कारण जर तो प्लॅट नंबर बरोबर होता तर आता पुन्हा मी बेशुद्ध व्हायची वेळ होती, त्या प्लॅटवर नाव होतं आ.कृ,देशपांडे आणि खाली पाटी होती ' sunita's beuti secrets'.............
दोन मिनिटं मी कठड्याला धरुन उभा राहिलो, अभिमन्युला चक्रव्युहात अडकल्यावर जे वाटलं असेल किंवा १० नंबरच्या बॅटमनला समोरुन शेन वॉर्न बॉलिंग करताना आजुबाजुला क्लोज इन फिल्डर लावल्यावर गार्ड घेताना जी धडधड होत असेल ती मला होत होती. आत जावं का जावु नये, अनु पण याच पार्लरबद्दल बोलत होती, सुनिताज का काय ते, आता कुणाला फोन करणं शक्य नव्हतं आणि मागं फिरणंही कारण प्रश्न पंधरा लाखांचा होता. धीर करुन दरवाजावरची बेल दाबली, एका टिपिकल पार्लर असिस्टंट पोरीनं दरवाजा उघडला, डोक्यात चार पाच काड्या, कानावर एक अन हातात एक ब्रश, ' येस हु डु यु वाँट ?' शुद्ध इंग्रजीत प्रश्न आला, या डाटथेफ्टच्या भानगडीत पहिल्यांदाच कुणीतरी बोलत होतं, काय सांगावं कळालं नाही, पण दुस-याच क्षणाला मेंद्च्या ज्या भागाचा ताबा गुन्हेगारानं घेतला होता तो कामाला आला, मी पटकन बॅगमधुन टॅब काढुन दाखवला. त्या पोरीच्या चेह-यावरचे भाव बदलले अन ती फटकन आत गेली. पुन्हा बाहेर आली ती, एक बॉक्स होता, तो दाणकन बाहेर फेकत म्हणाली ' ले जाव तुम्हारा मटेरियल, ऐसा घटिया माल हमको नही मांगताय, फोकट दिया तो भी नही, और तुम्हारा पैसा लेके जाव कोरेगाव पार्क के ब्रँच से, परसो शाम को' मी शांतपणे बॉक्स उचलला, आणि खाली आलो. गाडीत बसुन तो उघडणं धोक्याचं होतं, बॉक्स मागं ठेवला अन गाडीत अनुची वाट पाहात बसलो. आता पुन्हा वर जाउन माझी बायको इथं आली आहे हे सांगितलं असतं तर मेलोच असतो. सीट मागं करुन पडलो असताना एक गोष्ट लक्षात आली की, त्या प्लॅटच्या खिडकीतुन मी तिथंच उभा आहे हे दिसत होतं आणि ते धोकादायक होतं. गाडी पुढं घेतली, अनुला फोन केला की रिक्षा करुन घरी ये, माझं डोकं दुखतंय. आणि गुपचुप घरी आलो.
सगळे आल्यावर जेवणं झाली सासुबाई सोडुन कुणी फारसं काही बोललं नाही, निघताना नेहमीप्रमाणे सासुबाईनी काहीतरी डबा भरुन दिला, दोन पिशव्या भरुन भाज्या दिल्या. सगळे खाली आलो, आता हे सगळं पुढच्या सीटवर बसणं शक्य होतं, पण मागे चिन्मया झोपेल अन मला पुढं बसायचं आहे या अनुच्या हट्टानं डिकी उघडावीच लागली, आतला तो व्हिट हेअर रिमुव्हरचा बॉक्स पाहुन सासरे म्हणाले ' काय ओ जावई, डायरेक्ट अनुपम खेर का काय आता, हे एवढं क्रिम कुणाला घेतलंय आणि ते पण बायकांचं' झालं अनुला तेवढंच कारण मिळालं, लगेच मागं येउन पाहिलं, तिचे डोळे मोठे झाल्याचं लक्षात आलं, पण ती गप्प होती.
टाटा करुन निघाल्यावर, तिसरा गिअर टाकायच्या आतच अनुचा प्रश्न आला,' हे खोकं तुझ्याकडे कसं आलं, त्या पार्लरमध्ये माझ्या पायाशी पडलं होतं, डस्ट्बिन सारख, सगळ्यांचं कापलेले केस वगैरे त्यात गोळा करत होते तिथे.' माझा एक सेकंद अॅक्सलेटरवरचा पाय निघाला, गाडी एकदम स्लो झाली, तशीच बाजुला घेतली एका दिव्याखाली, बाहेर निघणार तेवढ्यात अनुनं सुचवलं ' या पेक्षा एखाद्या कचरापेटी जवळ घे', एवढंही लक्षात येउ नये याचं वाईट वाटलं पण मग गाडी, पुढं घेतली, एका कचरा कुंडी जवळ गाडी उभी केली, अनु तिचा फोन घेउन आली, त्याच्या टॉर्चच्या उजेडात तो बॉक्स उघडला, ओ माय गॉड् खरंच त्या खोक्यात केस होते, सरळ खोकं उचललं डिकीच्या बाहेर घेतलं, आणि तसाच टाकुन देण्यापुर्वी नक्की आत काय आहे ते पहावं म्हणुन, कचराकुंडीत ते वरचे केस टाकुन दिले, केस पडले अन खाली एक पाकीट होतं, ते काढुन घेतलं आणि लगेच निघालो. पाकीट अनुकडं होतं, तिनं वरच्या पिन्या काढल्या अन आतुन यापुर्वी कधी ही न हाताळलेली एक गोष्ट बाहेर आली.
एक हजारच्या नोटांची १५ बंडलं, ३-४ खाली अनुच्या पायाशी पडली होती, तिला आता ती पटकन वाकुन घेणं शक्यच नव्हतं, ती पुढची दहा मिनिटं ३ लाख रुपये पायात घेउन प्रवास करत होती. घराच्या पार्किंग मध्ये आलो, गाडी बंद करुन अनुकडं जाईपर्यंत वॉचमन येउन मागं उभा राहिला, त्याच्या हातात एक छोटं पाकीट होतं, त्यावरचं नित्याच्या प्लॅटचा नंबर खोडुन माझ्या प्लॅटचा लिहिलेला होता. कुणी ते माहित नाही. ' कौन दे के गया ये?' , ' मालुल नही साब, इ तो वो डे ड्युटी वाला ले के रख्खा था, हमको पता नही है' एवढं बोलुन तो गेला, मी चिन्मयाला कडेवर घेतलं अन बाकिचं सामान घेउन लिफ्ट्कडं निघालो,मागं अनु हातात १५ लाख घेउन येत होती. वर घरात आलो, सगळॅ लाईट लावले, बेडवर चिन्मयाला झोपवलं, अनुनं घरातले सगळे पैसे काढुन बाहेर डायनिंग टेबलवर ठेवले, तिथंच बसुन राहिली, नाईलाज मी जाउन दुस-या खुर्चीवर बसलो. ' उद्या संध्याकाळ पर्यंत हे पैसे घरातुन बाहेर गेले नाहीत तर मी पोलिसांना सांगणार आहे सगळं' हिच्यायला, बायकांना काही सांगु नये म्हणतात तेच खरं, आणि आता ते ब्युटी पार्लर या सर्किट मध्ये आल्यानं हे होणं अजुनच धोक्याचं होतं. डोकं भण्ण होत होतं.
अनुचं बोलणं अगदीच चुक नव्हतं, हे एवढे पैसे मी घरात ठेवुन जात होतो, घरात या दोघीच काही झालंच तर या दोघींच्याच जीवावर येणार होतं, आणि बहुधा हेच कारण असावं, पैसा कसा येतोय या पेक्षा तो आपला जीव घेइल हिच गोष्ट तिला जास्त सतावत असावी. ती उठुन बेडरुम मध्ये गेली, धाडकन दरवाजा लावुन घेतला अन मी बाहेर उरलो समोर हे एवढे पैसे घेउन, विचार करुन करुन किती करणार होतो, परवा पुन्हा कोरेगाव पार्क मध्ये त्याच हॉटेलात जायचं होतं, तिथं काय होईल याची कल्पना करत होतो. अजुन पैसा मिळेल का, माझ्या ही जीवाला धोका होईल, ती दुसरी आयटम मेली म्हणजे काय, खरंच मेली का तिला मारली काही बिनसल्यानं, तसंच मला पण उडवलं तर, नित्याला काही केलं तर, वायझेड, आज संध्याकाळपासुन नित्याला फोनच केला नव्हता. जरी बराच उशीर झालेला होता, तरी त्याला फोन केला. बराच वेळ रिंग झाली, मग फोन उचलला नित्यानंच, त्याला घरी बोलावलं. तो येईपर्यंत समोरच्या नोटांच्या बंडलांशी खेळत होतो, त्यांच्या थप्प्या रचत होतो, रस्ते करत होतो, इमारती बांधत होतो.
बेल वाजली, मी उठुन दरवाजा उघडेपर्यंत अनुपण बेडरुमच्या दरवाजात आली होतीच, नित्या अन शकुताई दोघंही होते, हे बरं झालं. सगळे जणच हॉल मध्ये बसलो. पहिला बॉम्ब अनुनंच टाकला,' हे सगळं उद्याच्या उद्या संपलं नाही तर मी पोलिसांना सगळं कळवणार आहे', माझ्या पेक्षा नित्या जास्त हादरला, आणि त्यानं अनुला हे असं न करण्यचा सल्ला दिला, आम्ही पैशाच्या मोहानं किती मोठ्या घोळात अडकलेलो आहेत हे पुरे ३ तास समजावलं, यातुन मला न कळालेल्या काही गोष्टी कळाल्या ज्यामुळं माझ्या शंका ख-या ठरायला सुरुवात झाली. शकुताईनं पार्सल परत पाठवल्यापासुन नित्याला फॉलो केलं जात होतं, कोरेगाव पार्कच्या मिटिंगच्या वेळी त्याला हॉटेलच्या पार्किंग मध्येच बसवुन ठेवलं गेलं होतं, एका डिलिव्हरी व्हॅन मध्ये. अर्थात त्यानंतर पण त्याला घर ते ऑफिस व उलट फॉलो केलं जात होतं. आणि ते सुद्धा सांगुन. आता त्याच्या घरुन इथं येताना सुद्धा तो घाबरतच आला होता. मला खाली वॉचमननं दिलेलं पाकिट आठवलं, त्यावर खोडलेला नित्याचा पत्ता होता, त्याबद्दल त्याला विचारलं, तो पत्ता त्यानंच खोदुन माझा पत्ता लिहिला होता. आता त्याच्या समोरच पाकिट उघडलं, आत एकात एक अशी ७ पाकिटं होती आणि सगळ्यात आत एक सिम कार्ड होतं आणि ते ब्लँक होतं.
सगळ्यांच्या झोपा उडालेल्याच होत्या, मी अनुला कॉफी करायला लावली, अन लॅपटॉप सुरु केला, हेम्याला बोलावलं, त्याला सगळी कहाणी सांगितली. त्याचा रिप्लाय आला' चुका तुमच्यात, माझ्या नाय, आपलं काय ठरलं व्हतं, मी माल सप्लाय करणार, तु मी विकायचा, तो कुट़ बी विका, मला काय त्येचं, ज्या गोष्टी मी सुदरवु शकतो त्या सुदरवल्यात, जे माज्या हातात नाय त्येला मी काय करु शकत नाय, ह्या तुमच्या माणसांच्या भानगडी हायत, आमी भुतं कशी निस्तरणार.' आणि हेम्या गायब. दोन तीन वेळा आहेस का विचारलं, काही उत्तर नाही. आता मात्र शेवटची आशा तुटत चालली होती. अनु कॉफी घेउन आली, पहाटेचे ३ वाजलेले. सगळे जण बाहेर टेरेस वर आलो. विषय चेंज करायचा म्हणुन शकुताईनं अनुला तिच्या डोहाळ्याबद्दल विचारलं, अन अनुच्या उत्तरानं आम्ही सगळेच दचकलो, ' मला ना त्या आखाडाच्या विहिरीतल्या देवीची पुजा करायची आहे' असं होतं कधी कधी, किती ही एखाद्या गोष्टी पासुन दुर जायचा प्रयत्न केला तरी जाणं शक्य होतंच नाही. आखाडावरुन सुरु झालेलं हे सगळं पुन्हा तिथंच येउन थांबत होतं, नव्ह्तं तर घुटमळत होतं. जसं काही आमच्या सगळ्यांचाच त्या आखाडाशी काहितरी घनिष्ठ संबंध होता, जो तोडणं शक्यच होणार नव्हता, तिकडं तो मंद्या त्या आखाडाच्या पाण्यासाठी अडकुन होता, इथं हा हेम्या अन आता ही अनु.
ब-याचवेळानं शकुताई बोलली ' चल रे याच निमित्तानं त्यांचे पैसे पण देउन टाकु आणि व्यवहार पण पुर्ण करुन टाकु, म्हणजे सगळंच संपेल एका फटक्यातच. तो हेम्या पण मोकळा, मंद्या पण, तु पण आणि ही पण. पुन्हा ते चो-या करणं नको की असे पैसे कमावणं नको, जातानाच तो टॅब पण टाकुन देउ उजनीत म्हणजे ती पण किटकिट नको उगा डोक्याला. ' खरंच चांगला उपाय होता, सगळ्यांना पटला. हॉल मध्ये आलो, लगेच वाटणीचे डिटेल्स घेउन आलो, पैसे वाटले, वेगवेगळ्या पाकिटात ठेवले अन पुन्हा आत नेउन ठेवलं, उरलेले पैसे अक्कलकोटला देवळात देउन टाकायचं ठरलं हा पैसा घरात ठेवायचाच नाही असं अनुचं अन नित्याचं म्हणणं होतं.
Print Page
0 comments:
Post a Comment