Wednesday, September 26, 2012

क क कपलचा - भाग ०९

पाणी प्यायला उठत अनुजानं विचारलं ' शरद मारतो ना ग तुला, तु असं नाही म्हणालीस तर ?' - पुढे चालु....
अनुजानं तिची कथा सांगावी आपण ऐकत रहावी, कथा संपली की तिच्या दुखा:बद्दल दोन अश्रु ढाळावेत, तिच्यात नसलेल्या अन आपल्यात नसलेल्या धैर्याबद्दल थोडी चिडचिड करावी अन निघुन जावं, असा सरधोपट विचार स्मिता करत होती, पण ऐकता ऐकता आपण यात एवढं रंगुन जावु याची तिला कल्पना नव्हती, आणि या अनोळखी क्षणी ती बोलुन गेली ' हो, ब-याचदा', देवळाबाहेरची घंटा निशब्द अडकुन असते पण कुणीतरी नाद केला की आपल्याच आवाजानं थरारुन जाते तशी स्मिता थरारली, काहीतरी बोलु नये असं बोललं गेलंय ते सावरण्यासाठी ' म्हणजे याचसाठी असं नाही, बाकीही बरीच कारणं असतात, त्यांची ड्युटीच तशी आहे ना, दिवसभर चौकात उभं रहायचं केवढं टेन्शन असतं गं,' तिच्या सावरासावरीचं अनुजाला मनापासुन हसु आलं, कसंबसं तोंडातलं पाणी गि़ळुन ती हसायला लागली. ' माझ्यापासुन काय लपवतेस तु स्मिता, अगं वरच्या पाट्या वेगळ्या असतात, आत सगळ्या एस्ट्यांच्या सीट फाटलेल्याच असतात, तुला हवंय का पाणी ?' स्मिताला हवंच होतं, ती पाणी पित असतानाच अनुजानं विचारलं' एक सांगु स्मिता तुला, निदान माझ्याबरोबर तरी उघड उघड बोल, काही सांगणार नाही मी ना हर्षदला ना शरदभावोजीना, केसच्या ८ महिन्यात कुणाला कधी काय आणि कसं सांगायचं आणि काय लपवायचं हे चांगलं समजलं आहे मला.'
' पण नक्की कसली केस झाली होती, तु तक्रार केलीस का पोलिस स्टेशनला सरांबद्दल ?' स्मितानं पुढचा प्रश्न विचारला, ' हं, छे ग, मी काय जाणार होते तक्रार करायला, आणि कशाची तक्रार करणार होते, माझा नवरा असं वागतो, असं करतो, तसं करायची जबरदस्ती करतो अशी, कोण ऐकणार होतं माझं, उलट तिथंच माझ्या चारित्र्याचा पंचनामा मांडला असता, आणि माझ्या मागं त्यावरुन मनमुराद हसले असते, शेवटी हे झालंच कोर्टात, काही टळलं नाही नशिबातलं.' या विषयावर तिला फार बोलायचं नव्हतं, पटकन उठुन ती निघुन बेडरुम मध्ये गेली, दार आतुन बंद करुन घेतलं. स्मिताला काय करावं हेच सुचेना, तिनं भेदरुन बेडरुमच्या दरवाजावर थापा मारत अनुजाला हाका मारायला सुरुवात केली, दोन तीन मिनिटं गेली, अनुजा बाहेर आली, रडुन ओला झालेला चेहरा कोरडा केल्याचं दिसत होतंच. स्मितानं तिचे दोन्ही हात हातात घेत ' सॉरी ग, माझंच चुकलं, हा विषयच काढायला नको होता मी, ' असं सांत्वनाचा प्रयत्न केला. ' असु दे गं, कधीतरी आपली दुख: उगाळायला सुद्धा बरं वाटतं, आणि ज्या दुखातुन सहिसलामत बाहेर पडतो ती दुख: तर जास्तच आठवतात आपल्याला' अनुजा तोंड धुवायला बाथरुम मध्ये गेली. ती बाहेर येत असतानाच स्मितानं तिला विचारलं ' इतर वेळी बरा धीर दाखवतेस, केसचा विषय निघाला की फार अवघडतेस एकदम, का ग?'
'घरातली दुख: कितीही मोठी असली तरी घराच्या चार भिंतीत फार छोटी असतात, जेंव्हा त्यांच्या बाजार मांडला जातो तेंव्हा असहय होतं सगळं. मला माझ्या लग्नाच्या नव-यानं आमच्या घरात काय करावं आणि काय नाही हा आमच्या दोघांच्या मधला व्यवहार होता, खुशीचा असेना का जबरीचा असेना, पण जेंव्हा जग यात तोंड खुपसायला लागतं, तेंव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या आहेत ते जाणवायला लागतं, आणि नसतील तरी हे जग त्यांच्या मोठेपणा तुमच्या नजरेसमोर असं नाचवत राहतं की तुम्हाला तुमच्यातलं नसलेलं खुजेपण टोचायला लागतं, नुसतं टोचतच नाही तर जगणं नकोसं करतं, फुग्याच्या आत टाचणी घालुन फुगा फुगवला तर आतल्या टाचणीला कसं वाटेल, तसं वाटायला लागतं. फुग्याच्या आत टाचंणीला सुरक्षित वाटतं, पण हा सुरक्षेचा घेराव आपल्यामुळंच फुटणार आहे ही भीती सुद्धा असते प्रत्येक क्षण जगताना, प्रत्येक हालचाल करताना. स्वताचे अस्तित्व जपायचं आणि फुगा फुटणार नाही याची काळजी घेत जगणं फार मुश्किल असतं. केसच्या सुरुवातीच्या दिवसांत सरांना बहुदा केस करुन आनंद मिळत होता, मला धडा शिकवल्याचं समाधान वाटलं, माझ्या चारित्र्यावर संशय घेउन मी दिलेल्य त्रासाचा, मी केलेल्या अपमानांचा बदला घेतल्याची भावना त्यांना सुखावुन जात होती, पण जसजशी केस पुढं पुढं गेली तसं तसं त्यांनासुद्धा चटके बसायला लागले' अर्धवट निघालेल्या खपलीवर मलम लावलं की जीवाला शांतता लाभते तसं झालं अनुजाला, एका दमात एवढं सगळं बोलुन गेल्यावर.
दोघी जणी हॉलमध्ये बसल्या होत्या, 'म्हणजे तुला काय म्हणायचंय, कळलं नाही मला' स्मितानं पुन्हा प्रश्न केला ' आपण बायका फुगा असतो का टाचणी, की आपला संसार हा फुगा असतो आणि आपण टाचणी, समजलं नाही मला.' अवघडलेले हात मोकळे करायला आळस देत स्मितानं विचारलं. काही क्षण शांतता पसरली आणि मग अनुजानं विचारलं ' का ग, आपण बायकाच प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यावर ओढुन घेतो, का वाटतं तुला हा संसार म्हणजे फुगा आणि आपण त्यात अडकलेली टाचणी आहोत, असं का नाही वाटलं की फुगा म्हणजे संसार असेल आणि टाचणी म्हणजे पुरुष, प्रत्येक वेळी संसार फुटणं किंवा न फुटणं ही जबाबदार बाईचीच का असते किंवा बाई ती ओढुन का घेते आपल्या डोक्यावर ?' का नाही पुरुषाकडं त्या नजरेनं पाहिलं जात, का त्याला गुन्हेगार केलं जात नाही, या समाजानं नाही केलं हरकत नाही पण आपण बायका तरी का अशा समजुतीत राहतो, नुकसान कुणाचं होतंय अशानं आपलंच ना ? ' स्मिताकडं या प्रश्नांची उत्तरं नसावीत अशा नजरेनं तिच्याकडं पहात अनुजानं आपलं बोलणं थांबवलं, ' वाचलीत, मी सुद्धा असली स्त्रिमुक्ती वाल्यांची पुस्तकं वाचली आहेत, थेट त्यातलीच वाक्यं बोलतेस तु, तुझ्या केसमध्ये कुणी होतं का स्त्री जागरण मंचवालं ?' वर्गातल्या ढ विद्यार्थ्याला एखादा प्रश्न विचारुन त्याची जिरवायची असा विचार करुन एखादा नवीन मास्तर वर्गात येतो आणि नेमका त्याच दिवशी तो विद्यार्थी आख्खं अपेक्षित पाठ करुन आलेला असतो, मग मास्तरला कसं वाटतं, तसं अनुजाला झालं, या प्रतिप्रश्नाची अपेक्षाच नव्हती ठेवली तिनं.
' चहा करु का कॉफी ग, काय घेणार तु?' वेळ उलटी आली की विषय बदलायचा हे बायकांना जन्मजात येतच असतं आणि त्यात केसचा अनुभव यामुळं असं करणं अनुजला फार अवघड गेलं नाही, दोघी उठुन किचनमध्ये गेल्या, स्मितानं कॉफी करायला घेतली तशी अनुजा निवांत खुर्चीवर बसली ' किती छान वाटतं ना आपल्याच घरात कुणीतरी फुकट बसवुन चहा करुन देतंय ते, मला तर फार बरं वाटतं, पण आमच्याकडं कुणी येतंच नाही असं करुन द्यायला' कॉफि साठी दुध गरम करायला ठेवुन स्मिता कट्ट्यावर बसत स्मितानं विचारलं ' केस नक्की कसली झाली होती, म्हणजे केली होतीस तु ?' अनुजा हसली, थोडंसं असहाय वाटेल असं हसु होतं, ' मी केली, सांगितलं ना तुला, मी नव्हती केली केस, सरांनी केली होती केस, आणि केस कसली घटस्फोटासाठी अर्ज केला कोर्टात, एकतर्फी', स्मिता जवळ जवळ ओरडलीच, त्याला उतु जाणा-या दुधाच्या चरचरण्यानं साथ दिली, गॅस बंद करता करता तिनं विचारलं ' काय, हे असं घाणेरडं वागुन, तुला एवढा त्रास देउन त्यांनीच घटस्फोटासाठी अर्ज केला, नालायक मनुष्य असणार नक्कीच, शिक्षक म्हणायच्या लायकीचा नसणारच तो, हरामखोर कुठला, लाज नाही वाटली असं करायला त्याला' कळत नकळत स्मिता एकेरीवर आली होती. ' काही म्हण हे असंच झालंय, एके दिवशी सर वकिलाकडुन दोन सेट घेउन आले परस्परसंमतीने घटस्फोटाचे त्यावर सही करुन दे असं सांगितलं, मला वाटलं होतं की त्यांना जे हवंय जसं हवंय ते दिल्यावर ते समाधानी असतील, माझ्या मागण्या सोडुन द्यायची मी तयारी दाखवली, त्यांच्या हातापाया पडुन झालं, रडुन झालं, काही उपयोग झाला नाही. त्या रात्री सर बेडरुम मध्ये झोपले एकटेच, मी रात्रभर हॉल मध्ये जागी होते, दोन तीन वेळा पळुन जायचा विचार केला, दरवाज्यापर्यंत आले, दरवाजा उघडला पण मागं फिरले.'
' का, एवढा चांगला चान्स होता त्या नरकातुन बाहेर पडायचा मग का नाही पळुन गेलीस ?' स्मितानं कॉफिचा कप अनुजाच्या हातात देत विचारलं ' मोह असतो, सगळे रस्ते बंद झाले तरी एक नविन रस्ता असेल जवळ्च कुठंतरी अशी आशा असते आणि खरं सांगु मला वेड लागलं होतं, व्यसन लागलं होतं सुखाचं, या शरीराचे लाड करुन घ्यायचं ते सुटणं अवघड होतं, फरक एवढाच होता की पुरुष हे उघड व्यक्त करतात या ना त्या मार्गानं स्त्रीला ते शक्य होत नाही किमान आपल्याकडं तरी, जेवढं मिळेल तेवढ्यात सुख मानायची सवय लागलेली असते किंवा लावलेली असते, माझी ती सवय बदललेली होती आणि एकदा पायवाट सोडुन रान तुडवायला सुरुवात केली की सुरुवातीला टोचणारे काटे नंतर सुखावायला लागतात, प्रत्येक वेळी पाय समजुन उमजुन काट्यांवर पडायला लागतो, माझं तसं झालं होतं. शेवटी व्यसन ते व्यसनच आणि मी त्यात अडकले होते. आठ दिवस सर काहीच बोलले नाहीत घरात जेवण पण करत नव्हते, आणि एक दिवस संध्याकाळी त्यांनी सांगितलं की त्यांनी एकतर्फी केस दाखल केली आहे आणि उद्यापासुन ते वेगळं राहणार आहेत, माझ्या जगण्या खाण्याची सोय माझी मी पाहायची आहे' कॉफि संपवुन दोघी पुन्हा गॅलरीत येउन बसल्या, स्मितानं विचारलं' पण घटस्फोटासाठी नक्की काय कारण दिलं होतं सरांनी, म्हणजे असं नुसतंच हवाय म्हणुन घटस्फोट मिळत नाही ' अनुजा ह्सली ' तुला ग काय माहित घटस्फोटाबद्दल एवढं, शरदनं कधी ऑफर केला होता का, का तुच घेतली आहेस माहिती याबद्दल,' आपण प्रश्न विचारुन चुकतोय आणि फसतोय हे समजुन सुद्धा आपण असे प्रश्न का विचारतो हे स्मिताला कळत नव्हतं. ' कारण ना, विवाहबाह्य संबंध असणे, थोडक्यात चारित्र्य वाईट असणे हे प्रमुख कारण होतं, त्यामुळं संसाराकडं दुर्लक्ष, मुल होउ न देणं वगैरे वगैरे गोष्टी त्यातच आल्या त्यानंतर'
थोडंसं चाचरत स्मितानं विचारलं ' पण तु म्हणतेस तसं तुला लागलेलं हे व्यसन पुर्ण करायला तु कोणताही मार्ग अवलंबले असतील, विस्तु असल्याशिवाय धुर नाही येणार ना, सरांना संशय आला असेलच तुझं वागणं पाहुन' अनुजानं थोडं चिडुन विचारलं ' का ग का संशय यावा, ज्याच्या जोरावर ते मला उपभोगायचे किंवा मी तसं सुख द्यावं अशी त्यांची अपेक्षा होती त्याच मार्गांनं मी त्यांना सुख मागत होते यात माझं काय चुक होतं, त्यांचं वागणं पाहुन मला संशय आला होता पण त्याचं मुळ कशात आहे ते मी शोधुन काढलं आणि तोच मार्ग अवलंबला म्हणुन असले आरोप करायचे, ते ही थेट घटस्फोटासाठी' तेवढ्यात बाहेर दरवाजा वाजला, अनुजा बाहेर गेली तसं स्मितानं धीर गोळा केला ती परत आली की तिला काहितरी विचारण्यासाठी. ' कसलीतरी वर्गणी मागायला आले होते ' बेडरुममधला लाईट लावत अनुजा बोलली ' ये ना इथंच बसु, गॅलरीचा दरवाजा बंद करावा लागेल नाहीतर डास येतात घरात ' स्मिता दार लावुन आत आली, बेडवर बसत तिनं विचारलं ' पण तु देखील नक्की काहीतरी केलं असणारच त्या शिवाय ह्या थराला सर जाणार नाहीत, कारण बघ तु बरंच काही मागत होतीस तरी त्याबदल्यात त्यांना जे हवंय ते मिळत होतंच ना, मग ?' ' बरोबर पकड्लंस, ' अनुजा खाली जमिनीवरच बसत म्हणाली , ज्या दिवशी सरांनी घटस्फोटाचे अर्ज आणले त्या आधी दोन दिवस आम्ही रात्र जागवली होती, शेवट त्या दिवसांत व्हायचा तसं माझ्या रडण्याऐवजी सरांच्या चिडण्यात आरडा ओरडा करण्यत झाला होता, ते निघुन हॉलमध्ये गेले, आणि सकाळी जेंव्हा ते निघाले तेंव्हा मी त्यांच्या हातात एक जाहिरात ठेवली होती पेपरमध्ये आलेली ' अपने खोये हुवे पौरुषत्व की पुनप्राप्ती के लिये हमारे पास आये अक्सीर इलाज सिर्फ तीन दिनोमे' आणि म्हणलं ''when you cannot avoid it, try improving it'



Print Page

0 comments:

Post a Comment