Tuesday, June 28, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०८


स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०८
पुन्हा दोन मिनिटांचा गॅप गेला आणि ओळी दिसु लागल्या, ’ हर्ष्या माफ कर, काल खोटं बोललो म्या तुला, अरं माणुस माणसाला निस्तं चेह-यानंच नाय ओळखत, आत्म्याचं आम्यालापण कनेक्शन असतंच कि, अन त्याच्यातला आत्मा तर माझाच एक तुकडा हाय ’ , मी चमकलो, हा काय बोलतोय, काल खोटं बोलला, याच्या आत्म्याचा तुकडा काय, अरे काय चाललंय हे, कशाचा कशाला धरबंद्च नाही. मग टाईपलं,’ ते सोड, आजच्या बैठकीबद्दल सांगणार होतास त्याचं काय ते बोल, उशिर झाला की, पुन्हा सगळ्यांना संशय, आधीच शकुताईला जरा जरा शंका येते आहेच’ यावेळी बहुधा हेम्याकडे उत्तर तयारच होतं,’ आता फक्त आखाडाचं राह्यलंय ना, मग असं कर मंद्या जो रेट बोलंल त्याच्या दुपटीनं तु घ्ये विकत आखाड, अन त्याच्या म्हणण्यानुसारच सा हिस्सं कर अन देतो म्हणं पैसं सा महिन्यात समद्यास्नी,’ मंद्या म्हणेल त्याच्या दुप्पट, म्हणजे मंद्या दोन लाख एकराला म्हणला तर मी चार लाखाची ऑफर द्यायची, हे गणित माझ्या डोक्यात उतरत नव्हतं.
मी पुन्हा विचारलं,’ अरे एवढे पैसे कुठुन आणु, तु फक्त सॅलरी स्लिप पाहिलिस, तिथुन पुढं फुटणारे खर्चाचे फाटे नाहिस पाहिलेले, काहि तरि धोंड नको बांधु माझ्या गळ्यात. उगा तो हो म्हणाला तर, नको त्यापेक्षा जे मिळतात ते घेउन मी मोकळा होतो, असु दे तुझे हिशोब आणि तुझे पैसे मिळवायचे मार्ग तुझ्याचपाशी, उगी तुझ्या सारख्या अडाण्याच्या नादाला लागुन मी आहे ते घालवुन बसायचो, नको.’ त्यावर हेम्या बोलला ’ असं, काल रात्री लई गप्पा मारत होता अन आता शेपुट गांडीत घालतोस का काय भाड्या, अरं चोरचुकाळिच्या, तुझ्या जिंदगीवरच थु तिच्यामायला, जर तु न्हाई केलंस ना तर बग मी काय करतोय ते, थांबच आता, एक डाव गम्मत दाखवल्याबिगार न्हाय सुदरायचा तुमि माणसं तिच्यायला, थांब आता.’ हि स्क्रिनवर दिसलेली शेवटची अक्षरं, पटकन वर्ड फाइल बंद झाली, काहि सेकंदच गेले असतील, कमांड विंडो उघडली आणि एका मागं एक उलट्या सुलट्या कमांड दिसायला लागल्या, नुसतं स्क्रोल होत होतं, मी सवयीनं अल्ट+कंट्रोल+डिलीट दाबलं, काहि फरक नाहि, आता कमांड विंडो बंद झाली आणि रिसायकल बिन उघडला, त्यात हळु हळु सगळं सिलेक्ट होत होतं, सगळं सिलेक्ट झाल्यावर, डाव्या बाजुला डिटेल्स मध्ये दाखवत होतं १६७८ फाईल्स सिलेक्टेड, टोटल फाइल साइझ ७६.२३ जिबी, राईट क्लिक मेन्यु आला आणि वर्ड फाइल पुन्हा उघडली, फॉंट साईज पण मोठि झालेलि होति आणि लिहिलं होतं, करु काय डिलिट कायमच्या, व्हय रं, बोल आता, हा एवडा कचरा काडला ना की मला इथं जागा पण लई भेटंल मोकळी, सांग की भाद्या करु का डिलीट? ’ नाही, नको’ , हो म्हणायला मला काय चान्सच नव्हता, नक्की काय काय गेलं आहे ते पण कळालं नसतं, रिकव्हर करुन काहि थोडंफार मिळालं असतं पण हेम्यानं ते रिकव्हरच होवु दिलं नाहितर काय करणार.
दहावी पास होवुन शिक्षण थांबलेला हेम्या एवढा हुशार एक दिवसात होईल असं वाटलंच नव्हतं. त्याला विचारलंच ’ हेम्या, एका दिवसात तुला एवढं कसं कळालं रे सगळं. दहावी पास झालास कसाबसा, का गावात काही करत होतास कोर्स वगैरे? , माझा पराभव मान्य केल्यामुळं फॉंट पण लहान झाला अन शब्द आले ’ अरं मेला तो हेम्या, ती बॉडि अन त्या मेंदुत तेवडंच बसलं व्हतं, अजुन बसलं असतं पण तुज्या बापानं इथंच कुजवलं त्याला, आता मी आत्मा हाय फक्त. मला ना मेंदु ना बॉडी, कशाची लिमिट नाय का भिती नाय, फक्त एकच हाय म्हंजे ही फ्रिकेन्सी, तिच्यायला त्यानंच तर इतं अडकलोय, नायतर आख्ख्या दुनियेत काय बि अडचण नाय मला.’ लिहिता लिहिता त्याची एक कमजोर कडी मला उमगली होती, पुढं मागं याचाच उपयोग करुन घेणं मला फायद्याचं होतं. पुन्हा पुढचे शब्द आले. ’ बोल आता काय करु का डिलीट समदं, का घेतोस आखाड विकत? पैशाला अडू नको, त्ये सावरायला म्या हाय इतं, सया कराया अन अंगटे लावाया तुमि रव्हा म्हंजे मिळवलं’ ७६.२३ जिबि डोळ्यासमोर नाचत होतं, हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता. हेम्याला हो सांगितलं, म्हणजे टाइपलं अन सगळं घेउन बाहेर आलो.
हॉलमध्ये तयारि कालच्यासारखिच होति, फक्त आज लोकं कमी असणार होती, अण्णा आणि जग्गनाथकाका कागदपत्रं घेउन बसले होते, मंद्या आणि गण्या एकमेकांत कुजबुजत होते. आत्या येउन बसली होति, शकुताई, सुरेखा अन ज्योती नाष्टा, चहा घेउन आल्या. मी गावात असतो तर माझेही लग्न असं मुली बघुनच झालं असतं,पण जाउदे तो विषय नंतर कधीतरी. मस्त पैकी पोहे दोन डिश खाल्ले अन चहा घेउन सगळे तयार झालो. अण्णांनी सुरुवात केली’ पहा, पोरांनो काल बाकी सगळ्या जमिनिचा निकाल लावला आहे, आज फक्त आखाडाचा विषय आहे, तर मंदार बोल बाबा तुझं काय म्हणणं आहे ते सांग, झालं सगळ्यांना मान्य तर विषयच संपला, मग उरलेली कागदपत्रं करुन जेवणं आटोपु, कसं पुणेकरांना पण रात्रीच्या आत घरी पोहोचायला येईल रात्रिच्या आत, होय ना रे हर्षद, बरोबर ना?’ अण्णा थांबले, मी आपलं उगाच ’ हो हो, बरोबर आहे’ एवढं बोलुन मोकळा झालो. घसा खाकरत मंद्यानं सुरु केलं, ’ काल म्हंलो ना तसं करन मी, समदा आखाड अडिच एकराचा हाय, चार लाख एकराला देतो, हात धुवा पैसं घ्या अन मोकळं व्हा.’ उगा पडिक जमिन ती कशापायी जिव लावताय, का येउन कसणार हाय कुणि’ तो थांबला, काही वेळ सगळे गप्प होते, आधी आत्याचा आवाज आला’ ठिक आहे बाबा, मला चालेल, पण पैसं लगेच पाहिजेत, नाहरकतीला सह्या झाल्या की लगेच, म्हणजे इकडं पैसे अन तिकडं सह्या, मला कबुल.’
एक विकेट पडलि, म्हणजे शेवटपर्यंत टिकायची आशा नव्हतीच, पण जरा लवकरच पडली. अगदी अनपेक्षितपणे जग्गनाथकाकानं पण सेम स्टेटमेंट टाकलं, सगळं कसं अगदि ठरल्यासारखं होत होतं. मी शकुताई कडं पाहिलं, तिचा चेहरा कावरा बावरा होत होता, धीर सुटत चालला होता. मी तिला डोळ्यानं गप्प रहा असा इशारा केला. उरला गण्या, तो तर काल रात्रिच्या आमच्या बोलाचालिंनंतर निश्चिंतच होता. तरी, आता बैठकीला बोलणं भाग होतं, म्हणुन त्यानं सुरु केलं ’ काय हाय अण्णा, नाय म्हंजे आता आखाडाच्यापासुन रस्ता जाणार हाय, पन त्येला अजुन तरि १०-१५ वर्स लागायची बगा, तोवर कोन हाय कोन नाय, देवाला ठाव, तवा लै पुडचा विचार नाय करत म्या, तरि पण काय म्हंतो, मंद्या जर समदा आखाड तु घेनार तर तु नाय तुजी पोरं टोरं तर मिळिवतिल्च कि पोत्यानं पैसा, न्हाय का काका, मग असं कर तु आता थोडा ढिला कर कि हात, चार लाख का एकरि सात दे, कसं बी गेली ५-६ वर्षे टॅंकरचा धंदा त्या आखाडाच्या हिरिवरच चालतोय ना तुजा, त्यातलं कदि भागिदारी नाय मागितली कुनि का कधि तु हुन दिली नायस. अण्णा ह्याचा बि विचार करा.
हे बोलणं अजुनही खेड्यात राहणा-या आत्याला पेटवुन गेलं ’ व्हय रं, कवाच्या वर्षी पोतं दोन पोतं जवारी नाय, पायलि शेर तुर नाय, कारखान्याची फुकट मिळतीय ती साखर नाय, कदि काय आलं नाय या लेकिच्या वाट्याला,माय व्हति तर निदान दिवाळसणाला तरी साडी चोळी बगाया मिळाची, ति गेल्याधरनं निस्तं आमच्या पोरा बाळिच्या लग्नाला तेवडं येताय, एक चिरगुट, एक शर्टाचा पिस अन एक टोपि घेउन, बाकि समदं सण वार सगळं म्हायेरच सुटलंय जणु.’ वातावरण वाटण्यांवरुन एकदम ’माहेरची साडी’ टाईप झालं. आता आत्याचा नातु अन नात इकडं गावातच शिकायला होते, घरीच रहात होते हे बोलायचं ती टाळत होती. अगदी शकुताई, सुरेखा अन ज्योती सगळ्यांच्या नजरा थोड्या बदलल्या, पण असलं बोलणं ऐकुन मुद्दा सोडतील ते अण्णा कसले?, पुन्हा चर्चा व्यवस्थित वाटेला लावत ते म्हणाले ’ आं गण्या, एकदम सात लाख एकराला, अरं उजनिच्या बॅकवाटरला सोडलं तर आख्या जिल्ह्यात तरि हाय कारं असला भाव जमिनीला, बोलाचाली व्हायच्याच असल्या वक्ताला पण एकदम सात लाख, अन त्ये बी चुलत भावाला, अरं असं करु नका, काय तर मधला मार्ग काढा.’ यावर गण्या लगेच उत्तरला ’ काय नाय अण्णा मदला बिदला काय न्हाय, द्याचे असतिल तर सात द्यावं नाय तर राव्हदे आखाड समद्यांचा, जमिन हाय, पाणि हाय, आताशा काय ते माती परीक्षण करुन भेटतोय रिपोर्ट काय तरी उगवेलंच कि तिथं, जे येइल ते येउद्या समदे मिळुन खाउ, इतं कुणाचा काय अड्लं न्हाय पैशावाचुन, नकोच असला पैसा मला.’
त्यानं पुढं चालुच ठेवलं ’ अन तुमि ओ काका, काय करणार पैसा घेउन एकुलता एक लेक गेला, कोन हाय मागं सांबाळायला, डोइला छप्पर हाय, करुन घालायला एकाला दोन सुना हायत, करुन घालतेत तिन टायमाला, बरोबर नात-नातु हायत, त्यास्नी जीव लावा, का उगा पैसा पैसा करायलात या म्हातारकाळात.’ त्याचं बोलणं कितीहि सत्य, जळजळीत सत्य असलं तरी त्यानं जग्गनाथकाकाला असं सगळ्यासमोर बोलायला नको होतं, हेम्या गेल्यावर जग्गनाथकाका माझ्याकडं होता तेंव्हाची त्याची अवस्था मला आठवली, दिवसभर बिचारा हेम्याचा एक फोटो अन त्याची पत्रिका घेउन बसायचा, समोर आलो कि दाखवायचा पत्रिका अन म्हणायचा ’ बग रे, त्या दात्यानं लिहुन दिलंय, इतं खाली, द्विभार्यायोग म्हंजे दोन दोन बायकाचा योग आहे म्हनुन, एक तरी मिळलि का होती रं त्याला,सांग बाबा तुच सांग, त्यो दाते समद्या दुनियेत पिक पाणी ते दिवाळ संक्रात बरोबर बिनचुक सांगतोय मग माज्या लेकाची पत्रिका लिवतानाच काय चुकला रं त्यो.?’
अण्णा आता शेवटचे वाटेकरी म्हणुन माझ्या आणि शकुताईकडं पहात होते,मी होता नव्हता तेवढा धीर गोळा केला अन सुरु केलं बोलायला’ हे बघा अण्णा, आम्हाला गाव सोडुन झाली १०-१५ वर्षे, आता नाही राहिला काहि संबंध पण आम्हाला पण कधितरि वाटतंच की एक शेत असावं,दोन म्हशी, दोन बैलं, चार कोंबड्या असाव्यात. उगा निवांत उठावं सकाळी ८-९ ला, घराबाहेर बसुन दात घासत शेजारच्या बरोबर दोन गप्पा हाणाव्या, मग उठुन त्याच्याकडंच जावं चहा प्यावा,मग निवांत तासाभरानं घरी येउन डायरेक्ट जेवण करुन मगच आंघोळ करावी, निवांत शेतात जाउन, गडी काय करताहेत काय नाहि पहावं. उगा चार दोन जणांना शिव्या घालाव्या, मालकिचा माज दाखवावा, पण काय शक्य होत नाही,या जन्मी तरी असं वाटतंय. आता ह्या वाटण्या झाल्यावर तर काय पुन्हा इकडं येणं होईल ते या लेकरांच्या लग्नाकार्यालाच. जशी इथली आशा सुटत नाही तशीच तिथली कामं पण सुटत नाहीत. काही झालं तरी हे घर, ही माणसं तरी आहेतच आपली, कधि वाटलंच तर येउन डोकं टेकवावं असे काका आहेत, तुम्हि आहात. ६०-६५ मैलाला आत्या आहे, हो कि नाहि ग आत्या?, मग एवढं सगळं असताना पुन्हा वेगळा जमिनिचा तुकडा काय करायचा ओ? असला काय नसला काय सारखाच ना? काय ग शकुताई बरोबर म्हणतोय ना मी, बोल की तु, हो तर म्हण नाहि तर म्हण.’ एवढं बोलुन मी थांबलो. शकुताई माझ्याकडे बघत बघतच बोलली, ’ होय बाई, खरंच आहे सगळं, इथं कुणाला वेळ आहे हो सगळं करायला, आहे त्या घरातल्या तुळशीला अन मनिप्लॅंटला पाणी घालणं होत नाही म्हणुन ड्रिप करुन घेतलंय घरात अन हे शेतीचं कोण बघणार, एवढ्या लांब येउन’
’अगदी बरोबर बोललीस, ताई तु’ मी पुढं सुरु केलं ’ त्याचबरोबर आता गण्या म्हणला ना ते पण खरंच आहे, कसंही झालं ना तरी आपलं ते आपलंच असतंय मग ते लेकरु असेल नाहीतर,जमिन. म्हणुन आखाडाची जमिन मी घेतो विकत एकरी १० लाख देतो.’
अण्णा, मंद्या अन गण्या गडबडले होते, जग्गनाथ काका नुसताच माझ्याकडं पहात होता, आत्या बिपि वाढल्यासारखि दिसत होती, तर शकुताई फक्त पांढरीफटक पडायची राहिलि होती. एक-दोन मिनिटं कुणिच काहि बोललं नाही. या धक्क्यातुन सावरत अण्णा बोलले ’ अरे, ह्ये काय लिलाव चाललाय का काय जिल्हा सहकारी बॅंकेचा, एकजण चार म्हणतंय, दुसरा सात म्हणतोय अन आता तु दहा, चक्क दहा, समजतंय का काय बोलतोस ते, चालु बाजारभावाच्या पेक्षा अडीचपट भाव बोलतोस तु. आहेत का एवढं पैसं तुझ्याकडं ? कुणालाही येईल तसा माझ्या ऐपतीचा प्रश्न आल्यावर मला पण राग आला,’ अण्णा, गावातलं मोठे म्हणुन तुम्हाला बोलावलंय, बाजारभाव काय आहे अन काय नाही ते आम्हाला पण कळतंय. आणि कुणाकडं किती पैसा आहे अन नाही याच्या उचापती तुम्ही करु नका, कागदोपत्री व्यवहार होणार आहेत ना मग जेवढा द्यावा लागेल तेवढा पैसा आहे माझ्याकडं, बिनपैशाचं बोलत नाही मी उगा गमजा म्हणुन. जे व्यवहार चाललेत त्यावर फक्त थोडं लक्ष द्या तुम्ही, नस्या चवकशा नका करु उगा.’
माझं हे ऐकुन अण्णा अन मंद्या चिडलेच होते अन त्याच रागात मंद्या बोलला’ चल, हाय माजि तयारी,टाक पैसं अन घे नाहरकत लिहुन, बगुयातच कोण येतंय त्या आखाडात कसायला अन खायला. चल टाक पैसं अन घे आखाड तुला.’ त्याचं ऐकुन गण्या त्याला बोलला’ अरं मंद्या अन टॅकर कशानं भरणार मग, विकणार का काय सगळं एक हाती.’ गण्याचा प्रश्न ऐकुन मंद्या अजुनच चिडला, बोलताना त्याच्या अंगावर जायचाच बाकी होता,’ जा रे मोठं आलं माझ्या टॅंकरला हात लावणारे, आरं दुष्काळी भाग हाय आपला तितं, चार - आठ गावात पाणी पुरवुन पुण्याचं काम करतुया तर कोन अडवतोय तेच बगायचंय मला. देवाची देन हाय ते पाणी, समद्या गाववाल्यांचा हक हाय त्येच्यावर, ह्यो कोन आला पैसं टाकुन ते विकत घेनारा, हात तर लावु द्ये हिरीला, तिथंच मुडदा पाडीन हात लावणा-याचा’ मंद्याचा आवेश पाहता तो असलं काहितरी करेल याची मला भिती वाटायला लागली, जग्गनाथकाका पण हादरले होते, शकुताई अन आत्या आता खुपच घाबरल्या होत्या. शकुताई मला म्हणाली’ मुर्ख आहेस का रे, काय बडबड करतो आहेस समजतंय का तुझं तुला, तिथं घराचे अन गाडिचे हफ्ते भरता भरता दम लागतोय अन हे काय नसती स्वप्नं पाहतोयस, कुठुन आणणार आहेस एवढा पैसा अन आणलास तरी काय करणार आहेस त्या आखाडाचं ? उगाच का घरातच दुष्मनी ओढवुन घेतो आहेस, सांग सगळ्यांना की तुला काही ईंटरेस्ट नाही म्हणुन, अण्णांना सांगुन थोडा भाव वाढवुन द्यायला लावु मंद्याला, अन झालं.’
माझा राग अजुन उतरला नव्हताच, शकुताईवर जरा जोरातच ओरडलो ’ तु गप ग शकुताई, इथं सोन्याचा भाव आलाय जमिनीला अन हे आपल्याला काही कळत नसल्यासारखं समजुन मातीच्या भावानं पैसे देताहेत अन उगीच गप्प बसायचं का आपण? काल चौकशी केली मी आजुबाजुला, गेल्या ५-६ वर्षात मंद्यानं पाण्याच्या धंद्यात लाखो कमावलेत, १५ लाखाचा एक टॅंकर पडतो, आणि आता सहा टॅंकर आहेत त्याच्याकडं त्यातले चार बिनकर्जाचे, अजुन एक सोलापुरला पडलाय अडकुन पोलिस स्टेशनला तो वेगळाच. यातला काय हिस्सा दिलाय का कधी आपल्याला? दहा दहा टक्के जरी दिले असते ना तर तुला मला घरासाठी कर्ज काढायची गरज पडली नसती तिथं, कॅशमध्ये घरं झाली असती, पोरांना चांगल्या शाळेत घालता आलं असतं आज. उगा व्यवहार कळत नाहीत तर बोलु नकोस मध्ये मध्ये.’ हिस्सा न देणं याला आत्याचा पुर्ण पाठिंबा होता, तिनं लगेच तसं बोलुन पण दाखवलं. आत्या मध्ये पडली म्हणल्यावर शकुताईला थोडं बरोबर वाटलं, पण अजुनही आखाड विकत घेणं तिच्या डोक्यात घुसत नव्हतं हे निश्चित. तिकडं अण्णांचे हिशोब चुकत चालल्यानं अस्वस्थता वाढत होती, या सगळ्या व्यवहारात त्यांचा काहीतरी फायदा होता हे निश्चित होतं, त्यामुळं त्यांना सगळं मंद्याच्या बाजुनं व्हायला हवं होतं, जे कालपर्यंत होत होतं पण आताच्या बदलाची त्यांनी कल्पनाच केलेली नसावी, त्यामुळं त्यांच्याकडं प्लॅन बी असा काही रेडि नव्हता.
स्वताला सावरत ते म्हणाले’ बरं असं करा, मग तुम्हीच ठरवा काय ते मी यात पडतच नाही तुमच्या मध्ये, उगा गावात माझी अब्रु नको जायला घरात भांडणं लावली असं, काय बरोबर ना जग्गनाथा, बोल की रे तु का असा गप्प बसलायस’. जग्गनाथकाका खरंच काही बोलायच्या अवस्थेत नव्हता, त्याला जशी इथली परिस्थिती माहित होती, तशीच माझ्या परिस्थितीची कल्पना होतीच. तरी आता मोठंपण आलंय म्हणल्यावर बोलणं भाग होतं ’ ह्ये बग मंदारा, अरं काल बी तुमी जमिनीचे भाव जरा कमतीच लावले, म्या काय बोललो नाय, त्याचा भाग निदान आखाडात तर द्या की रं, शेवटी काय आपल्यालीच हायतं की सगळी, तुला पाण्याच्या धंद्यात पैसं मिळालं की न्हाय ह्ये काय लपुन उपेग हाय का?, समद्यांस्नी कळतंच बाळा ते, अन हर्षद काय पुना इतं येनार नाय का जमिन कस्नार नाय, मग त्येला बी थोडं जास्तीचं मिळालं तर काय बिगडालय तुजं, ती शकु अन माया, दोगी लेकी या घरच्या, आपल्या आपल्या घरी गेल्या सुखात हायत, कदी तर सणावाराला येणार कायतर दोन चार दिस राहणार अन जाणार, का उभ्या राह्यल्यात कदी दारात पदर पसरुन, न्हाय ना, मग मिळलं त्यानाबी चार पैसं तर तुजं काय चाललंय, का तुज्या तोंडचा घास तर नाय ना मागत कुणी, असं करा तुजं बी ठिव बाजुला अन त्याचंबी, गण्या म्हणतोय तसं करा सातावर मोकळं करा सगळ्यास्नी, एकच मुद्दा राह्यलाय तो सोड्वा अन मोकळं व्हा’ घरातल्या सगळ्यात मोठ्या माणसाचा शब्द मोडणं सगळ्यांनाच अवघड होतं.
नाही म्हणायला अण्णा थोडं नाराज होते ऐनवेळी झालेला बदल त्यांना रुचला नव्हता. मनात हिशोब केला तर मला तरी काही वाईट वाटत नव्हतं सातच्या हिशोबानं साडेसतरा लाख म्हणजे अंदाजे अठरा लाख आणि त्याचा सहावा हिस्सा म्हणजे मला तीन लाख अन कालच्या हिशोबातले अडीच लाख असे एकुण साडेपाच लाख मिळाले म्हणजे माझं होमलोन निम्याला आलं असतं एकदम, शकुताईकडं पाहिलं तिनं बरोबर आहे अश्या अर्थानं मान हलवली,मला आता एकदम मगाशीची भुमिका बदलुन दुस-या टोकाची भुमिका घेणं भाग होतं, व्यवहारी होतं, घसा खाकरुन मी बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात दरवाज्यातुन मंद्याचा धाकटा आत आला, कालपासनं तापला होता म्हणुन शाळेत नव्हता गेला, आत येउन माझ्याकडं पाहिलं अन ओरडायला लागला ’ काका आलाय तिथं काका आलाय, आई चल चल काका आलाय तु बी चल जाउ चल’ त्याच्या
चेह-यात मला आता हेम्याची झाक जाणवत होती आणि त्याचा कालचं टायपिंग आठवत होतं, ” हर्ष्या माफ कर, काल खोटं बोललो म्या तुला, अरं माणुस माणसाला निस्तं चेह-यानंच नाय ओळखत, आत्म्याचं आम्यालापण कनेक्शन असतंच कि, अन त्याच्यातला आत्मा तर माझाच एक तुकडा हाय’
क्रमशः

Print Page

0 comments:

Post a Comment