Sunday, July 3, 2011

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ९

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ९
सुरेखा धाकट्याला उचलुन आत घेउन गेली, तिच्यामागंमागं ज्योती पण गेली आता फक्त शकुताई अन आत्याच, दोघीच बायका होत्या तिथं, कालच्यासारखं अजुन तरी शिव्या देण्यापर्यंत वेळ आली नव्हती पण कधीही येउ शकली असती, असं वातावरण होतं. जग्गनाथकाकानं पुन्हा मंद्याला विचारलं ’काय रे मंद्या, काय त्ये बोल की शेवटचं, का उगा ओढताय विषय बिनकामाचा’, मंद्या मगाशीपासुन धुमसत होताच त्याला हा चान्स हवाच होता कुणीतरी विचारायचा,’ म्या काय आखाडाचा हक्क सोड्णार न्हाय, नाय विकणार आखाड कुणालाच, काय करायचं ते करा कुणीबी, राव्हदे आखाड मेल्या म्हाता-याचंच नावानं काय बिगडत न्हाय, कुणाचं,’ , ’ठिक हाय’, आत्यानं त्याला उत्तर दिलं’ मग हिसाब कर पाण्यच्या धंद्याचा अन दे वर्साचं पैसं सगळ्याना वाटुन तु, जमिन पायजे पन उत्पन नको द्याया कुनाला असलं नाय चालणार, नायतर हर्षद देतोय ना धा लाख एकराला घे गुमान अन हो बाजुला,’ हा मुद्दा गण्याला सुद्धा पटला, त्यानं पण लगेच हो ला हो केलं. जग्गनाथकाका तर काय तयार होतेच, ते पैसे घेउन काय करणार होते ते माहीत नाही पण वय झालं म्हणुन काय मोह सुटत नसतो माणसाचा. शकुताईचा विरोध होता तो मी पैसे कुठुन आणणार यासाठी, नाहीतर तिला पण पैसे हवेच होते. मंद्या एकटा पडल्यासारखा झाला होता, त्यानं शेवटचा डाव टाकला’ पर म्या पाण्याचा धंदा हाय तसाच करणार, त्याला कुणि हात नाय लावायचा त्याला’, उसनं का होईना पण अवसान आणलं होतंच म्हणुन त्याच तो-यात त्याला बोललो’ छे हे असलं नाही जमणार, जमिन माझी तर विहिर अन विहिरिचं पाणि पण माझंच, घराला अन तुझ्या शेताला जे लागेल ते पाणी ने की, पाणी विकायचा धंदा करणार असशील तर फिफ्टी फिफ्टी करावा लागेल फायदा, आताच सांगुन ठेवतो, पुन्हा नंतर लफडे करायचे नाहीत, जमिन घेतोय म्हणजे माझी माणसं पण आणुन ठेवेनच मी इथं जमिन राखायला, उगा गावातल्यांच्या गमजा नाही चालु देणार, असेल कबुल तर बोला नाहीतर द्या कुणी पण दहा लाख अन सोडवा हा प्रश्न’
बैठक आता चांगलीच तापली होती, एकाबाजुला पाच लाख मिळणारे अन एका बाजुला हेम्या, असं लफडं होतं.सुरेखा धाकट्याला आत झोपवुन परत आली होती, तिच्या आणी मंद्या मध्ये काहितरी डोळ्यानं बोलाचाली झाल्या, काय झालं ते मला समजणं शक्यच नव्हतं. जग्गनाथकाकानं तिला चहा करुन आणायला सांगितला तसं जरा नाराजीनंच उठुन ती आत गेली. अण्णा आता सगळ्यात जास्त वैतागले होते,’ काही ठरवणार आहात का संपलं सगळं आहे तसंच’ ते बोलुन गेले. मंद्या त्यांच्याकडं पहात म्हणाला ’ ठिक हाय मला कबुल हाय सौदा, बाकी जमिनी मी अन गण्या घेतोय काल ठरल्याप्रमाणे अन आखाद घिउद्द्या हर्षदरावांना. व्यवहार कधी पुर्ण करायचे तेवढं बोला आता, माज्याकडं पैसं नाय लगेच द्यायला, १५ दिस तरी सोडा त्यासाठी’ मगाशी काय झालं सुरेखाबरोबर की लगेच तयार झाला, हे समजणं अवघड होतं. पण आता ते समजुन घ्यायच्या नादात मी नव्हतो. शकुताई पुन्हा माझ्याकडं भुत पाहिल्यासारखं पहात होती अन आत्या खुश होती, तीच्या एक दोन डायलॉगनं तिचा बराच फायदा झाला होता. अण्णांचा चेहरा पडला होता पण नाईलाज होता. जग्गनाथकाका निवांत होते, ना खंत ना खेद अशी अवस्था होती.
प्राथमिक स्तरावर बोलणी संपली होती, प्रिंसिपलि अ‍ॅग्रीड अशा अवस्थेत होतं सगळं. आता शकुताई सोडुन कुणीच टेन्स नव्हतं. मी पैसे कुठुन आणणार याचं माझ्यापेक्षा तिलाच जास्त टेन्शन होतं. मी उठुन आत गेलो, लॅपटॉप चालुच होता, हेम्या.डॉक ओपनच होती, हायबरनेट मधुन बाहेर आल्यावर हेम्यानं विचारलं ’ काय रं काय झालं, म्या म्हनतोय तसंच केलंस का आलास पुनांदा शेपुट घालुन **त घालुन,दमच नाय तुमच्यात काय करनार म्या तरी, मरा तिच्यायला असंच घाबरत घाबरत जगा अन असंच मरा एक दिस, कुनाला काय पड्लं नाय तुमच्या जिंदगानीचं’ हे वाचुन मला हसु येत होतं, त्याच्यासारखाच थोडा पॉज घेउन मी टाइपलं ’एकराला दहा लाख घेउन आखाड घेतला मी’, एक रिटर्न पॉज आला, त्यानंतर शब्द दिसले’ शाबास रं माज्या मर्दा, एक तो धाकटा अन तु दोगंच माजा वारसा चालिवणार आता माज्या मागं, मंद्या किती म्हणत होता, सा का सात?’ ’ छे रे तेवढे काय देतोय तो,चार म्हणत होता फक्त, गण्याच सात म्हणत होता, म्हणुन मी दहा म्हणालो, आता पैसे मिळवुन देणं तुझ्या हातात आहे हेम्या. दोन महिने मागुन घेतलॆत मी पैसे द्यायला सगळ्यांचे’
हेम्याचं उत्तर आलं ’मालक जरा लांबच पाय टाकलाय तुमी, धा लाख म्हंजे पंचवीस लाख झालं,आनि पैसं मिळवायला लागणारा कच्चा माल माज्याकडं लागलं, पैसं देणं न्ह्याय, ते तुलाच करावं लागेल, म्या निस्तं पोती भरुन देणार ती नियाची, बाजारात विकाची ह्यो धंदा म्हाजा नवं, आमी शेतात जलम्लो आनि शेतापतुरच आपला आब हाय, एकदा का माल पेंड्यापोत्यात बांदुन घातला आडत्याच्या कट्ट्याला का आपलं काम संपलं, त्यापुडचं कुनाला ठाव कसं असतंय ते’ आता हे वाचुन मी पुरता अडकलो आहे याची जाणिव मला झाली आणि रागाबरोबरच मी एवढा मुर्ख कसा निघालो याचं आश्चर्य पण वाटायला लागलं. थोडं वर स्क्रॉल करुन पुन्हा पहिल्यापासुन वाचायला सुरुवात केली,”एक तो धाकटा अन तु दोगंच माजा वारसा चालिवणार आता माज्या मागं’ हे वाक्य पुन्हा वाचलं, कॉपी पेस्ट केलं खाली अन विचारलं ’ हेम्या ह्याचा अर्थ काय, काल तो इथं खोलीत येउन गेल्यापासुन वेड्यासारखं करतोय, तुझं कालपासुन आत्म्याचं कनेक्शन चाललंय आणि वारस, ह्याचा अर्थ काय आहे नक्की?’ आता बराच वेळ मध्ये गेला नंतर शब्द आले ’ व्हय तुला जे वाटतंय ते खरंय, धाकटा माजायं, मंद्याचा नव्हं’ माझ्या माकडहाडात वायरी घालुन कुणीतरी शॉक देतंय असं वाटत होतं, एकतर हे असलं वाचणं आणि समोर शकुताईचं उभं राहणं,ती आत कधी आली ते कळालंच नव्हतं. शकुताई मगाशी बाहेर नुसतीच टेन्शन मध्ये होती आता वेडी झाल्यासारखी पहात होती माझ्याकडं अन मला जाब विचारत होती मी असं का केलं त्याचा. मी काहीच बोललो नाही,तिचा आवाज ऐकुन दारात सुरेखा अन धाकटा आले होते. मी काहीच बोलत नाही हे पाहुन तडतडत निघुन गेली.
ती बाहेर जायला वळाली तशी, सुरेखा पण निघुन गेली,धाकटा सुरेखाच्या पदरात तोंड लपवुन जाता जाता घाबरुन पहात होता. सगळं आवरायला घेतलं, जेवणं झाली कि निघायचं होतं. वाटणीचे कच्चे कागद बाहेर अण्णा बसुन करत होते, जग्गनाथ काका तिथं होतेच, त्यावर सह्या करुन, जेवणं झाली की निघायचं. मग येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष व्यवहार करायचे होते खरेदि विक्रीचे. पैसे लगेच द्यायला माझ्याकडं पण नव्हते अन मंद्याकडं पण नव्हते. दोन महिन्यात पैसे द्यायचे म्हणजे त्याआधी हेम्याचा कच्चा माल नेउन बाजारात विकावा लागणार होता, त्यासाठि आडत्याचं काम करावं लागणार होतं. पण जो माल बाजारात खपु शकतो असा कच्चा माल त्याला पुरवता आला पाहिजे होता. पैसे कसे येतील यापेक्षा आता कुणाकडुन येतील याची आता मी काळजी करत होतो, डोळ्यासमोर एक दोन कंपन्या होत्या ज्यांच्याकडुन मला या आधी इनडायरेक्ट ऑफर आल्या होत्या डाटासाठि, नित्यानं तर घराचं डाउन पेमेंट पण या पैशातुन केलं असावं अशी मला शंका होती.
गण्या खोलीत आला, कागदपत्रं झाल्याचं सांगायला, माझंही आवरुन झालं होतं. तो जरा बसला म्हणुन मी पण बसलो, आता टेन्शन काही नव्हतं, त्याचा झाला तर तो फायदाच झालेला होता. ’ हर्ष्या, एक सांगु, आखाड ताब्यात घेतलास ना दोन कामं पय्ला कर बग, म्हंजे तुमी नाय गावात राहात म्हनु तुमाला खरं नाय वाटायचं पन अनुभव हाय म्हनुन बोलतो, एक म्हंजे हिरितली देवी भायर काड, एका बाजुला छोटं देउल बांध अन दोन चार झाडं लाव, म्हंजे बाकी जमिनीत तु कायपन करायला मोकळा अन दुसरं म्हंजे ती हिर बुजीव, वरसाकाठी ३-४ मुडदंतर हायत तिथं, लै केलं मंद्यानं जाळ्या लावल्या, माणसं ठिवली राखनीला पन काय उपेग नाय झाला, एकदा तर राखणदारच मेला आत जाउन,शापाची बिपाची कायतर भानगड हाय त्यात, उगा तुज्या चालत्या संसाराला खिळ नको त्यानं.’ तो बोलायचा थांबला तसा मगाशी वाळत आलेला घाम पुन्हा फुटतो का काय असं वाटायला लागलं. मग तोच खांद्यावर हात टाकुन उठत म्हणाला’ सोड ते चल पटकन सह्या अंगटे करा अन जेवाया बसु लगेच, उगा तुमाला निघाया उशीर नको’ ही असली खेड्यातली माणसं आधी काहीतरी करायला लावतिल अन मग नंतर त्याचे तोटे सांगत राहतील अन मग नंतर पुन्हा आपणच सांत्वन करतील वरुन.
बाहेर आलो, भिती, दुख:, आनंद आणि अशा ब-याच भावना एकाच वेळी अनुभवत होतो. हॉलमध्ये सगळे बसले होते, अण्णांनी वाटणीचे मुद्दे वाचुन दाखवले, मध्येच अजुन दोन तीन लोक बोलावले होते पंच लागतात म्हणुन. कागद पुन्हा एकदा सगळ्यांना दिला गेला, प्रत्येकानं वाचुन पाहिला.मंद्या, गण्या मी आणि शकुताई आम्ही सह्या केल्या, शेवटी आत्या अन काकानं अंगठे उमटवले. साक्षीदार म्हणुन अण्णा अन इतर चार जणांनी सह्या अंगठे केले अन एक मोठा कार्यक्रम संपला. ओझं उतरलं अन चढलं एकदमच. अशीच वेळ घराच्या रजिस्ट्रेशनला गेलो तेंव्हा झाली होती. बाहेरची मंडळी निघुन गेली घरचे सोडुन फक्त अण्णा जेवायला होते. काल त्यांनीच फर्माइश केल्याप्रमाणे गव्हाची खीर अन चपात्या होत्या, त्याबरोबर शेंगाची आमटी, वांग्याची कोरडी भाजी अन हरभ-याची कोरडी डाळ, एवढंच होतं. आईच्या हाताची चव नव्हतीच अन आता खेड्यात पण पिवळा अन निळा पोहोचलेत त्यानं चुलीची पण नव्ह्ती आणि असती तरी मला समजली नसती. दोन घास कमीच जेवलो, अजुन ड्रायव्हिंग करत पुण्याला जायचं होतं. बरोबर शकुताई होति, आत्याला सोलापुरला सोडुन पुढं जायला थोडा वेळ लागणार होता. जेवता जेवता शकुताईचा फोन वाजला,बोलता बोलता तिचा चेहरा हसरा होत होता, तिनं फोन कट केला अन ह्सत हसत सगळ्यांना सांगितलं ’ काका, आत्या, अण्णा आता यापुढचं असं एकत्र जेवण हर्षदच्या घरी बरं का, बाप होतोय पुन्हा एकदा, यायचं हं सगळ्यांनी बारश्याला न चुकता’ ऐकुन माझा खिरीतला हात खिरितच राहिला आणि सकाळपासुन अनुला फोन करायचं विसरल्याचं लक्षात आलं, कालच ती बरं नाही म्हणुन तिच्या आईकडं गेली होती तरीपण मी तिला सकाळपासुन फोन केला होता, खरंच पैसा, जमिन, जुमला अन भुतं आपल्याला आपली माणसं विसरायला लावतात हेच खरं.. तिच्या आठवणीत सगळ्यांचे अभिनंदनाचे अन बाकी टोमणे ऐकुच आले नाहित, मला आता फक्त लगेच निघायचं होतं माझ्या अनुला भेटण्यासाठी...

Print Page

1 comments:

vijay said...

पुढचा भाग कधी ?

Post a Comment