Print Pageनाही वर्ल्ड कप चालु झाला म्हणुन नाही, पण याला थोडा क्रिकेटचा संदर्भ आहे. ४ वर्षापुर्वी पर्यंत क्रिकेटचे दोनच प्रकार होते १. कसोटी आणि २. एकदिवसीय.
कसोटि पाच दिवस चालणारा सामना, प्रत्येकाला दोन दोन संधी मिळणार, एकदा केलेली चुक सुधारता येईल, आधीच्या वेळी मिळवलेलं दुस-यांदा घालवता येईल असा हा प्रकार. आणि शेवटपर्यंत अनिश्चित, त्यात अनिर्णित हा एक अतिशय कंटाळवाणा निर्णय लागण्याची भयंकर शक्यता.
दुसरीकडे एकदिवसीय सामना, मर्यादित षटकांचा, संधी एकच, एका ठिकाणि केलेली चुक म्हणजे फलंदाजित केलेली चुक क्षेत्ररक्षणात सुधारुन घेण्याची संधी, गोलंदाजीतली चुक फलंदाजीत सावरण्याची संधी , पण ती सुद्धा एकच.
या गोष्टींचा प्रभाव पडत होताच. कुठलीही गोष्ट बोलताना क्रिकेटचा संदर्भ देउन बोललं की आपल्या क्रिकेट्वेड्या देशात लगेच कळतं , जसं मला कुणि सांगितलेलं काही कळत नसेल तर मी त्याला outside off stump म्हणुन सोडुन देतो. उगाच मध्ये बॅट घालुन ऑट कोण व्हा.
कधीतरी विचार करताना, डायरी लिहिताना वाटलं आपण टेस्ट खेळतोय का वन डे ? आजचं उद्या करु, पुन्हा केंव्हातरी बघु हे असले विचार का करु शकतो तर टेस्ट खेळतोय म्हणुन. वेळेचं भान नाही राहात मग, कुठली बंधनं नको वाटतात, कुठलं ध्येय दिसत नाही समोर नक्की. कितिही केलं तरी कमीच आहे असं वाटायला लागतं. आत्ता आपण काहितरी करायचं आणि समोरच्यानं जास्त केलं तर पुन्हा अजुन जास्त करायचा प्रयत्न करायचा आणि ते जमलं नाही तर जिंकल्याचा शुद्ध निखळ आनंद नाहीच की पुन्हा पेटुन उठवेल अशी पराभवाची भळभळती जखम नाही, उगीच वेड्यासारखं ' नेकी कर ऑर दर्या में डाल ' किंवा तुला न मला घाल कुत्र्याला ' असा प्रकार सगळा.
त्यापेक्षा वनडे जरातरी बरि, ९९% काहीतरी निकाल लागणारच, मी जिंकेन किंवा हरेन, काहीतरी होईलच. आणि जे व्हायचं आहे ते करण्यासाठी मी जे करु शकतो ते एका निश्चित वेळेत, निश्चित पद्धतिनं करायचं आहे. कुणि दिलेल्या ध्येयामागं पळायचं असेल तर गाठायला ते ध्येय आहे. कुणाला पळवायचं असेल तर किती पंळवायचं ते ठरवुन तेवढं करायला हवंय. भले ते कमी पडेल एखादे वेळेस पण जर समोरचा ते करु शकला नाही त्याच्या निश्वित वेळेत आणि निश्चित साधनांनी तर मी जिंकलो नाहीतर हरलो. पण अनिर्णिततेचा तो भयंकर पेंडुलम नाही डोक्यावर.
पण इथं, ही स्पर्धा आहे माझी माझ्याशीच, तो दुसरा कुणि नाहीच आणि असला तर मला माहित नाही. पण माझ्यातला दुसरा तर आहेच. माझी पहिली बॅटिंग आहे, काहीतरी करायचं आहे, विक्रम करायचे आहेत, केलेले मोडायचे आहेत, बळी पडतीलच, ते पडण्यासाठिच असतात, पण तरी ही पुढं जायचंच आहे. किति हे ध्येय नाही पण किती वेळात हे ध्येय आहे. मला नाही आवडत ते दिवसेंदिवस उभं राहणं आणि हा सगळा खेळ आपल्यच हातांनी अनिर्णिततेच्या भयंकर अनिश्चिततेकडं घेउन जाणं.
आणि म्हणुन मी माझ्यावर घालुन घेतलं एक बंधन, ५० फक्त, ५० वर्षे, आपलं कर्तुत्व दाखवायला, आपली ताकत सिद्ध करायला, वाढवाय्ला आणि एक ध्येय गाठायला. कोणती आहेत ही ध्येय किंवा काय मिळवायहातांनी, आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारिरिक का अजुन काही ? ते मला पण अजुन कळालेहातांनी,, मग इथं मात्र मी टेस्ट्चा नियम वापरतो. take one session one time. एकदा एका ध्येयाचा विचार आणि ते मिळवलं मी मग दुस-याचा पाठलाग सुरु. कधी एकाचा पाठलाग करताना दुसरं आपसुकच मिळतं आणि कधी पहिलं मिळवताना दुस-या पासुन फार लांब जातो. मग पुन्हा वाट बदलुन नवा पाठलाग सुरु करावा लागतो.
यात मजा आहे. एक थ्रिल आहे जसं प्रत्येक ओव्हर संपली की जसं उरलेल्या ओव्हर आणि चार पाच शक्यता पकडुन एकुण होणा-या रनस दाखवल्या जातात तसं, एक दिवस संपला की झोपताना उरलेले दिवस आणि मिळवायची ध्येयं यांचा हिशोब करायला मी मोकळा होतो. मग शक्यता - अशक्यतांचे तक्ते मांडले जातात, वाटा बदलायचा निर्णय घेतला जातो. कसं आधी विकेट वाचावायच्या का रनरेट वाढवायचा ते ठरवलं जातं, आणि एकदा वनडे खेळायला सुरवात केली की हे प्रत्येक ओव्हरला करावं लागतं, त्यानं आयुष्यात काय होतं तर एक शिस्त लागते, पुढं जाण्याची विजिगिषु का काय म्हणतात ना तशी व्रुत्ती तयात होते. एक प्रकारचा लढवय्येपणा येतो, आल्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करणं सोपं जातं.
यासाठि ५० फक्त, उगाच टिवल्या बावल्य करायला आणि प्रत्येक बॉल तटवुन खेळायला वेऴ नाही आपल्याकडे. एवढं काही करुन जायचं आहे की कोणि सहजासहजि ते पार करु नये आणि केलं तरी मला वाईट वाटु नये.
असो, जे मला वाट्लं आणि जे मी अंगिकारायचा प्रयत्न करतो आहे ते लिहिलं, कोणाला पटेल न पटेल, काय फरक पडतो. जो पर्यंत बॅट आपल्या हातात आहे तोपर्यंत कोणता शॉट खेळायचा ते आपण ठरवायचं पण एक लक्षात ठेवुन ५० फक्त.
0 comments:
Post a Comment