्याच्या डोळ्यावर पड्लं, रावणाचं लक्ष विचलित झालं अन ताणलेली प्रत्यंचा त्याच्या हातुन गळुन पडली, अन धनुष्य खाली जमिनीवर पड्लं.
निशब्द शांततेमध्ये जानकीनं सोडलेला निश्वास बाकी कुणाला नसेल पण मलातरी नक्कीच ऐकु आला. मी पुन्हा तिचा हात हातात घेतला, मगाशीचा कंप नाहीसा झालेला होता. यानंतर फारच कमी लोक उरले होते,

Sunday, May 8, 2016

अंकोदुहि - ०५

सकाळपासुनच सगळ्या नगरात प्रचंड गडबड सुरु होती, वाड्याच्या सगळ्या खिडक्यांना जाड गवतांच्या चटयांनी झाकलेलं असल्यानं आमच्या कानावर बारीक आवाजच येत होते, पण् तणाव जाणवत होता.
आई येउन माझ्यामागं उभी राहिली, ' आज क्षत्रियकन्या म्हणुन उभ्या आहात ठिक आहे, पण उद्या क्षत्रियपत्नी व्हाल तेंव्हा अशी नजर बावरी होउन चालणार नाही शंखनादानं, तुमच्या हातातल्या कंकणाच्या आवाजापेक्षा हा तलवारींचा खणखणाट मन सुखावुन गेला पाहिजे. वाड्यातल्या मैनेची शिळ गोड वाटु दे पण त्यापेक्षा धनुष्यावर होणा-या बाणाच्या घर्षणाचा नाद जास्त घुमला पाहिजे कानात.' मागे उभं राहुन आईनं माझं वक्षवस्त्र आवरुन दिलं, आज घातलेले मोत्याचे दागिन्यांचे स्पर्श नेहमीपेक्षा वेगळे होते, ते सावरता सावरता, वस्त्रांकडं थोडं दुर्लक्ष झालं होतं.
मी तिच्या पाया पडण्यासाठी मागं वळले, पण तिनं थांबवलं अन म्हणाली ' आज खरोखरी स्वर्गस्वामिनी दिसतेस, आज नकोस करु नमस्कार, फक्त एकच सांगणं आहे, बाकी तिघिंना सांभाळायची जबाबदारी तुझ्यावर आहे, कारण ती शक्ती तुझ्यातच आहे. काल जेंव्हा गोशाळेत गेला होता तेंव्हा ज्या सहजतेनं अनेक वासरांना खेळवत होतीस ते पाहिलंय मी, तसंच आज भावनांच्या वासरांना आवरायचं आहे. स्वयंवर म्हणजे जेवढी आलेल्यांची परीक्षा आहे तेवढीच ती तुमची देखिल आहे. तुम्हा तिघींसाठी एक पुर्वतयारी आहे असं समजा हवं तर. आणि अजुन एक विसरलेच सांगायचं, आता बंधना दासी एक विशेष वस्त्र घेउन येईल, काही काही क्षणांनी ताईच्या मानेवर येणारा घाम पुसत रहा, त्या वस्त्राचा निळा रंग तांबडा झाला समजायचं की तिचा स्वतावरचा ताबा सुटतो आहे आणि सावरायचं तिला.'
' आई, पण जायचंय कधी तिथे, त्याआधी मला ताईला पाहायचंय, नविन बनवलेल्या सुवर्ण वस्त्रांत ती कशी दिसते ते पहायचंय मला, जाउ तिच्याकडं मी.?' माझी उत्सुकता मी लपवु शकतच नव्हते, ' जा, बंधना येउन गेली की जा मग, पण तुला तिलाच पाहायचंच त्या वस्त्रांत की तु कशी दिसली असतीस ह्याची कल्पना करायची आहे. हं ?' आई माझ्या खोलीच्या बाहेर पडत होती, मला ओरडुन सांगायचं होतं तिला, की हो हो हो, मला तेच पाहायचंय, ती सुवर्णाची झळाळती वस्त्रं मला माझ्या अंगावर मिरवायची आहेत, पण आवाज आतच दाबला, समोर बंधना उभी होती, एक अतिशय तलम निळंशार वस्त्र होतं, त्याच्या किना-यावर बारीकशी मोत्याची नक्षी काढलेली होती, ते वस्त्र आणि एक चांदिची कुपि माझ्या हातात देत तिनं अतिशय हळुवार आवाजात सांगितलं, ' हयात बेशुद्धिची मात्रा आहे, प्रसंग पाहुन तुम्ही निर्णय घ्या, असा महाराजांचा निरोप आहे. '
मी आणि ती एकत्रच बाहेर पडलो, तिच्या दालनात येईपर्यंत अजुन काही मैत्रिणि बरोबर आल्या होत्या, माझ्या अंगावरची निळी वस्त्रं आणि मोत्यांचे दागिने यांचे कौतुक त्यांच्या नजरेत दिसत होतंच. तिच्या दालनात बाकी सगळेच जण होते, आणि विशेष म्हणजे, आमच्या वाड्यात असणा-या महिक्षा दलाच्या स्त्री सैनिक होत्या, त्यांनी आम्हांला चौघींना आमच्या वस्त्रांलंकारांना शोभेल आणि सहज लपवता येईल अशी शस्त्रं दिली, अगदी छोटीशीच पण कमालीची धारदार. एका खाली एक अशा सहा माळा असलेल्या माझ्या मोत्यांच्या कंबरपट्यात ते शस्त्र अगदी सहजी लपुन गेलं, जसं काही दोन्ही एकाच कलाकारानं बनवलेली आहेत. ताईच्या सुवर्णलंकारात मात्र ते स्पष्ट उठुन दिसत होतं, तसंही तिच्या नाजुकशा शरीरावर एवढे अलंकार अगदी शोभत नव्हते असं नाही, पण ती चालताना मात्र सगळ्यांनाच ते जाणवलं, मग थोडा वेळ तिचे अलंकार कमी करण्यात आणि सावरण्यात गेला. आता इथुन निघुन बाहेर कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याचा निरोप आल्यावर आम्ही चौघी आई आणि काकुला नमस्कार करुन निघालो, वाड्याच्या व्हरांड्यातुन बाहेर पडताच ताईच्या अंगावर सुर्याचे किरण पडले आणि आम्हां मागच्यांना एकदम डोळे दिपल्यासारखं झालं, क्षणभर थांबलोच आम्ही सर्व, पण ती मात्र पुढं निघुन गेली होती.
स्वयंवराच्या ठिकाणी, एक खुप मोठं व्यासपीठ तयार केलेलं होतं, जवळपास एका गजाएवढी उंची होती त्याची, त्यावर काका आणि बाबांची आसनं होती मध्यभागी, आणि त्यांच्या उजव्या बाजुला काही ब्राम्हणांच्या बसण्याची व्यवस्था होई, व्यासपीठाच्या चहुबाजुला, आमच्या सैन्यातलं सर्वात उत्तम दल शस्त्रसज्ज उभं होतं. आम्ही व्यासपीठावर चढल्यावर समोरच्या गर्दीचा अंदाज आला, जवळपास शंभराहुन जास्त राजे जमा झालेले होते, आणि हे सगळे निमंत्रित होते, त्यामुळं त्यांना त्या मानानं बसण्याची व्यवस्था केलेली होती. तिथं खाली मधल्या मोकळ्या जागेत एका मोठ्या चौरंगावर ते धनुष्य ठेवलेलं होतं, त्याची प्रत्यंचा एका बाजुला गुंडाळलेली दिसत होती.
काकांनी उठुन सर्व उपस्थितांना अभिवादन करुन, या स्वयंवराची प्रस्तावना केली, आणि ताईचा जो पण होता, तो सांगितला ' हे भद्र पुरुषहो, आमची ज्येष्ठ कन्या जानकी, आपणांसर्वांसमक्ष ह्या अद्वितिय अशा धनुष्याला प्रत्यंचा ओढुन दाखवेल, तिची अशी इच्छा आहे की जो कोणि योग्य पुरुष हा पराक्रम पुन्हा करुन दाखवेल त्याचाच ती पतिरुपात स्विकार करेल. आपण सर्वांनी आपापल्या मंत्रीगणांना आपली ओळख करुन देण्यास सांगावे, आणि त्यानंतर जानकीची इच्छापुर्ती करण्याचा मानस असल्यास तिची मान्यता घेउन धनुष्यास प्रत्यंचा ओढावी. ' एवढं बोलुन काकांनी ताईला व्यासपीठावरुन खाली जाण्यास सांगितलं. आठ महिक्षा आणि त्यांच्या भोवती आठ सैनिक अशा संरक्षित पद्ध्तीनं ती खाली उतरली, त्या धनुष्याकडं जाउन, तिनं नमस्कार केला, आणि सहजच ते धनुष्य उचलुन पेललं, खालच्या टोकाला प्रत्यंचा बांधुन ते टोक डाव्या पायाच्या अंगठ्यात पकड्लं ,आणि डावा हात धनुष्याच्या मध्यात पकडला, मागं वळुन काकांकडं बघत मस्तक वाकवलं, आणि पुढच्याच क्षणी दोन्ही हातांच्या विजेसारख्या हालचाली झाल्या, आणि ते धनुष्य प्रत्यंचित झालं.
सगळी सभा आश्चर्यचकित होउन पाहात होती, तिनं पुन्हा एकदा काकांकडं पाहिल, आणि पुन्हा त्याच वेगानं ती प्रत्यंचा उतरवली, अन धनुष्य पुन्हा त्या चौरंगावर ठेवलं,त्याला नमस्कार करुन ती पुन्हा त्या संरक्षक कड्यातुन व्यासपिठावर परत आली. मी तिचे दोन्ही हात हातात घेतलं, तिच्या नाडीचे ठोके अतिशय जलद झालेले मला जाणवलं, तिला तिच्या आसनावर बसवुन आम्ही तिच्या मागं उभ्या राहिलो.