Saturday, November 27, 2010

कट्यार काळजांत घुसली

किंचित मंद उजेड, दोन बॆठका, एक तसबिर,मागच्या कोनाड्यात मुरलीधराची मुर्ती आणि कुणाची तरी कुठेतरी जायची तयारी  चालु आहे.  अरे हि तर उमा, घर सोडायची तयारी करते आहे. हो पण तिच्यावर हे घर सोडायची वेळ का यावी? जाउन विचारावं का?  नको ही मोठ्या घरची माणसं आपण आपलं थोडं हातभर अंतर राखुनच रहावं. हे काय दिवाणजी पण आले, म्हणजे नक्की काहीतरी झालंय त्याशिवाय अशा मोठया हुद्द्यावरची माणसं सहजासहजी दिसत नाहीत होत हो.

थांबा थोडं इथंच आणि पाहु काय आहे प्रकार तो. काय ! छे छे हे कसं होईल, अशक्य असं कसं झालं. म्हणजे आता मला संगीत्तातलं काही कळत नाही पण पंडित भानुशंकर म्हणजे विश्रामपुरची शान होते, ते हरले कालच्या मॆफलित,आणि ते ही खानसाहेबांकडुन.

होय मित्रांनो, मी कट्यार काळजांत घुसली बद्दल बोलतोय. काल गेलो होतो पाहायला, बालगंधर्वमध्ये. यातली पदं माहित होतीच पण प्रत्यक्ष नाट्क पाहायचा योग काल आला, राहुल देशपांडेंनी खानसाहेबाची भुमिका केली आहे. आता नाटक दोन अंकी आहे, म्हणजे आधि किती मोठं होतो मला माहित नाही पण मोठं असावं असा अंदाज.

संगीत नाटक ही संस्था जिवंत राहिली पाहिजे, त्यासाठी या आमच्या पिढितली जे कलाकार उभे आहेत त्यापॆकी राहुल देशपांडे एक, त्याबद्दल त्यांचे अतिशय धन्यवाद व अभिनंदन. बाकी खेळ चांगला झाला. इतर कलाकारांची नावे काही लक्षात राहिली नाहीत, म्हणजे मध्यंतरात आम्ही वडे खायला गेलो होतो ना त्यामुळं थोडं चुकलंच.

सदाशिवची भुमिका करणारा अभिनेता पण खुप छान म्हणत होता पदं, खास करुन शेवटचं, खानसाहेबांनी अर्धवट ठेवलेलं ’ सुरत पियाकी’ जेंव्हा तो पुर्ण करतो ना ते अतिशय सुंदर म्हणलं.

तो आणि राहुल, या दोघांच्यात पदं म्हणताना होणा-या हालचाली आक्रमक होत्या, ही शास्त्रिय गायकांची पद्धत असते की संगीताची जादु माहित नाही, कारण माझे पण हात आपोआप हलत होते. मध्यंतरात काही जुन्या (म्हाता-या) पुणेकरांकडुन अंतु बर्वा आणि रावसाहेबांसारख्या प्रतिक्रिया ऎकायला मिळाल्या त्या अशा -

पुर्वी पदं पुर्ण म्हणायचे,ऎकलीत आम्ही, आता सगळे शॊर्टकट मारता आहेत.
राहुल वाटतो थोडा थोडा आमच्या वसंतरावांसारखा,पण तेजोनिधि गावं ते आमच्या अभिशेकीबुवांनीच हो.

मनांत म्हणलं, ह्यांना रथ पुढं सरकतोय याचं कॊतुक नाही तर त्याच्या वेगाबद्दलच शंका, असो उद्या आम्ही पण कुमार शानु आणि सुनिधिच्या गाण्यांबद्दल असेच बोलु,कोणि सांगावं.

बाकी माझ्यासारख्या ऒफिसला येताजाता कानाला इअरफोन लाउन हि गाणी ऎकणा-या साठी ती प्रत्यक्ष ऎकणे हा एक खुप छान योग होता. पार ’ लागी करेजवां’, ३ वेगवेगळ्या प्रकारानी गायलेलं ’ घेई छंद मकरंद’, ’ या भवनातील’ ’तेजोनिधि लोहगोल’,’ मध्येच आलेली रागमाला आणि शेवटचं ’ सुरत पियाकी’ ते ही दोन वेळा, एकदा खानसाहेबांच्या कडुन आणि नंतर सदाशिवाकडुन, म्हणजे आनंदाच मेळाच होता.

राजकवींची विनोदाची पखरण अतिशय उत्तम, त्या कलाकारानं अतिशय छान भुमिका केली आहे,’ आपल्या प्रेमळ परवानगीने आपला मुका’ हा द्वयर्थी संवाद लक्षात राहतो.

माझ्या स्वभावाला अनुसरुन काही तांत्रिक गोष्टी खटकल्याच, पंडितजी आणि खानसाहेब दोघांच्या तसबिरी तसबिर न वाटता फोटो वाटत होते. नेपथ्य थोडं अजुन सावरायला हवंय, विशेषत: हवेलीतल्या पाय-या रंगवायल्या हव्यात. तसेच, विंगेतुन येणारा प्रकाशामुळे कलाकार येण्याआधीच त्याची सावली रंगमंचावर येते,ह्या काही बाबी. खानसाहेबांचे दोन पुतणॆ प्रत्येकवेळी तानपुरा ठेवुन जाताना जी गडबड करतात तेंव्हा तो पडतो की काय वाटतो,त्याचं काहीतरी पाहायला हवं.

सदाशिव हवेलीत बद्री म्हणुन वावरतोय हे फक्त संवादातुनच सुचित केलं जातं हे थोडं खटकतं.तसेच राहुल देशपांडेंचा मेक अप ही जरा भडक वाटतो, केस सगळे काळे असताना डोळ्याखाली एवढि काळी वर्तुळं बरोबर वाटली नाहीत. अर्थात ही माझी मतं आहेत.

पण एकुणच या संगीत नाटकांच्या सुवर्ण काळात न जन्मल्याचा पश्चाताप जास्तच होतो आहे.

0 comments:

Post a Comment