Tuesday, May 24, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ४

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ४


आता माझे हात थरथर कापत होते, मी डिग्री पुर्ण करुन गावी आल्यावर आजोबांनी गावजेवण दिलं होतं तेंव्हाचा तो फोटो होता माझ्या लॅपटॉप वर त्यातला फक्त हेम्याचा चेहरा दिसत होता, कम्युनिकेटरला. कपाळावर, हातावर घाम आला होता, काय होतंय तेच सुचत नव्हतं, समजत नव्हतं. लहानपणापासुन आखाडाच्या विहिरीच्या देवीबद्दल आणि नंतर आजीबद्दल ब-याच गोष्टी ऐकलेल्या होत्या, त्या सगळ्या डोक्यात घुमायला लागल्या. तेवढ्यात पुन्हा कम्युनिकेटर अ‍ॅक्टिव्ह झाला आणि आता लिहिलेलं होतं ’ भ्याला का काय बे, मी हेम्याय.आखाडाच्या हिरितच हाय गेली २-३ वर्षे मुकाम.दुपारी लईच गलका आला आखाडात, म्हनुन वर आलो तर तु दिसला आखाडाची मोजणी चाललेली, मग ध्यानात आलं समदं का वाटण्या चाललेल्या आहेत.’
मी प्रेताहुन पण जास्त थंडगार झालो होतो, हाता पायाला मुंग्या आल्या होत्या, कोरड्या ओठावरुन जीभ फिरवुन पुढं काय लिहिलं जातंय ते वाचायला लागलो, तो मजकुर असा होता ’ हिरीतुन निघुन झाडाकडं यायलो तर जाम वडला गेलो एक्दम ,काय ध्यानातच नाय आलं, समजे समजे पर्यंत हितं आलो’
हे फारच विचित्र होतं,डोक्याच्या पलीकडचं. आता थोडं थोडं नॉर्मल होत होतो, एवढा वेळ मी शांत बसल्यानं सगळे अस्वस्थ झालेले होते, मंद्याचा आवाज आला ’ काय बे पुन्हा सुरु का हिशोब का पाढे शिकवु आता तुला.एवढे सगळे मोठे समजावुन सांगतेत ते काय चुलीत का सगळं, का पुण्याहुन आला म्हणजे लई जास्त कळतय तुला’ मी मंद्याकडं पाहिलं, आधीच तो माझ्यापेक्षा अंगानं डबल आणि त्यात आता चिडलेला आणि त्यात हा गोंधळ, त्याला कसाबसा उत्तरलो ’ होय हिशोब करतोय, थांबा जरा, काहितरी घोळ आहे.
स्क्रिनवर पुढचे शब्द उमटले ’ ते काय पांढरं होतं आन त्यावर एक दिवा लुक लुक करायला व्हता, तिथं पत्तर आलो आन झाडाला धरावं धरावं म्हनस्तोवर कायतर धक्का बसला एकदम आतच गेलो त्या पांढ-याच्या, काय कळेना काय समजेना, आखाडाचि व्हिर बि अमासेला अशीच अंधारी असतिय, कधि मधी आज्जी येती वर तवा बरं वाटतंय, नायतर एकला असलो ना का लय भ्या वाटतंय तितं.’
तितं, अरे माझी इथं बोबडी वळत होती, समोर जिवंत मंद्याची घाई चाललेली आणि आत हा गप्पा मारत होता, प्रवास वर्णन करत होता. रात्रिचे ९ वाजत आलेले आणि लॅपटॉपचि बॅटरी पण संपत आलेली, माझी तर शॉर्टच झाली होती. सगळ्यांना ऐकु जाईल अश्या आवाजात कसंबसं बोललो ’ मला जरा बरं वाटत नाही, अ‍ॅसिडिटी पण झालीय आणि जरा लुज मोशन पण होत आहेत दुपारपासुन, आपण उद्या सकाळी पुन्हा बसु आणि संपवु सगळं एकदमच, चालेल ना अण्णा.’ हे ऐकलं तसा मंद्या आणि गण्या भडकले,’ ते काय नाय, काय तो निकाल आत्ताच लावा आणि कांडकं मोडुन मोकळं करा, एका रातीतनं काय दुनिया इकडची तिकडं व्हायली का काय रे भाड्या, अर्धा तास त्यात डोकं घालुन बसलायस अन आता का उगा नाटकं करतोस रं?’ पुन्हा मंद्याच्या प्रश्न आला.
मी काहि बोलणार, तेवढ्यात अण्णांचा आवाज आला ’ मंद्या, तुच म्हणतोस ना इकडची दुनिया तिकडं होत नाही एका रात्रित, मग राहुदे उगा वाद वाढवु नका, आजची बैठक बास,उद्या सकाळी मात्र १० ला बसु आणि जेवणापर्यंत सगळं आटोपुन टाकु, गण्या तुझ्या बायकोला उद्यासाठी चांगली गव्हाची खिर अन चपात्या करायला लाव, सगळं व्यवस्थित होईल अन पाहुणे जातील तोंड गोड करुन. काय रे हर्षद ठिक ना बाबा, चला. मग जग्गनाथा निघतो रे मि. गण्या चल मला सोड बाबा घरापर्यंत तुझ्या कमांडर मधुन, मोटरसायकल वर काय जमणार नाय मला रात्रीचं.’ गण्या, जरा मंद्यापेक्षा थोडा शांत होता, तो उठुन गेला अण्णांबरोबर आणि हॉलमध्ये आता फक्त मि, शकुताई, आत्या, मंद्या आणि जग्गनाथ काका उरलो, आणि हो माझ्या खांद्यावर बॅग होति, त्यात लॅपटॉप होता त्यात हेम्या होता. पटकन उठुन मंद्याकडं न पाहता सरळ आमच्या खोलीकडं निघालो, तसा मंद्या बोलला ’ हर्ष्या, जुलाब लागलेत ना, धाकल्या बरोबर ओवा देतो पाठवुन, चावुन गिळ आणि पाणी पी ग्लासभर, झोप अर्धा तास अन मग ये जेवायला, वाट बघतोया सारी जण, आन हो आपली गडि माणसाची ताटं उचलल्यावर बाया जेवणार हायत, तुमच्यावानि नाय, मांड्याला मांडि लावुन बसले लग्नात बसल्यासारखं हरघडी.’
मी आणि शकुताई खोलीत आलो, मी एकदम अंग सोडुन दिलं पलंगावर आणि डोळे मिटुन पडुन राहिलो, शकुताईचा आवाज आला ’ काय रे काय होतंय तुला, जुलाब तर होत नाहित, चांगला सहा ते दहा बसुन होतास की बैठकीत, आणि आठवड्यात तिन वेळा हे आणि तु जाउन बसता तिथं राज गार्डनला तेंव्हा नाही वाटतं होत अ‍ॅसिडिटी, आजच झाली ती, सगळं पटकन संपलं असतं, हिशोब झाले असते, उद्या संध्याकाळ पर्यंत कॅश देतो म्हणाला होता ना मंद्या, तर तुला नस्त्या भानगडिच फार’ एवढं बोलुन शकुताई निघुन गेली, मग पुन्हा लॅपटॉप चार्जिंगला लावला आणि चालु केला, अपेक्षेप्रमाणे सगळ्यात आधी कम्युनिकेटर चालु झाला ’ च्यायला बंद कशाला केलं बे उगा, तिच्यायला त्या आखाडाच्या व्हिरित बि अंधार अन हितंबी तेच’ अक्षरं उमटली स्क्रिनवर, मी घाबरत घाबरत टाईप केलं, कॅन यु सी मी? ’, थोड्या वेळानं रिप्लाय आला, ’ एवडं इंग्रजी आलं असतं ना तर कदीचा वळसंग सोडुन गेलो असतो, तुजा बाप याला कारण हाय, तुला ठेवलं नेवुन सोलापुरला अन आम्हि इतंच खपलो बाबाच्या हाताखाली शेतात. दहावि कशी बशी करु दिली नशिब आमचं’
मी पण आता रोमन लिपीत मराठी सुरु केलं ’ मि दिसतोय का तुला ’ ’ नाय, मला कोणी बि दिसत नाय, दिसतय ते फक्त आत्मा, आता शरिराचा म्हव नाय -हायला हर्श्या. मंद्या,भरत कोळ्याच्या पोरीला घेउन निजायचा ना आखाडाच्या खोपटात तेंव्हा लय वाटायचं, भाड्याला धरावं अन ह्यानम्हनुन आपटावं तिथंच, अरं माझं लग्न तिच्यासोबतच ठराचं व्हतं, पन ह्याचं हे असलं समजलं कोळीकाकाला अन त्याच दिशी रातीला त्यानं फास घेतला शेतातल्या बाभळीला, च्यायला झाड तरं असं बाराचं बघ, माणुस मेला असंल नसंल, दिलं सोडुन खाली धाडदिशी, कोळी काका फासानं गेला का पडुन गेला कुणाला कळलं नाय, फक्त मी आणि आजी होतो तिथ, पण काय करता नाय आलं रे आम्सानी.’ आता त्याच्या कथेत मि गुंतलो होतो, सहज विचारलं, ’ का रे का नाही गेला तुम्ही वाचवायला?’ -त्यावर उत्तर आलं ’ इसरला का काय इतक्यात, अरे माळकरी होता रं तो, जोवर आत्मा शरिरात अस्तोय तोवर आमाला काय पण चान्स नव्हता, आणि खरं सांगतो कोळिकाका स्मशानात नेला तरि मेला नव्हता, उगा हट्टानं नाकात कापुस घातला अन मारला तिथं त्याच्या पोरानं.
तेवढ्यात खोलिचा दरवाजा उघडला अन मंद्याचा धाकटा मुलगा आत आला, एका वाटित ओवा आणि पाणि ठेवलं, थोडं वाकुन लॅपटॉप पाहिला अन पळुन गेला. मी हेम्याला सांगितलं ' मी मशीन चालुच ठेवतो आहे, एक वर्ड फाईल उघडुन ठेवतो, तुला काय सांगायचं आहे ते तिथं सांग. जेवुन येतो मी आता’ एवढं बोलुन ओवा खिडकितुन बाहेर टाकला पाणि पिउन बाहेर आलो, समोर अंगणात गण्या अन मंद्याची पोरं खेळत होती, धाकटा नव्हता त्यात. तिथंच एका खुर्चीवर बसुन त्यांचा खेळ पहायला लागलो, तेवढ्यात मंद्याचं धाकटं पोरगं आईला हाताला धरुन ओढत बाहेर घेउन आलं, आलं ते ओरडतच ’ ते बघ त्या खोलित काका हाय काका, माझा काका आलाय, त्या खोलीत. आत कॉटवर काका आलाय काका...


Print Page

0 comments:

Post a Comment