Monday, June 25, 2012

क क कपलचा - ०२क क कपलचा - ०२


प्रीती मधली पार्टी संपवुन हर्षद क्वार्टरवर आला, 'क्वार्टर चढवुन क्वार्टरवर येणे' अशी एक निरर्थक कोटी तो नेहमी करायचा, आईचं शिक्षिका असणं हे यामागचं एक कारण होतं, त्याचा अन साहित्याचा तेवढा एकच संबंध होता बाकी त्याचं आयुष्य निरस होतं म्हणलं तरी चालेल, किंवा तो तरी म्हणायचा. त्याला दारु पिताना सुद्धा पंकज उदास वगैरे काही लागयचं नाही, हां लसुण शेव फार गरजेची गोष्ट आहे असं त्याचं स्पष्ट मत होतं. दाराचं कुलुप काढुन त्यानं समोरच्या खोलीतच ठेवलेल्या सिंगल बेडवर अंग टाकलं अन छताकडं पाहता पाहता त्याला अनुजा, त्याची बायको आठवली. लग्न होउन महिना होउन गेला होता. देव देव आटोपुन हनिमुनला गेला होता तेंव्हाच्या गोष्टी त्याला आठवायला लागल्या. लग्न झाल्यापासुन हे एक नविनच होत होतं, दारु पिल्यावर सुद्धा ब-याच गोष्टी आठवायच्या, नाहीतर आधी लगेच झोप लागायची. थोडा वेळ छतावर अनुजाचा चेहरा बघुन झाल्यावर तो उठला अन आत किचनमध्ये जाउन बेसिन मध्ये तोंड धुतलं. 

उद्या सुट्टी घेतली होती, कारण क्वार्टर बदलायची होती. ह्या वन रुम किचन मधुन वन बेडरुम किचन मध्ये सगळं सामान शिफ्ट करायचं होतं. सकाळी आठच्या सुमारास टेंपो येणार होता, त्याआधी पुन्हा एकदा त्यानं सगळी पॅकिंग चेक करुन घेतली. महत्त्वाचं सामान आजच नेउन टाकलं होतं. लग्नातलं रुखवतातलं सामान डायरेक्ट तिकडंच नेउन ठेवलं होतं. आता उरलं होतं गेली दोन - तीन वर्षे त्याला सोबत करणारं बॅचलरातलं सामान.


तोंड धुवुन सामान आवरुन सुद्धा तीनच वाजले होते, आता झोपणं भाग होतं, उद्याचा दिवस सगळा घर लावण्यात जाणार होता, आणि संध्याकाळी अनुजा येणार होती तिला घ्यायला  जायचं होतं. पुन्हा तिच्या विचारानं त्याचं डोकं चढलं, सगळं अंग थरथरलं. उगाचच या अंगावरुन त्या अंगावर होता होता त्यानं स्वतालाच मिठित घेतलं, दोन्ही पंजे आपल्याच पाठीवर दाबुन अंगाखालच्या उशीवर चेहरा घासायला लागला, उशीवरचा त्याचा कान त्यालाच गरम लागत होता. तशीच कधीतरी त्याला झोप लागली. सकाळी जाग आली ती शरदच्या फोनमुळं, शरद त्याचा जोडीदार आणि सध्या ट्रॅफिकला चिंबोरीतच होता. सामान हलवायला टेंपो आणि माणसं तोच आणणार होता.  त्याला यायला अर्धा तास होता, आंघोळ करणं भागच होतं म्हणुन त्यानं आवरलं, अंदरकी बात बाहेर समजु नये म्हणुन सरळ कपडे एका प्लॅस्टिकच्या बॅगेत भरले आणि वाट पहात बसला. 

माणुस जिथं राहतो मग ते एक दिवस असेना का आयुष्यभर त्या जागेची एक ओढ लागते, हर्षदला आता तेच जाणवत होतं, किचनच्या खिडकितुन दिसणारी मागची डोंगररांग अन हल्लीच त्यावर सुरु झालेलं हॉटेल पाहताना त्याला एकदा वाटलं की आता पुन्हा ही मोकळी हवा मिळेल का नाही कुणास ठाउक. डिपार्ट्मेंटचे फॅमिली क्वार्टर म्हणजे अगदीच खुराडी होती, कुण्या बिल्डरनं सरकारी कोट्यातुन बांधुन दिलेल्या त्या इमारती, बाहेरुनच इतक्या वाईट दिसायच्या की विचारता सोय नव्हती आणि मॉडर्न डिझायनच्या नावाखाली बिल्डरनं बाकी साईट्वर उरलेलं मटेरियल तिथं खपवलं होतं, पण आता उपाय नव्हता.

साडेआठला शरद टेंपो घेउन आला आणि तो ड्रायव्हर आणि सहा पोरं हर्षदच्या ताब्यात देउन ड्युटीला निघुन गेला. साडेअनउ ते दिड वाजेपर्यंत दोन ट्रिप झाल्या, सामान घरात उतरवुन टेंपो निघुन गेला, आणि सामान लावायला जेवण करुन येतो म्हणुन ती सहा पोरं पण गायब झाली, हर्षद पुन्हा सकाळच्याच सिन मध्ये आला, हे एवढं मोठं सामान पडलेलं आणि मध्ये तो. भुक त्याला पण लागली होती पण बाहेर पडायचा प्रचंड कंटाळा आला होता, घर हलवलं हे सांगायला  त्यानं फोन  लावला अनुजाला, चार वेळा एंगेज. मग शेवटी आईला फोन लावला, सगळं कसं कसं झालं सांगितलं, त्याचं बोलणं होईपर्यंत अनुजाचा  बारा वेळा कॉल येउन गेला. यानं काही  रिटर्न कॉल केला नाही, फक्त एसेमेस - हाउस शिफेट्ड नाउ,थँक्स. आता सहापैकी दोनच पोरं परत आली, मग त्या दोघांना शिव्या घातल्या.

 त्याचा आवाज खाली उतरेपर्यंतच दरवाज्यात बहुधा शेजारच्या घरात राहणा-या काकु येउन उभ्या राहिल्या. अंगावरच्या साडी अन दागिने पाहुन गेला बाजार सौ. एपिआय तरी असणार असा विचार करुन तोंड बंद् करुन हर्षदनं नमस्कार केला.'जेवणाची काय सोय केली?' - काकुंचा थेट प्रश्न. नाव वगैरे काही न विचारता आलेल्या ह्या प्रश्नानं तो बावचळला. ' अं हं, नाही आता चाललोच आहे आता, हे आलेत लावतील सामान'. त्याच्या उत्तरानं काकुंचं समाधान झालं नाही, ' थांबा, सामान यांच्या जीवावर टाकुन कुठं जाताय ?' मी ताट आणुन देते, का येताय आमच्याबरोबरच मी आणि कांचन बसतोय आता?' हो म्हणावं का नाही हा पेच हा हर्षदच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला होता, पहिल्यांदा लाच घेताना, अनुजाला पसंती कळवताना आणि हनिमुनच्या काही प्रसंगात तर हा घटक फार बेक्कार अवघड करुन गेला होता. ' नाही नाही, उगा तुम्हाला का त्रास, असु दे, माझा नाष्टा झालाय सकाळीच मजबुत' कसंतरी उत्तर दिलं अन चेहरा ह्सरा केला. ' नाष्टा झालाय ना, मग ठीक आहे आणि त्रास काही नाही, आमची मेस आहे, एखादा मेंबर नसतो एखादं दिवशी मग उगा वाया जातं ' एवढं बोलुन काकु निघुन गेल्या.


सगळं सामान जागच्या जागी ठेवायला सहा वाजले, दोन्ही पोरं निघुन गेली आणि मग नव्या घराला कुलुप लावुन हर्षद बाहेर पडला. शेजारच्या घरावरची पाटी पाहिली श्री. श्.दि. निकाळजे सि.कॉ. एवढंच लिहिलेलं. म्हणजे दुपारी पाहिलेले दागिने हे त्या मेसचा आशीर्वाद होता, आणि ते देखील खरे होते का कसे काय माहित. खाली उतरुन बाहेर आला, ही जागा चिंबोरीच्या एकदम हार्ट ऑफ् दी सिटीत होती, कंपाउंड्ला लागुनच रिक्षा स्टँड, उजव्या बाजुला एक मिनि शॉपिंग सेंटर जिथं बरंच किंवा बहुतेक सगळंच मिळायचं, तर डाव्या बाजुला फुटपाथवरच भरणारा  भाजी आणि मासळी बाजार होता. बॅचलर क्वार्टर या बाबतीत फार छान होती असं त्याला उगाचच वाटलं. तरी बाहेर पडल्यावर येणा-या गाड्या माणसांच्या आवाजाला सरावुन घेण्याचं ठरवत, रिक्षा पकडुन भद्रा सन्स च्या सर्विस सेंटरला आला, चिठ्ठी दाखवुन पैसे देउन आपली पल्सार घेतली, यावेळी गाडीला  पॉलिश करुन घेतल्यानं मस्त फिल होता.

ऑइल बदलल्यानं इंजिन सुद्धा एकदम  स्मुथ झालं होतं, त्याला उगाचच दर पंधरा दिवसाला गावाकडं जाउन ऑइंलिंग करुन येतो म्हणणा-या शरदची आठवण झाली, आता अ‍ॅडजेस्ट करुन थोडं मागं सरकावं लागलं नाहीतर तो एवढं मागं कधी बसायचा नाही. थेट सांदवी फाट्याचा स्टुडिओ धाबा येईपर्यंत गाडी तीस ते एकशे दहा सगळ्या रेंजमध्ये चालवुन झाली होती.
 
आज पंचवीस  तारीख, उद्यापासुन सहा दिवस उरले चिंबोरी स्टेशनला. एक तारखेपासुन थेट कोर्टात ड्युटी  बदली मिळाली होती. लग्नानंतर तरी काही माहिने त्याला दहा ते पाच ड्युटी हवी होती. धाब्यावरच्या पोराला दोन रोटी अन दाळ फ्राय आणायला सांगुन त्यानं निवांत ताणुन दिली. आता वर आभाळातल्या ढगात पण त्याला अनुजाची फिगर दिसायला लागली, लगेच पुन्हा फोन केला. यावेळी तिचं नशीब चांगलं होतं, मग अर्धा तास एकदा इकडुन एकद तिकडुन सॉरी, झालं का, हो, नाही ,उद्या असा फोन झाला. धाब्यावरचं पोरगं पण त्याचा फोन अन चेहरा बघुन गालातल्या गालात हसत होतं.

शेवटी फोन ठेवल्यावर त्यानं जेवण आणुन दिलं. पटकन जेवण संपवुन निघाला, ते थेट गोल चौकातल्या नव्या मॉल मध्ये आला. खरंतर त्याला बाहेरच्या खिडकित दिसणारे झिरझ्रिरते गाउन घ्यायचे होते, पण पुन्हा तोच हो का नाही हा पेच उभा राहिला, बराच वेळ तो तिथल्या चार पुतळ्यांपैकी नक्की कोणत्या पुतळ्यासारखं अनुजाचं अंग आहे याचा हिशोब लावत होता. शेवटी एवढ्या मोठ्या ट्रॉलीत काहीतरी घ्यायचं म्हणुन दोन डिओ, एक बेडशीट जोड,  पाच मॅगीचे पुडे, हे अनुजानं सांगितले म्हणुन, एवढं घेउन निघाला. पण ज्यासाठी तो इथं आला होता त्याला हात घालायची त्याची अजुन हिंमत होत नव्हती. ओटिसि मेडिकलच्या काउंटरसमोरुन दोन तीन  फे-या मारुन झाल्यावर तिथल्या पोरानंच त्याचा अंदाज घेत त्याला विचारलं 'काय हवंय साहेब ?'
एवढ्या मोठ्या जागेत, ह्या पोराला सांगायचं कसं काय हवंय ते आणि ते पण मागं काउंटरवर एक पोरगी उभी असताना हा त्याला प्रश्न पडला, तो इकडं तिकडं पाहतोय हे लक्षात घेउन तो पोरगा त्याला मागच्या रॅककडं घेउन गेला, 'साहेब, फक्त इथले पॅक रिकामे आहेत, तुमचं झालं की मला सांगा,आणि हे काही स्पेशल ऑफर पण आहेत ते पण बघा' एवढं बोलुन हर्षदच्या हातात चार दोन गुळगुळीत जाहिराती दाबुन तिथुन निघुन गेला.


Print Page

0 comments:

Post a Comment