Friday, October 14, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग १३


पहिल्या एक तीन पार्टी व्यवस्थित झाल्या, अगदी माल उचलणे ते माल पोहोचणे, आमच्या बेडरुमच्या वॉर्डरोब मध्ये पाचशे च्या दोन हजार नोटा छान विश्रांती घेत होत्या, आणि बरोबर १२ दिवसानंतर ऑफिस खालच्या चहावाल्यानं सकाळी सकाळी, एक पाकिट दिलं, एक सिम कार्ड होतं त्यात, एकाही मिटिंगला बोलणं झालेलं नसलं तरी आता त्या दोन आयटम आणि ते गृहुस्थ यांच्या एकुण काम करण्याच्या पद्धतीबद्दल कल्पना आलेली होती, ऑफिसात जाउन ते सिमकार्ड टॅब मध्ये टाकलं, सिमवर काही मेसेज ड्राफ्ट मध्ये ठेवलेले होते, ते वाचले आणि माझी शुद्धच हरपली असं म्हणलं तरी चालेल. आमच्या एक आयटम मेली होती, हो मेलीच, मेसेज तसाच होता. आणि पुढचे ३ महिने काही काम मिळणार नव्ह्तं, म्ह्णजेच पैसे पण मिळणार नव्हते. दोन्ही सिमकार्ड व टॅब जपुन ठेवायचा होता अन बरोबर ९० दिवसांनी कोरेगाव पार्कच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जायचं होतं, पेट्रोल १०००/ ते २०००/- च्या मध्ये भरायचं होतं, ज्या आकड्याला तो अटेंडंट थांबेल ते आकडे ९८७४५८ याच्या पुढे लावुन जुन्या सिमवरुन मेसेज करायचा होता आणि त्यावरुन पुढची स्टेप कळणार होती.
आता मला एखाद्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीत असल्यासारखं वाटायला लागलं होतं, नित्याबरोबर बोलुन काही फायदा नव्हता, कारण सुरुवात त्यानं केलेली असली तरी तो आता या सगळ्यात नव्हता उलट त्याच्यावर जबरदस्त वॉच होता. पण आता ३ महिने गप्प राहणं म्हणजे डोक्याला ताप होता, हेम्या गप्प बसायची शक्यता कमी,त्याला लवकरात लवकर आखाड मोकळा करुन हवा होता आणि माझ्या मनात आता त्याच्या स्वप्नांपेक्षा कितीतरी मोठी स्वप्नं रंगत होती, आणि हो ती सगळी आर्थिकच होती, मला मोठा हॅकर वगैरे व्हायचं नव्हतं पण या गोष्टी करुन मिळ्णारे पैसे मला झोपु देत नव्हते. माझ्या स्वप्नातली लिनिया, अनुची दागिन्यांची हौस, चिन्मया अन होणा-या बाळाचं मोठ्या शाळेतलं शिक्षण, आम्हाला मोठं घर, आणि हे सगळं आमची आमची स्वप्नं म्हणता प्रत्येक ठिकाणी असणारा मी. हल्ली ऑफिसात लक्ष लागत नव्हतं, काय करणार २० महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम घरी कपाटात असताना दर महिन्याच्या पगारासाठी किती लक्ष देईल माणुस कामाकडे.
हे सगळं डोक्यात घुमत असतानाच, सुरेखाचा फोन आला, पुन्हा पैशाबद्दल चौकशी केली, तिला पुढच्या आठवड्यात व्यवस्था करतो असं सांगितलं, पैसे तर होते माझ्याकडे तयार, पण न्यायचे कसे हा प्रश्न होता, कोणत्याही बँकेत भरुन सोलापुरात काढणं शक्य नव्ह्तं, कुणाच्या नावानं डिडि काढणं शक्य नव्हतं. तशातच हेम्या वर आला, ' काय बे काय म्हंतोस, कधी जायचं गावाकडं, झाला असेल ना आता हिशोब सगळा पुरा', त्याला सगळं झालंय हे सांगावं का नाही याच गोंधळात होतो, कारण तो माल उचलुन देत होता तरी त्याची किंमत त्याला माहित नव्हती, ' नाही रे अजुन ५-६ महिने लागतील, लगेच मिळत नाहीत पैसे, तरी जे मिळालेत ते पाठवतो आहे गावाकडे, तेवढ्यात ऐकलं तर आखाड मोकळा करुन घेउ लगेच' मी एक फुकट आश्वासन ठोकुन दिलं ' हां त्ये बी खरंय, ह्ये पण तिच्यायला कारखान्यागत हाय, तिच्यायला या वारच्या उसाचे पैसे पुढच्या काट्याला मिळतेत तिथंबी. एखादा नविन गुन्हेगार जसा प्रत्येक गुन्हा करताना चाचरतो, घुटमळतो तसं माझं होत होतं. तेवढ्यात हेम्यानं एक फाईल ट्रान्सफर करायला सुरुवात केली, छोटीशीच फाईल होती, सगळी फाईल आल्यावर उघडली, ते आमच्या कंपनीचे सॅलरी डिटेल होते, जी एक्सेल फाईल दर महिन्याला बँकेला जायची ती फाईल होती. पण माझ्या क्युबिकलकडं माझा बॉस येताना दिसल्यानं पटकन दोन्ही फाईल बंद केल्या, उठुन उभा राहिलो. आज सकाळी मी काही मेल चुकीचे पाठवले होते, हो चक्क इंटर्नल टेक्निकल ऑडिटचा रिपोर्ट मी जशाच्या तसा क्लायंटला पाठवला होता, तो पण for your neeful action asap, असं लिहुन, म्हणजे थोडक्यात आपणच आपली कबर खणायला अ‍ॅड्व्हान्स देउन आल्यासारखा प्रकार झाला होता. या भयंकर चुकीबद्दल बॉस तिथंच उभा राहुन मला जाम शिव्या घालत होता आणि मी ऐकत होतो, कारण दुसरा काही पर्याय माझ्याकडे त्या क्षणी नव्हता. घरातल्या पैशाची मस्ती दाखवणं शक्य नव्हतं. १० मिनिटं फायरिंग झाल्यावर बॉस गेला, आता हळु हळु एक एक जण डोकं क्युबिकलच्या बाहेर काढत होता. बातमी नित्यापर्यंत गेली होतीच. त्यानं मला लंचमध्ये त्याच्याकडं यायला सांगितलं.
लंचमध्ये जायच्या आधीच एका पिसिओ वरुन मिस कॉल आला, ५ वेळा, आणि शेवटी शिव्या घालायला सुरु केल्यावर पलिकडुन आवाज आला, एका बाईचा, इतना गुस्सा काय को होताय रे, सिर्फ पक्का कर रही थी तुच है के कोई और है, चमेली के लिये काम कर सकता है तो चंपा के लिये क्यों नही, काम मंगता है तो आजा वहीच जहां पह्य्ले चमेली को मिला था.आजा आज शामको, रात होनेतक इंतजार करेगी मैं, बहीच आय्डि वहीच पासवर्ड से उसीच मशीन पे लॉग इन करना जिटॉक पे ' फोन कट झाला. हे काय होतं क्रॉस का डबल क्रॉस, मी पहिल्यांदा कुणाला तरी भेटलो ते दुस-या कुणाला कसं कळालं आणि ते पण आयडि पासवर्ड सहित. मी यात पुरता अडकलो आहे याची जाणिव झाली होती, पण ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला किंवा गुन्हेगाराला येणा-या संकटाची चाहुल लागताच ते सुटकेचा किंवा प्रतिहल्याचा विचार करु लागते, तो विचार पॅरलली माझ्या मेंदुत चालु झाला.
मी या सगळ्यात आलो का, पैसे हवेत्, पैसे का हवेत तर जमिन घ्यायची आहे, जमिन का घ्यायची आहे तर हेम्याला आखाड मोकळा हवा आहे, करेक्ट मग हेम्यानंच मला यातुन सोडवलं पाहिजे आता. प्रश्न हेम्या तर उत्तर पण हेम्याच.' तु ही बिगाडे तु ही संवारे तु ही तो है', ही लोकं जर मला ऑलमोस्ट ब्लॅकमेल करत आहेत तर मी का नाही, काम करता करता हेम्याला कसा वापरता येईल याचा विचार पण चालुच होता, ऑफिस संपेपर्यंत काही सुचलं नाही. तसाच घरी आलो. घरी शकुताई आणि अजुन ४-५ बायका कॉलनीमधल्या येउन बसल्या होत्या, विषय होता कॉलनीत आज झालेल्या चोरीचा, कॉलनीच्या एका टोकाला असलेल्या बिल्डिंग मधुन दिड लाख रुपयांची चोरी झाली होती आणि त्या घरातल्या आजी अन सुनेला मारहाण केली होती, इथं आलेल्या सगळ्या बायकांना अनुची काळजी होती. मी आल्यावर ५ मिनिटातच गेल्या सगळ्या पण शकुताई अन अनु मात्र जबरदस्त टेन्स दिसत होत्या, आणि ते साहजिकच होतं. पैसे कसे द्यावेत यावर अनुनं एक उपाय सुचवला, त्या सगळ्यांना इथं बोलावुन घ्यायचं अन देउन टाकायचे पैसे, करार अन सह्या पण इथंच करायच्या. शकुताईला पण हे पटलं, त्यानिमित्तानं सगळे इथं येतील, तसे ही हे पैसे मिळाल्यावर कुणी येण्याचा प्रश्न नव्हताच, आणि बाकीच्यांना दाखवण्यासाठी निमित्त करायचं ते अनुच्या डोहाळजेवणाचं असं ठरलं.
हे झाल्यावर जेवायला उशीरा येतो हे सांगुन, नित्याला कल्पना देउन, म्हणजे जरी आता तो यात नव्हता तरी त्याला माहित असणं गरजेचं होतं मी नवनीत कार्ड जवळ आलो, मागं असलेल्या सायबर कॅफेत गेलो, तो कॅफे चालवणार गृहुस्थ सोडला तर तिथं बाकी सगळ्या पोरीच होत्या, मला त्या कॅफेवाल्याचा क्षणभर हेवा वाटला, दिवस रात्र अशा पोरी समोर येउन बसणं म्हणजे निदान नेत्रसुख तर होतंच की. मला एका विशिष्ट मशीनवरच बसायचं होतं आणि हो माझी वाट पाहात ती चंपा इथंच बसलेली असणार होती, याचा अर्थ जी पोरगी संध्याकाळ पासुन इथं बसुन आहे तीच ती असणार होती, असा विचार करुन मी तिथलं रजिस्टर घेतलं नाव पत्ता लिहिण्यासाठी, त्यात पाहिलं ३ नंबरच्या मशीनवर बसलेली मुलगी ५.१० ला आलेली होती आणि आता ८.३० पर्यंत प्रत्येक तासाला तिनं वेळ वाढवलेली होती. मला हवं असलेलं मशीन रिकामं व्हायला जर ९.१० पेक्षा जास्त वेळ झाला असता तर तिला पुन्हा एकदा वेळ वाढवायला इथं काउंटरला यावं लागलं असतं अन तिचा चेहरा मला दिसला असता. पण तसं झालं नाही, मला हवी असलेली ७ नंबरची मशीन रिकामी झाली अन मी तिथं जाउन बसलो, आता मी बरोबर त्या ३ नंबर वालीला पाठमोरा होता, मी जिटॉल्क ला लॉगैन केलं तेवढ्यात मागं हालचाल जाणवली, वळुन पाहिलं तर ती ३ नंबरवाली निघुन जाताना दिसली, छ्या अंदाज पुन्हा चुकला, मी या नेटवर्क मध्ये बराच कच्चा होतो अजुन. पण तो पर्यंत माझ्या जिटॉल्क वर दोन तिन पिंग आले होते. एक लिंक आली होती आणि त्याखाली येस किंवा नो एवढंच उत्तर द्यावं ही अपेक्षा होती. आपल्या अटी लादणं याची आता मला सवय झाली होती, मी येस किंवा नो न म्हणता, किती मिळतील असं विचारलं, ५ मिनिटं काहीच उत्तर आलं नाही, मग मी लॉग ऑफ करतोय असं टाइपल्यावर, आकडा दिसला स्क्रिनवर १५००००० आणि पुन्हा येस ऑर नो. मी दोन वेळा कर्सर वापरुन ते शुन्य मोजुन घेतली, एकम दहम शतम करत अन मग कमालीच्या वेगानं येस टाइप करुन एंटर केलं, पलीकडचा युजर लॉगऑफ झाला, आणि मी ति लिंक लिहुन घेउ लागलो, ते मालक गृहुस्थ माझ्याकडे आले अन मला एक सिमकार्ड दिलं, आणि जी चिठ्ठी लिहित होतो ती घेउन फाडुन टाकली. मी पैसे दिले अन बाहेर आलो. समोरच्या मिठाईच्या दुकानात जावं म्हणुन रोड क्रॉस केला, एक बासुंदीचा पॅक घेतला पुन्हा पल्सरकडं आलो, निघणार इतक्यात ती पहिली आयटम नवनीतच्या बिल्डिंग मधुन बाहेर पडताना दिसली, समोरचीच अ‍ॅक्टिव्हाची डिकी उघडुन तिनं आत एक पर्स आणि दोन पिशव्या टाकल्या अन निघाली, मी तिला फॉलो करायचं ठरवलं, माझ्या अंदाजानं आता माझ्या अंगावर हे बोजड जॅकेट होतं, डोक्यावर हेलमेट त्यामुळं ओळखला जाण्याची शक्यता कमी होती, इतक्यात फोन वाजला, अनुचा होता, चिन्मया जेवणासाठी थांबल्याचं सांगितल्यावर मी फॉलो करायचं विसरुन डायरेक्ट घरी आलो.
जेवणं झाली, चिन्मया झोपल्यावर अनुनं आणि शकुनं ठरवलेला कार्यक्रम सांगुन टाकला, मी त्याच्या बजेटचा विचार करत झोपलो उद्या पहाटे लवकर उठण्यासाठी, आणि चक्क पहाटे उठलो, पैसा देवा पैसा, सगळं करायला लावतो माणसाला. काल मिळालेलं सिम कार्ड टॅबमध्ये घातलं,टॅब लॅपटॉपला जोडला अन हेम्याला बोलावलं, तो लगेच आला, त्याला सिमकार्डच्या मेसेज मधली लिंक दिली, आणि वाट पाहात बसलो, म्हणजे थोडा पेंगुळलोच होतो, जाग आली ती अनुच्या ओरडण्यानंच, एकदम जागा झालो, समोर पाहतो तर स्क्रिनवर त्या लिंकवरुन हेम्यानं उचललेल्या फाईल होत्या अन त्यातलीच एक हेम्यानं चालु केली होती बहुधा,हिंदी डायलॉग होते आणि ते ही अतिशय अश्लील म्हणजे अगदी मला हेडफोन लावुन ऐकायला देखिल लाज वाटावी असे, अन त्याचवेळी चिन्मया मला गुड मॉर्निंग करायला आली होती. आवाज तसा जवळ आल्याशिवाय ऐकु येईल असा नव्हताच, माझे डोळे शब्दशः खाडकन उघडले अन विद्युत वेगानं काय ते म्हणतात ना तसं मी ती फाईल बंद केली. अनुकडं वर तोंड करुन पाहण्याचं धैर्य माझ्यात नव्हतंच. हेम्याला फक्त विचारलं सगळं झालंय का. तो हो म्हणाला अन मी लगेच सगळं बंद करुन उठलो, यापुढं या गोष्टी रात्रीच करायच्या अन जागं राहुन हे ठरवुनच. आता अनुबरोबर बोलायचा काही प्रश्नच उरला नव्हता, गुपचुप आवरलं, आज लवकर जाणं भाग होतं कारण आज लंच टाईम मध्ये मिटिंग होती. मग अनु चिन्मयाला सोडुन आल्यावर तिला नुसतंच येतो म्हणुन सांगुन निघालो.
ऑफिसला आलो, बाकी काहीही विचार न करता फक्त ऑफिसच्या कामावर लक्ष देउन काम केलं, एक दोन रिपोर्ट द्यायचे होते ते बॉसला पाठवले, दहा मिनिटात बॉस समोर हजर, आणि आज चक्क कौतुक करत होता त्या रिपोर्टबद्दल. माझ्याशी बोलुन झाल्यावर त्यानं सगळ्यांना जवळ बोलावलं आणि हे सांगितलं की काल जरी त्यानं माझ्या चुकीबद्दल सगळ्यासमोर माझी कान उघडणी केली होती तसंच तो आज माझं कौतुक पण मुद्दाम सगळ्यांसमोरच करत होता, हा सोहळा संपन्न होईपर्यंत लंच टाईम झालाच, गुपचुप टॅब घेउन निघालो, ठरलेल्या हॉटेलात आलो, रिसेप्शनला विशिष्ट नावाची चौकशी केली, त्यानं रुम नंबर सांगितला आणि मी लिफ्टनं त्या रुमसमोर येउन उभा राहिलो, या आधीच्या सगळ्या वेळी २-३ जण होते आणि सगळ्य मिटिंग सार्वजनिक ठिकाणी झालेल्या होत्या, बंद दरवाज्यामागची ही पहिलीच मिटिंग होती. नित्याला हॉटेलचं नाव सांगितलेलंच होतं. धीर करुन बेल दाबली, दरवाजा उघडल्यावर आत पाहतो तर पहिली आयटम होती अन आत बेडवर एक छोटं मुल होतं. आताही आत येताना काहीही संवाद नव्हते फक्त डोळ्यानंच इशारा होता. आत जाउन बसलो. पुन्हा टॅबची अदलाबदली झाली, १० मिनिटात माझा टॅब परत आला, वरच एक फाईल होती, ती उघडुन पाहिली, त्यात एक पत्ता होता यावेळी बिबवेवाडिमधला आणि खाली लिहिलं होतं 'read it remember it delete it and improve your memory' , मी थोडा ओशाळलो, तेवढ्यात ते मुल रडायला लागलं म्हणुन ती आयटम उठुन त्याच्याकडे गेली पण त्याला शांत करताना सुद्धा ती एक शब्द बोलत नव्हता, मुकी होती का काय कुणास ठाउक, पण ते मुल मात्र लगेच शांत झालं, तिनं मला डोळ्यानीच निघायला सांगितलं, मी काही बोलायचा प्रश्नच नव्हता. गुपचुप बाहेर आलो, शंका म्हणुन पुन्हा दरवाज्यावरच्या नंबर कडं पाहिलं, तोच होता बदललेला नव्हता आणि पोटात भुक लागलेली होती. तिथल्याच रेस्टॉरँट मध्ये जेवायला गेलो, ऑर्डर देउन फोन पाहिला, अनुचा मेसेज होता, ती तिच्या आईकडं जाणार होती, अन मला संध्याकाळी घ्यायला जायचं होतं. तिला फोन केला, तर तिनं सांगितलं की तिला ब्युटि पार्लर मध्ये जायचं आहे म्हणुन, राग अजुन कमी झालेलाच नव्हता. आणि मला ही तिकडंच जायचं होतं, पुन्हा एकदा पत्ता आठवुन समोरच्या पेपर नॅपकिनवर लिहुन घेतला अन जेवण करुन ऑफिसला आलो, आज सगळं नॉर्मल होतं, कामं केली हेम्याबरोबर जरा गप्पा मारल्या, सकाळी काय लफडं झालं ते सांगितलं, हेम्याला पण वाईट वाट्लं, तो निघुन गेला, ऑफिसची वेळ संपली.
गाडी काढली अन डायरेक्ट सासरी आलो, घरी सासरे एकटेच होते, त्यांच्यबरोबर जरा गप्पा झाल्या, अनु अन सासुबाई ब्युटिपार्लरमध्ये गेल्या होत्या, त्यावरुन काही जोक मारुन झाले, चिन्मया खालीच खेळत होती, जेवणं तिथंच होणार होती, म्हणुन त्या दोघींना घेउन येण्यासाठी निघालो, पण आधि त्या पत्त्यावर जावं असं ठरवलं, खाली उभारलेल्या पोरांना पत्ता विचारला, समजुन निघालो, त्या बिल्डिंगखाली आलो, गाडी एका बाजुला लावली, च्यायला इथं रस्ते एवढे छोटे आहेत की गाड्या लावायचा लफडाच होतो. मग लिफ्टनं वर गेलो आणि प्लॅट नंबरची खात्री केली, कारण जर तो प्लॅट नंबर बरोबर होता तर आता पुन्हा मी बेशुद्ध व्हायची वेळ होती, त्या प्लॅटवर नाव होतं आ.कृ,देशपांडे आणि खाली पाटी होती ' sunita's beuti secrets' .............

Print Page

0 comments:

Post a Comment