Tuesday, November 8, 2011

चपला आणि सत्कार - भाग ५


अशोक नाथाच्या घरी आला होता, सिव्हिल मध्ये काय झालं ते सांगायला ...
नाथानं दोघांना हाकलुन दिलं आणि लाईट बंद करताना बायकोच्या शिव्या खात व तिला शिव्या देत तो घराबाहेर पडला. आपली आवडती सुझुकी घेउन तो डायरेक्ट समाचार चौकात आला, एका बोळातल्या घरी जाउन दोन जणांना उठवलं आणि चार गोष्टी सांगितल्या, दोन बंडलं दिली अन पुन्हा घरी आला. तो घरी येउन, त्याच्या बायकोनं दरवाजा उघडुन त्याला आत घेईपर्यंत समाचार चौकातुन एक ओम्नी सात रस्ता क्रॉस करुन गेली होती विजापुरच्या दिशेनं, आणि तिचा ड्रायव्हर हणमंता त्या बिचा-या ओम्नीला ताण ताण ताणत होता. गाडी खड्यातुन गेल्यावर मागं बसलेला कुमार त्याला ओरडत होता ' अबे, एखादं माल उडाला ना कोपचितुन थेड गांडीत घुसेल तुझ्या, हळु जरा खड्डे बिड्डे बघ की भाड्या '. तेवढा विचार करायला हणमंताला वेळ नव्हता, एकतर बिनचपलेची गाडी चालवणं त्याला अवघड होत होतं अन ही किरकिर. नाथानं दिलेले टायमिंग बरोबर असतील तर त्याला मोठा मासा मिळणं अवघड होतं पण छोटा मासा म्हणजे बांगरे तरी निश्चित मिळालाच असता, पण आज त्याचं नशीब जरा जास्तच चांगलं होतं, आटिओला कुणी अडवलं नाही की चेकपोस्टला कुणी अडवलं नाही कि पुढं राज्यसीमेला पण नाही. हणमंता आता पुरता मुडमध्ये आला होता, गाडी चालवायच्या आणि माल चालवायच्या पण. पाच वर्षं जुनी ओम्नी अगदी जिवावर येउन ७०-८० च्या स्पिडनं विजापुरकडं जात होती.
नाथा घरी येउन झोपला पण फॉरेस्टच्या रेल्वे क्वार्टरच्या मागे असलेल्या कॅरम क्लबमध्ये मात्र सुनसान शांतता होती. आनंद चव्हाण त्याच्या पित्त्यांवर चिडुन होता, बांगरेची सायकल कुठं गेली आणि तो एमएटिवाला हॉस्टेलमधुन कुठं गेला. बांगरेची सायकल गेल्याचं कळाल्यावर त्यानं मुश्ताकचं जाणं कॅन्सल केलं होतं पण त्याच्याच हट्टामुळं त्याला रात्री ऐनवेळची गाडीची व्यवस्था करुन पाठवावं लागलं होतं त्याचं टेन्शन होतंच. तिकडं अशोकनं दिलेली ओसि संपल्यावर सिव्हिलच्या शवागाराच्या शिपायानं करुन आनंदला दिलेली माहिती त्याच्या रागात भर घालत होती , यावेळी एका अगदीच अनोळखी माणसाला यात गोवण्यात आलं होतं त्यामुळं नेहमीच्या माणसांच्या हातुन काम न करुन घेण्याची त्याची आयडिया त्याच्याच विरुद्ध वापरली जात होती. शेवटी रात्रीचे साडेतीन वाजले तेंव्हा दोन तीन जणं घरी गेली अन बाकीचे तिथंच टेबलं जोडुन झोपायचे तयारीला लागले, तेंव्हाच आनंदला मुश्ताक विजापुरला पोहोचल्याचा फोन आला अन त्याचं निम्मं टेन्शन कमी झालं आणि तो पण झोपुन गेला.
नाथा पहाटेच उठला अन आंघोळ वगैरे आवरुन तालमीजवळ गणपती ठेवलेल्या शेडमध्ये आला, शेडमध्येच झोपलेल्या कार्यकर्त्यांना उठवुन तो आता गेला, दिवा लावला आणि दोन उदबत्त्या ओवाळुन ठेवल्या. तिथल्याच मागच्या पोत्यातले चार नारळ काढुन एका पिशवीत घेतले, गणपतीसमोरच्या डब्यातुन अरगजा घेउन एक पुडी बांधुन घेतली अन तडक बाहेर पडला. सुझुकी घेउन थेट गणपती घाटावर आला, रात्री मिळालेली बातमी अन सिद्धेश्वर तळ्याच्या बाजुचं पहाटेचं थंड व शांत वातावरण यानं तो उत्साहित झाला. सुझुकी सेंट्रल टॉकिजच्या बाजुला लावुन पिशवी घेउन नाथा चालत निघाला. घाट उतरुन गणपतीच्या देवळात बाहेरुनच नमस्कार केला, बाहेर पायरीवरच थोडा अरगजा वाहिला, एक नारळ फोडला अन पुन्हा गाडीकडं आला, लांबुनच त्याला त्याच्या गाडीजवळ उभी राहिलेली ओम्नि दिसली. झपाझप पावलं टाकत नाथा गाडीकडं आला, मागचा दरवाजा सरकावुन आत वाकुन पाहिलं, हसला आणि बाहेर थुंकुन चार शिव्या दिल्या. खिशातुन अजुन एक बंडल काढुन हणमंताला दिलं अन तो गेला की लगेच परेशला फोन लावला.
इकडं आनंद सकाळिच क्लब बंद करुन घरी आला तेवढ्यातच त्याचा मोबाईल वाजला अन कालच्या गाडीच्या ड्रायव्हरनं विजापुरहुन परत येताना गाडी बंद पडल्याचं आणि तुम्हीच पाठवलेल्या एका व्हॅनमध्ये दोघेजण येउन बांगरेला घेउन गेल्याचं सांगितलं. यावर्षी घरच्या आणि मंडळाच्या गणपतीला फोडलेले नारळ नासकेच निघाले होते, त्याचा हा परिणाम आहे का काय असं त्याला वाटायला लागलं. त्यानं लगेच माननियांना फोन लावला, म्हणजे हे माननिय ४ वर्षापुर्वीपर्यंत वर्षातले कमीत कमी २ महिने तरी जेल मध्ये असायचे आणि उरलेला वेळ जिल्ह्यातुन तडीपार, पण एका मोठ्या पक्षाचे दोन तुकडे झाले अन असे बरेच जण रात्रीतुन माननिय झाले होते, हे त्यापैकीच एक. माननीय झाल्यावर एक हॉटेल आणि एक शाळा असे मुख्य उद्योग सुरु केलेले असले तरी, मुळच्या धंद्याशी इमान राखुन होते. अजुन माननीयांची आंघोळ झाली नाही, असं त्यांच्या एका कार्यकर्त्यांनं सांगितल्यावर, फोनवर बोलण्यापेक्षा डायरेकट बंगल्यावर गेलेलंच बरं असा विचार करुन आनंद निघाला. पंधरा मिनिटात एक लाल अल्टो त्या अलिशान बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर थांबली. ग्रे कलरचा सफारी घातलेला आनंद त्यातुन बाहेर निघाला अन गाडी लॉक करुन झटपट बंगल्याच्या मुख्य दरवाज्यातुन आत गेला. अर्धा तासानं जेंव्हा तो बाहेर आला तेंव्हा त्याच्याबरोबर अजुन दोघं जण होती अन त्याच्या गाडीच्या मागं मागं एक पांढरी स्कॉर्पिओ निघाली.
दोन्ही गाड्या माननीयांच्या संपर्क कार्यालयाजवळ येउन थांबल्या, आनंद बरोबर जे होते ते दोघं जण उतरुन निघुन गेले आणि आनंद गाडीतच बसुन राहिला. तिथं अर्धा तास बसुन त्याची अस्वस्थता वाढतच होती, त्यातच त्याच्या फोनवर बांगरेच्या मुलीचा फोन आला, अण्णा कधी घरी येणार आहेत अन कुठं आहेत या तिच्या दोन्ही प्रश्नांना आनंद कडं आत्ता तरी काहीच उत्तरं नव्हती. तो शांतच राहिला. संपर्क कार्यालयातुन एक जण पाकीट घेउन बाहेर आला अन आनंद्च्या गाडीत बसला. आनंदनं त्या रहदारीच्या रस्त्यावरच यु टर्न मारत गाडी स्टेशनसमोरच्या काडादी चाळीकडं घेतली. तो तिथं पोहोचेपर्यंत त्याच्या बरोबरचा माणुस त्याला बरंच काही सांगत होता, त्यातलं बरंच त्याला कळत होतं, बरंच डोक्यात घुसतच नव्हतं. स्टेशनच्या पार्किगमध्ये गाडी लावुन ती दोघं चालत काडादी चाळीत आले, आतल्या बाजुच्या १२ नंबर चाळीतल्या खालच्या मजल्यावरच बांगरेचं घर होतं. त्याची मुलगी बाहेरच भांडे घासत होती. आनंदला कोणाबरोबर तरी येताना पाहुन तिनं हात धुतले, कमरेला गुंडाळलेली ओढणी काढुन गळ्यात घेतली अन दारासमोरची भांडी बाजुला करत घरात गेली. आनंद दरवाज्यात उभा राहिला तेंव्हा आत बांगरेची बायको पुढच्या खोलीतल्या कॉटवर बसुन भाजी निवडत होती. ' येउ का वहिनी आत ?' आनंद आवाजानं तिनं वर पाहिलं अन काहीतरी बिघडल्याचं तिच्या लक्षात आलं, तिच्या हो किंवा नाही म्हणण्यानं आनंद काही थांबणार नव्हता. आनंद आणि त्याचा बरोबरची व्यक्ती दोघं त्या कॉटवर बसेपर्यंतच ते घर शांत होतं, ते बसल्या बसल्या बांगरेच्या बायकोनं आनंदला जे शिव्याशाप द्यायला सुरु केल्या त्याला काही उत्तर त्यावेळी तरी आनंद कडं नव्हतं, तो फक्त हा रागाचा भार ओसरण्याची वाट पाहात होता.
नाथाला परेशच्या घरात यायला कुणाला विचारावं लागायचं नाही, दुकानाच्या बाजुच्या जिन्यानं तो सरळ वर आला, चपला काढुन 'नाजुक ब्राम्हणा आहेस का घरात ?' असं मुद्दाम बायकी आवाजात हेल काढत विचारलं. परेशची आई अन बायको एकदमच बाहेर आल्या. ' या नाथा भावोजी' परेशच्या बायकोनं सासुवर एक पॉईंट मिळवला आणि पुन्हा आत निघुन गेली. नाथानं परेशच्या आईच्या पायाला हात लावत नमस्कार केला अन रस्त्याकडच्या खिड्कीच्या जवळ ठेवलेल्या बाकड्यावर बसला. ' काय म्हणताय सासुबाई, हल्ली दिसत नाहीत ओ परेश शेट दुकानात जास्तीचं, कधीपण विचारा त्या पोरींना, मालक वर हायंत एवढंच सांगतात' चेष्टेच्या सुरात नाथा बोलला, ही चेष्टा त्याला बारा तासापुर्वी सुचली नसतीच. परेश येउन त्याच बाकड्यावर बसला, दोघांच हळु आवाजात कुजबुजणं झालं. परेशची बायको चहा घेउन आली तेवढाच वेळ दोघं शांत होते.
इकडं बांगरेची बायको शांत झाल्यावर आनंदनं तिला सांगितलं की, बांगरे काल विजापुरला गेला आहे, आणि परत यायला ७-८ दिवस लागतील. तेवढ्यात, बाहेर एकजण आला आणि बाहेरुनच ओरडला ' मावशी, अण्णांची सायकल ठेवलीय बाहेर, आत्ता एकजण टेम्पोमधुन बाहेर पानटपरीला टाकुन गेलाय ' आता मात्र आनंदची टरकली, बांगरे सायकल क्लबला ठेवुन विजापुरला गेल्याचं त्यानं सांगितलं होतं. आता, बांगरेच्या बायको आणि मुलीच्या रडण्याला काय उत्तर द्यावं त्याला काहीच सुचेना. मगाशीचा दंगा आणि आत्ताचं रडणं ऐकुन चाळीतल्या बाकीची लोकं जमा झाली, दोनच मिनिटात ती छोटीशी खोली भरुन गेली. आनंदला बाहेर जायचं पण मुश्किल झालं. गर्दीतुन एकाचा आवाज आला, ' मावशी, पोलिसला कळवा झाटदिशी, निस्ती भानगड नको तिच्यायला', त्या परिस्थितीत बांगरेच्या बायको आणि मुलीला हा पर्याय जास्त जवळचा वाटला अन त्या दोघी घरातुन बाहेर निघाल्या, तसं आनंदची डोकं सरकलं. या भानगडीत पोलिस आले असते तर अजुनच गोंधळ वाढला असता. पण एवढ्या लोकातुन बाहेर जाउन त्यांना थांबवणं सुद्धा फार अवघड होतं. गर्दी कमी झाली तसा तो आणि त्याचा जोडीदार बाहेर निघाले. चाळीच्या मोठ्या दारातुन बांगरेची बायको, मुलगी अन बरोबर १०-१५ बायका बाहेर पडत होत्या. तिथंच गाडी थांबवत आनंद उतरला आणि त्या दोघींच्या हातापाया पडुन त्यांना गाडीतुन पोलिस स्टेशनला घेउन जातो असं सांगुन त्यांना घेउन निघाला.
नाथा परेशच्या घरुन निघुन गंगाविहिरीच्या बाजुनं चौपाडच्या विट्ठल मंदिरात आला, उरलेले दोन्ही नारळ तिथं फोडले मग तिथल्या पुजाराच्या घरातुन मागच्या खारपेंडीच्या दुकानात गेला. तिथं बसलेल्या ४-५ लोकांबरोबर ब-याच बोलाचाली शिव्यागाळी झालं अन मग घरी आला. जेवायची वेळ तर होउन गेलेलीच होती. त्याची बायको बाहेरच गाडीवर भाजी घेत होती, ' ऐ बये, संपले की गणपती, जरा मासं कर की घरात, तिच्यायला बामणाच्या पोरी ह्या असल्याच, कधी कळायचं काय म्हाईत' , भाजीवाला अन बरोबर उभारलेल्या बाकीच्या बायका फिसक्क्न हसल्या तशी नाथाच्या बायकोला राग आला, घेतलेली भाजीची पिशवी तिथंच आपटली ' आणा मासे आणा, कोंबडे आणा, बकरे आणा आणि खा तुम्हीच , मी मरते उपाशीच, कशाला सोडलं बाबांचं घर अन आले या ठोकळ्याचं मागं काय माहित' बडबडत ती आत निघुन गेली. मागं मागं नाथानं गुपचुप पिशवी उचलली, भाजीवाल्याला वीस रुपये दिले अन आत गेला. आता बाकीच्या बायका जास्तच जोरानं हसायला लागल्या. नाथा खोलीपर्यंत पोहोचलाच होता तेवढ्यात रात्री अशोकला सोडायला गेलेला त्याचा कार्यकर्ता पळत पळत आला, धापा टाकत टाक्त तो सांगायला लागला ' पैलवान, मदनचे घरचे सिव्हिलला चाललेत बाडी आणायला' , एक पाय पायरीवर ठेवलेला नाथा थबकलाच, काय करावं त्याला काहीच सुचेना. तो गपकन तिथंच खाली बसला पायरीवर.
मार्चला राहिलेला बारावीचा गणिताचा पेपर ऑक्टोबरला काढतो म्हणालेला, रात्री काय येत नाही, गाडीतच झोपतो पण उद्या सकाळी चहा तर घरीच घेणार म्हणुन मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीला गेलेला पोरगा, आज तीन दिवस झाले घरी आला नव्हता. मंडळातली पोरं काय नीट बोलत नव्हती. मदनचा बाप दोन दिवस वाट बघुन कंटाळला होता, पण काल पेपर मध्ये आलेल्या बातमी वाचुन ' मन चिंती ते वैरी न चिंती' म्हणतात तसं त्याच्या मनाला घोर लागलेला. मदनचा मोठा भाउ सुरत वरुन आल्या आल्या घरातली रडारडी झाल्यावर ती दोघं अन काही बाकीचे नातेवाईक पोलिस स्टेशनला जाउन आले, तेंव्हाच त्यांना तशीच एक बॉडी सिव्हिलला असल्याचं कळालेलं होतं. मदनचं घर दक्षिण कसब्यात होतं. औरंगाबादवरुन दोन वर्षापुर्वी ही लोकं धंद्याच्या निमित्तानं इथं आलेली. नाथाच्याच ओळखीनं हुतात्मा बागेजवळ एक खोकं घेउन तिथं चपलांचं दुकान टाकलेलं होतं. जातींनं चांभार नसला तरी मुंबईला बरीच बर्षं चपलांच्या धंद्यात नोकरी करुन मदनचा बाप याच धंद्यातला झाला होता. दोन पोरांपैकी मोठा सुरतला केमिकल कंपनीत फोरमन होता अन धाकटा मदन इथंच दुकानात बसायचा. संभाजी शिंदे कॉलेजला जायचा, थोडा उडाणटप्पुचं, मुंबईच वारं अंगात होतं. महिन्यातुन एकदा तरी मित्राकडं म्हणुन मुंबईला दोन तीन दिवस जाउन येणारा होता. गेलं वर्षभर तालमीत येत होता, आधी फक्त जिमलाच यायचा पण नंतर बाकी कामांमध्ये पण यायला सुरु झाला.
कसब्यातली मंडळं तशी मवाळच,मंडप टाकुन मठपती लायटिंगवाल्याकडुन माळा आणुन सोडल्या की नंतरचे आठ दिवस पत्ते खेळायला आणि एक दिवस सत्यनारायणाची पुजा एवढाच कार्यक्रम राबवणारी. त्यामुळं लांब राहायला असला तरी मदन जिम बरोबरच मंडळाकडं पण आकर्षित झाला. झांज पथकात अजुन वर्णी लागलेली नव्हती. पण बाकीची कामं करायला तो नाथाबरोबर फिरायचा. फार जवळचा झालेला नव्हता तरी नाथाला मदनबद्दल काहीतरी वाटायचं. तर हा असा मदन, विसर्जानाच्या रात्री गुलालानं रंगलेल्या मदनच्या चेह-यानं आणि मुश्ताकच्या दारुनं तारवटलेल्या डोळ्यामुळं मुश्ताकला ओळखता आला नाही आणि हकनाक जीव गमावुन बसला, बरं हा काही ' होता जिवा म्हणुन वाचला शिवा' असला ठरवुन केलेला प्रकार नव्हता, त्यामुळं ज्यांनी मदनला उचललं गेलं ते नक्की कुणाला उचलायला आले होते हे समजणं फार अवघड झालं होतं. त्यासाठी आज सकाळी पकडलेला बांगरे नाथासाठी फार महत्वाचा प्यादा होता, हणमंतानं त्याला मोहोळच्या आश्रमशाळेत पोहोचवला असणारच होता एव्हाना. पण ते अजुन नक्की कळालेलं नव्हतं.
इकडं आनंद, बांगरेची बायको आणि त्याची मुलगी पोलिस स्टेशनच्या बाहेर उभारले होते, नेहमीच्या ओळखीच्या एक दोन हवालदारांबरोबर नमस्कार चमत्कार करुन झाल्यावर एकदाचं स्टेशन जमादारानं त्यांना आत बोलावलं, आत गेल्या गेल्या बांगरेच्या बायकोनं पुन्हा रडायला सुरुवात केली जसं काही त्या जमादारानंच तिच्या नव-याला आत टाकलं होतं. त्या पोलिस स्टेशनमधल्या कुणालाच हे प्रकार नवीन नव्हते. आरडा ओरडा कमी झाल्यावर जमादारानं ड्युटिवरच्या लेडिज हवालदाराच्या ताब्यात त्या दोघींना दिलं अन तो आनंद बरोबर बाहेर आला. लेडिज हवालदारानं बांगरे मावशीची कहाणी ऐकली, तिची मुलगी गप्पच होती, दोघीची पोलिस् स्टेशनला पहिल्यांदाच आलेल्या. दहा मिनिटात सगळं ऐकुन लेडिज हवालदारानं एका कागदावर सगळं लिहुन काढलं, अन त्या दोघींना बाहेर झाडाखाली बसायला सांगुन तो कागद घेउन जमादाराकडं गेली. आनंदचं तोपर्यंत जमादाराला पटवुन झालेलं होतं. जमादारानं बांगरेच्या बायको व मुलीला बोलावलं अन नेहमीच्या सवयीनं विश्वास दिला, उद्या सकाळी यायला सांगुन तिथुन कटवलं. त्या वेळेपुरता तो खिशातल्या पाचशेच्या दोन नोटांना जागला होता. त्या मायलेकिंना काडादी चाळीच्या दाराजवळ सोडताना मुलीच्या हातात आनंदनं शंभरच्या नोटांचं एक बंडल दिलं.

Print Page

Saturday, November 5, 2011

चपला आणि सत्कार - भाग ४


इकडं फॉरेस्ट मध्ये आनंद चव्हाणच्या घरुन मटण अन भाकरीचा डबा घेउन निघालेला इसम अजुन सायकल हाकतच होता, लक्ष्मी विष्णु बंद झाल्यापासुन तो चव्हाणच्या बरोबर होता. फॉरेस्ट ते कानडे चाळ हे अंतर फार नव्हतं तरी नेहमीचे रस्ते अन अगदी ओळखीची माणसं सुद्धा टाळुन तिथपर्यंत जायचं म्हणजे पार जुन्या आरटिओ समोरुन जाणं भाग होतं त्या बिचा-याला. साठे चाळिच्या मागच्या बाजुला असलेल्या एका १० खोल्यांच्या चाळीसमोर तो थांबला. स्टीलच्या डब्यातुन येणा-या मटणाच्या वासानं त्याला जास्त वेळ थांबणं जमलं नसतं. चटकन दुस-या खोलीसमोर जाउन त्यानं हाक मारली, ' मुश्ताकभाय, ओ मुश्ताकभाय, मै बांगरे खाना लाया है' हीच गोष्ट दोन तीन वेळा रिपिट झाल्यावर आतुन दरवाजा उघडला गेला, बांगरे आत गेला.
त्याचवेळी तामलवाडीला नाथाबरोबर असलेला माणुन बांगरेची सायकल उचलुन तीन चाकी टेम्पोत टाक्त होता आणि अशोक सिव्हिलच्या शवागाराबाहेर उभा राहुन हवालदाराबरोबर देशी अंडी कुठं चांगली मिळतात अन ब्रॉयलर अंड्याला चहाच्या पाण्यात बुडवुन देशी कसं बनवतात यावर चर्चा करत होता. सिव्हिलचा शिपाई अन तिथला ड्युटी हवालदार आल्यावर पाच मिनिटात अशोकला आत बोलावलं गेलं, खिशातल्या ओसिच्या बाटलीवर हात ठेवुन अशोक आत गेला, ऑफिसमध्ये सगळे थांबले होते, शिपायानं अशोकला विचारलं' कधी गेला का बे मुडदे बघायला?' ' नाय कधी नाय' अशोक आता जरा घाबरला होता, ' मग आता काय, तुझा बाप ठेवलाय का आत, एवढं रात्रीला आलायस भेटायला' ड्युटि हवालदार नेहमीच्या निवांत आवाजात बोलला. अशोक आता अजुन घाबरलेला पाहुन सगळ्यांनाच हसु आलं. शिपायानं हवालदाराला इशारा केला अन त्याच्याकडुन परत इशारा आल्यावर टेबलाचा ड्रावर उघडला अन आतुन प्लॅस्टिकचे ३ ग्लास बाहेर काढले, आता काय करायचं ते अशोकला माहित होतं, त्यानं खिशातुन ओसि काढली, बरोबर १५ मिनिटानं अशोक आणि सिव्हिलचा शिपाई आत गेले, अशोकला आत गेल्या गेल्या ओकारी झाली, अन तो बाहेर आला पळत, बाहेर दोघं हसत होते, पुन्हा एकदा कसातरी धीर करुन अशोक आत गेला, फोटोबरोबर बॉडीचा चेहरा पाहिला अन लगेच बाहेर आला. तेवढ्या थंडीत पण त्याला घाम फुटला होता. समोर टेबलवरची उरलेली ओसि तशीच नीट घशाखाली उतरवुन तो तिथुन बाहेर निघाला. मग जेंव्हा तो एमएटिवरुन सिव्हिलच्या बाहेर पडला तेंव्हा दोन पल्सर त्याच्या मागं निघाल्या पण त्यांना एमएटिच्या स्लो स्पिडला जुळवुन घेणंच जास्त अवघड जात होतं आणि अशोक पार्क चौकातल्या एससि एसटि हॉस्टेलच्या कंपाउंडमध्ये घुसल्यावर त्यांना बाहेर थांबणं भाग होतं. रात्रीचे ११ वाजले तरी तिथुन कुणी बाहेर आलं नाही. दोन पैकी एक पल्सर तिथुन निघुन गेली, दुस-यानं तिथुन गाडी काढुन मागं घेउन बँकेच्या पार्किंग मध्ये लावली आणि समोर हुतात्माच्या कंपाउंडला टेकुन उभा राहिला नाटकाला आलेल्या बाया बापड्या बघत.
बाईचा नाद वाईटच खरा, कारण त्याच्या तिकडं बघण्याच्या नादात, एक जुनी सुझुकी हॉस्टेल मधुन अशोकला घेउन निघुन गेली, ती थेट थांबली, अरगडे वाड्यासमोर. तालमीपासुन मोजुन ५० मिटर वरचा हा वाडा म्हणजे एकेकाळचं सोलापुरातल्या गँगवॉरचं केंद्र्स्थान, पण आपापसातली भांडणं अन मधल्या काळात काही प्रामाणिक पोलिस अधिका-यांच्या मुळं आता हा वाडा गँगस्टरांच्या भांडणापेक्षा त्यांच्या रखेल्या अन त्यांच्या वारसांच्या भांडणानीच गाजायचा. रस्त्यावरचा दरवाजा उघडुन आत गेलं की डाव्या बाजुला तीन संडास अन त्यानंतर एक मोठा हौद होता, त्या हौदासमोरच पहिल्या खोलीचा दरवाजा होता उजव्या बाजुला अन त्यानंतर ओळीनं चार दरवाजे. एकात एक दोन, अशा चार बि-हाडांच्या सोय करणा-या त्या चार खोल्या हा या वाड्याचा दर्शनी भाग होता. पहिल्या दोन खोल्या लांबी रुंदीला सारख्याच पण तिसरी अन चौथी खोली मात्र वेगळी होती, दोन्ही खोल्या एका दरवाज्यानं जोडलेल्या होत्या. याच खोल्यात नाथा राहायचा. आणि आत्ता एकजण अशोकला घेउन तिथं आला, ३० फुटाच्या त्या बोळात एकच बल्ब लावलेला होता. अशोक त्या अंधारात चाचडपडत आत आला, त्याच्या बरोबरच्यानं चौथ्या खोलीसमोर उभारुन बेलचं बटण दाबलं, आत लाईट चालुच होते, बाईचा आवाज आला ' ह्ये बगा पैलवान आता कुटं गेलास ना तर तुमाला उद्या सकाळ्परेत घरात नाय घेणार, मग नुकसान कुणाचं ते तुमचं तुमी बगा' याला उत्तर दिलं, दार उघडणा-या नाथानं, ' ए गप्प जरा तिच्यायला, सकाळ रात काय हाय का नाय, उगा कधी पण या अन पडा इथं'
दोन्ही पैकी एक दरवाजा उघडुन नाथा बाहेर पहायला लागला, त्याला अशोकचा चेहरा दिसला तसा त्यानं दोघांना आत घेउन दरवाजा बंद केला. आतली बाई लगबगीनं आत गेली, तरी अशोकच्या नजरेतुन पदरावरची 'झग्गा मग्गा मला बग्गा' साडी सुटली नाही, खोलीत लोंबणा-या सगळ्या साड्या अन ड्रेस तसलेच होते. नाथानं त्याला डायरेक्ट विचारलं, ' काय रे भाड्या, काय झालं सिव्हिलला ? अशोकनं बोलायला तोंड उघडलं तोच ती झग्गा मग्गा एका ट्रे मध्ये तीन ग्लास चहा घेउन बाहेर आली, ट्रे ठेवुन ती तिथंच थांबली, नाथानं तिला हातानं इशारा करुन आत जायला सांगितलं, आता अशोक पुन्हा बोलायला लागला. त्याचं बोलुन संपलं, अजुन हातातला चहा संपला नव्हता तरी नाथानं दोघांना उठवलं आणि जवळ जवळ हाकलुन काढलं, अशोक पुन्हा बाहेर आला तो एकटाच, ना तो बरोबरचा माणुस होता ना बाहेर ती सुझुकी होती, तालमीकडुन एक दुसरी बॉक्सर आली अन इशा-यानुसार अशोक गुपचुप मागं बसला अन पुढच्या दहा मिनिटात ती गाडी, जोडबसवण्णा चौकातुन पुढं निघाली होती सुसाट,
आणि त्याच वेळी इकडं साठे चाळीच्या मागच्या बाजुला एक टेम्पो ट्रॅक्स मध्ये चार माणसं एखाद्या लांब प्रवासासाठी निघत होती.
त्या ट्रॅक्स मध्ये मुश्ताक आणि बांगरे होते, बरोबर दोन ड्रायव्हर आणि किमान पंधरा दिवस रानात राहता येईल एवढा कोरडा शिधा होता. मुश्ताक फोनवर चिडुन बोलत होता अन बांगरे घाबरुन गप्प होता, त्याला पुढच्या १५ दिवसांपेक्षा आज त्याची सायकल गेली याचीच काळजी जास्त होती. मुश्ताकचं बोलुन झाल्यावर ट्रॅक्स बाहेर निघाली अन मोदीमधुन पत्रकार भवनाच्या डाविकडुन सरळ विजापुर रस्त्याला लागली, पुलाजवळ दर्गा दिसताच तिथं मुश्ताकनं थांबायला सांगितलं, तसा तो ही घाबरुनच खाली उतरत होता पण त्यापेक्षा जास्त ड्रायव्हर घाबरला होता. मुश्ताक उतरुन दर्ग्यात गेला, प्रार्थना केली, खरं म्हणजे त्यानं अल्लातालाकडं माफी मागत होता, त्याच्या धाकट्या लेकाच्या वयाच्या त्या पोराला मारताना सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर मैन्नुद्दिनचाच चेहरा येत होता,म्हणुन तर त्यानं ऐन वेळेला त्या पोराला मारताना कधी नव्हे ते दोन वेळा विचार केला होता, मुंबईत समोरच्या गँगच्या माणसाला मारताना का मारतोय याची कल्पना असायची किंवा डोक्यात काहितरी खुन्नस असायचीच, पण हे कालचं मर्डर फक्त पैशासाठी केलेलं होतं त्यानं. मोठ्या पोरीचा निकाह पैशामुळं अडला होता अन आपल्या नेहमीच्या मार्गानं पैसे मिळण्याची शक्यता संपत आल्यानं त्यानं हा मार्ग पत्करला होता. सोलापुरातला त्याच्या मेव्हण्याच्या मित्राला, आनंद चव्हाणला हे काम करुन हवं होतं कुणा बाहेरच्या माणसाकडुन आणि मग मुश्ताक यात आला. प्रार्थना करुन मुश्ताक बाहेर आला. बांगरे अजुन गाडितच मागच्या हौद्यात पडुन होता,अन ड्रायव्हर रोडच्या पलिकडं जाउन कंबर तलावातलं चांदणं पहात होता.
मुश्ताकनं गाडीचा दरवाजा उघडला आणि त्या आवाजानं ड्रायव्हर पण परत आला, त्या दोघांना एकमेकांशी काही बोलायचं नव्हतं जे काही कम्युनिकेशन होतं ते बांगरेच्या मार्फत, कारण ड्रायव्हरला मराठी येत नव्हतं अन मुश्ताकला कन्नड. गाडीतले सगळे पॅसेंजर आले आहेत हे समजुन ड्रायव्हरनं गुपचुप गाडी सुरु केली अन विजापुरच्या दिशेला निघाला. तिथुन दोन अडीच तासाचा रस्ता होता फक्त. दर्ग्यात जाउन आल्यानं मुश्ताकच्या मनावरचा ताण थोडा कमी झाला होता तरी, झोप लागावी एवढा तो निवांत झालेला नव्हता. गाडीनं सोरेगाव सोडलं, अन पुढं दिसलेल्या पहिल्या एस्टिडी बुथजवळ गाडी थांबली, आधी ड्रायव्हर जाउन फोन करुन आला आणि मग मुश्ताक उतरला, आता मोबाईलच्या जमान्यात त्या बुथला असं ही गि-हाईक नव्हतंच, त्यामुळं तो बुथवाला जरा संशयानंच पहायला लागला. एस्टिडी बुथच्या काचा तुटलेल्या असल्यानं मुश्ताक जास्तच अवघडला. तरी दुसरा उपाय नव्हता. त्यानं मुंबईला फोन लावला, बायको, पोरी अन मुख्य म्हणजे मैन्नुदिन सगळ्यांशी बोलुन होईपर्यंत पंधरा मिनिटं गेली. अधुन मधुन तो गाडीकडं पाहात होताच, पण बाहेर येताच त्याचं डोकं सरकलं, तो ड्रायव्हर गाडीचं बॉनेट उघडुन काहीतरी करत होता अन जवळ जाउन पाहतो तो बांगरे गाडीत नव्हता. ड्रायव्हर बॅटरीच्या वायर काढुन काहीतरी करत होता आणि तसं तसं मुश्ताकची अस्वस्थता वाढत होती, आधीच हे सोलापुर - विजापुर - निपाणी - गोवा - कोल्हापुर - पुणे- मुंबई हा प्रकार त्याला आवडला नव्हता तरी त्यावर त्याचा उपाय नव्हता. त्याला पुन्हा मुंबईला वनपिस मध्ये सोडणं ही चव्हाणची जबाबदारी होती अन त्यामुळं तो म्हणेल तसंच त्याला वागणं भाग होतं. बांगरे आला, त्याल दोन शिव्या घालुन मुश्ताकचा राग थोडा कमी झाला. तो ड्रायव्हर गाडीत आत लावलेले नविन लायटिंगचं वायरिंङ जोडत होता. ते झालं अन मग गाडी तिथुन निघाली, आता गार वा-यानं मुश्ताकला थोडी झोप लागली, मध्ये एकदा त्यानं उठुन पाहिलं बांगरे झोपला होता, टेपवर ड्रायव्हरनं कन्नड गाणी लावली होती, समोर रंग बदलणा-या दिव्यात गणपती होता अन रस्त्यावरचा दगड विजापुर अजुन ५० किमी दाखवत होता.


Print Page

Thursday, November 3, 2011

चपला आणि सत्कार - भाग ३


थोडंसं मागच्या भागातलं - हर्षद आणि नाथा पैलवान एका हॉटेलात बसुन बोलत होते... तिथुन पुढे.....
नाथानं दिलेली ऑर्डर यायला दहा मिनिटं गेली, तो पर्यंत नाथा काही बोलला नाही, पुरी भाजी अन कुंदा आल्यावर त्यानं एका घासात गपकन कुंदा खाल्ला अन तसंच भरल्या तोंडानं अजुन एक कुंदा आणायची ऑर्डर दिली, वेटर गेल्यावर एक पुरी दोन घासात संपवुन नाथानं माझ्या डिशमधल्या दोन पु-या घेतल्या, वेटर कुंदा घेउन आल्यावर त्याला अजुन ८ पु-या आणायला सांगितल्या. मगाशी गडबडीत असणारा नाथा आता जरा शांत होता, त्यानं बोलायला सुरुवात केली ' मिरवणूकीच्या आधीच पकडला होता त्याला बे, आणि मारलाय पण असा म्हणे की एक वळ नाय अंगावर, दारु पाजुन उशी दाबली असंल तोंडावर' या सगळ्याशी हर्षदचा संबंध होता तो त्या एरियातल्या नगरसेवकामुळं, त्यांची महापलिकेतली कामं करताना त्याची गरज पडायची आणि त्यामुळं त्याची ही खास माणसं जरा ओळखीची होती. पण या असल्या भानगडीत एवढा सक्रिय सहभाग कधी घ्यायची वेळ आली नव्हती त्याच्यावर.' अण्णा म्हणाले की तुझ्याकडं आहेत बोरामणीची लमाणं कामाला म्हणुन तुला पकडालय, तु करायचंय एवढंच त्यातल्या एकाला माझ्याकडे दे पाठवुन, पुढं काय करायचंय ते मी करतो बरोबर. ' नाथा शेवटची पुरी तोडताना बोलत होता.
हर्षदच्या डो़ळ्यासमोर त्या बोरामणीच्या लेबर गँगचा लिडर अशोक आला, तो तेवढा डोक्यानं जरा चलाख होता आणि पोलिस स्टेशनच्या एक दोन चकरा पण मारुन झालेल्या होत्या त्याच्या. ' बरं, मी पाठवतो कुणाला तरी, कुठं पाठवु तेवढं बोला' हर्षद्नं त्याला होकार दिला.' पाठवतो काय, माझ्या बहिणीबरोबर पाट लावतो का काय त्याचा ?, आता घेउन चल मला त्याच्याकडं लगेच, ए बाय्प्रॉड्क्ट दोन फुल्ल चहा घे रे' आता नाथाला नाही म्हणणं शक्य नव्हतं, मगाशी पासुन मोबाईल सायलेंट करुन ठेवलेला हर्षदनं तो काढुन पाहिला, साहेबाचे १५ फोन येउन गेले होते, अजुन एक दोन त्या अशोकचेच होते, त्याला फोन करुन तरटी नाक्याला बोलावुन घेतलं अन दवाखान्यात गेलो आहे असा एसेमेस साहेबाला केला. अशोक यायला अजुन अर्धा तास लागणार होता, हॉटेल मधुन बाहेर येउन समोरच दोघंजण थांबले, तरटी नाक्यावरची* ऑफिसं आत्ता सुटली होती अन हिशोब चालु होते, ती गंमत पहात आणि आपल्या सभ्य मराठीत काही अतिशय उच्च्भ्रु शिव्यांची भर पाडुन घेत हर्षद उभा होता, पुन्हा एकदा मावा घेउन नाथा आला, पाठिमागुन थाप टाकत त्यानं विचारलः ' बसला होता का बे कधी बाहेरुन एसएससिला, का डायरेक्ट घरचाच फॉर्म भरला. ' हर्षद एकदम गडबडला, ' च्यायला काय पण बोलतो का बे ' नाथा आता मिस्किल हसत होता.
अशोकची फार वाट पहावी लागली नाही, ' नमस्कार साहेब' , आपली एम एटी बाजुला लावत अशोकनं हर्षदला नमस्कार केला, त्याच्या बाजुला कोण आहे याची त्याला कल्पनाच नव्हती. मग पुन्हा ते तिघे हॉटेलात गेले, तिथं नाथानं अशोकला नाष्टा चारला अन काय करायचं आहे ते सांगितले, त्यातलं अशोकला एवढं समजलं की, काल जो बोरामणीच्या शिवारात मुडदा सापडला आहे तो, नक्की नाथा सांगतो आहे त्याचाच आहे का हे सिव्हिल हॉस्पिटलला जाउन पाहुन यायचं. मदन तालमीत आल्यावर काढलेला फोटो नाथाच्या खिशातच होता एकदा ती बॉडी मदनचीच आहे हे फिक्स झालं की मग पुढचा मार्ग निश्चितच होता नाथासाठी. आता बोरामणीच्या हवालदाराला नाहीतर चौकी जमादाराला कसं गटवायचं अन गुपचुप तिथुन सिव्हिलला येउन ती बॉडी बघायची हे अशोकनं त्याचं त्यानं पहायचं होतं, नाथानं तिथंच त्याला पाचशेची नोट काढुन दिली अन संध्याकाळ पर्यंत इथंच भेटायला सांगितलं. अशोकनं पाचशेची नोट परत केली, आणि नाथाला म्ह्णाला ' पहिलवान, ह्ये पैस नको, आज रातची काय तर सोय लावुन द्या इथं बाजुला, बास झालं' नाथाला जाम हसु आलं आणि राग पण ' **व्या, तुझा बाप असले धंदे करत असेल *ई*ल्या, हवं असले तर घे पैसे अन काम कर बे, नुसता माज करु नको एक काम सांगितलं तर' बोलताना नाथानं अंगातल्या नेहरु शर्टाच्या बाह्या मागं केल्यावर अशोकनं गुपचुप टेबलवरचे पैसे उचलले. याचा अर्थ अशोक आज दिवसभर कामावर येणार नव्हता.
नाथा तिथुन निघाला अन बाहेरच्या बसस्टॉप वरुन थेट तामलवाडीची बस पकडली, बाउंड्रीच्या हॉटेलवर दोघांना ठेवल्याचा निरोप आला होता त्याला, त्याच बसमध्ये तुळजापुरनाक्याला अजुन दोन जण चढले, सगळे बसले वेगवेग़ळे तरी जायचं मात्र एकाच ठिकाणी होतं, बस तामलवाडी बाउंड्रीला थांबली, तशी एकच जण खाली उतरला तिघांपैकी अन दोघं पुढच्या स्टॉपला उतरण्यासाठी पुढं गेले, उतरलेला होता तो परेश, सोलापुरच्या तालमींच्या विश्वात असलेला एक दुर्मिळ ब्राम्हण माणुस. राहायला नवी पेठेत म्हणजे तालमी पासुन हाकेच्या अंतरावर, वर घर अन खाली रेडिमेडचं दुकान आणि एक पानपट्टी चालवायला दिलेली, असा परेश म्हणजे अगदी शेवटचा उपाय म्हणुन खेळात उतरायचा, नाहीतर त्याचा यांच्याशी संबंध फक्त रात्री शारदा थेटरला*१ शेवटच्या शोला जाउन बसणं एवढाच होता. अर्थात दातेंच्या देवळात श्रावणीला जाणा-या त्याच्यासारख्याला दिवसा शारदा मध्ये जाणं शक्यच नव्हतं.
तर हा परेश, हॉटेल समोर उतरला, मातीत तोंडातला ऐवज थुंकुन आत गेला, हॉटेल म्हणजे काय एक मोठं खोपटंच होतं, मध्ये एक टेबल ठेवुन मागं किचन केलेलं अन पुढं सहा टेबलं अन बाजुला बाकडी. त्या चहा करायच्या टेबलच्या वर गुटख्याच्या माळा लटकवलेल्या, खाली टेबलवर स्टोव्ह वर चहा उकळत होता, परेश तिथंच गेला अन एका टेबलमागं बसला, दहा मिनिटात नाथा अन त्याचा साथीदार तिथं आले, एका टेबलवर बसुन ऑर्डर दिली ' ओ, मालक एक चिवडा द्या कांदा घालुन अन दोन चहा घ्या गरम'. हॉटेलचे मालक टेबला खाली वाकुन चिवडा शेव काढायला लागले तसं, मागच्या बाजुला जात परेश बोलला 'मालक, दोन नंबरला मागल्या बाजुला जावं का शेतात?' मालक हो नाही म्हणेपर्यंत परेश मागच्या बाजुला पोहोचला होता. त्या एकाच खोपटाला मागच्या बाजुला एक दरवाजा होता, तिथंच एक पाण्याचा एक ड्रम होता अन बाजुलाच एक डबडं होतं. परेशनं ते डबडं उचललं, ड्रमातुन पाणी घेतलं अन खोपटाच्या दारातुन वाकुन विचारलं ' दोन नंबरला कुणीकडं जावं मालक, त्ये तिकडं बाभळीकडं जावं का नको तिकडं.' आतुन काही आवाज तर आला नाही, दोन मिनिटं थांबुन पुन्हा एकदा परेश दारातुन आत जरा जास्तच आत वाकला, आत एक बाकडं होतं आणि बाजुला एका सतरंजीवर एक बाई झोपली होती, अजुन कुणी नव्हतं. खबर पक्की नव्हती, पण लगेच पुढं जाउन चालणार नव्हतं. ते डबडं घेउन तसाच पुढं बांधामागं गेला अन तिथं पाच मिनिटं थांबुन परत आला. नाथा अन त्याचा साथिदार अजुन चिवडा खात होते. दुस-या टेबलमागं बसुन परेशनं समोरचा ग्लास उचलला अन घाण असल्यासारखा तो झटकला. मागं रस्त्यावर एक एस्टि थांबली होती, नाथा उठुन पैसे द्यायला आला, त्याचा साथिदार खोपटाच्या बाहेर पडला, मागं मागं नाथा पण गेला. आता तिथं एकटा परेशच होता.
नाथाचा साथीदार कोंतम चौकात उतरला, नाथा एस्टी स्टँडपर्यंत बसुन होता. स्टँडवर उतरुन बाहेर न पडता नाथानं हैदराबादला जाणारी एशियाडमध्ये सगळ्यात शेवटचं सीट पकडलं, अन गाडी सुटेपर्यंत २-३ फोन करुन घेतले. अशोकचा मिस कॉल आल्यावर मात्र नाथा खाली उतरला, आणि सरळ समोरच्या सोलापुर इडली गृह मध्ये जाउन बसला, जेवणाची वेळ असल्यानं तिथं बरीच गर्दी होती, एका कोप-यातल्या तुटक्या टेबलवर बसुन त्यानं अशोकला फोन लावला, दोन तीन रिंग नंतर अशोकनं फोन उचलला. पाच मिनिटं बोलणं झालं आणि नाथा उठुन बाहेर आला. आता तो थोडासा निवांत दिसत होता. तामलवाडीचं काम हुकलं होतं तरी सिव्हिलचं काम पक्कं झालं होतं. नाथा आता घरी निघाला होता, अजुन लग्न न झालेली त्याची बायको घरी जेवायला वाट पाहात बसलेली असणार होती.


Print Page