Sunday, June 17, 2012


क क कपलचा .....


बाकी लोकं चिंबोरीतुन बदली झाली की शक्य ते सर्व प्रयत्न करायचे ती टाळायचे, अगदी काहीही म्हणजे माझ्या आईची ट्रिटमेंट जवळच्या शामताबेन हॉस्पिटलमध्ये आहे तरी माझी बदली करु नये, अशी काहीही कारणे असायची त्या अर्जात, हर्षद्ला असे अर्ज घेतानाच काय पण आत साहेबांना नेउन देताना सुद्धा हसु आवरायचं नाही, पण ८-१० दिवसांत असेच अर्ज विनंती मंजुर होउन परत यायचे तेंव्हा आश्चर्य देखिल वाटायचं.
आज त्याच चिंबोरी पोलिस स्टेशनात हर्षदचा शेवटचा दिवस होता ३० एप्रिल , तो इथं आला तीन वर्षापुर्वी. सोलापुरात ९ वर्षांनी पोलिस भरती झालेली त्यात नशिबानं अन, वडिलांच्या ज्या वरकमाईचा त्याला एकेकाळी राग होता, त्या वरकमाईचा यथोचित उपयोग तो डिपार्ट्मेंटला जॉइन झाला. सोने पे सुहागा का काय तसं, त्याला पहिलीच रायटरची पोस्ट मिळाली चिंबोरीला. हे मात्र फक्त भाग्यातच असावं लागतं. पहिल्या दिवसापासुन चिंबोरीतला प्रत्येक जण त्याच्या नशिबाची तारीफ करायचा. प्रत्येकवेळी तो सुखावुन जायचा, दोन महिन्यात त्याला या कौतुकाची सवय झाली अन त्यामागची भावना पण समजुन यायला लागली. मग सहा महिन्यात तो सरावला, पुढं वर्षभरात स्थिरावला आणि तीन वर्षात दुणावला. अंगानं आणि पैशानं दोन्ही बाजुनं.
जानेवारीत लग्न ठरलं तेंव्हाच त्यानं सोनवणे साहेबांकडं बदलीसाठी अर्ज केला होता, कारण दिलं होतं पालकांच्या तब्येतीचं, अर्थात ते कागदावर लिहिलेलं. सोनवणेंच्या घरी गेल्यावर त्यानं स्पष्ट सांगितलं होतं ' साहेब, दोन अडीच वर्षात बरेच भले बुरे संबंध निर्माण झालेत, लग्न झाल्या झाल्या इथं नकोय आणायला मला बायकोला ' सोनवणे पाच मिनिटं डोळे मिटुन बसले आणि मग त्याला म्हणाले ' हर्षदराव, हे आपलं डिपार्टेमेंट आहेच असं *****, तिज्यायला यातुन मिळणारी सगळी ऐश पाहिजे बायकोला, पोराला पण ह्याच्या घाणीचा वास नको घरात घुसायला. तुला काय वाटतं, चिबोरी सोडलंस म्हणजे या सगळ्यापासुन दुर जाशील, हा वास जाईल का युनिफॉर्मचा , ** नाही जात, साला ही वर्दी अंगावरुन उतरवलीस ना तरी तिची मस्ती , तिचा माज डोक्यातुन कधीच नाही जाणार लिहुन ठेव , साला फुकणीचा रायटर कुठला , जा बोलतो मी त्या हराम्याशी, पाकिट मात्र तयार ठेव, ज्या दिवशी हो म्हणेल त्या दिवशीच डिल सोडवायचं, रात्र गेली की काही आठवत नाही इथं कुणाला. '
सोनवणेंनी काम केलं, अर्थात तिथंही डबल गेम केलाच, जो येणार होता त्याच्याकडनं पण पैसे घेतलेच होते. हर्षदला एवढ्याच गोष्टीचं बरं वाटलं की लग्नात स्टेशनच्या लोकांनी ४ तो़ळ्याच्या अंगठ्या दिल्या दोघांना पण आणि गेलेले थोडे वसुल झाले. आज रात्री प्रिती मध्ये पार्टी होती सेंडऑफची. त्याच्या तयारिसाठी त्यानं आपला आयफोन काढला अन महेश मांढरेना फोन लावला. ' नमस्कार, स्टँडिंग कमिटि मेंबर साहेब'...
क्रमशः


Print Page

1 comments:

pon said...

Amazing the visit was worth…
puneonnet.com

Post a Comment