Saturday, July 2, 2016

अंकोदुही भाग ११

राजसभेतुन बाहेर पडल्यापासुन माझ्या दालनात येईपर्यंत माझ्या कानांत काकांचं शेवटचं वाक्य घुमत होतं ‘ तुम्हांला तिघींना तुमचा निर्णय घेण्यासाठी उद्या सुर्यास्तापर्यंतची वेळ आहे, उद्या सुर्यास्तानंतर आपण सर्वजण इथं जमु आणि तुमचा निर्णय ऐकु. त्यानंतरच्या दिवशी चवथ्या प्रहरी राजा दशरथांना भेटायला आपणा सर्वांना जायचं आहे, तुमचा निर्णय काहीही असला तरी..’
हेच आपलं स्वयंवर कसं होईल, - मांडवी शक्य तेवढ्या रागानं बोलत माझ्या दालनात आली. तिच्या मागोमाग श्रुतकिर्ती आणि ताई पण आल्या. ‘ ताईच्या स्वयंवरात कितीतरी राजे आले होते, त्या सर्वांनी तो धनुष्याचा पण पुर्ण करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर तिचा विवाह निश्चित झाला, जे त्या स्वयंवरात सहभागी झाले त्यांची नावं, राज्यं, संपत्ती याची थोडी तरी कल्पना होती आपल्याला, पण याबाबतीत तसं काहीच घडणार नाही.’
तिच्या बोलण्यात थोडी भिती होतीच, पण त्याच बरोबर एक निर्णय समानतेची किंवा स्वातंत्र्याची संधी मिळत नसल्याचा राग देखील होताच.
‘म्हणजे तुला त्या राजकुमारांना पाहायचं आहे तुझा निर्णय घेण्यापुर्वी.’ श्रुतकिर्ती या विषयावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलली., ‘ मला तर नुसतं पाहायचंच नाही तर त्यांची भेट घ्यायची आहे आणि बोलायचं देखील आहे ‘
 सितेचा वेगळेपणा पुन्हा अधोरेखित होत होता, हा विचार उद्यापर्यंत न ठेवता आताच आईला अन् काकुला सांगायचं ठरलं आणि आम्ही आईच्या दालनात गेलो. तिथं आई एकटीच होती, दासी तिच्या पायांना उटी लावत होत्या, आम्हांला बघताच त्या निघुन गेल्या, ‘ मला वाटलंच होतं, तु येशील असं, पण तुम्ही तर सगळ्याच जणी आल्या आहात ‘ आई माझ्याकडं पाहात उठुन बसली.
श्रुतकिर्तीनं काहीही आढेवेढे न घेता, तिचा विचार आईला बोलुन् दाखवला. ‘ तुझी मागणी अगदीच अयोग्य आहे असं नाही, पण याचा निर्णय उद्या सकाळी राजा जनक आणि कुलगुरु करतील, आणि राजा दशरथांना देखील या बद्दल विश्वासात घ्यावं लागेल.’
माझ्या अपेक्षेनुसार आई पुन्हा एकदा आमच्या बाजुनं बोलली होती, आम्ही परत निघताना तिच्या हालचालीतुन एक तणाव जाणवत होता, किंचित आनंदाचा भास होत होता, दालनाच्या दरवाज्यातुन मी मागं वळुन पाहिलं तेंव्हा आई एका गवाक्षाला टेकुन बाहेरचं आकाश पाहात होती. माझ्या दालनात येउन मी देखील तशीच उभी राहिले, पण माझ्या गवाक्षातुन मला आकाश पाहता येत नव्हतं, त्याची कल्पना करावी लागत होती. तो छोटासा काळाकभिन्न् आकाशाचा तुकडा आणि एखादाच तारा कुठंतरी दुरवर चमकणारा, प्रत्येक रात्री तुमच्या समोर चंद्राची कोर येत नसतेच आणि आली तरी तिचा प्रकाश तुम्हाला पुढची वाट दाखवेलच असं नाही,
आयुष्याच्या वाटा निट पाहायला अन समजायला सुर्याचीच साथ असावी लागते, उदया काय होईल याच्या नेहमीसारख्या विचारात हरवुन मला झोप लागली, कधीतरी दासी येउन दालनातले दिवे शांत करुन गेल्याचं जाणवलं.
सकाळी मात्र ताईच्या दालनात रात्रभर  दिवे जळत असल्याचं कळालं, या पुर्वी असं कधी झालेलं नव्हतं. मी मात्र सकाळी उठुन गाईंच्या गोठ्यात गेले, दिवस उजाडताच त्या सा-या गाई अन् वासरं चरायला नेली जात, पुर्वेच्या जंगलांच्या सीमेवर जिथं उंच उंच गवतांची दुरवर पसरलेली वनं होती, मला तिथं जायला खुप आवडायचं, पण आज ते शक्य नव्हतं. थोडा वेळ तिथं थांबुन मी दालनात आले, आईचा निरोप आलेला होता सकाळच्या दुस-या प्रहरीच आम्ही तिघी जणी आईच्या दालनात आलो, बाबा तिथंच होते. आईनं आमचं कालचं बोलणं त्यांच्या अन् काकांच्या कानी घातलं होतं.
बाबा नेहमीच्या गंभीरतेने येरझा-या घालत होते, बहुधा काकांची वाट पाहात होते. ते येइपर्यंत कुणीच काही बोललं नाही, मला ताईची तिथं नसण्यानं उगा अस्वस्थ होत होतं, काही क्षण असे वाट पाहण्यात गेले, आणि काका, काकु आणि ताई एकत्रच आले, ताईनं आज रक्तवर्णी वस्त्र अन् अलंकार घातले होते, पांढ-या शुभ्र वस्त्रांत असलेल्या काकांच्या मागुन येताना ती ज्वालेसारखीच दिसत होती. सगळे जण बसल्यावर दालनाचे दरवाजे बंद करण्यात आले अन् दिवसा देखील गवाक्षांचे पडदे ओढले गेले.

‘ तुम्हा सर्वांशी बोलण्यासाठी राजा दशरथांना स्वतः यायचे आहे, असा निरोप आला आहे आताच दुताने, तसेच आपण सर्वांनी त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणी म्हणजे उत्तकिर्ती उपवनात यावं असा देखील निरोप त्यांनी दिला आहे. ‘ काकांनी एका दमात सगळं सांगुन टाकलं. मी ताईकडं पाहिलं, तिन्ं डोळ्यांनीच सगळं काही व्यवस्थित असल्याचं सांगितलं. ‘ आज दुपारी भोजनानंतर राजा दशरथ आणि त्यांचे पुत्र आपल्या सभेत येणार आहेत, तुम्ही सर्वांनी त्यावेळी तिथं यावं, अर्थात सर्व मर्यादा पाळुनच ही भेट होईल, तसेच पुर्वेकडच्या काही राज्यांनी या स्वयंवराच्या विरोधात एकत्र येउन युद्धाची तयारी सुरु केली असल्याची वार्ता आलेली असल्यानं या प्रस्तावावर एक दोन दिवसांत आपण निर्णय घ्यावा असं मंत्रिपरिषदेचं विचार आहे, अर्थात तुम्हां तिघींवर कोणताही दबाव नाही निर्णय घेण्यासाठी हे लक्षात ठेवा परंतु त्याचवेळी हे आपलं राज्य, प्रजा आणि समाज या सर्वांचाही विचार तुम्ही कराल एवढ्या ज्ञानवती तुम्ही आहात हे मी जाणतो ‘

Monday, June 27, 2016

अंकोदुही भाग १०

‘ तुम्हांला दोहींना महाराजांनी बोलावलं आहे,’ दासीच्या आवाजानं दोघीही एकदमच भानावर आलो, अंगावरची वस्त्रं सावरुन लगेच काकांच्या कक्षाकडं निघालो, जाताना मांडवी अन् श्रुतकिर्ती देखील आमच्या बरोबरच होत्या .
काकांच्या दालनात न नेता आम्हाला राजसभेच्या मोठ्या दालनात बोलावलं होतं, याचा अर्थ आता जे बोलणं होणार आहे ते वैयक्तिक किंवा कौटुंबिक नव्हतं तर त्यापेक्षा जास्त मोठे असं काही होतं. आम्ही सगळ्याजणी जेंव्हा तिथ्ं पोहोचलो, तेंव्हा तिथ्ं आई, बाबा, काका, काकु आणि काही म्ंत्रि व आमचे कुलगुरु बसलेले होते. आमच्या साठी आसनं राखुन ठेवलेली होतीच, आम्ही बसताक्षणीच, काकांनी बोलायला सुरुवात केली,‘हे कुलगुरु आणि मंत्रिगण,सितेचं स्वयंवर संपन्न झालं, अयोध्येचा राजकुमार रामाबरोबर तिचा विवाह निश्चित झाला आहे, त्याचवेळी राजा दशरथांनी एक प्रस्ताव ठेवला आहे, तो प्रस्ताव या तिघींच्या संदर्भात आहे’
शेवट करताना काका आमच्या आसनांजवळ् आले होते.. त्यांनी मंत्रिगणांपैकी एक, स्वधत्वांना पुढे बोलायला सांगितले, त्यांनी राजा दशरथांचा प्रस्ताव आम्हां समोर मांडला, आणि पुन्हा आसनस्थ् झाले..
‘ विवाह हा एक अतिशय वैयक्तिक् निर्णय आहे प्रत्येक् स्त्री साठी, त्या बद्दलच्या प्रस्तावाची चर्चा अशी राजमंत्र्यांचा समोर का करण्यात येते आहे, याचं कारण विचारु शकतो का आम्ही ? मी माझा प्रश्न विचारला. आईचं माझ्याकडं पाहणं मला अजुनही आठवतं, किंचितसा धाक आणि बरंच कौतुक होतं तिच्या बघण्यात..
काका आता माझ्या आसनाच्या मागंच आले होते, तेंव्हा स्वधत्वांना काही बोलायचं होतं, पण काकांनी हात वर करुन त्यांना बसायला सांगितलं, ‘उर्मिले, हा प्रश्न मला फक्त तुझ्याकडुनच अपेक्षित होता अन तु माझा अपेक्षाभंग केला नाहीस. होय, विवाह संबंध हा वैयक्तिकच निर्णय आहे तुमच्यासाठी, नव्हे सर्वांसाठीच पण राजा दशरथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी जी शंका उपस्थित केलेली आहे, त्या शंकेचं उत्तर शोधण्यासाठी किंवा तिचं निराकरण करण्यासाठी त्यांनीच हा प्रस्ताव् मांडला आहे, आणि हे इतक्या कमी वेळात झालं आहे, याचा अर्थ या प्रस्तावावर त्यांनी इथं येण्यापुर्वीच विचार केलेला आहे. सहज सुचलेला असा हा उपाय नाही. या प्रस्तावावर आपण जो काही निर्णय देउ त्याचे बरेच साद पडसाद फक्त सितेच्या किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरच पडतील असे नाही तर आपल्या राज्यावर, राजकारणावर देखील पडु शकतात्.’
‘ ते काय असतील याबाबत आज दिवसभर मी आणि तुझ्या बाबांनी आपल्या मंत्रिसभेसोबत आणि सेनाध्यक्षांसोबत् विचार केलेला आहे, तसेच दिवसभर तुझी काकु आणि आई ह्या कुलगुरंसोबत याबद्दलच्या शास्त्र आणि धर्मग्रंथाच्या संदर्भाने चर्चा करत होत्या. या दोन्ही बाजुंनी विचार केल्यास हे चारही विवाह होणं हे आपल्या राज्याच्या सुरक्षेच्या आणि भविष्यातील प्रगतीच्या दुर्ष्टीनं उपयुक्त आहेच, आणि शास्त्रांनी देखील अशा विवाहांना मान्यता नाकारलेली नाही.’
 ‘ आता प्रश्न उरला तुमच्या आयुष्याच्या जोडिदाराची निवड तुम्ही करण्याबाबत, .. आईनं उठुन आमच्या बाजुला येत बोलायला सुरुवात केली. ‘ अयोध्येच राज्य आणि  तिथला राजवंश हे काही उत्क्रुष्ट राजसंस्थांपैकी एक आहेत, राजा दशरथांचे चारही पुत्र शारिरीक, बौद्धिक आणि भावनिक कसोट्यांवर उत्तम उतरु शकतील याबाबत आपल्या गुप्तहेरांनी खात्री दिलेली आहे, आणि आपल्या आयुष्यभराच्या सहचराबद्दल अशा उत्तम क्षत्रिय कुळात जन्मलेल्या पराक्रमी पुरुषांपेक्षा तुमची अपेक्षा फार वेगळी नसेल असं आम्हांला वाटतं’

आणि हे सुद्धा लक्षात घ्या, जर हा प्रस्ताव आमच्या पैकी एकालाही योग्य वाटला नसता, तर या चर्चेसाठी तुम्हाला बोलावण्यात आलंच नसतं, तुमचं मत विचारलं गेलंच नसतं. आता हा प्रस्ताव स्विकारणं किंवा नाकारणं हेचं तुमचं स्वयंवर आहे असं तुम्ही समजु शकता..

Sunday, June 19, 2016

अंकोदुहि भाग् ०९

आज, वाड्यातला मोठा चौक सजवला होता, सर्व् बाजुंनी तलम् वस्त्रांचे पडदे अन् त्या जोडीला विविध आकाराची आसनं, वेगवेगळ्या पुष्परचना आणि खुप सारे सुगंधी द्रव्यांचे धुप त्या चौकात एका मंगल कार्याची चाहुल देत होते. तिस-या प्रहराला दशरथ राजा सहित, राम्, लक्ष्मण्, ऋषीगण, कुलगुरु आणि मंत्रिगणांचं आगमन झालं, बाबा स्वागताकरिता वाड्याच्या मुख्या प्रवेशद्वाराजवळच उभे होते. चौकात सगळे जण् आल्यावर, काकांनी सर्वांचं स्वागत केलं, ज्याला त्याला मानानुसार आसनांवर बसवलं गेलं, मध्याभागी दोन वर्तुळाकार आसनांवर् काका आणि राजा दशरथ बसले होते. जलपान् आणि मिष्टान्न सेवनानंतर बराच काळ चर्चा होत राहिली.
‘’ जनका, तुम्ही तुमच्या कन्येचं उभं केलेलं स्वयंवर माझ्या मुलानं जिंकले आहे, हे तुमचं आणि आमचं, सौभाग्यचं म्हणावं लागेल, या दोन्ही प्रचंड आणि बलवान राज्यांमध्ये जुळुन येणारा हा संबंध आपल्या सुरक्षित भविष्याची सुरुवात ठरेल हे नक्की. परंतु माझ्या एका मंत्र्यानं एक शंका उपस्थित केलेली आहे, त्याबद्दल आपण आपापल्या कुलगुरुंचा विचार घ्यावा असं मला वाटतं..
राजा दशरथांच्या शांत अन गंभीर आवाजानं तिथं उपस्थित असलेले सगळेजण मोहित झाले होते जणु,, ‘’ तुझी कन्या सीता हि तुमची निजकन्या नाही, तुम्हाला सापडलेली या भुमिच्या पोटात, तिचं उत्पतस्थान आणि वंश यांचा शोध लागणं फार कठिण आहे. अशा कन्येबरोबर् माझ्या ज्येष्ठ् राजपुत्राचा विवाह झाला, तर तो क्षत्रिय आणि अक्षत्रिय विवाह् ठरेल आणि वर्णभेद झाल्यानं आणि यानंतर माझ्या इतर तीन पुत्रांचा विवाह क्षत्रियकन्यांशी होणं ही गोष्ट अवघड होईल.
‘ परंतु महाराज दशरथांनी असा विचार करावा हे योग्य वाटत नाही ‘ काकांचा आवाज् सुद्धा तेवढाच शांत आणि विश्वासु होता. ‘ प्रत्यक्ष देवाधिदेवांच्या प्रसादानं आपणांस प्राप्त झालेले हे चार् पुत्र तेवढेच पराक्रमी अन् तेजस्वी आहेत., हा वर्णभेदाचा विचार एखाद्या अशक्त क्षत्रियानं केला पाहिजे, आपल्यासारख्या बलवान राजा आणि अयोध्येसारख्या शास्त्रनियंत्रक राजसत्तेसाठी असा विचार योग्य नव्हे.
‘योग्य आणि मान्य असा विचार तुम्ही पुढं ठेवला आहे राजा जनक, जसे आम्ही चार पुत्रांचे पिता आहोत तसेच तुमच्या शुभकुळात् देखील् अजुन तीन कन्या आहेत. या स्वयंवराने राम जानकीचा विवाह् सिद्ध झाला आहे, तसेच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा विवाह् त्या तिघिंच्या समवेत करुन हा शास्त्रोत्त्पन्न प्रश्न सोडवता येउ शकतो..’
एखाद्या गोष्टीचा फार खोलवर आणि दुरपर्यंत विचार करुन बोलल्याप्रमाणे राजा दशरथांनी त्यांचा विचार त्या छोट्याश्या सभेपुढे ठेवला. या शक्यतेचा कुणी विचारच केला नसावा, किंबहुना ताईचं स्वयंवर, ते धनुष्य या गोष्टी एवढ्या मोठ्या झालेल्या होत्या की त्यामागे असा काही विचार करावा हे देखील कुणाला सुचले नाही. अर्थात बाबा आणि आईच्या बोलण्यात ब-याच वेळा अशा प्रकारच्या चर्चा ऐकु येत हे खर्ं..
त्या दिवशी इतर काही विषय नव्हताच कुणाला बोलायला, नगरातल्या नागरिकांपासुन ते आमच्या मंत्रीगणांपर्यंत हा एकच विषय होता, ताईच्या वेगळेपणाचा प्रभाव एवढ्या प्रखरतेनं या पुर्वी कधीच जाणवलेला नव्हता. या सगळ्यांनं तिला एकाकी वाटु नये म्हणुन् मी तिच्या दालनात् गेले. ती नेहमी प्रमाणे शांत होती, मंचकावर झोपुन ती फार काही गहन विचार करत आहे असं जाणवलं मला, तरी देखील माझ्या चाहुलीनं ती उठली अन पश्चिमेच्या तिच्या आवडत्या गवाक्षात् जाउन् उभी राहिली, मी तिच्या जवळ जाउन थांबले, बाहेर सुर्य क्षितिजाला टेकला होता, कोणत्याही श्रेष्ठ रंगकर्मीन्ं कितीही तपस्या केली तरी शक्य होउ नये अशा रंगछटा तिथं पसरल्या होत्या, आणि दर क्षणाला त्यांच्यात असंख्य बदल होत होते, काहीशा वेगानं चाललेल्या वा-यांनी चुकार ढगांबरोबर खेळ चालवलेला होता.
तितक्यात सुर्यास्ताचा घंटानाद नगरात दुमदुमु लागला, आमच्या मागुन आलेल्या एका दासीनं घाईनंच त्या गवाक्षावरचा जाड गवताचा पडदा खाली पाडला अन् आम्ही दोघी पुन्हा कालच्याच पुष्करणिजवळ येउन बसलो, काहीही न बोलता, बरंच काही सांगितलं जात होतं अन् ऐकु येत होत्ं.. शेवटी ताईनंच सुरुवात केली.. ‘ का गं, तुम्हा क्षत्रियकन्यांना मान्य आहे का असा विना स्वयंवराचा विवाह,? स्वत्ः निवड करण्याचा तुमचा अधिकार तुम्हाला आहे, पण तो न वापरता येणं याला तुमची तयारी आहे?
‘स्वयंवराची गरजच आहे कशासाठी, तर एखाद्या स्त्रीला ज्या पुरुषाबरोबर आपल्ं आयुष्य व्यतित करायचं आहे, तिला तो पुरुष योग्य वाटतो किंवा नाही, हे समजुन् घेण्याचा हा अधिकार् आहे. यांत स्वातंत्र्य निवडीचं आहे, ‘ मी आईबरोबरच्या चर्चेतुन जे मला समजलं होतं त्याचा विचार करुन उत्तर दिलं..
परंतु, ही निवड करायची आहे, ती कोणत्या क्षमतांवर, त्या पुरुषाची युद्धसज्जता, परहत्या पराक्रम का संपत्ती का बौद्धिक संपन्नता अथवा प्रजननक्षमता.. माझ्यासाठी हा धनुष्याचा पण उभा केला गेला, पण जर हे धनुष्यच नसतं तर कशाच्या आधारावर मला माझ्या आयुष्याच्या जोडिदाराची निवड करावी लागली असती ? ताईच्या मनात असे बरेच प्रश्न होते तसे माझ्या मनात् देखील. त्यांची उत्तरं माझ्याकडंही नव्हती त्यामुळं मी शांत राहायचं ठरवलं. अशा वेळी शांतताच आपल्या प्रश्नांची उत्तरं देते किंवा कधी कधी त्या प्रश्नांचं अस्तित्वच मिटवुन टाकते.
मग असे प्रश्न पडुन राहतात शस्त्रागारांच्या अंधा-या कोप-यात पडुन राहिलेल्या वज्रांच्या पात्यांसारखे, त्यांच्या तुटलेल्या धारेला आता काहीही अर्थ उरलेला नसतो, आणि त्या मोडुन् पडलेल्या शराग्रांसारखे ज्यांच्या मागचे काष्ठांगही तुटुन गेल्यानं ते होउन राहिलेले असतात धातुंचे तुकडे, पुन्हा कधी एकदा तो अग्नी वितळवुन् टाकेल अन पुन्हा जन्म होईल या आशेवर.
आणि हो एकदा का हे अर्थहीन वाटणारे धातुंचे तुकडे वितळवले की मग मात्र त्यापासुन् पुन्हा बनतात तशीच शस्त्रे जी पुन्हा तेवढीच जीवघेणी असतात, तुम्हाला हवी असली तरी किंवा कसेही..