Sunday, June 19, 2016

अंकोदुहि भाग् ०९

आज, वाड्यातला मोठा चौक सजवला होता, सर्व् बाजुंनी तलम् वस्त्रांचे पडदे अन् त्या जोडीला विविध आकाराची आसनं, वेगवेगळ्या पुष्परचना आणि खुप सारे सुगंधी द्रव्यांचे धुप त्या चौकात एका मंगल कार्याची चाहुल देत होते. तिस-या प्रहराला दशरथ राजा सहित, राम्, लक्ष्मण्, ऋषीगण, कुलगुरु आणि मंत्रिगणांचं आगमन झालं, बाबा स्वागताकरिता वाड्याच्या मुख्या प्रवेशद्वाराजवळच उभे होते. चौकात सगळे जण् आल्यावर, काकांनी सर्वांचं स्वागत केलं, ज्याला त्याला मानानुसार आसनांवर बसवलं गेलं, मध्याभागी दोन वर्तुळाकार आसनांवर् काका आणि राजा दशरथ बसले होते. जलपान् आणि मिष्टान्न सेवनानंतर बराच काळ चर्चा होत राहिली.
‘’ जनका, तुम्ही तुमच्या कन्येचं उभं केलेलं स्वयंवर माझ्या मुलानं जिंकले आहे, हे तुमचं आणि आमचं, सौभाग्यचं म्हणावं लागेल, या दोन्ही प्रचंड आणि बलवान राज्यांमध्ये जुळुन येणारा हा संबंध आपल्या सुरक्षित भविष्याची सुरुवात ठरेल हे नक्की. परंतु माझ्या एका मंत्र्यानं एक शंका उपस्थित केलेली आहे, त्याबद्दल आपण आपापल्या कुलगुरुंचा विचार घ्यावा असं मला वाटतं..
राजा दशरथांच्या शांत अन गंभीर आवाजानं तिथं उपस्थित असलेले सगळेजण मोहित झाले होते जणु,, ‘’ तुझी कन्या सीता हि तुमची निजकन्या नाही, तुम्हाला सापडलेली या भुमिच्या पोटात, तिचं उत्पतस्थान आणि वंश यांचा शोध लागणं फार कठिण आहे. अशा कन्येबरोबर् माझ्या ज्येष्ठ् राजपुत्राचा विवाह झाला, तर तो क्षत्रिय आणि अक्षत्रिय विवाह् ठरेल आणि वर्णभेद झाल्यानं आणि यानंतर माझ्या इतर तीन पुत्रांचा विवाह क्षत्रियकन्यांशी होणं ही गोष्ट अवघड होईल.
‘ परंतु महाराज दशरथांनी असा विचार करावा हे योग्य वाटत नाही ‘ काकांचा आवाज् सुद्धा तेवढाच शांत आणि विश्वासु होता. ‘ प्रत्यक्ष देवाधिदेवांच्या प्रसादानं आपणांस प्राप्त झालेले हे चार् पुत्र तेवढेच पराक्रमी अन् तेजस्वी आहेत., हा वर्णभेदाचा विचार एखाद्या अशक्त क्षत्रियानं केला पाहिजे, आपल्यासारख्या बलवान राजा आणि अयोध्येसारख्या शास्त्रनियंत्रक राजसत्तेसाठी असा विचार योग्य नव्हे.
‘योग्य आणि मान्य असा विचार तुम्ही पुढं ठेवला आहे राजा जनक, जसे आम्ही चार पुत्रांचे पिता आहोत तसेच तुमच्या शुभकुळात् देखील् अजुन तीन कन्या आहेत. या स्वयंवराने राम जानकीचा विवाह् सिद्ध झाला आहे, तसेच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा विवाह् त्या तिघिंच्या समवेत करुन हा शास्त्रोत्त्पन्न प्रश्न सोडवता येउ शकतो..’
एखाद्या गोष्टीचा फार खोलवर आणि दुरपर्यंत विचार करुन बोलल्याप्रमाणे राजा दशरथांनी त्यांचा विचार त्या छोट्याश्या सभेपुढे ठेवला. या शक्यतेचा कुणी विचारच केला नसावा, किंबहुना ताईचं स्वयंवर, ते धनुष्य या गोष्टी एवढ्या मोठ्या झालेल्या होत्या की त्यामागे असा काही विचार करावा हे देखील कुणाला सुचले नाही. अर्थात बाबा आणि आईच्या बोलण्यात ब-याच वेळा अशा प्रकारच्या चर्चा ऐकु येत हे खर्ं..
त्या दिवशी इतर काही विषय नव्हताच कुणाला बोलायला, नगरातल्या नागरिकांपासुन ते आमच्या मंत्रीगणांपर्यंत हा एकच विषय होता, ताईच्या वेगळेपणाचा प्रभाव एवढ्या प्रखरतेनं या पुर्वी कधीच जाणवलेला नव्हता. या सगळ्यांनं तिला एकाकी वाटु नये म्हणुन् मी तिच्या दालनात् गेले. ती नेहमी प्रमाणे शांत होती, मंचकावर झोपुन ती फार काही गहन विचार करत आहे असं जाणवलं मला, तरी देखील माझ्या चाहुलीनं ती उठली अन पश्चिमेच्या तिच्या आवडत्या गवाक्षात् जाउन् उभी राहिली, मी तिच्या जवळ जाउन थांबले, बाहेर सुर्य क्षितिजाला टेकला होता, कोणत्याही श्रेष्ठ रंगकर्मीन्ं कितीही तपस्या केली तरी शक्य होउ नये अशा रंगछटा तिथं पसरल्या होत्या, आणि दर क्षणाला त्यांच्यात असंख्य बदल होत होते, काहीशा वेगानं चाललेल्या वा-यांनी चुकार ढगांबरोबर खेळ चालवलेला होता.
तितक्यात सुर्यास्ताचा घंटानाद नगरात दुमदुमु लागला, आमच्या मागुन आलेल्या एका दासीनं घाईनंच त्या गवाक्षावरचा जाड गवताचा पडदा खाली पाडला अन् आम्ही दोघी पुन्हा कालच्याच पुष्करणिजवळ येउन बसलो, काहीही न बोलता, बरंच काही सांगितलं जात होतं अन् ऐकु येत होत्ं.. शेवटी ताईनंच सुरुवात केली.. ‘ का गं, तुम्हा क्षत्रियकन्यांना मान्य आहे का असा विना स्वयंवराचा विवाह,? स्वत्ः निवड करण्याचा तुमचा अधिकार तुम्हाला आहे, पण तो न वापरता येणं याला तुमची तयारी आहे?
‘स्वयंवराची गरजच आहे कशासाठी, तर एखाद्या स्त्रीला ज्या पुरुषाबरोबर आपल्ं आयुष्य व्यतित करायचं आहे, तिला तो पुरुष योग्य वाटतो किंवा नाही, हे समजुन् घेण्याचा हा अधिकार् आहे. यांत स्वातंत्र्य निवडीचं आहे, ‘ मी आईबरोबरच्या चर्चेतुन जे मला समजलं होतं त्याचा विचार करुन उत्तर दिलं..
परंतु, ही निवड करायची आहे, ती कोणत्या क्षमतांवर, त्या पुरुषाची युद्धसज्जता, परहत्या पराक्रम का संपत्ती का बौद्धिक संपन्नता अथवा प्रजननक्षमता.. माझ्यासाठी हा धनुष्याचा पण उभा केला गेला, पण जर हे धनुष्यच नसतं तर कशाच्या आधारावर मला माझ्या आयुष्याच्या जोडिदाराची निवड करावी लागली असती ? ताईच्या मनात असे बरेच प्रश्न होते तसे माझ्या मनात् देखील. त्यांची उत्तरं माझ्याकडंही नव्हती त्यामुळं मी शांत राहायचं ठरवलं. अशा वेळी शांतताच आपल्या प्रश्नांची उत्तरं देते किंवा कधी कधी त्या प्रश्नांचं अस्तित्वच मिटवुन टाकते.
मग असे प्रश्न पडुन राहतात शस्त्रागारांच्या अंधा-या कोप-यात पडुन राहिलेल्या वज्रांच्या पात्यांसारखे, त्यांच्या तुटलेल्या धारेला आता काहीही अर्थ उरलेला नसतो, आणि त्या मोडुन् पडलेल्या शराग्रांसारखे ज्यांच्या मागचे काष्ठांगही तुटुन गेल्यानं ते होउन राहिलेले असतात धातुंचे तुकडे, पुन्हा कधी एकदा तो अग्नी वितळवुन् टाकेल अन पुन्हा जन्म होईल या आशेवर.
आणि हो एकदा का हे अर्थहीन वाटणारे धातुंचे तुकडे वितळवले की मग मात्र त्यापासुन् पुन्हा बनतात तशीच शस्त्रे जी पुन्हा तेवढीच जीवघेणी असतात, तुम्हाला हवी असली तरी किंवा कसेही..

2 comments:

App Development Bangalore said...

very informative post for me as I am always looking for new content that can help me and my knowledge grow better.

GST Courses Delhi said...

Very great post. I simply stumbled upon your blog and wanted to say that I have really enjoyed browsing your weblog posts. After all I’ll be subscribing on your feed and I am hoping you write again very soon!

Post a Comment