Thursday, October 28, 2010

आत्महत्या

आत्महत्या ----

का करावी वाटते आत्महत्या, आणि ते सुद्धा वयाच्या २० -२२व्या वर्षी. 

जमलेले सगळे झालेल्या घटनेला अतर्क्य, अकल्पित वगॆरे म्हणत होते, पण आदर्शला का वाटलं असेल 

या मार्गानं जावं असं, असतील काही समस्या, प्रश्न आणि जटिल पण असतिल तरी हे पाउल घेण्याआधी सगळे इतर मार्ग संपल्याची खात्री केली होती त्यानं ? 

कोणि नसेल का भेटला त्याला जसा पार्थाला भगवान भेटला, आता मान्य कि पार्थ आत्महत्या करायला चालला नव्हता , पण एका क्षत्रियानं युद्ध नाकारणं म्हणजे आत्महत्याच होती की एका प्रकारे.त्याला आमक्लेश झाला होता किंवा होत होता,पण भदवदगीता ऎकुन त्याचा आत्मक्लेश दुर झाला.पण या मझ्या मित्राच्या बाबतीत असं म्हणणं बरोबर ठरेल का  कि त्याचा आत्मक्लेशच त्याच्या आत्महत्येला कारणीभुत ठरला.

दारु सिगारेट वगॆरे होतं पण व्यसन होईल इतकं नाही, एक दोन प्रेम प्रकरणं सुद्धा होऊन गेली आहेत. 

मी आता विचार करतो आहे, मी त्याच्या क्रुष्ण व्हायला हवं होतं का ? मी होऊ शकलो असतो का क्रुष्ण,सांगु शकलो असतो त्याला आमच्या दोघांच्या आयुष्यापुरती गीता ? करु शकलो असतो का त्याचा आत्मक्लेश दुर ज्यामुळे त्याने अशा प्रकारे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला नसता ?

असे बरेच प्रश्न आता पडत आहेत माझ्या मनाला पण मेंदु म्हणतो अरे वेड्या जर असं समजलं असं की त्याच्या दुखाचं कारणच तु आहेस तर, तर काय केलं असतंस? त्याची माहिती असलेली प्रेम प्रकरणं ठिक आहे पण असं समजलं असतं की तो कस्तुरी वरच प्रेम करतो आहे तर, मग तुझ्यातल्या क्रुष्णानं काय केलं असतं? उगाच नसतं विचार करु नकोस. काल पर्यंत तो होता आणि आता नाही हेच एकमेव आणि अंतिम सत्य आहे आणि तुला ही हेच ..........

क्रमश...

Thursday, October 21, 2010

मी मज हरपून

गा, मी सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे माझी एक आवडती क्रिया.
माझा आवाज़  काही फार चांगला वगैरे नाही, वरचा सा खालचा ध हे मला समजत नाही. परन्तु ऐकतोय ती गाणी चांगली की वाईट हे समजते.

मला गाण्यातील स्वर आणि तालाच्या आधी, त्यातले शब्द भावतात. शब्दांच्या केलेल्या हरकती , खेळ यां कड़े माझे जास्त लक्ष जाते.  अनूप ज. यांचे भजन '' हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो'' याचे उत्तम उदहारण. सुरुवातीचे हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो आणि आता आई ऐकतच नाही अजुन तिला संशय आहे असे लक्षात आल्यावर झालेला बदल हे मैंया मोहि मैंनेही माखन खायो, हा बदल जेंव्हा समजतो तेंव्हा हे शब्दच सुर आणि तालाच्या सुन्दर कव्हर मधला मुद्देमाल आहे हे लक्षात येते.

आज लिहितोय ते मराठी मधील '' मी मज हरपून बसले ग '' या गाण्यात ही, पहिली दोन कड़वी शृंगार रसावर आधारित आहेत, गाणे बहुधा राधेला मनात कल्पुन असावे, अतिशय सुंदर गाणे आहे. पहिली दोन कडवी राधा तिच्या आणि कृष्णाच्या शृंगाराबद्दल सांगते आहे तिच्या सखीला, हो सखिलाच कारण तिच्या साठीच तर आहे तो सुरेख ग आणि आशा भोसलेंचा  आवाज. या गाण्यांत तर स्वत: श्रीरंग ही  या आवाजाला राधेचाच समजला असता.

' साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग ' ,  मी ५वी  - ६वीत असल्यापासून प्राजक्ताची फुले माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, म्हणून ' प्राजक्तासम टिपले ग ' याचा याची देहि याची डोळा आणि याची हाती अनुभव आहे. आणि त्यात भर घातली ती चंद्रशेखर गोखालेंच्या कवितेनं
प्राजक्ता झाडावरुन ओघलतो
त्याच्या आवाज होत नाही
याचा अर्थ असा नाही की
त्याला इजा होत नाही ,
असो विषयांतर फार झाले,  प्राजक्ता  आणि  गोखले हे सगळे स्वतन्त्र विषय आहेत.

दुस-या  कडव्यात  राधेला दिव्याची वात आणि गज-यातून मोकळ्या होउन पसरलेल्या मोगा-याच्या  कोमेजल्या कळ्या  या सारख्याच  वाटताहेत.  एकीकडे पहाटेच्या मंद वा-याने होणारी  वातीची थरथर  तर दुसरीकडे तीच थरथर राधेत जागवतो आहे श्रीरंग.  राधेच्या या हालचालीनी  श्रीरंगाला पण  जाग आली आणि त्याने जो स्पर्श केला राधेला, त्या सुख स्वप्नात तिला वाटले की आपण  कालिंदी काठी असलेल्या झोक्यावर आहोत काय पण श्रीरंगाचा  स्पर्श आहे हे समजल्यावर तिला प्रथम लज्जेची जाणीव झाली पण नंतर त्या लज्जेतुन बाहेर येतांच ती उमलली आणि मग ती त्या झोक्यांवर झुलू लागली.

गाण्या मधल्या तिस-या  कडव्या तील' त्या नभ श्यामल मिठीत नकळत बिजलिसम लखलखले ग ' या ओळी भर उन्हाळ्यातच काय पण रिपरिप येणा-या पावसांत सुद्धा डोळ्यांसमोर  धुवांधार पावसाची  चित्रे  उभा करतात.
एवढ्यात बहुधा कुणाच्या तरी येण्याची चाहुल लागते आणि राधा लगेच आपल्या सखीला या शृंगार जालातुन बाहेर  काढताना म्हणते ''दिसला मज तो देवकी नंदन ', संपलच सारे  शृंगारचा पासून सपशेल फरकत आणि चक्क आता श्रीरंगा वरून राधा एकदम देवकी नंदन  पर्यंत  येउन पोहोचते.

 ज्या श्रीरंगाने राधेला प्राजक्तासम टिपलं ,  ज्याच्या श्वासांनि  ती थरथरली, ज्याच्या स्पर्शानी ती लाजली, उमलली आणि    झुलली, त्याच्या मिठीत बिजलीसम लखलखली पण, आता सांगताना मात्र कशी सांगते आहे  त्या लखलख प्रकाशांत दिसला तो कोण,  तो नभ शयामल श्रीरंग नाही, राधा म्हणते  '' दिसला मज तो देवकी नंदन , अन मी डोळे मिटले ग ''

या राधे कृष्णाच्या सुन्दर गीतांने मी या लेखन प्रकारची सुरुवात केली आहे आणि माझ्या क्षमते नुसार पुढे ही विविध गीतां बद्दल लिहेन.

धन्यवाद

माझा आणि तुमचा
हर्षद,

Tuesday, October 19, 2010

kahi aathvani

आताशा माझे पिल्लू ३ वर्षे १० महिन्यांचे आहे, कधी अड़ते कधी पड़ते. कधी त्याला समजावतो कधी रागावतो.
हे त्याच्या वागन्या पेक्षा माझ्या मूड वर जास्त अवलंबून असते.  नंतर उगाच विचार करतो बाबा पण असेच काही करायचे ना.

लहानपणी मी एकदा घरात काहीतरी माझ्या मनासारखे झाले नाही म्हणून चिडून बसलो होतो आणि मग घर सोडायला निघालो होतो, फकत बाबांची वाट पाहत होतो. अशासाठी की बाबा येउन माझा प्रश्न सोडवू शकतील अशी आशा होती. बाबा आले शालेतुन आणि घराबाहेर पाय-यावर बसून माझ्या बरोबर बोलत होते १० च मिनिटे. काय बोलले ते आता आठवत नाही पण ते जे काही होते बहुधा तोच माझ्या आयुष्याचा बेस झाला आहे.

मुंजित वडिलांना गुरु मानून जो गुरुमंत्र देतात ना हे त्या पेक्षा ही पवित्र आणि गंभीर होते, बाबा मला बहुधा आमच्या परिस्थिति बद्दल सांगत असावेत असे वाटतेय. मला समजले की नाही माहित नाही पण माझा राग मात्र शांत झाला होता.
आज पण गोंधळ झाला की आपोआप तो कोड excute होतो आणि गोष्टी सोप्या वाटायला लागतात.

आज मी बाप झाल्यावर माझ्या बाबांबद्दल विचार करतो तेंव्हा आपसुकच डोळे भरून येतात, मग वयामागे आणि वेळेमागे गेलेल्या आणि तिथेच अड़केल अशी भीती असणा-या मनाला पुन्हा वर्तमानात आणताना कष्ट होतात

हर्षद.

Sunday, October 17, 2010

Ga aani Kha

गा आणि खा , मराठीतील दोन सर्वात छोटी पण सर्वात महत्वाची क्रियापदे.
मला माझ्या आयुष्याचे सगळे खेळ समजावून सांगणारे, आणि आता मी सांगेन तुमच्या ही.

माना किंवा नको नो इश्यु पण हेच पाहिले आणि अंतिम सत्य आहे

इंग्लिश मध्ये म्हणे आय ऍम हे सगळ्यात छोटे अर्थपूर्ण वाक्य आहे, असो बापडे. आमच्या माय मराठीत मात्र गा आणि खा  ही क्रियापदे जवळ पास सगळे आयुष्य व्यापतात.  अर्थ काय अनर्थ सगळे यांतच येते.

माझ्या ब्लॉग वर तुम्हाला काही दिवसातच मेनू कार्ड पहायला मिळेल, आर्डर देण्यासाठी नहीं तर आर्डर कैंसल करण्यासाठी,
अशी जी तुम्ही कधी दिलीच नव्हती. चायाला जोडाक्षरे लिहायला जास्त वेळ  लागतो आहे. सुधारणा होइल ही अपेक्षा मी आणि तुम्ही दोघेही ठेवू म्हणजे बाई ठेवतात तसे , लफडी अशी असतात की कधी निस्तरता येत नाहीत.

पण अशी लफडी नसतील तर आयुष्य शर शय्येवर ( असले जड़ शब्द मला चालत नाहीत पण माझेच वजन .... असो हा वेगला विषय आहे) पडलेल्या  भीष्मा  सारखे होइल. दिरेक्टोर आपण पण कुणी ऐकतच नाही.

चला क्रमश करतो,  काय आहे  ल ला ळ करायचे अजुन जमत नाही.

आज दसरा कागदावरुन नेट वर सीमोलंघन करत आहे.

माझा आपला आणि कुणा कुणाचा

हर्षद.