Thursday, June 2, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ५


स्टेट ऑफ द आर्ट - भाग ५

मंद्याची बायको, त्याच्या धाकट्याकडं पाहुन हसत हसत मला म्हणाली’ भावजी, कवा तरी येतास आणि जाताय लगेच दोन दिसात, पोरं वळक विसराला लागली, नुसतं भाचेच नसतेत पुतणं बी हायत, ध्यान द्या जरा. तुमचा लेक तर आमाला वळक बी द्यायाचा न्हाई कधि भेटला कधी तर’ त्याचवेळी मागुन शकुताई येत होती, भाचा-पुतण्याचा उल्लेख तिला खटकला ’ वहिनी माया दोन्हि कडुन लावावी लागते, उगा एकानं हात पुढं करुन होत नाहि, अडल्या पडल्याला मागं उभं राहिलं पाहिजं नुसतं पुजेला प्रसाद घ्यायला पुढं येउन नाती सुधारत नाहीत’. मी मात्र मंद्याच्या बायकोकडं बघत होतो, ती वाकुन पोराला उचलुन घेत असताना तिच्यावरुन नजर वळवु शकलो नाही. यांच्या लग्नात केवढ्या होत्या आणि आता कसल्या झाल्या होत्या, नाहितर आमचं दिव्य गेला बाजार ४०-४२ किलो असेल आणि वर्षातुन कमितकमि ३ आजारपणं व्हायची. तेवढ्यात शकुताई खोलीकडं निघाल्याचं लक्षात आलं आणि पटकन तिच्याआधी आत गेलो, स्क्रीनवर पाहिलं तर हेम्या निबंध लिहित होता, अवध्या १५-२० मिनिटात ८ पानं भरली होती. शकुताई तिची बॅग आवरता आवरता बोलली, ’हर्षद, तु काहीतरी वेगळं वागतो आहेस दुपारपासुन,काय झालंंय? ह्यांचा फोन आला होता ऑफिसमध्ये काही गोंधळ आहे का घरी काही झालंय? एवढ्या महत्वाच्या प्रसंगी असं वागुन चालणार नाही तुला हे समजत नाही का तुला? एकटाच लॅपटॉप बघत काय बसतो, पोट खराब झालंय काय म्हणतो,तिथं बाहेर सुरेखावहिनीकडं काय पाहतोय टक लावुन, काय चाललंय नक्की?’ मी सुरेखाकडं पाहतोय हे हिच्या नजरेतुन सुटलं असेल असं मला वाटलं, आता थोडं अपराध्यासारखं वाटत होतं पण माझं काय चालु आहे हे तिला सांगणं शक्य नव्हतं आणि सांगितलं तरी तिचा विश्वास बसला नसता.  

हेम्यानं लिहिलेलि १-२ पानं वाचुन शकुताईला बोललो ’ तायडे, ही लोकं जमिनीचा भाव फार कमी सांगत आहेत, मी उद्या उलटा पर्याय ठेवणार आहे, ज्या भावात ते आपल्या हिश्याच्या जमिनी घेणार आहेत त्याच भावात त्यांच्या जमिनी आपल्याला देतात ते का ते बघुया?’ शकुताई एकदम उखडली, तिच्या डोळ्यासमोर घरासाठी घेतलेली भरमसाठ कर्जे आणि जमिनीच्या पैशातुन होणारी त्यांची परतफेड हेच होतं, एका अर्थी ते बरोबर होतं, कर्जे आणि हफ्ते यांच्या भितिनं ती आणि नितिन गेली दोन वर्षे दुस-या मुलाचा विचार करत नव्हते आणि माझा पण यावरुन अनुशी नेहमी वाद व्हायचा. आता इकडे येताना तिनं घातलेली अट हीच होती, हे व्यवहार झाले की लगेच चान्स घ्यायचा आपण. पैसा आपल्या आयुष्याला असा सगळीकडं बांधुन ठेवतो, खरं तर आम्ही घरं घेताना या गोष्टीचा विचार केलाच नव्हता, स्वताचं घर आणि आयसिआयसिआयच्या माणसाची गोड गोड बोलणी याला भुलुन जास्त कर्ज घेतलं पण त्या रेटनं आमचे पगार नाही वाढले, त्यात मागच्या वर्षीची रिसेशन, म्हणजे या वर्षी पण पगार काही फार जास्त वाढणार नव्हता, सगळं अवघड होतं. ’आणि काय तु आणि अनु गाणं म्हणणार काळया मातीत मातीत,इथं बसुन’ मुर्ख कुठला, अरे कोण सुखी झालंय शेती करुन इथं, ह्यांचा जातो ना निम्मा पगार कर्जाचा हफ्ता आणि गावाकडं पाठवायला, १ वर्ष झालंय फ्रिज आणि टिव्ही बदलायचाय ते पण होत नाहिये, आणि अनुची गाडी पण बदलायची आहे ना, दोन वर्षे झाली तिच्या गाडिला, किती जुनं वाटतं ते मॉडेल आता, पार्किंग मधुन काढताना पण किती लोग्रेड वाटतं तिला तुला काय माहीत.?’ शकुताईनं जुना बॉम्ब नविन विमानातुन टाकला. पण हेम्या जे लिहित होता ते वाचता वाचता मला शकुताईच्या बरोबर वाद घालणं शक्य नव्हतं म्हणुन मी गप्प बसलो.

गण्याची मुलगी आत येउन म्हणाली ’ शकुत्या आणि काका, चला जेवायला लै भुक लागलिय आणि तुम्ही बसल्याशिवाय आम्ही जेवायचं नाही म्हणतीय आई, चल की लवकर’ असं म्हणुन तिनं शकुताईला धरुन ओढायला सुरुवात केली, शकुनं तिला पटकन उचलुन घेतलं आणि म्हणाली ’ हो गं बाई चल जाउ आपण, म्हणतात ना ’सासवा सुना लोकाच्या अन आतभाच्या एकाच्या’ तेच खरं. आणि तु पण ये रे लगेच. बास झालं आता उठ लवकर सगळी लेकरं खोळंबलीत आपल्यासाठी.’ इकडं हेम्या गेल्या ३ वर्षाचा इतिहास सांगत होता आणि ह्यांना जेवायचं पडलं होतं, हेम्याला थांबवुन मी मध्येच टाईप केलं ’मी जेवुन येतो, थांब तो पर्यंत, रात्री सगळे झोपले की मग बोलु आपण दोघं’ मग बाहेर जेवायला आलो, गण्या अण्णांना सोडुन आला होता, जग्गनाथ काका रात्री देवाचं काहितरी वाचायचे ते आटोपुन आले होते. मधल्या अंगणातच आम्ही जेवायला बसलो, पोरं एका बाजुला आणि आम्ही एका बाजुला. आता वातावरण बरंच निवळलं होतं. गप्पा मारत जेवणं झाली, मंद्याचा धाकटा जरा टरकल्यासारखाच होता, माझ्याकडे पाहायचं पण टाळत होता. नेहमीपेक्षा दोन घास जास्त जेवलो, हात धुताना मंद्याला विचारलं ’गच्चीवर प्लग आहे का रे? मी आज वरच झोपणार आहे,थोडं ऑफिसचं काम करायचं आहे. तो म्हणाला ’आहे, पण डास लै झालेत, पार दोन चादरी घेतल्यास तरि काय नाय, येतंतच आत, पण तु झोपणार असशील तर झोप की वर, पाणि द्या ओ वर गच्चीवर तांब्या भांडं भरुन’आणि घरच्या गड्याला वर गच्चीवर अंथरुण टाकायला सांगितलं.

मी सगळं आवरुन वर आलो, जिन्याच्या बाजुलाच झोपायची सोय केलेली होती, मी पटकन लॅपटॉप जोडला आणि पुन्हा वाचायला सुरुवात केली. आमच्याच घराविषयी मला नसलेली बरीच माहिति मला कळत होती. बराच भाग आखाडाच्या अवतीभवतिच घुटळमत होता, आखाड, विहिर आणि कोनाड्यातली देविचि मुर्ति, आजी हे त्या स्टोरिचे मेन कॅरेक्टर होते, हेम्याच्या मते, तो त्या दुनियेत अजुन बच्चाच होता, आजी होती म्हणुन त्याचं निभावुन जात होतं नाहीतर फार अवघड होतं. मला सगळ्यात मोठा धक्का होता तो म्हणजे हेम्याच्या अपघाताची गोष्ट वाचुन, हे घर बांधायला काढलं तेंव्हाच जग्गनाथ काकाला वाटणी करुन हवी होती, त्यावरुन त्याचा आजोबांशी वाद झाला होता, बरीच भांडणं झाली होती घरात. अशीच एक दिवस भांडणं झाली, हेम्याला घर हवं होतं, पाण्याच्या धंद्यातला हिस्सा सोडायचा नव्हता आणि काकाला आखाडाशी काहीही संबंध ठेवायचा नव्हता, यावरुन त्या दोघात पण बरेच वाद झाले होते, एका रात्री घरी काका, हेम्या , मंद्या आणि गण्या या सगळ्यांची बरीच भांडणं झाली, सुरेखा आणि ज्योती दोघी मध्ये पडल्या, हेम्या त्यांना काहीतरी बोलला, त्यावरुन मंद्या आणि गण्यानं त्याला मारलं आणि नंतर ४ दिवसांनी हेम्याच्या अपघात झाला, बुलेटवरुन तो घरी येत होता, तेंव्हा एका पाण्याच्या टॆंकरनं त्याला उडवला, गावापासुन बरंच लांब असल्यानं टॆंकर काहि सापडला नाहि पण त्याचा नंबर हेम्याच्या लक्षात होता, त्यानं तो इथं दिला होता आणि खाली लिहिलं होतं, सोलापुरात पोलिस स्टेशनला अजुन आहे गावठी दारुच्या वाहतुकीत पकडला म्हणुन जा ये बघुन.

हेम्याच्या संशय नव्हता तर त्याला खात्रीच होती मंद्याच ह्याच्या मागं होता, त्याच्यामते दोन कारणं होती, एक आखाडाच्या जमिनिचा आणि पाणि धंद्याचा वाद व दुसरं म्हणजे सुनिता, कोळीकाकाची मुलगी. हेम्याच तिच्याबरोबर लग्न ठरत होतं आणि तिचे मंद्याबरोबर संबंध होते, मंद्याचं लग्न झालेलं असुन सुद्धा आणि ते सोडायला ती तयार नव्हती. बिनाआईची बाढलेली लेक म्हणुन बापानं लाडावलेली आणि वळसंगची ब्युटी क्विन, तिला हेम्याबरोबर लग्न करायचं नव्हतं पण आजोबा, जग्गनाथ काका आणि तिच्या वापासमोर ती काही बोलु शकत नव्हती. हा घोळ निस्तरण्यासाठी एक मार्ग होता म्हणजे हेम्याला रस्त्यातुन हटवणे, आणि मंद्यानं त्याचा बरोबर गेम केला. मी सुन्न झालो होतो, हे प्रकरण या थराला गेलं असेल याची कल्पना नव्हती, कारण हेम्याच्या दिवसपाण्याला आईच आली होती, आणि परत येताना जग्गनाथ काकाला ट्रिटमेंट साठी घेउन आली होती, त्यामुळं या गोष्टीवर कधी चर्चा झालीच नव्हती. सहा महिन्यात काका परत गेला, वर्षभरानं आई गेली,एक महिन्यात रियाचा जन्म या सगळ्यात पुन्हा इकडं येणं झालं नाही आणि आमचं घर सोडुन बाकी कुणाशी गावात संबंध नाही, त्यामुळं काही समजत नव्हतं, आम्ही आमच्या जगात सुखी आहोत असं होतं.


Print Page

1 comments:

चिंतातुरपंत धडपडे said...

laiiiii bahri.pan update jara lavkar lavkar taklyat tar bara boiel.we are wating for next post....

Post a Comment