Monday, August 6, 2012

क क कपलचा - भाग ६


गच्चीवरचं सगळं आवरुन झालं, दोघं घरात आले तेंव्हा निकाळजे काकु घरी निघुन गेल्या होत्या, त्यांच्या दाराबाहेर तेच दोन महागडे बुटांचे जोड होते, घराचं दार स्मितानंच उघडलं, आज मुक्कामाला आलेले असल्यानं तिनं कपडे बदलुन गाउन घातला होता, मागं बेडरुममधुन अनु बाहेर आली, तिचंही आवरुन झालं होतं. 'चहा करु का रे?' तिनं विचारलं, कुणीच काही बोलत नाही हे पाहुन ति सुद्धा गप्प झाली, सगळे जण हॉलमध्येच बसुन होते. पार्टीत ब-याच गोष्टी स्मिताच्या कानावर पडल्या होत्या, काही आधीपासुन शरद लपवतो आहे हे तिला जाणवत होतंय, त्यामुळं आता तिच्या स्त्रिसुलभ आकर्षणानं हे सगळं नक्की काय आहे हे तिला जाणुन घ्यायचं होतं, पण स्पष्ट विचारणं शक्य नव्हतं,म्हणुन ती देखील गप्प होती. पाच मिनिटं अशीच टेन्शनमध्ये गेली ' आम्ही दोघं इथं हॉलमध्येच झोपतो,तुम्ही दोघी आत झोपा' हर्षद उठत बोलला, सगळ्यांना तेच हवं होतं. अंथरुणं टाकुन हर्षद पुन्हा दरवाजा लावायला आला तेंव्हा ते महागडे बुट जागेवर नव्हते.
' तुला वाईट वाटलं का ग फार, लोकं काय बोलतात ते ऐकुन?' बेडवर एका कुशीवर होत अनुजानं स्मिताला विचारलं, स्मिता गोंधळली, हो म्हणावं तर काही माहित नाही, नाहि म्हणावं तर फार बावळटपणा वाटेल, ती उगाच डोळे मिटुन झोप लागल्यासारखी पडुन राहिली. कुस बदलत अनुजानं विचारलं ' तुला नाही का ग काही वाटत बाकीं कुणाबद्दल, म्हणजे पुरुषांबद्दल ?' स्मितानं घेतलेलं झोपेचं सोंग गळुन पडलं, डोळे सताड उघडले, थोडंसं घाबरतच तिनं अनुजाकडं पाहिलं, अंगापिंडानं तिच्यापेक्षा थोडी थोराडच होती अनुजा, तिच्या डोक्यात नाही ते विचार यायला लागले, अगदी आता इथुन उठुन दरवाज्यापर्यंत जाउन कडी काढुन बाहेर कसं पळायचं इथंपर्यंत सुद्धा.' मला वाटतं, म्हणजे कधी आकर्षण वाटतं, तर कधी कीव येते, कधी तर त्याचीच कीव येते ज्याचं आकर्षण वाटतं.' सगळा धीर गोळा करुन स्मितानं एकच शब्द उच्चारला 'का?'. गच्च पाणी भरलेल्या टाकीचा एकच थेंब पुरेसा असतो ओव्हरफ्लो सुरु व्हायला तसं झालं,.
'सेकंड इयरला असताना' अनुजानं सुरुवात केली' मी प्रेमात पडले पहिल्यांदा आमच्या एका सरांच्या, एक वर्ष नक्की काही कळलंच नाही, पण थर्ड इयरला मात्र ब-याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या, इतक्या की मला आवडणारा शर्ट सर सलग दोन दोन दिवस घालायचे आणि मी पण रात्री ड्रेस धुवुन पुन्हा दुस-या दिवशी तोच घालुन जायचे, कॉलेजात चर्चा होत होत्याच, पण ना मी कधी स्पष्ट बोलले ना कधी सर. एक दिवस मैत्रिणीच्या घरी गप्पा मारताना तिच्या लहान बहिणीनं ऐकलं, तिच्या आईला सांगितलं आणि मग माझ्या घरी समजलं. गोंधळ झाला,वय,कमाई अशा चिल्लर तेवढ्या सगळ्या गोष्टी आड येत होत्या. खरंतर आम्हाला लगेच लग्न वगैरे करायचं नव्हतंच, पण आमचे संबंध फार पुढं गेले आहेत असा काकुला संशय होता, ' एवढी भरली कशी नाहीतर वर्षात' मी आणि आई दोघीच समोर असताना तिनं घेतलेला संशय आणि कँटिन मध्ये बसुन मारलेल्या गप्पा यांचा संबंध लागायला लागला मला. कॉलेज बंद, मैत्रिणी बंद आणि स्थळं पाहणं सुरु झालं. पंधरा दिवसात तीन ठिकाणी दाखवुन झालं. साहजिकच मी सुद्धा ठाम विरोध सुरु केला,जे विचार आजपर्यंत करत नव्हते ते करायला लागले, माझी काही चुक नसताना मला शिक्षा भोगावी लागत होती, म्हणुन बंडाचा मार्ग धरला.'
'बंड म्हणजे?', एक अध्याय संपेपर्यंत ऐकणारा सत्यनारायणाच्या कथेत गुंतलेला असतो, मध्येच गुरुजी पाणी प्यायला थांबले तरी अस्वस्थ व्हायला होतं, तसं स्मिताला होत होतं. अनुजा खिड्कीच्या बाजुला होती, त्यामुळं तिच्यामागुन रस्त्यावरच्या लाईटचा येणारा उजेड तिच्या चेह-यावर पडत नसला तरी तिच्या मागं एक प्रभावळ उभी केल्याचा भास होत होता, आणि ही कथा ऐकताना अनुजा काही एखाद्या देवीपेक्षा कमी नाही असंच स्मिताला वाटत होतं. 'चार दिवस जेवलेच नाही, आजारी पडले, घरीच डॉक्टरांना बोलावुन उपचार सुरु झाले, मैत्रिणि यायला सुरुवात झाली, एक दिवस मैत्रिणिकडुन त्या गोळ्या मागवुन घेतल्या, घेतल्या, पहिल्यांदाच, घाबरतच पण अपेक्षित परिणाम झाला, तारखा उलटुन गेल्या. पहिल्यांदा आई आणि काकु उघडपणे,आणि नंतर सगळेच हादरले. काका आणि बाबा त्याच दिवशी कॉलेजमध्ये जाउन सरांना भेटले, पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट नाकारलं, मला भेटण्याची परवानगी मागितली एकट्यानं. अर्थात असं काही झालंच नव्हतं पण बहुधा कधीतरी त्या वयातल्या आकर्षणानं आणि अव्यक्त प्रेमानं बाजी मारली, जातीचा काही प्रश्न नव्हता, सरांनी दोन दिवस घेतले, आणि मग हो म्हणाले. ते पिक्चरमध्ये असतं ना ' मुझे इस जमानेने गुनहगार बना दिया' तसं झालं माझं. लग्नाचा सिझन चालु होताच, फक्त शिक्षण पुर्ण करणे ही सरांची अट होती. तारखा उलटण्याचं खरं कारण समजेपर्यंत माझ्या लग्नाची गोष्ट जगजाहीर झाली होती, आता मागं सरकणं ना माझ्या घरच्यांना शक्य होतं ना सरांना.' 'आलेच ग पाणी पिउन' लागलेली तंद्री तोडत अनुजा उठत म्हणाली, त्यावर स्मिताची सहज रिअ‍ॅक्शन गेली 'पटकन ये' आता ती सुद्धा बेडला टेकुन बसली होती.
परत येताना एक ग्लासभरुन पाणी स्मिताला सुद्धा आणलं होतं अनुजानं, तिचं पाणी पिउन झाल्यावर अनुजानं पुढं सुरु केलं ' नंतरच्या पहिल्या मुहुर्तावर माझं लग्न झालं, सहा महिने राहिले होते लास्ट इयरचे, पण आता माझ्याच कॉलेजमध्ये जाणं फार अवघड झालं होतं. आज पार्टीत काय बोलली असतील लोकं त्यापेक्षा घाणेरडं ऐकायला मिळायचं आणि ते पण बरोबरच्या मुलांमुलींकडुनच नाही लॅब असिस्टंट कडुन सुद्धा. महिनाभरात चिडुन सरांनी नोकरी बदलली, गाव बदललं आणि माझं शिक्षण अर्धवटच राहतं का काय अशी शंका यायला लागली मला. ' लग्नानंतर पण सरच म्हणायचीस त्यांना?' स्मितानं बोलणं तोडत प्रश्न केला. 'हो, अग तशीच सवय पडली होती दोन वर्षात, नवीन गावात माझी अ‍ॅडमिशन व्हायला वेळ होता, तेंव्हा घरीच असायचे, अभ्यास पुन्हा सुरु करावा म्हणुन एक दिवस घरातला पिसि जोडला, सर एकटेच असायचे त्यामुळं पासवर्ड वगैरे नव्हताच सिस्टिमला. थोडा अभ्यास केला मग गाणी आणि पिक्चर आहेत का पहावं म्हणुन सर्च केला, गाणि आणि काही पिक्चर सापडले, बरेचसे जुने पण जे जे पहायला सुरु केले तेंव्हा चालु झाल्या त्या तसल्या घाणेरड्या फिल्मस, ज्यांच्याबद्दल आजपर्यंत इनडायरेक्टली ऐकत होते ती गोष्ट, ब्लु फिल्मस. ब-याच फाईल्स पाहिल्या सगळ्यात तेच, शेवटी कंटाळुन पिसि बंद केला अन सुन्न बसुन राहिले. सरांकडं ह्या असल्या घाणेरड्या गोष्टी असाव्यात याचं फार वाईट वाटत होतं, घरी आल्यावर त्यांच्याशी यावर बोलायचं ठरवलं. '
या विषयाबद्दल स्मितानं देखील फक्त ऐकलंच होतं, आणि यावर एका नवरा बायकोत काय बोलणं झालं असेल याची तिला फार उत्सुकता लागुन राहिली होती. अनुजानं दोन मिनिटं गॅप घेतला, तेवढं थांबणं सुद्धा तिला अवघड झालं ' मग बोललीश त्यांच्याशी ?' तिनं अनुजाला विचारलं. ' नाही' , एकदम निराश करणारं उत्तर आलं, पण अनुजानं पुढं चालु केलं बोलणं 'नेमकं त्याच दिवशी माझ्या अ‍ॅडमिशनचं, सरांचं अपॉईंट्मेंट लेटर, त्यांच्या घरुन आमच्या लग्नाला मिळालेला स्विकार अशा ब्-याच गोष्टी झालेल्या, त्यामुळं दोघंही खुप खुश झालो, आणि या आनंदात त्यांना असं काही विचारावं हे माझ्या डोक्यातच आलं नाही, मग लगेच दुस-या दिवशी सरांच्या मुळ गावी देव देव करायला गेलो, दोन दिवस तिथं राहुन सर परत निघुन आले आणि मी पुढचे आठ दिवस तिथंच राहिले. आठ दिवसानी परत आले त्या दिवशी सरांच्या वागण्यातला बदल पाहुन एक दोन दिवस मला सुद्धा बरं वाटलं. खरा फटका बसला तो त्यानंतर, त्यांच्या अपेक्षा आणि मागण्या वाढत दर रात्री वाढत होत्या, दोन दिवसातच लक्षात आलं की त्यांची अपेक्षा त्या फिल्म मध्ये दाखवतात तसं मी वागावं अशी होत होत्या, त्या प्रकारांची खरंतर पहिल्यांदा चिड आली होती, त्यावरुन आमच्यात वाद होणं सुरु झालं, स्पष्ट तर दोघंही बोलत नव्हतो, मी बेडरुमचा दरवाजा बंद करुन झोपायचा प्रयत्न करायचे, माझ्याच घरात घाबरुन, लपुन जायचे. माहेरी काय अन कसं सांगणार, शेजार पाजार देखील नविनच आणि या विषयावर बोलणार तरी काय आणि कुणाला.'
' तोंड दाबुन बुक्क्यांचा मार, म्हणतात ना तेच हे' सरांनी वर्गाबाहेर उभी केलेली मुलं एकमेकांकडं जशी पाहतात त्या नजरेनं पहात स्मिता बोलली, ' बाईच्या जन्माचे भोग आहेत, भोगल्याशिवाय संपणार का?' ' का नाही ?', रात्रीच्या शांत वातावरणात अनुजाचा आवाज जरा जास्तच मोठा वाटायला लागला ' मी पण असाच विचार करत होते काही दिवस, मग जेंव्हा सरांनी सकाळी, दुपारी कधीही अंगाला झटणं सुरु केलं तेंव्हा मात्र पुर्ण विरोध करायची, एक दिवस तिथं शारिरिक ताकद कमी पडली आणि शेवटी बाजुला झाल्यावर सर हसत हसत बोलले 'be positive, when you cannot avoid it, try enjoying it'
क्रमशः


Print Page

0 comments:

Post a Comment