पहिल्या मिटिंगवरुन घरी आलो, पराठे खाउन झाल्यानं जेवण करायचं नव्हतंय आणि अनुनं स्वयंपाक पण केलेला नव्हता. ती तशी झोपायच्या तयारीतच होती, आणि जे काही चाललं होतं ते तिला सांगुन काही उपयोग नव्हता, पण जेंव्हा याचे परिणाम दिसतील तेंव्हा तिला काय स्पष्टीकरण द्यायचं हे अजुन ठरत नव्हतं, म्हणजे तिनं तसं विचारलं असतंच पण या बाजुचा कधी विचारच केला नव्हता. हा असा मिळणारा पैसा कसा वापरायचा किंवा कसा खपवायचा ते समजत नव्हतं, अगदी गण्या आणि मंद्याला दिला काय किंवा होम लोन प्रिपे केलं काय, सगळे प्रकार लोकांच्या नजरेत येतील असेच होते.
बेडवर पडल्या पडल्या अनु सांगत होती ' अरे तुला सांगायचंच राहिलं, मागच्या आठवड्यात तु गावाला गेला होतास ना तेंव्हा, आईच्या घराजवळ एका पार्लरमध्ये गेले होते, त्या पार्लरमध्ये ना आपल्याला आवडणारी गाणी ऐकायची सोय आहे, प्रत्येक टेबलाला एक पेन ड्राइव आणि सिडि प्लेयर आहे, आपण आपली गाणी न्यायची अन ते एक ब्लुटुथ इअरफोन देतात, मस्त ऐकत बसायचं. तसे खुप लोक नव्हते मस्त पैकी हातात रिमोट देतात एक, गाणि बदलायला आणि निवांत बसायचं तोंडाला फेशियल लावुन गाणी ऐकत, संगीताचा पण बराच प्रभाव पडतो म्हणे त्वचेच्या मुलायम होण्यात, ती सांगत होती. मी पुढच्या आठवड्यात दुस-या सिटिंगला जाणार आहे ना तेंव्हा तुझा पेन ड्राइव्ह घेउन जाइन. आणि हे सगळं फुकटात आहे काही एक्सट्रा चार्ज नाही. '
अनुला झोप लागली आहे हे पक्कं झाल्यावर उठुन लॅपटॉप चालु केला अन हेम्या येण्याची वाट पाहात बसलो, बराच वेळ झाला काही झालंच नाही, त्याला आज जी माहिती मिळाली होती ती द्यायची होती अन पुढचा प्रकार समजावुन सांगायचा होता, थोडा वेळ वाट पाहुन सगळं बंद केलं, कपाटातल्या फाईल्स काढल्या, अॅड्रेस प्रुफ, पॅन कार्डाची कॉपी वगैरे काढुन ठेवलं, उद्या कोप-यावरच्या आयडियाच्या दुकानातुन एक कार्ड घ्यायचं होतं आणि नंतर ते रिचार्ज करायचं होतं, भविष्यात कधीतरी पैसे मिळणार होते तर उद्या काही पैसे घालवणं भाग होतं. सगळं काढुन ठेवलं आणि झोपायला बेडरुमकडं आलो, तर अनु दारात उभी होती अन विचारलं ' काय चाललंय हे रात्रीचं, सगळे कागद काढुन बसला आहेस, तुझं काही बिघडलंय का ऑफिसात, काही टेन्शन, बेंच वर टाकलाय का तुला मॅनेजरनं तुझ्या ?' मग तिला कसं तरी समजावुन आम्ही झोपलो,ह्याच विचारात झोप लागता लागताच एक विचार आला की तो मोबाईल फुकट येणार होता अन घरीच येणार होता, त्याच्या बद्दल काय समजुत काढणार होतो मी अनुची, आणि परत झोप उडाली.
पहाटे कधीतरी डोळा लागला असावा, कारण डोळे उघडले तेंव्हा अनु चिन्मयाचं आवरुन तिला शाळेत पाठवत होती, अनु खाली बसमध्ये जाउन सोडुन येईपर्यंत आवरलं, नाष्ट्याची तयारी केली, अनु आल्यावर दोघांनी मिळुन नाष्टा केला, तेंव्हाच तिला मोबाईल बद्दल सांगितलं आणि त्याच टेन्शन मध्ये असल्याचं सांगितलं. अनु फटकन संतापली, एवढा महागाचा म्हणजे १२ हजाराचा मोबाईल घेण्याची काय गरज आहे हे तिला समजावुन सांगायचा निष्फ्ळ प्रयत्न झाल्यावर बॅग घेउन निघालो, ड्बा विसरला त्या गडबडीत.
ऑफिसला आलो, सगळं सुरु झालं अन त्याचवेळी हेम्या लगेच आला, अरे काल रात्री तुला कळालंच नाही मी आल्याचं, कसं काय ते सांग. मी विचारात पडलो आता यानं काय केलं असावं याचा विचार करत होतो, आणि त्यानं जे काही सांगितलं त्यानं मी पुन्हा वेड्यात निघाल्याचं कळालं, हेम्या वर्ड फाईलमध्ये फाँटचा कलर पांढरा करुन टायपत होता आणि ते माझ्या लक्षातच आलं नव्हतं. याचा अर्थ हळु हळु तो एक्सपर्ट होत होता. आज हेम्यानं ऑफिसात कुठं हात मारला नाही तर नेटवर्क वरुन काही गोष्टी उचलुन आणल्या, काही ब्लॉग हॅक करुन दाखवले पण कसं ते मला सांगितलं नाही. मला फक्त रिझल्ट मिळत होते प्रोसेस कळत नव्हती. या प्रकाराची पण एक चिडचिड होते. दुपारी लंचला निघणार तेवढ्यात अनुचा फोन आला, घरी आलेला मोबाईल नव्हता तो टॅब होता सॅमसंगचा, किंमत ४५०००/- आणि मी अनुला १०-१२ हजारचा फोन घेतल्याचं सांगितलं होतं सकाळी,इथं पुन्हा घोळ झाला होता, अनुनं चिडुन फोन ठेवुन दिला अन समोरुन नित्या येताना दिसला, त्याच्या घरी पण टॅब पोहोचला होता, फक्त त्यानं शकुताईला काहीच सांगितलं नव्हतं हे मोठं लफडं झालं होतं अन तिनं ते पार्सल परत पाठवलं होतं. नित्या एवढा टेन्शन मध्ये आला की जेवायला पण बाहेर आला नाही, मग मी एकटाच जाउन जेवण करुन आलो.
परत येउन काम चालु केलं, निघताना पुन्हा एकदा हेम्याला विचारलं, काय काय झालंय ते, त्याचा काळ्यात रिप्लाय आला, 'आज सुट्टी घेतलीय मी, उद्याच्याला बगु काय ते' असं म्हणुन तो निघुन गेला फाईल बंद झाली. घरी येताना आयडियाचं कार्ड घेउन आलो, घराला कुलुप होतं, माझ्याकडच्या चावीनं कुलुप उघडलं, डायनिंग टेबलवरच ते खोकं अर्धवट उघडलेलं तसंच होतं. आवरुन त्याच्या मागं लागलो, पॅकिंगवरुन तरी एअर कुरियर होतं हे समजलं पण ओरिजिन कुठुन झालं ते कळालं नाही, ब-याच ठिकाणी मार्करनं काळं केलेलं होत्ं. बॉक्स् उघडला अन तो टॅब सुरु करायला घेतला, मग त्यात ते कार्ड टाकलं, आणि काही वेळ न लागता ते अॅक्टिव्हेट झालं आणि कालपासुनच्या घटना पाहता ते अपेक्षितच होतं. नंतर काल मिळालेल्या माहितीनुसार त्या मोबाईलवरुन लगेच एसेमेस केला, अनु यायच्या आत हे संपलेलं बरं असा विचार केला.
हे संपतं ना संपतं तेच बेल वाजली अनु अन शकुताई आत आल्या, दोघी प्रचंड चिडलेल्या होत्या, मागं मागं नित्या आला, चिन्मया त्याच्या कडेवर होती. आता हे सगळे लफडे सगळ्यांसमोर आणणं गरजेचं होतं, नित्याला सग़ळं तर शकुताईला अर्धवट माहित होतं, अनु पुर्णच अंधारात होती. तोपर्यंत चिन्मयानं टॅबचा ताबा घेतला अन प्रयोग सुरु केले, नुसतं बोट लावल्यावर हलणा-या गोष्टी तिला एकदम आवडुन गेल्या आणि ते हलणारं पाणि आणि जहाज तर एकदम भारी होतं. पुढचे दोन तास अनुला अन शकुताईला पहिल्यापासुन सगळं सांगुन समजावुन झालं आणि नंतर आलिया भोगासी असावे सादर नुसार अनु यात सहभागी व्हायला म्हणा किंवा विरोध न करायला किंवा गप्प रहायला तयार झाली.
दुस-या दिवशी ऑफिसला आलो, बरोबर टॅब होताच आणि आता सगळं कम्युनिकेशन माझ्याच वर अवलंबुन होतं, नित्यानं त्याच्या केबिन मध्ये बोलावलं आणि समोरच्या पार्टीनं झालेल्या गडबडीबद्दल बरंच सुनावल्याचं सांगितलं, आज पुन्हा मिटिंग होणार होती संध्याकाळी पण यावेळी एकदम हाय फाय जागी होती, एकदम कोरेगाव पार्कातल्या एका रेस्टोबार मध्ये, आणि यावेळी निरोप ऑफिसबाहेरच्या चहावाल्याकडं ठेवला गेला होता, समोरच्या पार्टीचं नेटवर्क बरंच गुंतागुंतीचं अन डेव्हलपड होतं. दुपारी टॅब वर एक मेसेज आला स्पॅनिश भाषेत एक लिंक होती आणि पुढं मराठीत लिहिलेलं होतं, माल उतरवुन घ्या. ऑफिसचं लॅन काढुन टॅब वरुन लॅपटॉप नेटला जोडला अन हेम्याच्या फाईल मध्ये ती लिंक पेस्ट करुन लिहिलं ' हा पत्ता, सगळा माल घेउन ये अन पुढं त्याच टॅबचा एक फोल्डर रुट टाकला जिथं ते स्टोअर करायचं होतं. कालच्या सुट्टीनंतर आज हेम्या कामाच्या मुड मध्ये होता, त्यानं एवढाच रिप्लाय दिला, जेवाच्या येळेपत्तुर डिलिव्हरी होईल.' आणि बरोबर साडेबारा वाजता टॅब वर एक फाईल येत असल्याचा डायलॉग बॉक्स ओपन झाला, पुढच्या १२-१५ मिनिटांत टॅबचा ३२ जिबिचं कार्ड २२ जिबि भरुन गेलं, आणि शब्द उमटलं, 'झालं तिच्यायला, हे असलं वाचाया येत नाय तसलं घेउन काय करणार रे तु' मी टाइपलं, अबे तुला काय करायचंय, तुला आखाड मोकळा मिळाला की बास ना, मग गप की जरा',
टॅब काढला पुन्हा लॅन केबल लावली अन मेसेंजर वर नित्याला मेसेज टाकला 'आणि महावीर रडला', त्याचा रिप्लाय आला ' हो संध्याकाळी जायचंय शोकसभेला, पांढरे कपडे घालुन, तुझ्याकडं आहे का पांढरी पँट', ' नाही जाताना घेउन जाउ घरी' असं म्हणुन मेसेंजर बंद केला अन कामाला लागलो. घरी येताना मेगामार्ट मधुन एक पँट घेउन घरी आलो, पुन्हा आज पार्टी असल्याचं सांगितलं, अनु थोडी अन चिन्मया जास्त नाराज होती, पण नाईलाज होता. कोरेगाव पार्कात जायचं असल्यानं कार घेउन निघालो, टॅब वर आलेल्या मेसेज नुसार गाडी पेट्रोल पंपात घातली, माझा नंबर आल्यावर त्या अटेंडंटनं माझ्याकडुन किल्ली घेतली, समोरची एक रिक्षा बोलावली अन मला त्यात बसायला सांगितलं, मी गुपचुप निघालो त्या रिक्षातुन, पुढची २५ मिनिटं कोरेगाव पार्क ते कल्याणी नगर असं फिरुन पुन्हा रिक्षा पेट्रोल पंपावर आली, माझी गाडी एकदम चकाचक करुन ठेवलेली होती आणि एक ड्रायव्हर माझी वाट पाहात होता. मागं बसल्यावर माझ्या लक्षात आलं की समोरचा कार टेप बदललेला आहे, याबद्दल आता जाब विचारायला हवा होता, उद्या जर या सगळ्याची किंमत आम्हाला मिळणा-या पैशातुन वसुल केली गेली असती तर फार महागात पडलं असतं. हे सगळं स्पष्ट करुन घेणं भागच होतं.
हॉटेलला पोहोचलो तेंव्हा तिथं बरीच गर्दी होती, एकाची मोठी सफारी ड्रायव्हरनं हॉटेलच्या पाय-यावर चढवली होती अन बरंच नुकसान झालं होतं, माझ्या ड्रायव्हरनं गाडी एका बाजुनं खाली नेउन लावली अन मी आत गेलो, समोर दिसलेल्या वेटरला टेबल नंबर सांगितला त्यानं त्या अंधारात काही तरी दिशा दाखवल्या अन तिथं जाउन पोहोचलो, पांढरे शुभ्र कपडे अन हातात तो चामड्याच्या चकचकीत केस मधला टॅब यामुळं माझी इज्जत केली जात होती. टेबल सापडलं तिथं आधीच ३ जण होते, त्यात कालचे दोघंजण होतेच अन अजुन एक आयटम गर्ल हातात सिगारेट घेउन बसली होती. तिघांच्या समोर सेम टु सेम टॅब होते, एका विशिष्ट पद्धतिनं ठेवलेले होते. मी पण काही न बोलता माझा टॅब पण तसाच ठेवला, वेटरनं आधीच ऑर्डर दिल्याप्रमाणे एक ग्लास पाणि आणुन ठेवलं, मग लक्षात आलं की इथं बार मध्ये बसुनही कुणीच दारु पित नव्हतं, त्या कालच्याच आयटमनं चारी टॅबच्या जागा बदलल्या मग एकदा त्या नविन आयटमनं आणि नंतर त्या गृहुस्थानं आणि मग मला पण तसं करायचा इशारा केला. हे करुन झाल्यावर प्रत्येकानं आपल्या समोरचा टॅब उचलला, माझ्याकडं आलेला टॅब माझा नव्हता, आणि त्यात मेमरी कार्ड पण नव्हतं, फक्त वर वॉलपेपरवर एक नंबर होता आणि एक फोल्डर होता, बाकी सगळे जण त्यांच्याकडे आलेले टॅब चेक करत होते, म्हणुन मी पण सुरु केलं, त्या फोल्डरमध्ये एक फाईल होती, ज्यात एक पत्ता होता, पाषाण सुस रोडचा.
दहा मिनिटं झाली होती, अजुन नित्या आला नव्हता म्हणुन त्याला फोन लावायला फोन काढला तर त्या नव्या आयटमनं मला फोन करु दिला नाही आपल्या नाजुक बोटांनी नाही म्हणुन मला फोन परत ठेवायला लावला. दोन्ही मिटिंग मध्ये कुणीही काहीही बोललं नव्हतं, कालच्या आयटमनं टॅबवर बरेच काही केल्यावर पुन्हा टॅब त्याच्या केसमध्ये ठेवला आणि पुन्हा टॅबची फिरवाफिरवी झाली एकदाच. आणि माझा टॅब पुन्हा माझ्याकडे आला, पुन्हा सर्वांनी टॅब काढुन पाहिले. माझ्या टॅबमधलं मेमरि कार्ड फॉर्मट केलेलं होतं, बाकी तसंच होतं आणि अजुन एक मेसेज आलेला होता अजुन एक लिंक बाकी काही नाही.
आपापल्या ग्लासातलं पाणी संपवुन सगळे निवांत बसले, वेटरनं बिल आणुन दिलं, ३ बाटल्या मिनरल वॉटर ३८५/- टॅक्स सहित, बिल आल्यावर सगळे जण उठुन गेले अन मी बिलाकडं पाहात राहिलो, शेवटी पर्याय नाही हे उमजुन बिल दिलं अन निघालो, बाहेर आलो तर नित्याला एका रिक्षात बसवुन कुठंतरी पाठवलं जात होतं, माझ्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली, पण तेवढ्यात मगाशीचा ड्रायव्हर येउन माझ्या गाडीची किल्ली देउन गेला, गाडी दरवाज्याच्यासमोर ठेवुन मागचं ट्रॅफिक जाम करुन ठेवलं होतं, त्यामुळं मला लगेच तिथुन निघावं लागलं, त्या रिक्षाला फॉलो करायचा थोडावेळ प्रयत्न केला पण बुधराणी मागच्या ब्रिजजवळ आमची चुकामुक झाली, पोलिसांकडे जावं का नको असा विचार करत असतानाच शकुताईचा फोन आला, तिला नित्याचा फोन आला होता तो घरीच येत होता. मग घाई करुन घरी गेलो. नित्या जाम घाबरलेला होता, दातखीळ बसायचीच राहिली होती त्याची. हा डाटाथेफ्ट्चा धंदा एवढा धोकादायक असेल याची आम्हाला कल्पनाच आलेली नव्हती.
मला मिळालेल्या निरोपानुसार रात्रीच पाषाणाच्या पत्त्यावर जाउन यायचं होतं, म्हणुन नित्याला काही न सांगता निघालो, साडेदहा झालेले होते, पत्ता सापडायला फार त्रास झाला नही, पहिल्याच मजल्याचा प्लॅट होता, बाहेर पाटी होती, एम एन बाटलीवाला. बेल वाजवली, पाच मिनिटं शांततेत गेली, दरवाजा उघडला गेला, आत ती आज भेटलेली आयटम होती तिनं एक पाकिट हातात ठेवलं आणि धाडकन दरवाजा लावुन घेतला, मी गुपचुप खाली आलो, आणि गाडीची चावी बहुधा वर पडली म्हणुन परत वर गेलो, तोच प्लॅट तोच दरवाजा अन पाटी होती आ. कृ, देशपांडे, माझ्या गाडीची किल्ली तिथंच पडलेली, ती घेतली पटकन खाली आलो, गाडीत बसलो, पाकिट उघडुन पाहिलं त्यात ५०० च्या नोटांची ८ बंडलं होती, पहिल्या मिटिंग मध्ये एवढीच रक्कम ठरली होती, जी लिंक आज मिळाली होती त्याची पण तेवढीच किंमत मिळणार होती, अशीच ४-५ कामं झाली की या धंद्यातुन बाहेर पडायचं असा विचार करुन गाडी स्टार्ट केली अन धुम घराकडं निघालो..
Print Page
0 comments:
Post a Comment