न पटणारे शब्द....
मला हे शब्द बाजीप्रभुंचे असतील असं वाटत नाही, अगदी कितीही काव्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला तरी सुद्धा.
सरणार कधी रण प्रभो तरी हे
कुठ्वर साहु घाव शिरी
कुठ्वर साहु घाव शिरी
बाजीप्रभुंचा इतिहास पुन्हा लिहावा ह्याची गरज नाही,त्या महात्म्याला माझे कोटि कोटि दंडवत. महाराजांना विशाळगडाकडे पाठ्वुन दिल्यानंतर मागुन येणा-या विजापुरी सेनेचा नायनाट करण्यासाठी घोडखिंडीसारख्या अतिशय अवघड ठिकाणाची निवड करणा-या त्या सेनानीच्या मनात असे विचार येणंच शक्य नाही. त्या रात्रिच्या त्या गोंधळात या अशा ठिकाणाची माहीती डोक्यात ठेवुन आणि तिचा असा योग्य वापर करण्याची बुद्धिमत्ता असणारी व्यक्ति असा पळपुटा विचार करणंच शक्य नाही.
पन्हाळ्याच्या वेढ्यातुन निघाल्यावर घोडखिंडितुन महाराजांना पुढे पाठवायचा निर्णय जेंव्हा बाजीप्रभुंनी घेतला असेल, तेंव्हाच त्यांना व बरोबर असलेल्या बांदल सेनेला आपले भविष्य माहित होतंच. ही लढाई अनपेक्षित नव्हतीच, जाणुन बुजुन समजुन उमजुन अंगावर घेतलेले हे रण होतं.
महाराज घोडखिंडीतुन निघाल्या पासुन ते विजापुरी सेना तेथे पोहोचेपर्यंत कितिसा वेळ मिळाला असेल त्या महाविरांना विचार करायला, आणि जो मिळाला असेल त्यात त्यांची एकच विचार केला असेल, आज माझ्या तलवारीनं किती मुंडकी उडवेन, किती हात पाय तोडेन. त्यातच काही जुनी वॆरं पण असतीलच. इथं काही मुत्सद्दीपणा वगॆरे पणाला लागायचाच नव्हता. काही दिवसांपुर्वी प्रतापगडाच्या पायथ्याला जे महानाट्य घडलं होतं ते आता मागं पडलं होतं, आज फक्त होणार होता तो रणमर्दिनी महिषासुरमर्दिनीला प्रसन्न करण्यासाठी शतमुंड किंवा सहस्त्रमुंड अभिषेक. होतं ते फक्त एकच ध्येय येणारा गनिम कापुन ठेवायचा.
माझा राजा सुरक्षित होईपर्यंत लढत राहायचं होतं पण ते झाल्यावर सुद्धा जिवंत राहण्याची शक्यता नव्हतीच, छे तो विचार नव्हताच कोणाच्या मनांत. उभा राहिलेली प्रत्येकजण दहा विस जणांना मारुन मरण्यासाठीच उभा होती. फक्त वाट पहात होते ते त्या विजापुरी सेनेची. गनिम आला की तोडायचा बास एवढेच, आपण तुटेपर्यंत त्याला तोडायचा. एकच ध्यास एकच आज्ञा होती मारा मारा आणि मारा. तो हरामखोर सुडाने पेटुन उठलेला गनिम या जागेच्या पुढे जाता कामा नये.
अफजलखानाच्या वधानंतर विजापुर दरबार सुद्धा पेटुन उठला होता, त्यांची ही शक्ती काही कमी नव्हती, जेवढी विरता मर्द मराठ्य़ांत होती तेवढीच त्यांच्यात पण होती. येणा-या लाटा या वादळीच असणार होत्या. आपल्या एका मोठ्या सरदारचा कत्ल आणि आता पन्हाळ्याचा वेढा या अशा पावसाळी रात्री तोड्णे ह्यांचं आश्चर्य ओसरेपर्यंत त्या विजापुरी सेनेला एक मोठा दिलासा मिळाला होता, या सगळ्यामागचा म्होरक्या सिवाजी पकडला गेला होता, पण हाय रे कंबख्त हे काय तो पण नकली. आणि हे समजल्यावर ते शांत थोडेच बसणार होते. शत्रुला नेस्तनाबुन करण्याच्या भावनेपेक्षा पुन्हा पुन्हा होणा-या या अपमानांचा बदला त्या सेनेला घ्यायचा होता. अपमान आणि सुडानं पेटलेली विजापुरी सेना आपल्यावर चालुन येणार आहे याची पुर्ण कल्पना बाजीप्रभुंना व त्यांच्या बरोबरीच्या मावळ्यांना होतिच.
मारु आणि नंतर मरु ही तयारी बाजीप्रभुंनी आपल्या साथिदारांची करुन घेतलीच असेल त्या मिळालेल्या थोड्याश्या वेळांत. मग तोच महाप्रतापी लढवय्या हे असं म्हणेल का ? नाही कधीच नाही.
क्रमश :
0 comments:
Post a Comment