Wednesday, November 28, 2012

तुझ्या गळा माझा गळा ' .........

ऑफिसच्या गारव्यातुन बाहेर येत लिफ्ट समोर उभं राहिलं की जरा बरं वाटतं, मन शरीराच्या आधीच बार मध्ये जाउन पोहोचलेलं असतं. खाली पार्किंग मध्ये येताना मी रोज विचार करतो, प्रत्येकवेळी बाहेर पडणं हे असं आधी खाली खोल खड्यात जाउन मगच असतं का ? कारण, आमच्या ऑफिसचं पार्किग मायनस ९ ला आहे. गाडी घेउन वर येताना प्रत्येक वळणावर गाडी घसरायची भीती वाटते, पण घसरलो कधीच नाही, बहुतेक त्या भीतीमुळंच माझा वेग आपोआप कमी होतो. बाहेर आल्यावर लगेच सिक्युरिटी समोर थांबावं लागतं, रोज नेमका इथं येउन थांबलो की मंद्याच्या फोन येतो. तो  सिक्युरिटी वाला बॅग उचकत असतो अन मंद्याची बोंबाबोंब चालु असते. केबिन मध्ये ती लेडिज गार्ड असेल तर मी फोन उचलतच नाही, 'जिगर मा बडी आग है, पर्यंत रिंगटोन वाजु देतो, तो बाहेरचा काळा ठोकळा अन ती लेडिज गार्ड वैतागुन जातात, संध्याकाळची स्रुरुवात मजेत होते.
मी आज सगळ्यांना सांगितलं, उद्याचा शुक्रुवार शेवटचा. त्यानंतर मी दोन वर्षे येणार नाही. प्रोजेक्टला बदली झाली आहे माझी. सगळ्यांना खुप हेवा वाटतोय, तोंडावरुन दिसतंय तसं. आज सगळे मिळुन मला त्यांच्या पेगमधला एक चमचा दारु माझ्या ग्लासात टाकुन कॉकटेल करुन देतात. एक लार्ज बुईथ सोडा, बॉटम्स अप. पाच मिनिटं काही सुचत नाही, मग ह़ळु हळु नॉर्मल होतो. तसं मला कधी चढत नाही दारु पण हे पाच वेग़ळ्या वेगळ्या एकत्र करुन म्हणुन थोडा त्रास झाला. सगळ्यांचा निरोप घेउन मी लवकर निघतो, प्रवासाची तयारी करायची आहे, मेडिकल टेस्ट करुन घ्यायच्या आहेत, तीन लसी  टोचुन घ्यायच्या आहेत. हे सग़ळं आवरुन घरी पोहोचायला अकरा वाजतात. दरवाजा उघडुन मी आत येतो, लाईट सकाळी अ‍ॅटो मोडला टाकले होते, ते चालु बंद होत राहतात माझ्या मागं मागं. दोन तासांत बॅगा भरुन होतात. मग दोन्ही गाड्यांच्या किल्या  घेउन मी खाली जातो, इथं पण खड्यात जावं लागतं मायनस ३ ला.  स्कॉर्पचं कव्हर काढतो, आतुन पल्सरचं कव्हर काढतो. स्कॉर्पचं कव्हर पल्सरच्या बॅगमध्ये ठेवतो, तिच्या बॅटरीच्या वायर कादुन ठेवतो, कव्हर घालतो. मग ठोंगा, म्हणजे स्कॉर्पिओ चालु करुन चेक करतो. ठोंगा महिन्यातुन दोन वेळाच बाहेर निघतो.
आज शनिवार, ऑफिसमधुन अर्धे डिटेल घ्यायचे आहेत, ते मिळणार संध्याकाळी साडेचार वाजता, आणि त्यासाठी ठोंगा घेउन जावा लागेल. अर्धे डिटेल उद्या मिळणार अर्धे १४० किलोमिटरचा प्रवास झाल्यावर. नेहमीचं आहे हे. यावेळी हॉटेल आणि पोरी वेगळ्या आहेत असं ऐकुन आहे, पाहुया. नेहमीप्रमाणे ऑफिसला आलो, कामं केली, रिपोर्ट छापले, पैसे घेतले, प्रोजेक्ट करन्सी. बरोबर साडेचार वाजता मायनस ९ ला आलो. ठोंगा वॉशिग एरियात घातला, बाहेर आलो तेंव्हा आउट ऑफ द वर्ल्ड फिलिंग आहे. मग सरळ घरी आलो, जेवण केलं आणि झोपलो. उद्या सकाळी अकराच्या सुमारास निघेन. खरंतर लवकर निघणार होतो पण सात वाजता शाल्मली येणार आहे. मग दोन तास तरी जातीलच म्हणुन अकरा वाजता. अकरा वाजता निघालो की हॉटेलला पोहोचायला तीन वाजतील मग तिथंच मुक्काम होईल, पहाटे तीन वाजता निघेन आणि सात वाजता साईटवर. कार्यक्रम पक्का आहे. उद्या सकाळी शाल्मली येईल त्याची वाट बघत झोप लागली आज थोडी लवकरच.
सकाळी साडेसहा जाग आली, उठुन आवरलं, बरोबर सात वाजता दरवाजा वाजला, शाल्मलीचं ही, कधीच बेल वाजवत नाही. दरवाजा उघडुन आत येताच तिच्या ओल्या केसांचा वास घरभर पसरला. पुढचा तास फार छान गेला. दोघांनी मिळुन चहा, पोहे केले, घरातल्या माझ्या आवडीच्या गोष्टी काढुन तिच्या आवडीच्या गोष्टी वर काढुन ठेवल्या, आता दोन वर्षे तिच्या मनासारखं होणार सगळं, पुन्हा मी गेल्यावर तिला हे सगळं जमणार नाही, म्हणुन. मग दहा ते साडेदहा आम्ही गॅलरीत बसुन होतो. अलार्म वाजला तसा उठुन आवरलं. एकटाच मायनस ३ ला आलो. शाल्मलीला पुजा करायची होती. ठोंगा काढला, शहरातली गर्दी मला ही आवडत नाही अन ठोंग्यालाही. ती संपली की पाचवा गिअर,  अठराशे आरपिएम, पंच्याहत्तरचा स्पिड. पहिला घाट लागेपर्यंत तरी.
साडेचार वाजल्यानंतर जे पहिलं हॉटेल दिसलं तिथं गाडी घातली, दहा सेकंड इंजिन बंद केलं, सिस्टिमनं सर्व काही अपडेट झाल्याचं कळवलं. बाहेर पडुन हॉटेलमध्ये गेलो, रुम बुक केली आणि आत जाउन झोपलो, जेवण वगैरे करायचं नव्हतंच. पहाटे अलार्म वाजला, उठुन आवरलं. चेक आउट करुन निघालो. आज एकुण नउ तास प्रवास करायचा आहे. ही साईट नविनच आहे, आजचा प्रवास तसा नविनच भागातुन आहे, ब-यापैकी निर्मनुष्य सुद्धा. कंटाळवाणं होणार आहे सगळं. या नोकरीत आलो ते पैसा, घर, गाडी मिळणार म्हणुन, पहिले सहा महिने फार छान गेले पण जेंव्हा पासुन साइट सुरु झाल्या तेंव्हापासुन त्रास आहे खरंतर. ही माझी दुसरीच साईट, पहिली एक महिन्यासाठीच होती ट्रायल बेसिसवर, वर्षभरानी त्याचे रिझल्ट आल्यावर मग इथं दोन वर्षासाठी पाठवत आहेत. शाल्मलीला जेंव्हा हे समजलं तेंव्हा तिनं स्पष्ट नाराजी व्यक्त केलेली होती, पण मिळणारा पैसा, सुरक्षितता ह्यांच्या जीवावर तिला समजावता आलं होतं. दिवसभर गाडी चालवुन साडेपाचच्या सुमारास साईटच्या गेटसमोर उभा आहे, सगळ्या चेकिंगला वगैरे अर्धा तास गेला. मग आत आलो, आता सगळंच सिस्टिमच्या हवाली इथुन पुढं.
गेले आठ दिवस नुसता माझ्या रुममध्ये बसुन आहे,जेवणखाण वेळेवर मिळतंय, ठरल्या वेळेला बाहेर फिरायला मिळ्तंय ठरलंय तेवढंच मग पुन्हा रुममध्ये. प्रत्यक्ष काम काहीच दिलेलं नाही अजुन. सिस्टिमवर वेटिंग लिस्ट चेक केली. अजुन तीन दिवस मला कुणी भेटणार नाही. प्रचंड कंटाळा आलेला आहे. पहिल्यांदा साईटवर गेलो होतो ते आठवतं पुन्हा एकदा, म्हणजे गेल्या आठ दिवसांत दररोज दोन वेळा आठवुन झालेलं आहे. आता पुन्हा आठवंतय, बॉसनं घेतलेलं ब्रेन स्टॉर्मिंग, झालेले वाद आणि मग दोन दिवसांनी दिलेला होकार, नंतर शाल्मलीचा गोंधळ आणि बरंच काही. ही कंपनी जॉइन करतानाच लक्षात आलेलं होतं की काहीतरी घोळ आहे, पण पैसा, घर आणि गाडी डोळ्यासमोर नाचत होते. अशावेळी नेहमी करतो ते केलं, बॅगमधुन एक इंजेक्शन काढलं आणि टोचुन घेतलं. या ऑषधाचा प्रभाव पुढचे दोन दिवस टिकेल. मग एकच दिवस वाट बघणं आणि त्यानंतर काम सुरु.
आज दुपारी माझा पार्टनर येणार आहे, नंबर ८९३७, वय वर्षे २९, आज सकाळीच आलेल्या मेसेज मध्ये होतं तसं. बरोबर तीन वाजता रुमचा दरवाजा उघडला तेंव्हा समोर जॉब नंबर ८९३७ उभी होती. चेह-यावर प्रसन्न हसु, केसांचा बांधलेला पोनी आणि त्याला न शोभणारं बंगाली कुंकु कपाळावर. ' हाय, मी प्रवीण ' , ' हाय, मी मीना, आत येउ ?' दोनच वाक्यं बोललो, पण खुप जवळची ओळख आहे असं वाटलं. पुढची दोन वर्षे तरी एकत्र काढायची  आहेत, किंवा रिझल्ट मिळेपर्यंत. दोघं आत येउन रुममागच्या लॅबमध्ये गेलो . ' थोडा वेळ गप्पा मारु या का, आपण अहेड ऑफ स्केड्युल आहोत बरंच'  तिला विचारलं. कपडे बदलत पडद्यामागनं तिनं उत्तर दिलं ' मी तेच करणार आहे, तुझी कितवी साईट आहे ?' मला बरंच हायसं वाटलं ' दुसरी, तुझी?' पडदा बाजुला करत ती म्हणाली 'चवथी, यु आर टु  ज्युनियर टु मी, किती रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत आजपर्यंत, काय पर्सेंटेज ?  तिनं   सोफ्यावर अंग टाकत विचारलं.  ' काही घेणार,  नव्वद टक्के आहेत रिझल्ट, निदान माझ्याकडुन तरी'  पार्टनर आल्यावर रुममधल्या सर्व सर्विस ओपन होतात, त्यानुसार बार उघडलेला होता. ' आतातरी फक्त सोडा दे तीन क्युब टाक त्यात'  दोघांचे ग्लास तयार करुन टिपॉयवर ठेवले तेंव्हा तिचा चेहरा फुललेला होता, बंगाली कुंकु पुसल्यानं कपाळ थोडं जास्तच मोठं दिसत होतं.
 'तर मि. प्रवीण, येत्या महिनाभरात आपल्याला ही दोन पझल्स सोडवायची आहेत, मला वाटतं तुम्ही माझ्या शरीरापेक्षा या कोड्यांवर जास्त लक्ष द्यावं, कसं सुरु करायचं आपण, आधी एक पुर्ण करायचं की  दोन्ही पॅरलली करत जायची. ' तिच्या आवाजात सिनियरनेस जाणवत होता, मी माझी नजर तिच्या वरुन काढुन समोरच्या टिपॉयच्या  स्क्रिनवर नेली. दोन प्लॅन आणि दोन ड्रॉइंग उघडी होती स्क्रिनवर. मला एका ड्रॉईंगमधलं बरंचसं समजलं, प्लॅनमधली गावं रस्ते ओळखीचे वाटत होते, पण दुस-याचा काही पत्ता लागेना.  ' मला पण काहीच समजत नाही यातलं, प्लॅन ए आहे तो पुर्ण शहरातला पाणीपुरवठा विषयुक्त करुन मरणाचा थैमान घालायचा आहे, पण दुसरा काय आहे समजत नाहीये. तुला कळालं का काही यातलं ? मीनानं संवादाला सुरुवात केली. ' ग्रेट , मला प्लॅन बी समजलाय संपुर्ण, सगळ्या शहरात मोक्याच्या ठिकाणी गाड्या अडवुन एक प्रचंड ट्रॅफिक जाम घडवुन आणायचा आणि मग  मेमॅवेच्या साहाय्यानं धुळ्धाण उडवुन द्यायची. वुई कॉम्प्लिमेंट इच अदर ' उगा जवळीक दाखवायची म्हणुन मी बोललो. ' मेमॅवे म्हणजे काय ? समथिंग केमिकल ऑर हाउ ?' मिनानं मुलभुत प्रश्न विचारला. '  मेमॅवे म्हणजे मेगा मॅगनेटिक व्हेव - मेमॅव्हे, पण उच्चार मेमॅवे असाच केला जातो.
'चल तु माझ्या क्षेत्रातल्या प्लॅनवर काम करायला सुरुवात कर, मी तुझ्या फिल्ड्मध्ये दिवे लावतो, म्हणजे दोन्ही प्लॅनच्या सगळ्या बाबी चेक होतील आणि व्यवस्थित होतील, व्हॉट से पार्टनर ?' मी माझा नेहमीचा गेम प्लॅन टाकला, असं केलं की मला माझ्या चुका, ते माझं फिल्डच नाहीय या सबबीखाली लपवता येतात. तिनं होकार दिला. माझी व्होड्का आणि तिचा सोडा संपला होता. आता तिनंच उठुन विचारलं ' अजुन एक घेणार का ? माझा होकार आहे असं समजुन ती बारकडं गेली. काचेचा दरवाजा उघडणार तेवढ्यात सिस्टिमचा बायकी आवाज आला ' रुट ३ रुमचे अल्कोहोल कंझ्म्शन लिमिट संपले आहेत.'  आणि त्यामागं एक जिवंत बायकी आवाज ' ओ शिट मॅन, धिस इज अनफेअर' हातातला ग्लास तिनं  फोडुन टाकला. पुन्हा येउन ति सोफ्यावर बसली. दोन्ही हात डोक्याच्या मागं धरुन, मी तिच्या कडं न पाहायचा अयशस्वी प्रयत्न केला, ते जास्त वेळ जमलं नाही, आणि तिच्यदेखील लगेच लक्षात आलं, डोळे बंद असुन देखील ' तुझी पहिली साईट डेडबॉडीज वरुन व्हायरस उचलायची होती ना ?' मला सिनियर असल्यानं तिला माझी हिस्ट्री माहित होती, तो चान्स मला नव्हता. ' हो, पहिली साईट एवढी बेकार लागली मला' मी माझी निराशा  स्पष्ट केली. ' मग त्या वेळी स्त्रियांच्या प्रेतांकडं पाहताना, त्यांच्यावरुन व्हायरस उचलताना ज्या भावनेनं वागला असशील ना त्याच भावनेनं वाग आताही माझ्याबरोबर, पुरुषाबरोबर राहायची वेळ आली तर माझी रिअ‍ॅक्शन प्रेतापेक्षा जास्त वेगळी नसते हे लक्षात घे, उगा नंतर अपेक्षाभंग नको.'  तिचं स्पष्ट बोलणं मला लागलं ' म्हणजे तु इथुन बाहेर गेल्यावर माझ्यामागं भुत होउन लागणार नाहीस ना, माझ्या इच्छा पुर्ण कर म्हणुन, त्यापेक्षा आताच काय ते मागुन घे, प्रेतं देखिल काही कमी डिमांडिंग नसतात. ' माझ्या विनोदाच्या ढ क्वालिटिवर तिला हसु देखील आलं नाही, ती उठुन रुममधल्या तिच्या बेडवर गेली, बाजुचा लेसर ट्रॅप चालु केला अन  झोपली, अगदी प्रेतासारखी.
आज, दोनशे दिवस झालेत, केमिकल इंजिनियरिग आमच्या इंजिनियरिंगपेक्षा फार कमी अवघड नसतं याची पुर्ण कल्पना मला आली आहे. त्यत मिनाबरोबर झालेल्या करारानुसार वर्किंग टाइममधला फक्त एकच तास एकमेकांच्या शंका निरसनासाठी ठेवलेला आहे. त्यामुळं फार अवघड होतं, प्रत्येक वेळी माहिती सिस्ट्मिमधुन घ्यावी लागते, मिळत नाही, समजत नाही असं नाही पण तिच्याकडुन ऐकायला बरं वाटतं, आणि मी सिस्टिमवरुन माहिती करुन घेउन तिला पुन्हा मुद्दाम विचारतो आहे हे तिच्या लक्षात येतं, तिच्या शिक्षणाची नक्की कल्पना नाही पण फार नसावं, जेवढं मला अडतं त्यापेक्षा तिला जास्त अडतं, आनि स्पेशली मॅगनेटिक ईंडक्शन मध्ये ती जाम फसते, तो टेस्ला तिला प्रत्येक वेळी घुमव घुमव घुमवतो आणि जोरात आदळतो खाली, आणि तो तर आपला खास दोस्त, याचा बराच फायदा घेतो मी, तिच्या शंका अर्धवटच क्लिअर करतो. मग पुढच्या शंकानिरसनच्या तासात ती पुन्हा तेच घेउन बसते, सिनियर असली तरी लाजत नाही कळत नाही हे सांगायला. माझं तसं नाहीये, बहुधा पुरुषी अहंकार मध्ये येतो अजुन देखील. तिच्या प्रत्येक उत्तरात काहीतरी खुसपट काढतो, तिचं बोलणं मध्येच तोडतो, तिला आवडत नाही ते खरंतर. पण पुरुष असल्याचा कंड  कुठं तरी शमला पाहिजे ना.
' प्रवीण, हे बघ म्हणजे हा मेमॅवेचा संपुर्ण प्लॅन झाला नाही अजुन, पण एका  शहराच्या गेल्या एकोणीस महिन्यातल्या ट्रॅफिकचा स्टडी करुन मी एक ट्रॅफिक होल्ड प्लॅन बनवलाय, पहिल्या होल्ड पासुन शेवटचा होल्ड येईपर्यंत बारा मिनिटं जातील, आणि त्यानंतर मेमॅवेला तु म्हणतो तसं अर्धा तास लागेल होत्याचं नव्हतं करायला, किमान ७०% सक्सेस रेशो दिसतो आहे. आपल्याला काय पाहिजे रेशो मिनिमम ९५ % ना, मग अजुन बरंच काम करावं लागेल. ' एक दिवस मीनानं एक वॉक थ्रु दाखवला रुममधल्या स्क्रिनवर. माझं समोर टिपॉयच्या स्क्रिनवर काम चालु होतं. मला वर पहायला दोन मिनिटं गेली. तिनं पुन्हा पहिल्यापासुन दाखवलं, 'गुड ना ,ब-यापैकी जमलंय ना रे, आणि हेच अल्गोरिथम वापरुन कोणत्याही शहराला यात फिट बसवता येईल असं करायचं आहे मला ते  आता उरलेलं २५% तु जमव.' तिला प्लॅन पुन्हा एकदा रनथ्रु करायला लावला, त्यावेळी मी टिपॉयवर लिहित होतो वर बघता बघता. रन थ्रु संपल्यावर तिच्या ते लक्षात आलं, शेजारी येउन बसत ती म्हणाली ' काय काय लिहिलं आहेस माझ्या विद्यार्थ्यानं बघु ?' मी तिची व्हायवा घ्यायला सुरुवात केली.  एक तासभर आम्ही बोलत होतो. तिनं टिपॉयच्या तिच्या बाजुला  ब-याच नोट्स काढ्ल्या आमचं बोलणं संपलं तशा त्या बोटातल्या रिंगवर पिकप केल्या अन तिच्या बेडवर जाउन बसली, लेसर ट्रॅप चालु केला.
आज सहाशे पन्नास  दिवस संपले प्रोजेक्टचे, मिना आणि मी, बाकीच्या दोन्ही टिमपेक्षा खुप पुढं आहोत,म्हणजे सातशे दहा दिवसांचे टारगेट आम्ही साठ दिवस आधीच पुर्ण केलंय. सध्या आम्ही प्लॅन २ आणि प्लॅन ३ बनवतोय, पहिले प्लँन फेल झाले तरची तयारी,अर्थात आम्हाला ते डिटेल वर्कआउट करायचे नाहीत, पुढच्या सिनियर टिम आमच्या स्क्रॅचवर काम करुन फायनल करतील आणि आता पण सिस्टिम पॅरलली त्यावर काम करत आहेच. आमचे ओरिजनल प्लॅन सध्या रुट १९ ला चेक होत आहेत, त्यापुढं अजुन एक  रुट, तो क्लिअर केला मी प्रमोशन, मी मास डिस्ट्रक्शन वरुन पर्सनल हंटिंगला जाईन आणि मिना  इनर किलिंगला. तिच्या पहिल्या दोन साईट पर्सनल हंटिंगच्या होत्या त्यामुळं तिला ती एक स्टेप टाळता येईल असं वाटतंय. उद्या पहाटे पाच पासुन रुट१९  बरोबर मिटिंगला बसायचं आहे. डार्क मिटिंग, या प्रकाराचा मला अनुभव नाही, म्हणजे रुममध्ये फक्त स्क्रिनच दिसते, पलीकडं कोण आहे तुम्ही पाहु शकत नाही आणि ते पण तुम्हाला पाहु शकत नाही, फार भयाण प्रकार आहे हा. मिनाला विचारलं तर ती काही स्पष्ट बोलली नाही याबद्दल. आज संध्याकाळी ती आमची गाडी घेउन बाहेर गेली आहे कुठंतरी, बहुदा लांब गेली असेल कारण आज गाडी हवी म्हणुन तिनं गेला आठवडाभराचा कोटा सेव्ह केला होता तिचा आणि मला पण एक दिवस रुममध्येच बसवुन ठेवलं होतं.
पहाटे पाच ते दुपारी एक, रुट १९ ची मेगामॅरेथॉन मिटिंग संपली, आमची दोन्ही प्रोजेक्ट रुट १९ नं अ‍ॅडमिन क्लिअर केली, आता ती फायनान्स क्लिअरसाठी रुट २० ला जातील, तिथं साधारण ५० दिवस लागतात, आणि त्यानंतर हातात येईल डायरेक्ट डि डेट आणि प्रमोशन लेटर. डि डेटच्या आदल्या दिवशी आम्हाला इथुन सोडलं जाईल. पुढचे ५० दिवस फार निवांत नाही जाणार पण फार टेन्शन नसेल आम्हाला. आता निम्मा दिवस गाडी वापरायची परवानगी आहे, प्रोजेक्टच्या रुट १६ पर्यंत आम्ही बिनघोर फिरु शकतो, रुममधला बार चोवीस तास खुला होणार उद्यापासुन. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शाल्मलीबरोबर दररोज ३०० सेकंद बोलु शकतो, हो म्हणजे पाच मिनिटंच पण ३०० म्हणलं की खुप जास्त वाटतं. जवळ्पास दोन वर्षानी,धाकट्या बहिणीबरोबर बोलताना काय बोलु आणि काय नको असं होणार आहे मला, अर्थात आमचं बोलणं ट्रॅक होणार, रेकॉर्ड होणार आणि सेन्सॉर देखील, तरी पण खूप खुप छान वाटतंय मला. गेल्या सहाशे पन्नास दिवसात एकावेळी २० लाख लोकांना कसं मारता येईल याचाच विचार करत होतो.  मिना तिचे ३०० सेकंद कुणाबरोबर बोलेल काय माहित. असेल तिचा कुणीतरी बॉयफ्रेंड वगैरे नाहीतर मुलगा आणि नवरा सुद्धा असेल. अजुन साठच दिवस मला देखील तिची हिस्ट्री चेक करायची ऑथोरिटी मिळेल आणि मग कळेल मला सगळं.
उद्या सातशे दिवस पुर्ण होणार, आज आम्ही दोघं बाहेर गेलो होतो रुट १३ ला तिथं, आमच्या प्रोजेक्टवर एक ग्रुप चर्चा करत होता. आम्ही पण जाउन उभे राहिलो झालं, काही कमी पडलंय का पहायला, अर्थात इथं कुणीच कुणाला ओळखत नाही त्यामुळं ती लोकं बिनधास्त बोलत होती. काही पॉइंटस मिळाले आहेत. रात्री बसुन पुन्हा अपडेट करुन घेउ ते. गेले पन्नास दिवस मिना दररोज पाच मिनिटं पुढचा वेळ देते, पहिला दिवस ००:०० ला बोललो, दुस-या दिवशी ००:०५ ला असं करुन तिचा प्रत्येक वेळचा मुड समजला मला. एकदम मस्त आयडिया दिली तिनं. सगळ्या घराला नविन रंग दिला आहे तिनं,टाइल्स बदलल्या आहेत, अजुन बरंच काही. माझ्यासाठी दोन तीन मुली पाहुन ठेवल्यात. आई बाबांची कसर भरुन काढते आहे. हे सगळं मी मिनाला पण सांगितलं, ती कुणाशी बोलते ते कळालंच नाही, दररोज दुपारि एक वाजता मला रुमच्या बाहेर जायला सांगते, काही कळालंच नाही त्यामु़ळं. उद्या दिवसभरात कधीही रुममधले स्पिकर सुरु होतील आणि आम्हाला गुड न्युज मिळेल. आणि मग अर्धा दिवस फोन, पुर्ण दिवस गाडी आणि रुट १८ पर्यंत प्रवासपरवानगी. मिना पण कुठं गेलीच नाही आज दिवसभर, नुसती बेडवर पडुन आहे. सकाळीच तिनं चार पेग व्होड्का घेतली आहे, त्याबरोबर तीन बाटल्या सोडा. एवढं डायल्युट करुन कसं काय घशाखाली कोण जाणे. असते एखाद्याची आवड कोण सांगणार काय ते?
डोक्याचा भुगा झालाय, डि डे अजुन एक महिन्यानं आहे, मेमॅवेचा प्लॅन फायनल झाला आहे, मला आणि मिनाला प्रमोशन मिळालं आहे. अजुन पगार पण वाढला आहे पण फोन बंद झालेत आता प्लँन यशस्वी किंवा अयशस्वी होईपर्यंत आम्हाला बाहेर कुणाशी संपर्क साधता येणार नाही.  पण प्रत्येक सिनेमाला असतो जसा क्लायमॅक्स असतो इथं पण आहे, आमचा प्लॅन ज्या शहरात ट्राय करणार आहेत तिथं मिनाच्या आईबाबांचं घर आहे, जसाजसा आमच्या प्लॅनवर शहराचा प्लॅन लॅप होत गेला तसं तसं तिला रडु आवरेनासं झालं, आम्ही नेहमीप्रमाणे अंधारात होतो डार्क मिटिंगच्या,पण रुममधली आर्द्रता लिमिटच्या बाहेर गेल्याचं आणि अनावश्यक आवाज येत असल्याचं सिस्टिमनं रुट २० ला कळवलं तसं, एक क्षण आमची रुम प्रकाशानं झगझगुन गेली, मिनानं प्रयत्न करुन देखील तिला डोळ्यातलं पाणी पुसता आलं नाही. मिटिंग संपल्यावर ति लगेच निघुन गेली गाडी घेउन. कधी परत येईल माहित नाही. मला आता तिची दया येते आहे,  इथं पुर्वी झालं आहे तसं ती बहुधा रुट २० ला जायचा प्रयत्न करेल आणि मरुन जाईल. इथं आत्महत्या करायचा तो एकमेव मार्ग आहे, बाकी कोणत्याही मार्गानं तुम्ही स्वताला संपवु शकत नाही. मी पण तसंच केलं असतं का आमच्या शहराचा प्लॅन लॅप केला असता तर, कालपर्यंत मिनाला आमचा २० लाख लोकांना एकत्र मारायचा प्लॅन निवडला गेला म्हणुन आनंदात होता, आणि आज तिला दुख आहे ते त्या मरणा-या वीस लाखांचं नाही तर त्यातल्या दोघांचं. का तर ती तिची आपली आहेत म्हणुन.
त्या बिनओळखी एकोणीस लाख नव्याण्ण्व हजार  नउशे अठ्याण्णव लोकांच्या मरणानं आम्हाला काही फरक पडत नव्हता पण या दोघांच्या जाण्यानं पडत होता. त्या विस लाखांचं मरणं आमच्या देशाच्या साठी फार गरजेचं आहे, दर सहा महिन्यांत असे रॅडम निवड करुन वीस लाख लोक मारले जातात, त्याशिवाय बाकीच्यांना जगणंच शक्य नाही असा एक निष्कर्ष काढलेला आहे सिस्टिमनं. या मरणाच्या उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात,  त्यांना वाचवणं शक्य आहे, पण त्यासाठी त्यांची गरज आम्हाला सिस्टिमला सिद्ध करुन दाखवता आली पाहिजे, अजुन तीस दिवस उरले आहेत. काहीतरी करणं भाग आहे, काय ते कळत नाहीये. मिनानं आत्महत्या केली नाही, ती रात्री परत आली. कुठं गेली होती ते विचारलं, काही बोलली नाही. मी माझ्या बेडकडं जात होतो तेंव्हा माझ्या मागं आली, मला घट्ट पकडलं मागुन आणि सोफ्यावर आणुन ढकललं. मला काहीच समजेना. आज तिनं पुन्हा ते बंगाली कुंकु लावलं होतं. दोन वर्षात तिची पोनी जाउन केस चांगले खांद्याच्या खालपर्यंत आले आहेत, कधी लक्षात आलं नव्हतं पण आज आलं. पण माझ्याकडं पाहताना भेसुर वाटली नाही उलट डोळ्यात कुणावर तरी  उपकार करत असल्याची भावना दिसत होती.
' तुला ड्राय बनवु का कॉकटेल' तिनं विचारलं,' आज एंजॉय करायचं आहे आपल्या जवळच्या कुणाचं तरी मरण, आज मी प्रेतासारखं नाही तर मित्रासारखं वागणार आहे तुझ्याबरोबर' व्होड्काचे दोन ग्लास हातात घेउन येत ती बोलत होती. ' तुला काय वाटलं असतं रे, तुझ्या बहिणीच्या घराखाली मेमॅवेचा जनरेटर लावला असता तर, त्या एका न दिसणा-या वलयानं तुझ्या घराची विट अन विट हादरवुन तोडली असती, एखाद्या बिमच्या खाली तुझी बहिण चिरडली असती, तुझी आवडती पल्सार, किती तुकडे होउन पडली असती का तिला आग लागेल रे लगेच. ....' बराच वेळ ती बडबडत होती. काही काही कल्पना तर एवढ्या भयंकर होत्या की मला खरंच भीती वाटायला लागली, शाल्मलीबद्दल हे ऐकवेना. जेंव्हा ती थांबली तेंव्हा तिला सांगितलं' असं काही होणार नाही माझ्या घराला, माझा अंदाज खरा ठरला मेमॅवेचा, गेल्या महिन्यात मी दररोज पाच मिनिटं शाल्मलीला समजावलं आहे त्याबद्दल आमच्या कोड मध्ये. आता माझं घर मेमॅवेप्रुफ झालं आहे. तुझी घाणेरडी स्वप्नं कधीच पुर्ण होणार नाहीत.  शाल्मलीला पाणी पिणं बंद कर हे सांगणं मला शक्य नव्हतं. म्हणुन मग मीच पहिल्यापासुन पाण्यात विष घालायच्या प्लॅन मध्ये फॉल्ट ठेवत गेलो. आणि शेवटी मला हवं ते मिळवलं. तुला माझ्या  क्षेत्रात एवढं तज्ञ व्हायचं होतं की तु प्रत्येक गोष्ट काळजीपुर्वक करत गेलीस आणि मग माझ्या ट्रॅप मध्ये अडकत गेलीस. आता या मधुन मी तुला सोडवु शकतो पण एका अटीवर. '
' माझं शरीर हवंय तुला, पण मिळणार नाही अजिबात अगदी माझ्या आईबाबांच्या बदल्यात देखील नाही' तिच्या बोलण्यात निर्धार होता, ' आणि तु असं काहीतरी करशील याची मला कल्पना होतीच, अरे तुझी सिनियर आहे मी, या खेळाचे, सिस्टिमचे  नियम तुझ्यापेक्षा जास्त माहित आहेत मला. आपले फोन बंद होण्याच्या शेवटच्या दिवशी मी शाल्मलीला निरोप दिला आहे, आपण लग्न करणार आहोत आणि तयारीसाठी तिला माझ्या घरी जायला सांगितलं आहे. पाच सहा दिवसांनी ती तिकडे जाणार आहे.' मंदशी हसत ती खाली बसली. आणि मी तर तुला यातुन सोडवु पण शकत नाही. सॉरी ज्युनियर. माझं डोकं अजिबातच कामातुन  गेलं, तिला जीवे मारावं असा विचार करुन मी उठलो पण ती माझ्यापेक्षा चपळ निघाली, मी तिला पकडेपर्यंत ती तिच्या बेडवर पोहोचली अन लेसर ट्रॅप सुरु केला. हताश होउन मी तिथंच खाली बसलो, सगळं हरलो होतो मी.  'आणि आता ऐका आजच्या परिस्थितीला अनुरुप गाणं याचे निवड कळलीय श्री.प्रवीण यांनी' रेडिओवरच्या निवेदिकेसारखा आवाज तिनं काढला आणि मग गाणं म्हणायला लागली ' तुझ्या गळा माझ्या गळा गुंफु मोत्यांच्या माळा, तुज कंठी मज अंगठी आणखी गोफ कोणाला, ह्हे तुझ्या गळा माझा गळा ' .........




1 comments:

Post a Comment