Monday, October 10, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ११


स्टेट ऑफ द आर्ट - भाग ११
एक दोन दिवस नित्याच्या होकाराची वाट पाहिली, त्याला एकदा स्पष्ट विचारलं तरी त्यानं स्पष्ट उत्तर दिलं नाहीच, आता मात्र मला या गोष्टी करण्याची भयंकर ओढ लागल्यासारखं होत होतं, दिवसभरात हेम्याबरोबर बोलणं व्हायचं, पण तो नक्की काय आणि कसं करणार याची कल्पना ना त्याला होती ना मला. नित्यानं आधीच सांगितल्याप्रमाणे या दोन दिवसात सगळ्या मशिन्सचे ड्राईव्हज, पोर्टस बंद करणं सुरु झालं होतं. ही सगळी क्लायंटची रिक्वायर्मेंट आहे असं सांगितलं गेलं. तिस-या दिवशी संध्याकाळी सुरेखाचा फोन आला, बाकीची विचारपुस करुन झाल्यावर तिनं पैसे ठरलेल्या वेळी देणार आहात ना हे विचारलं, मी हो म्हणालो आणि मग मात्र आता काहीतरी गंभीर पावलं उचलायची वेळ आली आहे हे लक्षात आलं. हेम्याची फाईल उघडली, त्याला विचारलं ’दोन दिवस इथं आहेस काय काय शिकलास काय काय समजलं आहे तुला ’ त्याचं उत्तर आलं ’ थांब दहा मिनिटं’ नंतर अचानक स्क्रीनवर कॉपी पेस्ट्चा बॉक्स ओपन झाला अन चक्क जवळपास ४२ जिबीचा डाटा येण्यास सुरुवात झाली, आधी ४० मिनिट रिमेनिंग होतं मग अचानक १२ मिनिट झालं अन एकदम १ मिनिट अन मग संपलंच. अवघ्या २ मिनिटात ४२ जिबि डाटा ट्रान्सफर झाला होता. लगेच हेम्या आला फाईलमध्ये ’ च्यायला हे लई लफडंय बे, तिथनं ओढायला जाम येळ जातोय अन इथं पण, छे तिच्यामायला ह्या पेक्षा पाटाला पाणी घातलेलं परवडलं’ मी बाहेर आलो, डाटा फोल्डर समोरच होते, हेम्यानं पहिलि चोरी आमच्याच ग्रुप मधल्या एका पोराच्या मशिन मधुन केली होती, त्याचं क्युबिकल माझ्या क्युबिकल पासुन जवळच होतं.
मी उठुन त्याच्याकडं गेलो, हाय केलं, त्याचा चेहरा प्रचंड गडबड्लेला होता,’ ओ मॅन शिट, माय ब्लडी डेटा हॅज गॉन, माय इ ड्राइव्ह इज एम्प्टी नाउ, व्हॉटस धिस, विल कॉल नितिन’ असं म्हणुन त्यानं फोन उचलला.
मी परत माझ्या डेस्कवर आलो, हेम्याला सांगितलं ’ ओके, हे सगळं परत नेउन ठेव’ त्यावर हेम्याच्या शांत रिप्लाय आला ’ परतीचा रस्ता सुधरंल का नाय म्हाइत नाय, बगु जमंल का ते’,आणि पुढच्या पाच मिनिटात अजुन दोन जणांच्या कडे कॉपि पेस्टचे बॉक्स उघडले गेले होते. आता हा हेम्या मलापण त्याच्याबरोबर आत घेउन जाईल तर बरं असं वाटलं, तेवढ्यात आमच्या प्लोअरची हिरोइन कम काकु ज्यादा लीलाच्या क्युबिकल मधुन ओरडण्याचा आवाज आला, जवळपासचे तिकडं गेलंच, मी पुरता भेदरलो होतो, उठुन उभा राहिलो तोच नित्या आत येताना दिसला, सुरा घेउन येणा-या कसायाला पाहुन बक-याला कसं वाटत असेल तसं मला वाटायला लागलं, तो त्या पोराच्या क्युबिकलकडं गेला आणि मी लीलाच्या. तिथली लोकं लगेच बाजुला होत होती शहाजोगपणे, लीला तर आधीच बाजुला झाली होती, मी वाकुन पाहिलं अन बोंबला तिच्यायला हेम्यानं पहिल्याच दिवशी माझ्या प्लॅनची वाट लावलेली होती,लीलाच्या मशीनवर स्क्रिन सेव्हर चालु होता, बदलणा-या फोटोंचा अन फोटो होते तलाठ्याला दाखवलेले.
हेम्यानं पहिला हिसका मलाच दिला होता, लीलाकडे हे फोटो असणं शक्यच नव्हतं आणि हे फोटो माझ्याकडचे आहेत हे मी सांगणं म्हणजे आत्महत्याच होती माझ्या करियरची. अक्षरश थरथरत परत आलो, हेम्या समोरच होता ’ काय बे जाम मजा येतीय मला तर ही ढकलाढकली करायला, ते सोड तुझं काम होतंय का नाय यातुन ते बोल’, मला खरं तर पुढचं शब्द टाइप करायचे होते पण भान न राहुन तोंडातुनच बाहेर पडले ’ ए गप तिच्यायला येद्या ***, नोकरी जाइल अशानं माझी ’ आवाज पण जरा नेहमीपेक्षा मोठा होता, फ्लोअरवरची सगळीजण माझ्याकडंच पाहात होती. हे माझ्या लक्षात लगेच आलं अन मी समोरच फोन आदळत सगळा रोख बायको या नेहमीच्या सुटकेच्या रस्त्याकडं वळवला.
आणि पुढच्या दहाच मिनिटात हा गोंधळ प्रचंड वाढला,हेम्या पिसाटला होता, लिलाच्या स्क्रीनवरचे फोटो गायब झाले होते तर नित्या अन त्याच्या हाताखालची विप्रोची पोरं, वेड लागल्यासारखं करत होती. ब-याच जणांचे इन्स्टंट मेसेंजर ओपन झाले होते अन बरंच काय काय, माझ्या मशिनला काहीच झालेलं नसुन मी सुन्न बसुन होतो, समोर हेम्याची फाईल ओपन होती, त्यात शब्द होते ’ बास का एवढं, होतील की पैसे जमा एवढ्यात.’ माझं डोकं अजुनच भिरभिरायला लागलं, रागारागात त्याला टाइपलं ’ भाड्या हे बंद कर सगळं, पैसे मिळणं सोड आहे ती नोकरी जाईल माझी.’ ’ ह्या ह्या ह्या’ चंद्र्कांता मधल्या यक्कुसारखं हेम्या हसला. थोडं भानावर येत, हेम्याला धमकी दिली ’ आणि नोकरी गेली ना तर हा लॅपटॉप पण जाईल अन तु सुद्धा त्यातच राहशील कायमचा, तुला कधिच बाहेर येता येणार नाही त्यातुन, समजलास काय तु ?’ ५ मिनिटं काहीच झालं नाही, पण हळु हळु गोंधळ कमी होत असल्याचं जाणवलं याचा अर्थ हेम्या शांत होत होता. मग पुन्हा वाक्य उमटलं ’ म्या हे समदं करु शकतो आता नक्की रस्ते अन गल्ल्या सांग कुटुन काय उचलायचं ते म्हंजे तेवड्च कराया बरं’ जीव भांड्यात पडणे म्हणजे काय ते अनुभवलं मी, तेवढ्यात तो भांड्यात पडलेला जीव पुन्हा बाहेर काढण्यासाठीच नितिन समोर येउन उभा राहिला, तुझा लॅपटॉप दे बरं जरा, आत घेउन जातो मी.’ दुसरा उपायच नव्हता माझ्याकडं गुपचुप लॅपटॉप त्याच्याकडं दिला अन गप्प बसुन राहिलो. आता सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारायला मोकळा झालो होतो, लिला सरळ हाफ डे टाकुन निघुन गेलि होती, त्याआधी एच आर कडे गेलेली होति असं कळालं. नित्यानं त्याच्या सर्वर रुम मधुन बाहेर येउन सर्व काही क्लिअर असल्याचं आणि हा इश्यु नविन सर्वर टेस्टिंग मुळं झाल्याचं सांगितलं, परत आत जाताना माझ्याकडं अशा नजरेनं पाहिलं कि आता मला ४०‍% हवेत २० % वर भागणार नाही.
लंचला बाहेरच गेलो होतो नित्याबरोबर, नेहमीच जायचो त्यामुळं कुणाला संशय येण्याचा प्रश्नच नव्हता. मग तिथुनच नित्यानं त्याच्या पर्सनल फोनवरुन एक दोन फोन केले आणि रात्रीची मिटिंग फिक्स केली, नवनीत कार्डस, एबिसी चौकात अशा मिटिंगला जाण्याची माझी पहिलिच वेळ होती. लंच करुन पुन्हा ऑफिसला आलो, नित्यानं लॅपटॉप परत आणुन दिला होता, चालु केला तोच हेम्या समोर आला आणि टाइपलं ’ तो कोण तुझा मेव्हणा का बे, लै डोक्यावर बसलाय जनु, काय काय घातलं होतं आता आत, पळता पळता लई दमलोय, आता दोन दिस काय बी करणार नाय मि’ मला खुदकन हसु आलं, नित्याला फोन करुन विचारलं तर त्यानं सांगितलं की अ‍ॅंटिव्हायरस बरोबरच रजिस्ट्रि क्लिनर वगैरे बरेच लफडे वापरुन पाहिले होते पण हेम्याला बाहेर काढता आलं नाही, उद्या हार्डडिस्कच फॉर्मट करायची ठरलं आहे. लगेच उठुन त्याच्या केबिन मध्ये गेलो, ’ अरे हार्ड डिस्क फॉर्मट्ला टाकली तर हेम्या बसणार कुठं? यावर नित्याचं उत्तर होतं ’ कुणाची हार्डडिस्क, तुझी हार्डडिस्क आधीच माझ्याकडं आहे, त्यानं त्याच्या ड्रावरकडं बोट दाखवलं आणि हेम्या पण, समजलास आता ५० - ५० करायचं आपण. जा आता उगा सगळ्यांना संशन नको यायला’
मी बाहेर पडलो,तिथं उभा राहुन थोडंसं हसलो, परत जागेवर आलो अन हेम्याला विचारलं’ कुठं आहेस आता ? हेम्या म्हणाला ’त्याच काळ्या तुकड्यात आहे सकाळधरनं, फोकलीचं मगाशी लयच गरम झालं व्हता तो मोठा चंदेरी खोका’. याला नित्याचा मुर्खपणा म्हणायचा का हेम्याचा शहाणपणा याचा अर्थ लावत होतो, सकाळच्या प्रकारानंतर सगळे उच्चपद्दस्थ मिटिंग मध्येच होते त्यामुळं खाली फ्लोअरला कुणी फारसं कामाच्या मुड्मध्ये नव्हतंच. तेवढ्यात लिला व तिचा नवरा, जोर जोरात ओरडत एच आरच्या केबिनकडं जाताना दिसलॆ, आता लिला नेहमीचे फॉर्मल कपडे न घालता डार्क ब्राउन पंजाबी सुट घालुन आली होती, आधीच आखुड टॉप मागच्या बाजुला थोडा जास्तच आखुड वाटत होता. आणि सायबेजचा टिशर्ट घातलेला तिचा नवरा तिला अजिबात शोभुन दिसत नव्हता.
वेळ संपली, नित्याच्या केबिन मध्ये डोकावलं तो नव्हता, त्याच्या हाताखालच्या पोराला निरोप दिला अन पंच करुन घरी निघालो. घरी आलो, चिन्मया अन अनुचं स्वप्नविश्व रंगवणं चालु असावं, सकाळी अनु दुस-या मुलाबद्दल पहिल्याला कल्पना कशी द्यावी अशा प्रकारचं पुस्तक वाचत होती, तिचं तेच चाललं होतं. चिन्मया काही केल्या समजुन घ्यायला तयार नव्हती, ’ ते एवढं मोठं बाळ तुझ्या ढेरीत गेलंच कसं अन तुझी ढेरी तर केवढी लहान आहे आता ? असल्या डोकं फिरवुन टाकणा-या प्रश्नांना उत्तर देता देता अनु रडकुंडिला आली असावी, मी आल्यावर तिनं या चर्चासत्रातुन यशस्वी माघार घेतली अन ’ चिने, बाबा सांगेल हं तुला, तो मोठा किनै, त्याला शगलं येतं, आ तर ढढंम ढ आहे, हो किनै रे बाबा?’ असं म्हणुन अनु किचन मध्ये निघुन गेली अन मी माझ्याच लेकीसमोर शरणागतीची तयारी सुरु केली. ’ मी आज बाहेर जातोय जेवायला’ पटकन सांगुन टाकलं, उगा उद्या सकाळी दहिभात कोण खाणार, आता अनुला तर शिळं काहीच खायचं नव्हतं. थोडा वेळ चिनुचे प्रश्न टाळण्याचा यशस्वी प्रयत्न करुन तिच्याबरोबर खेळत बसलो, साडेआठला नित्याचा फोन आला, एबिसित जायचं होतं म्हणुन, थोडंसंच आवरलं अन लगेच खाली आलो. दार लावताना आदेश आलेलाच होता, ’ स्वताच्या पायावर चालत येउ शकाल इतकीच प्या, निदान आतातरी सांभाळा जरा’ इति अनु.
मी आणि नित्या वेगवेगळे जाणार होतो, पल्सार घेउन एबिसित आलो तेवढ्यात अजुन एका मित्राचा फोन आला ’शाजी जवळ उभा आहे तुला पाहिला तिथं एबिसित ये इथं लगेच’, त्याला म्हणलं की जमणार नाही एक दुसरं काम आहे’ पण त्यानं सांगितलं की बरेच जण येणार आहेत आणि थोडा वेळ थांबुन जा मग तु’ मग नित्याला फोन लावला, त्याला यायला एक तास होता, समोरची पार्टी अजुन आलेली नव्हती, मग एबिसितुन चालत शाजी मध्ये आलो, तिथं बरेच जण भेटले, एक दोन पराठे खाल्ले, आता खरंतर अशा मिटिंग आधी जेवणं अवघड होतं तरीपण आग्रह मोडणं शक्य नव्हतं, बरोबर एक तासानं नित्याचा फोन आला, नवनीत कार्डच्या दुकानात जमुन मग पुढं जायचं होतं. मित्रांना कसाबसा कटवुन निघालो नवनीत कार्ड हुडकत, सापडलं एकदाचं त्यात नित्याचा १०-१२ वेळा फोन झाला होता.
नवनीतच्या बिल्डिंगमध्येच एक सायबर कॅफे आहे, तिथं गेलो, एक मध्यमवयीन चष्मेवाला आणि एक आयटम, होय आयटमच होती ती पोरगी, डोळ्यावरचा चष्मा सोडला तर बाकी आयटमच होती. तो गृहुस्थ, ती पोरगी, नित्या अन मी वेगवेगळ्या मशिनवर बसलो, प्रत्येकाच्या समोर एक एक युझर आयडि अन पासवर्ड होता, जिटॉक ला एंटर करुन आमची चॅट मिटिंग सुरु झाली, मेसेज टाईप करायचा क्रम ठरलेला होता, बदाम सात सारखा अगदि हातात पत्ते असले तरि आपला डाव आल्याशिवाय टाकायचे नाहि आणि मला आश्चर्य वाटलं की कोणताही कोड नव्हता, सगळं शुद्ध मराठी मध्ये रोमन मध्ये टाइप करुन, मिटिंगच्या शेवटी, मला आणि नित्याला दोन हाय एंड मोबाइल मिळतील येत्या ३ दिवसात घरी आणि त्यावरुन आम्हाला ज्या घरात चोरी करायची आहे त्याचा पत्ता मिळणार होता. ३ दिवसात प्रि पेड कार्डाची सोय आम्हालाच करायची होती, अन ते झाल्यावर एका प्रख्यात डिटिएच कंपनीचे रिचार्ज करायचे होते, ज्यावरुन तो नंबर त्या आयटमला मिळणार होता, कसा कुणास ठाउक आणि ते विचारायची आम्हाला गरज नव्हती.
तिथुन निघालो, एका धुंदीत होतो आणि पहिला फोन केला अन अंदाज अगदी बरोबर निघाला ज्योतीकडुन मिळालेला नंबर होता तो अन फोन आत कॅफेत वाजत होता.मग दुसरा फोन केला मगाशीच्या मित्रांना कारण उद्या काही झालंच तर या वेळात फक्त मी आणि नित्या एकमेकांच्या संपर्कात होतो हे सिद्ध होणं अवघड झालं असतं, मग नंतर फोन केला अनुला तिला ही चांगली बातमी दिली की मी आज फक्त बाहेर खाउन घरी येत आहे, तिचा विश्वास बसला नाहीच मग तिला सांगितलं येतोच आहे घरी यु कॅन चेक विथ युअर ब्रेथ अ‍ॅनलायझर.....
क्रमशः


Print Page

0 comments:

Post a Comment