Tuesday, June 7, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०६


स्टेट ऑफ द आर्ट - भाग ०६
हेम्याच्या म्हणण्यानुसार, हे दोघं जमिनिचा फार कमी भाव सांगत आहेत आणि त्यांनी अण्णाला पण पटवलं आहे,त्यामुळं भाव जास्त सांग किंवा त्याच भावात जमिनी तु विकत घे आणि नंतर विक बाजारभावाने.हे त्याला सांगायला फार सोपं होतं आणि जर खरंच ते विकायला तयार झाले तर काय घ्या, कुठुन देणार इतके पैसे हे कळत नव्हतं, तसं हेम्याला विचारलं तर तो म्हणाला’ अरं नसती चिंता नकं, काय विकत न्हायत जमिनी तुला, काय करणार विकुन, फिरणार दारोदारी भीक मागत, तुला एक हाय नोकरी पगार येतोय महिन्याचा महिन्याला मग काय वाटत नाय, इथं कसं जगतोय आमालाच ठाव.’
मी ह्सुन त्याला म्हणलं, ’तु अजुन जगतोयस, कसं काय रे?’ बरं ते जाउ दे उद्या काय ते सांगतो, मी फक्त भाव वाढवुन मागणार पण जमिनी विकत घेतो हे काही बोलणार नाही तिथं, आणि आता सगळं झालंय की रे फक्त आखाडाचाच प्रश्न आहे, उगा तेवढ्याकरता का ओढाताण करायची, शेवटी सगळे आपलेच कि, ताटात सांडलं काय वाटीत सांडलं काय एकच ना’
बराच वेळ स्क्रिनवर काहीच उमटलं नाही, मला पण झोप येत होती,म्हणुन मीच टाईप केलं झोपतोय रे आता, पहाटे उठेन परत. वर्ड फाईल बंद करणार तेवढ्यात अक्षरं उमटली ’ भाड्या, सकाळपर्यंत मेली तुझी बायको अन पोरगी तर म्हणशील का सगळं आपलंच की, अरं बोडाच्या ताट ताट असतंय अन वाटी वाटी असतीय, उद्या उठलास की जा बाबाच्या खोलीत, घे त्याची पोथी अन बघ त्यात, काय बी नाय रं माज्या म्हाता-याच्या पोथीत, देव न्हाय, धर्म न्हाय फक्त दोन फोटोयत, एक माझा दहावी पास झाल्याव काढलेला अन दुसरा माज्या बॉडीचा,अंगातलं समदं पाणि डोळ्यातुन भायर येईपतुर बघत असतोय रोजिला, त्याबिगार जेवण जात न्हाय त्याला आणि तु आला मोठा तालेवार म्हणे ताट अन वाटी’ ही धमकी नव्हती तरी पण माझा थरकाप उडाला पटकन अनुला फोन लावावा वाटला म्हणुन पाहिलं तर फोन खालीच राहिला होता, चटकन उठलो आणि खाली आलो फोन घ्यायला, पाह्तो तर शकुताई, सुरेखा आणि ज्योती मध्ये अंगणात खाटांवर झोपुन बोलत होत्या, मला बघताच ज्योती सावरुन बसली पण सुरेखा तशीच झोपुनच बोलली’ का वं हर्षद भावजी, भिती वाटती का काय वर, लगोलग खाली आलास?’ कुणी हवंय का सोबतीला,? मी म्हणालो ’ नाही माझा फोन राहिला होता खाली तो घ्यायला आलो होतो.’ त्यावर ती म्हणाली, ’ बग ग ज्योते, बायको नाय तर झोप येतीय पण फोन नाय तर कसं व्हायला लागलंय ’
मी हसुन खोलीत गेलो, फोन हुडकला कुठं सापडला नाही, मग बाहेर येउन शकुताईला विचारलं तर ती म्हणाली ’ मला नाही माहीत रे, बघ आत नीट, बॅग मध्ये टाकला आहेस का ते’ पुन्हा आत येउन बॅग तपासली, फोन एकदम खाली होता आणि त्यावर थोडी माती आणि विटाचा चुरा होता, मी तर जेवण करुन हात धुतले होते, मग हे डाग कुठुन आले, परत बाहेर येत शकुताईला विचारलं ’ तायडे फोन आला होता का ग कुणाचा, केवढा घाण झालाय, कुणी घेतला होता का पोरांनी वगैरे ?’ ताई काहि बोलायच्या आत सुरेखा उठुन बसत बोलली ’ घाण म्हणजे माती अन विटकुरं हायत का ’ त्याबरोबर ज्योती पण जास्तच सावरुन बसली आणि भेदरल्या सारखी माझ्याकडे बघायला लागली. मी म्हणालो ’ होय बरोबर,जाउ दे कोणी पोरानी घेतला असेल’
तेवढ्यात सुरेखा उठली, किचनकडे जाताना बडबडत गेली ’ गंगेत नेउन बुडवल्याखेरीज ह्ये माडके मोकळं व्हायचे नाय, पुरा पिच्छा सोडणार नाय असा’ अन बाहेर येताना देवघरातला गंगेच्या पाण्याचा गडु घेउन आली आणि मला म्हणाली’ आणा इकडं ते फोन तुमचं, दोन थेंब टाकल्याशिवाय हात लावु नका त्येला, काय ठिवा इथं खाली पायरीला’ मला काहीच समजत नव्हतं, पण भारावल्यासारखा मी फोन खाली ठेवला, समोर सुरेखा उभी होती हातात गडु घेउन म्हणाली ’ हात फुडं करा अन घ्या ह्ये गंगेचं पाणि अन टाका त्या माड्क्याच्या मुडद्यावं, जा म्हणावं त्याला इथुन नाय तर येईल तुमच्या संग पुण्यापत्तुर अन समदं आयुष्य उकिरडा करुन टाकंल,ब्रहमचारी मेला की लई बाराचा होतोय, मेला तवाबी हातात फोनच व्हता त्याच्या, लोकं म्हणत्यात बोलत होता म्हणं त्या सटवी सुनितासंग, आधी माझ्या नव-याला नागवलं अन याला तर पुरतंच उठवलं दुनियेतुन, अन आता हाय तुमच्या पुण्यातच, कुठं मोरे शाळा का काय तिथंच जवळपास असतीय, ब्युटी पार्लर काढलंय कुत्रीनं ’
माळेतले फटाके उडावे तसे माझ्या डोक्यात फटाफट विचार येउन गेले, ही हेम्या बद्दल बोलतेय, आणि अपघात झाला तेंव्हा हेम्या फोनवर बोलत असेल अशी शक्यता निश्चितच होती. आता त्या फोनला हात लावायचीच मला भिती वाटत होती. मी तसाच उभा होतो, ज्योती एका खांबाला धरुन उभी होती तर शकुताई थरथरत होती. त्याच अवस्थेत मी फोनवर पाणी टाकलं, त्यावेळी सुरेखा कन्नड मध्ये काहीतरी मंत्र म्हणत डोळे झाकुन उभि होती. तिचं ते पुटपुटुन झालं कि डोळे उघडुन म्हणाली ’ घ्या आता फोन अन जपुन ठेवा’ फोनकडं पहात मी तिला विचारलं’ हे सगळं..’ तिथंच माझं बोलणं तोडत ती म्हणाली, दर महिन्या दोन महिन्याचा कार्यक्रम हाय हा, कधी ह्यांच्या तर कधि गणेशभावोजीच्या फोनला असतेतच हे माती अन विटाचं हळदी कुंकु, रातभर समदे जागंच, फक्त ते म्हातारं मात्र घोरत असतंय खोलीत’
मी घाबरत घाबरत फोन घेतला,चालुच होता, लगेच अनुचा नंबर लावला, रिंग होवुन संपल्या तरी कुणी उचलला नाही, पुन्हा लावला पुन्हा कुणी उचलला नाही, ४-५ वेळा असं झाल्यावर माझा धीर सुटला, हे मोबाईलचं प्रकरण, मगाशी हेम्यानं सुनावलेलं त्यामुळं अजुनच भिती वाटत होती. शकुताईनं विचारलं ’ का रे काय झालं, अनु नसेल उचलत तर ह्यांना लाव फोन, त्यांना सांग घरी जाउन पहायला’ मी तसं केलं नितिनचा पण फोन उचलला जात नव्हता. आता शकुताई पण घाबरली होती. तिनं धावत जाउन तिचा फोन आणला त्यावरुन नितिनला फोन लावला, दोन-तीन रिंग झाल्यावर त्यानं उचलला, शकुताईनं घाईघाईनं सगळं सांगितलं आणि त्याला माझ्या घरी जाउन अनुला फोन करायला सांगितलं.
इकडं सुरेखा आता नॉर्मल दिसत होती पण ज्योती अजुन घाबरलेलीच होती. माझा घसा कोरडा पडला होता, सुरेखाला पाणि मागितलं, तिनं पाणी आणुन दिलं ते पिउन वर गच्चिवर जायला निघालो, मागुन सुरेखाचा आवाज आला ’ भावजी खालीच झोपा, उगा वर कुठं एकटं झोपताय.’ तिचं बरोबर होतं, मी म्हणालो’ आलोच माझा लॅपटॉप घेउन येतो फक्त’ एवढं बोलुन वर आलो, लॅपटॉप उचलला, चालुच होता, वर्डफाईलच्या लिखाणात शेवटी लिहिलेलं होतं,’ चला मुलावो प्रार्थना झाली, आता गणिताचा पिरियड सुरु, म्हणा एका एकराला ३ लाख तर अडीच एकराला किती ?’
ते वाचुन तिथंच खाली बसलो, लॅपटॉप जवळपास पडलाच होता,लगेच पुढच्या ओळी दिसल्या ’ अरं घाबरला का काय इतक्यात, काय भावा असं कसं व्हायचं रे, आणि असं एकदम हेलकावं नको देउस की इथं आत किती बोच-या सुया हाय्त, मधल्या मधल्या गरमबी झाल्यात, आन भायर काय पंका फिरतोय जनु मधुनच अंगात आल्यावानी घुर्र्र्र्र्र आणि मग बंद होतुय खटाक करुन. मला काय भ्या नाय या सगल्याचं पन उगा कुठं काय लागलं बिगलं म्हंजे तुजा खोळंबा नको उगा, व्हय ना. म्हणुन तुला सांगितलं जरा दमानं घे.
मध्येच हे एक अन शुन्य मग मध्ये एक शुन्य शुन्य असं होतंय मग नुसतंच शुन्य येतय बराच वेळ मग पुनांदा एक बराच वेळ मग पुनांदा शुन्य, कसलं रे हे दोन, तीन ,चार काय पुडं जाईनाच गाडं तिच्यायला, बग नीट बिगड्ला पिगडला न्हाय नव्हं, पैला डाव सांगतोय म्या काय बि केलं नाय, उगा नंतर फुकटचा आळ नको गळ्याला आपल्या समजलं का नाय. हां, नायतर समदे एक अन शुन्य धरुन ठेवीन एकाबाजुला मग बगु काय करतोयस ते तु.’
मगाशी पर्यंत मला त्याची कथा सांगुन रडवणारा हेम्या आता चक्क धमक्या देत होता, डोकं भरकटलेलं होतं, सरळ पॉवर ऑफ केलं, सिस्टिम शटिंग डाउन होता होता पुन्हा पॉवर ऑन झाली, मगाची वर्ड फाईल सेव्ह केलेली नव्हती तरी उघडली, एक मिनिट्भर लागलं, हेम्यानं लिहिलं होतं ’ह्यो डब्बा तुला भायेरुन चालु बंद करायला येत असेल, पन म्या आत हाय ह्ये धान्यात असुद्या काय, लै छळ केलाय माजा तुमि समद्यास्नी समदी परतफेड करायची हाय जनु मला, तिच्यायला बायाची नुसती पुस्तकं बगुनच मेलोय, समाधान कशाचं ते न्हाई, लक्षात ठिव धर्म,अर्थ,काम आनि मग मोक्ष असतोय, डायरेक्ट उडी नाय येत मारायला एकावरनं दुस-याला’
आता मात्र मला खरंच काही सुचेना झालं, हा हेम्या आता मला ह्याच्या हातातलं बाहुलं बनवणार आणि नाचवणार अशी चिन्हं दिसत होती आणि या क्षणाला तरी माझ्याकडे काहि उपाय नव्हता. खिशात फोन थरथरला, नितिनचा फोन होता,’ अरे अनु घरात नाहीये,तुला बोलली होती का कुठं जाणार आहे ते?’ हा सगळ्यात मोठा धक्का होता मगापासुनचा, आता तर काही बोलता पण येईना, तरी धीर करुन विचारलं ’म्हणजे, घराला कुलुप आहे आणि तिची गाडी आहे का खाली?’ नित्या बोलला ’ होय घराला कुलुप आहे आणि खाली गाडी पण नाहीये, मी संध्याकाळीच पाहिलं होतं पण मला वाटलं तुला माहित असेल म्हणुन तुला काहि बोललो नाही तेंव्हा.’
भर रात्रीच्या गार वा-यात पण माझ्या अंगाला घाम फुटला, फोन बंद करुन पुन्हा अनुला फोन लावला, ७-८ रिंग झाल्यावर उचलला, पण आवाज अनुचा नव्हता आणि प्रश्न तर ’कोण बोलताय, कोण हवंय तुम्हाला, एवढ्या रात्री फोन काय करताय’ असे होते. मी म्हणालो ’ मी हर्षद बोलतोय, तुम्ही कोण बोलताय?’ तिकडुन आवाज आला ’ हर्षदराव, अच्छा तुम्ही का, अहो चश्मा नाही लावला म्हणुन नंबर कळाला नाही, मी अनुचि आई बोलतेय, का हो इतक्या रात्री फोन केलात काय झालंय.’ अनु तिच्या माहेरी गेलिय म्हणल्यावर मला जरा धीर आला होता, आवाज पण नॉर्मल झाला होता, मी विचारलं ’ अनु कुठंय आत्ता, कधी आली इकडं?’ त्या म्हणाल्या ’ अहो, सकाळीच आलीय, आज जरा बरं वाटत नाही म्हणाली मग आली इकडंच, आता झोपलिय बेडरुम मध्ये संध्याकाळी फिरुन आल्यावर पर्स इथं हॉलमध्येच टाकली आणि झोपली, उठवु का तिला?’ आता दुसरं कुणी असतं तर नव-याचा फोन आहे म्हणल्यावर उठवलं असतं पण इथं या विचारत होत्या उठवु का? नसते लाड अजुन काय? ’ मी म्हणालो’ नको, अहो नितिनला पण सांगुन नाही आली म्हणुन काळजी वाटत होती जरा, ठीक आहे मी करतो उद्या सकाळी फोन’ असं म्हणुन फोन ठेवुन दिला आणि मग खाली निघालो, लॅपटॉप फोल्ड केल्यानं हायबर्नेट मोड मध्ये गेला होता आणि सकाळपर्यंत बॅटरी संपली असती, पुण्याला गेल्यावर नित्याला सांगुन गुपचुप लॅपटॉप कुणाबरोबर तरी बदलुन घ्यायचा म्हणजे हेम्याचा ससेमिरा सुटेल असा एक साधा विचार केला.
खाली आलो, लॅपटॉप बॅग मध्ये ठेवला, चेन जरा घट्टच बंद केली आणि खोलीत एकटं झोपायला भिती वाटलि म्हणुन बाहेर अंगणात आलो. शकुताई, सुरेखा आणि ज्योती अजुन बसुनच होत्या आणि आता गप्पा नव-याचे दुर्गुण या विषयावर आल्या होत्या. मला पाहुन सुरेखानं विचारलं ’ का व भावजी, लागला का बायकोला फोन.... तुमच्या का न्हाई अजुन?’ मी ’ हो लागला, तिच्या आईकडं गेलीय ती रहायला’ त्यावर सुरेखा म्हणाली ’ ह्ये ब्येस्ट हाय, उठ्लं कि चाल्ले म्हायेरात, शकुवन्सं तुमचं त काय एकाच बिल्डिंगात ना दोन्ही सासर बि म्हायेर बी’ जरा माझं पण टेन्शन जाईल म्हणुन मी बोललो, छे ग, तिचं सासर मोठं आहे बाबा सहा खोल्यांचा महाल आहे तो माहेर काय बाबा ३ खोल्या आहेत फक्त आणि परत स्वताचे घर आहे ४ खोल्यांचं, तालेवार पार्टी आहे तुमची वन्संबाई, काय समजलीस तु?’ आता शकुकडुन परत उलटवार होईल याची अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही, ती गप्पच राहिलि.
मगाच पासुन ज्योती गप्प होति म्हणुन मी तिला विचारलं ’ ज्योती आई बाबा कसे आहेत गं, आणि तुझा भाउ एमपिएससिची परिक्षा देत होता ना काय झालं त्याचं?’ तिला याची अपेक्षा नव्हती त्यामुळं गडबडुन म्हणाली ’ बरि हाय्त, अन दादा एक परिक्षा झालाय पास आता तोंडी का काय ते हाय पुढच्या महिन्यात, ते झालं की मग झालं, त्येचंबी लग्न करायचंय यंदा.’ आपल्या भावाचं लग्न हा प्रत्येक स्त्री साठी अतिशय नाजुक विषय असतो. त्यावर मी काही बोललो नाही.
घड्याळात अडिच वाजले होते, गण्या त्याच्या खोलीतुन बाहेर येत म्हणाला ’ आरं भाडीच्यानो झोपा की आता का उगा दळण चाललंय, अन तु ये काय लहान मोठं समजतय का उगा कुटं बी बसाचंच पदर पाडुन, होय. तिच्यायला स्न्स्कार्च नायेत कुटं, जा चा टाक जरा आणि दोन बिस्किटं टाक त्यात’ असं म्हणुन माझ्याजवळ येउन उभा राहिला. गणु मालक, रात्री अण्णाना सोडायला गेले तेंव्हा थोडी टाकुन आले होते, मला अडचण हीच होती की मला बरोबर नेलं नव्हतं. बरीच वर्षे झाली हातभट्टी घेतली नव्हती आणि आज अनुपण नव्हती. गण्या बोलला ’ नशीब तुज्या घरी न्हाई आणलं हिला अजुन, तिच्यायल तुज्या बायकोला ते रातीला गाउन अन सकाळी घट पॅंट घालुन फिरताना पायलं ना इथं गावाला नाद लावंल तसली कापडं घालुन, ते मागच्यावेळचं तुज्या बायकोनं दिलं ना काय ते बबली ड्रेस घालुन येतिय कधितरी माझ्याबरोबर तर लोकं मला सोडुन हिलाच नमस्कार करत्येत माहिते का तुला ? बस खाली उभा का दावा मांड्ल्यासारखा उगा’
असं बोलुन खाली बसतानाच त्याचं लक्ष गंगेच्या गडुकडं गेलं, अर्धा बसलेला उठत म्हणाला ’ हे का आनलंय इथं, काय झालं आज, ओ रेखा वहिनी बोला की काय झालं हे का आलं देवघराच्या भाईर रातच्याला?’ सुरेखा शांतपणे बोलली ’ नेहमीचंच हळदिकुंकु होतं, जरा नवी माणसं आलीत त्यांना पण परंपरा नको का समजाया घरच्या, समजल्याय का कसं ओ भावजी परंपरा घरच्या’ पुन्हा टेन्शन झालं, आता मात्र पटकन खालि बसत गण्या म्हणाला’ हर्ष्या पह्यिल्या झटदिनी फोन विकुन नविन घे, लै बाराचा हाय ह्यो एकतर सुकाच गेला अन आता सगळ्यांना सुकवायलाय. पोरां-गुरांना उतरवलाय का निस्त्याच गप्पा हाणताय इथं बसुन दोघी बी


Print Page

2 comments:

राष्ट्रार्पण said...

लेख छान आहे. मि पा वर वाचला होता. आपला ब्लॉग पण आवडला.

Anonymous said...

सर्वच भाग आवडले .

Post a Comment