Monday, March 28, 2011

तुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०८

Print Pageतुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०८

रविवारी लवकर उठले, आईबरोबर चहा घेतला, जिजाजिंचा फोन आला ते निघत असल्याचा. काका काकु आले घरी तेंव्हा माझंच आवरायचं राहिलं होतं. मला आज वेळ लागणारच होमला, ताईच्या लग्नानंतर आज पहिल्यांदाच साडी नेसत होते, एकतर मी काढलेल्या दोन्ही साड्यांचे ब्लाउज अंगात बसत नव्हते आणि मला ती गुलाबी साडी नेसायची नव्हती, खास दाखवायची साडी होती ती. ताईनं दोन्ही वेळा तीच नेसली होती. मला काही दाखवायला न्यायचं नव्हतं, आम्ही भेटणार होतो. आणि त्यात त्या साडिला मॅचिंग बांग्ड्या, कानातले काहीच नव्हते माझ्याकडं. शेवटी काकुनं सोलापुरात घेउ असा तोडगा काढला आणि मला साडी नेसवली. त्यात काकु उगा काही पण बोलुन चिडवत होती, आता मी का लहान आहे असलं काही सांगायला, कळत नाही का तेवढं मला? पदर कसा घ्यायचा दोन्ही खांद्यावरुन, बसुन उठताना साडी कशी नीट पकडायची, पाय नि-यात अडकु द्यायचा नाही, शी काही पण मी तर आताच ठरवलं आहे, सरळ सांगायचं नव-याला की मला जमणार नाही साड्या नेसायला, मी फक्त ड्रेस घालणार.
सगळं आवरुन निघेपर्यंत घरीच पावणॆदहा झाले होते, काकांचं उशीर होण्यावरुन किरकिर करणं सुरु झालं. सगळे एकत्र निघालो, तेवढ्यात शेजारच्या निर्मलाकाकुंनी विचारलंच ’ काय पाटिलवहिनी, तो परवा आला होता तोच का मुलगा, तिकडंच निघालाय वाटतं ?’ अस्सा राग आला होता, मलाही आणि आईलापण.’ तोंड दाखवण्यापुरतं आई हसली आणि आम्ही निघालो. बार्शी सोलापुर तास सव्वा तासाचं अंतर. मी तर आधी हॉस्टेलला राहिलेली त्यामुळं काही विशेष वाटत नसे,पण आज जास्त खुशीत होते. प्रवास कसा झाला कळालंच नाही, जिजाजी स्टॅंडवरच होते आणि आश्चर्य बरोबर गौरीताई पण होती. माझा आनंद अजुनच वाढला, आता उगा काकुच्या सुचना ऐकाव्या लागणार नव्हत्या. मी लगेच ताईच्या बरोबर जायला लागले. जाताना नव्या पेठेत एका ठिकाणि सगळ्यांनी चहा पाणि केलं, आईनं पुन्हा एकदा सगळं थोडक्यात सांगितलं. हॉटेलमधुनच त्याच्या घरी फोन करुन आम्ही दोन रिक्षानं निघालो. घर फार लांब नव्हतं आणि गावातच त्यामुळं सापडायला काही त्रास झाला नाही. रिक्षातुन उतरताना मात्र माझे हात पाय कापायला लागले. ताईच्या लक्षात आलं, माझ्याजवळ येउन म्हणाली ’ काळजी करु नकोस, हे बोलले आहेत काल काकांशी आणि इकडं पण’. मला कळेना ही काय सांगतीय ते.
त्याच्या घराच्या समोर उभे होतो, जुना वाडा पाडुन तिथं अपार्टमेंट केलेली असावी, कारण हा भाग मी कॉलेजात असताना पाहिलेला होता, पहिल्या मजल्यावर घर होतं. दार उघडंच होतं. बाजुच्या खिडकीतुन आत टिव्ही, मोठा टेप दिसत होता. मधल्या खोलीत जाणा-या दाराला पडदा होता, राधेक्रुष्णाचं भरतकाम केलेला. आम्ही येणार हे माहित असल्यानं चाहुल लागताच त्याची बहिण बाहेर आली, चेहरेपट्टीवरुनच लक्षात येत होतं त्याची बहीण आहे हे.’ या ना आत, या’ एवढं बोलुन ती आत गेली. आम्ही सगळे आत जातोय तो पर्यंतच त्याची आई बाहेर आली. एखाद्या मराठी चित्रपटात कर्तबगार आई म्हणुन शोभुन दिसेल अशी. ’ नमस्कार , मी वंदना कुलकर्णी, बसा ना आपण उभे का सगळे ? ’ आई, काका, काकु, जिजाजी बसले आणि आता बसायला जागाच नव्हती.
तो प्रश्न त्याच्या बहिणिनं सोडवला, ’ तुम्ही या ना आत, आपण आतच बसु’ म्हणजे हा घरी नव्हता. आत गेलो तर दोन छोट्या छोट्या खोल्या होत्या किचन सोडुन. , डाविकडच्या खोलीत आम्हि गेलो, दुस-या खोलीचा दरवाजा पुढं केलेला होता. ’ तुझं नाव काय गं ’ ताइनं तिला विचारलं ’ सुकन्या, पण मला घरी सगळे अन्याच म्हणतात. आणि तुझं माधवी ना, दादा म्हणाला मला, तु माझ्याच वयाची आहेस असं’ अन्या माझ्या वयाची असली तरी दिसायला कितीतरी उजवी होती आणि उंच पण. ती पाणि आणायला आत गेली, तेवढ्यात मी खोली पाहुन घेतली, अगदी माझ्या हॉस्टेलच्या खोलीसारखी. माधुरी दिक्षितचे दोन मोठे पोस्टर्स, एक उर्मिलाचं. बाकी एक टेबल त्यावर पुस्तकं, वह्या, पर्स पडलेल्या. कपाट बंद होतं, पण दरवाज्यामागं अडकवलेल्या कपड्यावरुन परिस्थितीची थोडीफार कल्पना येत होती. अन्या पाणि घेउन येण्याच्या आधीच बाहेरुन आवाज आला, ’ हा माझा मुलगा, हर्षद. अन्या एक खुर्ची आण गं दादाला’. ताई मला चिमटा काढत होती,आणि समोरच्या खोलीचं दार उघडुन खुर्ची घेउन जाताना अन्या सांगुन गेली ’ आला हं दादा’. मी उगीचच लाजले. ताईचं सुरु झालं, ’ बघ जमलं ना सगळं तर ती समोरची खोली तुझी बरं का ? ’ त्या खोलीकडं पाहिलं दरवाज्याच्या समोरच कुणातरी कमरेखाली लाल फडकं गुंडाळलेल्या निग्रो बॉडीबिल्डरचं भितीदायक पोस्टर लावलेलं. त्याच्याखाली अजुन एक दोन तसलीच छोटी पोस्टर्स होती. अन्या आत आली, ’ तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी ?’ ’ चहा’ माझंही उत्तर ताईनंच दिलं. मी आता काही बोलायच्या अवस्थेत नव्हते. माझी नजर उगाच त्या समोरच्या खोलीच्या न दिसणा-या भागात फिरत होती, काय असेल आत, कसं असेल ? तेवढ्यात बाहेरुन आलेल्या आवाजावरुन साठेगुरुजी आल्याचं कळालं. आणि आता खुर्चीसाठी तोच आत आला. मला पाहुन एक क्षण दरवाज्यात थांबला, ताईला पाहुन थोडं हसला आणि खुर्ची घेउन गेला.
१० मिनिटानी काकु आत येई पर्यंत तायडी मला चिडवत होती. अन्या पण आत येत नव्हती. काकु येउन म्हणाली ’ मधु चहा घेउन ये बाहेर’ पुन्हा मगासारखेच माझे हात थरथरायला लागले. ताई उठली’ चल मी पण येते बाहेर. मी किचन मध्ये आले, आमच्या किचनपॆक्षा कितीतरी जास्त स्वच्छ होतं हे, सगळं कसं जागच्याजागी अगदी पिक्चरमध्ये असतं तसं. पांढ-या शुभ्र कपबशात अन्या चहा गाळत होती, मला बघुन म्हणाली ’तु का आलीस, बस गं निवांत’, मागुन काकु म्हणाली ’ नाही देईल ती नेउन’. मला ताईनं ढकलल्यासारखं केलं, मी पुढं गेले, ट्रे हातात घेतला, माझ्या हाताच्या थरथरीनं त्या नाजुक कपबशा पण थरथरत होत्या. ताईनं पुढं येउन ट्रे धरला आणि म्हणाली,’ चल बाहेर मी आणते’ ताईच्या मागं मागं बाहेर गेले, माझ्या मागं अन्या होती. हळुच वर पाहिलं, समोर दाराजवळ एका स्टुलावर तो बसला होता. ’इथं पण दाराजवळच का ?’ मी मनात म्हणलं. हळू हळू ताई पुढं जात होती, मी एक एक कपबशी उचलुन देत होते, ते दोन सेकंद पण कपबशी थरथरत होती. दोघांना चहा द्यायचा राहिला एक तो आणि ते साठे काका. अन्या आत किचन मध्ये गेली होती चहा आणायला.
’तशी पत्रिका जुळतीय, पण बाकी गोष्टी पाहुन घ्या असं मी सांगितलं होतं वंदना ताईंना, आणि बरं झालं तुम्ही लगेच आलात ते.’ साठे काका बोलत होते ’ बरं किती महिने झालेत तुमच्या भावाचं निधन होवुन, आणि काही शांती पंचक वगैरे होतं का त्यावेळी ?’ मी काकांकडे पाहिलं, ते काही बोलणार तेवढ्यात जिजाजी बोलले’ ते सगळं व्यवस्थित केलं होतं काटिकरांनी, आणि त्यानंतर आमचं लग्नकार्य झालंय घरात’, काकांनी आपलं नेहमीप्रमाणे हो हो असा पाठिंबा दिला. ’ तुमचं लग्न नंतर झालं ना, मग तुम्हाला काय माहित सगळं व्यवस्थित झालं ते?’ साठेंनी जिजाजिंना विचारलं.’ अहो मीच केलंय सगळं अण्णाचं, आणि वैरागचे काटिकर गुरुजी म्हणजे काही बाकी ठेवतील का ते ? ’ आता काका जरा जोरात बोलत होते. मी त्याच्या आईकडं पाहिलं, माझ्या आईकडं पाहिलं, दोघी गप्प होत्या. अन्या चहा घेउन आली होती, मी साठेंना जरा रागानंच चहा दिला आणि त्याला चहा देताना, यावेळी थरथर नाही जाणवली.
तेवढ्यात अन्याचा आवाज आला ’ काकु, या ना आत, आपण आतच चहा घेउ.’ आईलाही या वातावरणातुन बाहेर जायचं होतं, ती उठली तशी त्याची आई पण उठली, दोघी आत आल्या. मला अन्यानं आत बोलावलं खुणेनं. आता आत फक्त आम्ही बायकाच होतो. सगळ्याच उभ्या. अन्यानं पाट ठेवले तीन चार. आई, काकु, त्याची आई सगळ्या बसल्या. आता बाहेरचं काहीच ऐकु येत नव्हतं. मला काही ईंटरेस्ट्पण नव्हता त्यात. नुसता राग आला होता. राग नक्की कशाचा आहे ते कळत नव्हतं, बाबांबद्दल असं विचारल्याचा, जिजाजिंना उलटं विचारल्याचा की काका न बोलल्याचा ? त्याच्या आईनं आम्हाला, म्हणजे अन्या, ताई आणि मी आम्हाला आत खोलीत जायला सांगितलं. अन्या जाताना म्हणाली ’तुम्हाला दादाची खोली दाखवते’. ’ नको आपण तुझ्याच खोलीत बसु ना’ ताई म्हणाली.’
पाच मिनिटांनी चहा घेत असतानाच ’मधु, गौरी, इकडं या गं’ आईची हाक आली. लगेच त्याच्या आईची हाक’ अन्या, ये इकडं’. आत गेलो तशी काकु म्हणाली’ मधु सगळ्यांना पाया पडुन ये जा.’ मी गोंधळले, मनात म्हणाले म्हणजे खेळ खल्लास का काय? बरं विचारणार तर कसं काय झालंय ते. गुपचुप बाहेर गेले, सकाळी सांगितल्याप्रमाणे पदर हातात धरुन सगळ्यांच्या पाया पडले, मग लक्षात आलं साठे काकाच नाहीत इथं. पुन्हा मी, ताई आणि अन्या आत आलो तिच्या खोलीत.
दोन पाच मिनिटं बाहेर काहीतरी चर्चा चालु होती आणि मग जिजाजी त्याला घेउन आत आले.’ लाडोबा, आई काय म्हणतीय बघ जरा’ तो म्हणाला, अन्या पटकन उठुन गेली. एक मिनिट शांततेत गेलं,’ हे बघा आपण तुमचं दोघांचं लग्न ठरवायला जमलो आहोत, तुम्ही दोघं एकमेकांना किती ओळखता, कसं ओळखता मला माहित नाही, तर आता तेच तुम्ही दोघं सांगा तुम्हाला एकमेकांबद्दल काय माहिती आहे ते.’ माझी तर जीभच जड झाली, घसा कोरडा पडला, तो पण काही बोलत नव्हता, ताईच्या खांद्यावरुन मागच्या माधुरीकडं पाहात होता. ’ हे बघा हा तुमच्या आणि दोघांच्या कुटुंबाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तेंव्हा जेवढा विचार आम्ही करु तेवढाच तुम्ही पण केला पाहिजे, आता दोघंही लहान नाहीयेत.’ तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे का? असेल तर आता सांगा मला स्पष्ट, आणि नसेल तरी काही बिघडत नाही, होय ना ओ मॅडम.- इति जिजाजी. ’ पण जुळवुन घेउन कराल का संसार नीट ? काय काय विचारतोय मी ? अजुन पण काही तुमची लग्नाची वयं नाहीत गेलेली तु २१-२२ ची असशील अन हा २४-२५ चा. काही घाई नाही ये, नीट विचार करा आणि सांगा. काय ? ’ जिजाजींच बोलुन झालं, माझी तर जीभ टाळुला चिकटली होती, त्यानं नुसती मान हलवली, हो का नाही, काहीच अर्थ निघत नव्हता. ’ चला मधु , मॅडम चला,निघुयात आपण’ जिजाजी म्हणाले.
आम्ही बाहेर आलो, माझी आई अन त्याची आई चक्क निवांत बसुन सरबत घेत होत्या, जिजाजी पुढं जात म्हणाले ’ आई, मी अजुन ताणलं ना तर रडेल मधु अन मग तिच्या बहिणाबाई मारतील मला घरी गेल्यावर, बास झालं आता, सांगुन टाका सगळं’ किचन मधुन बाहेर येत अन्या पण हसत होती, तिच्यामागं काकु पण. मी मागं वळुन पाहिलं, हा पण हसत होता आता आणि ताई पण. म्हणजे मलाच वेड्यातच काढलं होतं सगळ्यांनी मिळुन . आता खरंच रडु आलं मला, पळत आईकडं गेले, तिच्या गळ्यात पडुन रडायला लागले. ताई पण आली मागं मागं आणि अन्या पण. आता सगळेच निवांत होते. तेवढ्यात काका आत आले, हातात मिठाईचा पुडा होता, आईच्या हातात देत म्हणाले ’ दोन दोन कन्यादानाचं पुण्य माझ्या फाटक्या झोळीत टाकुन गेला बघा अण्णा.’ आई, काकु, तायडी सगळयांचेच डोळे भरुन आले. शेवटी जिजाजी पुढं होवुन त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाले ’ चला हो तुम्ही आणि चिसॉकां मधु पहिला देवापुढं पेढा ठेवा आणि मग सगळ्यांना द्या, चला पटपट मग जोडिचा पहिला नमस्कार करा, आणि सुकन्याताई चहा टाक बरं पुन्हा एकदा. काका तुम्ही घेणार ना चहा.’
’ नको टाकु ग चहा’ त्याच्या आईचा आवाज आला. मी आत जाता जाता थांबले. त्यांच्याकडं पाहिलं, हातात पेढ्याचा पुडा तसाच धरुन ठेवला होता. ’ कुकर घे लावायला, जेवायची वेळ झाली अन चहा काय पिताय हो ’.सगळं वातावरण अजुन थोडं हलकं झालं. मी आणि तो देवघरापुढं उभं राहुन दोन पेढे ठेवले, नमस्कार केला. ’ काय पण कंजुषी रे दाद्या, अरे लग्न ठरलं की तुझं,ठेव ना दोन पेढे जास्त देवाला’ अन्या हसत हसत म्हणाली. सगळेच किचनमध्ये आले होते, तिथंच पाया पडलो सगळ्यांचा.
जिपच्या सिटवरुन हात काढुन घेणारा तो मी ज्या पायाला हात लावुन नमस्कार करत होते त्याच पायाला हात लावत होता. ताईला नमस्कार करणार, एवढ्यात तिनं थांबवलं, मला मिठी मारली आणि म्हणाली ’ मला दोन पाय आहेत बरं का, नीट करा नमस्कार. '

2 comments:

Anonymous said...

sahich..
ajun ahe ki sampala?

Unknown said...

tu etaka bhari kas kay lihato...
are kadhi thambu nako..lihit raha.

Post a Comment