Thursday, December 15, 2011

चपला आणि सत्कार - भाग १३ - अंतिम.

नाथा अन बाकीचे चार जण केगांव पासुन निघाले, तिथुन बार्शी रोडला येउन ते मधल्या रस्त्यानं तामलवाडीला आले, तिथं बाउंड्रीच्या हॉटेलजवळ गाडीत अजुन थोडी भाजी भरुन घेतली, पुढं जाउन एकाआडवाटेला अंधारात थांबुन दोघांनी गाडीच्या नंबरप्लेट बदलल्या, समोरचे शो चे लाईट काढुन टाकले, आणि लटकणारा हनुमान, डॅशबोर्डावरचा गणपती काढुन ठेवला. त्या दोघांपैकी एकजण अंधारातच चालत पुन्हा सोलापुरच्या दिशेनं यायला निघाला. मध्ये एका बाजुच्या शेतात जाउन त्यानं दोन्ही नंबर प्लेटवर बरोबरच्या बाटलीतलं थिनर टाकलं अन दोन्ही प्लेट जमेल तेवढ्या स्वच्छ केल्या, द्गडानं वेड्यावाकड्या केल्या, एक तिथंच मातीत पुरली अन दुसरी पुढं चालत येउन एका वाहणा-या नाल्यात भिरकावुन दिली.
टेम्पो सुसाट पुढं निघाला,पहाटे पर्यंत लातुर - औसा रोडवर असलेल्या एका मठात पोहोचायचं होतं, पण त्याआधी बरोबर घेतलेली भाजी उस्मानाबाद मार्केटला टाकुन तिथं पोहोचायचं होतं. आता हा मठ या चार जणांचा पुढचा दोन महिने सांभाळ करणार होता. रात्री तुळजापुरनंतर एका ठिकाणी जेवायला थांबले होते तिथं फार कुणीच बोललं नाही, एखाद्याचा जीव घेउन नुसतं वावरणंच खरंतर अवघड असतं आणि इथंतर चार तासातच सगळे एकत्र बसुन जेवण करत होते, किंवा जेवण्याचा प्रयत्न करत होते, समोर आलेल्या तंदुरी चिकनच्या जागी वेगळंच काही दिसत होतं. नाथा ओरडला ' अबे बारक्या, हिरवी भाजी नाय का काय, त्ये घेउन ये काय वातड झालंय हे चिकन ' खरंतर हे बोलताना त्याच्या डोक्यात काल पोत्यात बांधताना आनंदच्या पायाला आलेला वातडपणा होता. आनंदला पाणी पाजुन निघतानाच त्याच्या लक्षात आलं होतं की हा टिकणार नाही, प्रशाच्या गोठ्यातच त्याच्या पँटवर मुंग्या चढताना त्यानं पाहिल्या होत्या. तेवढ्यात वेटरनं पालक पनीर आणुन दिलं, त्याला गार झालेल्या रोट्या बदलुन द्यायला सांगितल्या. अजुन दोन तासाचा प्रवास बाकी होता.
अप्पा बराच वेळ फोन लावत होते, पण तो स्विअ ऑफ येत होता. मग कंटाळुन ते घरी आले. घरी बाकी सगळ्यांनी जेवुन घेतलेलं होतं. सुनेनं आणुन दिलेलं दुध पिताना अप्पा गप्पच होते. सुनेनं त्यांच्या उशा आणि पांघरुणं आणुन दिली तसे अप्पा झोपायच्या तयारीला लागले. झोपेचं सोंग घेतलं अन पडुन राहिले. यावेळी जाधव घराच्या गच्चीवर बसुन दोन घोट व्हिस्की आणि तांब्याभर पाणी घेउन बसले होते. त्यांना घरुन पाणी हवं तेवढं मिळायचं पण व्हिस्की मात्र दररोज दोन घोटच आणि बरोबर मोजुन पाच काजु आणि अर्धी वाटी शेंगा टरफलासहित. आज त्यांचं जिगसॉ पुर्ण होत आलं होतं. फक्त एकच तुकडा बसत नव्हता, म्हणजे त्याचा आकारच होता गोल, त्या जिगसॉतली जागा पण होती गोलच पण तो तुकडा कसा ही फिरवुन बसवला तरी चित्र पुर्ण होत नव्हतं, प्रत्येक वेळी एक वेगळाच अर्थ दाखवत होतं. दोन घोट व्हिस्किनं रोज किमान लांबच्या चांदण्या जवळ दिसायच्या पण आज ही समोरची डिझाइन लांब चालली होती. कंटाळुन जाधव उठले, व्हिस्की संपलेलीच होती. घरात झोपायला आले, गुपचुप बेडरुममध्ये येउन बेडवर अंग टाकुन दिलं.
पहाटेला स्वामी श्री अवतारी बाबा आश्रमाच्या कुष्ठरोग विभागार तीन जण सेवेकरी म्हणुन भरती झाले, कुणी फारसं बोललं नाहीच. तिघांनी आंघोळी आटोपल्या आणि आश्रमातले कपडे घालुन कामाला लागले. झाडलोट आणि तिथल्या रुग्णांचे कपडे धुणं ही कामं त्यांच्याकडं होती. सगळा प्रकार मुक्यानंच चालायचा, सुपरवायझर तसा पोरगेलासा तो यांना पाहुनच घाबरला. एका रजिस्टर मध्ये त्यानं यांची नावं लिहुन घेतली. जेंव्हा ते कपडे धूण्याच्या जागेकडं निघाले तसं सुपरवायझरनं त्यांना गमबुट घालायला सांगितले, तिघांनी नकार दिला अन कामाला लागले. इकडं सोलापुरात दोन मोठ्या व्यक्ती सिव्हिल मध्ये अ‍ॅडमिट झाल्या एक अप्पा अन दुसरे माननीय. अप्पा सकाळी नेहमीप्रमाणे उठले नाहीत म्हणुन त्यांना दबाखान्यात आणलं गेलं रात्री कधीतरी एक माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक येउन गेला होता असं अनुमान काढला गेला, तालमी घुमलेलं शरीर म्हणुन वाचले होते. तिकडं माननीय अ‍ॅडमिट झाले ते कायदा अन राजकीय आजारापोटी, त्यांच्या वकिलानं अटकपुर्व जामीनाची तयारी सुरु केली होती. पोलिसांनी तालीम, मंडळ कार्यालय पुन्हा पिंजुन काढलं, काहीच मिळालं नाही.
दोन दिवसांनी अनपेक्षितपणे जाधवांच्या हाती एक धागा आला, आनंद बरोबर रात्री तिथं गेलेला त्याचा एक चेला, जखमी झाल्यावर तो गावाकडं जाउन राहिला होता एवढे दिवस आणि आता सगळं शांत झालं असेल असा विचार करुन तो परत आला होता. त्याला बोलता करायला दुपारचे चार वाजले, पुन्हा एकदा पोलिसांनी तालीम, मंडळ कार्यालय पुन्हा पिंजुन काढलं, काहीच मिळालं नाही. दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत जाधवांचा रिपोर्ट कमिशनर साहेबांच्या समोर होता. एकुण अठरा जण सोलापुरातुन गायब होते, प्रत्येकजण संशय घेण्यासारखा होता पण सगळ्यांची नावं कधी कुठं आलेली नव्हती, काही नावं मात्र या असल्य भानगडीत नेहमीच असायची. आता या सगळ्यांना हुडकणं अन चौकशी करणं बरंच वेळ खाणारं काम होतं. जाधवांनी त्याची परवानगी मागितली पण कमिशनर साहेबांनी दोन चार दिवस थांबायला सांगितलं. मनात थोडं निराश होउन जाधव बाहेर आले, ऑफिस समोरच्या बागेत थोडा वेळ उभारले आणि मग घरी गेले.
केगांव रोडवरच्या खड्ड्यात पडलेली बॉडी ही दै.संचार,केसरी अन तरुण भारत ची हेडलाईन झाली ती बरोबर तीन दिवसांनी.पोलिस प्रेस फोटोग्राफरना जागेवर घेउन गेले तेंव्हा तिथं मुंग्या लागलेल्या होत्या, बाजुला उभं राहवत नव्हता. बॉडी कुणाची हे न माहित नसल्यानं गर्दीत फारशी रडारडी नव्हती, दोन ठिकाणी दगडानं ठेचुन मारण्या मागच्या उद्देश नक्की समजत नव्हता, तरीसुद्धा धार्मिक तणाव होउ नये म्हणुन पोलिसांनी बॉडी लगेच हलवली. पुढचा तपास चालु झाला, वायरलेस वरुन ह्या सगळ्याबद्दल जाधवांना समजलं होतं, पण त्यांच्या समोर आनंदच्या माणसानं दिलेला जबाब असल्यानं यावर आता जास्त विचार केला नाही, पण आपल्या जिगसॉ मध्ये ह्या तुकड्याला सुद्धा एखादी जागा द्यावी लागेल याचा अंदाज त्यांना आला होता. उद्यापासुन जाधव रजेवर जाणार होते, त्यांना नागपुरला जाउन नविन नोकरीच्या काही प्रोसेस पुर्ण करायच्या होत्या. मग आज यात जास्त अडकायचं नाही असा सोयिस्कर विचार करुन ते नेहमीप्रमाणे राउंडला निघुन गेले.
आठ दिवसांनी जाधव नागपुरला जाउन परत येईपर्यंत प्रत्यक्ष केसमध्ये काही विशेष घडलेलं नसलं तरी बॅकग्राउंडला बरंच काही झालं होतं, त्यांच्या जिगसॉचं चित्रच बदलायची वेळ आली होती, अप्पांना हॉस्पिटलमधुन डिसचार्ज मिळाला होता,माननियांनी अटकपुर्व जामीन मिळवला होता, कमिशनरनी सगळी फाईल होम सेक्रेटरींकडे पोहोचवली होती, तिथुन त्याची एक कॉपी पक्ष प्रदेशाध्यक्षांकडे गेली होती. तालीम, मंडळाचं कार्यालय पुन्हा कार्यकर्त्यांनी भरुन गेलं होतं, तरीही त्या अठरापैकी कुणीच परत आलेलं नव्हतं.नवरात्र शांततेत पार पडलं होतं. जनसामान्य आपापल्या रोजच्या जगण्यात गढुन गेले होते, मदनचा भाउ आणि वहिनी पुन्हा आपल्या गावाला निघुन गेले, जाताना मदनच्या आईला बरोबर घेउन गेले. त्याच्या बापानं आपलं दुकान पुन्हा सुरु केलं, दुकानात एक फुटभर फोटो लावला होता मदनचा, त्याला रोज हार गंध करायचा, आणि बास. एका दोघांच्या जाण्यानं जगरहाटी थांबत नाही. बांगरे घरी आले होते पण आल्यापासुन आजारीच होते. काडादी चाळीतला डॉक्टर दररोज येउन औषध देउन जायचा पण त्यामागं माणुसकी कमी अन त्यांच्या मुलीचं हातात हात देउन थँक्यु म्हणणं जास्त होतं असं तिच्या आईला वाटायचं.
मोठा फरक पडला होता तो आनंदच्या घरी, घरचा कमावता असा गेला होता की त्याची बायको एकदमच विनाधार झाली, आणि मरणाच्या बरोबर पोलिस केस असल्यानं नातेवाईक पण दिवसपाण्यापर्यंतच घरी येत होते, नंतर कुणी फिरकलंच नाही ना सासरचं ना माहेरचं. कॅरम क्लब चालवणं तिला शक्य नव्हतं, दहावी पास या कुवतीवर कुठं नोकरी लागायची शक्यता नव्हती, घरची गाडी विकावी म्हणलं तर ती पोलिसांनी जप्त करुन ठेवलेली, ती सोडवायलाच जमादारानं चाळीस हजार मागितले होते. ज्या वस्तीत ' वहिनि' म्हणुन मिरवली होती, तिथंच चार घरी धुणी भांडी करुन जगायची वेळ आली होती, माननीयांच्या घरी दोन तीन वेळा जाउन आली, त्यांच्या आईनं अन बायकोनं दोन्ही वेळ पाच दहा हजार दिले पण, ते संपायला फार वेळ लागला नाही, पण ज्या दिवशी अप्पांना डिसचार्ज मिळाला त्या दिवशी अनपेक्षितपणे एकजण घरी येउन दोन लाख देउन गेला होता, तो नाथाचा माणुस होता. अप्पांनी हे करायला त्याला मुश्ताकला मारलं त्याच दिवशीच सांगितलं होतं. या पैशातुनच शेवटी तिनं आपल्याला जे जमेल ते करायचं ठरवलं, कॅरम क्लबच्या जागेत एक टपरी काढायची चहा भजीची.
कोजागिरी पौर्णिमेदिवशी अवतारी बाबा आश्रमात बरीच गडबड होती, उत्सव होता, जेवणं होती. सगळे जण गडबडीत कामाला लागले होते, पार संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळे कार्यक्रम संपले. संध्याकाळची आरती झाल्यावर महाप्रसादाची गडबड बाहेर चालु झाली तेंव्हाच मठाच्या प्रमुखांच्या खोलीत आठ जण जमले , त्यात नाथा, हणमंता आणि त्याच्याबरोबरचं दोघं जण होते. मठप्रमुखांनी समोर ठेवलेल्या ताटातुन अरगजा मुठीनंच उचलला अन या चौघांच्या कपाळाला मळवटासारखा लावला, 'आई भवानीचा उदो उदो' असा गजर झाला, चौघांनी सगळ्यांकडं आनंदानं पाहिलं, मठप्रमुखांनी इशारा केल्यावर त्यांच्या बाजुला बसलेले अप्पा उठले, खुर्च्यांमागं ठेवलेल्या पोत्यातनं चार खोकी काढ्ली, त्यावर थोडा अरगजा लावला अन प्रत्येकाच्या हातात एकेक खोकं दिलं. चौघांनी खोकं घेउन अप्पांच्या पायावर डोकं ठेवुन नमस्कार केला, अप्पांनी नाथा अन हणमंताला जवळ घेतलं, दोघांच्या डोक्यावरुन हात फिरवला ' बाबांनो, आता सहा महिने तरी दिसु नका इकडं, निघा लगेच, आणि चपला घाल की बे आता, मानाच्या आहेत म्हणजे काय कोनाड्यात ठेवणार का काय घरी निउन.' चौघांनी खोकी उघडली अन त्या नव्या को-या चपला कपाळी लावुन पायावर चढवल्या. मठातला पुजारी शोभावा असा एक इसम तिथं होता त्यानं एक तांव्या बरोबर दिला आणि सांगितलं इथुन थेट अहमदपुरवरुन नांडेड्ला जा गोदावरी माईत यांचं विसर्जन करा आणि मगच पुढं जा' त्या तांव्यात मदनच्या भावाकडुन घेतलेल्या राख अन अस्थि होत्या. मठाच्या बाहेर एक अवतारी बाबांच्या पोस्टरनी सजवलेली ट्रॅक्स उभीच होती,विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी ती संपुर्ण भारतात यात्रा करणार होती.सगळेजण ट्रॅक्सजवळ आले, मठप्रमुखांनी नारळ फोडला, चारी चाकांखाली लिंबं ठेवली होती ती फोडुन हणमंतानं गाडी पुढं घेतली, गाडी कचकचतच चालवतोय हे बघुन नाथा त्याला म्हणाला,'अबे पहिल्यांचा चालवतोय का भाड्या,नीट चालव की'यावर हणमंता बोलला'पैलवान, महिना झाला असंल ना बिनचपलेचं फिरतोय, आज एकदम चपला घालुन जमेना बगा, हुईल एक दोन दिवसात सवय, जरा दम धरा'
समाप्त --
चपला आणि सत्कार बद्दल --
सत्कार हा एक मान असतो, सन्मान असतो, एखाद्यानं केलेल्या चांगल्या मोठ्या कामाची दिलेली पावती असते. हार, पुष्पगुच्छ एखादं मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं याचं सर्वमान्य स्वरुप असतं. पण ब-याच ठिकाणच्या गँगवॉर मध्ये अशा ब-याच या परंपरा असतात . त्यापैकीच ही एक, एका गँगवाल्यांनी दुस-या गँगमधल्या एखाद्याला उडवलं की, याचा बदला घेण्यासाठी त्या गँगमधल्या दोन चार जण पुढं येतात अन हा बदला पुर्ण होईपर्यंत ते पायात चपला घालत नाहीत,अनवाणी राहतात. ब-याचदा याची सुरुवात जवळपासच्या एखाद्या देवळात देव देव करुन होते, म्हणजे कुणी विचारलंच तर 'देवाचं' असं सांगता येतं. आणि हो भले हा बदला महिन्यात घेतला जाउदे नाहीतर त्याला वर्षे लागुदे,अगदी स्वताचे लग्नकार्य मध्ये येउदे नाहीतर उन्हाळ्यात रस्त्यावरचं डांबर वितळायला सुरु होउ दे पण पायावर चप्प्ल चढत नाही यांच्या. जेंव्हा हा बद्ला घेउन होईल, तेंव्हा त्या सर्वांचा गँगकडुन नव्या को-या चपला देउन सत्कार केला जातो.
याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारलेली ही संपुर्णपणे काल्पनिक कथा आहे, यातील व्यक्ती, स्थळ, घटना, संवाद यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, घटना वगैरेशी कोणताही संबंध नाही, आणि तसे झाल्यास तो केवळ योगायोग आहे.
Print Page

Saturday, December 10, 2011

चपला आणि सत्कार - भाग १२

पहाटेच कारखान्याच्या बाजुला मोकळं व्हायला गेलेल्यांना भिंतीजवळ कुणी बसल्याचं दिसलं. सात आठ जण जमा झाल्यावर पोलिसांकडं जायचं ठरलं, कारखानाच्या आउट्पोस्ट्वर खबर गेली. तिथल्या ड्युटि हवालदारानं कारखान्याच्या सिक्युरिटीच्या मदतीनं आनंदला कारखान्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं. प्रथमोपचार केल्यावर आनंदला तिथुन सोलापुरला सिव्हिलला हलवलं गेलं. तिथं गेल्यावर पण आनंदनं त्याचा नाव पत्ता एवढंच सांगितलं. जखमा कशा झाल्या, कुठं झाल्या ह्या बद्दल त्यानं एकच स्टोरी चालु ठेवली, तो मित्राकडे चालला होता, त्याची मोटारसायकल एका जीपला धडकली, त्याचं भांडण झालं अन मग तो बेशुद्ध झाला. मग तिथुन तो कारखान्याजवळ कसा आला त्याला माहित नव्हतं. त्याच्या जखमा बघुन पोलिसांनी पण चौकशी वैद्यकीय कारणांसाठी तहकुब ठेवली. आनंद सापडला हे माननीयांना अन जाधव इन्सेपक्टर दोघांना एकदमच कळालं, पण सिव्हिलमध्ये येउन माननीयांना ह्या भानगडीत अजुन अडकायचं नव्हतं. जाधवना मात्र जाणं भाग होतं. त्यांनी जाउन पुन्हा एकदा चौकशी केली, पुन्हा तेच प्रश्न पुन्हा तीच उत्तरं. त्याच्या जखमा आणि त्याला असणारा डायबेटिसचा त्रास पाहता तिथेअल्या डॉक्टरांना त्याला जिवंत ठेवा असं सांगुन जाधव ही बातमी सांगायला कमिशनरांकडे आले. त्यांना हा अपडेट देणं फार गरजेचं होतं, त्यांच्या जिगसॉ मधल्या उरलेल्या जागा भरत येत होत्या. नोकरीतुन बाहेर पडता पडता ही एक केस त्यांच्या नावे आली आती तर बरं झालं असतं.
नाथानं आनंद सापडल्यावर तोंड उघडेल याची शंका येउन घोळसगावमध्ये(अक्कलकोट तालुक्यातील एक गाव), हणमंताला दिवसभर थांबायला सांगितलं, अन तिथुन एस्टी पकडुन एकटाच पुढं निघाला. आता त्याच्या फोनची बॅटरी एकच दांडकं दाखवत होती. अक्कलकोटमध्ये येउन त्यानं बाजारातुन नवे कपडे घेतले, भक्तनिवासात जाउन आंघोळ वगैरे आटोपली अन मंदिरात दर्शनाला गेला. बदललेले कपडे एका पिशवीत भरुन त्यानं एस्टी स्टँड जवळच्या एका जीपमध्ये टाकले अन तो एस्टिनं तुळजापुरला निघाला. त्यानं सकाळपासुनचा पहिला फोन केला तो तुळजापुरला पोहोचल्यावरच. अप्पांच्या घरी फोन करुन त्यानं सगळ्या गोष्टींची खातरजमा करुन घेतली. देवीचं दर्शन घेतलं अन तिथुन सोलापुरला निघाला. हे सगळं होईपर्यंत दुपारचा दिड वाजला होता, तामलवाडीला उतरुन त्यानं एक जीप पकडली केगाव कडं जाणारी. बरोबर चार वाजता तो केगावला पोहोचला होता. केगांवच्या तालमीत आधीच तो येणार असल्याचा निरोप आलेला होता. त्यामुळं तालीम समोरुन बंद होती अन मागच्या दरवाज्यानं नाथा आणि अजुन दोन तीन जण आत आले. आज रात्री अंधार होईपर्यंत आणि इथुन निघायला गाडीची सोय होईपर्यंत त्यांना तिथंच गप्प बसुन राहायचं होतं. सहा वाजता हणमंतानं बोरी धरणावर गाडी धुवुन निघाल्याचा फोन केला. तसा नाथा निश्चिंत झाला. दीड तासात हणमंता घरी सोलापुरात जाउन लगेच एस्टिनं औरंगाबादला निघणार होता. त्यानं तुळजापुर ओलांड्लं की तो फोन करणार होता आणि मग नाथा तालमीतुन निघुन त्या खड्ड्याकडं जाणार होता.
कमिशनर जाधवांची बातमी ऐकुन खुश झाले अन त्यांनी होम सेक्रेटरींना फोन लावला. होम सेक्रेटरींनी प्रदेशाध्यक्षांना. मोहोळ-पंढरपुर भागात दौरा करत असलेले प्रदेशाध्यक्ष लागलीच सोलापुरला परत यायला निघाले, त्याचवेळी त्यांनी माननीयांना गेस्ट हाउसला येउन थांबायला सांगितलं. होम सेक्रेटरींनी कमिशनरना पुढच्या चौकशीची परवानगी दिली आहे हे कळाल्यावर जाधवांना फार आनंद झाला, पण' जाताना बनसोडेला घेउन जा' ही कमिशनरांची ऑर्डर ऐकेपर्यंतच टिकला. ' मरता क्या न करता' म्हणत ते निघाले, बनसोडेंना डायरेक्ट सिव्हिलला येण्यास सांगितलं. जाधव सिव्हिलला पोहोचेपर्यंत बनसोडे तिथं आलेच होते. दोन दिवसापुर्वी लंचला त्यांचं या केसवर बोलणं झालेलं होतंच. दोघंही जण मग 'सि' बिल्डिंगमधल्या आयसियु वॉर्डकडं निघाले. आत जातानाच त्यांना आनंदला स्ट्रेचरवर नेत असल्याचं दिसलं, तिथंच अड्वुन त्यांनी चौकशी केल्यावर, त्याच्या पायातुन होणारा रक्तस्त्राव थांबत नसल्यानं त्याला ऑपरेशनसाठी नेत असल्याचं समजलं. म्हणजे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तरी काही काम होणार नव्हतं. थोडावेळ थांबुन बनसोडे निघुन गेले, जाधव तिथल्या ड्युटि हवालदाराला सुचना देउन परत आले.
माननीयांना सकाळपासुन सिव्हिलमध्ये काय होत आहे याची माहिती मिळतच होती. येणा-या प्रत्येक फोनबरोबर ते जास्त अस्वस्थ होत होते आणि इकडं प्रदेशाध्यक्ष सुद्धा दौरा अर्धा सोडुन परत येत होते, फोनवर काही बोलायला तयार नव्हते. बांगरेबद्दल काही माहिती अजुनही मिळाली नव्हती. आनंदची अवस्था पाहता तो किती वेळ जगेल याची खात्री नव्हती. सकाळपासुन तीन ऑपरेशन आणि २ बाटल्या रक्त त्याला देवुन झालेले होतं. त्यातच त्यांनी सिव्हिलमध्ये बसवलेल्या त्यांच्या माणसाचा फोन आला की, पोलिस आनंदच्या घरी जाउन त्याच्या बायकोला तिथं घेउन आले होते. आनंदनं पोलिसांना काही सांगितलेलं नव्हतं पण त्याच्या बायकोनं जर हे सांगितलं की गायब झाला त्या रात्री आनंद गेस्ट हाउसवर यांनाच भेटायला गेला होता तर पोलिसांनी लगेच काही केलं तरी असतं किंवा या माहितीच्या आधारे नंतर कधीतरी अडकवलं असतं. त्यांनी लगेच घरी फोन करुन बायकोला या गोष्टी किती महत्वाच्या आहेत याची कल्पना दिली आणि तिला ताबडतोब सिव्हिलला जाउन आनंदच्या बायको गप्प बसेल असं बघायला सांगितलं, त्यांची बायको कशीबशी तयार झाली. आता प्रदेशाध्यक्षांचं काय लफडं आहे ते मिटल्यावरच त्यांचं टेन्शन कमी होणार होतं.
साडेपाच वाजले तसं आनंदला थिएटरमधुन बाहेर आणलं गेलं, त्याला पुर्ण भुल दिलेली असल्यानं आयसियु मध्ये हलवलं गेलं. तो उद्या सकाळपर्यंत तरी काही बोलणार नव्हता. ड्युटि हवालदारानं जाधव आणि बनसोडे दोघांना हे कळवलं तसे दोघंची रात्रीपुरतं निश्चिंत झाले. तोपर्यंत आनंदच्या बायकोला कुणाला काही बोलायचं नाही हे समजवण्यात सौ.माननीय यशस्वी झाल्या होत्या. झालेलं बोलणं माननीयांना कळवुन त्या सिव्हिलमधुन निघाल्या. इकडं त्याचवेळी गेस्ट हाउसवर प्रदेशाध्यक्ष आले होते. त्यांनी माननीयांना आपल्या रुममध्ये बोलावलं व अर्धा तास रुममध्ये ते दोघंच होते. माननीय बाहेर आले ते संपुर्ण शरणागती पत्करुनच. ज्यानं कुणी केली होती त्याची चुक शेवटी माननीयांना फार महागात पडली होती. प्रदेशाध्यक्षांनी त्यांना हे सगळं प्रकरण कोणत्या थराला गेलं आहे आणि ते दडपण्यासाठी किती खर्च येईल याची कल्पना दिली होती. आकडे ऐकुन त्यांचं डोकं गरगरत होतं, हे ज्याच्यामुळं झालं असं त्यांचं मत होतं तो आनंद पण बेशुद्द्ध पडला होता. त्याला आजच्या दिवशी तरी काही बोलणं शक्य नव्हतं. सगळ्या गोष्टी फार संयमानं हाताळणं भाग होतं. ते पुन्हा एकदा रुममध्ये जाउन प्रदेशाध्यक्षांना भेटुन आले. आता बाहेर गर्दी जमा झालेली होती. संध्याकाळी पत्रकार परिषद होती, कार्यकर्ते येउन बसलेले होते. त्यांनी ड्रायव्हरला गाडी मागच्या बाजुला घेउन यायला सांगितली अन मागच्या बाजुनं निघुन गेले. ज्या एक दोन पत्रकारांच्या हे लक्षात आलं ते सोडुन कुणी त्यांच्या मागं गेलं नाही.
हणमंता तालमीपासुन एवढा लांब रहायचा की त्याचा पोलिसांना एवढा संशय यायचा प्रश्न नव्हता आणि अजुन आनंदनं काही माहिती दिलेली नव्हती त्यामुळं तो निवांत निघाला होता. वळसंगला आल्यावर त्यानं गाडीत मागं एका धनगराला त्याच्या बक-यासोबत बसवलं आणि अजुनच निवांतपणे सोलापुरला निघाला. अक्कलकोटनाक्याला त्याला कुणी अडवलं नाही, मात्र जकात नाक्यावर मात्र बक-यांची जकात करायला त्याला थांबावं लागलं. तिथं त्यानं हुशारी करत बरोबर आणलेला प्रसाद तिथल्या लोकांना थोडा थोडा दिला. गावात आल्यावर धनगराला विजापुर वेशीत सोडुन तो घरी आला.गाडी लावली, घरी जाउन बायकोला पैसे दिले, तिनं जेवण केलं, पोटाची अन शरीराची भुक भागवुन तो निघाला. निघताना इतके दिवस बिनचपलेच्या फिरणा-या नव-यानं आता चपल्या पिशवीत का घालुन घेतल्यात हे त्याच्या बायकोला कळालं नाही. पण नवरा घरी येउन जेवुन चाललाय याचा तिला आनंद होता. जास्त काही विचारणं तिनं टाळलंच कारण आपला नवरा काही सरळ उत्तर देइल याची तिला अपेक्षाच नव्हती. हणमंता चालत चौकात आला, पानटपरीवरुन गुटखा घेतला, तीन दिवस त्याला काहीच मिळालं नव्हतं. मग टमटमनं त्यानं स्टँडवर न जाता तु़ळजापुरनाका गाठला आणि तुळजापुरला जाणारी जीप पकडली. तुळजापुरनाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केलेली होती, हणमंता बसला ती जीप पण चेक केली, पण कुणाकडंच काही सापडलं नाही. इथुन पुढं त्याला अंडरग्राउंड होउन औरंगाबाद गाठायचं होतं, पण त्याच्या डोक्यात वेगळेच विचार होते. तो तामलवाडीला जीपमधुन उतरला. बाउंड्रीच्या हॉटेलात चहा भजी खाल्ली. मग तामलवाडीत गावात जाउन केगावला जाणारा एक टेम्पो पकडला. अर्ध्या तासानं केगावच्या पंचायतीसमोर उतरला आणि नाथाला फोन केला.
नाथानं त्याचा फोन पुर्ण चार्ज करुन घेतला होता, एक दोन वेळा त्या खड्ड्याजवळ बसलेल्या लोकांशी त्याचं बोलणं झालं होतं. तो आता फक्त हणमंताच्या फोनची वाट पाहात होता. केगाव बार्शी रोडवरुन चार जणांची बार्शी मार्गे पुढं उस्मानाबाद - लातुर -नांदेड - हैदराबाद अशी निघुन जाण्याची तयारी करुन ठेवलेली होती. हणमंताचा फोन आला तसा नाथा सावध झाला. फोन उचलला आणि दोन चार शब्द बोलल्यानंतर नाथानं कचकचुन शिव्या दिल्या. ठरलेल्या प्लॅननुसार न जाता हणमंता इथं का आला याचा त्याला राग आला होता. पण आता शेवटच्या क्षणी काही करणं शक्य नव्हतं. त्यानं हणमंताला पुन्हा तामलवाडीला जाउन थांबायला सांगितलं.
हणमंता हो म्हणाला खरं पण कुठंही न जाता तो तिथंच थांबला अर्थात हे नाथाला न कळु देता. नाथाकडं आता जास्त वेळ नव्हता, तो तालमीतल्या मारुतीच्या पाया पडला, मुर्तीवरचा थोडासा शेंदुर आणि समोरचा अरगजा एका पुडीत घेतला, आपली पिशवी पुन्हा एकदा तपासली. सोलापुरहुन घेतलेलं दुसरं सिमकार्ड नीट पाकिटात ठेवलं अन तो निघाला. त्या खड्ड्याकडं. तो निघाल्यावर तालमीतल्या एकानं त्या खड्ड्याजवळच्या खोपटात फोन केला, ते दोघंही निघायच्या तयारी करु लागले. तालमीतुन नाथा बाहेर पडल्या पडल्या तालमीच्या पुढच्या बाजुला उभी असलेली एक ४०७ टेम्पो निघाली. मागं भाज्यांची पोती भरलेली होती. नाथाला चालत खड्ड्यापर्यंत जायला १५-२० मिनिटं लागली असती, तेवढ्या वेळात खोपटातले तिघं जण तिथं येउन वेगवेगळ्या बाजुनं आत उतरत होते. त्या अर्धवट खोदलेल्या खाणीच्या एका कोप-यातच मुश्ताक पडुन होता.
संध्याकाळचे साडेपाच झालेले, जाधव ऑफिसमधलं सगळं आटोपुन घरी निघायची तयारी करत होते, तेंव्हाच त्यांना सिव्हिलमधुन फोन आला आणि त्यांना जी नको होती तीच बातमी त्यांना ऐकावी लागली. त्यांनी फोन ठेवला आणि सिव्हिलला फोन करुन ह्या बातमीची खात्री करुन घेतली. त्यांचं जिगसॉ पुर्ण फिसकटलं होतं, आनंद त्याला झालेल्या आणि दोन दिवसात चिघळलेल्या जखमांसमोर टिकाव धरु शकला नव्हता. जाधव सिव्हिलला पोहोचेपर्यंत आनंदच्या बायकोनं आकाशपाताळ एक केलं होतं. तिथं पत्रकार जमले होते, लोकल चॅनलवाले आले होते, आनंदची बायको त्यांच्यासमोर नुसता आक्रोशच करत नव्हती तर माननीयांचं नाव उघड उघड घेत होती. त्यामुळं जमा झालेल्या पब्लिकला आणि पत्रकारांना आयताच विषय मिळाला होता. आनंदची बॉडी अजुन वॉर्डातुन पोस्ट मार्टेमसाठी गेली नव्हती. बाहेर जमलेली गर्दी बघुन डॉक्टरांनी पोलिस फोर्स मागवला होता. त्या गर्दीतल्या एकानं मंडळाच्या कार्यालयात फोन केला.
नाथानं मोबाईल स्विच ऑफ केला मग तो आणि बाकीचे तिघे त्या खड्ड्यात उतरले, दुपारपासुन खड्ड्याकडं कुणी येणार नाही याची काळजी घेतली गेली होती. चौघं जण आत उतरले तेंव्हाही मुश्ताक पुर्णपणे बेशुद्ध पडुन होता. कुणीच काही बोललं नाही, बोलण्याची गरज नव्ह्तीच. पुढच्या पाच मिनिटात एक धडाप असा आवाज झाला जे काम करायला आले ते काम झालं. नाथानं बरोबरच्या अरगाजाच्या पुडीतला अरगजा सगळ्यांना लावला. पिशवीतले जुने कपडे काढुन एकाच्या हातात दिले, 'कपडे बदल रे या **घाल्याचे,जुनी कापडं अन बाकीचं सगळं बरोबर घ्या, वाटेत जाळुन टाकायचं सगळं, आणि तु बे पाणी आणलंयस ना, हात पाय लांब जाउन धु आणि अबे तो दगड उचल धु तो पण, जुन्या कपड्यानं कोरडा कर अन त्या दुस-या टोकाला नेउन टाक तिकडं, इथली माती सगळी खालीवर करा, ते पलीकडं शेण पडलंय ते आणुन पसरा बाजुला इथं, लवकर मुंग्या लागतील,' दोघांनी कपडे बदलायला घेतले,सगळे शांततेत चाललं होतं, कपडे घालुन होतानाच एकानं नाथाला विचारलं ' पैलवान, याचं काय करायचं धरम समजंल ना ?'मग सगळे जण एकमेकांकडं पहायला लागले, याकडं आधी कुणाचा लक्ष गेलं नव्हतं किंवा याचा कुणी विचार केला नव्हता. पाच मिनिटं सगळेच सुन्न होते, ' तोड ति**ला अन आटपा दना दना, तिच्यायला मंडपात न्यायला सजवताय का *************, ' सुड घेतला गेला तरी नाथाचा राग कमी होत नव्हता, त्याच्या शिव्या कमी होत नव्हत्या.
मंडळाच्या कार्यालयात, माननीयांच्या मोबाईलवर, जाधवांच्या टेबलवर आणि अप्पांकडे फोन वाजले ते एक दोन मिनिटांच्या अंतरानंच. यापैकी जाधव निराश झाले, माननीय जवळपास उद्धवस्त झाले, मंडळाच्या कार्यालयात टेन्शन पसरलं, गल्लीतल्या अजुन काही पोरांना आहात तसे आहात तिथुन बाहेर पडायच्या सुचनांबरोबर शंभरच्या नोटांची बंडलं वाटली गेली. बोळाच्या दोन्ही बाजुला असलेल्या पानटपरींवरुन नाथाला फोन लावायचा प्रयत्न सुरु झाला,तो स्वीच ऑफ लागत होता. आता यातच अप्पांच्या घरच्या फोनची पण भर पडली, त्यांच्या घरी फोन त्यांच्या सुनेनं घेतला होता तिनं अप्पांना निरोप दिल्यापासुन ते अस्वस्थ झाले होते. अप्पांना आनंद एवढ्या लवकर हार मानेल असं वाटलं नव्हतं, तालमीतला नव्हता तरी खात्या पित्या घरचा होता. आणि आता नाथाला निरोप देता येत नव्हता, त्याचा फोन स्विअऑफ होता याचा अर्थ तो काम करत होता.
केगांव रस्त्यावर खड्ड्यापासुन पाचशे मिटर वर एक ४०७ टेम्पो भाजी भरुन उभा राहिला होता, त्यात मागच्या बाजुनं कट्टाकट्टी भाजीची पोती भरलेली होती तरी, आत फार काही नव्हतं. त्याच्या ड्रायव्हरला नाथा खड्ड्यातुन वर येताना दिसला तसा तो टेम्पो चालु करुन तो तयारीत राहिला. मग नाथाच्या मागंच अजुन तिघं जण आले, मग त्यानं लगेच गाडी पुढं घेतली, सगळेजण पळत गाडीकडं आले, मागची एक दोन पोती काढुन आत गेलं आणि पुन्हा नाथानं शिव्या द्यायला सुरुवात केली अगदी नॉनस्टॉप, आत हणमंता होता. त्याचा प्लॅन फेल झाला होता, यावेळी हणमंता किमान माजलगांवच्या पुढं जायला हवा होता, पुढच्या सगळ्या व्यवस्था चार लोकांसाठीच केलेल्या होत्या. आता ऐनवेळी काहीतरी करणं भाग होतं, त्यानं गाडी सुरु होताच त्याचा फोन न सुरु करता हणमंताचा फोन घेतला, त्यातलं सिमकार्ड बदललं आणि पहिला फून अप्पांना केला. फोन एंगेज होता अन नाथाला हे समजायला काहीच मार्ग नव्हता की तो एंगेज त्याच्यामुळंच आहे.
अप्पा फोन लागत नसल्यानं चिडले होते, नाथावर आणि तो समोर नव्हता म्हणुन फोनवर, रागानं त्यांनी फोन आपटला अन त्याचवेळी रिंग वाजली, चिडुनच त्यांनी फोन उचलला' अप्पा, मी नाथा बोलतोय' अप्पा तसे शांत पण आता प्रचंड भडकले, आपण घरात आहोत अन समोर सुना आणि नाती आहेत हे विसरुन त्यांनी नाथाला शिव्या द्यायला सुरु केलं, हा भार ओसरल्यावर त्यांनी नाथाला बातमी सांगितली, नाथानं फोन बंद ठेवल्यानं अप्पांचा शब्द खाली पडला होता, चुक करणाराच नाही तर चुक करायला लावणारा पण गेला होता. आता ही चुक ना नाथाची होती ना अप्पांची, पण एका चुकीची शिक्षा होता होता अजुन एक चुक होउन गेली होती. अप्पांनी अजुन एक दोन गोष्टी विचारल्या, एक नंबर लिहुन घेतला अन् ती चिठ्ठी घेउन कपडे करुन अप्पा बाहेर निघाले, इथुन पुढचं बोलणं घरातल्या फोनवरुन करणं योग्य नव्हतं.

Print Page

Wednesday, November 30, 2011

चपला आणि सत्कार - भाग ११


प्रशा दुपारी जेवण घेउन आला तेंव्हा नाथा अजुन पण बनियन आणि अंडरवेअर घालुनच खोपटाच्या बाहेर गुणगुणत बसला होता.हणमंता खोपटाच्या आत अर्धा बाहेर अर्धा झोपला होता. प्रशानं आधी आत वाकुन आनंद जिवंत आहे का ते पाहिलं, तो जिवंत होता, त्याच्यापेक्षा प्रशालाच बरं वाटलं. त्याची शंका नाथानं ओळखली. ' प्रशाभौ, घाबरु नका, मारत नाय त्याला ते लंगडं आता तसंच राहिल जिंदगीभर तुम्हाला सांगतो फक्त एक पाच वाजेपर्यंत थांबा, त्याला घेउन जातो इथुन.' या बोलण्यानं प्रशाला थोडं बरं वाटलं पण आनंद अजुनच अस्वस्थ झाला. नाथाचं काम झालंय म्हणजे नक्की काय, बांगरे तर गायब होताच तो याला सापडला का काय, त्यानं मुश्ताकचा पत्ता दिला का काय, उगा त्या बेवड्याला क्लबातच ठेवायला हवं होतं, दुसरा कुणीतरी पाठवायला हवा होता मुश्ताकबरोबर, त्या रात्री नाथाला बोलवायला उगाच धाडस करुन त्याच्या एरियात जायला नको होतं, अशा ब-याच गोष्टी, पण या आधी त्याला एक गोष्ट आठवली ती म्हणाजे, मिरवणुकीच्या रात्री मुश्ताकबरोबर त्यानं स्वताच जायला हवं होतं, माणुस ओळखण्यात झालेली चुक त्याला महाग पडणार आहे याची थोडी कल्पना आलेलीच होती पण ती वेळ चार पाच दिवसातच येईल असं ही वाटलं नव्हतं, कारण विसर्जनाच्या दुस-याच दिवशी तालमीतली सगळी मोठी लोकं अंडरग्राउंड झालेली होती, नाथा सारख्या पैलवानाकडनं अशा हालचालीची अपेक्षा त्याला नव्हती.
माननीयांच्या घरच्या केबिनमध्ये त्यांना घरचाच आहेर मिळाला होता, रागारागात ते उठुन संपर्क कार्यालयात आले. तिथं बाकी बरीच माणसं त्यांची वाट पहात होती. आपल्या चेंबरमध्ये बसुन, म्हणजे कोंडुनच घेतलं होतं स्वताला, त्यांना काही सुचेना. मग तिथुन निघुन ते सरळ हॉटेलवर गेले. तिथं बसुन आपल्या खास माणसांबरोबर त्यांनी काही डाय-या काढुन फोन लावायला सुरुवात केली. पुर्वी हे सोपं होतं, दररोजचा धंदा होता, गावातल्या अन बाहेरच्या सगळ्यांशी दररोजचे संबंध होते पण ही जनसेवेची नाटकं सुरु केल्यापासुन सगळं अवघड होतं. समोरची लोकं मदत करायला सुद्धा घाबरत होती. शेवटी त्यांनी आपले खास राखुन ठेवलेले उपाय वापरायचं ठरवलं. हॉटेलच्या फोनवरुन त्यांनी थेट तालमीचे जुने पैलवान आणि कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष अप्पा महाजनांच्या घरी फोन केला. अप्पा पैलवान घरी नव्हते. अप्पा जरी तालमीशी संबंधित असले तरी अतिशय सज्जन माणुस, तालिम एके तालिम आणि पैलवानकी नि कुस्ती एवढंच त्यांचं क्षेत्र होतं. उमेदवारीच्या काळात माननीय पण त्यांच्या हाताखाली ताबडले गेले होते. त्यांना शरण जाण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. मगाशी मिळालेल्या निरोपानुसार माननीयांनी पुन्हा फोन लावला. अप्पा घरीच होते, त्यांनी भेटीची वेळ दिली, दुपारी चार वाजता. आता सकाळाचे दहा वाजलेले, इतका वेळ थांबणं अवघड होतं पण दुसरा उपाय नव्हता. खालुन दारु आणि चकण्याची ऑर्डर देउन माननीय तिथंच पडुन अजुन काही करता येईल का याचा विचार करायला लागले.
सकाळपासुन सतत चार तास प्रवास करुन जीप थांबली, अन मुश्ताकला ओढुन खाली उतरवलं गेलं. त्याची शुद्ध हरपलेलीच होती. त्याला धरलेल्यांनी सोडलं तसा तो धाडकन जमिनिवर कोसळला. त्याला पुन्हा उचललं तसं त्याला ओरडावसं वाटलं ,त्याचे हात पाय सोडले नाहीत फक्त डोक्यावरचं पोतं थोडं मोकळं केलं डोळे उघडायला जमल्यावर त्याला त्या पोत्यातुन येणा-या उजेडावरुन त्याला समजलं की त्याला थेट उघड्या आकाशाखाली टाकलेलं होतं. त्यानं एका अंगावर वळायचा प्रयत्न केला, दोन तीन वेळा प्रयत्न केल्यावर तो पालथा झाला. त्या पोत्यातुन अ‍ॅडजेस्ट करुन पाहिल्यावर त्याला कळालं की तो एका मातीतच पडुन आहे, बाजुला सगळीकडं दगडंच . त्याला जेवढं दिसत होतं तेवढ्यात काहीही जिवंत दिसत नव्हतं, ना झाडं ना माणसं. अजुन थोडी धडपड करुन तो उठुन नमाजाला बसतात तसं बसला, आता त्याला स्पष्ट दिसत होतं सगळीकडं. अजुनही जिवंत असं काहीच दिसत नव्हतं. त्यानं उभं राहायचा प्रयत्न केला पण दोन्ही पाय पोत्यात घालुन बांधलेले असल्यानं तो पुन्हा एकदा जोरात खाली पडला आणि यावेळी तो थेट तोंडावरच पडला, नाकाला आणि कपाळाला मोठी जखम झाली. कपाळावरुन खाली येणारा रक्ताचा मोठा ओघळ डोळ्यावरुन तोंडात आला, तोंड बांधलं असल्यानं ना त्याला ओरडणं शक्य होतं ना तो ते रक्त तोंडातुन थुंकु शकत नव्हता. जसा दिवस मावळायला लागला त्याच्या कपाळावरच्या जखमेतुन रक्त यायचं थांबलं. यावेळेपर्यंत त्याला ग्लानी आलेली होती, तहान लागलेली होती. कमरेखालचा भाग त्याच्याच मुतानं दुपारी ओला झाला होता आता तो पण वाळला होता.
माननीय चार वाजायची वाट पहात होते, पण त्यांना राहवलं नाही त्यांनी स्वताच स्कॉर्पिओ काढली आणि एका खास माणसाबरोबर अप्पांच्या घरी आले, त्यांच्या अपार्ट्मेंटच्या खाली ते आल्याचं वर अप्पांना कळालंच होतं. त्यांची बसायची जागा हॉलच्या खिडकीतच होती. चार वाजल्याशिवाय अप्पा आत घेणार नाहीत ह्याची त्याला पुर्ण कल्पना होती. वाट पाहणं एवढंच माननीयांच्या हातात होतं. बरोबर चार वाजता ते प्लॅटच्या दरवाज्यासमोर होते, आणि बेल न वाजवताच दरवाजा उघडला गेला. अप्पा समोरच बसलेले होते, पायातले बुट काढुन माननीय आत जाउन बसले. अप्पांनी थेट मुद्द्याला हात घातला. ' कोणी आणली बाहेरची माणसं गावात ? माननीय मान खाली घालुन बसले होते. ' कुणाला उडवायचं होतं अन कोण चुकलं ? माननीय गप्पच. ' आता ह्या चुकीची भरपाई कोण करणार?' ' अप्पासाहेब, पण मी काय म्हणतो,,' माननीयांचं वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच अप्पांचा पुढचा प्रश्न आला, ' आता एकच सांग, कुणाकडुन भरपाई घ्यायची, चुक करणा-याकडुन की चुक करायला लावणा-याकडुन ?' हे ऐकुन माननीय उडालेच. परिस्थिती फार पुढं गेलेली आहे हे कळुन चुकले. ' तुम्हाला काय बरोबर वाटतंय ते करा, आम्ही लेकरं काय तुमच्या बोलण्याच्या बाहेर जाणार का ?' अप्पांनी माननीयांना जवळ बोलावलं, दोन मिनिटं अगदी हळु आवाजात बोलणं झालं. मत अप्पांनी त्यांच्या मोठ्या सुनेला हाक मारली ' वनिताबाई, ओ वनिताबाई, जरा अरगज्याची वाटी आणि अक्षता आणा देवासमोरच्या.' वनिताबाई दोन्ही घेउन आल्यावर, अप्पांनी त्यांच्या वहीतुन एक मंडळाचं कॅलेंडर काढलं, माननीयांच्या कपाळाला अरगजा लावला, कॅलँडरवरच्या गणपतीला पण अरगजा लावला, थोड्या अक्षता त्यावर ठेवल्या. माननीयांच्या हातात कॅलेंडर ठेवलं. वनिताबाईंनी वाटीतली साखर दोघांच्या हातावर ठेवली. ' या आता तुम्ही, काय आणि कसं करायचं ते आम्ही बघुन घेतो. ' माननीय उठले, कॅलेंडरवरच्या अक्षता हातात घेतल्या, अप्पांच्या पायाला हात लावला ' अप्पासाहेब सगळं तुमच्यावर सोडलंय आता, सावरुन घ्या' यावर अप्पा हसुन बोलले ' हे गणपती महाराज आणि ही आमच्या घरातली लक्ष्मी, यांच्यासमोर सांगितलंय, या आता.' माननीय अपार्ट्मेंट मधुन बाहेर पडले ते फोन लावतच. त्याचवेळी वर अप्पांनी समोरच्या टीपॉयवरचा फोन ओढुन घेतला अन.....
बरोबर साडेचार वाजता नाथाचा फोन वाजला, तो पुन्हा खोपटापासुन उठला अन लांब येउन फोन घेताना त्यानं एक हात छातीला लावुन नमस्कार केला. पुढं दोनच मिनिटं तो बोलत होता. तो फोन बंद केला तेवढ्यात दुसरा फोन आला. दोन्ही फोनवरुन त्याचा चेहरा एकदम आनंदी झाला. खोपटाकडं परत येउन त्यानं हणमंताला विचारलं ' या भडव्याला नेउन होटगीला टाकायचं कारखान्याच्या मागं, किती वेळ लागेल तुला? ' इथुन निघायचा जेवढा हणमंताला आनंद झाला त्यापेक्षा जास्त प्रशाला जास्त बरं वाटलं. आनंदला इथुन जिवंत बाहेर नेणार यामुळं त्याला फार बरं वाटलं. हणमंतानं लगेच कपडे घालायला घेतले, नाथा त्याला म्हणाला, अबे कपडे लई घाण होतील ह्या भडव्याच्या घाणीमुळं, आधी ह्याला आत टाकु अन मग कपडे करु. आधी खोपटातला थोडा कडबा गाडीत अंथरुन दोघांनी आनंद्ची जखम पुन्हा पोत्यात बांधली, त्याचे तोंड आणि डोळे पुन्हा बांधले, तसा ही आनंद बेशुद्ध असल्यासारखाच होता, त्याला आपल्याला हलवलं जातंय एवढंच जाणवत होतं. मग दोघांनी त्याला उचलुन गाडीत आणुन टाकलं. मागच्या रांजणातुन पाणी घेउन हात पाय धुतले, नाथानं प्रशाला पाच हजार रुपये दिले आणि ते दोघं तिथुन निघाले.
मुश्ताकनं रात्र व्हायच्या आत इथुन निघायचा शेवटचा प्रयत्न करायचा ठरवलं. पाय दोरीनं बांधुन पोत्यात घातलेले होते ते सोडवायचा प्रयत्न करुन दमल्यावर, त्यानं आपले हात सोडवायचा प्रयत्न केला ते सुद्धा जमेना, मग मात्र त्याला रडणं आवरेना. तोंडातल्या बोळ्यामुळं त्याला ओरडता सुद्धा येत नव्हतं. गेल्या आठ दिवसातल्या सगळ्या घटना त्याला आठवायला लागल्या. त्याच्या डोळ्यासमोर त्या पोराचा, त्याचं नाव सुद्धा त्याला माहित नव्हतं चेहरा येत होता, त्यानंतर मैन्नुदिनचा चेहरा, मग त्याच्या मोठ्या मुलीचा मग आनंद आठवायला लागला. पण हे देखील त्याला जास्त वेळ जमलं नाही. शरीर साथ देत नव्हतं, पुर्ण अंधार झाल्यावर त्यानं डोळे मिटुन घेतले, ग्लानीतर आलेलीच होती. केगाव-बार्शी रोडवरचा तो खड्डा जसा पुर्णपणे अंधारात बुडुन गेला तेंव्हा तिथुनच हाकेच्या अंतरावर असणा-या एका घरात पण अंधार भरला होता, फक्त त्यात दोन जण एक पिशवी घेउन बसले होते, कुणाच्या तरी येण्याची वाट बघत, कुणाच्या तरी जाण्यासाठी.
हणमंतानं गाडी नळदुर्गच्या पुढुन अक्कलकोटकडं घेतली अन मागच्या रोडनं ते रात्री दहाच्या सुमारास होटगी स्टेशनच्या बाजुनं साखर कारखान्याच्या बाजुला पोहोचले. उस गाळपाच्या सिझनला या भागात सगळे ट्रक, बैलगाड्या असतात. तिथं रस्ता असा नव्हताच, सगळ्या मैदानात अजुनही उसाचा वाळलेला पाचोळा पडलेला होता, त्यावरुन गाडी कारखान्याच्या भिंतीजवळ नेउन हणमंतानं थांबवली. लाईट बंद केले. थोडावेळ तिथंच थांबले, कुणी येत जात नाही याचा अंदाज घेतला. कारखान्यच्या आतल्या बाजुला काहीतरी कामं चालु होती. नाथा गाडीतुन उतरला, त्यानं आनंदला सोडण्यासाठी योग्य जागा हुडकायला सुरु केली. सकाळहोईपर्यंत तो जिवंत राहणं भाग होतं, मग कुणीतरी पोलिसांना बोलावलं असतं, त्याला दवाखान्यात नेलं असतं, तो वाचला असता. ज्यानं मदनला मारलं तो सापडल्यानं आता नाथाला आनंद्ला मारायचं नव्हतं. बांगरे फारच कच्चा निघाल्यानं, औरंगाबादच्या उस्मानभाईला दिलेले पैसे वाया गेले होते. पण काम तर झालं होतं, पण आता अडचण एकच होती. होटगीवरुन आता बार्शी रोडला जायचं म्हणजे सिटि क्रॉस करावी लागणार होती. पोलिसांनी सगळीकडं बंदोबस्त लावलेला होता, त्यामुळं त्याला पुन्हा अक्कलकोटमार्गेच बाहेर पडावं लागणार होतं. इथं जास्त वेळ घालवला तर कुणाला तरी शंका आली असती. तो परत गाडीत आला, त्यानं गाडी पुढं घ्यायला लावली, आनंदला दोघांनी बाहेर काढलं. त्याच्या पायाचं पोतं काढलं, बांधलेले हात पाय सोडले, तोंडावर बांधलेला पंचा काढला, त्याला भिंतीला टेकवुन बसवलं, तो अर्धवट जागा झाला होता, त्याच्या तोंडात थोडं पाणी टाकुन नाथा अन हणमंता तिथुन निघाले. अक्कलकोटमार्गे बार्शी म्हणजे जवळजवळ तुळजापुर पर्यंत जावं लागणार होतं, हणमंताचा प्रोब्लेम होता गाडीत तेवढं पेट्रोल नव्हतं. आता रात्री हायवेला पेट्रोल मिळणं अवघड होतं,

Print Page

Thursday, November 24, 2011

चपला आणि सत्कार - भाग १०


--बांगरेला झोळा देउन मुश्ताक जरा निवांत झाला तरी त्याला तसं बसणं थोडं अवघडच होत होतं. दहा मिनिटं बोळाबोळातुन फिरुन ति मौला दर्ग्याजवळ पोहोचले. गाडी बाहेर एका बाजुला उभी झाल्यावर मुश्ताकच्या लक्षात आलं की एक जीप हॉटेलपासुन त्याच्या गाडीच्या मागं येत होती, बाहेर आल्यावर त्यानं जीपचा नंबर पाहिला. पुणे पासिंगची ती जीप होती आणि त्यातुन दोन तीन बुरखा घातलेल्या बायका खाली उतरल्या. मुश्ताकनं ड्रायव्हर आणि बांगरेला दर्ग्यात यायला सांगितलं, दोघांनीही आपण आंघोळ केली नसल्यानं येत नाही असं सांगुन ते टाळलं. मुश्ताक एकटाच आत गेला.
या दर्ग्याच्या मुख्य इमारतीत बायकांना प्रवेश नाही, त्यांच्यासाठी एक वेगळा चबुतरा बाहेर बांधलेला आहे. जीपमधुन आलेल्या तिघीजणी त्या चबुत-यावर बसल्या. मुश्ताकनं आत जाउन प्रार्थना केली. तिथं बसलेल्या मौलवीला अभिवादन केलं,त्या मौलवीनं हातातला मोराच्या पिसाचा पंखा मुश्ताकच्या डोक्यावर झाडत जोरजोरात काहीतरी पुकारा केला. सकाळपासुनच शंका धरुन बसलेल्या मुश्ताकच्या मनात अजुनच घोळ सुरु झाला. तरी दर्ग्यातल्या धुपाच्या वासानं अन त्या मौलवीच्या पाठीवर हात फिरवण्यानं त्याला थोडं बरं वाटलं. तिथंच एका भिंतीला टेकुन तो बसला, डोळे मिटल्यावर त्याच्या नजरेसमोर मैन्नुदिन येत होता. बाहेर पडल्यावर आधी घरी फोन करायचं ठरवुन तो बाहेर आला. सकाळपासुन काही खाल्लेलं नव्हतं. तो बाहेर निघाला, तेंव्हा ती जीप निघुन गेलेली होती. त्याची अजुन एक शंका निस्तरली गेली.
तो जरा शांत होउन इंडिका कडं निघाला, गाडीचा ड्रायव्हर सीट मागं पुढं करायचा प्रयत्न करत होता, सीट बांगरे तिथंच उभा होता. त्यानं मुश्ताकला सीट थोडंसं मागं होत असल्याचं सांगितलं. मुश्ताक पुन्हा गाडीत बसला, आता थोडा जास्त आराम होता, त्यानं मागच्या सीटवर त्याचा झोळा असल्याची खात्री केली. अन बांगरेला गाडी एखाद्या जुन्या हॉटेलकडं घ्यायला सांगितली. बांगरेनं कन्नडमध्ये ते ड्रायव्हरला सांगितलं, तसा तो एकदम खुशीत आला आणि त्यानं पुन्हा एकदा गाडी विजापुरच्या बोळाबोळातुन फिरवायला सुरुवात केली.
नाथाला फोन आला होता, बांगरे बरोबर असलेल्या ड्रायव्हरचा. त्यानं फोन करेपर्यंत तरी सगळं व्यवस्थित असल्याचं समजल्यावर नाथा जरा निश्चिंत झाला. त्यानं पुढच्या सुचना देउन फोन ठेवला. तो मुश्ताक एकदा पुर्ण ताब्यात आला की मगच आनंदचं फायनल करायचं त्यानं ठरवलं,त्यानं उस्मानमियांला फोन लावला, त्यांना पैसे मिळाले होते आणि त्यांनी विजापुरच्या त्यांच्या माणसाला पुढच्या सुचना दिलेल्या होत्या. त्यांनी मागितल्यानुसार नाथानं गाडीचा नंबर त्यांना दिला आणि पुन्हा खोपटात आला. प्रशाला त्यानं पुन्हा चहा आणायला सांगितला. प्रशानं पुन्हा नाथाला वॉर्निंग दिली, जर आनंद मेला तर तो या दोघांचं न ऐकता त्याची बॉडी नेउन हायवेला टाकणार होता. नाथानं त्याला दुपारपर्यंत वाट पहायला सांगितलं. प्रशा चहा आणायला गेला, नाथानं पुन्हा एकदा तोंड धुतलं, हणमंता अजुन पण खोपटाच्या बाहेरच बसुन होता. प्रशा चहा घेउन येईपर्यंत नाथानं तिथंच बाहेर पाच पंचवीस जोर मारले,
आज पाउस येईल असं वाटत होतं, मोकळा माळ असुन सुद्धा झाडाचं एक पान हलण्याएवढा सुद्धा वारा नव्हता. हणमंताकडं वळुन नाथा म्हणाला' मंता, चल दोन दोन हात करु, ये इकडं' हणामंता काय जागचा हलला नाय. नाथा जोरात हसला ' अबे हणम्या, मागच्या टायमाला तुला जेलमध्ये ते काय लिविंग का काय शिकवलं त्याचा लैच इपेक्ट झालाय वाटं तुझ्यावर, उठ लेका तिच्यायला, एक तुटलेला पाय बघुन असं झालंय तुला, दोन वर्षाखाली त्या सिद्राम पल्लीला तोडला होता तवा पाहायला पाहिजे होता, अबे जागेवरनं बॉडी हालवायलाच दोन पोती लागली होती, पोस्ट्माट्रेम करायची काय गरजच पडली नाय, निसती शिवाशिवी केली त्याचंच बिल जास्त झालं होतं म्हायतंय का' हणमंता जरा जागचा हलला अन पुढं येत नाथाला म्हणला ' हां पैलवान लै भादुर आहात माहितंय, तिच्यायला त्यादिवशी तालमीत हात वाकडा झाला तर काय ओरडत होता सुरात, आख्खी गल्ली गोळा झाली होती टाळ्या वाजवायला' . प्रशा चहा घेउन आला, तिघांनी बसुन चहा घेतला. दुपारी जेवणाला चिकन घेउन येण्यासाठी नाथानं प्रशाला दोनशे रुपये दिले. प्रशा खुश होउन गेला अन नाथा पुन्हा जोर मारायला लागला.
जाधव साहेब ऑफिसला आले, सकाळी घडलेली हकीकत त्यांनी कमिशनर साहेबांना सांगितली. कमिशनर साहेबांनी त्यांना जेल रोडच्या बनसोडेला या केसमध्ये घ्यायला सांगितले. बनसोडे कमिशनरच्या गावचा, जेंव्हा पासुन इथं आला तेंव्हापासुन प्रत्येक महत्वाच्या केसमध्ये तो असायचाच. जाधवना बरं वाटत होतं आणि रागपण येत होता. पण पुढच्या आठवड्यात त्यांना चार दिवस नागपुरला जायचं होतं, त्यावेळी कुणी तरी हे सगळं लफडं गळ्यात घालायला त्यांना हवंच होतं. पुन्हा त्यांनी कालचा कागद काढुन सगळी नावं पहिल्यापासुन जुळवायला सुरुवात केली, अशी केस एक दोन वर्षे आधी आली असती तर रिटायरमेंट नंतर नोकरी करायची वेळच आली नसती असा विचार त्यांच्या मनात आला. थोडा वेळ स्वस्थ बसुन मोदी पोलिस स्टेशनला फोन लावला. कालच्या गाडीचं पुढं काय झालं ते विचारलं, तिचा मालक आनंद चव्हाण गायब असल्याचं कळाल्यावर त्यांचा या केसमधला इंटरेस्ट जास्तच वाढला. मग त्यांनी जेल रोडला बनसोडेला फोन लावला, दोघांनी दुपारी जोडबसवण्णा चौकात कल्पना हॉटेलात जेवायला भेटायचं ठरवलं.मग घरी जाउन फोन करुन ड्बा पाठवु नका असं सांगितलं,आणि चहावाल्या पोराला चार प्लेट गरमगरम 'अण्णा भजी' आणायला सांगुन आठवड्याभरातली पेंडिंग कामं करायला घेतली.
ड्रायव्हरनं ब-याच बोळाबोळातुन गाडी फिरवुन शेवटी एका घरगुती हॉटेलसमोर गाडी थांबवली.एका जुन्या वाड्याच्या बाहेरच्या भिंतीत केलेलं हॉटेल होतं ते. मुश्ताकला तिथल्या खाण्यापिण्याच्या वासानंच योग्य ठिकाणी आल्याची खात्री झाली. बांगरेला हा भाग नविन होता. तिघं बाहेर येउन एका बाकड्याच्या बाजुला बसले, मुश्ताकनं हॉटेलवाल्याला सलाम केला, ऑर्डर दिली. एक तास भर तिथं बसुन ते पुन्हा निघाले.निघताना आधी मुश्ताकनं शेजारच्या एसटिडी मधुन घरी फोन केला. लगेच ते तिथुन निघाले, मुश्ताकला कधी एकदा घरी जातो असं झालं होतं. गाडी गेल्या गेल्या एस्टिडीवाल्यानं एक फोन करुन दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे गाडी निघाल्याचं आणि दुसरं तो मुंबईतला नंबर जिथं मुश्ताकनं फोन केला होता.
जवळ्पास अकरा वाजले असल्यानं ड्रायव्हरला एसि लावायला सांगुन मुश्ताक भरल्या पोटी जरा सुस्त झाला होता, खरं असं करणं त्याच्या जीवावर आलं होतं पण झोप टाळता पण येत नव्हती. गाडी अगदी विजापुरच्या बाहेरच आली असेल तेवढ्यात मागुन येणा-या एका जीपनं तिला कट मारला, खाडकन आवाज झाला. मुश्ताकचा झोप उडाली. ती जीप त्यांच्या गाडीच्या उजव्या बाजुला उभी होती डाव्या बाजुला मोठा खड्डा होता त्यामुळं मुश्ताकला उतरता येत नव्हतं. ड्रायव्हर आणि बांगरे उतरुन मागच्या जीपवाल्याशी भांडत होते. तो गाडीतुनच आरडाओरडा करायला लागला, त्याच्या खिशात एक छोटं ह्त्यार होतं पण बाहेर पडल्याशिवाय त्याचा काही उपयोग नव्हता. मागं वळुन पाहिलं तर त्याचा झोळा दिसत नव्हता. वेडावाकडा होत तो मागच्या सीटवर आला आणि उजव्याबाजुनं बाहेर पडला. जीपमध्ये जवळपास सात आठ लोक होते आणि दोन तीन बायका. सगळेच उतरुन तावातावानं भांडत होते आणि एकानं बांगरेला फाडकन कानाखाली लावुन दिल्यावर मुश्ताकला राहवलं नाही, आणि तो सुद्धा त्या मारामारीत पडला, तिथं तो सोडुन बाकी सगळ्यांना हेच हवं होतं.
प्रदेशाध्याक्ष रुमच्या बाहेर आल्या आल्या माननीय त्यांच्या समोर गेले, नमस्कार केला. अध्यक्ष त्यांना आत घेउन गेले. पंधरा मिनिटांनी अध्यक्ष एकटेच बाहेर आले अन गाडीत बसुन निघुन गेले. आत एसिमध्ये कोचवर बसलेल्या माननीयांना चांगलाच घाम फुटला होता. पण बाहेर येताना त्यांनी आपला चेहरा शक्य तेवढा शांत ठेवायचा प्रयत्न केला होता तरी ब-याच जणांना आत काय झालं असावं याची कल्पना आली. माननीय तडक बंगल्यावर गेले, दारात पाय ठेवल्यापासुन शिव्या सुरु झाल्या होत्या, आणि आत गेल्यावर समोरच हॉलमध्ये आनंदची बायको दोन्ही मुलांबरोबर बसली होती. माननीयांचं डोकं अजुनच भडकलं, ' काय झालं वहिनी, अजुन आले नाही का आनंदभाउ मुंबईवरुन ' बाकी बसलेल्यांसमोर शक्य तेवढ्या शांतपणे बोलुन ते आपल्या केबिन मध्ये गेले. त्यामागोमाग आनंदची बायको तिथुनच ओरडत, दोन्ही मुलांना घेउन केबिन मध्ये गेली. ' तुमीच पाठवलंय त्याला कुठंतरी, आता तुमीच हुडकुन आणा त्याना,' असं ओरडत तिनं केबिनचा दरवाजा उघडुन बाहेर येउन' ओ मोठ्या आई माझ्या नशीबाला वाचवा ओ, भाउनीच पाठवलंय माझ्या नव-याला कुठंतरी, दोन दिस झालं अजुन परत नाय आला' या बाहेरच्या भानगडी आता पार किचनपर्यंत जाउन पोहोचल्यानं माननीय अजुनच वैतागले. ते केबिन मधुन बाहेर येणार इतक्यात त्यांची आई आणि बायको दोघीजणी तिकडं येताना दिसल्या, नाईलाजानं त्यांना पुन्हा केबिन मध्ये परत जावं लागलं. आनंदच्या दोन्ही मुलांना बाहेर बसवुन त्यांनी आनंदच्या बायकोला आत बोलावलं. कधीतरी खरंच आनंद कुठं गेला होता हे त्यांना सांगणं भाग होतं, आणि सगळ्यात महत्वाचं आनंदची गाडी कुठं सापडली हे त्यांच्या आधी त्याच्या बायकोला कळालेलं होतं.
जीपला बसलेली धडक हा एका प्लॅनचा भाग होता हे मुश्ताकला क्ळेपर्यंत उशीर झाला होता, जेंव्हा त्याला हे कळालं त्यावेळी त्याच्या जवळ ना बांगरे नव्हता ना त्याचा झोळा ना त्याला हे कळत होतं तो कुठं जात आहे, त्याला फक्त एवढं कळत होतं की त्याचे हात,पाय आणि तोंड बांधलंय आणि त्याला एका गाडीत आहे. त्यानं हात पाय हलवायचा निष्फळ प्रयत्न करुन पाहिला. तोंडात काहीतरी कोंबलेलं होतं त्यामुळं त्याला ओरडताही येत नव्हतं. तोंडावर बांधलेल्या फडक्याच्या फाटलेल्या भागातुन त्याला फक्त तीन चार लोकांचे पाय दिसत होते, बिनचपलीचे.तो मान वळवुन बघता येईल तेवढं बघु लागला, त्याची ही हालचाल त्या जीपमध्ये बसलेल्या एकाच्या लक्षात आली आणि त्याचवेळी त्याच्या कमरेत एक फटका बसला, त्याला ओरडता पण येत नव्ह्तं. तोंडातला बोळा दातात दाबुन तो वेदना सहन करायचा प्रयत्न करु लागला.


Print Page

Sunday, November 20, 2011

चपला आणि सत्कार - भाग - ०९


दुस-या दिवशी सकाळ झाली तसं, दक्षिण कसब्याच्या जोशीवाड्यातुन चार जण दोन गाड्यांवर राख सावडायला निघाले, सगळेच बाहेरगावचे. तसा स्मशानभुमीचा रस्ता सरळच होता, कुणाला काही विचारायची गरज नव्हती. स्मशानभुमीत पोहोचले तर तिथं दोघंजण तिथंच थांबलेले होते, आत कट्ट्यावर चार जण बसलेले होते, मदनला बघुन सगळे जण उठुन त्याच्याकडे आले, तिथल्या ऑपरेटरनं चार अस्थी,थोडी राख काढुन ठेवलेलीच होती, काय अजुन ब-याच जणांना मुक्ती मिळालेली असावी. सगळ्यांच्या नावच्या वेगवेगळ्या पिशव्या करुन त्यानं बाजुला ठेवल्या होत्या.
तिथं थांबलेल्या त्या लोकांपैकी दोघांनी त्याच राखेतली थोडी राख बरोबरच्या पिशवीत काढुन घेतली अन लगेच निघाले. मदनला अन बरोबरच्यांना हा प्रकार जरा विचित्रच वाटला. न राहवुन मदननं त्यातल्या एकाला विचारलंच, ' ओ भाउ, हे कायय, तुमी काय करणार माज्या भावाची राख घेउन ? ' त्याच्या विचारण्यात राग पण होता अन उत्सुकता सुद्धा होती. ते सगळे बाहेर निघाले होते, त्यातले दोघेजण परत आले. ' तु मदनचा मोठा भाउ ना बे, फुकटची गेम केली त्याची त्या भड्व्यांनी आमच्या तालमीच्या माणसाची अन आमी गप बसु असं समजु नको,' पुढं गेलेल्या दोघांकडं हात दाखवुन म्हणाले, ते पाहिलंय का, असे अजुन तिघं जण हायत त्यांच्यासाठी पायजे राख' हा ही प्रकार मदनच्या लक्षात आला नाही. आपल्या भावाची राख अन यांचा संबंध त्याला कळाला नाही. पण अजुन काही विचारुन उगा गोंधळ नको असा विचार करुन त्यानं गप्प बसणं पसंत केलं.
नाथा अन हणमंताला जाग आली, तेंव्हा उजाडलं होतं, रात्री दोघंजण बराच वेळ बोलत बसले होते, दीड वाजता तर नाथानं फोन केला होता बीडला. जाग आल्या आल्या त्यानं पुन्हा तोच नंबर लावला आणि तसाच बनियन,अंडरवेअर वर बाहेर आला, चार पाच रिंग झाल्यावर फोन उचलला गेला अन पलीकडुन आवाज आला, ' पैलवान, आपला माणूस कवाधरनं उभाय पैसं घेउन कुणी दरवाजाच उघडंना घराचा, किती वक्त उभारणार असं कॅश घेउन चौकात, जरा तुमीपण लावा कॉल पार्टीला अन सांगा कॅश घ्यायला.' फोन कट झाला, अन नाथा निश्चिंत झाला. त्याला आता उत्साह आला होता. पुन्हा पानटपरीला फोन करुन त्यानं बांगरेची चौकशी केली, दररोज सातला उघडणारी पानटपरी आज पाचपासुन फक्त फोनसाठीच उघडी होती. बांगरे अर्ध्या तासात विजापुरला पोहोचणार होता, आणि त्याच्याकडुन त्या ट्रॅक्सच्या ड्रायव्हरचा फोन नंबर पण मिळाला होता. हणमंता सकाळची कामं आटोपुन आला, बाहेर नाथा फोन करत होता त्याच्याकडं हसुन बघत तो खोपटात गेला, अन एकच किंकाळी त्या माळरानावर घुमली. नाथा झटक्यात वळुन खोपटाकडं जायल लागला.
कमिशनर साहेबांनी रात्री जाधव गेल्यावर, सगळा मामला सेक्रेटरींना समजावला होता, आज सेक्रेटरी सकाळीच मंत्र्यांशी बोलुन निर्णय कळवणार होते. बंगल्याच्या बागेत राउंड मारता मारता कमिशनर परमिशन येणं आणि न येणं या दोन्ही शक्यता आणि त्याच्या परिणामांचा विचार करत होते, तसं ही फाईल अजुन कुणाला देउन आपले काही स्वार्थ या परमार्थात साधुन घेता येतील हा विचार पण पॅरलली चालु होता. सेक्रेटरी सकाळी दहावाजेपर्यंत फोन करणार होते. त्या आधी, कमिशनरांच्या डोळ्यासमोर दोन नावं होती. एक सोलापुरचे महापौर आणि दुसरे अक्कलकोटचे आमदार, या दोघांपैकी एकाकडं या फाईलची कॉपी देउन ठेवणं त्यांना सेफ वाटत होतं. पण सेक्रेटरींच्या फोन पर्यंत वाट पाहायचं त्यांनी ठरवलं, त्याचवेळी त्यांच्या मुलानं चहा तयार झाल्याचं हाक मारुन सांगितलं अन साहेब बंगल्यात आले. मोबाईल चेक केला, कुणाचा फोन आलेला नव्हता पण एक एसेमेस आलेला होता. त्याचा नंबर त्यांनी आपल्या डायरीत चेक केला, काही खास नंबर त्यांनी मोबाईल मध्ये सेव्ह केलेले नव्हते. महापालिकेतले विरोधी पक्षनेच्याचा नंबर होता तो, मेसेज उघडुन त्यांनी वाचायला सुरुवात केली, नंबर बघितल्यावर आलेलं टेन्शन एक्दम उतरलं. गणपती उत्सव कोणत्याही अनुचित प्रसंगाविना योग्य रितिने पार पाड्ल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या खात्याचे आभार मानणार मेसेज होता तो. कमिशनर साहेबांचं टेन्शन एकदम कमी झालं.
पहाटे माननीयांना जाग आली तेंव्हापासुन ते आपले फोन शोधत होते, बेडवर झालेल्या चादरींच्या घोळात त्यांचा फोन सापडत नव्हता आणि बंद करुन ठेवल्यानं दोन्ही फोन नक्की कुठं आहेत हेच कळतच नव्हतं. त्याचा राग त्यांनी बरोबर असलेल्या पोरीवर काढला होता. शेवटी फोन सापडल्यावर आंघोळ आवरुन ते थेट गेस्ट हाउसला आले. प्रदेशाध्यक्ष अजुन उठले नव्हते. हे असं वाट बघत बसणं त्यांना कधीच पटायचं नाही. वेळ जाण्यासाठी त्यांनी तिथंच नाष्टा मागवला. आज ग्रामीण भागातले पक्ष पदाधिकारी भेटायला येणार होते, त्याची तयारी करायची होती. त्यांच्या संपर्क कार्यालयातुन अजुन माणसं आली नव्हती. ज्या दोघांना त्यांनी आनंदच्या घरावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं त्यांना फोन लावला. रात्रभरात आनंदचे वडील सोडले तर दुसरं कुणी घरी आलं किंवा गेलं नव्हतं, नेहमीच्या लोकांकडुन आनंदचा काही पत्ता लागत नव्हता. एक आख्खा दिवस एक माणुस सापडत नाही याचं फार मोठं नुकसान त्यांना भविष्यात सोसावं लागणार होतं. जुने नवे सगळे संबंध वापरुन झाले होते. तालमीतल्या ज्या लोकांशी अजुन चांगले संबंध होते त्यांच्याशी पण काँटॅक्ट करुन झाला होता, पण काही फायदा झाला नव्हता. साडेआठ झाले तरी प्रदेशाध्यक्ष रुममध्येच होते,एव्हाना निघायला हवं होतं, अक्कलकोटला मठात एक कार्यक्र्म ठरवुन ठेवलेला होता, पण तिकडं आत रुममध्ये प्रदेशाध्यक्ष फोनवर शांतपणे समोरच्याचं बोलणं ऐकुन घेत होते.
नाथा, खोपटाजवळ येईपर्यंत हणमंताच बोंबलत बाहेर आला, त्याचं तोंड भुत पाहिल्यासारखं झालं होतं. दुस-या बाजुनं प्रशा येत होता तो पण खोपटाकडं पळायला लागला. नाथानं खोपटाकडं पाहिलं, पहाटे तो आणि हणमंता उठल्यावर आनंदनं उठुन नाथाचा शर्ट घ्यायचा प्रयत्न केला होता. त्याला त्यातलं हत्यार हवं असावं, पण पोत्यात बांधलेल्या पायानं त्याला दगा दिला होता, आणि अवध्या दहा मिनिटात सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं. गुप्तीच्या वारानं केलेली जखम खुपच खोल गेली होती. आनंदचा उजवा पाय पिंडरीतुन तुटल्यासारखा झाला होता आणि वरचा तुट्लेला भाग पोत्याच्या बाहेर आला होता. ' नाथा, माफ कर अन जीवे मार मला एकदाचा, काल पन बोललो तुला चुक झाली माफ कर, सोड मला अरे शुगर हाय मला, ही असली जकम जिंदा नाय ठेवणार मला सोडव बाबा सोडव.' नाथा थोडासाच घाबरला, त्यानं असले सीन याआधी त्यानं पाहिले होते, नुसतं रक्त वाहुन मेलेली माणसं त्यानं ९३ च्या भुकंपाला सिव्हिलमध्ये पाहिली होती. आता आनंद वर दया दाखवावी का कसं याचा त्याला निवाडा करता येत नव्हता. प्रशा मात्र हणमंता एवढाच हादरलेला नव्हता, सणा-जेवणाला कोंबडे बकरे मारणं वेगळं आणि जिवंत माणसाचा रक्ताळलेला तुटका पाय बघणं वेग़ळं हे त्याला जाणवत होतं. त्याच्या हातातला चहाचा तांब्या कधीच गळुन पडला होता. हातातल्या मोबाईलची रिंग वाजल्यावर नाथा तिथुन बाहेर आला, येताना त्यानं हणमंताला आनंदचं तोंड बांधायला सांगितलं. आनंदचं तोंड बांधुन झाल्यावरच त्यानं फोन घेतला,
गप्प झालेला मदनचा भाउ अन बाकीचे घरी आले, लगेच पंढरपुरला जायचं असल्यानं घरातली मंडळी लगेच निघायची तयारी करत होती. ही मंडळी घरातुन बाहेर पडली मग घरात एक दोन म्हातारे अन बाकी बायकाच होत्या. सगळे पुढच्या तयारीला लागले, जाणारा जातो पण मागच्यानं तर जगावं लागतंच, जगण्यासाठी लागणारं सगळं करावं लागतंच. घरातली लोकं बाहेर पडुन दहा मिनिटं झाली असतील तोच जोशीवाड्याबाहेर पोलिसांची जीप उभी राहिली. जाधव साहेब, दोन हवालदार व एक महिला हवालदार एवढे जण जीपमधुन उतरले, साहेबांनी लेडिज हवालदारासोबत एकाला आत पाठवलं. पाच मिनिटात दोघांबरोबर एक तरुण विवाहित स्त्री बाहेर आली. ती मदनच्या भावाची बायको होती. तिनं तिला जेवढी माहिती होती तेवढी दिली. त्यानं जाधवांचं समाधान झालं नाही पण त्यांचा नाईलाज होता.घरात अजुन कुणी नसल्यानं त्यांनी चौकशी आवरती घेतली आणि निघाले. त्यांच्या नंतर दहा मिनिटात कोप-यावरच्या पानटपरीतुन एक फोन केला जो दुस-या बाजुला इरिगेशनच्या गेस्ट हाउस मध्ये वाजली. फोन वर झाल्या प्रकाराची माहिती देवुन फोन करणा-यानं फोन ठेवला आणि ताबडतोब तो जोशीवाड्यात गेला. मदनच्या वहिनीकडं त्यानं एक पाकिट दिलं. माननियांचं नाव सांगुन तो तिथुन निघाला. तिनं पाकिट उघडुन पाहिलं, आत वीस हजार होते, तिला हा संबंध कळाला नाही पण तिनं गुपचुप ते पाकिट ठेवुन घेतलं अन घरात गेली.
बांगरेनं त्याला घेउन गेलेल्या गाडीच्या ड्रायव्हरला ते हॉटेल दाखवलं जिथं मुश्ताकला सोडलं होतं, बांगरे जाउन हॉटेलात जाउन मुश्ताकला भेटला, तुम्हाला मुंबईला सोडायला गाडी आणल्याचं सांगितलं. अचानक झालेल्या बदलानं मुश्ताक चिडला होता. तो काही ते हॉटेल सोडुन यायला तयार नव्हता. शेवटी कसंतरी बांगरेनं मुश्ताकला पटवलं. सामान असं काही मुश्ताककडं नव्हतंच. जे होतं ते एका मोठ्या झोळ्यात बांधुन घेउन तो बांगरेबरोबर निघाला. तो गाडीत येउन बसला, तिकडं बांगरे हॉटेलचं बिल देत होता. या कामाला फार झालं पाच मिनिटं लागली असती, पण जसा वेळ जास्त व्हायला लागला तसं मुश्ताकला संशय यायला लागला. गुन्हेगाराची एक वेगळीच मानसिकता असते, त्याला तो स्वतः सोडुन प्रत्येकजण त्याच्या जीवावर उठलेलाच वाटत असतो. मुश्ताक चुळबुळ करायला लागला, तसं ड्रायव्हरनं त्याला मागच्या सीटवरुन पुढं यायला सांगितलं आणि विजापुरमधुन बाहेर पडण्याच्या आधी मौला दर्ग्यात जायचं असल्याचं सांगितलं. दोन दिवस जीवाच्या भितिनं आणि आनंदचा काहीच संपर्क होत नसल्यानं मुश्ताक हॉटेलच्या बाहेर जास्त पडलाच नव्हता. त्याला पण दर्ग्यात जायचा विचार पटला. तो आपला झोळा घेउन पुढच्या सीट्वर आला, त्याला त्या सीट्वर नीट बसता येत नव्हतं, सीट एक्दमच पुढं होती, आणि काही केल्या ती मागं व्हायला तयार नव्हती. बांगरे तेवढ्यात मागं येउन बसला अन मुश्ताकनं बाहेर निघायच्या विचार करायच्या आत गाडी निघाली. ' मुश्ताक भाई, आपका बॅग दे दो पिछेको, काय को तकलीप उगाच तुमे' आधीच अवघडलेल्या मुश्ताकनं बांगरेची ऑफर स्विकारली अन झोळा त्याच्याकडं देउन टाकला.

Print Page

Tuesday, November 15, 2011

चपला आणि सत्कार - भाग ०८


फोनची रिंग वाजल्यावर नाथा चकित झाला, फोन मंडळाच्या कार्यालयातुन आला होता. तिथल्या मॅनेजरनं सकाळपासुन काय काय झालं ते सगळं सांगितलं आणि सगळ्यात महत्वाची बातमी दिली ती म्हणजे विजापुरचा पत्ता मिळाला होता. कुणाला संशय येउ नय म्हणुन आजचा दिवस इथंच काढणं त्याला भाग होतं. प्रशा वस्तीकडं जाउन जेवण घेउन आल्यावर, तिघांनी बसुन पोटभर जेवण केलं, आनंद थोडा शुद्धीत आला होता, नाथानं जेवण केलेल्या प्लेटमध्येच हात धुतला अजुन थोडा रस्सा त्यात घालुन ते पाणी आनंदला पाजलं, त्यात राग पण होता आणि त्याला जिवंत ठेवायची गरज तसं तर नव्हती पण त्याला उगाच लफडं वाढवायचं नव्हतं. तो मनात आता त्याच्या सोलापुरातल्या मुसलमान मित्रांची नावं आठवत होता. वेळ तर अशी होती की मिरवणूकीच्या रात्री मशिदीसमोर नाचुन जो दंगा केला होता, त्यामुळं सगळेच थोडे टेन्शनमध्ये होते. हणमंता गाडी धुवायला बोअरकडं घेउन गेला होता. तो आल्यावर, त्यानं गाडीतुन एक पाकीट काढलं, त्यातुन एक सिमकार्ड काढुन आपल्या फोन मध्ये घातलं, एक फोन लावला. दोन तीन वेळा लावल्यावर फोन उचलला गेला आणि नाथानं आदरानं बोलणं सुरु केलं ' उस्मानमियां है क्या घर पे, मैं नाथा बात कर रहा सोलापुरसे' फोनमध्ये एका बाईचा आवाज घुमला ' बडे अब्बा सुनो, सोलापुरसे फोन हंये, नाता की कौन है, लेते क्या अंदरसेच फोन, लिये क्या, हां मैं रखती इदर' , मग तिथं शिवारात फिरत फिरत नाथा अर्धा तास त्या उस्मानमियांशी बोलत राहिला. फोन बंद झाल्यावर त्याच्या लक्षात आलं होतं की हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाही, विजापुरातल्या पत्याचा काही उपयोग नाही. त्याला हवा असणारा तिथुन कधीच पुढं निघुन गेला असेल तर, गोव्यात किंवा मुंबईत जाउन त्याला हुडकणं अवघड होणार होतं. फोन बंद केला, सिम बदललं आणि पुन्हा फोन चालु केला तेंव्हा लगेच फोन आला. शेजारच्या काकुचा...
जाधवना या स्टेशनला येउन वर्ष झालं होतं, गेल्या वर्षात असं काही खास घडलं नव्हतं, जुगार आणि दारु गुत्यांवर होणारी भांडणं, त्यातुन झालेले एक दोन खुन, ७-८ घरफोड्या, एक मोठा अपघात, एक बलात्कार आणि बरेच किरकोळ गुन्हे, पण गँगवॉर सारखं असं काहीतरी पहिल्यांदाच होत होतं. त्यांनी स्टेशनच्या रेकॉर्ड मधुन सगळ्या जुन्या फाईल काढायला सांगितल्या. एका कागदावर सगळी नावं लिहुन धागे जोडत बसले होते. आज जेवण घरुन आलेलं होतं. स्पेशल डायट फुड, उकडलेल्या भाज्या आणि त्यामुळंच आता चहावाल्यानं आणलेल्या गरम गरम अण्णा भजी जास्तच भारी लागत होत्या. तीन चार वेळा सगळी नावं वाचुन झाल्यावर त्यांच्या डोक्यात एक चित्र तयार होत होतं, एक जिगसॉ पझल, ज्याचे दोन तीन तुकडं मिळतच नव्हते. ते सोडुन बाकी चित्र जुळल्यासारखं त्यांना तरी वाटत होतं, एक तुकडा त्यांनीच बाजुला ठेवला होता, तो लावायला त्यांनाच भीती वाटत होती. टेबलावरचा फोन वाजला म्हणजे खात्यातल्याच फोन असणार होता. फोन मोदी पोलिस स्टेशन मधुन होता, एक कार हरवल्याची तक्रार होती, त्याची काही माहिती आहे का असं पलीकडुन विचारलं गेलं, नंबर ऐकल्यावर तर, उत्तर द्यायच्या आधी जाधवांनी तो तुकडा त्या जिगसॉ मध्ये बसवुन टाकला आणि तो अगदी फिट्ट बसला पण, जाधव साहेब लगेच खुश झाले, त्यांच्या असिस्टंट्नं सकाळी अकरा ते आता पाच वाजेपर्यंत खपुन सगळा रिपोर्ट तयार केलेलाच होता. तो रिपोर्ट आणि बाकी सगळ्या फाईल घेउन जाधव कमिशनर ऑफिसला निघाले. ते बाहेर पडेपर्यंत मोदि पोलिस स्टेशनमधुन गाडी पाहायला एक कॉन्स्टेबल, एक लेडिज कॉन्स्टेबल आणि अजुन एक बाई आल्याचं कळालं, मग त्यांच्याबरोबर ते बाहेर ठेवलेल्या गाडीकडं गेले. आनंदच्या बायकोनं गाडी लगेच ओळखली. सकाळी गाडीत कागदपत्रं काही सापडली नव्हतीच, आणि आनंदच्या बायकोनं काही बरोबर आणली देखिल नव्हती.
नाथानं पुन्हा एकदा सिमकार्ड बदलुन उस्मानमियांला फोन केला, पुन्हा जवळपास अर्धा तास चर्चा झाली. ह्यावेळी फोन बंद केल्यावर नाथा थोडा टेन्शन फ्री होता. सिम कार्ड बदललं, बोळाच्या टोकाला असलेल्या पानटपरीवर फोन केला, तिथुन कार्यालयातुन एकाला बोलावलं. पुन्हा पाच मिनिटानी फोन केला. मग जवळपास पंधरा मिनिटात दहा गोष्टी सांगितल्या. सगळ्यात महत्वाचं होतं, ते बांगरेला विजापुरला घेउन जाणं आणि औरंगाबादला बावडी मशीद इलाक्यात उस्मानमियांच्या घरी पैसे पोहोचवणं. त्यानं पुन्हा अर्धा तासानं फोन केल्यावर त्याला कळालं की त्याच्या घरातले लाख रुपये पोलिसांनी जप्त करुन नेले होते, आता पुन्हा त्या पैशाची सोय करणं भाग होतं. परेशायनम:, दुसरा रस्ता आतातरी दिसत नव्हता. आणि त्याला राग आला होता की त्याच्या बायकोनं याबद्दल त्याला काहीच सांगितलं नव्हतं. सिम कार्डची बदला बदली करुन पुन्हा परेशला फोन केला. परेश तसा चिडलाच, कारण आता येणा-या दसरा दिवाळीच्या सिझनचा माल भरायला त्यानं पैसे बाजुला काढुन ठेवले होते, ते आता नाथाला दिल्यावर सिझन सुरु होण्याच्या आधी ते मिळायची शक्यताच नव्हती. त्यानं नाथाला एक तासानं फोन कर, बाबांना विचारतो असं सांगितलं. आता बाबांना विचारतो म्हणजे सोय होणार नाही याची पंच्याण्णव टक्के खात्री होती. नाथानं पुन्हा दुस-या पानटपरीला फोन केला आणि तिथं मॅनेजरला बोलावुन पैशाची सोय करायला सांगितलं. पुन्हा सिम बदललं, या बदलाबदलीत त्याच्या फोनची बॅटरी कमी होत होती. मग त्यानं अगदी खास नंबर फिरवला, ही त्याची शेवटची आशा होती, आणि त्याचं दैव बलवत्तर तिथं काम झालं. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे औरंगाबादला पोहोचण्याची खात्री त्याला मिळाली, तसं ही बीड ते औरंगाबाद अंतर फार जास्त नव्हतंच.
माननीय दिवसभरातल्या भानगडी आवरुन हॉटेल महाराजाला आले, सोलापुरातला एक फार जुना बार आणि लॉज. वर जातानाच त्यांनी खास विजापुर वेस खिम्याची ऑर्डर दिली आणि आपल्या नेहमीच्या खोलीत आपल्या खास लोकांसोबत बसले, प्रत्येकाचे दोन दोन पेग झाल्यावर माननीयांनी त्यांना रजा दिली आणि रुम मधला फोन उचलुन रिसेप्शनला स्पेशल ऑर्डर पाठवायला सांगितली. खास खिमा घेउन खास व्यक्ती रुममध्ये आल्यावर माननीय दिवसभराचं टेन्शन विसरले. अंगातला नेहरु शर्ट काढुन बाजुला टाकत खुर्चीवरुन उठले अन बेडवर जाउन पडले. आता पहाटे चारपर्यंत रुममध्ये कुणी येण्याचा प्रश्नच नव्हता, त्यामुळं ते निवांत झाले. दोन्ही मोबाईल बंद केले अन खिम्याचे तुकडे अन तोंडात टाकायला सुरुवात केली.
जाधव साहेब यावेळी कमिशनरसाहेबांच्या समोर बसुन आपला रिपोर्ट दाखवत होते, रिपोर्ट वाचुन झाल्यावर कमिशनर साहेब पाच मिनिटं डोळे मिटुन सोफ्यावर मागं डोकं टेकुन बसले. ' जाधव, तुम्ही असं करा, केस टाकायची तयारी करा, पण कुणालाच यात घेउ नका. वरुन पक्का आदेश येईपर्यंत कुणाला काही कळालं नाही पाहिजे. मी वाडकरांना मुंबईहुन बोलावतो, या भागातल्या गँगवॉरला जरब बसवणारा माणुस आहे तो. ते इथं होते तेंव्हाच्या पाच वर्षात गुन्हेगारी फक्त भुरट्या चो-या, अपघात आणि दारुड्यांच्या मारामा-या यापर्यंतच राहिली होती, त्यांची बदली मुंबईला झाली अन पुढच्या तीन महिन्यात दोन मर्डर झाले, ज्या केस आम्हाला पुढच्या तीन वर्षे पुरल्या कोर्टापर्यत न्यायला. आरोपी किरकोळ शिक्षेवर सुटले ते वेगळंच. पण नंतर फार गोंधळ वाढला. अर्थात तुम्ही रिटायरमेंटला आलात, तुमच्या कडुन अगदी तशीच अपेक्षा नाही पण मला वाटतं, तुमचे तीनच महिने उरले आहेत म्हणजे, या अशा केस करण्याची रिस्क तुम्ही घेउ शकाल. केस कोर्टात जायलाच एक वर्ष लागेल, तोपर्यंत तुम्ही रिटायर्ड होउन एखाद्या मोठया कार्पोरेट मध्ये चिफ सिक्युरिटि ऑफिसर म्हणुन जॉइन केलेलं असेल, एसि केबिन, गाडी, लॅपटॉप एकदम ऐश होईल तुमची, बरोबर ना जाधव.' जाधव हसले चहाचा कप टेबलवर ठेवला आणि डोक्यावर हात फिरवत म्हणाले ' होय सर, नागपुरची एक कोल इंडस्ट्री आहे तिथं झालंय बोलणं.' आपला दगड नेमका बसल्यानं कमिशनर खुश झाले.' मग आम्हाला बोलवा कधीतरी एसि केबिन मध्ये बसुन ऑरेंज ज्युस प्यायला' हसत हसत ते बोलले. फाईल बंद केली याचा अर्थ तुम्ही निघा असा होतो हे समजुन जाधव केबिनच्या बाहेर पडले. त्यांना ही केस करणं अगदी जीवावर आलं होतं सगळं आयुष्य त्यांनी लो प्रोफाईल आणि लो रिस्क पड्धतीनं काढलं होतं, आता जाता जाता त्यांना ह्या भानगडीत पडायचं नव्हतं.
प्रशा पुन्हा रात्री जेवण आणि बरोबर दोन बाटल्या देशी घेउन आला, आल्या आल्या त्यानं हणमंताकडुन आनंद जिवंत असल्याची खात्री करुन घेतली. हणमंतानं त्याला उद्या सकाळी १५ लिटर पेट्रोल आणायला पैसे दिले, नाथा गाडीचं इंजिन सुरु ठेवुन त्याचा मोबाईल चार्ज करत होता. दर पंधरा मिनिटाला सिम बदलुन एखादा फोन करायचा. आज येताना बायकोचा फोन घेउन आलो असतो तर फार बरं झालं असतं, पण रात्रीच्या गडबडित तेवढं सुचणं शक्य नव्हतं. रात्री आनंदनं हत्यार बाहेर काढल्याची शंका येताच त्याच्या मागं उभ्या असलेल्या महेशनं लुंगीत लपवलेल्या गुप्तीनं आनंदच्या उजव्या पायावर एवढ्या जोरात वार केला की, आनंदच्या हातातलं पिस्तुल तिथंच पडलं अन त्याच्याबरोबरचे लोक पळायलाच लागले. कॅरम क्लबमधल्या दारुड्यांवर दादागिरी करणारी लोकं ती, खाउन पिउन तालीम घुमणा-यांच्या समोर थोडीच उभी राहणार होती. आनंदच एकटा काय तो पाच सहा वेळा असल्या हातातोंडाच्या भानगडीत पडलेला,सकाळी बांगरेच्या बायकोनं दिलेल्या शिव्या, संध्याकाळीच मारलेले दोन पेग, अन रात्री माननीयांनी प्रदेशाध्यक्षांसमोर केलेली हजामत, ह्या सगळ्याची राख डोक्यात घेउन तो समोर दिसलेल्या चार सहा जणांना घेउन तो आला होता, याच्या उलट नाथा त्याच्याच एरियात होता, पुर्ण तयारीत होता. आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट, जी सकाळपासुन प्रशाच्यापण डोळ्यात खुपत होती, तो बिनचपलेचा होता.

Print Page

Saturday, November 12, 2011

चपला आणि सत्कार - भाग ०७


आजचा दिवस बहुधा बायकांसाठी चांगला नव्हताच, कसब्यात जोशीवाड्याच्या अंगणात मदनच्या अंत्ययात्रेची तयारी चालली होती, पोस्ट मार्टेम करुन बांधुन आणलेल्या त्याच्या बॉडीवर पडुन त्याची आई धाय मोकलुन रडत होती. इकडं सरवदे डॉक्टरच्या दवाखान्यात त्याची नर्स ड्रेसिंग करताना कपाळाची जखम दुखत असल्यानं नाथाची बायको दोन्ही पाय झाडुन ओरडत होती. तिचं आरडा ओरडा कमी होईना हे पाहुन सरवदे डॉक्टर केबिन मधुन बाहेर आली अन तिच्यावर ओरडली ' ए बये, एवढं का ओरडतीय एवढंसं लागलंय तर, उद्या पोर होताना तर ओरडुन ओरडुन जीव देशील की मग, गप जरा अन सहन कर उगा. दोन मिनिटात दुखायचं कमी होईल.' तिचं बोलणं ऐकुन नर्स सुद्धा हसायला लागली. बरोबर दहा वाजता बांगरेची बायको अन मुलगी जेंव्हा पोलिस स्टेशनला बांगरेची चौकशी करायला गेले तेंव्हा त्यांना तिथं चव्हाणवहिनी दिसली, बांगरेची बायको रडतच तिच्याकडं गेली.बांगरे गायब झाल्याचं वहिनीला माहित नव्हतं, आणि आता कळाल्यावर तिला बांगरेच्या बायकोला समजावयचं का तिचा नवरा रात्री घरी न आल्याची तक्रार करायची हेच कळेना. सकाळी माननियांच्या घरी जाउन काही फायदा झालेलाच नव्हता, माननिय अजुन गेस्ट हाउस वरुन घरीच आलेले नव्हते आणि त्यांचा फोन नंबर द्यायला कुणी तयार नव्हतं. नाईलाज होउन ती सरळ पोलिस स्टेशनला आली होती, तर इथं ही तिच्या गळ्यात पडुन रडत होती.
आणि पोलिस इन्स्पेक्टर जाधव चौपाडात सापडलेली एक अल्टो उचलुन घेउन जाण्याची तयारी करत होते. त्या गाडीच्या दोन दरवाज्यांवर रक्ताचे डाग होते. तसंच समोर गेलेल्या गल्लीत एक दोन ठिकाणी रक्ताचे डाग होते. गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताचं टेन्शन संपल्यावर जाधव दोन दिवस रजा घेउन घरीच बसले होते. आज ड्युटिवर आल्या आल्या हे लफडं म्हणजे त्यांचं डोकंच सरकलं होतं. त्यांनी तालिम मंडळाच्या कार्यालयात बसुनच चौकशी सुरु केली होती. त्यांचे असिस्टंट व हवालदार घराघरात जावुन सापडेल त्याला पकडुन आणत होते. अरगडे वाड्यात मात्र पोलिसांना फक्त बायकाच सापडल्या, शेवटच्या दोन खोल्या तर कुलुपबंदच होत्या. जाधवांना अजुन विनाचौकशी झडतीची ऑर्डर मिळाली नव्हती त्यामुळं ती कुलुपं तोडणं त्यांना शक्य नव्हतं. नाथाच्या शेजारच्या खोलीतल्या बाईनं, त्याची बायको सकाळी पाणी भरताना अंगणात पडल्यानं डॉक्टरकडं गेली असल्याचं सांगितलं होतं, आता ती परत येईपर्यंत तिथंच बसुन राहणं त्यांना भाग होतं. बाकी मंड्ळात, कार्यालयात, तालमीत आणि गणपतीच्या शेडमध्ये संशयास्पद असं काहीच न सापडल्यानं त्यांचा तिळपापड होत होता. नाही म्हणायला कार्यालयातल्या तिजोरीत चार शोभेच्या तलवारी अन चार भाले सापडले होते. मात्र ती चांदीची पाणी दिलेली शोभेची शस्रं गणपती उत्सवात स्थिर व विसर्जन मिरवणुकीत मुर्तीबरोबर घेउन जाण्याची परवानगी मंडळ गेली २३ वर्षॅ दरवर्षी घेत होतं. तशी ती या वर्षी पण घेतलेली होती, आणि पुन्हा ती शस्त्रं कपाटात ठेवताना दोन साक्षीदार व ड्युटी हवालदारानं पंचनामा करुन मंडळाला दिलेला होता. शिवाय ज्या कप्प्यात ती शस्त्रं होती त्याला तीन ठिकाणी सिल केलेलं होतं. त्याची रजिस्टर मध्ये नोंद होती. अगदी आता तपासासाठी कपाट उघडताना सुद्धा कार्यालयातल्या मॅनेजरनं रजिस्टरला नोंद करुन त्यावर जाधवांचीच नाव लिहुन सही घेतली होती.
हणमंता रात्री दोन वाजल्यापासुन गाडी चालवत होता, कालची रात्र पण गाडीत गेली आणि आज सकाळ दहा वाजेपर्यंत तो बसवकल्याणच्या पुढं आला होता. काल त्यानं एक जिवंत माणुस परत आणला होता, आणि आज ज्याला घेउन चालला आहे तो जिवंत आहे का मेलेला आहे हे कळायला त्याला मार्ग नव्हता आणि विचारायची गरज पण नव्हती. शेजारच्या सीटवर नाथा बरोबर बसला होता हेच त्याला पुरेसं होतं. रात्रीपासुन गाडी दोन वेळा पेट्रोल भरायला थांबवली होती, तेवढंच. बसवकल्याणच्या पुढं हणमंताची सासुरवाडी होती. तशी एका बाजुला असलेल्या वस्तीच होती ती, पण त्याचा मेव्हणा तिथल्या एका सामाजिक संघटनेचा अध्यक्ष होता त्यामुळं हे ठिकाण तसं सुरक्षित होतं, असं त्याला वाटत होतं. नाथा सोलापुर जिल्हा हद्द ओलांडल्यानंतर थोडा झोपला होता, गाडी एका बाजुला थांबल्यावर त्याला जाग आली. हणमंता गाडीच्या मागच्या बाजुला धार मारायला गेला होता. नाथानं गाडीत मागं वाकुन पाहिलं. आनंदच्या पायातुन बरंच रक्त गेलं होतं. त्याला गाडीत टाकलं तेंव्हा तरी तो जिवंत होता पण आता काय झालंय ते पहायला तो उतरुन बाहेर आला, गाडीतली पाण्याची बाटली घेउन त्यानं आनंदच्या तोंडावर पाणी मारलं, काही हालचाल दिसेना, मग त्याला थोडं हलवुन पाहिलं तसा आनंद ग्लानीतुन जागा झाला. डोळे किलकिले करुन त्यानं पाहिलं, पायातुन प्रचंड वेदना त्याच्या डोक्यापर्यंत जात होत्या, ओरडावं म्हणलं तर ओरडता येत् नव्हतं. पोत्यात बांधलेला पाय हलवता उयेत नव्हता. नाथानं पुन्हा एकदा ठेवणीतल्या शिव्या दिल्या, ते ऐकुन चेन लावत लावतच हणमंता गाडीकडं आला, ' जिवंत हाय ना भडवा, तिच्यायला असं मरायला पाहिजे ना की हेच्या पोराचं पोरगं बी मुतायला पाहिजे याचा फोटो बघुन. ह्यांच्यायला अवलादच हरामी याची ' नाथानं तोंड धुता धुता हणमंताला विचारलं, ' अजुन किती वेळ आहे रे पाहुण्याकडं जायला, आणि फोन केला आहेस ना नक्की' हणमंता स्टार्टर मारता मारता म्हणाला ' हे काय अजुन १५- २० मिनिटंच -हायलीत' नाथा आता पुर्ण जागा होता, आता त्याला बिनलग्नाच्या बायकोची आठवण आली. त्यानं फोन काढला आणि फोन लावला.
मलमपट्टी करुन दवाखान्यातुन नाथाची बायको बाहेर पडली, या तरटी नाक्याच्या एरियात यायला तिला कधी आवडायचं नाही पण नाथानं गेल्या सहा महिन्यात प्रत्येक वेळी तिला काहीही झालं की इथंच आणलं होतं आणि काल रात्री पण शेजारच्या काकुला तिला इथं घेउन यायला सांगितलं होतं. रात्रीतुन तो गेल्यापासुन त्याचा फोन नव्हता. तिला फोन लावायचा नाही असा दम दिला होता, ती बाहेर येउन रिक्षात बसत असतानाच तिच्या बरोबर आलेल्या काकुचा फोन वाजला, दोन शब्द बोलुन तिनं फोन नाथाच्या बायकोला दिला. तिथुन घर जवळ येईपर्यंत दोघं बोलत होती. रिक्षा बोळाजवळ आल्यावर काकुनं फोन काढुन घेतला बंद केला. दोघी वाड्यासमोर रिक्षातुन बाहेर पडल्या, आणि लगेच समोर उभ्या असलेल्या लेडिज हवालदारानं दोघींना ढकलत खोलीकडं नेलं. खोलीचा दरवाजा उघडल्यावर त्या तिघी आत गेल्या, तोपर्यंत लेडिज पोलिसानं, एक फोन करुन अजुन दोघांना बोलावुन घेतलं होतं. आता त्या खोलीत बरीच गर्दी झाली होती. किचन कट्टा व कपाट पहाटेच आवरुन ठेवलेलं होतं, लेदरच्या पाकिटात पैसे भरुन ठेवलेले होते. तिन्ही पोलिसांनी जवळपास अर्धा तास घरात हुडकाहुडकी केली. संशयास्पद म्हणावं असं काहीच सापडलं नाही, फक्त लाखभर रुपयांची कॅश सापडली. हे पैसे कुठुन आले हे नाथाच्या बायकोला न सांगता आल्यानं ते जप्त करुन घेतले. पंचनामा आटोपला आणि जाधव साहेबांना बोलावलं. जाधव आत आले, पुन्हा एकदा घरात थोडं वरखाली केलं, आरडाओरडा केला, शिव्या घातल्या अन एक गोष्ट केली ती म्हणजे नाथाच्या बायकोचा मोबाईल चेक केला. काल दुपारनंतर एकपण फोन केला नव्हता किंवा आलेला नव्हता. हे जरा अवघडच होतं, एसेमेस चेक केलं तिथंही काही नव्हतं. अजुन थोडी चिड्चिड करुन जाधव साहेब बाहेर पडले. आता इथं करण्यासारखा काही फार तपास राहिला नव्हता, बाहेर आल्यावर दोन हवालदारांची तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये ड्युटी लावुन तिथुन ते पोलिस स्टेशनला परत आले.
हणामंतानं गाडी गराडे वस्तीवर घातली, त्याचा मेव्हणा, प्रशा वस्तीच्या सुरुवातीलाच त्यानंच लावलेल्या संघटनेच्या बोर्डाजवळ उभा होता. गाडी थांबल्या थांबल्या त्यानं आधी हणमंताला बाहेर घेउन तो बोर्ड दाखवला.दोघांचं कन्नड मध्ये बोलणं झालं. हणमंता पुन्हा गाडीकडं आला, त्यानं नाथाला मागं बसणार का असं विचारलं, खरंतर नाथाच्या जीवावर आलं होतं पण तो मागं गेला. पुढं हणमंता आणि प्रशा बसले आणि गाडी सुरु झाली. तिथुन पुढं दहा मिनिटं कच्च्या रस्त्यावरुन गेल्यावर ते एका शेतातल्या खोपटाच्या समोर थांबले, ते खोपटं तिथुन जवळपास १०० मीटर होतं. मागचा दरवाजा उघडुन नाथा बाहेर आला आणि त्यानं बेशुद्ध आनंदला बाहेर ओढलं. गाडीतुन बाहेर येताना पाय जमिनीवर आदळल्यावर आनंद एवढ्या जोरात किंचाळला की प्रशाला वाटलं तो मेलाच आता. त्यानं लगेच हणमंताला बाजुला घेउन ओरडुन काहीतरी सांगितलं, त्यानं नाथाला तेच मराठित सांगितलं, आनंद जिवंत असेल तरच त्याला इथं ठेवता येईल, तो मेला तर प्रशा त्याला सरळ नेउन हायवेला टाकेल. नाथाकडं दुसरा उपाय नव्हता. शेवटी त्यानं आणि हणमंतानं खांद्यावर घेउन आनंदला खोपटात नेलं. आत नुसता कडबा आणि करडीची पेंड भरुन ठेवलेली होती. पडलेलं एक फाटकं पोतं घेउन नाथानं आनंदचा पायाची जखम बांधली. नावं कळेपर्यंत त्याला आनंद जिवंत हवा होता, नंतर प्रशानं त्याला हायवेवर टाकलं काय अन नायतर विहिरीत टाकलं काय नाथाला काही घेणं देणं नव्हतं.
दुपारचे दिड वाजले तरी, पोलिस स्टेशनला आनंदच्या बायकोची तक्रार लिहुन घेतली गेली नव्हती, ब-याच ठिकाणी लागेबांधे असलेल्या माणसाबद्दल तक्रार घ्यायची का नाही याबद्दल तिथं कुणाचंच एकमत होत नव्हतं. कागदावर लिहुन सगळं तयार होतं, पण त्याची कुठं नोंद करायला कुणी तयार नव्हतं. पुणे नाक्याला मारुती शोरुमाच्या बाजुला असलेल्या स्मशानभुमीत मदनच्या बाप खाली बसलेला उठतच नव्हता, मग त्याच्या भावानंच सगळं उरकलं. नातेवाईक, मंडळाचे फुटकळ कार्यकर्ते आणि एक मोठी व्यक्ती माननीय स्वतः हजर होते, ब-याच जणांना हा मोठा धक्का होता. अगदी श्रद्धांजलीची भाषणं वगैरे झाली. तिथलं सगळं आटोपुनच माननीय थेट पोलिस स्टेशनला आले, त्यांना बघताच आनंदची बायको उठुन त्यांच्याकडं गेली. रात्री त्यांना भेटायलाच आनंद गेला होता,आणि नंतर गायब झाला होता. आनंदची बायको शिव्या देत अंगावर आल्यावर त्यांना थोडं अवघड झालं, पण त्यांना बघुन तिथल्या लेडिज हवालदार पुढं झाल्या अन त्यांना आत घेउन गेल्या. मागं मागं आनंदची बायको पण गेली. दोन दिवसात, आपली दोन माणसं घालवुन माननीय आधीच चिडले होते, त्यात ही बाई त्यांच्या मागं मागं ओरडत येत होती. शेवटी अर्धा तास गोंधळ झाल्यावर आनंदच्या बायकोची तक्रार नोंदवुन घेतली गेली तेंव्हा, बांगरेच्या बायकोचा हे पोलिस आपल्या नव-याला हुडकुन आणतील यावरचा विश्वास उडुन गेला होता, मुलीबरोबर ती गुपचुप तिथुन निघुन गेली. दोन दिवस तिच्या धुणी भांड्याच्या कामाला ती गेली नव्हती, अजुन एखादा खाडा झाला असता तर आठ पैकी चार घरं तरी हातातुन गेलीच असती, तिला असं इथं बसुन दुख: करुन चालणार नव्हतं.

Print Page

Thursday, November 10, 2011

चपला आणि सत्कार - भाग ६


नाथा सिव्हिलला पोहोचेपर्यंत उशीर झाला होता, एकतर दुपारचे चार वाजलेले आणि सकाळच्या शिपायाची ड्युटी संपत आल्यानं त्यानं दिवसातलं शेवटचं गि-हाईक जास्त घासाघीस न करता सौदा पटवुन मोकळा झाला होता. नाथानं लक्ष्मीच्या देवळाजवळ गाडी लावली तेंव्हाच त्याला शवागाराच्या समोरच्या लिंबाच्या झाडाखाली उभा असलेला मदनचा बाप व बाकीची मंडळी दिसली होती. शववाहिकेचा ड्रायव्हर गाडी रिव्हर्स घेत होता म्हणजे सगळं झालं होतं. खरंतर बाकी सगळं बाजुला ठेवुन आपल्या तालमीचा पोरगा म्हणुन तरी नाथानं तिथं जायला हवं होतं, पण गेल्या दोन तीन महिन्यात चपला घ्यायला अन दुरुस्तीच्या निमित्तानं बायकोचं मदनच्या दुकानात जाणं नाथाला खटकत होतंच. आणि त्यावरुन त्यांचे दोन तीन वेळा वाद सुद्धा झालेले होते. अर्थात त्याची बायको, हो लग्न न केलेलीच होती, दिसायला होतीच तशी. इथं नाथाचं लक्ष मदनच्या बापावर होतं तेवढ्यातच सि बिल्डिंगमधुन सिव्हिल सर्जन मॅडम बरोबर माननीयांना पाहुन तो चमकला. इतर वेळी नाथानं हे एकत्र येणं ' आलं तिच्यायला एड्स कमी झाला का नाय बघायला' असं म्हणुन उडवुन लावलं असतं. पण आज काहीतरी वेगळं होतं. तो पटकन समोरच्या ओपिडि मध्ये घुसला. तिथल्या गर्दीत तो मिसळुन गेला. म्हणजे किमान त्याला तरी असं वाटत होतं, पण तिथंही त्याच्या मागं एकजण येतंच होता. उगाचच नाथानं एक दाताच्या डॉक्टरला भेट्ण्यासाठी केस पेपर काढुन घेतला आणि बाहेर दरवाज्याजवळ येउन थांबला. बाहेर गोंधळ अजुनच वाढला होता. शववाहिकेच्या आजुबाजुला आता बरीच गर्दी होती, पत्रकार लोक होते आणि सोलापुर लोकल केबल टिव्हीचा माणुस शुटिंग करत होता. गर्दीत माननीय बरेच हातवारे करुन बोलत होते, बाजुला एसिपि हो ला हो असा चेहरा करत उभ्रे होते. मागं सिव्हिल सर्जन मॅडम पण होतीच. प्रकरणाला वेगळंच वळण लागत होतं आणि हे प्रकरण हाताबाहेर जातंय का काय अशी शंका नाथाला यायला लागली.
संध्याकाळ पर्यंत आनंदला माननीयांना भेटताच आलं नव्हतं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आल्यानं दिवसभर ते त्याच कामात होते. क्लबमध्ये बसलेला असताना आनंदला निरोप आला की त्याला इरिगेशनच्या गेस्ट हाउसवर बोलावलं आहे. हाताखालच्या लोकांना क्लब लवकर बंद करण्याच्या सुचना देउन तो दोन कार्यकर्ते घेउन निघाला. इरिगेशन गेस्ट हाउसवर प्रदेशाध्यक्ष आल्यानं बरीच गर्दी होती. आनंदनं गाडी एका बाजुला लावली अन कार्यकर्त्यांबरोबर गेस्ट हाउसच्या बाहेर असलेल्या गर्दीत उभा राहिला. तिथं ओळ्खीचे बरेच जण होते. त्यांच्याशी बोलण्यात थोडा वेळ गेला, पण या प्रकरणामुळं त्याच्याशी कुणी फारसं बोलत नव्हतं. रात्र बरीच झाली, बाहेर लॉन वरच्या बैठकी आटोपुन प्रदेशाध्यक्ष आत गेल्यावर माननियांनी आनंदला आत येण्याचा निरोप दिला. आत गेल्यावर नमस्कार वगैरे करण्याच्या आधीच माननीय आणि प्रदेशाध्यक्षांनी डायरेक्ट आईबहिण काढायला सुरु केलं. एक तर मुळात या वेळात असली भानगड करायलाच नको होती आणि केलीच तर ही झालेली चुक निस्तरली जाय्ला हवी होती. पण आता ते शक्य नव्हतं समोरच्यानं एक पाउल उचललेलं होतं. माननियांनी मग नाथाला फोन लावला, बराच वेळ फोन उचलला गेला नाही. दोन तीन वेळा असं झाल्यावर माननीय भयंकर चिडले आणि नाथाला पण शिव्या घालायला सुरु केल्या. आनंदला तिथल्या तिथं जाउन नाथाला तिथं घेउन यायला सांगितलं. आजच्या दिवशी तालमीच्या लोकांपैकी फक्त नाथाच सोलापुरात होता अन बाकीचे कुठं गेले होते याचे फक्त अंदाजच केले जात होते.
नाथानं मुद्दामच फोन उचलला नाही, बरोबरची कुणी लोकं नसताना ह्या भानगडीत त्याला पडायचं नव्हतं, आणि जर आनंद किंवा अजुन कुणी बोलवायला आला असताच तर आयता मासा गळात पडला असता, नाथा घरातुन उठुन कार्यालयात गेला, एक दोन फोन केले, पंधरा मिनिटात १५- २० पोरं कार्यालयात आली. सगळ्यांना काय काय करायचं ते सांगुन नाथानं कार्यालय बंद केलं. मागं जाउन गणपतीच्या पाया पडला आणि घरी आला. गल्लीच्या या टोकापासुन ते त्या टोकापर्यंत तयारी झालेली होती. एक तास वाट पाहिल्यावर नाथा कंटाळला तशी पोरं सुद्धा कंटाळली. बंद दुकानाच्या बाहेरच्या कट्ट्यावर बसुन रात्री अकरा वाजता किती अन काय गप्पा मारणार नुसतं बसुन, बरोबर काय प्यायला नाय अन चकणा नाय. गल्लीच्या समोरुन एक चार चाकी सुसाट गेल्यावर मात्र पुन्हा सगळे सावधान बसले, तीच गाडी दोन तीन वेळा इकडुन तिकडं गेली आणि नंतर तांबटक-याच्या दुकानाजवळ थांबली. मागं अजुन एक जीप येउन थांबली होती. आनंद जीपमधुन खाली उतरला अन पुन्हा नाथाला फोन लावला. नाथा अंथरुणात जागाच होता, हात लांब करुन फोन घेतला, नंबर बघुन त्याच्या डोक्यात पुन्हा राग भरला. त्यानं अंगावरनं चादर झटकावी तशी बायकोला झटकली, अन उठुन किचन मध्ये गेला. स्वयपाकाच्या कट्ट्याच्या खाली कप्पा होता, तो उघडला, मागच्या बाजुच्या आमसुलं गच्च भरलेली बरणी होती ,ती काढुन ओट्यावर टाकायला सुरुवात केली. सगळी बरणी रिकामी झाली तरी त्याला किल्ली मिळाली नाही. किचनच्या दारात उभ्या राहिलेल्या त्याच्या बायकोकडं त्यानं रागानं पाहिलं ' ************, कुठं ठेवलीय किल्ली? तिनं शांतपणं सांगितलं ' गटारात टाकली परवाच', नाथा रागानं थरथरत तिच्याकडं आला, मगाशी त्यानंच प्रेमानं सोडलेले केस आता रागानं धरुन तिचं डोकं मागच्या भिंतीवर आपटलं, जीवाच्या आकांतानं ती ओरडली. त्याच आवाजात फोनची रिंग वाजायला सुरुवात झाली.
नाथा फोन उचलत नसल्यानं आनंदला अजुनच राग येत होता, पुन्हा पुन्हा तो फोन लावत होता. बोळातलं सगळे स्ट्रिट लाईट बंद होते, असलेल्या मिणमिणत्या उजेडात एक दोन कट्ट्यावर बसलेली माणसं पाहुन थेट आत जायचा विचार त्यानं झटकुन टाकला. त्यातच पुन्हा माननीयांचा फोन आला, फोनवर पण शिव्यांशिवाय काही नव्हतंच. त्याचा संयम आता सुटायला लागला होता, त्यानं जीपमधुन चार लोकांना उतरवलं आणि त्यांना घेउन आत निघाला. नुसतं नाथाला बोलवायला जायचं असल्यानं हातात दिसण्यासारखं काही घेउन जाणं शक्य नव्हतं म्हणुन अंगावर लपवता येतील तेवढीच हत्यारं घेउन चार पाच जणं पुढं निघाले. बोळाच्या आत दहा पंधरा फुट गेल्यावरच मागुन कोणीतरी येत असल्याची जाणिव होत होती. पण आता मागं वळणं शक्य नव्हतं, आनंद्चा फोन वाजला, नुस्ताच नंबर दिसत असल्यानं फोन कुणाचा आहे कळालं नाही आणि फोन घेईपर्यंत कट झाला, तो पुन्हा वैतागला. चिडुन सरळ अरगडे वाड्यासमोर जाउन उभा राहिला. वाड्याचा जाळीचा लोखंडी दरवाजा बंद होता. आतुन कुलुप लावलेलं. बरोबरच्या एकाला त्यानं पुढं जाउन नाथाला हाक मारायला सांगितलं, त्याच्या एका हातात फोन होता अन दुसरा हात पोटावर खोचलेल्या पिस्तुलावर होता. ' नाथा पैलवान ओ नाथा पैलवान ' रात्रीच्या अंधारात आवाज जरा जास्तच जोरात आला. हाक पहिल्या तीन खोल्या ओलांडुन पार नाथाच्या खोलीपर्यंत जाउन पोहोचली.
हाक आली तेंव्हा नाथाचं खोलीच्या भिंतीत असलेल्या कपाटाचं कुलुप तोडुन झालं होतं. आत मधल्या वरच्या कप्प्यात कपड्यांच्या ढिगामागचा एक लेदरचा पाउच काढला. त्यावेळी कपाळातुन येणारं रक्त एका हातानं थांबवत त्याची बायको त्याच्या पायाला पकडुन रडत होती. पाउच मधुन नाथानं हत्यार काढलं, गोळ्या भरल्या अन अंगावर शर्ट अडकवुन बाहेर निघाला. दरवाजाची कडी काढली, आधी एक फोन केला. रिंग बोळाच्या दुस-या टोकाला वाजली अन नाथा खोलीच्या बाहेर पडला. तो वाड्यातल्या अंधा-या बोळकांडातुन दरवाज्याजवळ येईपर्यंत बाहेरचा बोळ दोन्ही बाजुंनी पॅक झाला होता. बाहेर मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन्ही गाड्याच्या बाजुला एक एक चार चाकी टेम्पो येउन उभे राहिले होते. सगळं काही नाथाच्या प्लॅननुसार होत होतं. समोर अंधारातुन कुणी येतंय का नाही हे दिसत नसल्यानं दाराबाहेर उभ्या असलेल्यानं पुन्हा एक हाक मारली ' ओ नाथा पैलवान' '*************** येतोय बे भडव्या, जास्त खाज सुटलीय का *****' त्या हाकेला नाथानं उत्तर दिलं अन खोलीचा दरवाजा धाडकन ओढुन बाहेरुन कडी घालुन घेतली. हत्यार नाथानं पँटच्या खिशात ठेवलं होतं. चपला घालायचा प्रश्नच नव्हता, बोळातुन सरळ दाराजवळ येउन नाथानं पुन्हा त्या हाक मारणा-याला शिव्या दिल्या, दाराचं कुलुप काढलं, बाजुच्याच एका कोनाड्यात कुलुप किल्ली ठेवली अन दरवाजा उघडुन बाहेर आला. समोरच आनंद अन त्याची चार लोकं उभी होती.
' तिच्यायला, कोणय बे रात्रीचं हाका मारायलय, तुमच्यायला माज आला काय जास्त भडव्यांनो ', याला उत्तर देण्याच्या मुडमध्ये आनंद नव्हता. तो जमेल तेवढ्या शांतपणे समोर आला ' पैलवान, मी भांडायला आलो नाय इतं, साहेबानं तुला घिउन यायला सांगितलंय गेस्ट हाउसला, चल' , वाड्यच्या द्गडी पायरीवर बसत नाथा हसला, ' का बे, तुझा तो भडवा माननिय माझा सासरा लागतो का बे, तिच्यायला त्याला सांग भेटायचं असेल तर ये इथं मंडळात, का गांडीला घाम येतो का त्याच्या काय तालमी जवळ यायला' आनंदला हेच अपेक्षित होतं. ' नाथा हा वक्त आपसात भांडायचा नाय, जे झालं ते चुकिनं झालं हे तुला पण माहितंय, उगा लांबट लावण्यानं काय होणार नाय, तु चल साहेबाबरोबर बसु, बोलुन सगळं मिटवुन टाकु. सकाळी साहेब गेले होते सिव्हिल मध्ये त्या पोराच्या घरच्यांना भेटायला, त्या पोराच्या भावाबरोबर झालंय बोलणं साहेबांचं, ते मिटवुन घेतोय आम्ही, तुमाला काय ताप नाय होणार त्याचा' नाथाचे हात पाय थरथरत होते, ' भाडखाव, अबे म्हणजे चुकला नसता तर कुणाला लावलं असतं धर्माला, होय बे ***********च्या, हां आणि मिटवलं म्हंजे काय बे, ते पोरगं मिळणारय का परत त्याच्या आय बापाला. हे पाह्यलं का, ' दोन्ही पाय त्याच्या समोर नाचवत नाथा म्हणाला. आनंद तसा ही मनातुन घाबरलेला होताच ते बिन चपलेचं पाय बघुन तो अजुनच घाबरला. तरी उसनं अवसान आणुन बोलला ' ए उगा नाटकं नको करु *****, इथं काय तुझ्या बारशाला नाय आलो, गप बोलावलंय तर चल गुपचुप नायतर पाय मोडुन घेउन जाईन तुला. एकतर तुला मागं नाय ना पुढं, एकटा खुरडत खुरडत -हाशील जिंदगीभर' एवढं बोलुन त्यानं पोटावर लावलेलं पिस्तुल काढलं अन....


Print Page

Tuesday, November 8, 2011

चपला आणि सत्कार - भाग ५


अशोक नाथाच्या घरी आला होता, सिव्हिल मध्ये काय झालं ते सांगायला ...
नाथानं दोघांना हाकलुन दिलं आणि लाईट बंद करताना बायकोच्या शिव्या खात व तिला शिव्या देत तो घराबाहेर पडला. आपली आवडती सुझुकी घेउन तो डायरेक्ट समाचार चौकात आला, एका बोळातल्या घरी जाउन दोन जणांना उठवलं आणि चार गोष्टी सांगितल्या, दोन बंडलं दिली अन पुन्हा घरी आला. तो घरी येउन, त्याच्या बायकोनं दरवाजा उघडुन त्याला आत घेईपर्यंत समाचार चौकातुन एक ओम्नी सात रस्ता क्रॉस करुन गेली होती विजापुरच्या दिशेनं, आणि तिचा ड्रायव्हर हणमंता त्या बिचा-या ओम्नीला ताण ताण ताणत होता. गाडी खड्यातुन गेल्यावर मागं बसलेला कुमार त्याला ओरडत होता ' अबे, एखादं माल उडाला ना कोपचितुन थेड गांडीत घुसेल तुझ्या, हळु जरा खड्डे बिड्डे बघ की भाड्या '. तेवढा विचार करायला हणमंताला वेळ नव्हता, एकतर बिनचपलेची गाडी चालवणं त्याला अवघड होत होतं अन ही किरकिर. नाथानं दिलेले टायमिंग बरोबर असतील तर त्याला मोठा मासा मिळणं अवघड होतं पण छोटा मासा म्हणजे बांगरे तरी निश्चित मिळालाच असता, पण आज त्याचं नशीब जरा जास्तच चांगलं होतं, आटिओला कुणी अडवलं नाही की चेकपोस्टला कुणी अडवलं नाही कि पुढं राज्यसीमेला पण नाही. हणमंता आता पुरता मुडमध्ये आला होता, गाडी चालवायच्या आणि माल चालवायच्या पण. पाच वर्षं जुनी ओम्नी अगदी जिवावर येउन ७०-८० च्या स्पिडनं विजापुरकडं जात होती.
नाथा घरी येउन झोपला पण फॉरेस्टच्या रेल्वे क्वार्टरच्या मागे असलेल्या कॅरम क्लबमध्ये मात्र सुनसान शांतता होती. आनंद चव्हाण त्याच्या पित्त्यांवर चिडुन होता, बांगरेची सायकल कुठं गेली आणि तो एमएटिवाला हॉस्टेलमधुन कुठं गेला. बांगरेची सायकल गेल्याचं कळाल्यावर त्यानं मुश्ताकचं जाणं कॅन्सल केलं होतं पण त्याच्याच हट्टामुळं त्याला रात्री ऐनवेळची गाडीची व्यवस्था करुन पाठवावं लागलं होतं त्याचं टेन्शन होतंच. तिकडं अशोकनं दिलेली ओसि संपल्यावर सिव्हिलच्या शवागाराच्या शिपायानं करुन आनंदला दिलेली माहिती त्याच्या रागात भर घालत होती , यावेळी एका अगदीच अनोळखी माणसाला यात गोवण्यात आलं होतं त्यामुळं नेहमीच्या माणसांच्या हातुन काम न करुन घेण्याची त्याची आयडिया त्याच्याच विरुद्ध वापरली जात होती. शेवटी रात्रीचे साडेतीन वाजले तेंव्हा दोन तीन जणं घरी गेली अन बाकीचे तिथंच टेबलं जोडुन झोपायचे तयारीला लागले, तेंव्हाच आनंदला मुश्ताक विजापुरला पोहोचल्याचा फोन आला अन त्याचं निम्मं टेन्शन कमी झालं आणि तो पण झोपुन गेला.
नाथा पहाटेच उठला अन आंघोळ वगैरे आवरुन तालमीजवळ गणपती ठेवलेल्या शेडमध्ये आला, शेडमध्येच झोपलेल्या कार्यकर्त्यांना उठवुन तो आता गेला, दिवा लावला आणि दोन उदबत्त्या ओवाळुन ठेवल्या. तिथल्याच मागच्या पोत्यातले चार नारळ काढुन एका पिशवीत घेतले, गणपतीसमोरच्या डब्यातुन अरगजा घेउन एक पुडी बांधुन घेतली अन तडक बाहेर पडला. सुझुकी घेउन थेट गणपती घाटावर आला, रात्री मिळालेली बातमी अन सिद्धेश्वर तळ्याच्या बाजुचं पहाटेचं थंड व शांत वातावरण यानं तो उत्साहित झाला. सुझुकी सेंट्रल टॉकिजच्या बाजुला लावुन पिशवी घेउन नाथा चालत निघाला. घाट उतरुन गणपतीच्या देवळात बाहेरुनच नमस्कार केला, बाहेर पायरीवरच थोडा अरगजा वाहिला, एक नारळ फोडला अन पुन्हा गाडीकडं आला, लांबुनच त्याला त्याच्या गाडीजवळ उभी राहिलेली ओम्नि दिसली. झपाझप पावलं टाकत नाथा गाडीकडं आला, मागचा दरवाजा सरकावुन आत वाकुन पाहिलं, हसला आणि बाहेर थुंकुन चार शिव्या दिल्या. खिशातुन अजुन एक बंडल काढुन हणमंताला दिलं अन तो गेला की लगेच परेशला फोन लावला.
इकडं आनंद सकाळिच क्लब बंद करुन घरी आला तेवढ्यातच त्याचा मोबाईल वाजला अन कालच्या गाडीच्या ड्रायव्हरनं विजापुरहुन परत येताना गाडी बंद पडल्याचं आणि तुम्हीच पाठवलेल्या एका व्हॅनमध्ये दोघेजण येउन बांगरेला घेउन गेल्याचं सांगितलं. यावर्षी घरच्या आणि मंडळाच्या गणपतीला फोडलेले नारळ नासकेच निघाले होते, त्याचा हा परिणाम आहे का काय असं त्याला वाटायला लागलं. त्यानं लगेच माननियांना फोन लावला, म्हणजे हे माननिय ४ वर्षापुर्वीपर्यंत वर्षातले कमीत कमी २ महिने तरी जेल मध्ये असायचे आणि उरलेला वेळ जिल्ह्यातुन तडीपार, पण एका मोठ्या पक्षाचे दोन तुकडे झाले अन असे बरेच जण रात्रीतुन माननिय झाले होते, हे त्यापैकीच एक. माननीय झाल्यावर एक हॉटेल आणि एक शाळा असे मुख्य उद्योग सुरु केलेले असले तरी, मुळच्या धंद्याशी इमान राखुन होते. अजुन माननीयांची आंघोळ झाली नाही, असं त्यांच्या एका कार्यकर्त्यांनं सांगितल्यावर, फोनवर बोलण्यापेक्षा डायरेकट बंगल्यावर गेलेलंच बरं असा विचार करुन आनंद निघाला. पंधरा मिनिटात एक लाल अल्टो त्या अलिशान बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर थांबली. ग्रे कलरचा सफारी घातलेला आनंद त्यातुन बाहेर निघाला अन गाडी लॉक करुन झटपट बंगल्याच्या मुख्य दरवाज्यातुन आत गेला. अर्धा तासानं जेंव्हा तो बाहेर आला तेंव्हा त्याच्याबरोबर अजुन दोघं जण होती अन त्याच्या गाडीच्या मागं मागं एक पांढरी स्कॉर्पिओ निघाली.
दोन्ही गाड्या माननीयांच्या संपर्क कार्यालयाजवळ येउन थांबल्या, आनंद बरोबर जे होते ते दोघं जण उतरुन निघुन गेले आणि आनंद गाडीतच बसुन राहिला. तिथं अर्धा तास बसुन त्याची अस्वस्थता वाढतच होती, त्यातच त्याच्या फोनवर बांगरेच्या मुलीचा फोन आला, अण्णा कधी घरी येणार आहेत अन कुठं आहेत या तिच्या दोन्ही प्रश्नांना आनंद कडं आत्ता तरी काहीच उत्तरं नव्हती. तो शांतच राहिला. संपर्क कार्यालयातुन एक जण पाकीट घेउन बाहेर आला अन आनंद्च्या गाडीत बसला. आनंदनं त्या रहदारीच्या रस्त्यावरच यु टर्न मारत गाडी स्टेशनसमोरच्या काडादी चाळीकडं घेतली. तो तिथं पोहोचेपर्यंत त्याच्या बरोबरचा माणुस त्याला बरंच काही सांगत होता, त्यातलं बरंच त्याला कळत होतं, बरंच डोक्यात घुसतच नव्हतं. स्टेशनच्या पार्किगमध्ये गाडी लावुन ती दोघं चालत काडादी चाळीत आले, आतल्या बाजुच्या १२ नंबर चाळीतल्या खालच्या मजल्यावरच बांगरेचं घर होतं. त्याची मुलगी बाहेरच भांडे घासत होती. आनंदला कोणाबरोबर तरी येताना पाहुन तिनं हात धुतले, कमरेला गुंडाळलेली ओढणी काढुन गळ्यात घेतली अन दारासमोरची भांडी बाजुला करत घरात गेली. आनंद दरवाज्यात उभा राहिला तेंव्हा आत बांगरेची बायको पुढच्या खोलीतल्या कॉटवर बसुन भाजी निवडत होती. ' येउ का वहिनी आत ?' आनंद आवाजानं तिनं वर पाहिलं अन काहीतरी बिघडल्याचं तिच्या लक्षात आलं, तिच्या हो किंवा नाही म्हणण्यानं आनंद काही थांबणार नव्हता. आनंद आणि त्याचा बरोबरची व्यक्ती दोघं त्या कॉटवर बसेपर्यंतच ते घर शांत होतं, ते बसल्या बसल्या बांगरेच्या बायकोनं आनंदला जे शिव्याशाप द्यायला सुरु केल्या त्याला काही उत्तर त्यावेळी तरी आनंद कडं नव्हतं, तो फक्त हा रागाचा भार ओसरण्याची वाट पाहात होता.
नाथाला परेशच्या घरात यायला कुणाला विचारावं लागायचं नाही, दुकानाच्या बाजुच्या जिन्यानं तो सरळ वर आला, चपला काढुन 'नाजुक ब्राम्हणा आहेस का घरात ?' असं मुद्दाम बायकी आवाजात हेल काढत विचारलं. परेशची आई अन बायको एकदमच बाहेर आल्या. ' या नाथा भावोजी' परेशच्या बायकोनं सासुवर एक पॉईंट मिळवला आणि पुन्हा आत निघुन गेली. नाथानं परेशच्या आईच्या पायाला हात लावत नमस्कार केला अन रस्त्याकडच्या खिड्कीच्या जवळ ठेवलेल्या बाकड्यावर बसला. ' काय म्हणताय सासुबाई, हल्ली दिसत नाहीत ओ परेश शेट दुकानात जास्तीचं, कधीपण विचारा त्या पोरींना, मालक वर हायंत एवढंच सांगतात' चेष्टेच्या सुरात नाथा बोलला, ही चेष्टा त्याला बारा तासापुर्वी सुचली नसतीच. परेश येउन त्याच बाकड्यावर बसला, दोघांच हळु आवाजात कुजबुजणं झालं. परेशची बायको चहा घेउन आली तेवढाच वेळ दोघं शांत होते.
इकडं बांगरेची बायको शांत झाल्यावर आनंदनं तिला सांगितलं की, बांगरे काल विजापुरला गेला आहे, आणि परत यायला ७-८ दिवस लागतील. तेवढ्यात, बाहेर एकजण आला आणि बाहेरुनच ओरडला ' मावशी, अण्णांची सायकल ठेवलीय बाहेर, आत्ता एकजण टेम्पोमधुन बाहेर पानटपरीला टाकुन गेलाय ' आता मात्र आनंदची टरकली, बांगरे सायकल क्लबला ठेवुन विजापुरला गेल्याचं त्यानं सांगितलं होतं. आता, बांगरेच्या बायको आणि मुलीच्या रडण्याला काय उत्तर द्यावं त्याला काहीच सुचेना. मगाशीचा दंगा आणि आत्ताचं रडणं ऐकुन चाळीतल्या बाकीची लोकं जमा झाली, दोनच मिनिटात ती छोटीशी खोली भरुन गेली. आनंदला बाहेर जायचं पण मुश्किल झालं. गर्दीतुन एकाचा आवाज आला, ' मावशी, पोलिसला कळवा झाटदिशी, निस्ती भानगड नको तिच्यायला', त्या परिस्थितीत बांगरेच्या बायको आणि मुलीला हा पर्याय जास्त जवळचा वाटला अन त्या दोघी घरातुन बाहेर निघाल्या, तसं आनंदची डोकं सरकलं. या भानगडीत पोलिस आले असते तर अजुनच गोंधळ वाढला असता. पण एवढ्या लोकातुन बाहेर जाउन त्यांना थांबवणं सुद्धा फार अवघड होतं. गर्दी कमी झाली तसा तो आणि त्याचा जोडीदार बाहेर निघाले. चाळीच्या मोठ्या दारातुन बांगरेची बायको, मुलगी अन बरोबर १०-१५ बायका बाहेर पडत होत्या. तिथंच गाडी थांबवत आनंद उतरला आणि त्या दोघींच्या हातापाया पडुन त्यांना गाडीतुन पोलिस स्टेशनला घेउन जातो असं सांगुन त्यांना घेउन निघाला.
नाथा परेशच्या घरुन निघुन गंगाविहिरीच्या बाजुनं चौपाडच्या विट्ठल मंदिरात आला, उरलेले दोन्ही नारळ तिथं फोडले मग तिथल्या पुजाराच्या घरातुन मागच्या खारपेंडीच्या दुकानात गेला. तिथं बसलेल्या ४-५ लोकांबरोबर ब-याच बोलाचाली शिव्यागाळी झालं अन मग घरी आला. जेवायची वेळ तर होउन गेलेलीच होती. त्याची बायको बाहेरच गाडीवर भाजी घेत होती, ' ऐ बये, संपले की गणपती, जरा मासं कर की घरात, तिच्यायला बामणाच्या पोरी ह्या असल्याच, कधी कळायचं काय म्हाईत' , भाजीवाला अन बरोबर उभारलेल्या बाकीच्या बायका फिसक्क्न हसल्या तशी नाथाच्या बायकोला राग आला, घेतलेली भाजीची पिशवी तिथंच आपटली ' आणा मासे आणा, कोंबडे आणा, बकरे आणा आणि खा तुम्हीच , मी मरते उपाशीच, कशाला सोडलं बाबांचं घर अन आले या ठोकळ्याचं मागं काय माहित' बडबडत ती आत निघुन गेली. मागं मागं नाथानं गुपचुप पिशवी उचलली, भाजीवाल्याला वीस रुपये दिले अन आत गेला. आता बाकीच्या बायका जास्तच जोरानं हसायला लागल्या. नाथा खोलीपर्यंत पोहोचलाच होता तेवढ्यात रात्री अशोकला सोडायला गेलेला त्याचा कार्यकर्ता पळत पळत आला, धापा टाकत टाक्त तो सांगायला लागला ' पैलवान, मदनचे घरचे सिव्हिलला चाललेत बाडी आणायला' , एक पाय पायरीवर ठेवलेला नाथा थबकलाच, काय करावं त्याला काहीच सुचेना. तो गपकन तिथंच खाली बसला पायरीवर.
मार्चला राहिलेला बारावीचा गणिताचा पेपर ऑक्टोबरला काढतो म्हणालेला, रात्री काय येत नाही, गाडीतच झोपतो पण उद्या सकाळी चहा तर घरीच घेणार म्हणुन मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीला गेलेला पोरगा, आज तीन दिवस झाले घरी आला नव्हता. मंडळातली पोरं काय नीट बोलत नव्हती. मदनचा बाप दोन दिवस वाट बघुन कंटाळला होता, पण काल पेपर मध्ये आलेल्या बातमी वाचुन ' मन चिंती ते वैरी न चिंती' म्हणतात तसं त्याच्या मनाला घोर लागलेला. मदनचा मोठा भाउ सुरत वरुन आल्या आल्या घरातली रडारडी झाल्यावर ती दोघं अन काही बाकीचे नातेवाईक पोलिस स्टेशनला जाउन आले, तेंव्हाच त्यांना तशीच एक बॉडी सिव्हिलला असल्याचं कळालेलं होतं. मदनचं घर दक्षिण कसब्यात होतं. औरंगाबादवरुन दोन वर्षापुर्वी ही लोकं धंद्याच्या निमित्तानं इथं आलेली. नाथाच्याच ओळखीनं हुतात्मा बागेजवळ एक खोकं घेउन तिथं चपलांचं दुकान टाकलेलं होतं. जातींनं चांभार नसला तरी मुंबईला बरीच बर्षं चपलांच्या धंद्यात नोकरी करुन मदनचा बाप याच धंद्यातला झाला होता. दोन पोरांपैकी मोठा सुरतला केमिकल कंपनीत फोरमन होता अन धाकटा मदन इथंच दुकानात बसायचा. संभाजी शिंदे कॉलेजला जायचा, थोडा उडाणटप्पुचं, मुंबईच वारं अंगात होतं. महिन्यातुन एकदा तरी मित्राकडं म्हणुन मुंबईला दोन तीन दिवस जाउन येणारा होता. गेलं वर्षभर तालमीत येत होता, आधी फक्त जिमलाच यायचा पण नंतर बाकी कामांमध्ये पण यायला सुरु झाला.
कसब्यातली मंडळं तशी मवाळच,मंडप टाकुन मठपती लायटिंगवाल्याकडुन माळा आणुन सोडल्या की नंतरचे आठ दिवस पत्ते खेळायला आणि एक दिवस सत्यनारायणाची पुजा एवढाच कार्यक्रम राबवणारी. त्यामुळं लांब राहायला असला तरी मदन जिम बरोबरच मंडळाकडं पण आकर्षित झाला. झांज पथकात अजुन वर्णी लागलेली नव्हती. पण बाकीची कामं करायला तो नाथाबरोबर फिरायचा. फार जवळचा झालेला नव्हता तरी नाथाला मदनबद्दल काहीतरी वाटायचं. तर हा असा मदन, विसर्जानाच्या रात्री गुलालानं रंगलेल्या मदनच्या चेह-यानं आणि मुश्ताकच्या दारुनं तारवटलेल्या डोळ्यामुळं मुश्ताकला ओळखता आला नाही आणि हकनाक जीव गमावुन बसला, बरं हा काही ' होता जिवा म्हणुन वाचला शिवा' असला ठरवुन केलेला प्रकार नव्हता, त्यामुळं ज्यांनी मदनला उचललं गेलं ते नक्की कुणाला उचलायला आले होते हे समजणं फार अवघड झालं होतं. त्यासाठी आज सकाळी पकडलेला बांगरे नाथासाठी फार महत्वाचा प्यादा होता, हणमंतानं त्याला मोहोळच्या आश्रमशाळेत पोहोचवला असणारच होता एव्हाना. पण ते अजुन नक्की कळालेलं नव्हतं.
इकडं आनंद, बांगरेची बायको आणि त्याची मुलगी पोलिस स्टेशनच्या बाहेर उभारले होते, नेहमीच्या ओळखीच्या एक दोन हवालदारांबरोबर नमस्कार चमत्कार करुन झाल्यावर एकदाचं स्टेशन जमादारानं त्यांना आत बोलावलं, आत गेल्या गेल्या बांगरेच्या बायकोनं पुन्हा रडायला सुरुवात केली जसं काही त्या जमादारानंच तिच्या नव-याला आत टाकलं होतं. त्या पोलिस स्टेशनमधल्या कुणालाच हे प्रकार नवीन नव्हते. आरडा ओरडा कमी झाल्यावर जमादारानं ड्युटिवरच्या लेडिज हवालदाराच्या ताब्यात त्या दोघींना दिलं अन तो आनंद बरोबर बाहेर आला. लेडिज हवालदारानं बांगरे मावशीची कहाणी ऐकली, तिची मुलगी गप्पच होती, दोघीची पोलिस् स्टेशनला पहिल्यांदाच आलेल्या. दहा मिनिटात सगळं ऐकुन लेडिज हवालदारानं एका कागदावर सगळं लिहुन काढलं, अन त्या दोघींना बाहेर झाडाखाली बसायला सांगुन तो कागद घेउन जमादाराकडं गेली. आनंदचं तोपर्यंत जमादाराला पटवुन झालेलं होतं. जमादारानं बांगरेच्या बायको व मुलीला बोलावलं अन नेहमीच्या सवयीनं विश्वास दिला, उद्या सकाळी यायला सांगुन तिथुन कटवलं. त्या वेळेपुरता तो खिशातल्या पाचशेच्या दोन नोटांना जागला होता. त्या मायलेकिंना काडादी चाळीच्या दाराजवळ सोडताना मुलीच्या हातात आनंदनं शंभरच्या नोटांचं एक बंडल दिलं.

Print Page