Tuesday, February 1, 2011

गड्डा यात्रे काठ्या

Print Page


गेल्या आठवड्यांत गड्डा यात्रेवर एक लेख टाकला होता,  त्या लेखात काठ्या व लग्न यांचे उल्लेख व जालावरुन घेतलेले फोटो होतेच, पण गेल्या शनिवारी माझे सहकारी व मित्र श्री. काशिनाथ स्वामी यांच्याकडुन या वर्षीच्या काठ्याचे फोटो टाकत आहे. हे फोटो इथे प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल श्री. काशिनाथ स्वामी यांचे अतिशय आभार. 


या काठ्या हया म्हणजे बांबु असतात ज्यांना लवचिक व मजबुत करण्यासाठी वर्षभर तेल पाजलेले असते व गड्ड्याच्या दिवशी त्यांना सजवुन त्यांची मिरवणुक काढली जाते.
ह्या फोटोत श्री. काशिनाथ स्वामी हे पारंपारिक बाराबंदी घातलेले दिसत आहेत. त्यांनी बाराबंदीच्या वर कमरेला एक सुती दोराने विणलेला पट्टा बांधला आहे, या पट्ट्याच्या पुढे आलेल्या टोकात या काठ्यांचे टोक ठेवुन ती काठी अलगद दोन्ही हाताने सावरत हे काठीवाहक चालतात.काठ्यांचे टोक हे बहुधा पितळी असुन ते उलट्या शंकुच्या आकाराचे असते.

हा श्री. सिद्धेरामेश्वरांचा पालखितला मुखवटा.

आणि ही पालखी.

या फोटोत काठ्यांच्या उंचीची कल्पना येईल. या काठ्यांना पुर्ण लोकरी घोंगड्यांनी लपेटुन त्यावर सोन्याची किंवा चांदिची कडी घातलेली असतात. एका दिवशी या वर खोब-याच्या वाट्यांचे हार घातलेले असतात, तसेच लग्नाच्या दिवशि बाशिंगे पण बांधतात.

या एकुणं सात काठ्या व एक नंदिधव्ज अशी पुर्ण मिरवणुक असते.

हल्ली या काठ्यांच्या संपुर्ण मार्गावर अशा अत्यंत सुंदर रांगोळ्या काढलेल्या असतात.

हे स्वामी
 हा देवळाच्या आवारात चाललेला विडे लावण्याचा कार्यक्रम.
शेवटी पुन्हा एकदा काठ्या देवळात आल्यावर.
तर या अशा वॅशिष्ट्य पुर्ण गड्डा यात्रेत पुढच्या वर्षी आपणां सर्वांचे सहर्ष स्वागत आणि पुढच्या वर्षी काठ्यांच्या लग्नाला व गड्डा यात्रेला जरुर येण्याचे स्नेहपुर्ण आमंत्रण.
हर्षद.

Tuesday, January 25, 2011

या वर्षीची गड्डा यात्रा - फोटो सहित


३१ डिसेंबर संपली आणि पहिल्या जानेवारीला डोळे उघडायच्या आधीपासुनच प्रत्येक सोलापुरकराला गड्ड्याचे वेध लागलेले असतात. सोलापुरचे ग्रामदॅवत श्री. सिद्धेरामेश्वरांची यात्रा मकर संक्रांतीला भरते. संक्रांतीच्या २-३ दिवसात देवळात व होम मॅदानावर बरेच कार्यक्रम असतात. संपुर्ण शहरातुन काठ्यांची मिरवणुक निघते. काठ्या या शब्दावर जाउ नका, या प्रत्यक्ष ३०-४० फुटि बांबु असतात, जे एक व्यक्ति आपल्या कमरेला बांधलेल्या विशिष्ट पट्ट्याच्या आधारे दोन्ही हातावर तोलुन धरत जवळ्पास संपुर्ण शहरातुन मिरवत आणतात. ही मिरवणुक ३ दिवस असते. सोलापुर शहरात एकुन ६८ ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केलेली आहे, त्या सर्व ठिकाणी या काठ्या नेउन आणण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी या काठ्यांचे व श्रीसिद्धेश्वराचे लग्न लावले जाते, त्याच दिवशी रात्री होम मॅदानावर दारुकाम म्हणजे फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम असतो. पुढील फोटो जालावरुन साभार.
ह्या वर्षी माझं या सगळ्या सोहळ्याला उपस्थित राहणं शक्य झालं नाही, पण नंतर सुट्टी मिळाल्यावर लगेच लेकाला घेउन मी सोलापुरला आलो. पहिल्यांदा श्रीसिद्धेश्वराच्या देवळात गेलो त्याची काही छायाचित्रे.
हे देउळ एका मानवनिर्मित तलावात आहे, त्याच्या मागे सोलापुरचा भुईकोट किल्ला दिसत आहे. हा तलाव किल्ल्याच्या एका बाजुला आहे.
येथे ही देवळात आत जाताना पाय धुण्याची छान सोय केलेली आहे. तसेच संपुर्ण देवळाच्या फरसबंदी आवारात पांढ-या रंगाचे पट्टे मारलेले आहेत, पायाला चटके बसु नयेत म्हणुन.

ही श्री. सिद्धरामेश्वरांची समाधी. वरच्या लाल रंगाच्या मंडपामुळे खालची संगमरवरी समाधी लाल दिसत आहे. या आवाराला तिनही बाजुला दगडी ओव-या आहेत व मध्ये काही जुनी झाडे पण आहेत.

श्री.सिद्धेश्वराच्या देवळातील ही मुर्ती / शिवलिंगावरचा मुखवटा, श्रावणांत याला विड्याच्या पानंची सजावट केली जाते, ती देखील अतिशय सुंदर असते.

हे मंदिरावरचे शिखर व या मंदिराला गाभा-याच्या दोन्ही बाजुला सभामंडपाला जोडुन दोन छोटी मंदिरे आहेत, असा प्रकार मी फक्त येथेच पाहिला आहे.


हे साधुबाबा खिळाच्या वर उभे राहुन सर्वांना आशिर्वाद देत होते, पण का माहित नाही फोटो काढताना ते लगेच खाली उतरले आणि थोडे रागावले.

मंदिराला तलावाच्या काठाला जोडणा-या छोट्या रस्ता वजा पुलावर या यात्रा काळात व श्रावणांत दुकाने लावलेली असतात.

या दुकानात नेहमीच्या गंडे, दोरे, फोटो, प्रसाद या धार्मिक वस्तुंबरोबरच भस्म / विभुती पण मिळते, हे गोल्,लंबगोल, कांडी ते बेसन लाडु यापॅकी ब-याच आकारात मिळते. सोलापुरातील लिंगायत समाजात रोज सकाळी छाती,कपाळ व खांद्यावर भस्माचे पट्टे ओढुनच घराबाहेर पडण्याची किंवा कामाधंद्याला लागण्याची परंपरा आहे.
दुपारी घरी आल्या बागेतल्या फुलांचे व झाडांचे काही फोटो काढले, मालकीण बाई - आमच्या मासाहेब ब-याच दिवसांनी भेटल्याने सगळ्यांना तरतरी आलेली होती.




आणि या आमच्या माहेरवाशिणी, यांनी दिवाळीत आकाशकंदिलाच्या वायर वरच आपला झुलता बंगला बांधला आहे. 
ही दुस-या दिवशीची सुरुवातीची खादाडी - 
आणि आता खाली गड्ड्यावरची विविध दुकाने- 
माझ्या लहानपणी या हॉटेलमध्ये खाजा नावाचा मॅद्याचा केलेला आणि वरुन प्रचंड पिठिसाखर घातलेला गोड पदार्थ मिळायचा, त्याचं वर्णन मी माझ्या लेकाला पुणॅ ते सोलापुर ४ तास सांगत होतो, पण या वेळी हा खाजा कुठे दिसलाच नाही. आताशा ही हॉटॅल बदलत्या काळाप्रमाणे डोसा, इडली ते पावभाजी ते चायनिज पर्यंत आली आहेत.
 पण लोकं गड्ड्यावर येतात ते या साठी, भाग्यश्री बटाटेवडा, पोलिसचॉकीच्या जवळ असणारा हा स्टॉल माझ्यासाठी गेल्या २० वर्षांचं आकर्षण आहे. दरवर्षी गड्डा फिरताना सुरुवातीला दोन , मध्ये दोन व शेवटी दोन असे वडे खाल्याशिवाय माझा गड्डा पुर्णच होत नाही, या वर्षी ही परंपरा पुढं माझ्या लेकाला देताना मला खुप छान वाटत होतं आणि तो पण पहिल्यांदाच इतक्या इंटरेस्ट्ने बटाटावडा खात होता.
माझे बाबा जसे मला खांद्यावर घेउन मला सगळा गड्डा फिरवत मी पण तसेच लेकाला घेउन फिरलो, त्याला खेळणी घेतली, वडे खाल्ले, उसाचा रस पिला, पापड खाल्ले, परत घरी येताना फुगा घेतला आणि मगच मला माझं बाबा होणं पुर्ण झाल्यासारखं वाटलं, लेक पण माझ्यासारखाच खांद्यावर झोपला होता, माझे केस घट्ट धरुन आणि पाय गळ्यात अडकवुन, माझा शर्ट पण तसाच मळला होता जसा बाबांचा मळायचा. फरक एवढाच होता की दुखणा-या खांद्याबद्द्ल मी दोन वेळा लेकाला सांगितलं आणि खाली उतरवलं होतं आणि बाबा कधी या बद्दल बोललेच नाहीत....
या फोटोपॅकी काही फोटो लेकानं खांद्यावर बसुन काढलेत.


 भाग्यश्री वड्याएवढेच हे चिवडे पण गड्ड्याचा अविभाज्य भाग आहेत.  ज्या मोठ्या पाळण्यांत बसायला मी अजुनही घाबरतो त्याचा लांबुनच काढलेला फोटो.
 परंपरेनुसार गड्डा फिरण्याचा शेवट या स्थानी झाला, या दादांनी दिलेलं पुदिन्याचं पाणी संध्याकाळ भर पोटात भरलेलं व्यवस्थित पचवतं, हा १-२ नाही तर १५ वर्षांचा अनुभव आहे.
तर अशी झाली या वर्षीची गड्डा यात्रा, पुढच्या वर्षी लग्नासहित ३ दिवस जायचा विचार आहे, पाहु या कसं जमतंय ते.
हर्षद. 

Tuesday, January 18, 2011

तुमचं आमचं सेम नसतं भाग-२


...अशा त-हेने मी कोणत्याही मुलीच्या प्रेमात न पडताच कॊलेजच्या बाहेर पडलो, प्रेमात पडण्याच्या प्रयत्नांचा परिणाम अभ्यासावर झालेला दिसत होताच, तिथले मार्क वाढले नव्हते पण इथले तर कमी झाले होते.
कॊलेजच्या बाहेर पडलो आणि नोकरीला लागलो, आता इथे अनेक थोरा मोठ्यांबरोबर राहुन ब-याच गोष्टींच ज्ञान मिळत होतं. सुरुवातीचे काही दिवस काम करण्याच्या प्रेमात गेले, मग काही कंपनीच्या प्रेमात, आणि मग पुन्हा प्रेम आठवलं. घरुन पण "आता बघा लग्नाचं " अशी टोचणी सुरु झाली होती.
ऒफिस सोलापुरच्या मध्यवस्तीत बाजारपेठेतच होतं त्यामुळं ब-याच पोरी पाहायला मिळायच्या बसल्या बसल्या काम करता करता, पण सालं आमचं ऒफिसच असलं खतरुड होतं की आमच्या दिव्य व्यक्तित्वाचा प्रभाव फारसा पडायचा नाही. अशातच एका कमर्शियल बिल्डींगच काम आम्हाला मिळालं, अर्धी बिल्डिंग तयार होती आणि उरलेली आम्ही करत होतो. साहजिकच आधिच्या भागात जी ऒफिस होती, तिथली वर्दळ जाता येता सुखावु लागली.
त्यातल्याच एका दुकान कम ऒफिस ज्यादा मध्ये असलेल्या २-३ मुलींपॆकी एकीकडे जरा जास्त लक्ष जायचं, सुरुवातीला वाटायचं की हे उगीच होतंय, मग काही दिवसांनी मांजर डोळे मिटुन दुध पितं ती स्थिती आली. सहकारी होतेच पेटवायला आणि पार्ट्या उकळायला. दररोज ५-५० खर्च व्हायला सुरुवात झाली. असं करता करता २-३ आठवडे गेले. एका दिवशी साईटची सगळी कामं झाल्यानंतर वेळ होता म्हणुन तिथंच थांबलो होतो. तर आमच्या क्लायंट्च्या ऒफिसमधुन ती बाहेर येताना दिसली,आताशा तिथं ब-याच ओळखि झाल्या होत्या, म्हणलं आज त्यांच्याकडंच चॊकशी करावी आणि आत गेलो. पाहतो तो काय सगळॆजण पेढे खात आहेत. एका काकुंनी अर्धा पेढा दिला आणि म्हणाल्या " घे रे बाबा त्या वरच्या जोश्यांच्या पोरीचं लग्न ठरलंय". शपथ सांगतो त्यानंतर कधी कारलंही एवढं कडु लागलं नाही.
मग आडवळणानं थोडि चॊकशी केली, या परिस्थितित जास्त खोलात जाणं धोक्याचं होतं म्हणुन आपलं वर वर गप्पा, बरं या सगळ्यांत मला जेवढा आणि जो रस होता तो बाकी कुणाला नव्हता त्यामुळं १-२ वाक्यं झाली की बोलणी पुन्हा आमच्या कामाकडेच यायची.
अर्धा तास तिथं काढुन बाहेर येउन लकी मध्ये गेलो, एका मित्राला फोन केला त्याचं ऒफिस भागवत समोर होतं,तो पण काम संपवुन आला. त्याला थोडं सरळ काही फिरवुन फिरवुन सांगितलं, तो ही याच चक्रात पुरता अडकला होता. म्हणजे त्याला जी पोरगी पटवायची होती ती पटत नव्हती पण दुस-या पोरीनं त्याला पटवलं होतं. फक्त त्याच्या घरी जाउन ’ मॆं आपके बेटेके बच्चेकी मा बननेवाली हुं’ एवढं सांगणंच बाकी होतं. या गहन आणि अतिशय महत्वाच्या बिषयावर ब-याच चर्चा झाल्या आणि लकी वाल्यानं उठवलं म्हणुन घरी आलो. रात्र पुन्हा जागण्यात गेली.
दुस-या दिवशी पुन्हा साईटवर आणि सहज तिच्या ऒफिसवरुन गेलो तर ती एकटिच होती आत, एकदम सभ्यपणाचा चेहरा करुन आत जाउन अभिनंदन करावं असा विचार केला,तेवढ्यात तिच्या साहेबांचा आवाज आला, "नलिनी, जोशीबाई येणार नाहीत का लग्न केल्याशिवाय, फोन लावुन विचार जरा" म्हणजे ही जोशी नाही वा वा काय छान वाटलं मला, माझा जीव कितीतरी जोरात आणि किती मोठ्या भांड्यात पडला,त्या आनंदात गाणं म्हणत म्हणत बाहेर आलो, आज पुन्हा सगळं जग सुंदर वाटत होतं, हवा छान होती, झाडं डोलत होती वगॆरे वगॆरे.
पण माझ्या प्रेमाला अजुन मुहुर्त लागायची वेळ आली नव्हती, २-३ दिवसांतच माझी बदली दुस-या साईट्वर झाली आणि पुढचे ८ महिने तिथंच काढले. परत येउन पुन्हा साईटवर गेलो तर काय.....
हर्षद
वाचकांना नम्र विनंती बरा वाईट जो असेल तो प्रतिसाद द्यावा.