Sunday, March 20, 2011

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

Print Pageभुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची. ती आली की या उघडलेल्या काळजातली ही कुपी बंद करुन घ्यायची अन या दुष्ट जगापासुन आपल्या नाजुक लाडक्या लेकीला दुर घेउन जायचं आहे.

हे चित्र आहे माझ्या मनातल्या भावनांचं. वेळ होती भर दुपारची सुर्य पुर्ण डोक्यावर आला होता, आणि आम्ही होतो मुखापाशी सांदण दरीच्या. दरीच्या सुरुवातीला एक दिशादर्शक दगड आहे. 
इथपर्यंत न चुकता आलात तर पुढं चुकायची संधीच नाही. जाणार कुठं हो, फक्त एकच रस्ता एकच दिशा. रस्ता जमिनिच्या पोटात खोल खोल उतरत जाणारा. क्षणात असं वाटावं की जणु त्या भुमातेच्या काळजापर्यंत घेउन जाणारा राजरस्ता तो हाच.
रतनवाडीला श्री अम्रुतेश्वराचं दर्शन घेउन पुढं ५-६ किमीवर एक छोटी वाडी आहे, साम्रद नाव तिचं आणि या वाडीवरची एक छोटी वाट घेउन येते या दरीच्या मुखाशी. मुखापाशीच्या दाट झाडीजवळ येउन स्व:ताभोवती एकदा डाविकडुन उजवीकडे फिरलं की दिसतात ते रतनगड, त्याच्या खुट्टा, समोर आजोबा, त्याच्या टोकाचा सितेचा पाळणा, मग अलंग, मदन, कुलंग आणि नंतर कळसुबाई.

सगळा धीर गोळा करुन यांना हात जोडुन नमस्कार करायचा आणि चालायला लागायचं. तसं एका सपाटीवरुन चालणं फार थोडं आहे. वाट खाली खाली जात राहते, विश्वास बसु नये असे शिलाखंड समोर दिसतात.


त्यांच्या मागुन पुढुन वर खाली जाताना गारवा जाणवायला लागतो. हा गारवा वा-याचा नाही, पाण्याचा नाही तर इथपर्यंत सुर्यकिरणंच पोहोचु शकत नसल्यानं गार असणा-या पथ्थरांचा आहे. या गारव्यात संगमरवराच्या गारव्याची शिरशिरी नाही तर एका गुढ रम्य खोलात घेउन जाणारी आश्वासक धुंदी आहे.
एक आकर्षक उत्सुकता आपल्याला पुढं ओढत राहते आणि आपण ओढले जात राहतो. एखादा डाव्या बाजुनं जातोय तर पुढचा त्याला उजव्या बाजुची सोपी वाट दाखवतोय.

एकाच्या अनुभववावर दुस-याची नवलाई मात करु पाहते आहे तर दुस-याच क्षणाला अनुभव भारी पडतोय. अशातच एका मोठया शिलाखंडाच्या बाजुनं खाली उतरलो की दोन पाणीसाठे आहेत.

अलिखित नियम असा की जो मोठा आहे तो पिण्यासाठी वापरायचा तर दुसरा हात पाय धुण्यासाठी. आपण शांतपणे नियम पाळतो. गार पाण्यानं तोंड धुवुन एकदम ताजं वाटतं, पुढचा उतार जरा जास्तच आहे, आता जपुन. विश्वासुन आणलेली साधनं दगा देताहेत तेंव्हा सकाळपासुन ३-४ तासांचीच ओळ्ख असलेले हात पुढं येत आहेत. मग असंच पुढं जात जात ऐकुन वाचुन ओळखीचा झालेला तो पाणसाठा येतो. आतासुद्धा पार गळ्यापर्यंत येईल इतकं पाणि आहे तिथं. आम्ही बॅगा पुन्हा व्यवस्थित पॅक केल्या आणि त्या पाण्यात उतरलो. कल्पनेच्या पलीकडे थंड असलेले पाणि, आणि खाली स्वच्छ दिसणारे तळाचे दगड यावरुन एक एक जण पुढं सरकतो. अर्थातच एकमेकांच्या मदतीनं. ज्यांना जन्मजात पाण्याचं आकर्षण आहे ते दोन चार बुड्या मारुन घेतात, बुडायची भिती नाही अन कुणि बुड्वायची पण नाही. सगळे जण मान वर करुन आपण किती खाली आलोय हे पाहताहेत. नेहमी उंचीवरुन खालची छोटी छोटी वस्ती, घरं, झाडं पाहायची सवय आता उपयोगची नाही हे कळालेलं आहे.

प्रत्येकवेळी उंचीवर जाउनच काहीतरी मिळतं असं नाही. बापाच्या खांद्यावर बसुन जत्रा बघायचा जो आनंद आहे तोच आईचा पायामागं लपुन पोळ्याची बैलपुजा बघण्यात आहे हे जाणवतं. पाण्यात भिजायची नशा करुन झाल्यावर आम्ही पुढं सरकतो,



आता वाट एका पातळित आहे असं वाटत असताना पुन्हा काही मोठे मोठे दगड ओलांडुन पुढच्या उतारावरुन खाली जातो. इथं एक मोठा दगड आहे, त्यावर आडवं झोपुन वर पाहिलं तर आकाश फक्त ५-१० फुटांचंच दिसतं.



अजुन थोडं पुढं गेलं की समोरचा डोंगर खुणावतो, बोलावतो ये ये म्हणुन. सांभाळुन इथुन पुढं जाणं शक्य नाही.

एक प्रचंड शिलाखंड दोन छोट्याश्या दगडांच्या आधारानं उभा आहे.

बहुधा पंढरीच्या विठठलाला युगे अठ्ठावीस सोबत करत असावा. इथं सुरक्षित दरीची वाट संपते, थोडावेळ तिथं बसुन आम्ही परतायला सुरु करतो.
एसीच्या गारव्यात बसुन फक्त बोटं चालवायची सवय असल्यानं आज भुक जरा जास्तच जाणवते आहे. त्यामुळं थोडं भराभर चालत पुन्हा पहिल्या पाणवठयाला येतो. पोटातल्या भुकेला थोडं शांत करुन, पुन्हा निघतो, आता वरुन आम्ही किती खाली उतरलो होतो ते पाहायला.
दरीच्या फार जवळ जाता येत नाही पण टोकाला आल्यावर जाणवतं ते फक्त आपलं खुजेपण. पटते ती निसर्गाची अफाट शक्ती, साद घालतो तो नव्या साहसाचा आवाज.
१४ फेब्रुवारीचा खादाडि कट्टा, सांदण दरीचं स्वप्न जागवुनच संपला होता. बरोबर २९ दिवसांनी १३ मार्चला पहाटे साडेचार वाजता घरुन मिंटीमधुन निघालो, धमु, गणेशा, मनराव व शेवटि वल्ली, असे एकुण पाचजण बरोबर सहाला पुण्याच्या बाहेर पडलो.

मोशीमार्गे नाशिक हायवेला लागलो. आधी सिओसिओ पंप दिसल्यावर मिंटीची पोटापाण्याची व्यवस्था करुन पुढे नारायणगावापर्यंत थेट गेलो. इथं राजकमल या प्रसिद्ध मिसळ जाईंट्वर थांबलो.

पोटभर मिसळ हादडुन निघालो ते थेट रतनवाडीलाच थांबलो. मध्ये वाटेत गणेशाचा मित्र ह्रुषीकेश, त्याच्या बहिणिसह आम्हाला जॉईन झाला होता.
रतनवाडीचं अम्रुतेश्वराचं देउळ,समोरची पुष्करिणि इथं एक तास भर घालवुन भरपुर फोटो काढले,










मग निघालो आजच्या मुख्य ठिकाणाला. - सांदण दरी, फारसा परिचित नसलेला हा एक चमत्कार आहे. त्याचं यथाशक्ती वर्णन वर आलं आहे. पर्यटकांची अजुन एवढी वर्दळ नाही. तसा हा भाग वाहतुकिच्या मानानं मागास आहे. जे खरंच चांगलं आहे.
परत येताना बराच उशीर झाला होता मग जेवण आळेफाट्याला करुन व्यवस्थित घरी आलो.
माझी ही मिपा ग्रुपची दुसरी सहल, साठा उत्तरी कहाणि ज्यांच्यामुळं द्वि उत्तरी सुफ़ळ संपुर्ण झाली आहे, त्या सर्वांना म्हणजे धमाल मुलगा, वल्ली, मनराव आणि गणेशा यांना मनापासुन अतिशय धन्यवाद.
ह्रुषिकेश आणि त्याच्या बहिणिला तर खास धन्यवाद, न विसरता केलेल्या लिंबु सरबतासाठी.
बाकी फोटोच्या लिंक खाली देत आहे.
फोटोंसाठी वल्ली,मनराव व धमु   सर्वांना अतिशय धन्यवाद. 

2 comments:

Deepak Parulekar said...

मस्तच ! सहीच वर्णन केलयंस ! लवकरच सांदण दरीला भेट द्यायचा विचार आहे! फोटु तर झक्कास आलेत !!

rajiv said...

odh lavlis gadya !!
vitthalachya bhetila jaylach havay!!

Post a Comment