Sunday, October 21, 2012

क क कपलचा - भाग १० (अंतिम)


स्मिता साधा सरळ विचार करत होती, ही असली पोचलेली बाई, हिनं दुसरा कुणीतरी गाठला असेल असा, पण स्व:त प्रेमात पडुन लग्न केलेल्या नव-याचा असा अपमान केला असेल असं तिला वाटलं नव्हतं, आणि असं का वाटलं नाही याचं तिलाच आश्चर्य वाटत होतं ' एवढ्यावरुन सरांनी तुला घटस्फोटाची मागणी केली, खरं नाही वाटत मला ' स्मितानं तिची शंका बोलुन दाखवली. अनुजा हसली ' सगळ्यांना असंच वाटतं, आजसुद्धा, जाउ दे, चुका माझ्या सुद्धा झाल्याच, ए असं करा आता जेवुनच जा, दोघंजण, आमच्या घरी आलात खरं पण घरचं जेवलाच नाहीत, काल केटरर होता आज आपण बाहेरच जेवलो, पुन्हा हर्षद रागवेल मला ' असं म्हणत अनुजा उठुन किचनकडे गेली.
तिच्या मागंमागं जात स्मितानं विचारलं ' किती वाजता येतात गं? ' दाळ तांदळाचे डबे काढत अनुजा म्हणाली' आठ साडेआठ तरी होतात, मला तरी अजुन कुठं याचं टाइमटेबल माहित झालंय, तीन महिने तर झालेत लग्नाला' ' म्हणजे अजुन दोन तास आहेत तर ' समोरच्या ड्ब्यातल्या शेंगा उचलत स्मिता बोलली. ' हो तेवढ्यात आपलं बोलुन होईल सगळं, तु नको काळजी करु आता थोडंच राहिलंय.' तांदळाचं भांडं नळाखाली धरत अनुजा बोलली, त्या पाण्याच्या आवाजात तिच्या बोलण्याचा रोख नक्की कसा आहे ते स्मिताच्या लक्षात आलं नाही. ' असं ही केसबद्दल मी फार बोलणार नाहीये, तो विषय बोलायचा नाहीये मला, मळमळतं मला ते वाद अन चर्चा आठवल्या की' दाळ धुता धुता अनुजानं क्लिअर केलं. ' पण ते वाद अन चर्चा तुम्ही जे करत होता आणि बघत होता त्याबद्दलच होत्या ना, खुशीनं असुदे कि जबरदस्तीनं तुम्ही दोघंही जे करायचा, जे पाहायचा, जे अनुभवायचा किंवा ज्याची कॉपी करायचा, त्यावरच चर्चा व्हायची ना ? स्मिताचा प्रश्न ऐकुन अनुजाच्या हातातलं दाळीचं भांडं कुकरमध्ये पडलंच, का माहित नाही या बाजुनं तिनं कधी विचारच केला नव्हता.
' हो, म्हणजे तसंच आहे थोडंफार, पण ते पाहणं आणि करणं आमच्या घरात होतं, घरातच काय घरातल्या पण एका खोलीत होतं, आमच्या दोघांत होतं, तिथंच सुरु व्हायचं अन तिथंच संपायचं, त्या सगळ्याचा असा बाजार मांडला गेला त्याचं दुख: जास्त आहे. सरांनी मला enjoy करायचा ऑप्शन दिला तो मी जमेल तेवढा स्विकारला होताच मग त्यांना improve करायचा ऑप्शन स्विकारायला काय अडचण होती ?' वाईट याचं वाटतं की, एक बाई म्हणुन मी होणारा अन्याय सुद्धा आनंद म्हणुन स्विकारला पण त्या बदल्यात मला त्या पातळीचा आनंद मिळावा ही माझी इच्छा सुद्धा पुर्ण होउ नये याचं, समोरचा तुम्हाला चाबकानं मारणार असेल तर, मार खायची तयारी आहे, पण मारताना किमान त्याचं पेटुन उठलेलं शरीर दिसावं,त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेलं असावं आणि प्रत्येक फटक्याच्या आवाजाबरोबर रागानं येणारा त्याचा आरडाओरडा तरी ऐकु यावा असं मला वाटतं, enjoy करायचा आहे तर मग त्या अन्यायात पण काहीतरी थ्रिल नको का ? , हे असलं लॉ़जिक स्मिताच्या डोक्याबाहेर चाललं होतं. तिनं अनुजाच्या समोरुन कांदे अन बटाटे घेतले अन चिरायला सुरु केले. बराच वेळ दोघीजणी आपल्या घरातल्या स्वयपाकाच्या पद्धती आणि चवी यावर बोलत होत्या. तासाभरात स्वयपाक झाला, दोघी हातात कॉफीचे मग घेउन हॉलमध्ये येउन बसल्या.
'तुमच्या केसमध्ये हर्षद कसा काय आला ?' ब्रेक नंतर स्मितानं पुन्हा गाडी मुळ विषयाकडं नेली. ' केस फॅमिलि कोर्टात होती तोपर्यंत काही संबंधच नव्हता हर्षदशी, चार महिने झाले होते केस करुन तेंव्हा सरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, आणि लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीत माझं नाव होतं, त्यावेळेला चौकशीला पोलिस घरी आले तेंव्हा हर्षद पहिल्यांदा भेटला. सर तर वाचले, पण हे नवं लचांड माझ्या मागं लागलं, अर्थात माझ्या वकिलांनी याचा देखील उपयोग करुन घेतलाच घटस्फोटाच्या केसमध्ये, त्यामुळं माझी सुटका जरा लवकर झाली एवढंच,पण या चौकशीच्या निमित्तानं हर्षद भेटत राहिला, आमचं बोलणं होत राहिलं आणि आम्ही प्रेमात पडलो एकमेकांच्या. माझं सगळं प्रकरण हर्षदला माहित होतंच, आणि त्यानं प्रामाणिकपणे कबुल केलं की त्याला सुद्धा अशा गोष्टीचंच जास्त आकर्षण आहे,' तिचं बोलणं तोडत स्मितानं विचारलं ' आणि तुलादेखील एक पुरुष हवा होताच, हो ना?' दोन सेकंद गप्प राहुन अनुजा थोड्या चढ्या आवाजात बोलली, ' हो मला हवाच होता पुरुष, का हवा असु नये, तुझा नवरा आठ दिवस गावाला गेला, तर तुला नाही काही वाटत, महिन्यातलं चार दिवस लांब राहणं पुरुषांच्या जीवावर येतं, तर एक वर्ष सुखापासुन लांब राहिले होते मी, उलट मलातरी वाटतं की मी याबाबतीत फार संयम बाळगला, आम्ही वेगळं राहायला लागल्यानंतर एक दोन वेळा सरांनी माझ्या रुममध्ये घुसायचा प्रयत्न केला होता, माझी केस बघणारा पहिल्या वकीलानं पण फासे टाकुन पाहिले होते, एक वेळ अशी आली होती की, जाउदे मला बोलायचंच नाही आता त्याबद्दल.' एवढं बोलुन अनुजा मग ठेवायला किचनमध्ये गेली.
हर्षद आणि शरद एकत्रच आले, दोघी अजुन घरच्याच कपड्यात होत्या, आल्या आल्या शरदनं घरी जायची गडबड सुरु केली, पण स्वयपाक तयार आहे हे कळल्यावर त्याचा नाईलाज झाला, सगळुयांनी एकत्र बसुन जेवण केलं, जेवण झाल्यावर हर्षद खाली पान आणायला गेला, तो परत येईपर्यंत स्मिताचं आवरुन झालं होतं, ती दोघं निघायच्या तयारीत होते, पुन्हा भेटायच्या आमच्या घरी या ना एकदा असल्या गप्पा झाल्या अन अकराच्या सुमारास घराचा दरवाजा लावुन हर्षद आता आला, तेंव्हा अनुजा बेडवर बसुन होती, समोरच्या भिंतीकडं पहात ' यापुढं घरात कुणलाही बोलवायचं नाही, काहीही झालं तरी, समजलास ' तो आत आल्याचं जाणवताच ति अक्षरशः ओरडलीच त्याच्या अंगावर ' नालायक साले सगळे, दुखावर औषध तर नसतंच कुणाकडं पण पट्ट्या काढुन किती लागलंय ते पहायला फार आवडतं सगळ्यांना हराखखोर कुठले एकजात ', अनुजा दिवसभराचं ओझं उतरवुन ठेवल्यासारखं बोलली, ' होय, खरंय आणि तु सुद्धा अल्बम उघडुन बसली असशील दिवसभर हा माझा अन्याय, हा माझा न्याय करत, मानसिक आजार झालाय तुला, कुणीतरी लागतं तुझ्या अन्यायाबद्दल वाईट वाटतंय म्हणणारं तुला जवळ घेउन थोपटणारं, तुझंच खरं,तुझंच बरोबर असं म्हणणारं, आणि असं झालं नाही की तुला अ‍ॅटॅक येतो अन्यायग्रस्त असल्याचा मग जाहिरात करावीशी वाटते. इथं आल्यापासुन एक निकाळजे काकु भेटल्या होत्या, आता ही एक झाली. बेडवर आडवं पडत हर्षद बोलला.
बराच वेळ दोघं घुसमटुन झोपली होती, मग दोघांनाही कधीतरी शांत झोप लागली असावी. सकाळ झाली तशी दोघंही सवय लागल्याप्रमाणे उठली अन नेहमीच्या कामाला लागली, हर्षदचं आवरुन होईपर्यंत अनुजानं त्याचा डबा करुन हॉलमधल्या टिपॉयवर ठेवला, तो बाहेर येउन बुट घालायला लागला तसं किचनच्या दारातुनच अनुजानं विचारलं ' केसचं कुठपर्यंत आलंय, कधी निकाल लागेल काही कळालंय का?' 'बघतो आज, जाउन येतो पांढरेकडं', डब्याची पिशवी उचलुन हर्षद निघुन गेला. अनुजा दरवाजा लावेपर्यंत निकाळजे काकु समोर आल्या. ' पाहुणे राहिले होते वाटतं काल पण?' मग अर्धा तास दोघींच्या दारगप्पा झाल्या, अनुजा आत येउन बेडवर पडली अन तिनं आईला फोन लावला, पुजेच्या दिवसापासुन तिचं बोलणंच झालं नव्हतं. एक तास भर ती बोलत होती. कंटाळा आल्यावर फोन ठेवुन तशीच झोपुन गेली. संध्याकाळी हर्षद आला, त्याला वकीलाकडं जाणं जमलं नव्हतं, सकाळचं गरम करुन संपवलं अन दिवस संपला. असे बरेच दिवस संपले, रात्री काही जागत काही पेंगत तर काही वाट बघण्यात गेल्या. चार महिन्यांनंतर पुन्हा केसची तारीख पडली, हर्षदनं दोन दिवस रजा काढली, एक दिवस आधी अन दुसरा केसचा दिवस कोर्टात गेला. फारसं महत्वपुर्ण काही झालं नाही, पण एक झालं की सरांच्या वकीलानं फारसं ताणुन धरलं नाही, अजुन एक दोन तारखांत केस सुटेल असं वाटायला लागलं.
आताशा दोन वर्षे झालीत, अनुजा आणि हर्षदचं तसं बरं चाललंय, ज्या एक दोन तारखांत केसचा निकाल लागायचा होता त्या अजुन आलेल्या नाहीत. केसचा निकाल लागेपर्यंत अन स्वताचं घर होईपर्यंत मुल होउ द्यायचं नाही असा निर्णय दोघांनी घेतलाय. मध्ये एक दोन वेळा अनुजाची आई गुपचुप येउन गेली घरी. हर्षद्च्या घरचं अजुनही कुणी येत नाही. तो दोन वेळा घरी जाउन आला, घराला पैसे हवे होते तेवढ्यापुरतं घरानं जेवण पाणी विचारलं, तो तेवढ्यावर खुश आहे, निदान तसं दाखवतो तरी, अनुजा पण त्याला या विषयावरुन काही बोलत नाही. स्मिताला एक मुलगा झाला, पण तिनं अनुजाला बारशाला येउ नको असं सांगितलं फोनवरुन,रडतच पण स्पष्ट सांगितलं होतं. हल्ली अनुजा सुद्धा या सगळ्याचं वाईट वाटावं याच्या फार पुढं गेली आहे किमान दिवसभर तरी, मग जेंव्हा असह्य होतं तेंव्हा फिल्म्स बघते पुन्हा जुने दिवस आठवतात, त्याकाळची गरिबी आजची श्रीमंती याची नकळत तुलना करते, आणि पुन्हा मागचं सगळं विसरायचा प्रयत्न पहिल्यापासुन सुरु करते. त्या जागलेल्या रात्रीचा आनंद पुढं चार दिवस टिकतो.
नोकरीतल्या पगारात घर घेणं शक्य नाही, वरच्या पैशात घेतलं तर दुस-या दिवशी अँटीकरप्शनवाले धरुन नेतील या भितिनं हर्षद घर घ्यायचं टाळतोय. यावर्षी गाडी घेतली खरी, एक सेकंड हँड स्कॉर्पिओ. पण साहेबच अल्टो घेउन येतो म्हणल्यावर स्टेशनला गाडी घेउन जायला अवघड होतं, मग 'कल भी आज भी' बजाज पल्सर उपयोगी पडते. नाही म्हणायला अनुजा चार गल्ल्या पलीकडे दळण न्यायला आणायाला गाडी घेउन जाते. दळणाच्या खर्चापेक्षा डिझेलचा खर्च आणि दळणाच्या वेळापेक्षा ती गाडी काढण्या घालण्याचा वेळ हेच जास्त आहेत. वर कॉलनीतल्या गिरणीवाल्याला 'असलं' गि-हाईक तुटल्याचं वाईट वाटतं. दोन वर्षात घरी बाहेरचं कुणी फारसं आलं गेलेलं नाही. घरगुती अडिनडीला निकाळजे काकु आहेतच. सोनवणे मॅडमनी केस पांढरे वकीलांना दिली तेंव्हा त्या समजवायला आल्या होत्या, त्यांच्या घरच्या एक दोन पार्ट्यांना अनुजा गेली होती.
एकुणात म्हणलं तर बरं चाललंय. वातीला काजळी पकडली असली तरी कंदिलाची वरची काच स्वच्छ आहे, खालच्या रॉकेलमध्ये कचरा आहेच, वेळ दिला तर तो साफ करता येईल पण तेवढी आज गरज नाही म्हणुन वेळ असुन देखील कुणी ते करत नाही, पण कधीतरी धक्का लागतोय, रॉकेल डहुळतंच आणि मग वात खाली वर करुन उजेड वाढवायची खटपट केली जाते. वातीत अडकलेला कचरा जळुन जातो, उजेड वाढतो. आता हवाय तेवढा पडतो. आणि तेवढ्यावर सगळे समाधानी आहेत कंदिल पण, वात पण आणि रॉकेल पण.




Print Page

Wednesday, September 26, 2012

क क कपलचा - भाग ०९

पाणी प्यायला उठत अनुजानं विचारलं ' शरद मारतो ना ग तुला, तु असं नाही म्हणालीस तर ?' - पुढे चालु....
अनुजानं तिची कथा सांगावी आपण ऐकत रहावी, कथा संपली की तिच्या दुखा:बद्दल दोन अश्रु ढाळावेत, तिच्यात नसलेल्या अन आपल्यात नसलेल्या धैर्याबद्दल थोडी चिडचिड करावी अन निघुन जावं, असा सरधोपट विचार स्मिता करत होती, पण ऐकता ऐकता आपण यात एवढं रंगुन जावु याची तिला कल्पना नव्हती, आणि या अनोळखी क्षणी ती बोलुन गेली ' हो, ब-याचदा', देवळाबाहेरची घंटा निशब्द अडकुन असते पण कुणीतरी नाद केला की आपल्याच आवाजानं थरारुन जाते तशी स्मिता थरारली, काहीतरी बोलु नये असं बोललं गेलंय ते सावरण्यासाठी ' म्हणजे याचसाठी असं नाही, बाकीही बरीच कारणं असतात, त्यांची ड्युटीच तशी आहे ना, दिवसभर चौकात उभं रहायचं केवढं टेन्शन असतं गं,' तिच्या सावरासावरीचं अनुजाला मनापासुन हसु आलं, कसंबसं तोंडातलं पाणी गि़ळुन ती हसायला लागली. ' माझ्यापासुन काय लपवतेस तु स्मिता, अगं वरच्या पाट्या वेगळ्या असतात, आत सगळ्या एस्ट्यांच्या सीट फाटलेल्याच असतात, तुला हवंय का पाणी ?' स्मिताला हवंच होतं, ती पाणी पित असतानाच अनुजानं विचारलं' एक सांगु स्मिता तुला, निदान माझ्याबरोबर तरी उघड उघड बोल, काही सांगणार नाही मी ना हर्षदला ना शरदभावोजीना, केसच्या ८ महिन्यात कुणाला कधी काय आणि कसं सांगायचं आणि काय लपवायचं हे चांगलं समजलं आहे मला.'
' पण नक्की कसली केस झाली होती, तु तक्रार केलीस का पोलिस स्टेशनला सरांबद्दल ?' स्मितानं पुढचा प्रश्न विचारला, ' हं, छे ग, मी काय जाणार होते तक्रार करायला, आणि कशाची तक्रार करणार होते, माझा नवरा असं वागतो, असं करतो, तसं करायची जबरदस्ती करतो अशी, कोण ऐकणार होतं माझं, उलट तिथंच माझ्या चारित्र्याचा पंचनामा मांडला असता, आणि माझ्या मागं त्यावरुन मनमुराद हसले असते, शेवटी हे झालंच कोर्टात, काही टळलं नाही नशिबातलं.' या विषयावर तिला फार बोलायचं नव्हतं, पटकन उठुन ती निघुन बेडरुम मध्ये गेली, दार आतुन बंद करुन घेतलं. स्मिताला काय करावं हेच सुचेना, तिनं भेदरुन बेडरुमच्या दरवाजावर थापा मारत अनुजाला हाका मारायला सुरुवात केली, दोन तीन मिनिटं गेली, अनुजा बाहेर आली, रडुन ओला झालेला चेहरा कोरडा केल्याचं दिसत होतंच. स्मितानं तिचे दोन्ही हात हातात घेत ' सॉरी ग, माझंच चुकलं, हा विषयच काढायला नको होता मी, ' असं सांत्वनाचा प्रयत्न केला. ' असु दे गं, कधीतरी आपली दुख: उगाळायला सुद्धा बरं वाटतं, आणि ज्या दुखातुन सहिसलामत बाहेर पडतो ती दुख: तर जास्तच आठवतात आपल्याला' अनुजा तोंड धुवायला बाथरुम मध्ये गेली. ती बाहेर येत असतानाच स्मितानं तिला विचारलं ' इतर वेळी बरा धीर दाखवतेस, केसचा विषय निघाला की फार अवघडतेस एकदम, का ग?'
'घरातली दुख: कितीही मोठी असली तरी घराच्या चार भिंतीत फार छोटी असतात, जेंव्हा त्यांच्या बाजार मांडला जातो तेंव्हा असहय होतं सगळं. मला माझ्या लग्नाच्या नव-यानं आमच्या घरात काय करावं आणि काय नाही हा आमच्या दोघांच्या मधला व्यवहार होता, खुशीचा असेना का जबरीचा असेना, पण जेंव्हा जग यात तोंड खुपसायला लागतं, तेंव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या आहेत ते जाणवायला लागतं, आणि नसतील तरी हे जग त्यांच्या मोठेपणा तुमच्या नजरेसमोर असं नाचवत राहतं की तुम्हाला तुमच्यातलं नसलेलं खुजेपण टोचायला लागतं, नुसतं टोचतच नाही तर जगणं नकोसं करतं, फुग्याच्या आत टाचणी घालुन फुगा फुगवला तर आतल्या टाचणीला कसं वाटेल, तसं वाटायला लागतं. फुग्याच्या आत टाचंणीला सुरक्षित वाटतं, पण हा सुरक्षेचा घेराव आपल्यामुळंच फुटणार आहे ही भीती सुद्धा असते प्रत्येक क्षण जगताना, प्रत्येक हालचाल करताना. स्वताचे अस्तित्व जपायचं आणि फुगा फुटणार नाही याची काळजी घेत जगणं फार मुश्किल असतं. केसच्या सुरुवातीच्या दिवसांत सरांना बहुदा केस करुन आनंद मिळत होता, मला धडा शिकवल्याचं समाधान वाटलं, माझ्या चारित्र्यावर संशय घेउन मी दिलेल्य त्रासाचा, मी केलेल्या अपमानांचा बदला घेतल्याची भावना त्यांना सुखावुन जात होती, पण जसजशी केस पुढं पुढं गेली तसं तसं त्यांनासुद्धा चटके बसायला लागले' अर्धवट निघालेल्या खपलीवर मलम लावलं की जीवाला शांतता लाभते तसं झालं अनुजाला, एका दमात एवढं सगळं बोलुन गेल्यावर.
दोघी जणी हॉलमध्ये बसल्या होत्या, 'म्हणजे तुला काय म्हणायचंय, कळलं नाही मला' स्मितानं पुन्हा प्रश्न केला ' आपण बायका फुगा असतो का टाचणी, की आपला संसार हा फुगा असतो आणि आपण टाचणी, समजलं नाही मला.' अवघडलेले हात मोकळे करायला आळस देत स्मितानं विचारलं. काही क्षण शांतता पसरली आणि मग अनुजानं विचारलं ' का ग, आपण बायकाच प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यावर ओढुन घेतो, का वाटतं तुला हा संसार म्हणजे फुगा आणि आपण त्यात अडकलेली टाचणी आहोत, असं का नाही वाटलं की फुगा म्हणजे संसार असेल आणि टाचणी म्हणजे पुरुष, प्रत्येक वेळी संसार फुटणं किंवा न फुटणं ही जबाबदार बाईचीच का असते किंवा बाई ती ओढुन का घेते आपल्या डोक्यावर ?' का नाही पुरुषाकडं त्या नजरेनं पाहिलं जात, का त्याला गुन्हेगार केलं जात नाही, या समाजानं नाही केलं हरकत नाही पण आपण बायका तरी का अशा समजुतीत राहतो, नुकसान कुणाचं होतंय अशानं आपलंच ना ? ' स्मिताकडं या प्रश्नांची उत्तरं नसावीत अशा नजरेनं तिच्याकडं पहात अनुजानं आपलं बोलणं थांबवलं, ' वाचलीत, मी सुद्धा असली स्त्रिमुक्ती वाल्यांची पुस्तकं वाचली आहेत, थेट त्यातलीच वाक्यं बोलतेस तु, तुझ्या केसमध्ये कुणी होतं का स्त्री जागरण मंचवालं ?' वर्गातल्या ढ विद्यार्थ्याला एखादा प्रश्न विचारुन त्याची जिरवायची असा विचार करुन एखादा नवीन मास्तर वर्गात येतो आणि नेमका त्याच दिवशी तो विद्यार्थी आख्खं अपेक्षित पाठ करुन आलेला असतो, मग मास्तरला कसं वाटतं, तसं अनुजाला झालं, या प्रतिप्रश्नाची अपेक्षाच नव्हती ठेवली तिनं.
' चहा करु का कॉफी ग, काय घेणार तु?' वेळ उलटी आली की विषय बदलायचा हे बायकांना जन्मजात येतच असतं आणि त्यात केसचा अनुभव यामुळं असं करणं अनुजला फार अवघड गेलं नाही, दोघी उठुन किचनमध्ये गेल्या, स्मितानं कॉफी करायला घेतली तशी अनुजा निवांत खुर्चीवर बसली ' किती छान वाटतं ना आपल्याच घरात कुणीतरी फुकट बसवुन चहा करुन देतंय ते, मला तर फार बरं वाटतं, पण आमच्याकडं कुणी येतंच नाही असं करुन द्यायला' कॉफि साठी दुध गरम करायला ठेवुन स्मिता कट्ट्यावर बसत स्मितानं विचारलं ' केस नक्की कसली झाली होती, म्हणजे केली होतीस तु ?' अनुजा हसली, थोडंसं असहाय वाटेल असं हसु होतं, ' मी केली, सांगितलं ना तुला, मी नव्हती केली केस, सरांनी केली होती केस, आणि केस कसली घटस्फोटासाठी अर्ज केला कोर्टात, एकतर्फी', स्मिता जवळ जवळ ओरडलीच, त्याला उतु जाणा-या दुधाच्या चरचरण्यानं साथ दिली, गॅस बंद करता करता तिनं विचारलं ' काय, हे असं घाणेरडं वागुन, तुला एवढा त्रास देउन त्यांनीच घटस्फोटासाठी अर्ज केला, नालायक मनुष्य असणार नक्कीच, शिक्षक म्हणायच्या लायकीचा नसणारच तो, हरामखोर कुठला, लाज नाही वाटली असं करायला त्याला' कळत नकळत स्मिता एकेरीवर आली होती. ' काही म्हण हे असंच झालंय, एके दिवशी सर वकिलाकडुन दोन सेट घेउन आले परस्परसंमतीने घटस्फोटाचे त्यावर सही करुन दे असं सांगितलं, मला वाटलं होतं की त्यांना जे हवंय जसं हवंय ते दिल्यावर ते समाधानी असतील, माझ्या मागण्या सोडुन द्यायची मी तयारी दाखवली, त्यांच्या हातापाया पडुन झालं, रडुन झालं, काही उपयोग झाला नाही. त्या रात्री सर बेडरुम मध्ये झोपले एकटेच, मी रात्रभर हॉल मध्ये जागी होते, दोन तीन वेळा पळुन जायचा विचार केला, दरवाज्यापर्यंत आले, दरवाजा उघडला पण मागं फिरले.'
' का, एवढा चांगला चान्स होता त्या नरकातुन बाहेर पडायचा मग का नाही पळुन गेलीस ?' स्मितानं कॉफिचा कप अनुजाच्या हातात देत विचारलं ' मोह असतो, सगळे रस्ते बंद झाले तरी एक नविन रस्ता असेल जवळ्च कुठंतरी अशी आशा असते आणि खरं सांगु मला वेड लागलं होतं, व्यसन लागलं होतं सुखाचं, या शरीराचे लाड करुन घ्यायचं ते सुटणं अवघड होतं, फरक एवढाच होता की पुरुष हे उघड व्यक्त करतात या ना त्या मार्गानं स्त्रीला ते शक्य होत नाही किमान आपल्याकडं तरी, जेवढं मिळेल तेवढ्यात सुख मानायची सवय लागलेली असते किंवा लावलेली असते, माझी ती सवय बदललेली होती आणि एकदा पायवाट सोडुन रान तुडवायला सुरुवात केली की सुरुवातीला टोचणारे काटे नंतर सुखावायला लागतात, प्रत्येक वेळी पाय समजुन उमजुन काट्यांवर पडायला लागतो, माझं तसं झालं होतं. शेवटी व्यसन ते व्यसनच आणि मी त्यात अडकले होते. आठ दिवस सर काहीच बोलले नाहीत घरात जेवण पण करत नव्हते, आणि एक दिवस संध्याकाळी त्यांनी सांगितलं की त्यांनी एकतर्फी केस दाखल केली आहे आणि उद्यापासुन ते वेगळं राहणार आहेत, माझ्या जगण्या खाण्याची सोय माझी मी पाहायची आहे' कॉफि संपवुन दोघी पुन्हा गॅलरीत येउन बसल्या, स्मितानं विचारलं' पण घटस्फोटासाठी नक्की काय कारण दिलं होतं सरांनी, म्हणजे असं नुसतंच हवाय म्हणुन घटस्फोट मिळत नाही ' अनुजा ह्सली ' तुला ग काय माहित घटस्फोटाबद्दल एवढं, शरदनं कधी ऑफर केला होता का, का तुच घेतली आहेस माहिती याबद्दल,' आपण प्रश्न विचारुन चुकतोय आणि फसतोय हे समजुन सुद्धा आपण असे प्रश्न का विचारतो हे स्मिताला कळत नव्हतं. ' कारण ना, विवाहबाह्य संबंध असणे, थोडक्यात चारित्र्य वाईट असणे हे प्रमुख कारण होतं, त्यामुळं संसाराकडं दुर्लक्ष, मुल होउ न देणं वगैरे वगैरे गोष्टी त्यातच आल्या त्यानंतर'
थोडंसं चाचरत स्मितानं विचारलं ' पण तु म्हणतेस तसं तुला लागलेलं हे व्यसन पुर्ण करायला तु कोणताही मार्ग अवलंबले असतील, विस्तु असल्याशिवाय धुर नाही येणार ना, सरांना संशय आला असेलच तुझं वागणं पाहुन' अनुजानं थोडं चिडुन विचारलं ' का ग का संशय यावा, ज्याच्या जोरावर ते मला उपभोगायचे किंवा मी तसं सुख द्यावं अशी त्यांची अपेक्षा होती त्याच मार्गांनं मी त्यांना सुख मागत होते यात माझं काय चुक होतं, त्यांचं वागणं पाहुन मला संशय आला होता पण त्याचं मुळ कशात आहे ते मी शोधुन काढलं आणि तोच मार्ग अवलंबला म्हणुन असले आरोप करायचे, ते ही थेट घटस्फोटासाठी' तेवढ्यात बाहेर दरवाजा वाजला, अनुजा बाहेर गेली तसं स्मितानं धीर गोळा केला ती परत आली की तिला काहितरी विचारण्यासाठी. ' कसलीतरी वर्गणी मागायला आले होते ' बेडरुममधला लाईट लावत अनुजा बोलली ' ये ना इथंच बसु, गॅलरीचा दरवाजा बंद करावा लागेल नाहीतर डास येतात घरात ' स्मिता दार लावुन आत आली, बेडवर बसत तिनं विचारलं ' पण तु देखील नक्की काहीतरी केलं असणारच त्या शिवाय ह्या थराला सर जाणार नाहीत, कारण बघ तु बरंच काही मागत होतीस तरी त्याबदल्यात त्यांना जे हवंय ते मिळत होतंच ना, मग ?' ' बरोबर पकड्लंस, ' अनुजा खाली जमिनीवरच बसत म्हणाली , ज्या दिवशी सरांनी घटस्फोटाचे अर्ज आणले त्या आधी दोन दिवस आम्ही रात्र जागवली होती, शेवट त्या दिवसांत व्हायचा तसं माझ्या रडण्याऐवजी सरांच्या चिडण्यात आरडा ओरडा करण्यत झाला होता, ते निघुन हॉलमध्ये गेले, आणि सकाळी जेंव्हा ते निघाले तेंव्हा मी त्यांच्या हातात एक जाहिरात ठेवली होती पेपरमध्ये आलेली ' अपने खोये हुवे पौरुषत्व की पुनप्राप्ती के लिये हमारे पास आये अक्सीर इलाज सिर्फ तीन दिनोमे' आणि म्हणलं ''when you cannot avoid it, try improving it'



Print Page

Thursday, September 13, 2012

सहल - श्री गोंडेश्वर पंचायतन सिन्नर.

दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे. तांत्रिक किंवा इतर माहिती फार नाही, जाणं येणं आणि खाणं याची माहिती शेवटी दिलेली आहे.
प्रचि.१

प्रचि.२

प्रचि. ३

यौवनाची दोन रुपं, एक शतकांपुर्वी दगडांत उतरवलेलं दुसरं जिवंत पण दगडातलं देखील तेवढंच जिवंत..
प्रचि.४

प्रचि. ५

प्रचि. ६

प्रचि. ७

प्रचि.८

प्रचि.९

प्रचि.१०

प्रचि. ११

हे मंदिर संपुर्ण फिनिश केलेलं नसल्यानं हेमाडपंती बांधकाम पद्धतीचा अभ्यास करणं इथं शक्य आहे.
प्रचि. १२

प्रचि. १३

प्रचि. १४

प्रचि. १५

प्रचि. १६

संपुर्ण मंदिराला ह्या हत्तीशिल्पांनी उचलुन धरलेलं आहे,
प्रचि. १७

प्रचि. १८

एकतर काम अपुर्ण राहिलंय किंवा ही मंदिरं त्याकाळची आर्किटेक्ट किवा इंजिनियरिंग किंवा आर्टस कॉलेजेसची ऑन साईट प्रयोगशाळा असावीत बहुधा.
प्रचि. १९

प्रचि. २०

प्रचि. २१


हे मुख्य मंदिराचं शिखर
प्रचि.२२

बहुधा दगडाच्या क्वालिटिमुळं देखील इथलं नक्षिकाम पुर्ण होउन अपुर्ण वाटतंय, निसर्गाचा परिणाम जास्त जाणवतोय...
प्रचि. २३

प्रचि. २४

प्रचि. २५

प्रचि. २६

प्रचि. २७

प्रचि.२८

हा सादर मानाचा मुजरा त्याकाळच्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्सना, आणि अर्थात त्या प्रत्येक मजुराला ज्यानं हे काम धर्मासाठी केलं का पोटासाठी केलं का मरणाच्य भितीपोटी केलं माहित नाही, पण का करतोय या पेक्षा कसं करतोय याचं जास्त भान ठेवुन ह्या कलाकृतीला जन्म दिला, निसर्गातल्या दगडांना एक नविन रुप दिलं एक व्याख्या दिली, जगण्याची दिशा दिली, जगण्याचा आशय दिला.

हे सगळं घडताना तो निसर्ग पाहात होताच, तो या सगळ्यांचा बाप, पिता, पितामह , प्रपितामह का त्याहुनही मोठा, एखाद्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडं आलेल्या चिल्यापिल्यांनी संध्याकाळी खेळुन दमल्यावर हात पाय धुवुन देवासमोर बसुन शुभंकरोती म्हणुन संपवावी, आणि मग एक क्षण शांतता अनुभवावी तेवढ्यात बाहेरच्या ओट्यावरुन आजोबांचा आवाज घुमावा एखादं मोठं अवघड स्त्रोत्र म्हणणारा हा जो अनुभव आहे.. तो दुस-या भागात.

प्रवासमाहिती
स्थळ - श्री शिवगोंडेश्वर पंचायतन देवस्थान, सिन्नर.
प्रवाससोय - सिन्नर गाव हे नाशिक - पुणे हमरस्त्यावर नाशिकच्या आधी ३० किमी अंतरावर आहे, पुण्याहुन जाणा-या सर्व एसटी या ठिकाणी थांबतातच, मुंबईहुन नाशिकला येउन मग पुण्याच्या बाजुला यावं लागेल,अहमदनगरकडुन येताना सुद्धा सिन्नर नाशिकच्या आधीच आहे, प्रवासाची सोय रात्री १० पर्यंत उत्तम आहे.
हा मंदिरसमुह सिन्नर गावातच पोलिस स्टेशन / कोर्टाच्या मागच्या बाजुला आहे, सिन्नर एस्टिस्टँडपासुन रिक्षाने ४० रुपये खर्च होतो, चालत गेल्यास २० मिनिटांचा रस्ता आहे.
जेवणखाण - सिन्नर औद्योगिक शहर असल्यानं इथं सर्व प्रकारचं, जेवण खाण उपलब्ध आहे, स्टँडसमोरचं पंचवटी गुजराथी थाळी ही नो रिस्क जेवणाची सोय.
सिन्नरचं एस्टि स्टँड हे एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखं दिसतं निदान बाहेरुन तरी.

Print Page