Monday, January 14, 2013

अंकोदुहि - ०३


भाग - ०३
तेव्हाच ताईनं त्या धनुष्याला एक हिसका दिला अन कुठल्याश्या प्राण्याच्या आतड्याची असावी अशी ती खरखरीत प्रत्यंचा माझ्या हातातुन सरकन ओढली गेली, माझ्या हातावर अजुन एक रेघ ओढुन ...........
पुढं....

माझ्या हातातुन रक्त वाहणं थांबतच नव्हतं, मी.आई आणि धाकट्या बहिणींबरोबर त्या खोलीबाहेर पडले, बाहेर सगळेच उत्सुक होते आत काय आहे आणि काय चाललं आहे ते पहायला, समजुन घ्यायला. त्याचवेळी आम्हा चौघींचं असं बाहेर पडण्यानं थोडा गोंधळ झाला. थोड्याच वेळात वैद्य औषधी लेप घेउन आले, तोपर्यंत आईनं हात धुतला होता, तो लेप हातावर लावल्यावर चंदनाचा स्पर्श एकदम थंड वाटला,मात्र थोडया वेळानं जसजसं त्या लेपामधलंते औषध जखमेपर्यंत पोहोचायला लागलं आग आग व्हायला सुरुवात झाली. आईच्या मांडीवर डोकं ठेवुन मी झोपले होते ती बराच वेळ. जाग आली तेंव्हा दिवस मावळलेला होता, खोलीत समया लावलेल्या होत्या त्यांच्या शांत उजेडानं जरा बरं वाटलं. आईला देखील झोप लागली होती. माझ्या हालचालीनं ती उठली, मग उठुन दोघींनी आवरलं. हातावरचा लेप वाळुन निघुन गेला होता. पलंगाच्या बाजुला त्याच्या खपल्या पडल्या होत्या, एका  सखीनं येउन सगळं साफ केलं.

मला काकांना आणि बाबांना भेटायचं होतं, तसं मी आईला सांगितल्यावर तिनं कुणाला तरी तिकडं पाठवलं. दोघंही काही कामात होते, तोपर्यंत काकुकडं गेले. ती आणि ताई दोघी बाहेर बागेत फिरत होत्या. मला बघताच ताई पळत आली आणि माझा हात हातात घेतला, तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातनं दोन आसवं गळाली माझ्या हातावर आणि पुन्हा तेच झालं, आधी शीतलता आणि नंतर जळणं. मला वाटलं होतं, ताई तिच्या चुकीबद्दल काहीतरी बोलेल पण तसं काहीच झालं नाही, पण त्या धनुष्याबद्दलच बोलत राहिली. पेटीबद्दल एक चकार शब्द नव्हता तिच्या बोलण्यात. ते धनुष्य म्हणे योगी परशुरामांनी काकांना दिलं होतं, आणि त्यांना ते प्रत्यक्ष भगवान शंकरांनी दिलेलं होतं. खरं असावं असं मला तरी वाटलं नाही. खरं आश्चर्य या पुढंच होतं, ते धनुष्य आमच्या घरातल्या कुणीच आजपर्यंत वापरलेलं नव्हतं. काका एका विशिष्ट दिवशी त्याची पुजा करत तेवढंच. काही दिवसांपुर्वी एका ऋषींच्या करवी काही निरोप पोहोचला होता काकांकडे आणि त्यानुसार ही आजचा समारंभ साजरा झाला होता.

संध्याकाळचा शेवटचा प्रहर संपल्याचं नगा-यांच्या आवाजानं लक्षात आलं, आता आमच्या वाड्याचे सगळे दरवाजे बंद होणार,उदया सुर्योदयापर्यंत ते बंद्च राहणार. आजच्या समारंभाच्या नियमांनुसार बाबा आंणि काकांना सुर्यास्ताच्या आधीच भोजन करणं गरजेचं होतं, त्यासाठी काकु मगाशीच आत गेल्या होत्या. कारंज्याबाजुच्या पाय-यांवर बसुन मी आणि ताई त्या धनुष्याबद्दलच बोलत होतो. मला त्या ताईच्या पेटीबद्दल अजुन ऐकायचं होतं, पण ती अजिबात तो विषय काढु देत नव्हती. तिनंच सांगितलं की, आज काकांनी तिच्या स्वयंवराची घोषणा केली आहे, ' जो क्षत्रिय पुरुष, त्या धनुष्याच्या प्रत्यंचा चढवुन दाखवेल अशाशीच तिचं लग्न होणार होतं'. यापुर्वी लग्नाचा विषय निघाला की ताई थोडीशी गुपचुप असे, पण आज तिच्या चेह-यावर एक वेगळीच लकाकी होती, डोळ्यात एक वेगळाच भाव होता, थोडा आनंदाचा. ज्याच्याबद्दल मला असुया वाटायला लागली होती. आतुन आईची हाक आल्यावर आम्ही दोघी उठुन आत गेलो. माझ्या खोलीकडं जाताना बाबांच्या खोलीकडं माझी नजर गेली, तिथं सख्या आता समयांच्या वाती नीट करत होत्या, म्हणजे बाबा तिथं नव्हते. मला जे विचारायचं होतं ते आज राहुन जाणार होतं हे नक्की.

रात्री जेवताना थोडासा त्रास झाला हाताला, जेवण झाल्यावर पुन्हा आईनं हाताला लेप लावला, ती माझ्या खोलीतुन निघाली तशी मी तिला अडवलं, ' आई थोडा वेळ बस ना ?' मी तिला विचारलं. ती थांबली, मागं न वळता तिनं विचारलं ' मला उत्तरं देता येणार नाहीत असे प्रश्न विचारणार असशील तर मी थांबुन काय उपयोग?' तिला काहीतरी लपवायचं होतं असं वाटलं नाही, उलट ती मला मर्यादांच आणि त्या पाळण्याचं प्रात्याक्षिक देत होती. ' हो आहेत असे काही प्रश्न, पण त्यांची उत्तरे दिली नाहीस तरी चालेल मला'  आई मागं वळली तेंव्हा तिच्या डोळ्यात पाणी असेल असं वाटलं, पण तसं नव्हतं. अजुन एक प्रात्यक्षिक, कसं जगायचं याबद्दल.  मी पलंगावर एका बाजुला होउन बसले आणि आईला जागा करुन दिली.  तिनं खोलीच्या बाहेर उभ्या असलेल्या सखीला बोलावुन  तिला विचारल्याशिवाय कुणालाही आत पाठवु नये असं सांगितलं. यावरुन मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहित तरी ते मला विचारता येतील याची खात्री आईनं दिली मला.

'आई, स्वयंवर म्हणजे, उपस्थित आणि योग्य अशा वरांपैकी आपल्याला आवडेल आणि योग्य वाटेल अशा एकाची निवड करणं, होय ना? ',  ' होय, क्षत्रियकुळांमध्ये स्वयंवराचा हाच अर्थ असतो' - आईला या विषयावर प्रश्नाची अपेक्षा होतीच बहुदा, तिनं शांतपणं सांगितलं. ' मग ताईच्या स्वयंवरासाठी तो धनुष्याचा पण का?, तिला अशा वराची निवड करण्याचं स्वातंत्र्य नाही ? स्वयंवराच्या दिवशी एखादा क्षत्रिय पुरुष जर ताईला योग्य वाटला, आवडला, पण त्याला त्या धनुष्याला प्रत्यंचा नाही चढवता आली तर ताईला त्याच्याशी लग्न नाही करता येणार, असंच ना ?'- माझा पुढचा प्रश्न तिच्या उत्तराची वाटच पाहात होता. थोडंसं थांबत आई सावरुन बसली, तिनं उत्तरं दिली नसती तरी मला चालणार होतं, म्हणुनच तिच्या उत्तराची अपेक्षा न करता मी पुढचा प्रश्न विचारला ' म्हणजे तो क्षत्रिय पुरुष त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवु शकेल, पण तो ताईला योग्य वाटला नाही किंवा आवडला नाही तरी तिनं त्याच्याशीच लग्न करायचं का ? , का त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवु शकणं ही या स्वयंवराची एक  पुर्व पात्रता आहे, जर असे एकापेक्षा अनेक क्षत्रिय पुरुष असतील जे ही गोष्ट सिद्ध करु शकले तर त्या अनेकांपैकी एकाची निवड ताईला करता येईल.? का पहिला क्षत्रिय पुरुष हे सिद्ध करु शकला तर स्वयंवर तिथंच थांबेल. ?

माझं बोलणं थांबलेलं पाहुन, आई हसली. मला सतावणारे एवढे प्रश्न विचारत असताना आई एवढी शांत कशी राहु शकते याचं मला आश्चर्य वाटत होतं. पलंगाच्या मागच्या नक्षीकामाला रेलुन बसल्यानं आईचं उत्तरीय खाली ओघळलं होतं, ते हातानं सावरुन घेत तिनं बोलायला सुरुवात केली. ' हे पहा बाळा, तु मला चार प्रश्न विचारले, हो ना. त्या प्रत्येक प्रश्नात एक शब्द वारंवार येतो आहे, तो कोणता यावर जरा विचार कर, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझी तुलाच मिळतील. मी काही न सांगता देखील.' एवढं  बोलुन ती पलंगावरुन खाली उतरली, माझ्या मस्तकावरुन हात फिरवत म्हणाली ' बाळा, मला तुम्हा तिघींच्या  भविष्याची काळजी वाटते, ज्यांचं आयुष्य जन्मापासुनच अविश्वासनिय आहे, असामान्य आहे त्यांच्याबद्दल आपण सामान्यांनी काय बोलावं, का विचार करुन आपली मति कुंठित करुन घ्यावी.?' झोप आता, तुझ्या  जेवणामध्ये तुला गुंगी यावी असे काही पदार्थ मी मुद्दाम घातले होते, आणि हो हाताची जास्त हालचाल नको होउ देउ.' एवढं बोलुन तिनं पलंगाच्या बाजुच्या समईतल्या दोन वाती फुंकर मारुन शांत केल्या, अन ती बाहेर जायला निघाली.

माझ्याच प्रश्नातला एक शब्द, माझ्या भविष्याचीच काळजी,  आम्हां तिघींचं सामान्य असणं, ताईचं असामान्यत्व या सर्वांनी माझ्या डोक्यात पुरता गोंधळ माजवला होता त्या चार क्षणांत. या सर्वात माझे प्रश्न कुठंतरी बाजुलाच पडले होते. मी फक्त घटनांच्या परिणामांचा, आणि त्यादेखील समोर घडणा-या आणि मला दिसणा-या परिणामांचा विचार करत होते, तर आई त्या घटनांच्या मागं घडलेल्या आणि घडवुन आणलेल्या कारणांबद्दल बोलत होती. आई खोलीतुन बाहेर पडणारच होती, तेवढ्यात या विचार चक्रातुन बाहेर येत  मी तिला विचारलं, ' आई, मला काही समजलं नाही, तु काय समजावते आहेस ते, आणि ते समजल्याशिवाय मला झोप देखील येणार नाही, किमान तो शब्द कोणता ते तरी सांगुन जा'. दरवाज्याच्या चौकटीचा आधार घेत आई थांबली, एक पाय उंबरठ्यावर होता, तशीच मान मागं वळवुन माझ्याकडं पाहिलं, तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली  होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' ....

Tuesday, December 18, 2012

अंकोदुहि - ०२


भाग - ०२
दर चार दिवसांत ताईच्या बोलण्यात मात्र त्या खोली उघड्ण्याचा विषय यायचा, मग माझा तो दिवस घाबरुनच जायचा, माझा पडलेला चेहरा बघुन ताई धीर द्यायची पण मनातली भीती काय अशी जाते काय छे...
-...
एक दिवस आम्ही मैत्रिणिंसोबत बसलो होतो बोलत तेंव्हा त्या खोलीबद्दल बोलणं चाललं होतं, माझी एक मैत्रिण जिचे बाबा आमच्या गावातले मोठे तालेवार सोनार होते, ती म्हणाली की ' अगं माझे बाबा सांगत होते, तुझ्या काकांनी एक मोठा चौरंग सोन्यानं मढवुन घेतला आहे आणि जेंव्हा पासुन तो चौरंग त्यांनी तुमच्या वाड्यावर पाठ्वुन दिला त्यानंतर तो बाहेर कधीच दिसला नाही तुमच्या घरात पुन्हा, तोच असेल तिथं त्या खोलीत ? मला तरी असा एखादा खुप मोठा  चौरंग घरात कधी पाहिल्याचं आठवत नाही आणि तो देखील सोन्यानं मढवलेला तर मुळीच नाही, कारण सोन्या-चांदीची तशी कमतरता नाहीच आमच्याकडे. अगदी दररोजची जेवणाची ताटं सुद्धा चांदीची आहेत. मी ताईकडं पाहिलं,ती सुद्धा गप्पच होती म्हणजे तिला सुद्धा त्या चौरंगाबद्दल काही माहित नव्हतं. म्हणजे त्या खोलीत नक्कीच तो चौरंग असणार.
आणि अशातच एके दिवशी सकाळी स्वयंपाकघरात काम करत असताना ती बातमी कळाली, अजुन सहा दिवसांनी ती खोली उघडणार असल्याची. माझी पाच रात्रींची झोप उडाली. त्या दिवशी सगळ्या घरात एकच धामधुम होती,कितीतरी लोकं आली होती. आज ब्राम्हण सुद्धा खुप जास्त होते, देवघराच्या बाहेर त्या खोलीच्या मागे एक मोठा मंडप घातला होता तिथं कसलं तरी हवन चालु होतं पहाटेपासुनच. एकंदर सगळं शुभ वातावरण होतं, माझ्या मनात मात्र कुठंतरी दाटलेली भीती परत परत वेडावुन दाखवत होती. ताईला काही बोलणं शक्यच नव्हतं, तिला सगळ्यात जास्त आनंद झाला होता, मी दोन्ही धाकट्या बहिणिंना बोलुन दाखवलं तसं, त्यांची अवस्था देखील माझ्यापेक्षा फार वेगळी नव्हती. उत्सुकता आणि भीतीच्या सावल्या त्यांच्या चेह-यावर आलटुन पालटुन दिसत होत्या. 
त्या खोलीत काय  असेल याबद्दल आम्ही बरेच अंदाज बांधलेले होते, त्यांची सत्यासत्यता तपासुन पाहायची होती. आमच्या घरातल्या पुरुषांना त्या खोलीत काय आहे याची कल्पना होतीच पण बायका कधी त्या खोलीत गेल्याचं ऐकलं देखील नव्हतं, आई आणि काकु तर त्या खोलीचा विषय निघाला की गप्प गप्प राहायच्या. आमच्या मैत्रिणिंकडुन काही अर्ध्या मुर्ध्या गोष्टी कानावर येत होत्या पण त्याबद्दल देखील आई किंवा काकुकडं बोलणं शक्य नव्हतं. एक शक्यता त्या चौरंगाची होती, पण कशासाठी असेल तो चौरंग आणि काय असेल त्यावर, एखाद्या देवाची प्रतिमा की आमच्या कुलदेवतेच्या विशिष्ट पुजेसाठी तो चौरंग बनवलेला असेल काय माहित.
सुर्य पुर्ण माथ्यावर येइस्तोवर पुजाअर्चा, हवनं चालु होती, मग नैवेदय झाले आणि तो क्षण आला, दोन तीन ब्राम्हणांनी मोठ मोठ्यानं मंत्र म्हणत त्या बंद दरवाज्यवरच्या प्रतिमेची पुजा केली आणि मग काकांनी ती प्रतिमा त्या दरवाज्यावरुन बाजुला केली. खोलीच्या दरवाज्यावर त्या प्रतिमेमागचा भाग तेवढा स्वच्छ राहिला होता, आणि प्रतिमेला वाहिलेल्या कुंकुवामुळं एक लाल चौकट तिथं तयार झालेली होती, अशी चौकट जिच्यातुन बाहेर पडणं अवघड होतं. काकांनी मागं सरकुन त्या दरवाज्याला साष्टांग दंड्वत घातला अन उठता उठता खांद्यावरचं उपरणं काढुन कमरेवर बांधुन घेतलं घट्ट, बायकांच्या बाजुला सगळ्यात पुढं काकु, आई होत्या, त्यमागं ताई अन मी ताईच्या मागं उभी होते. ती विस्फारल्या डोळ्यांनी सगळं पाहात होती तर मी डोळे किलकिलेच केलेले होते. काकांनी दोन्ही हात उंचावुन सुर्यदेवाच्या स्तुतीचे मंत्र म्हणले, मग दोन्ही हात छातीवर घट्ट नमस्कारात धरुन शिवस्तुतीचे एक दोन मंत्र म्हणले आणि मग आपल्या बलदंड हातांनी ते दार आत ढकललं.
दार उघडता क्षणी एक वेगळाच वास तिथं भरुन राहिला , दोन ब्राम्हण दोन समया घेउन आत गेले आणि क्षणार्धात ती खोली प्रकाशानं भरुन गेली.  त्या खोलीत दोन वस्तु होत्या व्यवस्थित कापडानं गुंडाळुन ठेवलेल्या. आणि त्या दोन्ही एका मोठ्या चौरंगावर ठेवलेल्या होत्या. तोच तो सोन्यानं मढवलेला चौरंग, वरुन मोठं कापड पांघरलेलं असलं तरी त्याचे पाय दिसत होते खाली मोकळे आणि त्यावरुन अंदाज येत होता तो किती मोठा असेल याचा.  आत जाउन ब्राम्हणांनी समया खाली ठेवल्या आणि बाहेर येउन पुजेचं ताट घेउन आत गेले, काका आणि बाबा त्या खोलीच्या उंब-याला नमस्कार करुन आत गेले  आणि त्या चौरंगावरचं कापड बाजुला केलं. त्या चौरंगावर पुढच्या बाजुला एक लाकडी पेटी होती, खुप छान नक्षीकाम केलेली. पेटीचा आकार देखील मोठा होता जवळ्पास दोन हात लांब आणि एक हात रुंद होती ती पेटी, उंचीला देखील दोन हात उंच होती. काका आणि बाबांनी त्या चौरंगावरच्या दोन्ही वस्तुंना नमस्कार केला, ब्राम्हणांचं अनुक्रमे भुमिस्तवन आणि शिवस्तुती म्हणणं चालु होतं. त्या पेटीची पुजा केल्यानंतर, काका आणि बाबा मागच्या बाजुला गेले, तिथं काय आहे ते बाहेरुन दिसत नव्हतं.
पुजा झाल्यावर दोन्ही ब्राम्हण बाहेर आले, अजुन दोन समया खोलीत ठेवुन परत बाहेर आले, आतुन बाबांची हाक आल्यावर आम्ही सगळ्या बायका आत गेलो, तो उंबरा ओलांडतानाच मला एवढी भीती वाटत होती की मी ताईचा हात घट्ट पकडला, पण तिनं एका झटक्यानं तो बाजुला केला आणि चटकन आत गेली. दोन क्षण मी त्या उंब-यावरच घुटमळले, नाईलाज होता म्हणुन पाय आत टाकले. चार समयांच्या उजेडात ती खोली प्रकाशित झालेली होती, समोरचा सोन्यानं मढवलेला चौरंग झळाळुन निघाला होता, मी आत येताच बाबांनी दरवाजा बंद केला. आता खोलीत आम्ही आठच जण होतो आणि समोरच्या चौरंगावर ठेवलेली ती भलीमोठी पेटी आणि त्यामागं काय होतं ते मलातरी अजुन दिसलं नव्हतं. एक तर मी अजुन सुद्धा चौरंगापासुन बरीच लांब होते आणि त्यावरचं कापड अजुन तसंच होतं. सगळ्याजणी बाबांच्या बाजुला जाउन उभारल्यावर लक्षात आलं की मी एकटीच आहे एका बाजुला उभी असलेली, स्वेच्छेनं की बाकीच्यांनी मला एकटं सोडलं म्हणुन, पण अशा विचारांवर मनातल्या भीतीनं कधीच मात केली होती.
मी आता काकु आणि आईच्या मागं उभी होते, आणि समोर चौरंगाच्या दुस-या बाजुला काका आणि ताई उभे होते. ताईनं काकांकडे पाहिलं, तिच्या नजरेनंच परवानगी मागितली अन काकांनी डोळ्यांनीच हो म्हणलं, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, मी एकदम चमकले, काकुकडं पाहिलं ति देखील रडत होती, आई पण,बाबा पण. अरे पण का,का रडत आहेत सगळे, काही कळेना. विस्फारल्या नजरेनं जे होतंय ते पाहात राहिले. ताई पुढं आली तिनं त्या पेटीला नमस्कार केला अन ती उघडली, काही क्षण ती तशीच बसुन होती त्या पेटीसमोर, एकदम तिनं काकुला विचारलं ' खरंच या पेटीतच होते मी, अगदी खरं ना, का थट्टा करताय तुम्ही सगळे माझी? ' काकांनी निशब्द मान हलवली, काकु पटकन पुढं होउन ताईकडं गेली, तिला उठवुन आपल्या मिठित घेत म्हणाली ' होय बाळा, तु याच पेटीत होतीस, जेंव्हा आम्हाला सापडलीस तेंव्हा, आजपर्यंत हे सत्य तुला सांगितलं नव्हतं, पण कधीतरी ते तुला समजणारच होतं म्हणुन तुम्ही सगळ्याजणी मोठं होण्याची वाट पाहात होतो, कारण तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्यावरच की अशा गोष्टी समजावुन घेउ शकाल म्हणुन.'
आम्हां तिघिंसाठी हा आश्चर्याचा धक्का होता, म्हणजे ताई काका-काकुंची मुलगी नाही, ती त्यांना सापडली होती या पेटीत. एका क्षणात माझ्या डोळ्यासमोरुन आतापर्यंतचं आमचं सगळं आयुष्य सरसरत गेलं, प्रत्येकवेळी ताईला मिळणारी वेगळी वागणुक, ती मोठ्या काकांची मुलगी आहे म्हणुन मिळत असेल अशी माझी समजुत होती पण त्यामागचं कारण हे होतं खरंतर. ' आणि ते मागं काय आहे ?' माझ्या धाकट्या बहिणिनं विचारलं. अशा वेळी खुप छोटं असणं फार फायद्याचं असतं, खोट्या मोठेपणाचे मुखवटे वागवावे लागत नाहीत चेह-यावर. एका बाजुनं बाबा आणि एकाबाजुनं ताई पुढं झाली, आता मलादेखील तिकडं जायचं होतं, पण पुढं होताना काकुच्या पायावर पाय पडला आणि तिथंच थांबले. तिथुन पुढं जाईपर्यंत ते जांभळ्या रंगाचं कापड बाबांनी सरसरत ओढलं होतं, आणि मी पहिल्यांदाच एवढं मोठं धनुष्य पाहिलं, एवढं मोठं म्हणजे बाबांच्या धनुष्यापेक्षा मोठं पण एकदम साधंसंच, एखाद्या भिल्लाचं असावं तसं. दोन टोकांना मात्र दोन माणकं लावलेली होती, तीसुद्धा करड्या रंगाची.
समोर ठेवलेल्या समयांच्या प्रकाशात त्या धनुष्याच्या अर्धवर्तुळांच्या सावल्या भिंतीवर पडल्या होत्या, त्या सर्पासारख्या दिसत होत्या आणि टोकाला लावलेली ती करडी माणकं त्या सर्पजिव्हेसारखी लवलवत होती, कितीतरी काळ या खोलीत बंद असुन देखील त्या धनुष्यावरची चमक कमी झालेली नव्हती, साधारणपणाचा एकही गुण त्याच्यात दिसत नव्हता. आता मी जाउन ताईच्या मागं उभ्री राहिले होते. ' मी उचलु हे धनुष्य ?' मी काकांकडं पाहात विचारलं, त्यांच्या थकत चाललेल्या डोळ्यांत देखील एक चमक होती, नजरेनंच त्यांनी मला होकार दिला, मी ताईच्या मागुन पुढं झाले. खांद्यावरुन खाली घसरु लागलेलं उत्तरीय कमरपट्ट्यात खोचलं आणि त्या धनुष्याला वाकुन नमस्कार केला. दोन्ही हात त्या अर्धवर्तुळांच्या मध्यभागी ठेवले आणि ते धनुष्य उचललं, दोन पावलं मागं आले चौरंगापासुन. वाटलं होतं तसंच ते वजनदार होतं ते आणि जर उभं धरलं असतं तर जवळपास माझ्या एवढीच त्याची उंची झाली असती, त्याच्यावर कपाळ टेकवुन ते पुन्हा चौरंगावर ठेवायला गेले आणि माझाच तोल गेला, मला वाटलं ते धनुष्य आता खाली पडेल, मोठा आवाज होईल पण तसं झालं नाही. तोल सावरुन मी वर पाहिलं तो ताईनं ते माझ्यापेक्षाही सहज पेललं होतं, ते सुद्धा एकाच हातानं अगदी त्याच्या मध्यभागी धरुन, माझ्याकडं पाहुन ती हसत होती, मी खाली वाकुन माझ्या पायात गुंतलेली त्याची प्रत्यंचा सोडवत होते, तेव्हाच ताईनं त्या धनुष्याला एक हिसका दिला अन कुठल्याश्या प्राण्याच्या आतड्याची असावी अशी ती खरखरीत प्रत्यंचा माझ्या हातातुन सरकन ओढली गेली, माझ्या हातावर अजुन एक रेघ ओढुन ...........

Wednesday, December 5, 2012

अंकोदुहि - ०१



मी, बाई होते म्हणुनी. म्हणुन लग्न झाल्यावर नव-याच्या घरी यावं लागलं, पुरुष असते तर मला घर नसतं बदलायला लागलं. कसली मज्जा लग्नात, किती लोकं, किती माणसं, मित्र, शत्रु, जवळ्चे,लांबचे सगळे आले होते. आई बाबा किती आनंदात होते. तशी कधी बाबांनी किंवा आईनी आमच्या, म्हणजे आम्हा बहिणींच्या लग्नाची काळजि केल्याचं आठवत नाही मला. एकत्र कुटुंब आमचं. माझे आईबाबा, मोठे काका काकु, त्यांची मुलगी, सगळं किती मस्त होतं. सगळ्याजणी एकत्र राहायचो, एकच मोठं घर होतं आमचं. घर कसलं राजवाडाच होता तो. पण घर म्हणलं की जीवाच्या जवळचं वाटतं.
आम्ही सगळ्या जवळपास एकाच वयाच्या, एक दोन वर्षांचा फरक असेल . घरात खाण्यापिण्याची ददात नव्हती पण शिस्त देखील तेवढीच, तसं आमचं घर जुन्या वळणाचं, संस्कारांचं होतं. सकाळी लवकर उठणं, आवरणं, मग देवघरात जाउन बसणं, कधी मोठे काका तर कधी  बाबा पुजा करत असायचे. म्हणजे ब्राम्हण असायचे पुजा सांगायला, ते सांगतील तसं काका,बाबा करायचे, मध्ये मध्ये ते मंत्र म्हणायचे. आम्ही परकर पोलक्यात गप्प मागं बसुन राहायचो, समोरच्या प्रतिमेच्या गळ्यातले  हार, पायातले पैंजण बघत. त्यांना म्हणे पैंजण म्हणायचं नाही असं आई सांगायची, ते तोडे आहेत. पायात म्हणजे पैंजण आणि हातात म्हणजे कंगन एवढंच कळायचं वय होतं आमचं.   देवाच्या घरात, आम्हाला सगळीकडं फिरता यायचं नाही. तिथं सगळ्यात पुढं ब्राम्हण मग पाठमोरे बाबा किंवा काका आणि त्यामागं थोडं अंतर सोडुन आम्ही असायचो.
मध्ये मध्ये आई नाहीतर काकु यायच्या, देवाच्या जेवणाचं घेउन, त्याला म्हणे नैवेद्य म्हणायचं पण असायचं काय त्या ताटात, छे काय नसायचं ते विचारा, पार ताज्या ताज्या फळांपासुन गरम गरम पु-या अन दाट खीर असायची. त्या खिरीवरच्या तुपाचा असा मस्त वास यायचा की कधी एकदा पुजा संपते आणि आम्हाला प्रसाद मिळतो असं व्हायचं. देवघराच्या आत उजव्या बाजुला एक दरवाजा होता, त्याला मात्र नेहमी कुलुप असायचं. त्या दरवाज्यावर एक मोठी प्रतिमा होती, जिची पुजा केली जायची दररोज त्या लालभडक कुंकुवानं अन लालभडक फुलांनीच. पण दरवाजा उघडलेला आम्ही ती कधीच पाहिला  नव्हता. मला तर त्या प्रतिमेतल्या साधु बाबाचीच भीती वाटायची, म्हणुन मी कधी कुणाला विचारलं देखील नव्हतं त्या दरवाज्याबद्दल. पण एके दिवशी मात्र, आम्ही नेहमीप्रमाणे पुजा झाल्यावर नमस्कार केला आणि बाहेर निघणार प्रसाद घेउन तेवढ्यात काकांच्या मुलीनं विचारलं ' बाबा, त्या खोलीत काय आहे ? अजुन मोठे देव आहेत का आत ? तुम्ही पाहिलेत का ते ? ' आणि क्षणांत तिथले सगळेच जण स्तब्ध झाले. काका, पुजा सांगायला आलेले ब्राम्हण, काकु,  माझी आई सगळेच जण, आम्ही तर हातातला प्रसाद खायचं देखील विसरलो. काही वेळाच्या शांततेनंतर काकांचा आवाज आला ' बाळा, आपण ती खोली वर्षातुन एकदाच उघडतो, आतले देव ज्या दिवशी आपल्या घरी आले ना, त्या दिवशीच. आणि या एक दोन वर्षात वर्षी तुम्हाला कळेलच आत काय आहे ते, या गोष्टी समजण्याएवढं मोठ्या व्हालच तुम्ही तोपर्यंत, ठीक. चला पळा आता, गुरुजी येतील ना शिकवणीला, पळा.'
काका एवढ्या सहजी ती खोली उघडुन दाखवायचं म्हणतील असं मला तरी वाटलं नव्हतं, पण ताईचा, म्हणजे काकांच्या मुलीचा चेहरा एकदम आनंदला होता, ती चालताना देखील उड्याच मारत होती. माझ्या मनात मात्र उत्सुकतेपेक्षा भीती जास्त होती त्या खोलीत काय असेल याची. एवढे दिवस त्या साधुबाबाची भीती आणि आता आत काय असेल याची भीती याचा अजुन जास्त गोंधळ माझ्या मनात व्हायला लागला. मी त्यादिवशी रात्री आईला विचारलं देखील, पण तिनं नुसतीच उडवाउडवीची उत्तरं दिली. म्हणे आमचं वय नाही अजुन, लहान आहोत असलंच काही. मला काही समाधान वाटलं नाही पण आईनं तिच्या कुशीत ओढलं तेंव्हा ती रडेल असं वाटत होतं, म्हणुन मी पण फार काही न विचारता झोपुन गेले. मला नाही आवडायचं  आईनं रडलेलं. कारण तिला पण नाही आवडायचं मी रडलेलं. बाबा किंवा काका जरी रागावले तरी आई आणि काकु किती समजुन घ्यायच्या. पण कधीतरी आई सुद्धा रागावायची मग मात्र मी काकुमागं जाउन लपायची. आणि आईला पण हे माहित होतं, ती यायचीच नाही काकुच्या खोलीत. मग काकु बोलता बोलता काय झालं ते माझ्याकडुन काढुन घ्यायची, आणि मग माझी समजुन काढुन परत पाठवायची  आईकडं. खरंच किती मजा यायची त्या वेळी.
मला वाटतं बहुधा दोन वर्षे गेली, आणि आमचं बालपण संपलं आम्ही मोठ्या झालो. निसर्गाचा जादुचा पिसारा उमलायला सुरुवात झाली होती. आमची खेळ्णी बदलली, खेळ बदलले, हल्ली घरात बसुन रहायला आवडेनासं झालं, बाहेर बागेत फिरावं,लांब कुठंतरी फिरुन यावं असं वाटायला लागलं. आणि एवढी वर्षे हे करत नाही म्हणुन ओरडणा-या आई आणि काकु आता हेच करु नका म्हणुन रागावायाला लागल्या. आम्हा चौघींचे बोलायचे बिषय बदलले, या घरापलीकडच्या जगाची स्वप्नं हळुहळु आकार घेत होती. एवढी वर्षे आम्ही सगळ्या मैत्रिणींच्या घरी जायचो खेळायला आता त्यावर पुर्ण बंदी आली, त्याच आमच्या घरी यायच्या. तेंव्हा देखील गप्पाच जास्त व्हायच्या. आणि खरंतर अशा गप्पांना जास्त वेळ मिळायाचाचं नाही. सकाळी उठुन आवरलं की आई आणि काकुला मदत करायला स्वयंपाकघरात जावं लागायचं, अजुन पदार्थ शिजवणं आम्हाला करावं लागत नव्हतं पण सगळी छोटी छोटी कामं आम्हाला करायला लागायची,तसं तर हे सगळं करायला नोकर चाकर होते, पण ' या वयात सगळं यायला हवं' या एका सुचनेखाली सगळं करावं लागायचं. तिथं देखील आम्ही चौघी नेहमी हसत खिदळतच असायचो, आमच्या गप्पा ऐकुन बरोबर काम करणा-या बायका देखील हसायच्या, मग आई नाहीतर काकु ओरडायच्या. लहानपणी त्या ओरडण्याची भीती वाटायची, हल्ली गंमत वाटायची. मुद्दाम असं काहितरी करावं वाटायचं ज्यामुळं त्या रागावतील.
दर चार दिवसांत ताईच्या बोलण्यात मात्र त्या खोली उघड्ण्याचा विषय यायचा, मग माझा तो दिवस घाबरुनच जायचा, माझा पडलेला चेहरा बघुन ताई धीर द्यायची पण मनातली भीती काय अशी जाते काय छे...
क्रमश :