Wednesday, October 19, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग १५ - अंतिम.


आज ऑफिस करुन घरी आलो, पांढरी पँट घालुन मिटिंगला जायची तयारी केली. अनुनं आज हे सगळं संपवुन आलास तर बरं नाहीतर..... अशी धमकी दिली होती. नित्याला फोन करुन कळवलं, काही कमी जास्त झालं तर त्याला निदान ते हॉटेल तरी माहित होतं. कोरेगाव पार्कात पोहोचायला तब्बल एक तास गेला. हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी लावली तोच बाजुच्या ड्रायव्हरनं टेबल नंबर सांगितला अन निघुन गेला. वर रेस्टाँरंट मध्ये आलो, टेबल नंबरची तशी गरज नव्हतीच. एवढे सगळे पांढरे कपडे घातलेले लोक त्या अंधा-या जागेत लगेच समजले असते, तरी पण कॅप्टनला टेबल नंबर दिला, आज पाहिलं तर त्या टेबलवर सगळे फॅन्सी ड्रेस घालुन आलेले होते, तो सदगृहुस्थ आणि आयटम दोघेच जण. पहिल्यावेळेप्रमाणे टॅब बदलुन झाले, जेंव्हा माझा टॅब माझ्याकडे आला तेंव्हा त्यावर एक वर्ड फाईल होती. त्यात मी जे केलं होतं १५ लाखांसाठी ते डबलगेम आहे हे समजण्यात आलं होतं आणि या चुकीबद्दल मला या नेटवर्क मधुन बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं. हे सगळं वाचुन मला तो टॅब आणि सगळी सिमकार्ड त्यांना परत करायचं होतं आणि झाल्या प्रकाराबद्दल गप्प राहायचं होतं, विसरुन जायचं होतं. थोडक्यात ते चंपा - चमेली ही लॉयल्टी टेस्ट होती ज्यात मी अडकायला नको होतं.
मी गप्प राहणं मान्य जरी केलं तरी ही लोकं मला फॉलो करणार आणि माझ्यावर नजर ठेवणार हे नक्की होतं. हे सगळं मी मान्य करुन टॅब परत द्यायचा होता, आता माझ्या मनात एकामागुन एक वादळं येत होती. ज्यासाठी हे सुरु केलं ते पुर्ण झालं होतं, उद्या पैसे देउन कागदपत्रं झाली की हेम्या मोकळा होणार होता, उरलेल्या पैशातुन होम लोन फिटणार होतं. तसं पाहता आता मला या नेटवर्कची, या टेनश्नची काही गरज नव्हती, पण गरज आणि हाव या दोन वेगळ्या गोष्टी असतात, ज्यांच्यात फरक करणारा मनुष्य फार मोठा असावा लागतो.
आणि त्यामुळंच मी आज खरंच डबल गेम खेळलो होतो, आज दुपारी मी ब-याच विनवण्या आणि धमक्या यांचा वापर करुन हेम्याला लॅपटॉप मधुन टॅब मध्ये आणला होता, तो टॅबमधल्या मेमरी कार्डमध्ये होता आता, अन ज्यावेळी हे टॅब बदलाबदली झाली तेंव्हा माझ्या टॅब मधलं मेमरी कार्ड फॉर्मट करण्यासाठी त्या आयटमच्या टॅब मध्ये घातलेलं होतं, एवढ्या दिवसात हेम्याला कट पेस्ट अन कॉपि पेस्ट मधला फरक समजला होता, जेंव्हा टॅब माझ्याकडे परत आला तेंव्हा त्याच्या मेमरी कार्डमध्ये ४ जिबी डाटा होता, आणि मी वेळ काढत होतो कारण तो डाटा मी अपलोड करत होतो एका ठिकाणी, हे हेम्यानं केलं असतं तर लगेच झालं असतं, पण सध्या मी इथं असलेल्या आयडियाच्या रेंजवर अबलंवुन होतो, अजुन ६-७ मिनिटं लागणार होती, जी माझ्या साठी अतिशय महत्वाची होती. एकदा हे पार पडलं की मी मोकळा होणार होतो, या पार्टीची काही माहिती मला मिळणार होती, ती वापरुन पैसे कसे कमवायचे हे जरी नक्की नसलं तरी किमान माझ्या अन माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी मी ती निश्चीत वापरु शकणार होतो, आणि त्या पेक्षा महत्वाचं ज्याची मी कल्पनाच केली नव्हती ते इथं होत होतं......
पण एकच मिनिट इथं तर माझा डबल गेम ट्रिपल होत होता, मी मनातल्या मनात गांगुली सारखा शर्ट फड्कावत होतो, एक मी या लफड्यातुन बाहेर पडत होतो, बाहेर पडलो तरी माझं संरक्षण करण्याची सगळी सोय करुन आणि तिसरा आणि इथं झालेला अनपेक्षित फायदा म्हणजे, मला तो टॅब, सिमकार्ड, मेमरी कार्ड परत द्यायचं होतं आणि त्याबरोबर एकदम बेस्ट गोष्ट होत होती, या सगळ्याचं मुळ म्हणजे हेम्या काहीही न करता त्या मेमरी कार्ड बरोबर निघुन जाणार होता. खरंतर मला इथं त्या खालच्या डान्सफ्लोअरवर जाउन नाचावंसं वाटत होतं. त्या दोघांची चुळबुळ वाढत होती, मी टॅबवर एवढा वेळ काहीतरी करतो आहे हे त्यांच्या लक्षात येत होतं, आणि एक छोटीशी खोच मला आता लक्षात आली ती त्या टॅबवरचा डाटा ट्रान्सफरचा छोटा एलइडि लुकलुकत होता, आता मात्र मी नेहमीसारखा घाबरलो, तिथल्या अंधारात हे लक्षात येणं सहज शक्य होतं. पण आयडियाच्या कृपेनं तसं काही व्हायच्या आत ते संपलं, मी टॅब बंद केला, डाटा त्या कार्डात कसा आला हे कुणालाच कळणार नसल्यानं मला काही घेणं देणं नव्हतं. पुन्हा टॅबची अदलाबदली झाली. त्या गृहुस्थाकडं दोन तर आयटम कडं एक टॅब गेला, दोघंही उठुन निघुन गेले,
वेटरनं बिल आणुन ठेवलं आणि माझे डोळे पांढरे झाले, ही लोकं इथं गेले ३ दिवस राहात होती त्याचं बिल पण माझ्याच बोकांडी मारलं होतं. दोन रुम तिन दिवस, त्या तीन दिवसांचं खाणं पिणं वगैरे धरुन एकुण ४२०००/- बिल झालेलं होतं, माझ्या मोबाईलचा प्लॅश चालु करुन मी बिल पाहिलं, ही लोकं पाण्याऐवजी शँपेनच पित असावीत असं वाटलं, पण पर्याय काहीच नव्हता अन माझ्या अकाउंटला तेवढे पैसे पण नव्हते, शेवटी त्या मॅनेजरला कसं बसं पटवुन एक डेबिट कार्ड अन दोन क्रेडिट कार्ड वापरुन बिल चुकतं करुन घरी आलो.
दुस-या दिवशी पहाटे निघुन गावाला जायचं होतं, सुरेखाचे ७-८ फोन येउन गेले होते, तिची कागदपत्रं तयार झाली असावीत. नित्याला आणि शकुताईला रात्री इकडंच झोपायला बोलावलं होतं, उद्या जायचं असल्यानं अनुनं काही स्वयंपाक केलेला नव्हता, मग सगळेजण पालवी मध्ये जेवायला गेलो, जेवण करुन मग दुर्गा मध्ये कोल्ड कॉफी पिउन घरी आलो.
पाड्व्यानंतर गावाला जाउन आलो, त्या दिवसापासुन जी झोप उडाली होती ती आज पुन्हा निवांत लागेल असं वाटत होतं, पण कुठलं काय पुन्हा डोक्यात विचार फेर धरुन नाचतच होते, जे केलं ते बरोबर होतं का ? मी हेम्याचा विश्वासघात केला होता का? मी जे केलं ते हेम्यानं केलेल्या विश्वासघाताची परतफेड होती ? का ती तर मंद्यानं त्याला उडवुन ती केलेली होतीच ? , तसं असेल तर आता ही विश्वासघाताची एक नविन मालिका मी सुरु करत होतो का ? हेम्या मला कधीतरी भेटेल अन याची परतफेड करेल का? हेम्यानं तसं करायचं ठरवलं तर मी मला कसं वाचवणार होतो ? एक ना अनेक,
शेवटी तुम्हाला पण एक गोष्ट सांगतो, हे सगळं मी तुम्हाला सांगतोय हे एव्हाना हेम्याला कळालेलं असणार आहे, त्यामुळं मी तर सावध राहतोच आहे पण तुम्ही पण जरा सावध रहा, कधी काहीही न करता अचानक तुमच्याकडं काही डाटा आला किंवा तुमचा काही डाटा गेला तर हेम्या असेल तो, सांगता येत नाही, त्यामुळं जरा सांभाळुनच रहा, कारण आता तो अनियंत्रित आणि स्टेट ऑफ द आर्ट* फ्रिक्वेन्सी बेस व्हायरस आहे, ज्याला सध्या उपलब्ध असलेली कोणतीच सिक्युरीटी सिस्टिम पकडु किंवा मारु शकत नाही. तो तुम्हाला भेटेपर्यंत गुड लक.
--- समाप्त -----
ही मालिका वाचल्याबद्दल आपणा सर्वांचे अतिशय आभार, या मालिकेतील सर्व पात्रे, स्थळं, घटना, यांचा प्रत्यक्ष किंवा वास्तवातील पात्रे, स्थळ व घटनांशी काहीही साधर्म्य आढळल्यास तो फक्त एक योगायोग आहे, कारण ही पुर्ण मालिका एक फक्त आणि फक्त एक कल्पनाविलासच आहे, अर्थात आजपर्यंत असे बरेच कल्पनाविलास प्रत्यक्षात साकार होण्याच्या घटना झालेल्या आहेतच, त्यामुळे ह्या कल्पनाविलासाबद्दल देखिल ही शक्यता नाकारता येत नाही. या संपुर्ण कथेमुळे अजाणतेपणी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
धन्यवाद.
* state of the art -- The highest level of development, as of a device, technique, or scientific field, achieved at a particular time: (साभार - http://www.thefreedictionary.com/state+of+the+art)


Print Page

1 comments:

Anonymous said...

besttt.
far chan zalie story.chan.asach lihit raha

Post a Comment