Monday, December 6, 2010

बहरला पारिजात दारी...

सत्यभामा राजवाड्याच्या गच्चीवर उभी होती , सकाळची सगळी कामं झाली, पुजा, नॆवेद्य वगॆरे, आज सगळं अगदी वेळेत झालं त्यामुळं मन कसं प्रसन्न होतं. बाहेर नुकताच हिवाळा सुरु होवुन काही काळ लोटल्यानं येणारा थोडासा निवांतपणा होता. किंचित धुकं आणि त्यातच द्वारकेतल्या घराघरातुन येणा-या धुरामुळे निर्माण होणारी तरल चित्रं पाहता पाह्ता अचानकच तिची नजर त्याच्याकडे गेली.

जेंव्हा हे एकदा स्वर्गातुन परत येताना याच्या फुलांची माळ घालुन आले होते, तेंव्हा पासुन माझं मन त्याच्या साठी फार झुरत होतं. नंतर एक दोन वेळा यांच्याकडे विषय काढला, पण छे आमचं कोणि ऎकेल तर शपथ. मग मी पण शेवटचं अस्त्र उचललं. त्या दिवशी स्वारी महालात आल्यावर पद्स्पर्श केला आणि आत निघुन आले. हे आलेच मागे मागे, आणि मग चांगले प्रहर दोन प्रहर समजावत होते, पण मी सुद्धा काही कमी नाही, एक शब्द बोलले नाही. पण काय सांगु अस्सा मनकवडा स्वभाव आहे म्हणुन सांगु यांचा. काही म्हणजे काही लपवता येत नाही मलातरी यांच्यापासुन. पण त्या दिवशी कबुल करुनच घेतलं मी सुद्धा.

काही दिवसांतच ज्यावर स्वर्गलोक फार मिजास करत होता, तो होय तोच तो पारिजात आमच्या, म्हणजे माझ्या अंगणात वाढु लागला. त्याला मी स्थान पण असं दिलं होतं की मुद्दाम तिला दिसावं की पारिजात स्वर्गानंतर फक्त माझ्याकडेच आहे, बाकी कुठेच नाही. पण जसा जसा तो वाढला आणि फुलु लागला काहि तरी वेगळंच व्हायला लागलं..

बहरला पारिजात दारी...
फुले का पडती शेजारी...

प्रेम असल्याशिवाय का कोणि हे असलं वेडं साहस करेल का ? सांगा ना, प्रत्यक्ष देवाधिदेव ईंद्राच्या उद्यानातुन त्याचाच अतिप्रिय व्रुक्ष घेउन यायचा हे काय साधं सुधं काम नव्हे.आता लोक काय म्हणायचे ते म्हणुदेत पण तरी ही यांचं प्रेम माझ्यावरच जास्त आहे. सगळे द्वारकावासी जरी तिला मोठी म्हणत असले तरी मला काही नाही, कारण यांचा जेवढा माझ्यावर जिव आहे, तेवढा कुणावरच नाही. पण कधि तरी संध्याकाळी मनांत आषाढ घनांसारखं मळभ दाटुन येतं आणि मनांत खोलवर झालेला घाव पुन्हा टोचायला लागतो. कधि तरी कॊमुदिनी चेष्टेत मला म्हणते, आता उठावं पट्टराणि आणि मग वाटतं हा राजवाडा, हा संसार, ही संपत्ती आणि त्यावर मुकुट्मणि असा हा पारिजात हे सगळं माझं तरी पण तिच का पट्टराणी, मी का नाही?

माझ्यावरती त्यांची प्रिती...
पट्टराणी जन तिजसी म्हणती...
दुख: हे भरल्या संसारी....

कधी कधी यांच्या लहानपणाच्या गोष्टी सांगतात ना यशोदाआई की हे म्हणे त्यांना चिडवायचे, दहि लोण्यासाठी खोटं बोलायचे. गोकुळांत जवळपास सगळ्या घरांत दुध, दहि आणि लोणि चोरुन झालं होतं. पण म्हणे गवळणी तक्रार घेउन आल्या की त्यांच्या नाही तर बलरामभावोजींच्या मागे लपुन राहायचे. अगदी  अस्सा साळसुदपणाचा आव आणायचे की आलेल्या गवळणीपण तक्रार सोडुन यांचं कॊतुक करायच्या. अरे हो अजुन सुद्धा हे तसेच करतात की काय, म्हणजे बघा मी समोर दिसले की मी सुंदर, जवळची , प्रेमाची आणि बोलणं तर अस्सं गोड की बस्स. या गोड गोड बोलण्यांत मला फसवत तर नाहीत ना ? माझ्यावर प्रेमाचं नाटक तर करीत नाहीत ना? मी पण तशी थोडी भोळसट्च आहे. ह्यांच्या थोड्याश्या गोड बोलण्याला सुद्धा भुलुन जाते, नको आता या पुढे हे असं होवु द्यायचं नाही असं नेहमी बजावते मनाला.पण काय हे समोर दिसले की सगळे संकल्प संपतात.
असेल का हे नाटक यांचे ...
मज वेडीला फसवायचे...
कपट का करिती चक्रधारी...

ते सगळं असेल तसं असु दे आता ह्यांच्या मागे लागुन हट्टाने मी हा पारिजात आणुन माझ्या अंगणात लावला, तो बहरला, चांगला फुलांनी लगडला, सगळं माझ्या मनासारखं झालं होतं. द्वारकावासी काय माझ्यापेक्षा तिला जास्त मान देतात ते पण मी सहन करते आहे, ह्यांची तिच्यावर जास्त माया आहे, असेल.पण आता तर हे काय बाई हद्दच झाली अन्यायाची, कित्ती म्हणुन सहन करायचं माणसानं. आपली माणसं तर बाजु बदलतातच पण आता या निसर्गानं सुद्धा तिचीच बाजु उचलुन धरावी. पारिजात आणवला मी, लावला माझ्या अंगणात, वाढवला मी, फुलवला मी एवढेच काय या वा-याला मी त्या फुलांचा स्वर्गीय सुगंध त्याच्या अंगाखांद्यावर खेळवायला दिला तर हा क्रुतघ्न सगळी फुलंच तिच्या अंगणात नेउन टाकतो.


का वारा ही जगासारखा...
तिचाच झाला पाठीराखा...
वाहतो दॊलत तिज सारी...

बहरला पारिजात दारी...
फुले का पडती शेजारी...


हर्षद.

2 comments:

Anonymous said...

Sahi.......... Kuthun suchte etake chhan lihayala...

harshad said...

hi anonymous, thanks for the comment and keep visiting back, i update the blog weekly.
harshad.

Post a Comment