Thursday, April 7, 2011

तुमचं आमचं सेम -- भाग १०

तुमचं आमचं सेम -- भाग १०

लग्न ठरल्यानंतर माधवी एकदाच भेटली होती, गदग मध्ये डोसा खाल्ला आणि मग प्रभातला डिडिएल्जे पाहिला होता. मी पहिल्यांदाच एखाद्या तरुण मुलीच्या एवढा जवळ बसलो होतो. सगळा पिक्चर हात तिच्या खुर्चीच्या पाठीवर ठेवुन पाहिला होता. जाम मुंग्या आल्या होत्या हाताला, आणि हात तिच्या खांद्यावर ठेवायचा काय जवळ न्यायचा पण धीर झाला नाही. तिनंच एक दोन वेळा ओढणी मागं पुढं करताना माझ्याकडे टाकली होती.एवढाच काय तो रोमान्स, नंतर वाटलं यापेक्षा माझ्या स्कुटीवर फिरुन आलो असतो तर बरं झालं असतं. पण नंतर भेटायचा काही चान्सच आला नाही. माझ्यापुढे प्रश्न होता हनिमुनबद्दल, माधवीला विचारायची सोय/डेअरिंग नव्हती,आईकडं एकदा महाबळेश्वरच्या बुकिंग बद्दल विषय काढला तर तिनं साठेकाकांच्या मार्फत मला इशारा दिला होता. साठेकाका म्हणाले होते ’ अरे तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात, अशी कुठंतरी घाणेरड्या नको तसल्या लोकांनी वापरलेल्या भाड्याच्या खोलीत काय करायची रे स्वताचं घर आहे,तुझ्या स्वताच्या कष्टानं घेतलं आहेस,त्याच्या वास्तुपुरुष आशिर्वाद देईलच.या तोडग्याला माझ्याकडे काहि पक्का उपाय नव्हता आणि त्यानंतर आईनं दोन दिवसात ती लग्नानंतर ८ दिवस भागवतसप्ताहासाठी पंढरपुरला जाणार असल्याचं सांगितलं होतं, लाडोबा पण राष्ट्रिय सेवा योजनेच्या शिबिराला जाणार होती १५ दिवस. हा माझ्यासाठी जवळपास चक्रव्युह होता, फक्त दुस-या बाजुनं उघडा असणारा.  लाडोबा मात्र नियमित बातम्या पुरवायचं काम करायची.तिला हे सगळं थ्रिलिंग वाटत होतं.

माधवीच्या जिजाजींनी पाठवलेल्या टेम्पो मधुन आम्ही निघालो, तसं माझे साहेब तर त्यांची इंडिका देत होते,डिझेल घाल अन घेउन जा म्हणाले, पण ऐकलं नाही आईनं.’लग्न त्यांना घरासमोर करायचं आहे तर करु दे प्रवासखर्च त्यांना नाहीतर करा म्हणावं इथं’ या तिच्या म्हणण्याला माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. का असुन मला द्यायचं नव्हतं? शक्यतो मी आईच्या कोणत्याच गोष्टीला जास्त विरोध केला नव्हता आणि ती पण मला ’मुलगी निवडलीस ना तुझी तुच आता बाकी काही बोलायचं नाही’ या मुक वाक्यानं गप्प करत होती प्रत्येक वेळी.अर्थात काही ठिकाणि मी लाडोबाच्या हट्टीस्वभावाचा फायदा घेत बरंच काही काढुन घेतलं होतं.

समोरुन माधवीचे जिजाजी व अजुन २-३ जण येताना दिसले, मागं एक दोन बायका पण होत्या, हातात पाण्याचा तांब्या, ताटात काहितरी होतं . आता मी आणि आई खाली उतरल्यानं कोणालाच काही बोलता आलं नाही.’या या स्वागतम सुस्वागतम मंड्ळी, या या, आई या, हर्षद्रराव या इकडं या, आणि सुकन्याताई कुठं दिसत नाहीत, या तुम्ही पण या सुकन्याताई.’त्या बरोबरच्या बायकांनी आमच्या पायावर पाणी घातलं, भाकर तुकडा ओवाळुन टाकला. तेवढ्यात अजुन चार जण एक चादर घेउन आले, आमच्या डोक्यावर धरायला. लाडोबाला मजा वाटत होती, जिजाजींनी चार माणसं सामान उतरायला लावली अन ते पण आमच्या मागं घराकडं आले. मी दुस-यांदाच येत होतो,कंपाऊंडवरचे भालदार-चोपदार नव्यानं रंगवलेले होते,आतल्या भिंतीवर पुन्हा शुभ विवाह लिहिलं होतं.

घराच्या बाहेर पोहोचलो, तेवढ्यात बहुधा ताईच्या सासु आणि अजुन एक दोन म्हाता-या बाहेर आल्या, पुन्हा पायावर पाणि टाकलं, आमच्या डोळ्याला पाणी लावलं, ओवाळलं आणि आम्ही आत गेलो. बाकीचे व-हाडी व सामान उतरायची सोय केली होती तिकडं परस्पर जात होतं. लाडोबा कशीतरी चुळबुळत दोन मिनिटं बसली असेल, हळूच आईकडं पाहुन पटकन आत निघुन गेली. मला पण असंच वाटत होतं, पण आता मी नवरदेव होतो, हातात मोत्याच्या माळा लावलेला नारळ आणि डोक्यावर टोपी होती. चहा पाणी झालं, एक दोन मोठ्या लहानांच्या ओळखि करुन दिल्या. माझ्या किती लक्षात राहतील याची मलाच खात्री नव्हती. मी आपलं उगा नमस्कार नमस्कार करुन पुन्हा खाली बसायचो.

तेवढ्यात ताईचे सासरे म्हणाले ’ आता बघा उद्या तुमचं लग्न होय ना ?’ मी थोडासा लाजतच म्हणालो ’ होय’ . मग म्हणाले ’ मला एक सांगा तुम्हाला नवरा करायचा का नवरी ?’ मी गोंधळलो, च्यामारी ही काय नवी भानगड ’ नवरा करायचा का नवरी? ’ पटकन म्हणलं ’ नवरी’. ते उलटुन म्हणाले ’ अहो तुम्हाला नवरी केलं तर माधवीशी लग्न कसं लागायचं तुमचं, आं, सांगा की ओ असं कसं होणार ? बावचळुन मी लगेच उत्तर बदललं ’ नाही,नवरा ’ म्हातारबुवा बहुधा वकील असावेत अशा थाटात पुन्हा बोलले ’ अरारा, काय ओ हे विहिणबाई, ऐकलं का, तुम्ही म्हणताय ह्यांच्याशी माधवीचं लग्न करायचं अन हे तर मला नवरा करा म्हणायलेत की ओ, छ्या छ्या काय शाण्या सुरत्याच्या काळ नव्हं हा, रे गोविंदा.’ दोन मिनिटं गेल्यावर मायमराठीनं माझी विकेट दोन्हीकडुन काढल्याचं माझ्या लक्षात आलं आणि जास्तच लाज वाटायला लागली,पण आता मुर्खपणाची.  

सुटका झाली,ती आईच्या हाकेनं, ती मगाशीच आत गेली होती. आत जाउन बघतो तो ज्ञानप्रबोधिनीच्या पुरोहित बाई आल्या होत्या,माधवीच्या आई होत्या त्यांना नमस्कार केला. तिथंच थांबलो, घरात आत पहिल्यांदाच येत होतो, चोरनजरेनं इकडं तिकडं पाहिलं. सगळं सामान ऒषधांच्या खोक्यात भरलेलं. माधवी, गौरीताई कुठंच दिसल्या नाही. परत बाहेर आलो, काका आले होते. त्यांच्या पाया पडलो, थोडं काय कसं बोलणं झालं. मागुन लाडोबापण आला होता. जिथं उतरायची सोय होती त्या घराकडं निघालो. बाहेर पडताच लाडोबानं सांगितलं,’मधु तिच्या मैत्रिणिकडं गेली आहे,मेकप करायला आणि मेंदी काढायला.’ मला सहसा लाडोबाचा राग येत नाही पण आता आला, नुसतंच हं म्हणुन चालायला लागलो, तशी मागुन येउन लाडोबा म्हणाली ’ बरं बाबा, माधवी वहिनी, ठीक आता’ आई बाबांच्या थोड्या वेगळ्या स्वभावामुळं आम्ही दोघं काही बाबतीत फार जवळ आलो होतो. एकमेकांचे राग ओळखणं ही त्यातलीच एक होती. आमच्या या त्रिकोणी घरात हा नवा कोन कसा बसवायचा हा विचार करायला लागलो. प्रत्येक गोष्ट बदलणार होती, ब-याच आपल्या गोष्टी बदलाव्या लागणार होत्या, ब-याच शेअर कराव्या लागणार होत्या, आणि वस्तु काय करतात माणसं शेअर आपलेपणानं काय किंवा सक्तीनं काय, एक आख्खा जिवंत माणुस कसा शेअर करणार, आणि ते सुद्धा तीन वेगवेगळ्या लेवलला. बरं शेअर करणा-या तिघी बायकाच. एक आई म्हणुन, एक बहिण म्हणुन आणि आता एक बायको म्हणुन.

व-हाडाचंं घर आलं. आम्ही प्रमुख भुमिकावाले तासाभरात आवरुन बसलो होतो. मी,मावशी,आत्या आणि आई आमचं झालं होतं,लाडोबाला दोन वेळा हाक मारुन झाली होती. जिजाजी बोलवायला आल्यावर मात्र सगळेजण पुढं गेले आणि पाच मिनिटांनी आम्ही पण निघालो पुन्हा दुपारसारखं एका चादरीखालुन, आता उन नव्हतं चांगले सहा वाजले होते. साखरपुड्याला गोरज मुहुर्त धरला होता.

त्यांच्या घराच्या अंगणात गेलो,आणि पहिल्यांदाच प्रचंड सजवलेली माधवी दिसली.वायझेड,या पेक्षा जिपमध्ये यायची तेंव्हा फार चांगली दिसायची ती. तेंव्हा जेवढी धुळीनं माखलेली असायची तेवढीच आता मेकपनं माखलेली होती. हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या लोकरच्या कशानं तरी सजवलेली हेअर स्टाईल,गुलाबी केलेले गाल, साडिला मॅच होईल अशी निळी टिकली पण या सगळ्या गोष्टी माफ करायला लावेल असं हसणं. हाय हाय इसी अदापे तो यार मिट गये थे हम. असो, हळुच लाडोबाला हे सांगितलं, ती माधवीला घेउन आत गेली. मी समोरच्या स्टेजवर बसलो आणि गुरुजी मंत्र जरा जोरात म्हणात होते . एक- दोन आचमनं, आहेर देणं,घेणं,नमस्कार असल्या गोष्टी पार पडल्या. मग साधारण १५ मिनिटं असले मला काही सुचत नसलेले क्षण गेल्यावर पुन्हा माधवी बाहेर आली.डोक्यावरची लोकरी जाळी तशीच होती पण बाकी मेकप बराच कमी होता आणि आता मीच तिला शोभतो की नाहि अशी शंका मला येत होती. आपल्यासाठीचं कार्य म्हणलं ना की माणसाच्या चेह-यावर एक वेगळीच झाक येते, जशी अभिषेक करताना देवाच्या मुर्तीवर असते ना तशी, आता तीच झाक माधवीच्या डोळ्यात होती. सगळयांसमोर काही तिच्याकडं बघणं बरोबर वाटेना, म्हणुन हात पुसायला दिलेल्या नॅपकिनशी खेळत होतो, ते पाहुन गुरुजी म्हणाले’बघा बघा बघुन घ्या जी पाहीली, पसंत केली तीच आहे ना का दुसरी आहे कोणि ?’ ज्यांना ऐकु गेलं ते हसले, बाकीचे जेवण कधी वाढताहेत याची वाट पहात असावेत. मला वाटत होतं मी सगळ्यांनी माझ्याकडं पहावं, मी लग्न करतोय, त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल कौतुक असावं, पण वर स्टेजवर बसलं की कळतं आपल्या लग्नात फक्त आपल्यालाच ईंटरेस्ट आहे, बाकीचे काही जवळचे सोडले तर सगळे जेवायला अन मजा करायलाच आलेत.

माधवीचं असं नव्हतं, तिच्याकडच्या सगळ्यांना तिचं कौतुक असावं,बायका बोलताना तिच्याकडं हात वगैरे करायच्या. ते बघुन मलाच बरं वाटलं, आता बोलत काय होत्या कुणाला माहित चांगलं का वाईट ते, जाउ दे. पुढच्या पाच मिनिटात परांडकरांनी अजुन काही मंत्र संपविले. आता आम्ही दोघं समोरासमोर बसलो होतो. माझ्यामागं आई, लाडोबा आणि मामा होता. तिच्या मागं आई. गौरीताई, जिजाजि होते. काका काकु स्टेजवर बाजुला बसले होते. ’ आता, हा रुपाया घ्या आणि लावा तिच्या कपाळाला’ गुरुजी म्हणाले तसं मी केलं, रुपाया घेतला तिच्या कपाळाला लावला आणि खाली ठेवला, नाण्याच्या बाजुनी दोन बोटं पण लावुन घेतली हळुच. ’ अहो लावा म्हणजे, चिकटवा तिच्या कपाळाला, शकुनाचा आहे तो’ गुरुजी म्हणाले. माझ्या डोळ्यासमोर एकदम पोस्टातली डिंकाची बाटली आली. मग पुन्हा उगाच सभ्यतेच्या मर्यादा पाळत थोडं पुढं वाकुन तो रुपाया चिकटवल्यासारखा केला, तो काही चिकटेना. ’ अहो डोकं धरा की मागुन, असा कसा चिकटेल एका हातानं,ते काय तिकिट आहे पोस्टाचं.’ माधवी आणि मला, दोघांना या प्रकाराची आता गंमत वाटत होती, मी तिच्या डोक्यावरची लोकरी जाळी सांभाळत डाव्या हातानं तिचं डोकं धरलं आणि कपाळाला लावलेल्या गंध, पावडर, कुंकु आणि तिला आलेला घाम या सर्वांनी जो चिकट्पणा आला होता त्याच्या जोरावर ते नाणं चिकटवलं एकदाचं.

मग एकमेकांना अंगठी घालायचा कार्यक्रम पार पडला,पहिल्यांदाच तिचा हात हातात घेत होतो, तिच्याएवढाच माझाही हात थरथरत होता. अंगठी घालताना तिच्या बांगड्यात माझी बोटं अडकली, म्हणजे अडकवायची नव्हती पण अडकलेली सोडवायची पण नव्हती पण सोडवावी लागली.अंगठ्या मापं वगैरे न देता व्यवस्थित बसल्या.सगळ्यांनी टाळया वाजवल्या, तिच्या हातात साखरेचा पुडा दिला, आणि कार्यक्रम संपला. लोकं लगेच जेवायला गेली. आम्ही काही मोजकी मंडळी आत गेलो. घरातच आमची जेवायची व्यवस्था होती. पोळी,भाजी,भात, आमटी, भजी. कुरड्या आणि गोडाला श्रीखंड असा साधा पण खास बामणी मेन्यु होता. थोडी चेष्टा मस्करी, आग्रह यात जरा जास्तच जेवण झालं. मग आम्ही पुन्हा    व-हाडाच्या ठिकाणी आलो. तिथं बरीचशी मंडळी झोपली होती. आम्ही आत जाउन, उद्या सकाळची आवराआवर केली, म्हणजे मी बसुनच होतो, आई, मावशी, आत्या आणि लाडोबा याच आवरत होत्या. अकरा वाजले, आता सगळेच झोपलो. माझ्या डोळ्यासमोर मात्र माधवीच्या बांगड्यात अडकलेली माझी बोटं दिसत होती, तशीच अजुन थोडा वेळ  अडकवायला हवी होती, थोडाच्च वेळ.



5 comments:

Anonymous said...

Hello, me tumache Sarv lekh vachale aahet. Khup chan lihita tumhi ekdam saral aani sopi bhasha. Aaavadale mala. Tumhi solapurmadhye kuthe rahata? Majhe maher aasara society madhye aahe. Aanand jhala konitari solapurche bhetale mhanun. Pudhachi post lavakar publish Kara. All the best for future post. Thanks, Sneha, Singapore.

हर्षद छत्रपती said...

hi sneha, kashi aahes. its good that you liked it and thanks for that. majhe ghar jule solapur madhye aahe, tujhya aai babanchaya gharapasun javalach.

next post will come in by 15 april or so. and the last by 21st april. then i would start another series.

thanks for reading and keep visiting, if possible can you contact me at harshad.chhatrapati@gmail.com

harhsad chhatrapti.

Anonymous said...

harshad,
apratim kathanak!!!!
december pasun tujhya katha marathi blog viswavar baghat hoto pan vachayla vel milat navhata, aaj eka damat saglya vachun kadhalya, asach lihit raha.
baki hi katha satyaghatana aahe asach vatatay, aani jar nasel tar tujhya creativity la salaam.
asach lihit raha,
pudhchya bhagachi aaturtene vaat baghtoy........
- yogesh desai

क्रांति said...

sahee re! khoop chhan lihitos!

Unknown said...

chhan lihitos....mahiti navhat...keep it up..

Deepti mayee

Post a Comment