Showing posts with label first love. Show all posts
Showing posts with label first love. Show all posts

Thursday, April 7, 2011

तुमचं आमचं सेम -- भाग १०

तुमचं आमचं सेम -- भाग १०

लग्न ठरल्यानंतर माधवी एकदाच भेटली होती, गदग मध्ये डोसा खाल्ला आणि मग प्रभातला डिडिएल्जे पाहिला होता. मी पहिल्यांदाच एखाद्या तरुण मुलीच्या एवढा जवळ बसलो होतो. सगळा पिक्चर हात तिच्या खुर्चीच्या पाठीवर ठेवुन पाहिला होता. जाम मुंग्या आल्या होत्या हाताला, आणि हात तिच्या खांद्यावर ठेवायचा काय जवळ न्यायचा पण धीर झाला नाही. तिनंच एक दोन वेळा ओढणी मागं पुढं करताना माझ्याकडे टाकली होती.एवढाच काय तो रोमान्स, नंतर वाटलं यापेक्षा माझ्या स्कुटीवर फिरुन आलो असतो तर बरं झालं असतं. पण नंतर भेटायचा काही चान्सच आला नाही. माझ्यापुढे प्रश्न होता हनिमुनबद्दल, माधवीला विचारायची सोय/डेअरिंग नव्हती,आईकडं एकदा महाबळेश्वरच्या बुकिंग बद्दल विषय काढला तर तिनं साठेकाकांच्या मार्फत मला इशारा दिला होता. साठेकाका म्हणाले होते ’ अरे तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात, अशी कुठंतरी घाणेरड्या नको तसल्या लोकांनी वापरलेल्या भाड्याच्या खोलीत काय करायची रे स्वताचं घर आहे,तुझ्या स्वताच्या कष्टानं घेतलं आहेस,त्याच्या वास्तुपुरुष आशिर्वाद देईलच.या तोडग्याला माझ्याकडे काहि पक्का उपाय नव्हता आणि त्यानंतर आईनं दोन दिवसात ती लग्नानंतर ८ दिवस भागवतसप्ताहासाठी पंढरपुरला जाणार असल्याचं सांगितलं होतं, लाडोबा पण राष्ट्रिय सेवा योजनेच्या शिबिराला जाणार होती १५ दिवस. हा माझ्यासाठी जवळपास चक्रव्युह होता, फक्त दुस-या बाजुनं उघडा असणारा.  लाडोबा मात्र नियमित बातम्या पुरवायचं काम करायची.तिला हे सगळं थ्रिलिंग वाटत होतं.

माधवीच्या जिजाजींनी पाठवलेल्या टेम्पो मधुन आम्ही निघालो, तसं माझे साहेब तर त्यांची इंडिका देत होते,डिझेल घाल अन घेउन जा म्हणाले, पण ऐकलं नाही आईनं.’लग्न त्यांना घरासमोर करायचं आहे तर करु दे प्रवासखर्च त्यांना नाहीतर करा म्हणावं इथं’ या तिच्या म्हणण्याला माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. का असुन मला द्यायचं नव्हतं? शक्यतो मी आईच्या कोणत्याच गोष्टीला जास्त विरोध केला नव्हता आणि ती पण मला ’मुलगी निवडलीस ना तुझी तुच आता बाकी काही बोलायचं नाही’ या मुक वाक्यानं गप्प करत होती प्रत्येक वेळी.अर्थात काही ठिकाणि मी लाडोबाच्या हट्टीस्वभावाचा फायदा घेत बरंच काही काढुन घेतलं होतं.

समोरुन माधवीचे जिजाजी व अजुन २-३ जण येताना दिसले, मागं एक दोन बायका पण होत्या, हातात पाण्याचा तांब्या, ताटात काहितरी होतं . आता मी आणि आई खाली उतरल्यानं कोणालाच काही बोलता आलं नाही.’या या स्वागतम सुस्वागतम मंड्ळी, या या, आई या, हर्षद्रराव या इकडं या, आणि सुकन्याताई कुठं दिसत नाहीत, या तुम्ही पण या सुकन्याताई.’त्या बरोबरच्या बायकांनी आमच्या पायावर पाणी घातलं, भाकर तुकडा ओवाळुन टाकला. तेवढ्यात अजुन चार जण एक चादर घेउन आले, आमच्या डोक्यावर धरायला. लाडोबाला मजा वाटत होती, जिजाजींनी चार माणसं सामान उतरायला लावली अन ते पण आमच्या मागं घराकडं आले. मी दुस-यांदाच येत होतो,कंपाऊंडवरचे भालदार-चोपदार नव्यानं रंगवलेले होते,आतल्या भिंतीवर पुन्हा शुभ विवाह लिहिलं होतं.

घराच्या बाहेर पोहोचलो, तेवढ्यात बहुधा ताईच्या सासु आणि अजुन एक दोन म्हाता-या बाहेर आल्या, पुन्हा पायावर पाणि टाकलं, आमच्या डोळ्याला पाणी लावलं, ओवाळलं आणि आम्ही आत गेलो. बाकीचे व-हाडी व सामान उतरायची सोय केली होती तिकडं परस्पर जात होतं. लाडोबा कशीतरी चुळबुळत दोन मिनिटं बसली असेल, हळूच आईकडं पाहुन पटकन आत निघुन गेली. मला पण असंच वाटत होतं, पण आता मी नवरदेव होतो, हातात मोत्याच्या माळा लावलेला नारळ आणि डोक्यावर टोपी होती. चहा पाणी झालं, एक दोन मोठ्या लहानांच्या ओळखि करुन दिल्या. माझ्या किती लक्षात राहतील याची मलाच खात्री नव्हती. मी आपलं उगा नमस्कार नमस्कार करुन पुन्हा खाली बसायचो.

तेवढ्यात ताईचे सासरे म्हणाले ’ आता बघा उद्या तुमचं लग्न होय ना ?’ मी थोडासा लाजतच म्हणालो ’ होय’ . मग म्हणाले ’ मला एक सांगा तुम्हाला नवरा करायचा का नवरी ?’ मी गोंधळलो, च्यामारी ही काय नवी भानगड ’ नवरा करायचा का नवरी? ’ पटकन म्हणलं ’ नवरी’. ते उलटुन म्हणाले ’ अहो तुम्हाला नवरी केलं तर माधवीशी लग्न कसं लागायचं तुमचं, आं, सांगा की ओ असं कसं होणार ? बावचळुन मी लगेच उत्तर बदललं ’ नाही,नवरा ’ म्हातारबुवा बहुधा वकील असावेत अशा थाटात पुन्हा बोलले ’ अरारा, काय ओ हे विहिणबाई, ऐकलं का, तुम्ही म्हणताय ह्यांच्याशी माधवीचं लग्न करायचं अन हे तर मला नवरा करा म्हणायलेत की ओ, छ्या छ्या काय शाण्या सुरत्याच्या काळ नव्हं हा, रे गोविंदा.’ दोन मिनिटं गेल्यावर मायमराठीनं माझी विकेट दोन्हीकडुन काढल्याचं माझ्या लक्षात आलं आणि जास्तच लाज वाटायला लागली,पण आता मुर्खपणाची.  

सुटका झाली,ती आईच्या हाकेनं, ती मगाशीच आत गेली होती. आत जाउन बघतो तो ज्ञानप्रबोधिनीच्या पुरोहित बाई आल्या होत्या,माधवीच्या आई होत्या त्यांना नमस्कार केला. तिथंच थांबलो, घरात आत पहिल्यांदाच येत होतो, चोरनजरेनं इकडं तिकडं पाहिलं. सगळं सामान ऒषधांच्या खोक्यात भरलेलं. माधवी, गौरीताई कुठंच दिसल्या नाही. परत बाहेर आलो, काका आले होते. त्यांच्या पाया पडलो, थोडं काय कसं बोलणं झालं. मागुन लाडोबापण आला होता. जिथं उतरायची सोय होती त्या घराकडं निघालो. बाहेर पडताच लाडोबानं सांगितलं,’मधु तिच्या मैत्रिणिकडं गेली आहे,मेकप करायला आणि मेंदी काढायला.’ मला सहसा लाडोबाचा राग येत नाही पण आता आला, नुसतंच हं म्हणुन चालायला लागलो, तशी मागुन येउन लाडोबा म्हणाली ’ बरं बाबा, माधवी वहिनी, ठीक आता’ आई बाबांच्या थोड्या वेगळ्या स्वभावामुळं आम्ही दोघं काही बाबतीत फार जवळ आलो होतो. एकमेकांचे राग ओळखणं ही त्यातलीच एक होती. आमच्या या त्रिकोणी घरात हा नवा कोन कसा बसवायचा हा विचार करायला लागलो. प्रत्येक गोष्ट बदलणार होती, ब-याच आपल्या गोष्टी बदलाव्या लागणार होत्या, ब-याच शेअर कराव्या लागणार होत्या, आणि वस्तु काय करतात माणसं शेअर आपलेपणानं काय किंवा सक्तीनं काय, एक आख्खा जिवंत माणुस कसा शेअर करणार, आणि ते सुद्धा तीन वेगवेगळ्या लेवलला. बरं शेअर करणा-या तिघी बायकाच. एक आई म्हणुन, एक बहिण म्हणुन आणि आता एक बायको म्हणुन.

व-हाडाचंं घर आलं. आम्ही प्रमुख भुमिकावाले तासाभरात आवरुन बसलो होतो. मी,मावशी,आत्या आणि आई आमचं झालं होतं,लाडोबाला दोन वेळा हाक मारुन झाली होती. जिजाजी बोलवायला आल्यावर मात्र सगळेजण पुढं गेले आणि पाच मिनिटांनी आम्ही पण निघालो पुन्हा दुपारसारखं एका चादरीखालुन, आता उन नव्हतं चांगले सहा वाजले होते. साखरपुड्याला गोरज मुहुर्त धरला होता.

त्यांच्या घराच्या अंगणात गेलो,आणि पहिल्यांदाच प्रचंड सजवलेली माधवी दिसली.वायझेड,या पेक्षा जिपमध्ये यायची तेंव्हा फार चांगली दिसायची ती. तेंव्हा जेवढी धुळीनं माखलेली असायची तेवढीच आता मेकपनं माखलेली होती. हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या लोकरच्या कशानं तरी सजवलेली हेअर स्टाईल,गुलाबी केलेले गाल, साडिला मॅच होईल अशी निळी टिकली पण या सगळ्या गोष्टी माफ करायला लावेल असं हसणं. हाय हाय इसी अदापे तो यार मिट गये थे हम. असो, हळुच लाडोबाला हे सांगितलं, ती माधवीला घेउन आत गेली. मी समोरच्या स्टेजवर बसलो आणि गुरुजी मंत्र जरा जोरात म्हणात होते . एक- दोन आचमनं, आहेर देणं,घेणं,नमस्कार असल्या गोष्टी पार पडल्या. मग साधारण १५ मिनिटं असले मला काही सुचत नसलेले क्षण गेल्यावर पुन्हा माधवी बाहेर आली.डोक्यावरची लोकरी जाळी तशीच होती पण बाकी मेकप बराच कमी होता आणि आता मीच तिला शोभतो की नाहि अशी शंका मला येत होती. आपल्यासाठीचं कार्य म्हणलं ना की माणसाच्या चेह-यावर एक वेगळीच झाक येते, जशी अभिषेक करताना देवाच्या मुर्तीवर असते ना तशी, आता तीच झाक माधवीच्या डोळ्यात होती. सगळयांसमोर काही तिच्याकडं बघणं बरोबर वाटेना, म्हणुन हात पुसायला दिलेल्या नॅपकिनशी खेळत होतो, ते पाहुन गुरुजी म्हणाले’बघा बघा बघुन घ्या जी पाहीली, पसंत केली तीच आहे ना का दुसरी आहे कोणि ?’ ज्यांना ऐकु गेलं ते हसले, बाकीचे जेवण कधी वाढताहेत याची वाट पहात असावेत. मला वाटत होतं मी सगळ्यांनी माझ्याकडं पहावं, मी लग्न करतोय, त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल कौतुक असावं, पण वर स्टेजवर बसलं की कळतं आपल्या लग्नात फक्त आपल्यालाच ईंटरेस्ट आहे, बाकीचे काही जवळचे सोडले तर सगळे जेवायला अन मजा करायलाच आलेत.

माधवीचं असं नव्हतं, तिच्याकडच्या सगळ्यांना तिचं कौतुक असावं,बायका बोलताना तिच्याकडं हात वगैरे करायच्या. ते बघुन मलाच बरं वाटलं, आता बोलत काय होत्या कुणाला माहित चांगलं का वाईट ते, जाउ दे. पुढच्या पाच मिनिटात परांडकरांनी अजुन काही मंत्र संपविले. आता आम्ही दोघं समोरासमोर बसलो होतो. माझ्यामागं आई, लाडोबा आणि मामा होता. तिच्या मागं आई. गौरीताई, जिजाजि होते. काका काकु स्टेजवर बाजुला बसले होते. ’ आता, हा रुपाया घ्या आणि लावा तिच्या कपाळाला’ गुरुजी म्हणाले तसं मी केलं, रुपाया घेतला तिच्या कपाळाला लावला आणि खाली ठेवला, नाण्याच्या बाजुनी दोन बोटं पण लावुन घेतली हळुच. ’ अहो लावा म्हणजे, चिकटवा तिच्या कपाळाला, शकुनाचा आहे तो’ गुरुजी म्हणाले. माझ्या डोळ्यासमोर एकदम पोस्टातली डिंकाची बाटली आली. मग पुन्हा उगाच सभ्यतेच्या मर्यादा पाळत थोडं पुढं वाकुन तो रुपाया चिकटवल्यासारखा केला, तो काही चिकटेना. ’ अहो डोकं धरा की मागुन, असा कसा चिकटेल एका हातानं,ते काय तिकिट आहे पोस्टाचं.’ माधवी आणि मला, दोघांना या प्रकाराची आता गंमत वाटत होती, मी तिच्या डोक्यावरची लोकरी जाळी सांभाळत डाव्या हातानं तिचं डोकं धरलं आणि कपाळाला लावलेल्या गंध, पावडर, कुंकु आणि तिला आलेला घाम या सर्वांनी जो चिकट्पणा आला होता त्याच्या जोरावर ते नाणं चिकटवलं एकदाचं.

मग एकमेकांना अंगठी घालायचा कार्यक्रम पार पडला,पहिल्यांदाच तिचा हात हातात घेत होतो, तिच्याएवढाच माझाही हात थरथरत होता. अंगठी घालताना तिच्या बांगड्यात माझी बोटं अडकली, म्हणजे अडकवायची नव्हती पण अडकलेली सोडवायची पण नव्हती पण सोडवावी लागली.अंगठ्या मापं वगैरे न देता व्यवस्थित बसल्या.सगळ्यांनी टाळया वाजवल्या, तिच्या हातात साखरेचा पुडा दिला, आणि कार्यक्रम संपला. लोकं लगेच जेवायला गेली. आम्ही काही मोजकी मंडळी आत गेलो. घरातच आमची जेवायची व्यवस्था होती. पोळी,भाजी,भात, आमटी, भजी. कुरड्या आणि गोडाला श्रीखंड असा साधा पण खास बामणी मेन्यु होता. थोडी चेष्टा मस्करी, आग्रह यात जरा जास्तच जेवण झालं. मग आम्ही पुन्हा    व-हाडाच्या ठिकाणी आलो. तिथं बरीचशी मंडळी झोपली होती. आम्ही आत जाउन, उद्या सकाळची आवराआवर केली, म्हणजे मी बसुनच होतो, आई, मावशी, आत्या आणि लाडोबा याच आवरत होत्या. अकरा वाजले, आता सगळेच झोपलो. माझ्या डोळ्यासमोर मात्र माधवीच्या बांगड्यात अडकलेली माझी बोटं दिसत होती, तशीच अजुन थोडा वेळ  अडकवायला हवी होती, थोडाच्च वेळ.



Sunday, March 6, 2011

तुमचं आमचं सेम नसतं - भाग ०६

तुमचं आमचं सेम नसतं - भाग ०६
बुधवार सकाळ - मी उठेपर्यंत, नेहमी प्रमाणे आईचं आवरुन झालेलं होतं. मी अंथरुणं आवरली, खोली झाडुन सकाळचं सगळं आवरुन किचनमध्ये आले. आईचा स्वयंपाक चालु झाला होता. माझी चाहुल लागताच मागे न वळता म्हणाली ’ किती वाजेपर्यंत येशील दुपारी ? तिला बहुधा आज या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावायचा होता. मी म्हणाले ’ शाळा दोनला सुटते, मला यायला अडिच-तिन होतील.’ आई ’ ठिकय, काकांना पण सांग, त्याचवेळी यायला, आणि तु पण त्यांच्याबरोबरच ये. त्याला फक्त पत्ता दे’ मी - ’पण मला त्यांची साईट माहित नाही कुठंय ते? आम्ही फक्त फाट्यावरच भेटलोय, बाकी कुठं नाही.’ ’मग काकांना पण तुझ्याबरोबरच येउ दे, उगा सोसायटित चर्चा नकोत नसत्या.’ इति आई. मी खाली मान घालुनच ’ हो’.
आई आज लवकर येणार असल्याने डबा नेणार नव्हती, माझा डबा भरला आणि ती गेली दुकानात. महादेवकाका सकाळिच येउन चाव्या घेउन गेले होते. माझी पण वेळ झाली होती, मी आवरायला बेडरुम मध्ये आले. आज कोणता ड्रेस घालावा हा प्रश्न नेहमीपेक्षा मोठा होता. कालपर्यंत सगळं कसं मजेत होतं, तो माझ्याकडे पाहायचा, मी त्याच्याकडे, काहीतरी बोलणं, हसणं असं सगळं होतं, अर्थात आमचं भेटणं हे नेहमी जिपमध्येच असल्यानं सगळं एका मर्यादेत होतं, पण काल हे सगळं माझ्या मनातुन बाहेर पडलं होतं, आईला सांगितलं होतं आणि तिनं विश्वास ठेवला होता, त्यामुळं आता एक जबाबदारी वाटत होती,भिति होती. काल पर्यंत मी माझी मीच होते पण आता मी आमच्या घराला रिप्रेझेंट करत होते.
त्याला मी तशी काही आजपर्यंत या लग्नाच्या विषयावरच काय पण प्रेमाबद्द्ल पण कधी बोलले त्याला, आमचं बोलणं व्हायचं ते नेहमी पिक्चर, हिरो हिरोईन, गाणि, शेती पार अगदि आम्हि मेडिकल दुकानात गोळया ऒषधं ठेवतो कशी आणि नंतर ते बरोबर आठवतं कसं इथपर्यंत झाली होती. बार्शीतल्या जवळपास सगळ्या डॊक्टरांच्या हस्ताक्षरांची चेष्टा करुन झाली होती. पण प्रेम आणि लग्न छे कधीच नाही बोललो या विषयावर.
खरंच, का नाही बोललो आम्ही? का माझं त्याच्यावर प्रेमच नाहीये? उगा काल आई म्हणाली म्हणुन मी पण तयार झालेय? का आहे माझं त्याच्यावर प्रेम? अशावेळी मला माझी हक्काची मैत्रिण आठवली. गौरिताई, आता सौ.गौरी. लगेच बाहेर हॊल मध्ये येउन तिला फोन लावला. तिनंच उचलला,
मी - तायडे कशी आहेस ?
गॊरी - का ग ? काय झालं, कालच तर बोलले की अर्धा तास, काय झालंय, काही झालंय का ?
लग्नाआधीच्या मुली लग्नानंतर बायको झाल्यावर एवढ्या आत्मज्ञानी कशा होतात काय ठाउक.? म्हणजे मी पण अशीच होणार की काय आता? मला भिती वाटायला लागली होती.
मी - काही खास नाही ग, सहज केला फोन
गौरी - काल आपण बोललो,त्यावेळी आई बोलली नाही, आज ती दुकानात लवकर गेली आणि तु सहज फोन केलास? खरं सांग काय झालंय घरी ?
मी - अगं काका काकु आले होते काल घरी.
गौरी - त्या काकुच्या बहिणिच्या मुलाबद्दल का? मधे गधे लक्षात ठेव उगा काकांच्या झाशात येउन हो बि म्हणालिस तर. आईला काय ते काही बाही सांगुन पटवतील पण तु फसु नकोस. आपल्या दुकानावर डोळा आहे त्यांच्या आधीपासुनच.
मी - नाही ते नाही, प्रकरण वेगळं आहे, म्हणजे..
गौरी - म्हणजे तुला तुझा अजिंक्य देव भेटला की काय ग मधे ? खरं खरं सांग हं.
मी - अगदि तसंच नाहीये, पण काका काकुंनी आईच्या डोक्यात काहीतरी वेगळंच भरवलंय, - आणि मी पुढं कालचा सगळा प्रसंग सांगितला.
गौरी - मग काय, शायद मेरी शादि का खयाल दिल में आया है’ अगं माजं शोनं गं ते, छोटूकली परी गं ती माझी, मोठी झाली आता, तिला मोठा बाहुला बघायचा आता.
हे बोलता बोलता तिचा आवाज जड झाला, तिकडं ती आणि इकडं मी रडत होते. काहितरी बोलावं हे सुचायच्या पलिकडे गेलो होतो आम्ही. दोन-तिन मिनिटांनी गौरीचा आवाज आला.
गौरी - आता आपली आई किति एकटी पडेल ना ग?
मी - तायडे, मी मुळी त्याला बोलवणारच नाही आज. मला आईला सोडुन जायला नकोच वाटतंय ग ? काल मी तिच्या कुशीतच झोपले होते, लहानपणि झोपायचे ना तिच्या तोंडात बोट ठेवुन तसं.
गौरी - किति दुष्ट आहेस ग, आणि वर सांगते आहेस सगळं मला. मी आता लांब आले ना इकडं लातुरला म्हणुन मुद्दाम सांगतेस ना. - आता तिचा आवाज पुन्हा जड झाला होता. तिला उगाच हसवायचं म्हणुन मी म्हणाले
मी - आई नसली म्हणुन काय झालं आता
गौरी - गप गं लगेच सुरु झाली तुझी बडबड, इकडं माझं आंघोळीचं पाणि गेलं ना गार होवुन.
मी - आत्ता येवढ्या उशीरा आंघोळ, हां काय करत होतीस, एवढा वेळ. पाटलांच्या घरी कसं सडा सारवण झालं पाहिजे सुर्य उगवायच्या आत. फोन करु काय मांजरसुंब्याला ?
गौरी - ए चल गं उशीर होतोय, अजुन सगळं व्हायचंय, हे येतील आत्ता, आज डबा नेला नाही त्यांनी.
मी- ठेव ठेव आता काय आम्ही परके ते जवळचे ना, ठेव.
फोन ठेवला आणि लक्षात आलं की बराच उशीर झाला आहे. शाळा कारखान्याच्या हंगामी कामगारांच्या मुलांची असल्याने वेळेचं फार बंधन नसायचंच, पण तरी वेळेवर जावं लागायचं. त्यात सध्या ही परिस्थिती, तिथं काकांना कळालं मी आली नाहिये तर लगेच आईला दुकानात फोन करतील, आणि आता दहा वाजुन गेले म्हणजे आज एस्टिनंच जावं लागणार होतं, तो नवाच्या ठोक्याला चौकातुन जिप पुढं घ्यायचा. मग पटकन आवरलं आणि लगेच निघाले. एस्टि स्टॆंडपर्यंत ट्म्ट्म्ने येउन लगेच कारखान्याकडे गेले. फाट्यावरुन आत जाताना काकु दिसली, कारखान्याच्या जिपनं बार्शीला चालली होती. मनांत विचार आला, हिला बोलावलं की काय आईनं फोन करुन घरी? पण तेवढ्यात ती खाली उतरुन म्हणाली, ’ माधवी आज सोलापुरला चालले आहे गं, काही आणायचं आहे का तुला, माझं काम चाटिगल्लितच आहे.’ मी तिला दोन ओढण्या आणायला सांगितल्या. ती गेली आणि माझं टेन्शन कमी झालं.
कारखान्याजवळ गेल्यावर आत न जाता डायरेक्ट शाळेत गेले, बाकीचे सगळे जण आपलं आपलं काम करत होते. आता खरी धडधड सुरु झाली होती, इथलं काम झालं की फाट्यावर जायचं, मग तो येणार जिप घेउन, मग त्याला सांगायचं तुम्हाला घरी बोलावलं आहे म्हणुन. जिपमध्ये सांगावं की बाहेरच बोलवावं त्याला ? त्याला वेळ असेल का आज ? तो येईल का ? पुन्हा काल रात्रीचे प्रश्न रिपिट होत होते. बरोबर काम करण-या एका मुलीच्या हे लक्षात आलं. ति पण हातातलं काम आटोपुन माझ्याकडे आली आणि विचारलं ’ माधवी, बरं वाटत नाही का ग? काही हवंय का? काही होतंय का ?’ या होतंय का चा रोख माझ्या लक्षात आला, उगाचच बावरल्यासारखं होवुन गेलं आणि मनातल्या मनात तारखा मोजु लागले.
एक तास झाला, आता मनाचा हिय्या करुन उठले, विचार केला काय होईल ते होईल, आता मागं फिरुन चालणार नाही. बाकीच्यांना सांगुन कारखान्याच्या आत गेस्ट हाउसच्या टॊयलेट मध्ये जाउन कपडे निट केले आणी तशीच बाहेर पडले, चालत फाट्यावर आले. फाट्यावर एक दोन शाळेतल्या मुली होत्या, बाकी कुणि नाही. एक-दोन मिनिटात एक पॆसेंजरची जिप आली, थांबली, एकदा वाटलं जावं यातुनच, ते विचारणं नको आणि ती नकाराची भिती पण नाही मग. पण आता मन ऐकत नव्हतं. गुपचुप उभी राहिले, जिप गेल्यावर जाणवलं की एका अनोळखी पण मोहक रस्त्यावर जातेय आता, भुलभुलैया वाट्तोय खरा पण समोरच्या झाडावरची फुलं पण बोलवतातय. आणि तेवढ्यात त्याची जिप आली. बहुधा माझं लवकर येणं त्याला अनपेक्षित असावं. धुराळा खाली बसल्यावर नीट पाहिलं, आज त्यानं चक्क पांढरा शर्ट घातला आहे, इस्त्रीचा आणि इनशर्ट. काही तरी वेगळं आहे असं वाटलं. काही न बोलता जिपमध्ये चढले, आज मुद्दाम तो पुढच्या सिटला टेकुन बसला होता, त्यामुळं चढताना जिपचा पाईप पकडताना त्याच्या खांद्याला हात लागत होता, त्याच्या अंगावरचा शहारा मला आतपर्यंत थरथरवुन गेला. आधी पण हा स्पर्श झाला होता एक दोन वेळा, पण हे असं आत कुठंतरी काही होत नव्हतं.
आत बसले, त्या दोन मुली दुस-या बाजुनं बसल्या. माझी ओढणी बाहेर उडायला लागली म्हणुन थोडी आत सरकले, आज त्यानं हात सिटच्या पाठिवर ठेवला होता, बार्शी- वैराग रस्ता हा असा, आता हात धरावा पुढं तर हाताला लागतोय नाही धरावा तर नीट बसता येत नाहि. आज सगळंच काहीतरी वेगळं होतय एवढंच फक्त जाणवत होतं बास. मधल्या शिंदेवस्ती फाट्याला त्या दोन पोरी उतरल्या आणि मागं मीच एकटी उरले. आता माझा उतरायचा स्टॊप फक्त १० मिनिटाच्या अंतरावर होता. तोंड कोरडं पडत होतं, मी पुढं हात सिटला हात धरला की तेवढ्यापुरता तो हात खाली घ्यायचा, पुन्हा वर. मला तर आता राग यायला लागला होता, पण बोललं तर पाहिजे होतं. आम्ही गावात वळणार त्याच्या आधीच त्यानं विचारलं ’ तुम्हाला घराकडं सोडु देत का ? आज आम्हाला आहे थोडा वेळ. ’ माय गॊड, माझा विश्वासच बसत नव्हता जे मी ऐकलं त्यावर. आजच आईनं त्याला बोलवायला सांगावं, आजच काकु सोलापुरला जावी, आज मी लवकर निघावं, आज याच्या जिपमध्ये कोणि जास्त गर्दी असु नये, हे सगळं काय चाललंय. आणि त्यात आजच त्यानं विचारावं घराकडं सोडु का ?
जसं सुखाच्या ओझ्याखाली स्वताला हरवुन बसायला होतं ना तशी मी आता झालं होते. तेवढ्यात त्याच्या ड्रायव्हरचा आवाज आला ’ लवकर सांगा काय ते, एकदा सिटित गेलं की लई गर्दी होतिय परत उलटं यायला.’. एकदम भानावर आले आणि मनात पहिला विचार आला, याला कसं माहित एकदा गावात गेलं की आमच्या घराकडे यायला खुप गर्दीच्या आणि बोळाबोळातुन यावं लागतंय ते ? लगेच त्याचा प्रश्न,’ सोडुना तुम्हाला घराकडं?’ माझं उत्तर गेलं अभावितपणे ’ हो, चालेल. ’ त्यावर त्याचा पुढचा प्रश्न ’ मग सांगा कसं जायचं ते, उजवीकडं की डाविकडं ?. मनात म्हणलं,(मला काय विचारताय, तुमच्या ड्रायव्हरला विचारा की माहित असेलच त्याला सगळं) आणि मग मागुनच आता उजवीकडं, त्या वखारीच्या थोडं आधी खालच्या बाजुला जायचंय सुरु झालं, एकतर ह्या इथं मागं बसुन काही दिसत नव्हतं, आणि त्यामुळं सारखं पुढं वाकावं लागत होतं. पण तो आणि ड्रायव्हर, दोघांपैकी कोणिही माझ्याकडं पाहत नव्ह्तं, ड्रायव्हरला तर शक्यच नव्हतं रस्त्यावरच्या कोंबड्या, शेळ्या आणि डुकरातुन वाट काढतानाच त्याची सर्कस होत होती, पण तो सुद्धा फक्त पुढंच पाहत होता. का जाणे मला त्याचं हे वागणं आवडुन गेलं. शेवटी एकदाचं घर आलं, म्हणजे आमचं घर रस्त्यापासुन थोडं आत आहे.
आता उतरणं भाग होतं, जिभ हलतच नव्हती तोंडात. कशीबशी उतरले, सगळा जीव गोळा केला आणि फटकन बोलुन गेले ’ चला ना घरी चहा घेउन जा’ उत्तराची वाट न पाहता किंवा तो येईलच अशा आशेनं सरळ त्याच्याकडं पाठ फिरुन घराकडं जायला लागले. पर्समध्ये किल्ली पाहिली तर नव्हती, आज त्या बरोबरच्या मुलीला शाळेत किल्ल्या दिल्या होत्या, त्या परतच घेतल्या नव्हत्या. मागे पाहिलं, अंदाज घेतला तो जिपमधुन उतरत होता, मी माझा वेग उगाच थोडा कमी केला. त्यानं दोन -चार पावलातच गाठलं मला. आता मी पुढं आणि तो मागं चालायला लागलो. कुणिच बोलत नव्हतं. माझ्या मनात निवडुंग पिक्चर मध्ये रविंद्र मंकणि आणि अर्चना जोगळेकर चालत असतात तो सिन येत होता. आता बनसोडे काकुंकडे चावी मागायला गेले, त्याला वाटलं हेच आमचं घर, म्हणुन त्यानं जरा केस नीट केले वगैरे. मी काकुंकडुन किल्ली घेतली, पुढं निघालो, मागे पाह्ते तो अपेक्षेप्रमाणे बनसोडे काका व अमित उभे होते, त्यांची बघण्याची त-हा काही वेगळीच होती, आई काल रात्री अशाच बघण्याबद्दल बोलत होती बहुधा.
घरी आले,गेट उघडुन आत आलो.आईला हाक मारली. तिनं दरवाजा उघडला, मागं त्याला पाहुन थोडी गोंधळलीच. बहुधा मी त्याला घरी बोलावेन यावर तिचा विश्वास नसावा किंवा मी असला लगा बघेन असं तिला वाटलं नसावं. होते तेंव्हाही त्याचे केस पांढरे होते थोडे पण अगदि लक्षात येण्यासारखं नसले तरी आईच्या नजरेतुन कसे सुट्तील बरे. मी आत आले, त्याला काहीच बोलले नव्हते, या वगैरे. परत मागे वळले, तेवढ्यात त्याचा आवाज आला ’ नमस्कार’ एव्हाना आई पण सावरली असावी, तिनं त्याला आत बोलावलं.
आई आत आली, हळुच म्हणाली ’ हेच का ते ? मी खाली मान घालुनच मान डोलावली. आई म्हणाली’ जा हात पाय धुवुन कपडे बदलुन ये जरा’ मी हात पाय धुतले आणि नेहमीच्या सवयीनं टॊवेल हातात घेउनच बाहेर गेले, तो अजुन उभाच होता,’ बसा ना तुम्ही उभे का ? त्याला म्हणलं. मला लागलेल्या वेळावरुन आत आईच्या लक्षात आलं की मी तशीच वेंधळ्यासारखी बाहेर आली आहे. माझ्या घरात आणि आई बरोबर असताना माझा नर्व्हसपणा पण आता गेला होता.आईनं आत बोलावलं तशी आत गेले. कपडे बदलुन बाहेर जाउन त्याला विचारलं ’तुम्ही काय घेणार, चहा की सरबत? ’चहा’ त्याचं उत्तर आणि देताना चेहरा असा की ’ चहा साठी बोलावलं ना मग सरबत काय विचारताय वेड्यासारखं?’. सवयीनं पटकन पलंगावर बसता बसता आईला सांगितलं ’ आई चहाच टाक आम्हाला’

Monday, February 28, 2011

तुमचं आमचं सेम नसतं ... भाग ०५

Print Pageबाबांना खुप वाटायचं मी शिक्षक व्हावं असं, पण मला त्यात काहीच मजा वाटत नव्हती. लहानपणापासुन बाबांबरोबर दुकानात जाउन जाउन माझ्या डोक्यात ते वेगवेगळ्या ऒषधांचे वास बसले होते वस्ती करुन, ते काही केल्या जात नव्हते. ते आधीचं छोटंसं दुकान, मग नगरपालिकेने केलेलॊ तोडातोडी, मग ६-८ महिने चाललेली कोर्ट केस आणि मग नंतर हे मिळालेले खुप मोठं दुकान, सगळं सगळं आठवतय मला. माझा हट्ट पाहुन बाबांनी मला डिफार्मसीला घातलं, सोलापुरात होस्टेलवर मी एकटिच राहणार म्हणुन घाबरलेली मी, त्यात आईनं कुठुन कुठुन ओळखी काढुन दिलेले पत्ते, ही काकु, ती मावशी हे न ते सगळं सगळं लक्षात ठेवणं केवढं अवघड होतं ते माझं मलाच माहिती. त्यात गॊरी ताईचा गोंधळ, कारण तिला बार्शीतच कॊलेजला घातलं होतं म्हणुन.
ह्ळु हळु मी सगळ्याला सरावले होते आणि बघता बघता शिक्षण पण संपलं होतं. त्यावेळी किती तरी वेळा गप्पा व्हायच्या की कुणाला इथंच सासर मिळतंय कुणाला कुठं ? पण तेंव्हा हे फार सिरियस वाटलं नव्हतं, तेंव्हा काय आणि परवा पर्यंत तरी कुठं सगळं सिरियस होतं.
गेल्या मंगळवारी मी घरी आले तर , जास्तीची ताटं, कप बश्या पडलेल्या होत्या. मग आई आल्यावर आईला म्हणाले ’ कोण आलं होतं ग, काका काकु का?’ आई म्हणाली ’ हो, का ग ?’ आणि पुढं विचारलं ’ माधवी जरा एस्टीची तिकिटं दाखव गं?
मी म्हणाले ’ मी जिपनं जा ये करते कोण बसणार त्या फडतुस एस्टित धक्के खात’ एवढं ऐकल्यावर आई बेडरुम मध्ये जाउन रडत बसली, ताईचा फोन घेतला नाही,दुकानात पण गेली नाही, शेवटी महादेवकाकाच आले, चाव्या आणि पैसे घेउन. मला काही कळतच नव्हतं, मी एस्टीनं न जाण्यानं नुकसान होतंय एस्टीचं आणि आई का रडतेय, आणि गेले १५-२० दिवस तर पैसे पण देत नाही मी त्याला.
य्स्स्स, आत्ता उजेड पडला माझ्या डोक्यात, हे माझं त्याच जिपसाठी थांबणं कॊणितरी काकुच्या कानावर घातलं होतं आणि ते तिथुन आईपर्यंत पोहोचलं होतं. आता मलापण रडु येत होतं, काय करु सुचत नव्हतं. अगदी पिक्चरच्या हिरोईनसारखं होत होतं मला, मग होता नव्हता तो सगळा धीर गोळा केला आणि आईच्या समोर जाउन उभी राहिले. आई पाच मिनिटं ताडताड बोलत होती, माझ्या डोळ्यातुन धारा लागल्या होत्या, पण वर मान करायची डेरिंग होत नव्हती. माझ्या डोळ्यातलं पाणि माझ्याच पायांवर पडत होतं, आणि मनात वाद्ळ चालु होतं, काय केलंय मी असं ? फक्त दररोज एका जिपमध्ये बसते मह्णुन एवढा गोंधळ, एवढी चॊकशी.?
शेवटी एकदाची आई थांबली आणि त्याच आवाजात विचारलं ’ कुठपर्यंत गेलीत ही थेरं? काही झालं गेलं तर नाही ना? आधी बापानं दिलेली आणि नंतर मिळालेली विद्या आहेच, नको ती , त्याचवेळी सांगत होते इथंच ठेवा इथंच ठेवा, पोरिची जात नजरेसमोर बरी, तर नाही ऐकलं कुणि आमचं, आणि आता उरलेय........मी........एकटी........सगळ्या दुनियेला तोंड द्यायला ’
या सगळ्या बोलण्यानं मला मी जेवढी बावरली नव्हते, तेवढं शेवटच्या तीन थांबत थांबत आलेल्या उश्वासांनी हादरले . काही कळायच्या आत आईच्या पायावर पडले, आणि जोरात ओरडले ’ नाही ग आई, काही नाही केलं ग मी.’
आईनं उठवुन विचारलं, ’ खरं बोल गधडे, आता लहान नाहीस तु, चांगली एकवीसची आहेस.
मी म्हणाले ’ आई एकदा मला तरी विचारयंस की ग असलं काहीतरी बोलण्याआधी?
आई ’ तुझं तोंड शिवलं होतं होय गं ? तुला नाही सांगता आलं ते?
मी ’ अग पण आई, तसं काही माझ्या मनात नव्हतंच ग, उगीच कोणितरी तुला काहीतरी सांगतं आणि तुझा विश्वास बसतो
.
आई ’ चल आता एकदा तुझ्यावर ठेवते विश्वास सांग काय आहे ते सगळं आणि खरं खरं, एक शब्द जरी खोटा निघाला ना तर तुझा तरी जिव घेईन नाहीतर मी तर जिव देईन.
मी कसाबसा धीर गोळा करुन सगळं सांगितलं, अगदि दोन महिन्यापुर्वी पहिल्यांदा एस्टि सुटली होती ते आजपर्यंत. दहा मिनिटं तरी बोलत असेन. एवढं ऐकल्यावर बहुधा आईचा विश्वास बसला असावा. तिनं त्याच करड्या आवाजात ऒर्डर दिली , कोण आहे तो त्याला उद्या घेउन ये त्याला घरी, दुपारी मी घरी येईन जरा लवकर आणि येताना काकांना पण निरोप दे.
मी म्हणाले ’ हो बोलते मी .’
आणि हे बोलल्यावर खरी काळजी सुरु झाली, जर उद्या तो भेटलाच नाही तर, उद्या तो नाहीच म्हणाला तर, आज नको उद्या येतो म्हणाला तर, एक ना बारा भानगडी, नको नको ते विचार मनात येत होते, म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती.
तेवढ्यात आईचा नेहमीचा आवाज आला ’ मधु, चला आज भाजी आमटी तुझ्याकडे आहे, माझी पोथी वाचुन होईपर्यंत घे आटोपुन, मग एकत्रच बसु, पण त्याआधी महादेवनं हिशोब ठेवला आहे तो तपास आणि निट, गेल्या महिन्यात सात-आठ चुका झाल्या तेंव्हाच मला ही शंका यायला हवी होती. पण विचार केला लेकरु उन्हातान्हांत जातंय, बाबाला बोललं होतं एक - दोन वर्ष शिकवेन कारखान्याच्या शाळेत, जाउदे, तर हिचं काय वेगळंच सुरु.’
मी पुन्हा धास्तावले, ह्या अशा गोष्टी काय मी आईला सांगणार होते घरात, बरं गॉरिताईला फोन करावा तर तिचं नव्या संसाराचं कॊतुक, आत्ताच सांगत होती म्हणे ’आज काय ह्यांनी हाफडेच घेउन दुपारीच घरी आले अचानक आणि , त्यांचे सगळे कपडे इस्त्री करुन ठेवले आठवडाभराचे, मी म्हणाले, मी करत जाईन तर मला म्हणतात ही इस्त्री जड आहे, पुढच्या महिन्यात एखादी हलकी घेउ म्हणजे तुला पण करता येईल इस्त्री. रोज कडक इस्त्रीचा शर्ट लागतो ग यांना.’ आता माझ्या डोळ्यासमोर उगाच तो आला, आठवायला लागले त्याला कधी इस्त्रीचे कपडे घातलेलं पाहिलंय, कधीच नाही. नेहमी खाली जिन, वर एक शर्ट आणि टोपी उलटी घातलेली, त्या बाबा सैगल सारखी, शी बाई मला नाही आवडत असलं काही.
’मोहरी तडतडली नाही अजुन, गॆस संपला का ग? ’ इति आई. ’ अगं करते गं आता लगेच होईल, किती वेळ लागतो त्याला.’ मी उत्तर देउन रोजमेळ हातात घेतला आणि खरंच माझ्या चुका होत्या अर्थात पन्नास - शंभरच्या होत्या म्हणुन आई काही जास्त बोलली नव्हती, नाहीतर जेवण दिलं नसतं,बाबा करायचे तसं,हिशोब चुकला की रात्री जेवण नाही. हिशोब झाला, मग किचन मध्ये जाउन दोन्ही गॆस पेटवले, एकिकडे कढईत तेल गरम झालं की मोहरी टाकली. कुकरमधुन वरण काढेपर्यंत मोहरी जळाली, त्या वासानं आईचा आवाज ’ जरा सुधरा आता, हे असलं खाउ घालणार का उद्या नव-याला,होय गं ? आणि तो खाईल गप, त्याची आई,ती बरी चालवुन घेईल हे असलं’ यावर मला खुदकन हसु आलं,एकदम आठवलं, बाबांना पण ताटात लोणचं वाढलेलं खपत नसे,’ भाज्या करता येत नाहीत धड म्हणुन ही मुरवलेली लिंबं वाढता काय?’ हे असं चारचॊघात बोलायचे बाबा.
आईची पोथी वाचुन संपेपर्यंत कशीबशी आमटी झाली होती,’ कट्ट्याजवळ येत आई म्हणाली ’ अगं, मोहरी जळाली ना तर त्यात भाजी टाकायची, आमटीपेक्षा कमी वास येतो जळाल्याचा, सरक हो बाजुला. ताटं घे आणि आता मोठ्या ताटांत जेवायला शिका, ते तसलं कप्याकप्याचं ताट का नेणार आहेस बरोबर’ आई बहुधा माझं लग्न ठरल्यासारखंच वागत होती,ह्या सगळ्या कहाण्या आता तीन चार महिन्यांपुर्वी ऐकुन झाल्या होत्या, त्या परत एवढ्या लगेच ऐकायला मिळतील असं मलाच वाटलं नव्हतं. शेवटी भाजी आईनंच टाकली, तोपर्यंत मी बाकीचं आवरलं होतं. जेवणं झाली, सगळी झाकपाक करुन कड्या कुलुपं लावुन दोघी झोपलो, मला थोड्याच वेळात झोप लागली, काहीतरी आवाज झाला म्हणुन उठुन पाहिलं तर हॊलमधला दिवा चालु होता, बाहेर जाउन पाहिलं तर आई, बाबांच्या फोटोसमोर उभी राहुन बोलत होती. ’ काय करु मी, दुकानाचं बघु, गॊरीचं पहिलं वर्ष लग्नाचं, तिचं सणवार का हे मधुचं, असं सगळं एकदम कसं व्हायचं हो? बरं महेशभावोजींना सांगावं तर ते त्यांच्या साडुच्या मुलाचंच धरुन बसलेत, आपलीच पोर, आपलंच घर काही त्रास नाही काय नाही, पुढं मागं दुकान पण बघेल, हे सगळं असलं. हे सगळं रांगेला लावुन का नाही गेलात तुम्ही? काय घाई होती एवढी तुम्हाला ?
आई बरंच काही बोलत होती, मी हळुच परत आले आणि झोपायचा प्रयत्न करु लागले, आता एक एक प्रश्न समोर उभे राहात होते, उद्या माझं झालंच लग्न तर ह्या घराचं काय? दुकान कोण बघेल? आईकडं कोण बघेल? माझ्या नावाचं लायसन्स काढुन पुन्हा पहिल्यासारखं कोणितरी लायसन्सवाला बघा, त्याला हिस्सा द्या, ही सगळी लफडी आईला निस्तरता येतील? माझी मला मीच स्वार्थी वाटायला लागले होते, आई-बाबांची अपराधी वाटायला लागले होते. पण त्याच वेळी, जिजाजी ताईला कसं इस्त्री करायला शिकवत असतील, बाजुला बसुन का मागं उभं राहुन हे असले विचार पण घुमायला लागले. आई आत आली, हातात चक्क चहाचा कप होता, थेट बाबा धरायचे तसा, गरम चहाचा कप थेट पकडायचा, कानाला नाही, आणि मला म्हणाली,’आज खुप आठवण येतेय गं तुझ्या बाबांची. ते असते ना तर खुप मारलं असतं तुला हे असलं ऐकुन. बरं झालं बाई तुझा मार वाचला.’ माझा विश्वासच बसेना माझ्या कानावर, आई मगाशी बोलत होती ते खरं का हे ? का दोन्ही ? छे या पेक्षा एस्टिने गेले असते दोन महिने तर काय बिघडलं असतं माझं. 
सर्व वाचकांना नम्र विनंती, प्रतिसाद अवश्य द्या.
हर्षद.