Wednesday, June 15, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ७.


स्टेट ऑफ द आर्ट - भाग ७.
आता मात्र पटकन खालि बसत गण्या म्हणाला’ हर्ष्या पह्यिल्या झटदिनी फोन विकुन नविन घे, लै बाराचा हाय ह्यो एकतर सुकाच गेला अन आता सगळ्यांना सुकवायलाय. पोरां-गुरांना उतरवलाय का निस्त्याच गप्पा हाणताय इथं बसुन दोघी बी .
इथुन पुढं सुरु -----
शकुताई आणि सुरेखा झटकन आत गेल्या, हातात काहितरी घेउन आल्या आणि मुलांच्या दोन्हि खोल्यात जाउन आल्या, नंतर सुरेखा एकटीच मागं गोठ्यात जाउन आली. तोपर्यंत ज्योति चहा घेउन आली होती. तिनं मोजुन दोनच कप चहा केला होता, मी आणि गण्यानं चहा घेतला मग थोडावेळ सगळॆच शांत होते, एकदम खुप ताणलेलं प्लॅस्टिक फट्कन फुटावं तसा शकुताईचा फोन वाजला, फोन जवळच होता तरी घेताना ती धडपडली, नितिनचा फोन होता. त्याला अनु आईकडं गेल्याचं सांगितलं आणि फोन कट केला. आम्ही दोघं, मी आणि गण्या खोल्याबाहेरच्या पॅसेज मध्ये बसलो होतो. आजोबांनी सगळ्या घरात हट्टानं शहाबाद घालुन घेतली होती, त्या खडबडीत फरशा आमच्या घरातल्या गुळगुळीत टाईल्स पेक्षा जास्त उबदार होत्या,आणि आमच्या टाईलस वर कर्जाची सावली होती आणि इथं या शहाबाद एका खुनाच्या सावलीत होत्या. तो विषय डायरेक्ट काढणं शक्यच नव्हतं पण डोक्यातुन जात पण नव्हता.
शेवटी, सुरेखानं बोलायला सुरु केलं ’ गणेशभावजी, झालं का ओ सगळं म्हंजे हिशोब झाले का तुमचे, मी आले आत स्वयपाकाचं बगाया, पोरं बी भुक भुक करति होति, माजं काय बाय लक्षच नाय राहिलं’ वेड घेउन पेडगावला कसं जावं ह्याचं उदाहरणासहित स्पष्टीकरण होतं हे बोलणं. गण्या पाच मिनिटं गप्प राहिला मग थेट मलाच म्हणाला ’ हर्ष्या, ह्ये बग जमेल का तुला, आखाडाचे सा भाग करु, तुझा, माझा, मंद्याचा, जग्गनाथकाकाचा, शकुताईचा अन आत्याचा, ज्येला जिमिन हवी जिमिन घ्या, ज्येला नको असंल त्येनं ज्येन्ला हवीय त्यानला विका. बाकीचं तर सगळं जमलेलं आहेच, थोडं कमीजास्त. बग म्हणजे काय उगा घरातला मामला घरातच मिटलेला बराय नव्हं, उगा गावगाड्यात चर्चा नको निस्ती.’
मी विचारात पडलो, आखाडाला सगळ्यात जास्त भाव असणार, बाकीच्या जमिनीत झाला जरा मागं पुढं तरी इथं भरुन निघंल. हिशोब करायचा प्रयत्न केला पण हातावर काही जमेना. चेहरा गोंधळला होता, गण्याला वाटलं आला आता जाळ्यात, मी थोडासा चाचरत त्याला म्हणलं ’ अरे पण बाकी जमिनीचे भाग तुम्ही फार कमी सांगता आहात रे, बाजारभावापेक्षा निम्याला रेट लावताय तुम्ही, आमच्या जमिनी विकत घेताना. ते भाव वाढवत असाल तर हा विचार करता येईल, नाहीतर....’ मी वाक्य पुर्ण करण्यापुर्वी गण्या बोलला ’ नाहीतर असं करा तुमी घ्या जमिनि आमच्या वाट्याच्या,मग विका बाजारभावानं जमिनी. आमि काय मदे नाय येणार तुमच्या, टाका पैसं.’ गण्या इतक्या लगेच जमिनी विकायला तयार होईल याची कल्पनाच नव्हती त्यामुळं मी गांगरुन गेलो. ’ छे रे तेवढे पैसे कुठेत माझ्याकडे आता, असते तर घेतल्या असत्या जमिनी मी, काय म्हणतोय तुम्हिच जरा भाव वाढवा की, अगदी बाजारभाव नको पण निदान त्याच्या जवळपास तरी द्या की’ मी बोलायला नेहमिच चुकतो आणि आता हि न चुकता चुकीचं बोलुन गेलो हे बोलुन झाल्यावर लक्षात आलं माझ्या.
शकुताईचा चेहरा मात्र शांत होता, तिच्या मनात काहितरी वेगळंच होतं हे नक्की. आता मात्र मला झोप येत होती, मी उठलो, तसा गण्या पण उठला, लुंगी जरा वर करुन झटकली आणी खोलीकडं गेला, तशी ज्योती कपबशा घेउन लगेच किचनमध्ये गेली आणि परत येउन दरवाज्यात उभी राहिली, केला इशारा जाता जाता समजुन मि आणि शकुताई आमच्या खोलिकडं निघालो, सुरेखा गडु घेउन आत गेली, मागं ज्योती चटकन खोलित गेल्याचं मला जाणवलं, आत येउन गप्प पडलो. आता झोप येईना, आणि त्यात शकुताईचं बॅग काढुन बसणं, त्यामुळं लाईट चालु. थोडावेळ या कुशिवरुन त्या कुशीवर अर्धवट पेंगत होतो, तेवढ्यात शकुताईकडं नजर गेली आणि एकदम ओरडलोच,’ अगं हे काय करतेस, कशाला चालु केलास लॅपटॉप, बंद कर आधी’ ती चिडलीच, तसाच माझ्या हातात दिला आणि म्हणाली’ घे, जरा हिशोब करावे म्हणलं की सुरु तुझं, दुपारी पण असाच ओरडलास माझ्यावर’ असं म्हणुन पांघरुन घेउन झोपली
आणि मी, पुन्हा उघडलेलि वर्ड फाइल पाहुन काय करावं हा विचार करत होतो. तेवढ्यात अक्षरं उमटली ’ झोप आता भाड्या, उद्या बसाल ना चर्चेला तेंव्हा मी सांगतोय तसंच वागायचं, एकदा का मंद्याचा बदला घेतला ना का मग मोकळा मी, तुला काय बी होणार नाय हि माझि जबान हाय जबान. फक्त मी सांगतोय तसं कराचं नी तसंच बोलाचं.’ आता पुन्हा झोप उडाली, विचार केला एकदा या हेम्याशी वाद घालुच आता,त्याला म्हणलं म्हणजे टाईप केलं ’ काय रे तो गण्या म्हणतोय घ्या जमिनी विकत, आणायचे कुठुन पैसे त्याला द्यायला.उगा तुझा बदला बदला माझ्या अंगाशी यायचा, इथं आहेस तोपर्यंत गप्प रहा, तुझं संपलय आयुष्य आता आम्हाला जगु द्या सुखानं, उगा तुझ्या नादाला लागुन जे दोन घास खातोय सुखाचे ते पण सोडावे लागतील या जमिनी घेण्याच्या नादात अन तुझा बदला घेण्याच्या नादात.’ थोडा वेळ काहीच झालं नाही, माझा नैतिक विजय झाला असं समजुन आडवा पडलो.
स्क्रिनसेव्हर सुरु झालं होतं,डोक्यातुन विचार बाहेर निघत नव्हते पण डोळे बंद करुन पडलो होतो, किति वेळ झाला माहित नाही, पण जाग आली तेंव्हा शकुताई हलवुन जागी करत होती, उठल्यावर विचारलं ’ हे काय रे गोळी घेतली होतीस का काय, केवढा गाढ झोपला होतास, उठ साडेआठ झालेत, दहा पर्यंत येतील सगळे, आणि काल रात्रिसारखं काहितरि अर्धवट बडबड करु नकोस, हातात आलेला पैसा सोडु नकोस. हवं तर ह्यांच्याशी बोलुन घे एकदा. मी चालले आवरायला.’ ती निघुन गेली, उठुन बॅगमधुन ब्रश पेस्ट घेउन दात घासत बाहेर आलो, घरातली पोरांची गडबड चालली होती, शाळेला जायची, मंद्याचा धाकटा दिसत नव्हता. बाहेर अंगणात तोंड धुतलं, खोलित येउन पाहिलं,लॅपटॉप चालुच होता, हायबर्नेट मधुन बाहेर आल्यावर हेम्याचीच वर्ड फाइल होति, आणी आता लिहिलं होतं ’ घे तु जमिनि मी इथं बसुन लै काय काय करंन,अन तुला पैसं मिळाची सोय करतो, आता एक दोन ठिकाणी वाचलं काय ते डाटा थेप्ट काय अन ते हाकिंग का काय, एकडाव बघुया जमंल असं दिसतंय, मला जे समजल्या ना ते म्हंजे इकडचं तिकडचं एक आणि शुन्य पकडायचं अन बाहेर काडायचं, दुस-याला द्यायचा, रातभर तुज्याच प्रश्नावर विचार करत होतो, मग या वायरीतुन त्यात असं करता करता या मोठ्या खोक्यात आलोय आता, इथं तर लैच गर्दि हाय एक शुन्य शुन्य ची, जरा जरा समजाया लागलंय मला बी,’ आता नुसता घाबरलो नव्हतो तर ओरडुन रडावं वाटत होतं,डोक्याच्या भुग्याचा भुगा होत होता. आत बसुन हेम्या असं काहि करेल असं वाटलंच नव्हतं.
पण दोनच मिनिटात पैशाचा विचार केला, बाकी जमिनि सोडल्या अन आखाडाची विकत घेतली तरी दोन वर्षात दुप्पट झाली असती किंमत, आणि पुन्हा विहिरिच्या पाण्याचं उत्पन वेगळंच होतं, माझे पैसे त्यातच वसुल झाले असते. पैसा माणसाला काहीही करायला लावतो म्हणतात तसं झालं माझं, या विषयावर सगळे येण्याच्या आधी एकदा हेम्याबरोबर बोलायचं होतं, खोलीचा दरवाजा लावला आणि बसलो समोर लॅपटॉप घेउन,
हेम्या होताच, त्याला विचारलं ’ काय रे तुला कसं काय जमेल हे, तु तर एक आत्मा म्हणा किंवा भुत आहेस, तुला काय कळतंय या कॉंम्पुटरमधलं, तु तर जिवंत असताना पण काहि शिकला नाहीस, काहीतरि झालं अन इथं आत आलायस.’ पाच मिनिटं गेली, फेसबुक किंवा जिटॉकला खाली एक किबोर्ड दिसतो समोरचा टाइप करताना तसं इथं काही नव्हतं, त्यामुळं कळत नव्हतं काय होतंय ते. पण एकदाचं अक्षरं यायला सुरुवात झाली ’ हर्ष्या, तुला जरा डिटेलवार सांगतो आता ऐक, आत्मा मंजे काय असतंय माह्य्तेय का, अरं एक पुंजका असतोय, शेवरिचा कापुस उडवायचो ना ल्हानणी आप्ण तसं, फक्त त्यो पुंजका असतोय विशिष्ट लांबिचा, काय ते म्हणता तुम्हि त्येला फ्रिकेन्सि ना, तेच त्ते प्रत्येकाचा आत्मा एका खास अश्या लांबिचा असतोय, बोटाच्या ठसासारख्यारं, कोणतंबि दोन आत्मे सारखे नसतेत, म्हणुन तर असं भटकतोय कारण एकदा का एका शरिरातनं मोकळा झाला कि त्या आत्म्याला बरोबर फिट बसेल असं शरिर मिळेपर्यंत त्येला भटकावंच लागतंय, आता बघ तुझ्याकडं एरटेलचा फोन हाये मंग त्ये कार्ड रिलायन्स मध्ये बसलं का? नाय, त्येला त्येचं वेगळं असतंय, पन एका मोबाइल मधुन दुस-या मोबाइल मधं मात्र ते कार्ड बरोबर जातंय कारण त्येची लांबी बरोबर जुळतिया तिथं म्हणुन.’
दहावि पास हेम्याच्या तोंडुन हे असले टेक्निकल ऐकुन मी अजुनच भैताडलो, त्याला विचारलं, अरे मग तु कसा इथं आलास, हा काय फोन नाही’ त्यावर तो म्हणाला ’ अरे तुला बोललो नाय का भावड्या, तुला लै पहावासा वाटला म्हनुन त्या झाडाकडं येत होतो, अरं हरेक झाडाचा बी आत्मा असतोय आणि झाडाचा आत्मा कोणालाबी जवळ करतोय, लै चांगली असत्येत झाडं, झाडं संपली ना सगळी तर हे माझ्यासारकं भटके आणि भरित भर झाडांचे आत्मे सगळे फिरत राहतील अन लै गोंधळ होइल, त्ये जाउदे, तर मि काय म्हणत होतो, मि असा त्या झाडाजवळ आलो, अन थेट माझ्या फ्रिकेन्सिच्या एका लाइनला धडकलो, अन झाडाच्या आत्म्याच्या फ्रिकेन्सिला जुळवुन घेउन होइपर्यंत ह्या ड्ब्याकडं ओढलो गेलो, कायतरि पांढरं होतं, त्यावर एक लाइट व्हति लुक्लुक करालेलि अन घापाकदिशि आत ओढला मला त्या आइघाल्या लाइटनं, आजिला लै हाका दिल्या तसं ति आली व्हती पण तिची फ्रिकेन्सि काय जमली नाय, मग ति गेलि परत आखाडाच्या हिरित, इतं आत आल्या आल्या ह्या डबितच अडकलो होतो, इथं कुटंच काही जुळेना, जे जुळतंय असं वाटलं तिथं जाउन आलो, तर नविनच कायतरी होत होतं. घुंई घर घट्ट्क कसले कसले आवाज आले, ते तलाठि बोंबलायला लागला तुज्या नावानं, तु पण आलास पळत, तवा आजिच होती तिथंच, तुला निट पाहुनच गेलि परत.’ म्हणजे जर त्या तलाठाच्या टाटा फोटॉन स्टिक जर हेम्याचा आत येण्याचा मार्ग होता तर तिच स्टिक त्याचा बाहेर जाण्याचा मार्ग होती, पण असं असतं का प्रत्येक स्टिकची व्हेवलेंग्थ वेगवेगळी असते का आख्खि सर्विस एका व्हेवलेंग्थवर असते. माझं हे क्षेत्र नसल्यानं मला फार माहिती नव्हती, नित्याला विचारायला पाहिजे होतं,
पण ते नंतर,इकडं फिजिक्स्चा क्लास सुरुच होता, ’ तर असा आत आलोय, ह्ये जे बारिक पिनापिनाचं हाय ना तिथं जरा जुळतंय माझं, पण बाकि ठिकाणी लै उपटल्यावानि होतंय, बरं ते जाउदे तुमच्या बैठकिचि वेळ होत आलियं जा आता, घाबरु नको मर्दा, अरं भिड बिन्धास्त काय व्हईल ते बघुन घेव रे’ आता मला खोटा का होइना आत्मविश्वास आला होता, तेवढ्यात एक शंका आली ’ हेम्याला विचारलं,’ अरे पण काल संध्याकाळी मंद्याचा धाकटा आला होता खोलित, मग घाबरुन पळत काय गेला, नंतर ओरडत काय होता ?’ पुन्हा दोन मिनिटांचा गॅप गेला आणि ओळी दिसु लागल्या, ’ हर्ष्या माफ कर, काल खोटं बोललो म्या तुला, अरं माणुस माणसाला निस्तं चेह-यानंच नाय ओळखत, आत्म्याचं आम्यालापण कनेक्शन असतंच कि, अन त्याच्यातला आत्मा तर माझाच एक तुकडा हाय.......
क्रमशः

Print Page

1 comments:

राजेन्द्र भंडारी said...

हर्शद, नमस्कार,
काय जबरदस्त लिहलय राव! सॉलिड.वर्णन करायला शब्द अपुरे आहेत.
सुन्दर..पुढच्या भागाची वाट पहातोय.

Post a Comment