Sunday, May 1, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - ०१


स्टेट ऑफ द आर्ट - ०१

आज जरी मी तुम्हाला पुण्यात दिसत असलो तरी मी खेड्यातलाचं आहे. सोलापुरहुन अक्कलकोट्ला जाताना वळसंग नावाचं गाव आहे तिथला मी.पणजोबा इथं आले बिड-नांदेडकडुन आणि तिथंच सेटल झाले. या सगुण, साकार उंची ५’१०", वजन ७२ कि असणा-या मनुष्य देहाला माझ्या एकुलत्या एका आत्यानं ठेवलेलं नाव आहे हर्षद आज त्याचं हॅरी केलंय माझ्या लेकीच्या मामाच्या एकुलत्या एक बहिणिनं.आणि माडके या आडनावामुळं ऒफिसातले सगळे मला हॅम म्हणतात.

तर, आज मी चाललो आहे गावी, म्हणजे एक अतिशय महत्वाचे काम आहे.पाडव्यानंतर आठवड्यातच आजोबा गेले,आणि त्यानंतर आमचे जवळपासचे आणि लांबचे सगळे नातेवाईक गोळा झाले गेल्या दोन महिन्यात.अगदि बरोबर ओळखलंत. प्रश्न संपत्तीचाच आहे. मी, शकुंतला- माझी बहीण, जग्गनाथ काका, मोरया काकाची मुलं, मायाआत्या आणि बाबांची आत्या. असे, सगळे जण गोळा झाले होते. यापुर्वी जेंव्हा वाटणीचा विषय निघाला तेंव्हा आजोबांनी एका खोलीत बंद करुन घेतलं आणि हजारेंसारखं उपोषण सुरु केलं.

पण आता हे सगळं निस्तरणं भाग होतं, माझी आणि शकुताईची गरज होती, होमलोन प्रिपेमेंट करण्याची, जग्गनाथ काकांचा कर्ता मुलगा दोन वर्षापुर्वी अपघातात गेला, त्यामुळं त्यांना त्यांच्या म्हातारपणाची तरतुद करुन हवी होती. मोरया काकाची मुलं, गेली बरीच वर्षे गावातलं सगळं सांभाळत होती, मायाआत्या दसरा दिवाळीला जाउन येउन होती, आत्याआजी कडं बरीच जुनी कागदपत्रं होती, त्यांची भिती ती बाबा आणि काकांना नेहमीच घालायची, हेच काम तिची मुलं आणि आता नातु पुढं चालवत होते.

हे बघा आलं आमचं गावातलं घर, छे हो वाडा बिडा नाही हा. हेमंत,गणेश आणि मंदारनं बांधलंय हे २ वर्षापुर्वी, त्याच्या बांधकामाच्या वाळु सप्लायरबरोबर भांडुन येतानाच हेमंतला , म्हणजे जग्गनाथकाकाच्या मुलाला अपघात झाला, त्याची बुलेट सरळ धडकली होती ट्रकला का टॅंकरला आणि खेळ खल्लास. त्याचं लग्न ठरलेलं होतं तेंव्हा. नंतर २-३ महिने काका वेड्यागत झाला होता,इथं पुण्यात माझ्याकडंच होता. सुरुवातीला अनुष्कानं थोडि किरकिर केली, पण लांबवरच्या फायद्याची कल्पना दिल्यावर छान केलं माझ्या बायकोनं. मलाच काय तिच्या मम्मीडॅडीना पण कॊतुक वाट्लं.

तर तेच हे घर, गण्या,मंद्यानं आणि हेम्यानं त्यांच्यासाठी एक एक,आजोबांना एक,एक देवघर,एक किचन दोन हॉल आणि पाहुण्यांसाठी म्हणुन ४ अशा मजबुत मोठ्या मोठ्या १२-१३ खोल्या काढल्यात. आमचा भाग तसा दुष्काळीच,पण आमच्या आखाडाच्या विहिरिला पाणि असते कायम. आजोबांनी त्याकाळी सगळ्या प्रथा मोडुन गावच्या ब्राम्हण आणि लिंगायत जंगमांशी भांडुन आजीच्या हातुन विहिरीचं काम सुरु केलं होतं, त्यावेळी आजी ७ महिन्याची गरोदर होती, दोन महिन्यात आत्याचा जन्म आणि विहिरीला पाणि लागणं एकाच दिवशी झालं, तेंव्हा पासुन आजी त्या विहिरिला आपली बहिण मानायची. त्या विहिरिच्या भिंतीत एक कोनाडा आहे,ज्यात एक देविच्या आकाराचा दगड आहे. आजि दररोज तिथंच पहाटे अंधारात आंघोळ करायची,आणि विहिरिची पुजा करुन घरी यायची. दुष्काळी भागात एवढं मोठं घर झालंय ते या विहिरिच्या पाण्याच्या जीवावर, मंदारनं ६ वर्षात एकाचे तीन टॅंकर केलेत ते या आखाडीच्या विहिरीला पाणि आहे म्हणुन.

ज्या संपत्तीबद्दल बोललो ना ती तशी काही फार नाही. आमच्याच गावाच्या शिवारात आमच्या बापजाद्यांनी मिळेल तिथं मिळेल तशी जमिन घेउन ठेवली आहे, म्हणजे एकुण तेरा ठिकाणि मिळुन सतरा एकर जमिन आहे. सगळ्यात मोठा तुकडा, स्वामी मळा, इथं कधी काळी स्वामी समर्थ थांबले होते म्हणे. हा स्वामि मळा सलग ५ एकर आहे , बाकी गावाच्या सगळ्या दिशेला जवळ,लांब,ऒढ्याजवळ, कोरडी अशी सगळ्या प्रकारची जमीन आहे. गावातले लोक म्हणतात, गावात कुणिकडुन पण या माडक्याच्याच जमिनीतुनच यावं लागतंय, ते खरंच आहे’ ह्यात माझ्या बाबांचं काहीच कर्तुत्व नाही, शेवटची जमिन खरेदी केलेली होती आजोबांनी.आखाडाची, २ एकराचं रान ओढ्यापासुन ६ किमी लांब, म्हणुन त्यात काढलेली विहिर. त्या रानात माणसं राबली ती फक्त त्या विहिरीसाठिच, नंतर त्या रानात आम्ही कधी काही लावल्याचं मला तरी आठवत नाही. गवत मात्र जाम यायचं तिथं पण आम्ही काही कसली नाही कधी ती जमीन. मी सातवी नंतर सोलापुरला हरिभाईला आलो आणि डायरेक्ट ड्ब्लुआयटीतुन डिग्री झाल्यावरच परत गावाला गेलो. मग पुण्यात आलो, श्रि मॉड्युलर मध्ये वर्षभर मार्केटिंग केलं, नंतर तिथल्या साहेबाबरोबर दिशा जॉईन केलं, दोन वर्षानी विप्रो आणि आता युनीइन्फो मध्ये  आहे.

विप्रोतला हार्डवेअर मधला सहकारी नितिन माझा मेव्हणा झाला,दोन्ही बाजुनं,  म्हणजे मी अनुष्काच्या, त्याच्या बहिणिच्या प्रेमात पडलो आणि तो शकुंतलेच्या माझ्या बहिणिच्या. एक महिन्याच्या आत दोन्ही लग्नं उरकली. गेल्या वर्षी दोघांनी एमायटि जवळ ओम पॅरेडाईज मध्ये दोन प्लॅट घेतलेत. नितिन पण आता माझ्या बरोबरच आहे आयटि सिस्टिम एडमिन मध्ये.

आज मी आणि शकु दोघंच गावी आलो आहोत. आता दुपारी पंचायत ऒफिसमध्ये जायचं आहे, तलाठी का कोण येणार आहे, मग मोजणी आहे म्हणे शेताची. मग वाटणी संध्याकाळी घरातच होणार आहे. जग्गनाथकाकाचा यात मुख्य भाग असेल. तसं तर गण्या आणि मंद्यापण गावात वजन मिळवुन आहेत. पण काय होतंय ते सांगता येत नाही. कारण अशा वाटण्यात सिनियर सिटिझनच्या मताला फार महत्व देतात असं ऐकलंय. आज मोठा प्रश्न आहे तो आखाडाच्या माळाचा कारण तिथं काही पिकवलं नसलं तरी नवीन हायवे  त्याच्याबाजुनं जाणार अशी चर्चा आहे. आणि त्या विहिरीच्या बाजुला एक मोठं हॉटेल काढलं तर जाम पैसे मिळतील. आज पर्यंत दुर्लक्ष केलेला तो आखाडाचा तुकडा आता महत्वाचा ठरला आहे.


0 comments:

Post a Comment