Thursday, October 6, 2011

चपला आणि सत्कार - 2


....सगळ्या फोटोच्या शेवटी उरलेल्या जागेत आता टाकायचीच म्हणुन टाकलेली एक बातमी होती, बाकी बातम्यांबरोबर आणि फोटो बरोबर न जुळणारी, पण त्यामुळेच लगेच नजरेत भरलेली., संचारची घडी घालुन ती बातमी वाचायला सुरुवात केली.
- पुढे चालु
स्था. वार्ताहर - सोलापुर ग्रामिण
काल रात्री उशिरा मिळालेल्या बातमीनुसार, सोलापुर ते तुळजापुर रस्त्यावर हिप्परगा तलावाच्या रस्त्यावर शेळके वस्तीच्या मागील बाजुस एक बेवारस प्रेत सापडले असुन, सदर प्रेत पुरुषाचे असुन अंगात निळ्या रंगाचा चौकडा शर्ट असुन तपकिरी रंगाची बॅगी पॅंट आहे. सदर प्रेताच्या पायात निळ्या रंगाच्या स्लिपर आहेत. या प्रकरणाचा तपास बोरामणी ग्रामीण पोलिस स्टेशनचे अंमल हवालदार श्री. बनसोडे करत असुन,या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ बोरामणी पोलिस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन सोलापुर ग्रामीण पोलिसांकडुन करण्यात आले आहे.
एक दशांश कॉलम मध्ये बसवण्यात आलेली बातमी, वर १७-१८ विसर्जन मिरवणुकीचे फोटो असताना याच पानावर छापण्यामागे काय उद्देश असावा याचा विचार करता करता, समोरुन कुणीतरी आलं आणि चहाचा कप बाजुच्या खिडकीत ठेवुन गेलंय याची जाणिव होवुन हर्षद भानावर आला. चहा घेतला. काल विसर्जन मिरवणुक बघायला जाण्यासाठी लवकर घरी आल्याने आज हापिसात लवकर जाणे भाग होते. लग्नानंतरचा पहिला श्रावण, पहिली मंगळागौर, पहिला गणपती सगळं सगळं पहिलं व्यवस्थित पार पडलं होतं. फक्त गणपती विसर्जन करावा लागला याबद्दल आईला थोडं,...
आवरुन झाल्यावर डबा घेउन स्कुटीला किक मारली, नेहमीच्या रस्त्याने न येता चौपाडातुन जावं म्हणजे कोण कोण आज साईट्वर येणार आहे अन कुठं पर्यंत आलंय हे कळेल म्हणुन मुद्दाम वाट वाकडी करुन गाडी चौपाडात घातली, बालाजी मंदिराच्या बाजुला एक विटांचा ढिगारा होता, तिथल्या मंडळानं गणपतीसमोर पाण्याच्या कारंज्याची आरास केली होती पण मिरवणुकीला अडथळा होतो म्हणुन तो हौद तोडला होता, त्याच्याच विटा पडलेल्या होत्या, त्याच्यामागुन धुर येत होता, रबराचा व प्लॅस्टिकचा घाणेरडा वास येत होता अन तिथुन तांबटक-यांच्या समोरुन आत जाणा-या गल्लीत पुर्ण सामसुम होती. मागं मशिदीच्या बाजुला उभारलेली कापडाची पांढरी शुभ्र भिंत अजुनही तशीच होती, गुलालानं लाल भडक झालेली,तिथला सगळा रस्ताच लालभडक झालेला होता.
तिथुन पुढं जाता जाताच, कोप-यावर बंदोबस्तासाठी लावलेल्या पोलिसांच्या तंबुत पण काही हालचाल नव्हती. सण संपल्यानंतरचा एक निवांतपणा होता.तेवढ्यात मागुन हाक आली म्हणुन गाडी थोडी स्लो करुन बाजुला घेतली अन थांबला, पाहतो तो पंढरीनाथ होता, त्याला सगळे नाथ म्हणायचे. याचं कळत नकळत वय सगळं तालमीत गेलेलं अन तालमीबाहेर काही जग असतं हे समजलं तेंव्हा त्या जगातली याची अशी बरीच माणसं निघुन गेलेली होती.
नाथ जवळ आला अन डायरेक्ट विचारलं ’ अबे तुझ्या कडं ती बोरामणीची लमाणं होती ना खोदाईकामाला, आज आहेत का कामावर? हर्षद गोंधळला, ५ फुट उंची अन ७० किलो वजन असलेला अन दोन्ही कान सुपारी घालुन फोडलेला नाथ डायरेक्ट आपल्या लेबर बद्दल का विचारतोय हे कळालंच नाही. ’ हां बे आहेत की, येड्या**चेत लई, विसर्जन म्हणुन नवव्या दिवशीपासुनच सुट्टी केली होती, काल रात्री पेमेंट करणार नाही असं सांगितल्यावर आज आलेत साईटवर सात वाजताच. का बे काय झालंय? नाथाला जरा बरं वाटलं असावं, जवळ येत म्हणाला’ गाडी अशीच घे तरटी नाक्याला, मी येतो तिथं’ जा बे, तिच्यायला तरटी नाका, सकाळी सकाळी, दुसरं कुणी नाही का सापड्लं भाड्या तुला, आधीच सकाळपासुन साहेबाचा फोन आलाय ३ वेळा लवकर लवकर ये अन त्यात तु हे लफडं घाल माझ्या गळ्यात जा बे जा तिकडं तुच’ हर्षदनं सरळ सरळ झिडकारलं, नाथानं लगेच झब्याच्या खिशातुन संचार काढला आणि पान नंबर ४ वरची तीच बातमी काढुन पुढं धरली,; वाचलंय ना बे हे, चल गप भाड्या,’ असं म्हणुन स्कुटीवर मागं बसला सुद्धा.
हल्ली स्कुटीला जास्तीत जास्त ४० किलो वजन मागं नेण्याची सवय पडलेली एकदम लोड डबल झाल्यावर मालकासारखीच कुरकुर करत ती पण गप्प निघाली, थांबली ती डायरेक्ट मयुर रेस्टारंट समोर. नाथ उतरला अन सरळ रस्त्याच्या पलिकडं जात म्हणाला ’ आत जाउन बस बेसिन जवळच्या टेबलावर मी येतोच मावा घेउन.’ गुटख्याच्या या युगात गेली १५-१६ वर्षे हातानं रगडुन केलेला मावा खाणारा नाथ एकटाच.
हर्षद आत जाउन बसेपर्यंत नाथ आलाच’ तिथं विटामागं पेटवुन दिलंय पाह्यलं का ? ’ नाथाच्या आवाजात गडबड होती, हर्षद म्हणाला ’ हो सोमपावाल्यानी दोन दिवसाचा कचरा एकदमच पेटवलाय’ एवढं ऐकलं अन नाथानं हर्षदच्या मानेला धरलं अन झटक्यात मान खाली वळवली, मानेला बसलेला झटका फार कमी होता त्याच्या दहापट झटका बसला त्याला खाली बघुन, नाथाच्या पायात चपला नव्हत्या. नाथानं मान सोडली तशी भेदरलेल्या चेह-यानं त्याच्याकडं पहात हर्षद बोलला ते चाचरतच ’ म्हंजे, दिन्याला ?’ ’ नाय बे, दिन्याला काय हात घालतायत चोर चुक्काळ्ळीचे, त्यांच्या **त दम आहे का तेवढा, शिंदेच्या मदनला घेतला मिरवणुकीच्या टायमाला, च्यायला आपण ते तिथं मशिदीसमोर गुलाल उडवत होतो ट्रॅक्टरच्या फुकणीतुन तर इथं ह्या फुकण्यांनी हात मारला बरोबर,*न*त साले, सगळे हरामी बे एकजात, ति**ला काल परवा आलेलं पोरगं ते अजुन दोनशे जोरापर्यंत पण पोचलं नव्हतं, नुसता प्याद्याला प्यादं उडवलंय, आता ह्यांच्या** सिद्दा नेम वजीरावरच टाकतो बघ.
दोन मिनिटं गेली, जरा वातावरण शांत झाल्यासारखं झालं असं वाटलं, तेवढ्यात नाथानंच माहिती दिली, ' या वक्ताला १२ जोड पेटवुन दिलेत, अन पक्कं ठरवलंय भवानीच्या पायावर डोकं ठिवुन आलो ना कोजागिरीला की तिथंच रुपाभवानीच्या देवळाबाहेरच सत्कार समारंभ ठेवायचाय, त्या पेक्षा जास्त वेळ नाय लागु देणार आता, बघंच तु'. ’ अबे भाड्या, तुला काय मज्जा बघायला ठेवलाय का मालकानं का बायप्राडक्ट आहेस त्याचा, दोन पुरी भाजी अन दोन कुंदा आण झटदिशी’ शेवटचं वाक्य तिथल्या एकुलत्या एक वेटरला आर्डर देण्यासाठी होतं.
क्रमशः

Print Page

0 comments:

Post a Comment