Monday, May 9, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ३

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ३
लगेच नित्याला फोन लावला.’ नित्या, जाम लोच्या झालाय, अरे मशीन पुर्ण गंडलंय, काही कळत नाही, परवा आलो की डायरेक्ट घरीच येतो, तिथंच काय ते अपडेट वगैरे घेउन ये.’ एका दमात सगळं सांगितलं, त्यावर नित्याच्या एकच प्रश्न ’ **घाल्या, तुला कोणी सांगितलं होतं सरकारी मशीन घेउन जायला, इथं आधीच लफडे झालेत त्यानं, नेमकं तु घेउन गेलास आणि एचोनं इन्वेंटरी मागितली, कसातरी गप बसवलाय त्या रामकुमार चोप्राला आणि त्यात तु हे काहीतरी सांग नविनच,ये लवकर आणि ते काय झालं का मोजणी बिजणी?’
मी बोललो ’हो झालंय सगळं, आता संध्याकाळी बैठक आहे घरीच, आणि तु पण घरीच रहा नाहीतर जाल लगेच अप अ‍ॅंड अबोव करत, मग तुला काही कळायचं नाही मी काय बोलतोय ते, समजलं का आणि मिळणारे पैसे फक्त लोन प्रिपेमेंटला वापरायचेत, नाहीतर इथंच शकुच्या नावानं चांगली दहा वर्षाची एफडी करुन ठेविन.’ माझा आवाज जरा धमकावण्याचाच होता. ’ हां जसं काय तुमचे बंधु बसलेतच नोटा घेउन, झाल्या वाटण्या की घ्या मोजुन इथंच, माझ्याशी बोलल्याशिवाय काहीही फायनल करु नका,’ एवढं बोलुन त्यानं फोन कट केला. मी मनात म्हणलं, एवढं होतं तर यायचं रजा टाकुन, उगा तिथं बसुन ऑनसाईटसारखं गप्पा मारणार फुकाच्या. अजुन एक दोन वेळा लॅपटॉप चालु बंद करुन पाहिला, दरवेळी तेच होत होतं, म्हणुन मग बंदच केला आणि बाहेर आलो.
मंद्याच्या पोरानं हाक मारल्यावर किचनमध्ये आलो, मंद्याच्या बायकोनं भजी,पोहे,सांजा आणि चहा केला होता. शिकलेल्या तशा बेताच्याच पण मंद्या आणि गण्याच्या बायका भारी होत्या. आता बोलु नये असं पण दिसणं,वागणं,बोलणं आणि कामाला पण पुढं, हिशोबात चुक नाही की स्वयंपाकात, त्यामानानं आमचं प्रकरण जरा नाजुकच होतं, एकतर पुण्यात वाढलेलं आणि वडिल पहिल्या पिढीचे संगणक अभियंता, जेंव्हा सॅम पित्रोदा राजीव गांधीना शिकवायचा कॉम्प्युटर तेंव्हा हे दिवसाला ४-५ दुरुस्त करायचे आणि बिघडवायचे इथं पुण्यात. मग नंतर कुठुन तरी तैवानचा एक पत्ता भेटला, तिथं २-३ वर्षे काढली आणि परत आले ते ४ दिवसांत ३ प्लॅट खरेदी करायलाच.
खाउन भाच्या पुतण्यांशी बोलुन जरा बसेपर्यंत गावचे पाटील, जग्गनाथ काका आणि बाकीची मान्यवर मंडळी आली. ज्या हॉलमध्ये बसायचं होतं तिथं सगळी तयारी केली होती. या गर्दीत माझ्या बाजुनं उभं राहील असा एक जग्गनाथ काकाच होता बाकी कुणाशी फार संबंधच ठेवला नव्हता, त्याची कमतरता आता जाणवत होती. नमस्कार चमत्कार झाले, सगळी लोकं बसली. गावात एक रिटायर्ड मामलेदार आहेत ते मुख्य होते बैठकीचे, सरकारी माणुस आयुष्य कायद्यातच गेलेला म्हणुन मान मोठा होता त्यांचा,बिराजदार अण्णा त्यांचं नाव. आजोबांची पण बरीच घसट होती त्यांची.
मी, शकु आणि जग्गनाथ काका एका बाजुला तर गण्या, मंद्या आणि आत्याची मुलं दुस=या बाजुला बसले होते . ’अरे सुकाळिच्यानो, द्युत खेळायला बसला का काय बे, बायका नागवायच्या का काय एकमेकाच्या इथं, बसले समोरासमोर मांड्या उघड्या टाकुन. व्हा एकीकडं. पंच मंडळी बसा एका साईटला आणि जग्गनाथ तु का तिकडं रे, उगा शिंगं मोडुन वासराच्यात, इथं ये माझ्याबाजुला. गावात मी मोठा असलो ना तरी घरात तुच रे. दिवाळी पाड्व्याला तुझ्याच पायाला लागतात की रे हे मंद्या, गण्या आंघोळी करुन, मग लाज नाही वाटत आता त्यांच्यात बसायला जाउन.’ बिराजदार अण्णांचा एवढा दम ऐकुन जग्गनाथकाका मध्ये जाउन बसला आणि आम्ही पण सगळे एका बाजुला झालो आणि जग्गनाथ काकाच बिराजदार अण्णांशी कानडीत काहीतरी बोलणं सुरु झालं.
पुढचे तीन तास्र, बरीच वादावादी, रुसवे,फुगवे आणि पार आई बहिणीवरुन शिव्या देउन झाल्या, अगदी शकु,मायाआत्या समोर असल्यातरी कोणी तोंडं बंद ठेवली नाहीत. शेवटी एक सर्वसंमत तोडगा निघाला. एकुण जमिनिचे जग्गनाथ काका,आत्या.मंद्या,गण्या, मी आणि शकु असे सहा वाटे करायचे ठरले आणि मी, शकु, आत्या तिघंही गावात राहणार नव्हतो त्यामुळं आमच्या वाटच्या जमिनी गण्या व मंद्यानं विकत घ्यायच्या व आम्हाला पैसे देउन मोकळं करायचं ठरलं. आता प्रश्न आला जमिनिच्या किंमतीचा, बाकी सगळ्या जमिनीचे भाग सगळ्यांना मान्य होते, फक्त आखाडाचा सोडुन. मी आणि शकु गावापासुन लांब होतो त्यामुळं आम्ही दोघं अण्णा बिराजदार ज्या रेटला हो म्हणतील त्याला हो म्हणायचं असा सेफ गेम खेळत होतो, जेंव्हा प्रश्न आखाडाचा आला तेंव्हा मात्र जग्गनाथकाकांनी एकदम विरोधी पवित्रा घेतला. तिथुन जाउ घातलेला हायवे आणि विहीरचं पाणि हे दोन फार अवघड मुद्दे होते. पुन्हा बरेच वाद झाले. मग आधी झालेल्या वाटपाचे हिशोब करुन मग पुन्हा आखाडाबद्दल बोलायचं ठरलं,दोन तीन वेळा चहा झाला होता त्यामुळं बरीच जण जाउन मोकळं होवुन आले.
मी परत येउन पाह्तो तर शकु माझा लॅपटॉप घेउन बसली होती ते बघुन मी ओरडलोच ’ ए बये ते का आणलंयस इथं, आधीच बिघडलंय ते’ शकु म्हणाली ’ अरे एवढे हिशोब काय हाताने करणार आहेस, सत्तावीसचा सोड सहाचा तरी पाढा पाठ आहे का तुला?, मी तसाच पुढं जाउन लॅपटॉप घेतला, लॉगईन विंडो पर्यंत येउन थांबलं होतं, आता सेफ शटडाउन करायचं तरी लॉगईन करणं भाग होतं, ते केलं आणि सगळं व्यवस्थित चालु झालं, अर्धा जीव भांड्यात पडला, २-३ मिनिटं वाट पाहिली, विचित्र काही झालं नाही. मग एक्सेल चालु केलं, समोरचे जमिन हिशोबाचे कागद घेउन नव्या फाईलमध्ये डिटेल टाकले, सवयीने १० मिनिटात सगळे फॉर्म्युला टाकुन एक फायनल शीट तयार झाली. आता फक्त जमिनिचे रेट टाकले की लगेच सगळ्यांचे किती पैसे किती जमिनी सगळं लगेच समोर येणार होतं,
’ अरे हर्षद, दाखव रे काय करतोस रे, माझ्या पुतण्याकडं पण आहे असला कांट्युपर, तो दाखवत असतो सिद्धीविनायक, साईबाबा वगैरे’ अण्णांचा आवाजा आल्यावर त्यांच्याकडं गेलो, त्यांना दाखवलं काय केलंय ते. माणुस सरकारीच,हिशोव म्हणले की कागदावर असु देत का स्क्रिनवर लगेच समजुन घेतले आणि हसुन माझ्या पाठीवर थाप मारली ’बेस्ट, एवढं शिकल्याच्या घराला काहीतरी उपयोग झाला आज’ असं म्हणुन माझ्या शिक्षणाची इज्जतच काढली. मी तिथंच बाजुला बसुन राहिलो. सगळे आल्यावर अण्णांनी फक्त महत्वाच्या माणसांनाच बसायला सांगितलं’ इथुन पुढं पैशाची बोलणी आहेत,उगा गावगप्पा नाहीत, जे पैसे देणार आहेत का घेणार आहेत ते आणि २ पंच एवढेच इथं थांबा, बाकीचे निघा गप घराकडं’, अण्णांचा आवाज ऐकुन बरीच मंडळी निघुन गेली, त्यात मंद्या आणि गण्याचे दोन तीन मित्र होते, ते गेल्यानं मला खुप बरं वाटलं. आता सगळे जवळ जवळ बसलो होतो. मंद्या कागदावर आणि मी लॅपटॉपवर एक एक रेट टाकत होतो. पहिला रेट टाकला रु. दिड लाख एकर, दुसरा अडीच लाख असं करत करत १२ जमिनींचे रेट टाकुन झाले फक्त आखाड उरला होता. एवढ्यांचा हिशोब केला, माझ्या आणि मंद्याच्या हिशोबाला जेवढा वेळ लागला तेवढाच जास्त फरक रकमेत होता. मंद्यानं सांगितलेले आकडे ऐकुन मी चिडलोच कारण स्क्रिनवर दिसणारे आकडे फार जास्त होते. जग्गनाथकाकांनी मंद्याच्या हिशोब तपासला, बरोबर होता. मी शकुला बोलावलं तिनं पुन्हा एकदा पाहिलं तर सगळीकडे रेट मध्येच फरक होता. मी थोडा खजील झालो आणि पुन्हा एकदा रेट टाकायला सुरुवात केली, रेट टाकला की बदलायचा म्हणुन पुन्हा सगळ्या सेल चेक केल्या, तरी तेच. मग सगळे डिटेल्स दुस-या शीटवर, दुस-या फाईलमध्ये टाकुन पाहिले तरी तेच होत होतं.
शेवटी मी पण कागदावरचे हिशोब चेक करायला सुरुवात केली. थोडा ताण दिल्यावर सगळं आठवलं गणित आणि दहा मिनिटात जमलं देखील. तरी पुन्हा एकदा चेक करावं म्हणुन लॅपटॉप हातात घेतला तर एक कम्युनिकेटर विंडो उघडलेली होती आणि त्यात इंग्लिश मध्ये मराठी टाईप केलेला मेसेज होता ’ jaminike ret far kami sangatahet doghe aani to bhadkhvu anna pan tynna samil aahe, phasu nakos ' (जमिनिचे रेट फार कमी सांगताहेत दोघं आणि तो भाडखाउ अण्णा पण त्यांना सामील आहे . फसु नकोस’) इथं तर नेट नव्हतं त्यामुळं नितिननं पिंग करणं शक्यच नव्हतं मग हे कोण आहे पिंग करणारं, लॅपटॉप खाली ठेवुन काही दिसेना म्हणुन वर उचलुन घेतला आणि जवळुन पाहिलं. कम्युनिकेटरला लॉग इन केलेलं होतं - एच माडके आणि बाजुला फोटो होता.......................... हेम्याचा.
Print Page

0 comments:

Post a Comment