Tuesday, November 30, 2010

चांदोमामा.

आमच्या घराच्या खिडकीतुन घेतलेली ही चंद्राची काही छायाचित्रे.

हां एक दोन वर्षा पुर्वीचा, चंद्र थोडा तरुण असतानाचा फोटो.
हर्षद 




भाग -२ भुलेश्वर - एकदा जा नक्कीच...

पहिल्या भागाच्या प्रतिसादासाठी अतिशय धन्यवाद. काही फोटो राहले होते, ते तेंव्हा फार महत्वाचे वाटले नाहीत म्हणुन ते टाकले नव्हते, ते आता टाकत आहे. सर्वांना आवड्तील अशी अपेक्षा आहे.
हेमाड्पंती बांधकामाचा पुरावा या खांबांचा जोड पाहा,त्यात कोठेही काही भरलेले नाही.

या देवळांतच गर्भग्रुहाच्या बाजुला अश्या खोल्या आहेत, ज्या मध्ये विविध देवांची स्वतंत्र मंदिरे होती.

या आहेत,मंदिरात आत गेल्या गेल्या उजवीकडे असणा-या पाय-या,जे काही आहे ते या पाय-यांच्या वर आहे.

मंदिरात आत गेल्या गेल्या जी ओसरी आहे हे तिचं छत.

आणि हे एक आश्चर्यच होतं निदान माझ्यासाठी तरी,शंकराच्या मंदिरात चक्क शेषशायी विष्णुची प्रतिमा आणि मंदिर. हे जर चांगल्या अवस्थेत असतं ना तर...

त्याच वरच्या मंदिराचा जबळुन घेतलेला फोटो.

आता भुलेश्वरला जाणा-यांची संख्या वाढेल असं वाटतंय 
हर्षद 

Saturday, November 27, 2010

कट्यार काळजांत घुसली

किंचित मंद उजेड, दोन बॆठका, एक तसबिर,मागच्या कोनाड्यात मुरलीधराची मुर्ती आणि कुणाची तरी कुठेतरी जायची तयारी  चालु आहे.  अरे हि तर उमा, घर सोडायची तयारी करते आहे. हो पण तिच्यावर हे घर सोडायची वेळ का यावी? जाउन विचारावं का?  नको ही मोठ्या घरची माणसं आपण आपलं थोडं हातभर अंतर राखुनच रहावं. हे काय दिवाणजी पण आले, म्हणजे नक्की काहीतरी झालंय त्याशिवाय अशा मोठया हुद्द्यावरची माणसं सहजासहजी दिसत नाहीत होत हो.

थांबा थोडं इथंच आणि पाहु काय आहे प्रकार तो. काय ! छे छे हे कसं होईल, अशक्य असं कसं झालं. म्हणजे आता मला संगीत्तातलं काही कळत नाही पण पंडित भानुशंकर म्हणजे विश्रामपुरची शान होते, ते हरले कालच्या मॆफलित,आणि ते ही खानसाहेबांकडुन.

होय मित्रांनो, मी कट्यार काळजांत घुसली बद्दल बोलतोय. काल गेलो होतो पाहायला, बालगंधर्वमध्ये. यातली पदं माहित होतीच पण प्रत्यक्ष नाट्क पाहायचा योग काल आला, राहुल देशपांडेंनी खानसाहेबाची भुमिका केली आहे. आता नाटक दोन अंकी आहे, म्हणजे आधि किती मोठं होतो मला माहित नाही पण मोठं असावं असा अंदाज.

संगीत नाटक ही संस्था जिवंत राहिली पाहिजे, त्यासाठी या आमच्या पिढितली जे कलाकार उभे आहेत त्यापॆकी राहुल देशपांडे एक, त्याबद्दल त्यांचे अतिशय धन्यवाद व अभिनंदन. बाकी खेळ चांगला झाला. इतर कलाकारांची नावे काही लक्षात राहिली नाहीत, म्हणजे मध्यंतरात आम्ही वडे खायला गेलो होतो ना त्यामुळं थोडं चुकलंच.

सदाशिवची भुमिका करणारा अभिनेता पण खुप छान म्हणत होता पदं, खास करुन शेवटचं, खानसाहेबांनी अर्धवट ठेवलेलं ’ सुरत पियाकी’ जेंव्हा तो पुर्ण करतो ना ते अतिशय सुंदर म्हणलं.

तो आणि राहुल, या दोघांच्यात पदं म्हणताना होणा-या हालचाली आक्रमक होत्या, ही शास्त्रिय गायकांची पद्धत असते की संगीताची जादु माहित नाही, कारण माझे पण हात आपोआप हलत होते. मध्यंतरात काही जुन्या (म्हाता-या) पुणेकरांकडुन अंतु बर्वा आणि रावसाहेबांसारख्या प्रतिक्रिया ऎकायला मिळाल्या त्या अशा -

पुर्वी पदं पुर्ण म्हणायचे,ऎकलीत आम्ही, आता सगळे शॊर्टकट मारता आहेत.
राहुल वाटतो थोडा थोडा आमच्या वसंतरावांसारखा,पण तेजोनिधि गावं ते आमच्या अभिशेकीबुवांनीच हो.

मनांत म्हणलं, ह्यांना रथ पुढं सरकतोय याचं कॊतुक नाही तर त्याच्या वेगाबद्दलच शंका, असो उद्या आम्ही पण कुमार शानु आणि सुनिधिच्या गाण्यांबद्दल असेच बोलु,कोणि सांगावं.

बाकी माझ्यासारख्या ऒफिसला येताजाता कानाला इअरफोन लाउन हि गाणी ऎकणा-या साठी ती प्रत्यक्ष ऎकणे हा एक खुप छान योग होता. पार ’ लागी करेजवां’, ३ वेगवेगळ्या प्रकारानी गायलेलं ’ घेई छंद मकरंद’, ’ या भवनातील’ ’तेजोनिधि लोहगोल’,’ मध्येच आलेली रागमाला आणि शेवटचं ’ सुरत पियाकी’ ते ही दोन वेळा, एकदा खानसाहेबांच्या कडुन आणि नंतर सदाशिवाकडुन, म्हणजे आनंदाच मेळाच होता.

राजकवींची विनोदाची पखरण अतिशय उत्तम, त्या कलाकारानं अतिशय छान भुमिका केली आहे,’ आपल्या प्रेमळ परवानगीने आपला मुका’ हा द्वयर्थी संवाद लक्षात राहतो.

माझ्या स्वभावाला अनुसरुन काही तांत्रिक गोष्टी खटकल्याच, पंडितजी आणि खानसाहेब दोघांच्या तसबिरी तसबिर न वाटता फोटो वाटत होते. नेपथ्य थोडं अजुन सावरायला हवंय, विशेषत: हवेलीतल्या पाय-या रंगवायल्या हव्यात. तसेच, विंगेतुन येणारा प्रकाशामुळे कलाकार येण्याआधीच त्याची सावली रंगमंचावर येते,ह्या काही बाबी. खानसाहेबांचे दोन पुतणॆ प्रत्येकवेळी तानपुरा ठेवुन जाताना जी गडबड करतात तेंव्हा तो पडतो की काय वाटतो,त्याचं काहीतरी पाहायला हवं.

सदाशिव हवेलीत बद्री म्हणुन वावरतोय हे फक्त संवादातुनच सुचित केलं जातं हे थोडं खटकतं.तसेच राहुल देशपांडेंचा मेक अप ही जरा भडक वाटतो, केस सगळे काळे असताना डोळ्याखाली एवढि काळी वर्तुळं बरोबर वाटली नाहीत. अर्थात ही माझी मतं आहेत.

पण एकुणच या संगीत नाटकांच्या सुवर्ण काळात न जन्मल्याचा पश्चाताप जास्तच होतो आहे.

Thursday, November 25, 2010

भुलेश्वर - एकदा जा नक्कीच...


भुलेश्वर बरेच दिवस मनांत होतं पण होत नव्हतं शेवटी जुलॅ महिन्यात एका रविवारी जमवलंच. मी,अश्विनी,आई व ह्रुषीकेश होके मिंटी मँ सवार, निघालो. वारजे ते यवत साधारण १ तास लागतो.
यवतच्या अलीकडे - पूण्याकडुन सोलापुर कडे जाताना, उजवीकडे एक कालव्याच्या बाजुने रस्ता आत जातो, तोच रस्ता भुलेश्वरकडे जातो. एकदा उजवीकडे वळलं की सतत एक टेलिफोन टॉवर दिसत राहतो. तोच आपल्याला गाठायचा असतो हे लक्षात ठेवा. खबरदारी या गोष्टीची घ्यावी लागते की, शेवटचा घाट हा फार अवघड आहे, फक्त एक म्हणजे एकच चार चाकी जाउ शकते.
आता मंदिरा बद्दल - हे एका टेकडीवर असलेल्या पठारावर आहे. बाहेरुन मंदिर मोठ्या वाड्यासारखे दिसते. उन्हातुन आत गेलात तर वाटेल की समोर मुर्ती पण नाही आणि सग़ळा अंधार आहे. या अंधाराला थोडे डोळे सरावले की डाव्या बाजुला पहा एक दिड फुटी या मापाच्या ४ पाय-या आहेत.
त्या चढुन वर गेलात की मग आधी लक्ष जातं ते या नंदीकडे. अतिशय रेखीव्,प्रमाणबद्ध खुप मोठा आहे.
आता डोळे या पुढच्या मंदिरच्या भव्यतेच्या तयारीत असतांत्,आणि ती अशी आहे. मी फार लिहित नाही या छायाचित्रांनाच बोलु देत.
हे नक्षीदार खांब
हे छत तोलुन धरणारे गंधर्व (बहुधा, जाणकारांनी खुलासा करावा)
ही पिंड, ह्या पिंडीच्या खाली पुन्हा पिंडी आहेत, तसेच या पिंडीला असणा-या छिद्रातुन भुंगे बाहेर येउन त्यांनी यवन सॅन्याला पळबुन लावल्याच्या कथा हे पुजारी सांगतीलच.
आणि हे मंदिरातल्या नक्षीकामाचे असंख्य नमुन्यांपॅकी काही..
ही स्त्री गणेशाची प्रतिमा आहे, आम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिली.
आणि ही बहुधा स्त्री कार्तिकेयाची (जाणकारांनी खुलासा करावा)
संपुर्ण मंदिराची, म्हणजे गर्भग्रुहाची बाहेरची भिंत अशा नर्तकींच्या मुर्तींनी नटवलेली आहे.
हे शिल्प गंगावतर्णासारखं वाटलं मला (पुन्हा तेच जा.खु.क.)
या जाळ्या अखंड दगडात कोरलेल्या आहेत.
सुरुवातीला भेटलेल्या नंदीचे जवळुन घेतलेले छायाचित्र
काही खांबावर अशा नर्तकी आहेत.
मंदिरात काही मॅथुन शिल्पं ही असावीत्,त्यातली काही पुन्हा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हे मुळ मंदिर संपुर्ण दगडी आहे, तर बाहेर्च्या बाजुला पेशव्यांनी या मंदिराचा मातीच्या बांधकामांत जिर्णोद्धार केलेला आहे.
पाउस पडायला सुरुवात झाल्यानं त्याची छायाचित्रे काढता आली नाहीत.
आपणां सर्वांना नम्र विनंती आहे की, पुण्यात असाल तर ३-४ महिन्यांत एकदा आणि नाहीतर जंव्हा याल तेंव्हा भुलेश्वरला जरुर भेट द्या.
हर्षद.

Monday, November 22, 2010

आज अचानक गाठ पडे ..

काही वर्षे झाली त्याचा शोध घेणं सोडुन दिल्याला, शाळेत असताना  विवेकानंद आणि काही इतर जणांची पुस्तकं वाचुन मनाचे विचार एकदम प्रग्लभ वगॆरे झाले असं वाटलं होतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा द्रुष्टिकोनच बदलला होता. त्यात भर म्हणुन पुढच्या शिक्षणासाठी गावातल्या सिद्धस्वामी मंदिराची शिष्यव्रुत्ती मिळालेली आणि त्या साठी त्यांच्याच संस्थेच्या कॊलेजात जावं लागलं. तिथल्या त्या सकाळ संध्याकाळच्या प्रार्थना,ध्यान या मुळं तर सामान्य जीवनाबद्दलचं आकर्षणच नाहीसं झालं अशी वेळ आली होती.

शिक्षण संपलं आणि शेजारच्याच गावांत नोकरीवर रुजु झालो. द्र्र शनिवारी रविवारी गावाला यायचो, आई, बाबा व मोठी बहीण यांच्या सोबत दोन दिवस मजेत जायचे आणि परत नोकरीच्या गावी आल्यावर त्या सगळ्या गोष्टी फोल वाटायच्या. सहा महिन्यांतच आईनं मोहिनीचं, म्हणजे माझी मोठी बहीण, तिचं लग्न ठरल्याचं सांगितलं. मनांत विचार आला, बहुधा माझ्या नोकरी साठिच थांबले होते. पण जास्त काही विचार करेपर्यंत आणि बाबांबरोबर बोलायच्या आधी मोहिनी ताईचं लग्न झालं देखील. ती सासरी गेली आणि थेट दुस-या दिवशीपासुन आईचं ’ आत्ता मला होत नाही रे काम’ सुरु झालं. म्हणलं लग्नात तर छान होतं सगळं आणि एक दिवसांतच हे काय झालं.

मार्गशीर्ष संपला आणि नोकरीच्या गावावरुन परत गावी आलो की, मुलींच्या पत्रिका व फोटो दाखवणं सुरु झालं. बाबा या बाबतीत सगळं आईच्या मार्फत बोलणं करायचे. मनाचा ओढा, जीवन ध्येय, मानवी जीवनाची क्षणभंगुरता  वगॆरे गोष्टी आईलाच समजणं अवघड होतं त्यामुळं ते तिनं बाबांना सांगायचा काही संबंधच नव्हता, आणि दोन तीन वर्षे मी त्या परमात्यामाचा अभ्यास करत राहिलो आणि माझं लग्न फक्त आई बाबांच्या बोलणी, उपदेश यांचा भाग होवुन राहिलं. पण आइ अचानक गेली, त्या दुखा:त आणि बाबांच्या आणि मोहिनिच्या भावनात्मक बोलण्यापुढे माझं काही उपाय चालले नाहीत.पुढ्च्याच महिन्यांत माझं लग्न ठरलं आणि दोन महिन्यांत झालं सुद्धा.

मिनाक्षी दिसायला खुप सुंदर नव्हती पण ती आणि निसर्ग माझं मन संसारात रमवायला पुरेसं होते. लग्नानंतर महिनाभरात माझी बदली थोडी लांब झाली आणि ख-या अर्थानं मी आणि मिना संसारी झालो.

पण आज, हे काय समजण्याच्या पलीकडचं काहीतरी होतं आहे,

आज बहुधा सप्तमी असावी, बाहेर चंद्र फार मोठा नव्हता, एक दोन अवकाळी पाउस झालेले, हवेतला उष्मा कमी झालेला नाही, त्यामुळं खिडक्या उघड्या टाकुनच झोपलेलो, ज्या विषयसुखाची निर्भत्सना करायचो, ज्याला ह्या मर्त्य शरीराचे लाड म्हणुन कमी लेखायचो तेच लाड करुन आणि करुन घेउन या शरीराला निवांतपणा आलेला होता, खिडकीतुन मधुनच येणारी वा-याची चुकार झुळक मला दिलासा देत होती तर मिनाची अर्धवट समाधानी झोप चाळवत होती. तिच्या थोड्याश्या हालचालींनी काही वेळापुर्विच्या आणि त्याआधीच्या आठवणी जाग्या होत होत्या. झोप पण लागत नव्हती, जाग पण नव्हती. डोळा मिटतोय असं वाटलं की झुळुक यायची आणि मिनाच्या हाताची माझ्या खांद्यावरची पकड उगाचच घट्ट व्हायची.


आणि त्यातच, ओशोंनी वर्णन केलेली समधीवस्था अनुभवतोय की काय काहीच समजेना.

आज अचानक गाठ पडे ..
भलत्या वेळी भलत्या मेळी ..

अशीच एक वा-याची लहर आली, हळुच डोळे उघडले आणि कुस बदलुन मिनाला थोडं जवळ ओढावं असा विचार केला पण पुढं प्रत्यक्ष तोच उभा दिसला समोर, हो तोच तो ज्याच्या कितिक रुपांची, त्याच्या स्तुतींची पारायणं केली होती. तोच परमेश्वर, जगनियंता, गुढ वलयात आणि मंद प्रकाशात तोच होता होय नक्की.

नयन वळविता सहज कुठेतरी....
एकाएकी तुच पुढे....

आणि एकदम शहारलं सगळं अंग, मनाचा आणि मेंदुचा संबंध संपुन त्या दोन्हीच्या जागा आत्म्यानं घेतली होती. डोळे उघडले आणि त्याच क्षणी त्याच्या माझ्या मधले सगळे पडदे नाहीसे झाले काही क्षणांकरिता. मी त्याच्यात मिसळुन जातो आहे असं वाटलं. हे काय दिसतंय आपल्याला, हे खरं आहे का ते जे काही क्षणापुर्वी आपण अनुभवत होतो ते खरे होतं. माझी झोप आता उडाली होती. सगळ्या संवेदना जणु एकच जाणिव करुन देत होत्या. तेच हे आणि हेच ते. द्वॆत अद्वॆताचा फरक आणि एकात्मापणाची भावना बंधमुक्त होवुन सगळं त्या गुढ विलयामध्ये विलुप्त होत होतं.
दचकुनि जागत जीव निजेतुन...
क्षणभर अंतरपट उघडे...

त्याच वेळी मिनाचा हात पुन्हा खांद्यावर विसावला, पुन्हा विचार एका अद्वॆताकडुन दुस-या अद्वॆताकडे जाउ लागले. काही क्षणांआधिचं आम्हा दोघांचं अद्वॆत खरं की आता येणारा त्या अनादि नादाचं आणि माझं अद्वॆत खरं. पुस्तकातुन श्री. परमहंसांना असा अनुभव आला होता हे वाचलं होतं, पण मला ही तो यावा. एका क्षणांत मी माझी तुलना श्री.परमहंसांबरोबर करीत होतो तर दुस-या क्षणी माझ्या मिनाच्या हातातील बांगड्या माझ्या खांद्यावर रुतल्याची जाणिव होत होती.

गुढ खुण तव कळुन न कळुन .....
भांबावुन मागे पुढे .....

वाटलं हेच ते ब्रम्ह ज्याला भेटण्याची आपल्याला अतीव इच्छा होती, उत्कटता होती, त्याचा शोध घ्यायचा होता. हिच ती निसर्ग शक्ती जि आपल्याला खुणावत होती, आवाहन करीत होती. बहुधा माझ्या आणि मिनाच्या अद्वॆतच या परम अद्वॆतात परावर्तित होत होतं. अहं चा अहं ब्रम्हास्मि होत होता. प्रक्रुति आणि पुरुष यांच्या सर्वव्यापी रुपात आम्ही पोहोचलो होतो असं वाटत होतं. पण मला त्या गुढ विलय़ांत एकरुप व्हायचं होतं, त्या शक्तीला सर्व काही द्यायचं होतं, आणि हीच वेळ होती ती, दुसरी कोणतीही नाही.

गारुड झाल्यासारखा मी उठलो आणि पलंगावरुन उतरुन त्या प्रकाशाकडे जाणार तेवढ्यात मिनाचा आवाज आला, अहो खिडकी बंद करा ना जरा, गारवा सुट्लाय, पाउस पडतोय कुठेतरी, आणि तो चंद्र सुद्धा ....., वाटलं तिला सांगावं सगळं आणि निघावं, त्या दिव्या ज्योतीत मिसळुन जावं. पण तिचं ते ’ चंद्र सुद्धा म्हणुन छान हसुन संकोचुन त्या कुशीवर वळणं आणि वळताना चमकलेला मंगळसुत्रातला काळा मणि.

निसटुन जाई संधीचा क्षण .....

सदा असा संकोच नडे....

आज अचानक गाठ पडे ..

भलत्या वेळी भलत्या मेळी...


हर्षद.

Tuesday, November 2, 2010

हे सुरांनो चंद्र व्हा

हे गाणे मी पहिल्यांदा कॉपी पेस्ट्च्या वयांत ऎकलं, म्हणजे १७-१८चा असताना. दुरदर्शन वर बहुधा आरती पाटिल अश्या नावाची कोणी गायिका होती. आता नाव नक्की आठवत नाही, पण त्या काळांत गाणं जास्त लक्षात राहिलं ते त्या गायिकेच्या दिसण्यामुळं, तिचा चेहरा आणि तिची तवला वाजवणा-या कडं पाहतानाची नजर, त्या नजरेत एक प्रकारचा धाक होता किंवा अधिकार होता.

हे गाणं चारच ऒळींचं, अगदि टिपीकल नाट्यसंगीत, थोडेसेच शब्द आणि त्या बरोबरच्या सुर, आलाप, तानांच्या नाना हरकती. नाट्यसंगीत हा प्रकारच असा आहे की इथे मुळच्या रागदारीचे सुर, आलाप वगॆरे त्या थोड्याश्या शब्दांना जिवंत करतात की, मुळच्या सारेगमला हे शब्दांचं आवरण एवढं सुंदर बनवतं,की माझ्यासारख्या शास्त्रीय संगीताबद्दलच्या अगाढ अज्ञानी माणसाला सुद्धा हे संगीत नितांत सुंदर आणि जवळचं वाटतं.

तिचं झालं आहे भांडण जिवलगाबरोवर आणि तो निघुन गेला आहे. प्रेम हे असंच असतं प्रेमाच्या एका विशिष्ट काळांत कमालीची ऒढ,आपलेपणा ह्या गोष्टी स्वामित्वांत कधी बदलतांत कळत देखिल नाही,आणि त्यात ती गायिका,जेंव्हा त्याच्या प्रेमांत धुंद नसेल तेंव्हा सप्तसुरांच्या बर्षावात चिंब भिजणारी आणि भिजवणारी. खरंतर तो तिच्या आयुष्यांत येण्यापुर्वी हे सुरच तिचे जिवलग होते, पण आता तो ही आहे.

आज झाले काय की त्याला भेटायची वेळ टळुन गेली आणि तिला झाला उशिर तिचा रियाझ लवकर न संपल्यामुळं. गुरुजी म्हणाले देखिल कि आज तुझा आवाज जास्तच छान लागला होता, आणि त्या कॊतुकांत थोडा उशिर झाला खरा. पण त्याच्यातल्या पुरुषाला एवढं कारण पुरेसं होतं आणि तो चिड्ला निघुन गेला. मग आता अचानक एक पोकळी जाणवते आहे. मग हि पोकळी भरायला तिच्या मदतीला तिचे मित्र सुरच उभे नाही राहिले तर नवलच. कालिदासांच्या जवळ जसा मेघ होता तसा हिच्याकडं सुर होते, हक्काचे अगदी हुकुमत होती त्यांच्यावर. पण आता तर तो खुप दुर गेला असेल ते सुर पोहोचतील त्या पेक्षा खुप लांब.

तिला वाटलं की त्याच्या चिडण्याचं कारण पण हेच सुर होते, म्हणुन त्यांच्यावर पण चिडावं त्यांना रागवावं. तसं यावेळी राग काढायला जवळचं कुणीतरी हवंच होतं. तुमच्यामुळं तो गेला ना आता मी तुमच्यावर कशि रागावते ते पहाच. तिच्या रागाची कल्पना येउन सुर तिला म्हणाले बघ बाई आम्ही तुझे मित्र आता या क्षणी तुझ्या रागानं आम्हालाही दु:ख होतं आहे, आमची काही मदत होत असेल तर सांग करु आम्ही जेवढं जमेल तेवढं. अशा क्षणी तिला केवढा आधार वाटला या शब्दांचा. कोरड्या पडलेल्या विहिरीत एका कोप-यातुन अलगद एखादा झरा फुटावा आणि खालच्या तापलेल्या खडकाला त्यानं क्षणार्धात थंड करावं अगदी स्वताची वाफ झाली तरी त्याची पर्वा न करता तसं वाटलं तिला.

या जुन्या, न रागावणा-या मित्रांना तिनं मनापासुन धन्यवाद दिले आणि सांगितलं

हे सुरांनो चंद्र व्हा

तो गेला आहे लांब कुठेतरी काही ठावठिकाणा नाही, म्हणुन तुम्हीच आता चंद्र व्हा आणि तुमच्या चांदण्यांचे कोष बनवुन त्यांना माझ्या प्रियकराकडे पाठवा.सुर अगदी आनंदानं तयार झाले हे करायला पण, पण चंद्र होणं त्यांना समजलं, तो कुठं आहे ते पाहणं पण समजलं ठिक, मग हे चांदण्यांचे कोष कशासाठी गं? सुर असलं ते सुद्दा तिचे मित्रच होते त्याच्या ही आधिपासुनचे, थोडा त्याच्या बद्दल राग त्यांनाही होताच.

वाट एकाकी तमाची, हरवलेल्या माणसाची,

ती म्हणाली , अरे सुरांनो तुम्ही दॆवी आहांत,स्वयंभु आहांत पण तो तसा नाही. तो साधा माणुस आहे आणि आता तर चिड्लेला, रागावलेला. एकदा का राग आला ना की मग ओळखीच्या वाटा पण अनोळखी वाटायला लागतात, जवळची माणसं दुरची वाटतात, सगळा अंधार होतो,काही म्हणजे काही कळत नाही, अशावेळी आपलंच कोणितरी लागतं रे वाट दाखवायला. आज कितीतरी दिवसांनी त्याला भेटायचं होतं आणि त्यामुळं तर आज विरहिणि गातांना मी तुमच्या जवळ आले होते. मग तो चिडला गेला निघुन कुठेतरी एकटाच रागाच्या अंधारात, आणि या रागाच्या अंधारात तो नेहमीच्या वाटा देखिल चुकत असेल, कारण वाटा कधिच चुकत नसतांत, चुकतांत ती आपलीच माणसं, मग त्यांना परत नको का आणायला, सांगा बरं.

बरसुनि आकाश सारे अम्रुताने नाहवा

तेंव्हा आता तुम्हि चंद्र व्हा आणि तुमच्या चांदण्या या सा-या आकाशांत विखरुन टाका, जसा आषाढातला मेघ बरसतो ना तसंच आज तुमचं हे चांदणं बरसुद्या. तुमच्या या बरसणा-या चांदण्यांच्या अम्रुतधारांनी त्याला नाहवुन टाका, मग त्याचा राग शांत होइल आणि त्याला त्याची परतीची वाट ओळखु येउ लागेल.