Wednesday, August 31, 2011


श्रावणाच्या पहिल्या रविवारी भुलेश्वर ते शेवटच्या रविवारी पाटेश्वर असा शाक्तपंथीय शिवालयांचा प्रवास घडला, भुलेश्वराचे फोटो आधीच टाकलेत म्हणुन हे पाटेश्वराचे.
जवळुन पाहिल्यावर हे फुलांचे ताटवे दिसले,
हि दोन फुलं तर घ्यावीच वाटली
अजुन किती लांब अन उंच असा विचार करतानाच अचानक समोर काही बांधीव पाय-या आल्या बहुधा आपल्याला इथंच जायचंय जवळच, आता सामानाचं ओझं जरा हलकं वाटायला लागलं, पाय-या संपता संपताच समोर आली ती त्या बाजुच्या डोम्गरातच खोदुन काढलेली गणपतीची प्रतिमा अगदी रिद्धी सिद्धि सहित.
मुर्तीच्या पायावर डोकं ठेवलं पण पायवाट पुढं पुढं जातच होती.
आता बराच वेळ चालल्यावर पुन्हा एक बांधकाम असावं असं काही दिसु लागलं, वाटेतच एक मोठं झाड, वडाचं का पिंपळाचं, समजुन घ्याय्ला वर नजर फिरवली तर छे विश्वासच बसेना त्याचा, चाफ्याचं झाड एवढं मोठं, पण विचार करायला वेळ नव्हता, सहज मागं पाहिलं,
कळकबेट
किती छान कुंड आहे, आणि चक्क कमळं आहेत त्यात,
थांबुन चालणार नव्हतं,
त्या दगडी पाय-या पार करुन पुढं आलो आणि थबकले, देवळाच्या बाहेर देव आणि तो ही असा
पुढं नेणा-या या पाय-या अन त्यांच्या भिंतीतले हे दिव्यांचे कोनाडे,
एका मोठ्या कोनाड्यातलं हे शिवलिंग
ही अजुन एक सुरक्षादेवता
पाय-यांचा वर असलेलं हे देउळ
आणि हा नंदि
आणि त्याच्या पायाला वेटो़ळा घातलेला हा सर्प,
आणि त्या नंदिच्या पायात असलेलं हे शिवपुजेचं शिल्प
देवळाच्या बाहेरच्या भिंतीत असलेला हा महामहादेव,
पुर्वी अतिशय रागीट पण आता या मर्त्य मानवाला काही करत नाहीये,
याच देवळाच्या प्रांगणातली अजुन काही मंदिरं जी पाहुन सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल ,
का हेच पहा, हा शेषशायी विष्णु अगदी लक्ष्मी सह चक्क महादेवाच्या देवळात
आणि हा चार मुखी ब्रम्हा चक्क शस्त्रासह
आणि महादेवाच्या सर्पांबरोबर जन्मोजन्मिचं वैर असणारा विष्णु वाहन गरुड पण,.
खरंतर देउळ हे याचं महादेवाचं
ही चार हात असलेली शिव प्रतिमा
बाहेरची ही अष्टभुजा
आणि हा स्त्रि गणेश
ही शिव पार्वती प्रतिमा
आणि ही इतर मंदिरं, सगळी शिवाचीच पण भव्य अन गुहेत कोरुन काढलेली.
इथं पिंडीवर पिंडी आहेत, वेगळाच प्रकार
पिंडिवरच काय पण गुहेतल्या खांबावर अन भिंतीवर पण पिंडीच आहेत. आणि बाकी आहेत त्या पिंडी तरी किती वेगळ्या आहेत..
ह्या पिंडी आहेत का उखळं आहेत ?
हा दुसरा नंदी आणि त्याच्या पाठीवरची वेग़ळीच नक्षी.
हे नंदिच्या वर असलेले छत
हे मंदिराचे गवाक्ष, दगड कोरुन काढलेले ,
जेवढ्या या पिंडी अनाकलनिय तेवढ्याच या खुणा सुद्धा.
अरे भगवंता शंभो हे काय रे हा प्रकार तुलाच माहिति याची महती अन कार्यकारणभाव
]
काही धार्मिक अथवा ऐतिहासिक माहिती चुकीची असण्याची शक्यता आहे तरी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी मार्गदर्शन केल्यास बदल करेन.

Print Page

Saturday, August 20, 2011

’असे ही तसे हि’ आणि दुसरं ’ अग्निसखा’.


हल्ली असे क्षण फार कमी येतात आपल्या आयुष्यात की जे पुन्हा पुन्हा जगावे वाटतात, म्हणजे मागच्या पिढितल्यांना त्यांचे सगळं आयुष्य पुन्हा जगावसं वाटत असेल असं नाही, पण म्हणुनच हा लेखनप्रपंच तायडीच्या म्हणजे क्रांतीच्या जीवनातल्या अनेकोत्तम सुखी क्षणांपैकी काही क्षण पुन्हा जगवण्यासाठी.(अशी जड जड वाक्यं सुरुवातीला टाकली म्हणजे आता उशिर झाल्याबद्दल शिव्या नको खायला).

मा. सुरेश भटांच्या आशिर्वाद अगदी सुरुवातीच्या काळात लाभले क्रांतीला आणि जसं काही नदीनं उगमानंतर लगेचच समोरच्या कड्यावरुन झोकुन द्यावं तसं तिनं कविता आणि गझलांच्या विश्वात स्वताला झोकुन दिलं, घरची मोठी लायब्ररी, बाबांचं आपल्या लेकरांना वाचनाचं वेड लावण्याचं वेड, या आणि अशा ब-याच गोष्टींनी या काव्यसरितेला वेग दिला,योग्य वेळी मिळालेलं प्रोत्साहन आणि कौतुकाच्या झ-यांनी ह्या नदीचा विस्तार वाढवला नसेल कदाचित पण त्या पाण्याला वाहतं ठेवलं, त्याला त्याचा मुलभुत गुणधर्म, वाहणं विसरु दिला नाही.
पुढं ही नदी,डोंगर द-यांतुन पठारावर आली तसं वाहण्याच्या गुणधर्माबरोबर कर्तव्याच्या तीरांचा एक नाजुक बंध तिला मिळाला,त्या बंधात स्वताला सुखानं बांधुन घेत आणि त्याच्या सुरक्षित मर्यादांच्या कठिण पणानं अजुन सुखावत ती पुढं वाहत राहिली, आज पर्यंत त्या नदिच्या एका एका वेगळ्या वेगळ्य़ा वळणानं, छोट्या छोट्या खळाळांनं आपल्या सर्वांना मोहित केलं, क्षणभर आपली दुखं, कष्ट विसरायला लावले, आज अशाच काही वळणांचा, आंतरप्रवाहांचा अन त्या डोहातल्या भोव-यांचा एक एकत्रित अनुभव आपल्यासाठी, या रसिकांसाठी सादर केला जातो आहे.
नदीला स्व:ताचं नाव असलं तरी तिच्या प्रवाहातल्या या मोहमयी डोहांना पण वेगळी नावं आहेत, एक आहे
’असे ही तसे हि’ आणि दुसरं ’ अग्निसखा’.
श्री. परांनी इथं माहिती दिलेली होतीच, त्यानुसार क्रांतीच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सात ऑगस्ट, रविवारी नागपुर येथं साजरा केला, त्याचा हा रिपोर्ट.
या दोन पुस्तकांबद्दल थोडं साहित्यिक लिहुन झाल्यावर थोडी तांत्रिक माहिती, हा सोहळा साजरा केला नागपुरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभाग्रुहात, रविवारी संध्याकाळी.
वर फोटोत दिसतंय त्याप्रमाणे प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर यांचे आगमन झाल्यावर, क्रांतीची ज्येष्ठ कन्या अश्विनिनं कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, सुरुवात मा. श्री. गिरिश गांधी यांच्या अतिशय मोजक्या शब्दातल्या अन थेट भाषणानं झाली.
श्री. गिरिश गांधी.
यानंतर दिप प्रजव्लन, सरस्वति पुजन झालं, आणि नंतर मुख्य सोहळा झाला प्रकाशनाचा,
व्यासपिठावरच्या मान्यवरांनी त्या सोनेरी फिती सोडुन चमकणा-या कागदात बांधलेल्या दोन पुस्तकांना त्यांचा पहिला मोकळा श्वास घेउ दिला अन त्या पुस्तकांएवढंच छान अन मोठं हसु क्रांतीच्या चेह-यावर फुलुन आलं,
या कविता, गझला या तिला तिच्या लेकरासारख्याच, पण लेकराला जन्म देताना एक विशिष्ट कालावधि असतो तो माहित असतो, पण हे कविता गझलांचं तसं नसते, त्या आधी मनात, मेंदुत जन्मतात, मग कागदावर उतरतात आणि कालांतरानं पुस्तकरुपात येतात, कविला किंवा कवयित्रिला हे जन्मचक्र तीन वेळा भोगावं लागतं, भोग म्हणुन तो सुखाचा असतो अन वेदनेचाही, पण त्या सर्व प्रवासात हा एक थांबा, एक विसावा फार महत्वाचा असतो.
यानंतर, प्रमुख पाहुणे मा. गझलनवाज श्री, भिमराव पांचाळ उर्फ दादांनी, मराठी गझलांचं विश्व आणि त्यातल्या स्त्री गझलकारांविषयी सुंदर विवेचन केलं, आधीच मराठित गझल हा तसा थोडासा दुर्लक्षित काव्य प्रकार अन त्यात पुन्हा स्त्री गझलकार हे तर दुर्मिळात दुर्मिळ या परिस्थितीवर त्यांनी जे भाष्य केलं त्याचा त्यांना निश्चितच अधिकार आहे. त्यांच्या बोलण्यातुन त्यांच्या या अधिकाराबद्दल समोरच्याला करुन दिली जाणारी नम्र जाणिवसुद्धा जाणवत होती पण गर्व नव्हता, राजानं तो राजा आहे हे समोरच्याला जाणवुन दिलंच पाहिजे पण त्याच्या राजेपणाचा समोरच्याला बोजडपणा न वाटता असं दादांचं भाषण झालं, त्यांनी क्रांतीला शुभेच्छा आणि आशिर्वाद तर दिलेच पण त्याचबरोबर ’ आता थांबशील तर बघ’ असा सज्जड दम पण दिला. या गझलांपैकी काहि गझला ते त्यांच्या गझलगायनाच्या कार्यक्रमात घेणार असल्याचंही त्यांनी सुचित केलं.
कोणतंही लेखन हे फक्त आपल्या मित्र आप्तांनी डोक्यावर घेउन नाचलं म्हणजे चांगलं असं होत नाही, त्या मधलं बरं वाईट निवडायला एक टिकाकार, एक समिक्षक असावा लागतो, ति भुमिका या ठिकाणी डॉ. सुलभा हेर्लेकरांनी पार पाडली, क्रांतीच्या कविता, गझला छान आहेत यात वाद नाहीच परंतु त्या पुस्तकरुपात आणण्यास तिनं जो उशिर लावला याबद्दल सुलभाताईंनी तिचे थोडे कान पिळले.
यानंतर, स्वत: क्रांतिनं दोन शब्द बोलले, खरंतर जिनं तिच्या कवितेतुन एवढं काही बोललं आहे, तिच्याकडुन त्या कविता ऐकण्याचीच अपेक्षा होती अन ती सुद्धा पुर्ण केली तिनं.
सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर अश्विनी व प्रतिक(क्रांतीचा भाचा), यांनी माईकचा ताबा श्री.फड्णीसांच्या कडे आभार प्रदर्शनासाठी दिला,
कार्यक्रम संपत आल्याची जाणिव आणि पुन्हा एकदा आपल्या व्यवहारी जगात जाण्याची लगबग सर्वांच्या चेह-यावर दिसत होती, सर्व उपस्थित रसिक अल्पोपहाराचा अन चहाचा आस्वाद घेत होते, त्याचवेळी, फडणीसांनी दादांच्या म्हणजे भिमराव पांचाळांच्या ’ गरिबाच्या लग्नाला नवरी’ या प्रसिद्ध गझलेबद्दल त्यांना छेडलं आणि त्यांच्या विनंतीला मान देउन दादांनी या प्रसिद्ध गझलेचे दोन कडवी गाउन दाखवली, अन ख-या अर्थानं या सुंदर कार्यक्रमाची अतिशय सुंदर सांगता होणार याची खात्री झाली.
कार्यक्रमाचा प्रत्यक्ष शेवट प्रथमेशनं गायलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगीतानं झाली.
या नंतर हॉटेल प्रेसिडेंट इथं झालेल्या कौटुंबिक प्रितिभोजनाच्या समारंभाला अनपेक्षितरीत्या दादांची उपस्थिती सर्वांनाच छानसा धक्का देउन गेली, त्याच वेळी काही इतर प्रख्यात नेट कविंचा प्रत्यक्ष भेटण्याचा योग जुळुन आला.

Sunday, July 3, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ९

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ९
सुरेखा धाकट्याला उचलुन आत घेउन गेली, तिच्यामागंमागं ज्योती पण गेली आता फक्त शकुताई अन आत्याच, दोघीच बायका होत्या तिथं, कालच्यासारखं अजुन तरी शिव्या देण्यापर्यंत वेळ आली नव्हती पण कधीही येउ शकली असती, असं वातावरण होतं. जग्गनाथकाकानं पुन्हा मंद्याला विचारलं ’काय रे मंद्या, काय त्ये बोल की शेवटचं, का उगा ओढताय विषय बिनकामाचा’, मंद्या मगाशीपासुन धुमसत होताच त्याला हा चान्स हवाच होता कुणीतरी विचारायचा,’ म्या काय आखाडाचा हक्क सोड्णार न्हाय, नाय विकणार आखाड कुणालाच, काय करायचं ते करा कुणीबी, राव्हदे आखाड मेल्या म्हाता-याचंच नावानं काय बिगडत न्हाय, कुणाचं,’ , ’ठिक हाय’, आत्यानं त्याला उत्तर दिलं’ मग हिसाब कर पाण्यच्या धंद्याचा अन दे वर्साचं पैसं सगळ्याना वाटुन तु, जमिन पायजे पन उत्पन नको द्याया कुनाला असलं नाय चालणार, नायतर हर्षद देतोय ना धा लाख एकराला घे गुमान अन हो बाजुला,’ हा मुद्दा गण्याला सुद्धा पटला, त्यानं पण लगेच हो ला हो केलं. जग्गनाथकाका तर काय तयार होतेच, ते पैसे घेउन काय करणार होते ते माहीत नाही पण वय झालं म्हणुन काय मोह सुटत नसतो माणसाचा. शकुताईचा विरोध होता तो मी पैसे कुठुन आणणार यासाठी, नाहीतर तिला पण पैसे हवेच होते. मंद्या एकटा पडल्यासारखा झाला होता, त्यानं शेवटचा डाव टाकला’ पर म्या पाण्याचा धंदा हाय तसाच करणार, त्याला कुणि हात नाय लावायचा त्याला’, उसनं का होईना पण अवसान आणलं होतंच म्हणुन त्याच तो-यात त्याला बोललो’ छे हे असलं नाही जमणार, जमिन माझी तर विहिर अन विहिरिचं पाणि पण माझंच, घराला अन तुझ्या शेताला जे लागेल ते पाणी ने की, पाणी विकायचा धंदा करणार असशील तर फिफ्टी फिफ्टी करावा लागेल फायदा, आताच सांगुन ठेवतो, पुन्हा नंतर लफडे करायचे नाहीत, जमिन घेतोय म्हणजे माझी माणसं पण आणुन ठेवेनच मी इथं जमिन राखायला, उगा गावातल्यांच्या गमजा नाही चालु देणार, असेल कबुल तर बोला नाहीतर द्या कुणी पण दहा लाख अन सोडवा हा प्रश्न’
बैठक आता चांगलीच तापली होती, एकाबाजुला पाच लाख मिळणारे अन एका बाजुला हेम्या, असं लफडं होतं.सुरेखा धाकट्याला आत झोपवुन परत आली होती, तिच्या आणी मंद्या मध्ये काहितरी डोळ्यानं बोलाचाली झाल्या, काय झालं ते मला समजणं शक्यच नव्हतं. जग्गनाथकाकानं तिला चहा करुन आणायला सांगितला तसं जरा नाराजीनंच उठुन ती आत गेली. अण्णा आता सगळ्यात जास्त वैतागले होते,’ काही ठरवणार आहात का संपलं सगळं आहे तसंच’ ते बोलुन गेले. मंद्या त्यांच्याकडं पहात म्हणाला ’ ठिक हाय मला कबुल हाय सौदा, बाकी जमिनी मी अन गण्या घेतोय काल ठरल्याप्रमाणे अन आखाद घिउद्द्या हर्षदरावांना. व्यवहार कधी पुर्ण करायचे तेवढं बोला आता, माज्याकडं पैसं नाय लगेच द्यायला, १५ दिस तरी सोडा त्यासाठी’ मगाशी काय झालं सुरेखाबरोबर की लगेच तयार झाला, हे समजणं अवघड होतं. पण आता ते समजुन घ्यायच्या नादात मी नव्हतो. शकुताई पुन्हा माझ्याकडं भुत पाहिल्यासारखं पहात होती अन आत्या खुश होती, तीच्या एक दोन डायलॉगनं तिचा बराच फायदा झाला होता. अण्णांचा चेहरा पडला होता पण नाईलाज होता. जग्गनाथकाका निवांत होते, ना खंत ना खेद अशी अवस्था होती.
प्राथमिक स्तरावर बोलणी संपली होती, प्रिंसिपलि अ‍ॅग्रीड अशा अवस्थेत होतं सगळं. आता शकुताई सोडुन कुणीच टेन्स नव्हतं. मी पैसे कुठुन आणणार याचं माझ्यापेक्षा तिलाच जास्त टेन्शन होतं. मी उठुन आत गेलो, लॅपटॉप चालुच होता, हेम्या.डॉक ओपनच होती, हायबरनेट मधुन बाहेर आल्यावर हेम्यानं विचारलं ’ काय रं काय झालं, म्या म्हनतोय तसंच केलंस का आलास पुनांदा शेपुट घालुन **त घालुन,दमच नाय तुमच्यात काय करनार म्या तरी, मरा तिच्यायला असंच घाबरत घाबरत जगा अन असंच मरा एक दिस, कुनाला काय पड्लं नाय तुमच्या जिंदगानीचं’ हे वाचुन मला हसु येत होतं, त्याच्यासारखाच थोडा पॉज घेउन मी टाइपलं ’एकराला दहा लाख घेउन आखाड घेतला मी’, एक रिटर्न पॉज आला, त्यानंतर शब्द दिसले’ शाबास रं माज्या मर्दा, एक तो धाकटा अन तु दोगंच माजा वारसा चालिवणार आता माज्या मागं, मंद्या किती म्हणत होता, सा का सात?’ ’ छे रे तेवढे काय देतोय तो,चार म्हणत होता फक्त, गण्याच सात म्हणत होता, म्हणुन मी दहा म्हणालो, आता पैसे मिळवुन देणं तुझ्या हातात आहे हेम्या. दोन महिने मागुन घेतलॆत मी पैसे द्यायला सगळ्यांचे’
हेम्याचं उत्तर आलं ’मालक जरा लांबच पाय टाकलाय तुमी, धा लाख म्हंजे पंचवीस लाख झालं,आनि पैसं मिळवायला लागणारा कच्चा माल माज्याकडं लागलं, पैसं देणं न्ह्याय, ते तुलाच करावं लागेल, म्या निस्तं पोती भरुन देणार ती नियाची, बाजारात विकाची ह्यो धंदा म्हाजा नवं, आमी शेतात जलम्लो आनि शेतापतुरच आपला आब हाय, एकदा का माल पेंड्यापोत्यात बांदुन घातला आडत्याच्या कट्ट्याला का आपलं काम संपलं, त्यापुडचं कुनाला ठाव कसं असतंय ते’ आता हे वाचुन मी पुरता अडकलो आहे याची जाणिव मला झाली आणि रागाबरोबरच मी एवढा मुर्ख कसा निघालो याचं आश्चर्य पण वाटायला लागलं. थोडं वर स्क्रॉल करुन पुन्हा पहिल्यापासुन वाचायला सुरुवात केली,”एक तो धाकटा अन तु दोगंच माजा वारसा चालिवणार आता माज्या मागं’ हे वाक्य पुन्हा वाचलं, कॉपी पेस्ट केलं खाली अन विचारलं ’ हेम्या ह्याचा अर्थ काय, काल तो इथं खोलीत येउन गेल्यापासुन वेड्यासारखं करतोय, तुझं कालपासुन आत्म्याचं कनेक्शन चाललंय आणि वारस, ह्याचा अर्थ काय आहे नक्की?’ आता बराच वेळ मध्ये गेला नंतर शब्द आले ’ व्हय तुला जे वाटतंय ते खरंय, धाकटा माजायं, मंद्याचा नव्हं’ माझ्या माकडहाडात वायरी घालुन कुणीतरी शॉक देतंय असं वाटत होतं, एकतर हे असलं वाचणं आणि समोर शकुताईचं उभं राहणं,ती आत कधी आली ते कळालंच नव्हतं. शकुताई मगाशी बाहेर नुसतीच टेन्शन मध्ये होती आता वेडी झाल्यासारखी पहात होती माझ्याकडं अन मला जाब विचारत होती मी असं का केलं त्याचा. मी काहीच बोललो नाही,तिचा आवाज ऐकुन दारात सुरेखा अन धाकटा आले होते. मी काहीच बोलत नाही हे पाहुन तडतडत निघुन गेली.
ती बाहेर जायला वळाली तशी, सुरेखा पण निघुन गेली,धाकटा सुरेखाच्या पदरात तोंड लपवुन जाता जाता घाबरुन पहात होता. सगळं आवरायला घेतलं, जेवणं झाली कि निघायचं होतं. वाटणीचे कच्चे कागद बाहेर अण्णा बसुन करत होते, जग्गनाथ काका तिथं होतेच, त्यावर सह्या करुन, जेवणं झाली की निघायचं. मग येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष व्यवहार करायचे होते खरेदि विक्रीचे. पैसे लगेच द्यायला माझ्याकडं पण नव्हते अन मंद्याकडं पण नव्हते. दोन महिन्यात पैसे द्यायचे म्हणजे त्याआधी हेम्याचा कच्चा माल नेउन बाजारात विकावा लागणार होता, त्यासाठि आडत्याचं काम करावं लागणार होतं. पण जो माल बाजारात खपु शकतो असा कच्चा माल त्याला पुरवता आला पाहिजे होता. पैसे कसे येतील यापेक्षा आता कुणाकडुन येतील याची आता मी काळजी करत होतो, डोळ्यासमोर एक दोन कंपन्या होत्या ज्यांच्याकडुन मला या आधी इनडायरेक्ट ऑफर आल्या होत्या डाटासाठि, नित्यानं तर घराचं डाउन पेमेंट पण या पैशातुन केलं असावं अशी मला शंका होती.
गण्या खोलीत आला, कागदपत्रं झाल्याचं सांगायला, माझंही आवरुन झालं होतं. तो जरा बसला म्हणुन मी पण बसलो, आता टेन्शन काही नव्हतं, त्याचा झाला तर तो फायदाच झालेला होता. ’ हर्ष्या, एक सांगु, आखाड ताब्यात घेतलास ना दोन कामं पय्ला कर बग, म्हंजे तुमी नाय गावात राहात म्हनु तुमाला खरं नाय वाटायचं पन अनुभव हाय म्हनुन बोलतो, एक म्हंजे हिरितली देवी भायर काड, एका बाजुला छोटं देउल बांध अन दोन चार झाडं लाव, म्हंजे बाकी जमिनीत तु कायपन करायला मोकळा अन दुसरं म्हंजे ती हिर बुजीव, वरसाकाठी ३-४ मुडदंतर हायत तिथं, लै केलं मंद्यानं जाळ्या लावल्या, माणसं ठिवली राखनीला पन काय उपेग नाय झाला, एकदा तर राखणदारच मेला आत जाउन,शापाची बिपाची कायतर भानगड हाय त्यात, उगा तुज्या चालत्या संसाराला खिळ नको त्यानं.’ तो बोलायचा थांबला तसा मगाशी वाळत आलेला घाम पुन्हा फुटतो का काय असं वाटायला लागलं. मग तोच खांद्यावर हात टाकुन उठत म्हणाला’ सोड ते चल पटकन सह्या अंगटे करा अन जेवाया बसु लगेच, उगा तुमाला निघाया उशीर नको’ ही असली खेड्यातली माणसं आधी काहीतरी करायला लावतिल अन मग नंतर त्याचे तोटे सांगत राहतील अन मग नंतर पुन्हा आपणच सांत्वन करतील वरुन.
बाहेर आलो, भिती, दुख:, आनंद आणि अशा ब-याच भावना एकाच वेळी अनुभवत होतो. हॉलमध्ये सगळे बसले होते, अण्णांनी वाटणीचे मुद्दे वाचुन दाखवले, मध्येच अजुन दोन तीन लोक बोलावले होते पंच लागतात म्हणुन. कागद पुन्हा एकदा सगळ्यांना दिला गेला, प्रत्येकानं वाचुन पाहिला.मंद्या, गण्या मी आणि शकुताई आम्ही सह्या केल्या, शेवटी आत्या अन काकानं अंगठे उमटवले. साक्षीदार म्हणुन अण्णा अन इतर चार जणांनी सह्या अंगठे केले अन एक मोठा कार्यक्रम संपला. ओझं उतरलं अन चढलं एकदमच. अशीच वेळ घराच्या रजिस्ट्रेशनला गेलो तेंव्हा झाली होती. बाहेरची मंडळी निघुन गेली घरचे सोडुन फक्त अण्णा जेवायला होते. काल त्यांनीच फर्माइश केल्याप्रमाणे गव्हाची खीर अन चपात्या होत्या, त्याबरोबर शेंगाची आमटी, वांग्याची कोरडी भाजी अन हरभ-याची कोरडी डाळ, एवढंच होतं. आईच्या हाताची चव नव्हतीच अन आता खेड्यात पण पिवळा अन निळा पोहोचलेत त्यानं चुलीची पण नव्ह्ती आणि असती तरी मला समजली नसती. दोन घास कमीच जेवलो, अजुन ड्रायव्हिंग करत पुण्याला जायचं होतं. बरोबर शकुताई होति, आत्याला सोलापुरला सोडुन पुढं जायला थोडा वेळ लागणार होता. जेवता जेवता शकुताईचा फोन वाजला,बोलता बोलता तिचा चेहरा हसरा होत होता, तिनं फोन कट केला अन ह्सत हसत सगळ्यांना सांगितलं ’ काका, आत्या, अण्णा आता यापुढचं असं एकत्र जेवण हर्षदच्या घरी बरं का, बाप होतोय पुन्हा एकदा, यायचं हं सगळ्यांनी बारश्याला न चुकता’ ऐकुन माझा खिरीतला हात खिरितच राहिला आणि सकाळपासुन अनुला फोन करायचं विसरल्याचं लक्षात आलं, कालच ती बरं नाही म्हणुन तिच्या आईकडं गेली होती तरीपण मी तिला सकाळपासुन फोन केला होता, खरंच पैसा, जमिन, जुमला अन भुतं आपल्याला आपली माणसं विसरायला लावतात हेच खरं.. तिच्या आठवणीत सगळ्यांचे अभिनंदनाचे अन बाकी टोमणे ऐकुच आले नाहित, मला आता फक्त लगेच निघायचं होतं माझ्या अनुला भेटण्यासाठी...

Print Page